तुम्हे याद हो के न याद हो - १५

Submitted by बेफ़िकीर on 8 August, 2011 - 07:13

दिल धडक धडक के कह रहा है आ भी जा!

कॉर्पोरेशन हे काय थांबायचे ठिकाण आहे? तेही प्रेयसीसाठी? आणि वाजले की दोन आता? का मध्यरात्रीच्या दोनबद्दल बोलली होती? पोरी बावळट असतात याबद्दल आता तर काहीही संदेह राहिलेला नाही. प्रेमंबिमं करायची अन तीही सहज जमली तर! हे कसलं प्रेम? दोन वाजता ठरल्यावर पावणेदोनला आतुरतेने उभे असायला पाहिजे. आपण नाही का एक चाळीसलाच आलो. बसस्टॉपवर थांबल्यावर आजूबाजूचं पब्किकही विचित्र बघतंय! इथल्या सगळ्या बसेस येऊन गेल्या तरी हा उभाच!

असं किती वेळ थांब..... णा.... र... अँ?????

"हरामखोरांनो, आत्ता इथे तडफडायचं काही बेसिक कारण आहे का?"

"बरीच आहेत"

विन्याच्या मोटरसायकलवर मागे बसलेला राहुल उतरत म्हणाला आणि विन्या गाडी स्टॅन्डला लावताना कुचकट, भोचक, छद्मी व तीळपापड करणारं असं एकदम हासला.

हे विन्याला नेहमी जमायचं!

"चालते व्हा"

"जमणार नाही"

"आप्पाला सांगीन, तो तुमची कातडी सोलेल"

"आप्पानेच पाठवले आहे"

"तुम्हाला बघवत नाही का रे? आपल्यातल्या एकाचा जरा व्यवस्थित जम बसतोय, नोकरी लागली आहे, एक समवयीन मुलगी भाळली आहे"

"ही किल्ली"

"म्हणजे?"

"पेट्रोल फुल्ल भरले आहे"

"म्हणजे काय?"

"तिला पी एम टी तुन नेणारेस?"

"मग?"

"गाडी घेऊन जा"

"आणि तुम्ही?"

"आम्ही दोघेही समानलिंगी असल्याने एकमेकांमध्ये अंतर ठेवून चालत जायला आमची हरकत नाही"

कॉर्पोरेशनवर खदाखदा हासण्याचे आवाज भर उन्हात फार कमी वेळा ऐकू यायचे.

"अरे पण.. तू आज कामावर नाही गेलास?"

"गेलो होतो, हाफ डे काढला"

"का?"

" कारण तुला मोटरसायकल देण्यासाठी फुल डे लीव्हची गरज नाही"

"ए.. अरे सटका ना राव.. ती येईल आता"

"हे काही पैसे... "

"पैसे आहेत की माझ्याकडे??"

"अंहं... हे खास तुला म्हणून दिले आहेत..."

"कु... कुणी?????"

उमेशच्या पायाखालची वाळू सरकलेली होती.

"ताईने..."

राहुलने उमेशच्या पायाखालची पृथ्वीही सरकवली.

"शैलाताईला... शैला... शैलाताई???... तिला... कळ... लं कसं माकडांनो????"

"निवेदिताच्या मागच्या बाजूच्या खिडकीनंतरची खिडकी आप्पाची आहे याची नम्र जाणीव करून देत आहे"

"म्ह... णजे??"

"आपण दोघे काल संध्याकाळी चाप फेकाफेकी खेळत होतात ते शैलाताई याना विनासायास दिसले"

"विन्या... हे खोटे असले तर तुला हत्तीच्या पायाखाली देईन"

"हत्ती कुठे आहे?"

"भडव्यांनो... हे झाले कसे??"

" असभ्य भाषेचा आधार घेणार्‍या सभ्य गृहस्था, मांजराला वाटते आपल्याला कोण पाहतंय"

"शैलाताई काय म्हणाली?? "

"ती म्हणाली... आपटे काका काकू गावाला चाललेत... हे थोडे पैसे विन्याकडे देऊन ठेव"

"काय संबंध??? काय संबंध काय?? ते दोघे गावाला जाण्याचा मला पैसे देण्याशी"

"कारण ती म्हणाली की हे दोघेही आता कुठेतरी जाणारच असतील..."

"हे.. शैलाताई म्हणाली??"

"जाऊन विच्चार तिला"

"आता तिच्यासमोर उभा राहू शकेन का मी??"

"प्रेमात हे सर्व करावेच लागणार"

"अरे पण... हे ती स्वतःहून म्हणाली का... तुम्ही काही सांगीतलंत??"

