उद्योजक आपल्या भेटीला- मिहीर राजगुरु

Submitted by Admin-team on 2 August, 2011 - 02:45

"गुरुकृपा"- अप्पा बळवंत चौकात असलेले लहान मुले व जेन्ट्सच्या तयार कपड्यांचे दुकान. गुरुकृपा हे फक्त दुकानाचे नाव नसून शर्टसचा एक ब्रँड कसा झाला त्याची हकीगत मालक 'मिहीर राजगुरु' यांच्याकडून खास मायबोलीकरांसाठी.

mihir.jpg

प्रश्न- प्रवास कसा सुरू झाला तुमच्या व्यवसायाचा?

मिहीर - मी ऐंशीच्या दशकात बी.ई.-मेटॅलर्जी घेऊन पुण्यातल्या सी.ओ.ई.पी. मधून पास झालो. शिरस्त्याप्रमाणे नोकरीही मिळवली. बारा वर्षे कल्याणी ग्रुप मध्ये निरनिराळ्या जबाबदार्‍या घेऊन कार्यरत होतो. वडीलही डेक्कन कॉलेजमध्ये आर्किऑलॉ़जीचे (पुरातत्व खाते) प्रोफेसर आणि संशोधक असल्याने घरामध्ये अभ्यासाचे वातावरण. इतर चार मराठी घरांसारखे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत नोकरीने बांधलेले वळ घड्याळालाही. आजोबांचे स्टेशनरीचे दुकान होते. पण नंतर मला, वडीलांना दुकानात लक्ष घालायला वेळ नसल्याने बंदच होते. बंद दुकानाच्या विक्रीच्या, वापरायला मागायच्या सतत चौकशा होत होत्या. पंधरा ऑगस्ट १९९९ ला आमचे परिचित श्री. सुधाकर जाधव यांनी मुंबईला रेडिमेड गारमेंटसचे "गुरुकृपा" नावाने दुकान काढले व माझ्याकडे कपड्यांचा एक गठ्ठा सुपूर्द केला. "हे आता तूच बघायचेस. मला गठ्ठा परत नको" असे बजावून सांगितले. सुरुवातीला घरातूनच विक्री सुरु केली. परंतु घरी आल्या-गेलेल्यावर उगाचच खरेदी करायचा दबाव येतोय, उधारी वाढतेय हे लक्षात येताच आम्ही हा बाडबिस्तारा आजोबांच्या जुन्या दुकानात हलवायचे ठरवले. दुकान होते फक्त ८० स्क्वेअर फूट! सुरुवातीची पाच वर्षे ही जबाबदारी संपूर्णपणे माझ्या बायकोने घेतली. कपड्यांच्या वेगवेगळ्या ब्रँडपेक्षा लोक आपल्याकडे विश्वासापोटी येतायत हे हळूहळू कळले. सुधाकररावांनी "गुरुकृपा" नावाचा ब्रँड सुरु केला. त्यांच्या प्रोत्साहनाने मी पुण्यातही काम सुरु केले. माझी नोकरी चालू होतीच. पण दरवेळेस सीझनला सुट्या मिळणे अवघड होऊ लागले. पोस्ट वाढत गेली तसे हे आणखीच कठीण होऊन बसले. अखेरीस २००२ साली मी नोकरी सोडून पूर्ण वेळ "गुरुकृपा" ला द्यायचे ठरवले.

प्रश्न- कोणत्या समस्यांना नेहेमी तोंड द्यावे लागतेय?

मिहीर - नेहमीचेच प्रश्न. कामगारांची धरसोड. त्यांना भरपूर मागणी असते. इतर प्रांतातून आलेले बडे दुकानदार त्यांची रहायची, जेवायचीही व्यवस्था करतात. ते आपल्यासारख्यांना शक्य नाही. शिवाय यांना मोठ्या एसी ऑफिसेसमध्ये हाऊसकीपींग स्टाफ म्हणून खूप मागणी आहे. ग्राहकांबद्दल सांगायचे तर क्वालिटीपेक्षा डिस्काऊंट महत्त्वाचा वाटतो. मग 'बार्गेन मार्जिन' ठेवले की किंमत वाढणारच. ग्राहक शिक्षण नाही. आपल्या उद्योगाचा आवाका छोटा असल्याने मोठमोठ्या जाहिराती करणे शक्य नाही.

