साखरेचा किल्ला

Submitted by वेताळ_२५ on 8 August, 2011 - 04:34

साखरेचा किल्ला
50568610.jpg

श्री शिवाजी महाराज ऑगस्ट १६६६ मध्ये औरंगजेबाच्या पोलादी कैदखान्यातून आग्र्याहून निसटले आणि थेट महाराष्ट्रात येऊन दाखल झाले. या घटनेमुळे मोगल सम्राट औरंगजेब संतप्त झाला. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य मोगल साम्राज्याला तापदायक ठरणार याची खात्री औरंगजेबाला पटली आणि म्हणूनच त्याने दिलेरखान, दाऊदखान, महाबतखान यांसारखे मातब्बर सरदार दक्षिणेत पाठवून मराठ्यांविरूध्द जोरदार लढा सुरू केला. या संघर्षाला इ.स. १६७० मध्ये धार चढली. बागलाण भागात मोगल आणि मराठे यांच्यामध्ये जबरदस्त धुमश्चक्री सुरू झाली. बागलाण प्रदेश त्या सुमारास कुरुक्षेत्र बनले.

शिवकालातील बागलाण प्रदेशात सध्याच्या नाशिक जिल्ह्याचा बराच भाग मोडत होता. दक्षिणेतील लष्करी हलचालींच्या दृष्टीने या भागाचे मोगलांना अनन्यसाधारण महत्व वाटत होते. मोगलांची नाकेबंदी करण्यात मराठ्यांना या भागातील उत्तुंग गिरीदुर्ग उपयुक्त होते. या गिरीदुर्गांच्या आश्रयाने मराठ्यांनी मोगलांना विलक्षण त्रस्त केले. गनिमीकावा हा तर मराठ्यांच्या हातचा मळ होता. परंतु बागलाण भागात काही ठिकाणी उघड्या मैदानात लढाया जिंकून मराठ्यांनी मोगलांना चकीत केले. इ.स. १६७० चा हा संघर्ष अभूतपूर्व होता.
बागलाण भागातील विशेषत: चांदोर पर्वतराजीतील डोंगरी किल्ले नैसर्गिक दृष्टया खरोखरीच अभेद्द होते. इसवी सन १६७० मध्ये हे किल्ले जिंकून घेण्यासाठी मोगलांनी निकराचे प्रयत्न केले. परंतू मोठ्या प्रयासाने जिंकून घेतलेले किल्ले संधी येताच मराठे अल्पावधीत अगदी सहज जिंकून घेत, त्यामुळे मोगल सरदांच्या पराक्रमावर पाणी पडत असे आणि दिल्लीला औरंगजेब क्रोधायमान होत असे. अजिंठा आणि चांदोर पर्वतराजीतील अभेद्य गिरीदुर्गांविषयी इ.स. १८२० मध्ये जनरल लेकने लिहले आहे, "ह्या किल्ल्यांची नैसर्गिक तटबंदी इतकी आश्चर्यकारक आहे की मोठ्या परिश्रमाने आणि कौशल्यांने ती मुद्दाम तयार केलेली आहे असे वाटते."

Ahivant.JPG

चांदोर पर्वतराजीत अहिवंत हा एक असाच विलक्षण गिरीदुर्ग आहे. दिंडोरीच्या उत्तरेला पंधरा मैलावर हा किल्ला असून गंगथडी आणि खानदेश या मराठमोळ्या भागाच्या संरक्षणाच्या दृष्टीने शिवकालात त्याचे महत्व अनन्यसाधारण होते. कारण खानदेश आणि गंगथडी भागातून किल्ल्याकडे जाणारा रस्ता अतिशय अवघड असून पावसाळ्याच्या दिवसात गंगथडीकडून जाणे केवळ अशक्य आहे.

कॅप्टन ब्रिग्ज याने १८१८ मध्ये अहिवंत किल्ल्याचे वर्णन करताना विशाल आणि आकारहीन डोंगर असे म्हटले आहे. किल्ल्यावर प्रवेशद्वाराच्या काही खुणा आणि उध्वस्त झालेल्या भांडार गुहाचे काही अवशेष सोडल्यास काहीही नाही. परंतु या गिरीदुर्गाने एकेकाळी मोगलांच्या तोंडचे पाणी पळविले होते.