" अत्यंत दुर्दैवी बाब आहे की तू एक गोष्टच विसरतोयस उम्या.. "

"बका... बका.. काय विसरतोय मी??"

"तिचे ते लग्न तुझ्या अन निवेदितामुळेच नाही का मोडले??"

"अ... अरे पण.. त्याचा.. म्हणजे... इथे आत्ता काय सं...??

"आणखी एक विसरताय आपण मजनूंशेठ"

"काय??"

"शैलाताईचे ज्याच्याशी लग्न झाले तो आपला पुर्वाश्रमीचा मित्र आप्पा आहे"

"मग??"

"मग काय? शैलाताईने चाप प्रकरण आप्पाला सांगीतल्यावर आप्पाने मागची सगळी प्रकरणे तिला सांगीतली"

"आप्पा मूर्ख आहे"

"शक्यता आहे"

"निघा आता"

"तुम्ही दोघे कोणत्या भागात जाणार आहात त्याची साधारण कल्पना देऊन ठेव"

"खड्यात जा, कल्पना बिल्पना द्यायला मी बांधील नाही"

"दोनच मिनिटांपुर्वी मी दिलेल्या मोटरसायकलचा आधार विसरलास??"

"पी एम टी ने जाईन"

"माझ्यामते तुम्ही कुडजेगावला जा"

"राहुल्या, अजून उपदेश केलात तर बत्तीशी आऊट करेन"

"कारण तेथे भर मार्च महिन्यातही पाऊस असल्याचे आमचा वार्ताहर कळवतो"

" खरच का रे?"

"अविश्वास दाखवून तू मैत्रीची किंमत केलीस उम्या"

"निघा रे आता.. ती बघा ती आली"

खरच नितु आली की नाही हे पाहण्याचे कष्टही न घेता दोघेही सटकले.

आणि झालेला प्रकार निट समजून घेत उम्या उभा राहिला.

शैलाताईला सगळे समजले म्हणजे नवीनच संकट उभे राहिलेले होते. ती कुणाला काय सांगेल ते सांगता येत नव्हते. आप्पा एक मूर्खच! चाप फेकाफेकी पाहून शैलाताईने काही सांगितले तर गप्प बसायचे ना? आणखीन मसाला चोळला असेल!

काय करावे? की आज कुठे जाऊच नये? नाहीतर उद्या शैलाताई म्हणायची मीच पैसे दिले होते यांना फि...रा. य

अरे??? आपण चक्रमच! ती जर स्वतःच पैसे देतीय, तर त्याचा अर्थ ती आपल्याच बाजूने नाही का???

निवेदिता कधी येणार काय मा...ही... ........त...

"हाय"

बावळटासारखा उम्या पाहातच राहिला.

पांढर्‍या शुभ्र ड्रेसमध्ये निवेदिता समोर उभी राहून हासत होती.

तिला पाहून काय बोलावे तेच न कळल्यामुळे उम्याचा चेहरा बावळटासारखा झाला होता.

"काय झाले???"

"अं?.. काही नाही.. "

"मग असा काय.... बघतोयस??"

"तू अशी दिसशील याची कल्पनाच नव्हती..."

"अशी म्हणजे???"

निवेदिताने स्वतःच्याच ड्रेसकडे पाहात गोंधळुन विचारले.

"अशी म्हणजे काय रे???"

"म्हणजे... जरा बरी..."

"चला.. निघते मी.. "

"चेष्टा केली..."

"कर ना चेष्टा... मी कुठे काय म्हणतीय?? या येणार्‍या जाणार्‍या लोकांची... त्या बालगंधर्व पुलाची.. बसेसची... मी निघाले... "

"बावळटासारखी चिडूबिडू नकोस... मला म्हणायचं होतं की नेहमीपेक्षाही छान दिसतीयस"

"मी नि घा ले ... बास्स.. मला कुठेही यायचं नाहीये.. एक तर ऊन.. अन त्यात बसमधून फि...र...हे काय??"

"......"

"उमेश??? हे काय?? ... विनीतची गाडी इथे??"

"आजपुरती आपली गाडी आहे ती... "

"पण.. पेट्रोल??"

" टॅन्क फुल्ल"

"आणि त्याला नको होती???"

'आपल्याला हवी होती हे त्याला अधिक महत्वाचे वाटले..."

"उमेश???? .... आपण जाणार हे तू सांगीतलंस तिघांना??? अरे काही कळतंय का तुला???"

"अगं बाई मी नाही सांगीतलं... शैलाताईने आप्पाला सांगीतलं"

"क्काय??????"

भर रस्त्यावर दुपारी किंचाळली निवेदिता!

"की म्हणे यांचं असं असं आहे"

"असं असं म्हणजे??"