प्रश्न- या व्यवसायात नवीन काही कल्पना मनात घोळत आहेत? किंवा याशी संबंध नसलेल्या दुसर्‍या एखाद्या व्यवसायाबद्दल?

मिहीर - आम्ही आता शाळांचे दर्जेदार युनिफॉर्म बनवून देतो. कंपनी लोगो असलेले एक्सक्ल्युजिव क्वालिटी टी-शर्टही बनवून देतो. मी माझ्या इंजिनियरिंग शिक्षणाचा उपयोग म्हणून फ्लॉकिंग मशीन्सची एजन्सीही घेतली आहे. त्यासंदर्भात जर्मन कंपनीशी व्यवहार चालतो. मी जर्मनीला प्रत्यक्ष जाऊन ते तंत्र शिकून घेतले. फ्लॉकिंग हे वेलवेट मोल्ड करण्यासाठी वापरले जाते. ज्वेलर्स कडे मिळणार्‍या दागिन्यांच्या बॉक्सेस मध्ये, लक्झरी कार्सच्या इंटेरियर डिझाईनमध्ये तुम्हाला याचा उपयोग केलेला आढळेल. हा व्यवसाय इंटरनेट माध्यमातून मी अधिक सांभाळतो.

प्रश्न- धंद्यात नव्याने पाऊल टाकणार्‍या आम्हा मायबोलीकरांना काय सल्ला द्याल?

मिहीर - स्टेटस मधून बाहेर पडणे महत्त्वाचे. इंजिनियर झालो म्हणजे तेच काम केले पाहिजे असे नाही. ज्ञानाचा उपयोग कधीही कुठेही होतोच होतो. व्यवसाय धंदा करायचा असेल तर मार्केट रिसर्चला पर्याय नाही.

***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली, अनुमोदन.

आता हे दुकान कुठे आहे? मार्केट सेगमेंट कुठचे आहे? तयार कपड्यांच्या दुकानात मार्जिन कशी मॅनेज केलेली असते? क्वालिटीचे परिमाण काय असते (कुठच्या तरी ब्रँडने मला सांगितलेलं की १ इन्चात १५०० टाके घालतात ते, खखोदेजा)?एखादी रेंज कशी मॅनेज करतात, म्हणजे नविन पॅटर्न, किमतीत बदल वै?

मला स्वतःला तयार कपडे (लहान मुलांचे) व्यापारात रस आहे. वरील प्रश्णांची उत्तरे मिळाली तर मार्गदर्शन होईल.

मुलाखतीची सुरूवात चांगली झाली आहे. इथे वाचकांकडून येणारे प्रश्न आणि मग त्यावर दिलेले उत्तर असे प्रश्नोत्तरे स्वरुपाची मुलाखत (interactive) ही पद्धत आवडली. तरीही सुरूवातीची मुलाखत अजून थोडी खोलात हवी असे वाटते.
मला पडलेले काही प्रश्न जे मुलाखतीत यायला हवे असे वाटले
१. या व्यवसायासाठी कुठली कागदपत्रे लागतात, ती कशी मिळवायची? किती खर्च, वेळ लागतो.
२. नोकरी करत व्यवसाय सांभाळणे आणि मग नंतर पूर्णवेळ व्यवसाय करणे हा निर्णय घ्यायला ३ वर्षाचा कालावधी लागला असे वरच्या मुलाखतीतून कळले. या तिन वर्षात व्यवसाय किती वाढला. या तिन वर्षात Breaking even परिस्थिती आली का की तसे नसतांनापण नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
३. आपल्याकडे ग्राहक शिक्षण नाही असे म्हटलय, इथे ग्राहक शिक्षण म्हणजे काय अपेक्षित आहे.
४. दुकानातील मालाबद्दलचे विक्रीचे नियम कसे ठरवले जातात (उदा: एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही, रंगाची खात्री दिली जाणार नाही इ.इ.)
परदेशात बरेच ठिकाणी कुठलीही वस्तू असो ती ३० दिवसांच्या आत कुठल्याही कारणाशिवाय परत करता येते आणि परत केल्यावर सगळे पैसे परत मिळतात तसे काही करून ग्राहकवर्ग वाढवण्याचा विचार केला आहे का? ते भारतात शक्य आहे का.

मुलाखत सुरू कधी झाली आणि संपली कधी कळलंच नाही.

