गण गण गणात गणपती- श्री गणारायांच्या कृपेने एक सुरुवात!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

गण गण गणात गणपती- श्री गणारायांच्या कृपेने एक सुरुवात!

३ ऑगस्ट २०१० रोजी मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळाला एक विनंतीपर ईमेल केली:

संयोजक मंडळी,
यंदा मायबोली गणेशोत्सवात रोज एक, याप्रमाणे मायबोलीकरांनी रचलेल्या आरती/ गीतें संगीतबद्ध करून ऑडिओ स्वरूपात इथे द्यायचा मानस आहे. यात इथे इतरही उत्सुक मंडळी सामावून, तसा चार -पाच जणांचा छोटा समूह बनवून किंवा वैयक्तिक स्वरूपात हे करता येईल. तुमची परवानगी असेल तर इतर इच्छुकांना संपर्क करून तसे काम चालू करतो. नाही तर वैयक्तिक स्वरुपात नक्कीच ऑडिओ पाठवायला आवडेल. कृपया विनंतीचा आग्रहपूर्वक विचार केला जावा.
धन्यवाद!
योग

अर्थात, संयोजक मंडळाचे हो वा नाही येण्याआधीच, ही इच्छा मनात आली, नव्हे तर ही तीव्र इच्छा स्वस्थ बसू देईना. हेतू एवढाच होता, की या निमित्ताने देशाबाहेर असूनदेखील खुद्द श्री गणरायांची स्थापना करता आली नाही, तरी आपल्या परीने एक सेवा करता येईल. स्वतः कधी आरत्या वा भजनपर गीते लिहीली नसल्याने, किमान मायबोलीकरांनी लिहिलेल्या सुंदर आरत्यांना संगीत देऊन निव्वळ मायबोलीच्या गणेशोत्सवात, हा एक खारीचा वाटा म्हणून आपले योगदान असावे, असा विचार मनात प्रबळ होता. संयोजकांनी लगेच त्याच दिवशी पत्राचे उत्तर देऊन प्राथमिक संकल्पना आवडली, मंजूर असल्याचे कळवले. पण प्रत्यक्षात याचे स्वरूप अन नेमके हे कसे करणार? असा मोलाचा प्रश्न उपस्थित केला.

खरं तर माझ्या माहितीतील दोन चार मायबोलीकर यांच्या रचना, गीते वापरता येतील असा विचार होता, पण त्यांच्याकडून तसे नक्की कळले नव्हते. शिवाय या निव्वळ आरत्या नसून गणपतीवरील गीते/गाणी असावीत, असे मनात होते. तसे ईमेल करून विचारले असता त्यापैकी, जयावी आणि पेशवा दोघांनीही आनंदाने संमती दिली. जयावीचे गीत तयारच होते. पेशव्याने मात्र त्याच्या स्वभावानुसार उस्फूर्तपणे एक गीत रचना करून पाठवायचे कबूल केले. उस्फूर्त अशासाठी, की मी विचारल्यावर "बरं, बघतो काही सुचते का" असे उत्तर त्याने ईमेलमध्ये दिले होते.

२१ ऑगस्ट, २०१० ला संयोजकांनी पुन्हा एकदा सहमतीची/ परवानगीची आणि बरोबर अंतिम मुदत असलेली ईमेल पाठवली, ज्यात शक्यतो ५ सप्टेंबर पर्यंत सर्व गीते संपूर्णपणे तयार करून त्याच्या mp3 किंवा लिंक पाठवायची सूचना केली, आणि मी ती मान्य केली.