" च्च... जाऊदेत गं"

"उमेश मला आधी काय झालं ते सांग"

उमेशने तिला सगळी कहाणी सांगीतल्यावर तर ती 'मी आता सरळ वाड्यात चाललेले आहे' म्हणून हटूनच बसली.

रडवेला चेहरा करून निवेदिता बसलेली आणि उमेश तिला काहीतरी समजावयाचा प्रयत्न करतोय हे दृष्य त्या काळात कॉर्पोरेशनपाशी दुर्मीळ समजले जायचे.

एक प्रौढ कामगार महिला तेथे पचकली.

"काय रं??? छेडतोस काय पोरीला??"

"आं??? ओ.. तुमचा काय संबंध??"

"आणु का धा बैका हड्डी ढिल्ली करायला तवा??"

"ओ बाई... ही ही आहे.."

"ही म्हन्जे??"

"म्हणजे आम्ही एका वाड्यात राहतो"

"मंग रडतीयस का गं पुरी??"

पोरीचे ग्राम्य रूप पुरी आहे हे त्या बाईने निवेदिताकडे पाहिल्यामुळे तिला समजले.

"काही नाही हो मावशी... जा तुम्ही... आमचं वेगळं चाललंय"

ती बाई वैतागून निघून गेली.

"नितु... आपण इथून जाऊ... कुणीही पाहील.. आपल्याला काहीतरी ठरवायला पाहिजे पुढचं... आणि तुला काय बोलायचे ते तिथे गेल्यावर बोल ना? इथे किती वेळ असे बसणार??

"सव्वा दोन झालेत... मला साडे चारला वाड्यात पोचलं पाहिजे.. "

"म्हणजे जेमतेम दोन तास?? ह्याला काय अर्थ आहे??"

"वाड्यात काय काय नाटकं झाली आहेत आठवतायत ना??"

"आधी चल गं तू..."

निवेदिता मोटरसायकलवर मागे बसली आणि....

...... उत्तमनगर क्रॉस करेपर्यंत ती अखंड बडबडत होती मागून!

'शैलाताईला समजत नाही का? आता आई बाबा आल्यावर ती त्यांनाही सांगेल... वाड्यात आणि बाहेरही बदनामी... मला तर जिणेच मुश्कील होईल.... तुला कळत नाही का?? संध्याकाळी चाप कशाला फेकलास??तू काहीतरी फेकलंस म्हणून मी नेलपॉलिश फेकलं... ही काय माझी चूक म्हणता येईल का?? अजून आपल्या या नात्याला कुणीही मान्यता देणार नाही... तुझं काय.. तू एक मुलगा आहेस... माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे वगैरे...."

आणि गोल मार्केट मागे पडताना मोजून सहा टप्पोरे थेंब दोघांच्या अंगावर पडले....

... आणि पुढच्या दोन ते तीन मिनिटात बर्‍यापैकी थेंब!

अत्यंत बदललेल्या टोनमध्ये नितुने ते वाक्य उच्चारले..

"इथे पाऊस आहे"

हे वाक्य ' आह् ... इथे पाऊस आहे' अशा टोनमध्ये होते हे उम्यालाही जाणवले.

"तीन वाजले रे??"

पुन्हा आधीचा टोन!

"चार वाजता निघूयात ......काय??"

दोन्हीच्या मधला टोन! हा 'मधला' टोन येईपर्यंत कुडजेगाव दिसू लागलेले होते. भर मार्चमध्येही हिरवागार असलेला डोंगर!

उमेशने एक अक्षर उच्चारलेले नव्हते अजून!

"हे कुठे आलोयत आपण??"

"कुडजे"

"ई"

आणि ती अचानक आलेली सर!

"गधड्या थांबव मी काही आणलेले नाही"

एका बंद दुकानाखाली दोघेही थांबले.

दहा मिनिटांनी पाऊस थांबल्यावर उम्याने किक मारली आणि नितु मागे बसल्यावर त्याने सरळ गाडी पुण्याकडेच वळवली.

"हे काय?"

".... "

"उमेश... कुठे चाललायस???"

"चार वाजत आले"

"सव्वा तीन झालेत"

"तेच... म्हणजे आता चारच वाजत आलेत... "

"हो पण चाललायस कुठे??"

"अगं काय कुठे कुठे करतीयस??? घरी जायचंय ना??? घरीच निघालोय... "

"चिडायला काय झालं??"