मायबोलीकरांचे प्रश्न जरी अपेक्षित असले तरी मूळ मुलाखत घेणार्‍याने ती जास्तीत जास्त प्रश्नांना हात घालणारी करावी. ही फारच त्रोटक आणि उरकलेली वाटली. याआधीच्या जास्त छान होत्या.
कृपया मुलाखतकाराने राग मानू नये. Happy

नोकरी करत व्यवसाय सांभाळणे आणि मग नंतर पूर्णवेळ व्यवसाय करणे हा निर्णय घ्यायला ३ वर्षाचा कालावधी लागला असे वरच्या मुलाखतीतून कळले. या तिन वर्षात व्यवसाय किती वाढला. या तिन वर्षात Breaking even परिस्थिती आली का की तसे नसतांनापण नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
>>>>>>>>

हे असे निर्णय खराखुरा व्यावसायिक आपल्या इंस्टिंक्टवर घेत असतो, इतके जमाखर्च मांडत नाही.

नाहीतर कित्येक वेळा मग "अतिविचार कृती शून्य" अशी अवस्था होऊ शकते आणि हातची संधी निघून जाते.

मुलाखत छान झालीय. इथे आप्पा बळवंत चौक ही जमेची बाजु होती तथापी आप्पा बळवंत चौकात असलेले दुकान अन इतर शहरात/ गावात असलेल्या दुकानाच्या व्यवस्थापनात तफावत असेन. त्या दृष्टीने काही माहिती दिल्यास बरे होईल.

>>> स्टेटस मधून बाहेर पडणे महत्त्वाचे. इंजिनियर झालो म्हणजे तेच काम केले पाहिजे असे नाही. ज्ञानाचा उपयोग कधीही कुठेही होतोच होतो. <<<<
खर आहे! Happy
व्यवसायास हार्दीक शुभेच्छा

त्रोटक मुलाखत.

"गुरुकृपा" ब्रांड सुधाकर जाधवांनी सुरु केला असं दिसतय. त्यात मिहिर राजगुरुंचा काय सहयोग हे स्पष्ट नाही झाले. पण अजुनही तो प्रस्थापित ब्रांड का होऊ शकला नाही याची कारणी मिमांसा झाली कां??? उदा. कॉटन किंग्स हा ब्रांड अल्पावधीत लोकांच्या स्मरणात आहे तो त्यांच्या जाहिरातीमुळे. असं काही 'गुरुकृपा'ने केले आहे कां?? त्यांचा काय अनुभव????

ग्राहकांबद्दल सांगायचे तर क्वालिटीपेक्षा डिस्काऊंट महत्त्वाचा वाटतो >>> पूर्ण खरे नाही. कारण अ‍ॅरो, वॅन हुसेन ई. ब्रांड्स महाग असुनही त्यांचा खप वाढतोच आहे. किंमत आणि प्रत यांची योग्य सांगड घातली गेल्यास ग्राहक निश्चितच तयार होतो.

आपल्या उद्योगाचा आवाका छोटा असल्याने मोठमोठ्या जाहिराती करणे शक्य नाही. >>> ब्रांड सुस्थापित करायचा असल्यास जाहिरातबाजीला पर्याय नाही.

शुभेच्छा! Happy

व्यवसायाच्या भरभराटीसाठी शुभेच्छा.
फारच छोटी मुलाखत झाली आहे.
रुनीच्या प्रश्नांना मिळालेली उत्तर वाचायला आवडेल.

धन्यवाद मित्रहो. मुलाखती पहिल्यापासूनच त्रोटक ठेवतो आहोत. त्याची कारणेही याआधीच्या उद्योजक मुलाखतींत दिली आहेत. प्रतिसादांत जास्तीत जास्त प्रश्न विचारले जावेत, हाही एक हेतू.

पण मुलाखतीचे स्वरूप कसे असावे, याबद्दलही काही सूचना आल्यास यापुढील मुलाखतींत नक्की विचार करता येईल.