खरं तर मला स्वत:लाच मोठा धक्का बसल्यागत झाले. कारण चांगली इच्छा, हेतू, श्री गणरायांची सेवा हे सर्व भावनिकदृष्ट्या ठीक आहे, पण २१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर म्हणजे थोडक्यात फक्त १५ दिवसांत ही सर्व गीते, चाल, सूर, गायन, संगीत, वाद्य, इत्यादीसकट पूर्णत्वाला न्यायचे? बापरे! क्षणभर हे काहीतरी भलतेच द्रोणागिरी उचलण्याचे काम घेऊन बसलो की काय, असे वाटले. पण शब्द दिला होता, मंजूरी मिळाली होती, ध्येय समोर होते, अन दिवसरात्र एक करून हे संपूर्ण करावे अशी ऊर्मी मनात होती- तेव्हा ठरले, आता माघार नाही. तरीही प्रचंड दडपण होते- याला कारण मायबोलीवरील विशेषतः गणेशोत्सव, दिवाळी अंक इत्यादीतून आजवर उंचावत गेलेला साहित्याचा एकूण दर्जा. आपली गीते ही किमान त्या दर्जाला साजेशी असतील इतपत तरी आवश्यकच होते. थोडक्यात भावनिकदृष्ट्या जरी एखादे गीत गणरायाच्या सेवेला पुरेसे होते, तरी व्यावहारिकदृष्ट्या हे काम तत्परतेने अन दर्जेदार होणे आवश्यक होते.

एकीकडे मनात या सर्व गोष्टी अन् चलबिचल सुरू असताना दुसरीकडे श्रीगणरायावर गीते लिहीणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान होते. आजवर गायत्री मंत्र, अथर्वशीर्ष या पलिकडे या प्रांतात माझी लेखनिक झेप नव्हती. मग तशी गीते लिहून, स्वरबद्ध करून पुन्हा कुणाकडून तरी गाऊन घ्यायची, ही फारच दूरची गोष्ट होती.

इकडे १४ ऑगस्टला पेशव्याने एक तीन कडव्यांचे गीत (गणा गणा) लिहून पाठवले. श्री गणरायांवर हे असे थोडेसे गवळण, गजर अशा थाटाचे गीत पेशवेच लिहू जाणे. तरीही त्यावर "अरे हे जरा लहान आहे, वाढवून पाठवणार का?" या माझ्या विनंतीला मान देऊन त्याने १५ ऑगस्टला अजून दोन कडवी वाढवून लिहून पाठवले. मला इथे वैयक्तीक एक गीत लिहायचे तर घाम फुटत होता, हा इसम पानात पदार्थ वाढल्यागत कडवी वाढवून पाठवत होता, तेही दर्जात कुठेही कमी न करता, अन् उगाच शब्दांची जोड तोड न करता!

जयावीने देखील १४ ऑगस्टला चार कडव्यांची गणेशवंदना लिहून पाठवली, अगदी ध्रुवपद, कडवी इत्यादी बारकाव्यांसकट, शिवाय "मी लिहीलेली गीते घ्यायलाच हवीत असे काही नाही", असा नेहेमीचा प्रेमळ सल्ला सोबत.

याखेरीज पेशवा अन जयावी यांनी अजून एक, एक गीत लिहून पाठवले होते, पण माझ्या मनात ते तितकेसे उतरत नव्हते. याला मुख्य कारण बहुधा असे असावे, की हे सर्व काम करायचे ठरवल्यावर आणि संयोजकांचा होकार आल्यावर, एक संकल्पना मनात तयार होत होती. नुसत्याच आरत्या/गीते रचण्यापेक्षा त्यामागे एखादी कहाणी/ संकल्पना/ भूमिका/ क्रम असावा असे वाटत होते. मग साधारणपणे श्री गणराय घरी आल्यावर त्यांची स्थापना, पूजा, स्तुती, आरती, यथावकाश विसर्जन आणि निरोप या घटनाक्रमावर ही गीते रचली, तर गणेशोत्सव जगल्यासारखे होईल. पेशव्याने लिहीलेले काव्य (याला मी "गणेशगजर" म्हटले) आणि जयावीने लिहीलेली गणेशवंदना ही काव्ये तयार होती, पण मग बाकीच्या घटनाक्रमाचे काय? त्याला अनुसरून इतर गीते मिळत नव्हती. मग काय? मायबोलीच्या खजिन्यात पुन्हा शोध चालू केला. गेल्या एक, दोन वर्षातील आरत्या/ गीते/स्तवने वाचून काढली, पण कुठेतरी काहीतरी माझ्या मनातील घटनाक्रमात वा संकल्पनेत बसत नव्हते. हे सर्व करत असताना एकीकडे मनाच्या दुसर्‍या कोपर्‍यात काही शब्द, सूर उमटू लागले होते.