"मी चिडलेलो नाहीये"

"उमेश.... उलटा वळ.. मला ते गांव पाहायचंय... "

"मला त्यात काहीही इन्टरेस्ट नाही आहे"

"उमेश... उलटा वळ"

उमेश तशीच मोटरसायकल चालवत राहिला
.
दोन तीन मिनिटे निवेदिता एक अक्षर बोलली नाही. नंतर उत्तमनगरचा बस स्टॉप आला तशी एकदम म्हणाली.

"थांबव इथे... मी बसने येतीय.. "

"मी तुला डेक्कनपाशी सोडणार आहे आणि तिथून तू घरी जायचं आहेस"

" आवश्यकता नाही आहे... गाडी थांबव उमेश"

"मी इथे थांबणार नाही.. असल्या जागी तुला एकटीला सोडणार नाही"

"मला सहानुभुती वगैरे नको आहे... गाडी थांबव म्हंटलेना?"

उमेशने गाडी थांबवली आणि निवेदिता ताडताड स्टॉपवर जाऊन उभी राहिली. हा लांब तसाच गाडीपाशी उभा राहिला.

वीस मिनिटे झाली तरी बस येण्याची चिन्हे नव्हती. इतकेच नाही तर स्टॉपवर एक माणूसही नव्हता. अचानक एक जीप आली. ती शेअर बेसिसवर प्रवाशांची ने आण करणणारीजीप होती. बेकायदेशीर!

त्यात निवेदिता बसली आणि जीप भर्रकन निघून गेली.

डोळ्यात पाणी आले होते तिच्या! संतापाने!

आणि उमेशच्या संतापाचा प्रभाव विन्याच्या मोटरसायकलवर पडत होता. जीपच्या मागून काही अंतरावरून उम्या चाललेला होता.

जवळपास अर्ध्या तासाने जीप शहरात आली व डेक्कन कॉर्नरवर थांबली.

निवेदिताने बाहेर पडून पैसे दिले आणि ताड्ताड चालू लागली. तिने एकदाही उमेशकडे पाहिले नाही.

आणि उमेशचे काम संपलेले होते. निवेदिता सुरक्षित वातावरणात पोचलेली असल्याने त्याने घराकडे जायच्या ऐवजी मोटरसायकल वळवली रीगलकडे!

संताप संताप झाला होता त्याचा!

जिला भेटण्यासाठी तो गेले दोन दिवस आतुर होता, जिला देण्यासाठी त्याने एक कानातले आणलेले होते, जिने स्वतःच सतरा आणि अठरा या तारखा त्याला कागदावर मोठ्या अक्षरात लिहून दाखवलेल्या होत्या ती आज त्याला भेटल्यानंतर एक क्षणही आनंदी असल्याचे नुसते भासवतही नव्हती. उलट शैलाताईला समजल्याचे पाहून धक्का बसल्यासारखी आणि प्रचंड घाबरल्यासारखी वागत होती आणि प्रत्येक क्षणाला 'चल, मला लवकर जायला हवे' हाच पट्टा लावत होती.

काही अर्थच नव्हता अशा भेटीला! उमेशच्या अपेक्षेत होती सिंहगडावर झालेल्या भेटीसारखी भेट! आणि आजच्या भेटीची सुरुवातही चांगलीच झालेली होती. एक म्हणजे शैलाताई 'फॉर' आहे हे विन्या आणि राहुल्याने सांगितले होते. त्यातच विन्याने मोटरसायकल दिली होती आणि शैलाताईने दिलेले पैसेही दिले होते. एकंदर आज संध्याकाळी अंधार पडेपर्यंत या चोरून ठरलेल्या भेटीचा आनंद अमर्यादपणे उपभोगायचा हे उमेशचे स्वप्न सत्यात येऊ लागले होते. आणि नेमका निवेदिताने घोळ केला होता. तिची देहबोली अतिशय घाईची, घाबरलेली आणि भेटीत स्वारस्यच नसलेली अशी होती. उमेशला हे समजत होते की भेटल्यामुळे किंवा भेटल्याचे कुणाला कळल्यास किती प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि खासकरून निवेदिताला किती प्रॉब्लेम्स येतील हेही माहीत होते. पण त्याचे म्हणणे असे होते की या सर्वापासून दूर अशा वेळेस आणि ठिकाणी ज्या काय दोन घटका आहेत त्यात एकदा तरी तू आनंदीत असल्याचे भासवशील की नाही? की या भेटीची गरज फक्त मलाच आहे??? मग आलीस कशाला?? तारखा कशाला कळवल्यास?? आणि तू अशी वागत असताना त्या कुडजेगावात बसून काय करायचंय??