प्रश्नकर्त्यांचे स्वागत. मिहीर लवकरच उत्तरे देतील. Happy

माझेही प्रश्न जाईजुईच्या प्रश्नांसारखे आहे - असे दुकान काढायला परवाने काय प्रकारचे लागतात ? दुकानात सिक्युरिटी काय असते ? अकाउंटिंग व इन्व्हेंटरी मॅनेज करण्यासाठी सॉफ्टवेअर वापरता का ? तयार कपडे बनवणारे जे लोक असतील त्यांच्याकडून आधी पैसे देऊन विकत घ्यावे लागतात का ? की स्टॉक घ्यायचा, जेवढे विकले जातील त्यांचे पैसे द्यायचे अशी पद्धत असते ? सीझन प्रमाणे फॅशन / स्टाईल याचे स्टॉकिंग कसे मॅनेज करतात. सणासुदीचे कपड्यांमधे तर सतत नव्या नव्या फॅशनचे कपडे येत असतात - त्याचं स्टॉकिंग / मार्केटिंग कसं करतात ?
८० स्क्वे फूटाचं दुकान असेल तर एकावेळी एकापेक्षा अधिक माणूस कामावर लागतो का ? कामाचं स्वरूप / वेळा काय रहातात ? परप्रांतातील लोकांपेक्षा कॉलेजमधले युवक युवती चालणार नाहित का ? की त्या मुलांना अशा दुकानात नोकरी करण्यात इंटरेस्ट नसतो ?

@हिम्सकूल-
*फ्लॉकिंग संदर्भात-Its a process of Surface Coating, which creates a superb 'velvetty' finish or texture. It is used in various fields for decorative purposes as well as technical applications.
*For more info, pls visit- www.maag-flock.com

@जाईजुई-
*मार्केट सेगमेंट- जेंट्स आणि किड्सवेअर- तयार कपडे.
*मार्जिन- व्यवसाय करणार्‍या व्यक्तीवर अवलंबून आहे. आमचे स्वतःचे production असल्याने मार्जिन कमी आहे.
*क्वालिटीचे परिमाण- Readymade कपड्यांमध्ये standardisation नाही. जो quality ची जास्त जाहिरात करतो, त्याचा लोक स्वीकार करतात. Textile Market चीही हीच परिस्थिती आहे. कापडाच्या quality वर कुणाचेही नियंत्रण नाही. (उदा. खाद्यपदार्थांवर FPO वगैरे कंपन्यांचे testing remarks असतात.)

@रूनी पॉटर-
*कागदपत्रे- इतर कुठच्याही धंद्याला प्राथमिक पातळीवर लागतात तीच. जागेची भाडेपावती / मालकी हक्काची कागदपत्रे, Shop Act License (हे ३-४ आठवड्यांत मिळते) इ.
*नोकरी करत असताना जेवढा पगार मिळत होता, साधारण तेवढे पैसे धंद्यातून मिळायला लागल्यावर नोकरी सोडली.
*ग्राहक शिक्षण- कपड्यांच्या क्वालिटीची माहिती. Telling about Details as Real Cotton, PC, Cotton Rich etc.
*विक्रीचे नियम असे ठरवले जात नाहीत. प्रत्येक व्यावसायिकाची पॉलिसी वेगळी असू शकते. आमच्याकडे घेतलेले कपडे न वापरता परत केल्यास पैसे परत देतो. काही रंगांची खात्री dying करणारे एक्स्पर्टही देऊ शकत नाहीत. कॉटन डार्क रंगात dye केले तर रंग फिका होतोच. माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकत सरसकट सगळ्या ठिकाणी पैसे परत देण्याची पद्धत नाही.

@चंबू-
गर्दीच्या भागात किंवा मेन मार्केटमध्ये धंदा यशस्वी करणे किंचित सोपे असते, पण तो मुख्य मुद्दा मात्र ठरत नाही. गर्दीत असो, की आडबाजूला; मालाची quality, दुकानाचे प्रेझेंटेशन आणि interior, ग्राहकांशी वागण्याची पद्धत, व्यावहारिक टर्म्स इत्यादी अनेक फॅक्टर असतात. तुम्ही या सार्‍या बाबतीत योग्य मार्गावर असाल तर यशस्वी होण्यासाठी दीड ते अडीच वर्षांचा काळ लागतो असा माझा अनुभव आहे.