वर सांगितल्याप्रमाणे इ.स. १६७० मध्ये मोगलांच्या बरोबर संघर्ष सुरू झाल्यावर शिवाजीमहाराजांनी बागलाणातील किल्ले जिंकून घेण्याचा सपाटा सुरू केला. डिसेंबर १६७० मध्ये महाराजांनी अहिवंतचा किल्लाही जिंकून घेतला. यावेळी खानदेशचा मोगल सुभेदार दाऊदखान कमालीचा अस्वस्थ झाला. औरंगजेबाची आपल्यावर गैरमर्जी होणार हे त्याने ओळखले. कारण अहिवंत किल्ला म्हणजे खानदेश आणि गंगथडी या दोन्ही भागाचा टेहळणी नाका होता. वाटेल ती किंमत देऊन अहिवंत किल्ला पुन्हा जिंकून घ्यायचे दाऊदखानाने ठरविले. मराठ्यांनी अहिवंत जिंकून घेतला त्याचे शल्य दाऊदखानाच्या मनात सलत होते. कारण किल्ला जिंकताना मराठ्यांनी दाऊदखानाला हातोहात बनवले होते. 'मराठे बर्‍हाणपूरची पेठ लुटणार आहेत', अशी बातमी शिवाजीमहाराजांच्या सहकार्‍यांनी हेतुपुरस्पर पसरवली होती. त्याचा परिणाम म्हणजे दाऊदखान प्रचंड फौज घेऊन बर्‍हाणपूरच्या रोखाने निघाला. परंतु अजिंठ्याच्या लेण्याजवळ आल्यानंतर त्याला कळले की मराठे अहिवंतच्या रोखाने गेले आहेत. दाऊदखानाने मोठ्या शीघ्र गतीने अहिवंतकडे वाटचाल सुरू केली. परंतु रस्त्यातच मराठ्यांनी अहिवंत किल्ला जिंकून घेतल्याचे त्याला समजले. प्रत्यक्ष लढा न होता अहिवंत मराठ्यांकडे जावा, एवढेच नव्हे तर दाऊदखान या महत्वाच्या प्रसंगी बेसावध असावा ही गोष्ट औरंगजेबाला खपण्यासारखी नव्हती.

सम्राट आपल्याला बडतर्फ करील अशी भिती दाऊदखानाला वाटू लागली. दरम्यान औरंगजेबाने महाबतखान नावाच्या सरदारास दक्षिणेत पाठवले असल्याची वार्ताही दाऊदखानाला समजली. त्यामुळे तो अधिकच बेचैन झाला. त्याच्या ह्या अस्वस्थ मन:स्थितीचा फायदा घेऊन मराठ्यांनी जानेवारी १६७१ मध्ये बागलाणातील दुसरा महत्वाचा किल्ला 'साल्हेर' जिंकून घेतला. त्यामुळे तर दाऊदखानची परस्थिती शोचनीय झाली. महाबतखान दक्षिणेत येऊन लढ्याची सूत्रे स्वत: कडे घेणार ही कल्पनाच दाऊदखानला सहन होईना. 'आपल्याला, दिल्लीला परत बोलवून घ्या' अशी विनंती त्याने औरंगजेब बादशहाला केली, परंतु त्याचा उपयोग झाला नाही.

महाबतखान इ.स. १६७१ च्या प्रारंभीच महाराष्ट्रात येऊन दाखल झाला. दाऊदखान आणि महाबतखान यांची जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात चांदूर येथे भेट झाली. महाबतखानाने दाऊदखानास योग्य ती वागणूक दिली नाही. म्हणून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले. असे तारीखे दिल्कुशाचा लेखक भीमसेन सक्सेना लिहितो. भीमसेन स्वत: दाऊदखानाकडे नोकरीस होता. चांदूरच्या भेटीत दोघांनी मराठ्यांविरुध्द कोणती पावले उचलायची याचा आराखडा तयार केला आणि त्याप्रमाणे अहिवंतच्या किल्ल्याला वेढा दिला.
जवळ जवळ एक महिना वेढा रेंगाळत चालला. महाबतखान आणि दाऊदखान वेगवेगळ्या दिशेने मोर्चे बांधून हल्ल्याची पराकाष्टा करत होते. परंतु यश मिळत नव्हते. किल्ल्यातील मराठ्यांची अल्पशिबंदी मोगलांच्या प्रचंड सेनेला दाद देत नव्हती. महाबतखानाच्या बरोबर किशनसिंग, (मिर्झा राजे जयसिंग यांचा मुलगा) सुजाणसिंग, शुभकर्ण बुंदेला, अनुपसिंग, तुर्क ताजखान इत्यादी मातब्बर सरदार होते. परंतु किल्ला सर होण्याची आशा दिसेना.