शेवटी ठरवलं- हे काम आपणच करायचं.

मग गणेश स्तवनापासून सुरुवात केली. आपल्या संस्कृतीत आणि विशेष करून गणपतीच्या अनुषंगाने ॐकाराचे महत्व मोठे आहे आणि सर्व सृष्टीची सुरुवात त्यापासूनच आहे, अशी संकल्पना आहे. मग त्याला अनुसरून "ॐ नमो श्री गं गणपतये नमो" हे गीत रचले. अर्थातच हे गणेश स्तवन/स्तुती असल्याने यात गणपतीचे सर्व गुण येणे अपेक्षित होते. त्यातूनच मग "ॐकार हुंकार शब्दसूर झंकार परंब्रह्म निरंकार तू" अशा शब्दांची रचना झाली असावी.
(हे गीत ईथे आहे.)

मग गणराय घरी आल्यावर त्यांची स्थापना करायची, त्यातून "आज बाप्पा घरी आले, मन माझे तल्लीन झाले" हे गीत सुचले. या गीतात निव्वळ गणपतीचे गुण नव्हे तर रंग, रूप, सजावट, थाटमाट हेही येणे आवश्यक होते असे वाटले. त्याला धरून सर्व गीताची रचना केली.
(हे गीत ईथे आहे.)

गणेश गजर म्हणून पेशव्याचे "गणा गणा" तिसरे गीत झाले.
(हे गीत ईथे आहे.)

गणरायांच्या स्तुतीला, वंदनेला, जयावीचे "गजानना तुझ वंदन करीतो" हे चौथे गीत झाले.
(हे गीत ईथे आहे.)

आता घटनाक्रमानुसार खरे तर गणराय घरी आले, बसले, त्यांचे वंदन स्तवन झाले, पुढे काय? इथे गाडी अडली. अडली म्हणण्यापेक्षा आजूबाजूला आजकाल जे काही विचित्र, वाईट, चालू आहे, त्या पार्श्वभूमीवर गणरायाचे कौतूक, आगमन हे सर्व कुठेतरी असंबद्ध बाटत होते. दर वर्षी बाप्पा येतात, आम्ही जल्लोषात स्वागत करतो, कौतूक करतो, मग बाप्पा वाजत गाजत निरोप घेतात, पुढे काय? रोजचा संघर्ष, दैन्य, दु:ख, अन्याय याचे काय? ते तसेच रहाते? असे का? हे असले टोकाचे विचारही मनात येत होते. त्यातूनच बहुदा "पावाल का, देवा धावाल का" हे पोवाडारूपी गीत मनात आकार घेत होते. मनातील या संघर्षाला कुठेतरी मोकळी वाट करून द्यावी अन त्याची तक्रार, निवारण श्री गणरायच करतील या भावनेतून ते शब्द/गीत आकारास आले.
(हे गीत ईथे आहे.)

मग, गणरायांचे निरोपगीत- थोडक्यात विसर्जनाची मिरवणूक या अनुषंगाने गीत लिहायचे होते- त्याचे ध्रुवपद लिहून ठेवले, पुढचे सुचत नसल्याने तसेच ठेवले.