@भ्रमर-
*गुरूकृपा brand सुधाकर जाधव यांनी मुंबईत आणि आम्ही पुण्यात एकाच वेळी चालू केला. दोघांना अर्थातच सुरूवातीला झगडावे लागलेच.
*प्रस्थापित brand - वेळोवेळी टीव्ही आणि पेपरात जाहिराती दिसणे- अशी प्रस्थापित brand ची अनेकांची कल्पना आहे. विस्तृत सेगमेंटमध्ये हातपाय पसरण्यासाठी हे साहजिकच आहे. पण विशिष्ट प्रदेशापुरताच आपला ब्रँड मर्यादित ठेवायचा, अशी पॉलिसी ठरली असेल, तर या जाहिरातींचा काहीच उपयोग नाही. मोठ्या brandच्या जाहिरातींचे पैसे ते विकूनच उभे झालेले असतात, अर्थातच प्रॉडक्टची किंमत अनावश्यकरीत्या वाढते, हे सांगायला नकोच. आपण जास्त पैसे मोजले म्हणजे आपल्या पदरात चांगल्या qualityचाच माल पडेल- ही समजूत मला बर्‍याच अंशी चुकीची वाटते.
*व्यवसाय सुरू केला तेव्हा आम्ही 'मध्यमवर्गीयांना परवडेल अशा योग्य किंमतींत चांगल्या qualityचे कपडे देणे' असे साधे सोपे तत्व स्वीकारले होते. आजही तेच आहे आणि भविष्यातही राहील. अनेक outlets व Franchisee चालू करू शकतो, पण मग किंमतीवर नियंत्रण राहणार नाही, असे मला वाटते. मनाला मुळातून पटलेले तत्व बाजूला सारून पैसा मिळवणे-हे फारसे पटत नाही. पैसा असाही मिळेलच, मिळतोच आहे.
*जाहिरातबाजी- Product quality चांगली असेल तर तो brand आपोआप सेट होतो, असा आमचा अनुभव आहे. हार न मानता, तात्पुरत्या तोट्याकडे न बघता चिकाटीने काम मात्र करणे आवश्यक आहे. काही प्रमाणात जाहिराती करणे ठीक आहे, पण गेल्या १०-११ वर्षांत पुण्यात स्थिरावलो ते मुख्यतः योग्य किंमतीतल्या तयार कपड्यांच्या quality मुळे आणि Mouth Publicity मुळे. '४-५ वर्षांपुर्वी शर्ट नेला, तो आजही चांगला आहे, म्हणून दुकान शोधत परत आलो' असं म्हणणारे आमचे बरेच ग्राहक आहेत.

मित्रांनो, माहिती वाचून उत्सुकतेने प्रश्न विचारलेत, याबद्दल धन्यवाद. असेच भेटत राहू.

मायबोली.कॉमचे मनःपूर्वक आभार मानतो.

@मेधा-
*कागदपत्रे विशेष लागत नाहीत. विशेषतः हॉटेल किंवा तत्सम व्यवसाय सुरू करायला जशा महापालिकेच्या अनेक विभागांच्या परवानग्या लागतात, तसे इथे नाही. Shop Act License व त्याशी संबंधित कागदपत्रे इतकेच. व्यवसाय वाढल्यावर मग टर्नओव्हरच्या अनुषंगाने सेल्स टॅक्स रजिस्ट्रेशन वॅट रजिस्ट्रेशन वगैरे करणे आवश्यक आहे.
*लहान दुकानात फारशी गरज पडत नाही. व्यक्तिगत लक्ष ठेवणे हाच सुरक्षिततेचा सर्वोत्तम उपाय ठरतो. आमच्या फॅक्टरीत अनेक विभाग व अनेक लोक असल्याने सीसीटीव्ही इ. अर्थातच आहेत.
*अकाउंटिंग व इन्व्हेंटरी मॅनेज करण्यासाठी सॉफ्टवेअर- वापरतो. बार कोड सिस्टिम वगैरे यातच आले.
*उत्पादक आणि दुकानदार यांच्यात आपापसातल्या संबंधांनुसार, किती दिवस / वर्षे एकत्र काम करत आहेत, त्यावर हे ठरते. प्रत्येकाचे, प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे असू शकते.
*सीझन प्रमाणे फॅशन / स्टाईल याचे स्टॉकिंग- याचा अंदाज सुरुवातीला अजिबात येत नाही. आऊटडेटेड फॅशन्स, आणि एखाद्या खास सण किंवा प्रसंगापुरत्याच्या कपड्यांचे स्टॉक्स अंगावर पडले, की अंदाज सपशेल चुकले, हे कळते. मग हळूहळू मार्केटचे वागणे, आणि मार्केटमध्ये आपण नक्की कुठे उभे आहोत, हे समजायला लागते. याला दोन-तीन वर्षे तरी लागत असावीत.
*छोट्या दुकानात कमी माणासं लागतात, हे खरे असले तरी या प्रकारच्या धंद्यात अगदीच कमी माणासं ठेवून चालत नाही. मेडिकल दुकानात जाऊन काय मागायचे हे जसे ठरलेले असते, तसे इथे नसते. एक शर्ट घेण्यासाठी २०-३०-४० शर्ट्स बघितले जाऊ शकतात. बघणार्‍याची अपेक्षा-आवड ओळखून हे सारे दाखवणे, पुन्हा वर्गवारी करून त्या त्या जागेवर ठेवणे यासाठी थोडे अनुभवीच लोक लागतात. कॉलेजच्या मुलांचाही प्रयोग काही दिवस करून बघितला होता. परंतु त्यांच्या कॅज्युअल वागण्यामुळे त्रास झाला. हे किंचित जबाबदारीचे, अनुभवाचे काम आहे- त्यामुळे त्यांना ते फारसे जमणार नाही, हे तसे अपेक्षितच होते.