तिकडे निवेदिताला वेगळाच त्रास होता. इतकी रिस्क घेऊन ती त्याला भेटायला आली आणि त्यानंतर त्यातच हे समजले की वाड्यात उमेशच्या मित्रांबरोबरच शैलाताईलाही सगळे कळले आहे. ही तिच्या दृष्टीने एक धोक्याचीच पातळी होती. त्यात वेळ कमी उरलेला होता आणि त्यात पाऊस! त्यामुळे घाईगडबडीत ती उमेशला 'गधड्या' म्हणून गेली होती. पण तिला याहीपेक्षा त्रास याचा होता की ती खुद्द तिथे त्याच्याबरोबर असतानाही त्याने इतका इगो दाखवला की ज्या भेटीसाठी तो आसूसल्याचे आधी सहज लक्षात येत होते त्या भेटीत जणू त्याला काही इन्टरेस्टच राहिलेला नव्हता. हे एक मुलगी म्हणुन निवेदिताला अत्यंत बोचणारे सत्य होते. तिला याचाच अपमान वाटत होता.

फणकार्‍याने ती वाड्यात शिरली तेव्हा तिच्या हेही लक्षात राहिलेले नव्हते की ती बर्‍यापैकी भिजलेली आहे आणि वाड्यापासून किमान पंधरा किलोमीटरच्या त्रिज्येत कुठेही पाऊस झालेला नाही.

त्यातच आणखीनच लाजीरवाणा प्रकार करावा लागणार होता. घराची किल्ली शैलाताईकडे असायची. ती मागावी लागणार होती.

संकोचून आप्पाच्या घराचे दार वाजवले तर ते नेमके आप्पानेच उघडले. आणखीनच कसेसे झाले तिला! कशीबशी किल्ली घेऊन ती दार उघडून आत आली आणि पर्समधून परवा उम्याने दिलेला चाप काढला आणि मोडून टाकला. हिंदी अभिनेत्रींप्रमाणे ती उशीवर कोसळून वगैरे रडणार्‍यातली नव्हती. सरळ उद्याच्या पेपरचा अभ्यास करायला घेतला आणि नाकाचा शेंडा अधिकच लाल लाल करत शपथही घेतली.

'उमेशने येऊन दहा वेळा माफी मागीतल्याशिवाय मी आता बोलणारच नाही'

इकडे रीगलला लागोपाठ तीन चहा झाल्यावर उमेश उठला आणि टिळकरोडवर चालू लागला. त्याचे विचार काहीसे तसेच होते.

'ही लागून कोण गेली? दोन तास फक्त आहेत म्हणायला ही काय इंग्लंडची राणी आहे? आणि एवढी भीती वगैरे असेल तर कसले प्रेम करणार ही? म्हणजे चहा पोहे करून स्थळ बघूनच लग्न करणार्‍यातले हे आपटे आहेत. गेली उडत! आणि आपले काही इतके प्रचंड प्रेम वगैरे नाही आहे तिच्यावर! दिड दोन महिन्यांपुर्वी ही वाड्यात नव्हती तेव्हा कसे जगत होतो?? काय फरक पडत होता तेव्हा? आणि आता तरी काय फरक पडणार आहे? '

अचानक एक गाडी सुळ्ळकन येऊन थांबली. पांढरी शुभ्र!

"संभलके चल के अभी वक्त है संभलनेका मियाँ"

खणखणीत आवाजात आणि नेहमीच्याच मोहक स्मितहास्याने अख्तर मियांनी मारलेली ती हाक आज उमेशला नकोशी वाटत होती. पण ते साहेब होते.

"बैठो मियाँ गाडीमे... कही बाहर जानेवाले थे ना?? गये नही?? "

"उद्या.. उद्या जायचंय.. "

"तो आज क्यूं नही आये यार??"

"सर मै... मतलब... आजभी मै बाहरही गया था.. "

"नौकरी शौकरी तो नही ढूंढ नही रहे हो ना??"

खदखदून हासत मियाँनी विचारले.

"छे छे.. मला तुमच्याइथे काम करायचंय"

"जिस तरहा तुम रास्तेपर अभी घूम रहे थे ना... उसपर एक शेर है "

"को... णता?? "

"शहरकी बेचराग गलियोंमे... जिंदगी तुझको ढूंढती है अभी"

"मी कुणालाही शोधत नव्हतो... "

"जूस्तजू से इन्सान बचता नही है बेटे... मौतसे बचजाये.. पर जिंदगीसे नही बचता.. "

का कुणास ठाऊक, आज अख्तर मियांचे बोलणे उमेशला अत्यंत आवडत होते. वेदनेने तडफडणार्‍या मनावर सुगंधी विचारांचे शिडकावे होत होते. मन मोकळे करावेसे वाटू लागले त्याला! शेवटी अख्तरमियाँनीही प्रेम केलेलेच होते त्यांच्या तारुण्यात! पण मन मोकळे तेथे करतात जेथे अजाण माणसे असतात, अख्तर मियाँ सुतावरून स्वर्ग गाठू शकणारा माणुस होता.