शेवटी या सर्वाचा सांगितिक समारोप म्हणून एक भैरवी/भजन लिहायचे ठरवले. गणरायांकडे आपण रिद्धी, सिद्धी, बुद्धी, समृद्धी, इ. मागतोच, पण भैरवी रचायची असल्याने त्यात एक समर्पण, भक्तीभाव, कैवल्यभाव यावा असे वाटत होते. आयुष्याच्या सांजेला श्री गणपतीकडे काय मागणे असेल? संत, सज्जन, ई. मंडळींनी विठ्ठल, पांडुरंग, श्रीकृष्ण, श्रीराम ई. सर्व देव देवतांकडे अशा प्रकारची अध्यात्मिक मागणी अनेकविध गीत रचनांमधून केली आहेच, पण श्री गणरायांकडे अशी मागणी करता येईल का? का नाही?
शेवटी सर्व देव एकच, तत्व एकच, हे आपणच म्हणतो अन दुसरीकडे मात्र बालाजीकडे धन, साईंबाबांकडे समृद्धी, हनुमानाकडे शक्ती, इ. वर्गवारी आपणच करतो.

ते काही नाही, भाव खरा असावा, प्रामाणिक असावा हेच महत्वाचे. तेव्हा पुन्हा एकदा ॐकार साधना अन् त्याचे अध्यात्मिक अनुषंगाने असलेले महत्व, याला धरून श्री गणरायाकडे काही मागणे मागता येईल का? ऐहिक जगताचे संबंध संपतात, थोडक्यात देहातून प्राण जातो, तेव्हा निव्वळ देहालाच बरे वाईट डाग रहावेत, आत्मा/आत्मतत्त्व मात्र तसेच निर्मळ, शुद्ध, निरंजन असावे यासाठी ॐकार हे साधन होईल का? ॐकार साधनेतून हे शक्य होईल का? अशी एक मागणी, असा एक विचार मनात येत होता. अर्थात एवढ्यावरच गाडी थांबली होती. ही संकल्पना वा विचार आकर्षक वाटला, तरी एखाद्या काव्यातून तो फुलवणे, पोचवणे हे जमायला हवे, त्यासाठी शब्दही हवेत. थोडक्यात या गीताची निव्वळ संकल्पना अन पुसटसे शब्द डोक्यात घोळत होते.

हे सर्व चालू असताना एक प्रकारची तंद्री लागलेली अवस्थाच आली होती जणू. काही गीतांचे शब्द अपोआप स्फुरत होते तर काही गीतांचे निव्वळ सूर (भैरवी) डोक्यात घुमत होते. पोवाडा, भैरवी लिहीण्याएवढा मुद्दामून अभ्यास नाही, अनुभव तर नाहीच, पण तरीही कुणितरी आपल्याकडून हे लिहून घ्यायला आपल्याला भाग पाडतय, एक भलतीच तीव्र इच्छा, तळमळ आपल्यात निर्माण करतंय, हे जाणवत होतं- तीन दिवस डोकेफोड करून देखील न जुळलेली भैरवी/भजन रात्री २.३० वाजता अचानक शब्द समोर येतात काय, मी झपाटल्यासारखा ऊठून ते कागदावर उतरवतो काय, सकाळी कामावर जाण्या आधी त्याची चाल तयार करतो काय, अन संध्याकाळी घरी येताना गाडीतच ती संपूर्ण भैरवी शब्द सूरांसकट माझ्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड करतो काय- या सर्वाला दैवी संकेत म्हणावे, का निव्वळ माझे वेड, का आणखीन काही- याला माझ्याकडे उत्तर नाही. मी आजही हेच म्हणून शकतो की कुठलीतरी गूढ शक्ती माझ्याकडून हे सर्व करून घेत होती- मी निव्वळ माध्यम होतो.

(हे भैरवी/भजन गीत ईथे आहे.)
*****************************************************
या सर्वाचा एक परिणाम मात्र असा झाला, की माझी ठाम खात्री पटली की हे जे काही निर्माण होणार आहे त्याचा निर्माता "मी" नाही, त्याची प्रेरणा, त्याचा स्त्रोत "मी" नाही. मग असे आहे, तर यात मी यशस्वी होईन का अयशस्वी, याची चिंता कशाला करावी? तो व्यवहार आहे. एक प्रवास आहे. मी प्रवासाचा आनंद मात्र घेईन, जमल्यास इतरांना देईन अन कृतार्थ होईन, बस्स! त्या एका विचाराने आत्तापर्यंतचे दर्जा, गुणवत्ता, वगैरेचे आलेले ओझे कुठल्या कुठे पळून गेले. ही निर्मिती पूर्णत्वास न्यायची या एकाच ध्यासात मी रंगून गेलो जणू.