या वेढ्याच्या वेळी 'तारीखे दिल्कुशाचा लेखक भीमसेन सक्सेना हजर होता. अहिवंतच्या वेढ्याची तपशीलवार हकिकत त्याने दिलेली आहे. दाऊदखानच्या पदरी एक जोतिषी होता. त्याला भिमसेनने 'किल्ला केंव्हा सर होईल?' म्हणून विचारले. तेंव्हा त्या ज्योतिषाने साखरेचा एक छोटासा किल्ला तयार केला. तटबंदी साखरेची, बुरूज साखरेचा, प्रवेशद्वार साखरेचे असे त्या किल्ल्याचे स्वरूप होते. किल्ल्याभोवती उभे केलेले मोर्चेही साखरेच्या प्रतिकृतीमध्ये दर्शविले होते. ज्योतिषाने मग एक मुंगळा या साखरेच्या किल्ल्यावर सोडला. मुंगळा प्रथम महाबतखानाच्या मोर्चाकडे गेला. त्यानंतर साखरेचा बुरुज ओलांडून किल्ल्यात गेला. ज्योतिषाने सांगितले, 'महाबतखानाच्या मोर्च्याकडून किल्ल्यावर जबरदस्त मारा होईल. परंतु सहा दिवसानी दाऊदखानच्या मोर्च्याकडूनच किल्ला सर होईल.'

भीमसेन लिहितो, 'अहिवंतचा किल्ला म्हणजे गगनाला भिडल्यासारखा... तो सर होईल हे बुध्दीला पटेना. परंतु खरोखरच सहाव्या दिवशी दाऊदखानच्या मोर्च्याकडून किल्ला सर झाला.'
वास्तविक महाबतखानाने निकराचे हल्ले केले होते. परंतु किल्ल्यातील मराठ्यांनी अंत:स्थपणे दाऊदखानाशी वाटाघाटी करून किल्ल्याच्या किल्ल्या त्याच्या ताब्यात दिल्या. भीमसेन लिहतो, "या वाटाघाटी महाबतखानाच्या पश्चात झाल्या, म्हणून त्याला भयंकर राग आला."

मराठ्यांनी दाऊदखानाबरोबर कोणत्या प्रकारच्या वाटाघाटी केल्या असतील?.....दाऊदखानाने गुपचूपपणे किल्ल्यातील मराठ्यांना कसे जाऊ दिले ? ...... महाबतखानाला हा बेत कसा समजला नाही ?... या सार्‍या प्रश्नांचे उत्तर म्हणजे किल्ला जिंकण्याचे श्रेय मिळावे, म्हणून दाऊदखानाने 'साखर पेरणी' करून मराठ्यांना वश केले असावे. ज्योतिषाने तयार केलेल्या साखरेच्या किल्ल्याचा अर्थ तोच असावा. एरवी महिन्यापेक्षा अधिक काळ मोठ्या शर्थीने लढवलेला किल्ला केवळ पाच सहा दिवसातच मराठ्यांनी मोगलांच्या स्वाधीन कसा केला असता आणि खरा जबरदस्त मारा महाबतखानाच्या मोर्च्याकडून होत होता, मग किल्ला जिंकण्याचे श्रेय महाबतखानाला का मिळाले नाही ? दाऊदखानाशी वाटाघाटी करून मराठ्यामनी कार्यभाग साधला आणि विशाल व आकारहीन अहिवंत त्यानी मोगलांच्या स्वाधीन केला. ज्योतिष्याला दाउदखानकडून मोठी बक्षिसी मिळाली असे भिमसेन सांगतो.

मात्र दाऊदखान आणि महाबतखान या दोघांना बादशहाकडून भलतेच बक्षिस मिळाले. महाबतखानबद्दल कोणीतरी बादशहाकडे चहाडी केली की तो आतून शिवाजीला सामील आहे. संशयी बादशहाने महाबतखानाला सप्टेंबर १६७१ मध्ये परत बोलावले. दाऊदखानाला तर त्यापूर्वीच बादशहाने बोलावून घेतले होते. साखरेचा किल्ला (अहिवंत) जिंकल्याचे बक्षीस त्या दोघांना अशाप्रकारे मिळाले.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

.