"घडीभरकी जुदाई है या हमेशाकी बिदाई?"

खटकन मान वळवून उमेशने मियाँकडे पाहिले.

"अच्छा.... सिर्फ घडीभरकी जुदाईही है"

"हे.. कस काय ओळखलंत??"

"हमेशाकी जुदाई होती तो इस तरह मेरी तरफ ना देखते... किस बातपे लडाई हुई?? "

"मिलनेपर"

" तो मिलने आयी नही मोहतरमा"

'आयी थी... पण सारखे हेच म्हणत होती... चल जाऊ... चल जाऊ"

खदखदून हासत मियाँनी गाडी डावीकडे घेऊन थांबवली.

"काय झालं सर??"

"तो आप क्या कहना चाहते है?? के वो रुकनेको तैय्यार हो जायेगी??"

"म्हणजे??"

"भाईसाहब एक तो माशूका आती नही है.. और इसपर रो रो कर लोग खुदखुशी कर लेते है... आपकी तो आयी थी.. और आप गुस्सा होगये.... कुछ तो मेरे पिंदारे-मुहोब्बत का भरम रख... तू भी तो कभी मुझको मनाने के लिये आ.... हा हा हा हा हा हा"

"मी काय करायला हवं होतं??"

"दिलसे काम तब लेना चाहिये जब दिमागका काम खतम हुवा हो"

"म्हणजे काय??"

"जाईये और मुआफी मांगीये... जो मिलने आयी थी.. हो सकता है माफ करदे"

"मी नाही माफी बिफी मागणार..."

"आप तो मियाँ ना शराब पीते है ना शायरी फर्माते है ना हुस्नसे डरते है... मिजाज मुबारक. प्यासा चलोगे??"

टाईमपास तर करायचाच होता. दारू सोडलेलीच होती. नुसते बसायला हरकत नव्हती.

प्यासाला पोचले दोघे!

कबाब, शायरी आणि गप्पा! शेवटी काय काय झाले ते उम्याने सांगून टाकले.

"वो नये गिले वो शिकायतें वो मज़े-मज़े की हिकायतें
वो हर एक बात पे रूठना तुम्हें याद हो के न याद हो"

"वा वा"

अख्तरमियाँच्या त्या शेराला उम्याने नैसर्गीक दाद दिली.

"आणखीन?? आणखीन ऐकवा की??"

"वो बिगड़ना वस्ल की रात का, वो न मानना किसी बात का
वो नहीं-नहीं की हर आन अदा, तुम्हें याद हो के न याद हो"

"वो नही नही की??"

"वो नही नही की हर आन अदा तुम्हे याद हो... के न याद हो..."

"तुम्हाला पाठ आहे??"

"कुछ खास नही... बस शौक रखते है थोडा बहुत... "

"मी लिहून घेऊ??"

"आज नही.. फिर कभी... आपको मोमीन मियाँकी किताबही देदेंगे... "

कसे कुणास ठाऊक! निघायला दहा वाजले दहा!

मियाँना ड्रायव्हर घेऊन गेला. जाताना त्यांनी नेहमीचाच शेर ऐकवला. 'संभलभी जा कि अभी वक्त है संभलनेका'!

प्रेमकहाणीतील पहिला रुसवा, पहिला अबोला आणि पहिला विरह आजच्या दिवसाबरोबर उजाडलेला होता.

उद्याही नितुच्या घरी कुणी नसणार होते. पण उद्याही भेटण्याचे स्वप्न तर आता पाहणेही शक्य नव्हते. बहुधा तिच्याबरोबर क्षमा किंवा वर्षा झोपायला गेली असेल.

बहुतेक वाडा आता झोपला असेल अशा विचाराने उम्याने वाड्यात प्रवेश केला. मनात नव्हते तरीही चोरटी नजर गेलीच नितुच्या घराकडे! आणि मोठाच धक्का बसला.

रु .... मा... ल

तोही... हिरवा!

वो जो लुत्फ़ मुझ पे थे पेश्तर, वो करम के था मेरे हाल पर
मुझे सब है याद ज़रा-ज़रा, तुम्हें याद हो के न याद हो

काय करावे हेच समजत नसल्याने उम्या मागून मारुतीच्या देवळात गेला तर....

... मागची खिडकी ... उघडी????

इतक्या रात्री चोरासारखे कठड्यावर चढताना त्याला कसेतरीच झाले... पण कठड्यावर गेलाच तो...

मांडी घालून बसला...