तरिही व्यावहारीक अडचणी होत्याच. घर, संसार, नोकरी, आणि अडीच वर्षाची मुलगी या सर्वात वेळ काढायचा कसा? जमेल तसे कामावरून आल्यावर, तुकड्या तुकड्यात बसून चाली लावणे, संगीत बनवणे सुरू होते. बायकोने रोजचे कामकाज स्वत:वर घेतले, त्यामुळे थोडा मोकळा झालो खरा, पण या सर्व गीतांना संगीत द्यायचे, सर्व अधले मधले संगीत तुकडे बसवायचे, ते रेकॉर्ड करून ठेवायचे वगैरे या सर्वाला "वेळ" हवा होता आणि कितीही नाही म्हटले तरी १५ दिवसात तेवढा वेळ मिळणे अवघड होते. खेरीज या चाली, गीते, यातला भाव, प्रामाणिक प्रयत्न मला जितका माहित होता तितका समोरच्याला तो पोचेल का याची शाश्वती नव्हती.

मग ठरवलं. आज काही खास रसिक, जाणत्या मंडळींना बोलावून हे ऐकवावे- निदान त्यांच्या प्राथमिक अभिप्रायावरून तरी काही कळेल. संध्याकाळी जेवणाचा घाट घातला. जेवणानंतर आम्ही बसलो. मी आणि बायकोने तयार असलेली तीन गीते ऐकविली. श्रोत्यांमध्ये पेटी/गाणे/संगीत यातला "दादा" माणूस समोर बसला होता. एक जुना मित्र, हितचिंतक असला तरी या बाबतीत तो मला खरे खोटे-रोख ठोक ऐकवणार याची खात्री होतीच. मलाही तेच हवे होते- फुकट उगाच वरवरची स्तुती नको होती- म्हटलं याने आत्ताच ठोकलं तर बरं होईल पुढे ठोकर खाऊन पडणार तरी नाही. रचना ऐकल्यावर तो स्तब्ध झाला, क्षणभर विचार करून त्याने मला पुढचा धक्का दिला, "या रचना ध्वनिफितीवर आल्याच पाहिजेत, it deserves the best"! मी खूष झालो पण ध्वनिफीत काढणे मात्र अनपेक्षित होते. फार फार तर घरच्या घरीच होम स्टूडियो वर रेकॉर्ड करून आणि संगीत साज चढवून मी तयार करणार होतो. संगीतातील एकूणात पूर्वीचा अनुभव असला तरी हे काम व्यावहारीक दृष्ट्या अजून एक पहाड उचलण्याचे काम होते. दडपण आणि समाधान दोन्ही एकाच वेळी होते.

यात व्यवहारिक अडचणी बर्‍याच होत्या. वाद्य, वादक, स्टूडीयो, रेकॉर्डींग, फायनल मास्टरींग वगैरे वगैरे या गोष्टी दुबईमध्ये शक्य नव्हत्या. हाताशी वेळ होता २ आठवडे, त्यात नोकरी, त्यात मुलीची शाळा, इतकेच काय कुठला स्टुडिओ, कुठला अ‍ॅरेंजर इथपासून सुरुवात होती. हे काम भावनेच्या भरात हो म्हणून होण्यासारखं नव्हतं.

पण या सर्व उपस्थित मंडळींनी असा आग्रह धरला, की या गाण्यांची एक सुंदर ध्वनिफीत व्हायलाच हवी. माझ्या मते हा प्रकल्प/काम व्यावसायिक-कमर्शियल स्वरूपाचे नसल्याने उगाच, निव्वळ काहीच्या काही अवाजवी किंमत मोजून ध्वनिफीत करायची गरज नव्हती. मुळात याला भक्तीभाव याचा साज असल्याने आणि गणेशोत्सवाचे विशेष निमित्त असल्याने, त्याला समजून माझ्या जोडीने काम करणार्‍या कलाकारांबरोबरच काम करणे योग्य होते. पण इतक्या कमी वेळात आणि कसलाही जुगाड नसताना मी कुणाकडे जाणार होतो?