एखाद्या वेबसाईट्वर असा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम मी स्वतः पहिल्यांदा अनुभवला. उत्तरे द्यायला छान वाटले. पुन्हा एकदा धन्यवाद.

धन्यवाद मिहीर.. सध्या लेकीसाठी कपडे घेताना भरमसाठ किम्मत आणि लेकीला न आवडणारे जाळी/जरी, सिक्वेन्स काम याने जीव वैतागला आहे.

ह्यावर उपाय काही करता येईल का? हा विचार करत आहे.

तुम्ही कच्चा माल स्वत: खरेदी करता का? म्हणजे फुलं न पडणारे कापड, विशविशीत न होणारे सॅटिन हे बाजारातून उचलताना काय निकष असतात? की हे पण अनुभवातूनच?

चांगलि नोकरी सोडुन धंदा करणे खरंच अवघड.
अभिनंदन !!!
मला काहि प्रश्न पडले आहेत
१) गुरुक्रुपा चि शाखा मिळु शकेल का ?
२) काय करावे लागेल, खर्च किति येइल
३) गुरुक्रुपाचे शर्टच का आणखि कांहि आहे ?

@जाईजुई-
*कपड्याला गोळे येणे (फुले येणे / बबलिंग) हे त्यात पॉलिएस्टर्/इतर धागे मिक्स असण्याचे लक्षण आहे. त्वचेला घातक असलेले धागे असले तर या गोळ्यांमुळे एचिंग होऊ शकते. अनेकांना अ‍ॅलर्जी असू शकते. आपल्या कपड्यात किती टक्के कॉटन आहे, हे नीट कुणीच सांगत नाही, कारण त्यांना तसे कुणी विचारत नाही. अगदी सुप्रसिद्ध कॉटनच्या कपड्यांचे ब्रँडसही सरळसरळ फसवणुक करताना दिसतात. गोळे/फुले आल्यावर खरे तर त्याच दुकानात नेऊन शर्ट दाखवला पाहिजे. कॉटनच्या संदर्भात कस्टमर एज्युकेशन हवे, ते मी वरती म्हटले होते- ते याच संदर्भात. आम्ही कच्चा माल हा रेप्युटेड मिलचाच खरेदी करतो. यातही आम्ही अनंत प्रयोग केले आहेत. कपड्याच्या ताग्याचे नीट अ‍ॅन्बालिसिस करणार्‍या केमिकल टेस्ट असतात, त्या हे उत्पादक नीट करून आपल्यासमोर पारदर्शपणे मांडतात की नाही, यावर आम्हाला नीट लक्ष ठेवावे लागते. शिवाय या ताग्याचे कपडे शिवल्यावर आम्ही, आमचे लोक स्वतः हे कपडे वापरून, धुवुन बघून, काही दिवस निरीक्षण करतो. सुरुवातीला २-३ वर्षे खरे तर या आणि इतर अनेक प्रकारच्या 'ट्रायल अँड एरर' प्रयोग करण्यात गेले. त्यानंतर जे अनुभव मिळाले, त्यांचीच किंमत- ती वर्षे होती!
रिंकल्स (सुरकुत्या) येणे- हा कॉटनचा मुख्य गुणधर्म. याचाच वापर करून तयार झालेले आणि अत्यंत सोबर दिसणारे १००% कॉटनचे कपडे तुम्ही पाहिलेच असतील. 'रिंकलफ्री' कॉटन कपडे किंवा पँट- असं जेव्हा एखादा दुकानदार म्हणतो, तेव्हा म्हणजे नक्की काय, हे आपण कपडे घेताना नीट विचारले पाहिजे.
आपण एखादा कपडा जेव्हा 'कॉटन' म्हणून निर्यात करतो, तेव्हा त्यासोबत अनेक टेस्ट सर्टिफिकिटे जोडावी लागतात. तसे इथल्या लोकल मार्केट मध्ये कुणीच विचारणारे नसल्याने उत्पादक आणि दुकानदारही त्या फंदात पडत नाहीत- कस्टमर एज्युकेशन झाले, तर ही परिस्थिती सुधरेल असे वाटते.