आता काय करावे??? या बयेला कसे समजणार आपण इथे आल्याचे???

सुचले! कोणतेतरी गाणे शिट्टीवर वाजवावे हळूच! कोणते??? नाहीतर गाण्याची निवड चुकली म्हणून रागवायची! म्हणजे काय?? आपल्याला ती रागवू नये बिये असे वाटत आहे की काय?? आपल्याला काय वाटतंय ते सालं नंतर बघू! आधी शिट्टी!

अरे तिच्यायला... आयायायायायाया

ताडकन उठला उमेश! काहीतरी अंगावरून गेलं होतं! नशीब ते चावलं नव्हतं! बहुधा मोठं झुरळ बिरळ असावं!

शिट्टी कोणती वाजवायची पण??

ओ मेरे हमसफर
प्यारकी राहपर
साथ चले
हम मगर
क्या खबर

रास्ते मे कहीं...

आह!

मागे ब्रह्मचारी हनुमान, सभोवती किडे आणि अंधार आणि समोर खिडकीत चंद्र!

मंद दिव्यात निवेदिता उभी होती. उमेशने काहीही अ‍ॅक्शन केली तरी तिला त्यातले काहीच कळत नव्हते. नुसतीच त्याची आकृती दिसत होती आणि तीही अतिशय भयावह! पण तो उमेशच आहे हे शिट्टीच्या सुमार दर्जामुळे तिला समजलेले होते. तिला काहीच कळत नसल्यामुळे शेवटी वैतागून उमेशने सरळ कठड्यावरून बोळातच उडी मारली आणि धप्प असा आवाज झाला.

दचकून आणि घुसमटलेली किंकाळी फोडून नितुने खिडकी आपटून बंद केली. जवळपास दहा बारा सेकंदांनी तिनी खिडकी किलकिली केली. बोळात मात्र नीट उजेड होता एका सार्वजनिक, चोरीपासून वाचलेल्या व लागला आहे हे कळू शकणार्‍या दिव्याचा!

आणि त्यात तिला ते दृष्य दिसले. खिडकी उघडली तर हा असा समोरच उमेश!

पुन्हा दचकून ती मागे झाली आणि पाहात राहिली. त्याला जायच्या खुणा करू लागली जोरजोरात! तर तो खिडकीला चिकटूनच उभा राहिला. मग तीही खिडकीपाशी आली आणि तीव्र भीतीने त्याला जा जा असे म्हणू लागली.

त्याने सिरियसली सॉरी म्हणुन माफी मागीतली. आश्चर्य म्हणजे तिनेही! त्यामुळे त्याला एकदम सुखावल्यासारखे वाटले आणि त्याने तिला बाहेरूनच ओढले. पण येथे सिंहगड रिपीट करणे शक्य नाही हे खिडकीच्या गजांमुळे समजल्यावर तो निघू लागला.

तर मागून.... शिट्टी! गुरखा????

"ए... ए रूक... रूक स्साले... चोर... चोर.... चोर"

घाबरावे की पळावे की गुरख्याला दम भरावा हेच समजत नसलेला उमेश फक्त दोन क्षण उभा राहिला आणि सुसाट धावत सुटला. आपल्याच वाड्याबाहेर आपणच येड्यासारखे चोर म्हणून पळतोय ही भावनाच राहिलेली नव्हती मनात!

इकडे नितुची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. कारण आता पब्लिक जमले तर कोणत्या खिडकीपाशी चोरी करणार होता हे गुरख्याने दाखवले असते आणि वाड्याने नितुला झापले असते. त्यातच वाड्यात उमेश नाही म्हंटल्यावर आणखीनच संशय!

त्या परिस्थितीत काय करावे हेच नितुला समजेना! बोंब मारावी असेही तिला एकदा वाटुन गेले. पण ते प्रकरण नक्की बाबांच्या कानावर जाणार आणि 'आम्ही दोघे नसतानाच कसा काय नेमका चोर आला' यावरून मोठा इश्यू होणार हे तिला समजले.

तिकडे उम्या लहान मुले पळतात तसा पळत सुटलेला होता. गुरख्याला काही तितके जोरात धावता येईना! मग त्याने जागेवरच बोंब ठोकायला सुरुवात केली. पाच एक मिनिटातच पब्लिक जमले. त्यात आप्पा आणि शैलाही होते.

"ये इध्धर... इध्धरसे चोरी कर रहा था.. मैने देखा ना.. होएंगा तीस चालीस साल का आदमी"

गुरखा फेकत आहे हे पाहिल्यावर नितुच्या जीवात जीव आला तोवर शैलाने आप्पाला सगळ्यांसमोर झापायला सुरुवात केली. त्या 'सगळ्यांमध्ये' राईलकर फॅमिली आणि विन्या व राहुलही होतेच!