पुन्हा एकदा मायबोलीवरील मित्र/मैत्रिणी मदतीला आले. पैकी जयावीने दिलेल्या रेफरन्स वरून मी मुंबईमधील प्रशांत लळित यांना दुबईतून फोन केला, आणि एकूण संकल्पना आणि स्वरूप याची बोलणी केली. प्रशांतसारख्या अत्यंत यशस्वी संगीत संयोजक आणि व्यस्त कलाकाराने तरीही मला होकार दिला. फक्त कमी वेळेत हे सर्व कसे काय जमेल अशी शंका उपस्थित केली. "आमचे प्रॉजेक्ट कमीत कमी दोन महिने आधी चालू होतात, आपल्याकडे तर एक महिना देखिल नाही," त्यावर माझ्याकडे उत्तर नव्हते. प्रत्यक्ष मुंबईला जाणे आणि काम पूर्ण करणे याशिवाय पर्याय नव्हता.

प्रशांतने एक दोन दिवसांत सर्व वादक संच, व रेकॉर्डींग स्टुडिओच्या तारखा बघून मला उत्तर दिले.
ठरले तर, मी दुसर्‍याच दिवशी विमानात बसून मुंबईला जाणार होतो. ऑफीसमध्ये एक दिवस रजा टाकून गुरुवार, शुक्रवार, शनिवार ह्या तीन दिवसांत ऑडिओ (वाद्ये) रेकॉर्डिंग करून, मग पुढल्या आठवड्यात व्होकल (गायक) रेकॉर्डींग करायचे ठरवले. पण एकंदरीत कमी वेळ, अन् या अशा गीतांना ईतर बाहेरचे व्यावसायिक गायक भावनिक तत्वावर तितका न्याय देवू शकतील का, याची खात्री नसल्याने मी स्वत: अन् बायको, दोघांनी हे गायनाचे शिवधनुष्य उचलायचे ठरवले- थोडक्यात, आणखी एक मोठी जबाबदारी. दोघांनाही गायनाचा अनुभव असला, तरी अलिकडे रियाज सोडाच, साध्या गायनालाही वेळ मिळत नव्हता. त्यातही घरी बसवलेल्या चाली आणि संगीत संपूर्ण नव्हते, साधारण अंदाज येईल इतपत जुजबी करून ठेवले होते. एकंदरीतच एकीकडे संगीत रेकॉर्डींग तर दुसरीकडे गायन रियाज असे काहीसे करावे लागणार होते.
*****************************************************
या सर्व विचारांचा गुंता डोक्यात घेऊन मी दुबईहून रात्री प्रयाण केले- २३ ऑगस्ट २०१०. तत्पूर्वी, त्याच दिवशी, म्हणजे २३ ऑगस्टला सकाळी प्रशांतला मी बसवलेल्या गाण्यांच्या mp3 ईपत्राने पाठवून दिल्या, एक अंदाज यावा या दृष्टीने. त्याच दिवशी रात्री विमानात काही म्युझिक चे तुकडे आणि एक दोन कडव्यांच्या चाली बसवून टाकल्या. माझा अवतार- हेडफोन, लॅपटॉपवर दिसाणारे अगम्य म्युझिक सॉफ्टवेअरचे स्क्रीन, नोटेशनची चाललेली धडपड वगैरे पाहून, बाजूची सहप्रवासी दर थोड्या वेळाने मी नक्की काय करतोय असे "साशंक लूक्स" देत होती. मी एका म्युझिक अल्बमवर काम करतोय, अशी थोडक्यात तिची बोळवणी करून, तिच्या भलत्या शंकांना आळा घातला.
मुंबईत उतरलो ते पहाटेचे ६ वाजले होते, २४ ऑगस्ट. प्रशांतचे घर सासुरवाडीच्या जवळ असल्याने मी सासुरवाडीलाच थेट गेलो. न्याहारी, नाश्ता करून, ९.३० ला ठरलेल्या ठिकाणी मी पोचलो. सासरेबुवा म्हणजे दिलाचे राजा अन संगीताचे कानसेन- मला मदत म्हणून गिरगावमधील स्वत:च्या मोठया रेस्टॉरंट मधील मागच्या ऑफिसची जागा, खेरीज पेटी, तबला असे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले.
१०.३० वाजता प्रशांत आला- ती आमची पहिलीच भेट. पण आमचे सूर असे काही जुळले, की जणू या आधी अनेक वर्षे एकमेकांबरोबर काम केले आहे.