@अमित कुलकर्णी-
*फ्रँचायझी / डीलर्स नेमणे, तयार करणे हा एक स्वतंत्र विषय आहे, आणि अनेक व्यावसायिक कटकटी अंतर्भुत असलेलाही. गुणवत्ता, ग्राहकांशी वागणुक- याबाबतचे तुमचे धोरण तुमचा फ्रँचायझी किंवा डीलर १००% कधीच पाळत नाही. कारण अर्थातच फ्रँचायझी / डीलर्स त्यांच्या व्यावसायिक लाभापुरतेच सर्वात आधी बघत असतात. ते आपले धोरण कितपत पाळतात, किंवा नाही, हे सारखे बघत बसणे- ही एक कटकट होऊन बसते. जाहिरातींबाबत माझी भुमिका काय आहे, ती मी वर मांडलीच आहे. डीलर्सना इतर कुठच्याही गोष्टीपेक्षा जाहिरातींचा बॅकप सर्वात महत्वाचा वाटतो- त्यासाठी ते सारखा लकडा लावुन असतात- असाही अनुभव आहे.
मी काम करणे बंद केल्यावर, पुढची पिढी या धोरणात बदल करेल, तर स्वागतार्हच आहे. परिणामांची जबाबदारी अर्थातच ज्याची त्याची. पण माझ्यापुरते तरी फ्रँचायझी / डीलर्स नेमायचे नाहीत, क्वालिटी मेंटेन करून सध्याच्या ग्राहकवर्गाचा माझ्यावरचा विश्वास आहे, तसाच ठेवायचा- असे ठरवले आहे.
*कॉटन शर्ट्स व्यतिरिक्त आम्ही जीन्स, कॉटन ट्राऊझर्स बनवतो, विकतो. शिवाय रिटेल आणि होलसेल टीशर्ट्सच्या मार्केटमध्येही आम्ही आहोत. सध्या कॉर्पोरेट किंवा इन्स्टिट्युशनल सेलसाठी टीशर्ट हे एक आमच्यासाठी चांगले उत्पादन ठरले आहे.

ज्यांनी अभिनंदन व शुभेछ्हा चिंतल्या आहेत, त्या सर्वांचा आभारी आहे. माझ्या कामात सुरुवातीपासूनच माझी बायको, तसेच कुटुंब यांचाही खूप हातभार आहे- हे नमूद करू इच्छितो.

मिहिरदादा,
इथे तुमची मुलाखत पाहून छान वाटलं!
तुमच्या दुकानातल्या मालाच्या दर्जाबद्दल प्रश्नच नाही... इतके वर्षं वापरूनही अजूनही शर्ट/ टीशर्ट्सचे रंग गेलेले नाहीत की गोळे आलेले नाहीत. Happy

प्रथमता मायबोलीला धन्यवाद
मिहीर सर मी एका खाजगी कंपनीमध्ये ( मुंबईमध्ये) काम करत असून मला तयार ( REDYMADE ) कपडा व्यवसाय सुरु करायचा आहे.
पण व्यवसाय कसा सुरु करायचा त्याबद्दल थोडे मार्गदर्शन पाहिजे म्हणजे
१) व्यवसाय चालू करण्यापुवी कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे
२) कपड्याचे प्रकार किती आहेत
३) कपड्याचा दर्जा कसा ओळखावा
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबईमध्ये मला तयार कपडे कुठून मिळतील
संजय पतीयान मुंबई
09664514869 san_patiyan@yahoo.com

मिहीर दादा
माझा उद्देश हि संजय पतीयान यांच्या सारखाच आहे. सध्या माझे झेरौक्स & कंप्युटरचे दुकान आहे मला तयार कपडा व्यवसायात सुरु करायचा आहे.म्हणुन मी तुम्हाला ते प्रश्न विचारले होते.