"तुम्हाला सांगत असते मी... की बोळाकडची खिडकी उघडी ठेवू नका म्हणून... :

त्यातच आप्पाच्या वहिनीने जोक मारला.

" तेच ना... एक तर नवीन लग्न झालं आहे... "

सगळे हासले तेव्हा नितुला समजले की शैलाने ऐन वेळी 'खिडकीच' बदलली होती आणि गुरख्याला आता दोनपैकी नेमकी कुठली खिडकी होती हेच आठवत नव्हते. आप्पा अगदी गुलाम असल्यासारखा ऐकून घेत असतानाच उमेश हे दिव्य बाळ शांतपंणे प्रवेशले.

"काय झालं???"

"चोर... चोर आला होता.. "

कुणीतरी ज्ञान पुरवले.

"आयला... तो चोर होता????"

"आपने देखा?? "

"म्हणजे काय?? माझ्या समोरून तर गेला धावत.. "

गुरख्याला आता स्वतःचा अभिमान वाटू लागला कारण त्याने सांगीतलेली कथा खरी निघालेली होती.

"पण हिचे वडील पोलिसात आहेत म्हणावं त्याला"

भुमकर काकुंचे ते वाक्य ऐकून विन्याची आई उसळून म्हणाली...

"चोर भेटला की सांगू हो??"

त्यावर वर्षाही हासली.

पांगापांग वगैरे व्हायला एक तास लागला. आणि अगदी निजताना...

... शेवटच्या क्षणी निवेदिताने उमेशला एक करकचून डोळा मारला आणि मिश्कीलपणे हासत घरात निघून गेली..

.. चोर वगैरे प्रकरण पाहून आता क्षमा आणि वर्षा तिच्याकडे झोपणार हे ठरलेले होते...

तिचे ते डोळा मारणे अगदी त्याच्या हृदयात घुसले वगैरेच!

आणि झोपतानाच्या काही मिनिटे आधी आजोबांचे विधान कानात!

"तुझा का रे श्वास फुलला होता पण इतके हळू चालून मगाशी????/"

हृदयावर अचानक त्या वाक्याने आलेला दाब कसाबसा सोसून तो आडवा होतोय तोवर अख्तरमियाँनी आज सांगीतलेल्या गझलेतला तो शेर डोक्यात आला आणि हृदयावर सुखाचे सिंचन झाले...

कभी बैठे सब में जो रू-ब-रू, तो इशारतों ही से गुफ़्तगू
वो बयान शौक़ का बरमला....

... तुम्हे याद हो.... के न याद हो...

गुलमोहर: 

"तुझा का रे श्वास फुलला होता पण इतके हळू चालून मगाशी????>>>>>>>>
Happy हसुन हसुन मेले...मस्त्...आजोबा बाकि एकदम वस्ताद ...

छान आहे. . . . . .
पण,
कादंबरी पुढे सरकत नाही आहे.
त्या दोघामध्ये रुसवा आणि माफी..... इतकेच.

छान आहे. . . . . .
पण,
कादंबरी पुढे सरकत नाही आहे.
त्या दोघामध्ये रुसवा आणि माफी..... इतकेच.

छान आहे. . . . . .
पण,
कादंबरी पुढे सरकत नाही आहे.
त्या दोघामध्ये रुसवा आणि माफी..... इतकेच.

कथा पुढे न सरकणे, प्रेमकथेतला आणि शैलीतला तोच तोच पणा, ओव्हरऑलच नावीन्याचा अभाव, हे सगळे असूनही खुप दिवसांनी आल्याने हा भाग मी एन्जॉय केला.

कथा पुढे सरकत नाही असे वाटले नाही.
हा भाग काही काळाने प्रकाशित झाल्याने तसे वाटते पण एकत्र जर वाचले तर असे काही जाणवणार नाही.
मला तर हा भागही आवडला.

बेफिकिरजी,

मला तर वाट्तय तुम्हाला ही कादंबरी लिहिण्याचा कंटाळा आलाय्....तुम्हालाच आवडत नाहीये ती...

हा प्रश्र ईथे विचारु नये पण मला समजत नाहि कुठे विचारु ... म्हणुन शेवटी विचारते... मी ईथे परदेशात आहे... मला वाचनाचा खुप म्हणजे खुप छंद आहे... पुर्ण मायबोलि वरचे सगळ्या कथा कांदबरी मी वाचुन काढल्या... मला ओनलाईन मराठी पुस्तक . कुठे वाचायला मिळु शकतिल ? कोणि मद्त करेल प्लीज