मग तहान भूक विसरून सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.३० पर्यंत बसून सर्व संगीत तुकडे, नोटेशन्स, वगैरे फायनल केले. कुठे काय वाद्ये वाजवायची, कुठले ताल, तुकडे, मुखडे, इत्यादी, याची कल्पना मी आधीपासून दिली असल्याने, खेरीज प्रशांतचा यातील अनुभव, याच्या जोरावर सर्व ७ गीते आम्ही त्या ८ तासात संपूर्ण संगीतबद्ध करून टाकली. रक्षाबंधनाचा दिवस, घरी जेवायला पाहुणे हे सर्व असून त्यातूनही जमेल तसा वेळ काढत, प्रशांतने ही जबाबदारी स्वत:वरच घेतली जणू- त्याचे आभार मानावे तेवढे थोडेच.

२६, २७ ऑगस्टला सर्व वाद्यवृंद आणि संगीत ट्रॅक रेकॉर्ड करायचे ठरले. शक्यतो सर्व वाद्ये "लाईव्ह" वाजवायची- कीबोर्डवरील वेगवेगळे वाद्याचे टोन्स, संच उपलब्ध असले, तरी ते न वापरता. कारण थेट वाद्याचे सूर हे दर्जा आणि गुणांत अनेक पटींनी चांगले असतात, ओरिजिनल असतात, असा माझा आग्रह असल्याने तबला, ढोलकी, मृदंग, टाळ, झांजा, सितार, शहनाई, ई. सर्व वाद्यवृंदाला तारखा व वेळा दिल्या गेल्या.

२४ ला संध्याकाळी मी आमच्या घरी (माहेरी) Happy गेलो, आणि घरच्यांनाही या कामाच्या व्यापाबद्दल सांगून धक्का दिला. तोपर्यंत त्यांना काहीच कल्पना नव्हती.

२६ ला सकाळी पुन्हा ठाण्यावरून अंधेरीला १० वाजता स्टुडिओला पोचलो. सर्वच नवीन, सर्वच अनोळखी-कसे काय होणार होते, याची चिंता होती. खेरीज भारतीय प्रमाण वेळेनुसार सर्व उगवणार, म्हणजे एकंदरीत काम उशीरापर्यंत चालणार याची खात्री होती. अर्थात उशीरा मुहुर्ताचा नारळ फोडला, तरी आमची तयारी अन वाद्यवृंद कलाकार हे हाडाचे प्रोफेशनल असल्याने गाडीने पटकन वेग पकडला.
सर्वच मंडळी गेले अनेक वर्षे मराठी, हिंदी चित्रपट, अल्बम यातून उत्तम कामाचा अनुभव असलेली, अनेक सिनीयर कलावंत, अनेक नावाजलेले पुरस्काररप्राप्त लोक. या सर्वांना एक संगीत दिग्दर्शक म्हणून सूचना देणे किंवा त्यांच्याकडून हवे तसे काम करून घेणे, हा एक कठीण पण तितकाच मोलाचा अनुभव होता. "हे प्रॉजेक्ट" कमर्शियल नाही, ही गणपतीची सेवा आहे- पण दर्जात कुठेही तडजोड नाही", असे मी सर्वांना आधीच विनंती करून सांगितले. एकंदरीत गीते, चाली, तयारी, शिवाय गायन हे मी स्वतः करणार आहे, याचे प्रचंड कौतुक या सर्वांना वाटले. तर काहींना, ते थोडे चिंतेचेही वाटले, पण माझा प्रामाणिक हेतू लक्षात आल्यावर, अगदी स्वत:च्याच घरी गणपती येणार आहेत, जणू या भावनेने सर्वांनी काम केले आणि सहकार्य केले. अगदी निव्वळ ३० मिनिटाचा लंच ब्रेक घेऊन, सकाळी ११ ला चालू केलेले काम आम्ही रात्री ११.३० ला संपवले. ४ गाणीच झाली होती. उरलेली ३ गाणी दुसर्‍या दिवशी करायची होती. रात्री पुन्हा घरी पोचलो तेव्हा १ वाजला होता. झालेले ट्रॅक ऐकत झोपी गेलो.

पुन्हा दुसर्‍या दिवशी सकाळी १० ला मी स्टुडिओमध्ये हजर झालो. आता सर्वांशी मस्त ट्युनिंग जुळलेले असल्याने एकमेकांच्या अपेक्षा, भावना जास्त चांगल्या प्रकारे समजू शकत होतो. आणि तसं पाहिलं तर मतभेद व्हायला जागा नव्हती, अन झाले तरी सर्व वाद "सुरेल" होता- प्रत्त्येक जण सुरांच्या प्रवासातील साथीदार होता. कोमल, मध्यम तर कधी तीव्र अशा सुरेल देवाणघेवाणीतून श्री गणरायांवरील गाणी आकारास येत होती.

चला, आता निरोप गीत करायला घेऊया, असे प्रशांत ने म्हटले तेव्हा माझ्या एकदम लक्षात आले- अरे हे आपण पूर्ण लिहीलेलेच नाही- नुसती चाल आहे कडव्यांना शब्दच नाहीत. सर्व धावपळीत ही एक गोष्ट मी पूर्ण विसरलो होतो. खरं तर, नुसते वाद्य रेकॉर्ड करायचे तर शब्दांची गरज नव्हती, चाल पुरली असती, पण जरा बारकाईने विचार केलात, तर लक्षात येईल की ते तितकेसे खरे नाही. शब्द काय आहेत, त्यानुसार कुठले वाद्य वाजवायचे, हे ठरवावे लागणार होते. शब्द काय आहेत त्यानुसार, प्रत्येक ओळींचा अन एकंदर गीताचा भाव, अपिल, ठरणार होतं. शब्द कुठे कसे वापरले आहेत, त्यानुसार संगीत तुकडे बसवायचे होते. शब्द एकीकडे, वाद्ये एकीकडे, आणि संगीत एकीकडे असे तुकडे करून चालणार नव्हते. मी सरळ लंच ब्रेक घेऊन टाकला अन् डोक्यात चालू असलेल्या कल्पनेवर विचार करू लागलो- श्री गणरायांच्या विसर्जनाला, मिरवणुकीला, निरोपाला काही आवडते देव-देवता खुद्द आल्या तर? काय माहोल असेल? कोण कोण येईल.. ?

मग एक एक कडवे सुचत गेले. पहिल्या कडव्यात विठ्ठल रखुमाई आले, दुसर्‍या कडव्यात आई अंबाबाई आली, तिसर्‍या कडव्यात खंडेराय आले आणि निरोपाचे गीत मस्त सजले. तिसर्‍या कडव्याची तर गम्मतच झाली. मला आई तुळजा भवानीला या निरोप गीतात आणायचे होते, पण तुळजा भवानीचा काही वेगळा खास गजर आहे का? जसा "जय हरी विठ्ठल", "उदे ग अंबाबाई", वगैरे...? काही डोके चालेना.. एक दोन फोन केले, उपस्थितांना विचारले, पण कुणालाच सुचेना.. तेव्हड्यात अचानक सुचलं. जेजुरीचे खंडेराय- "येळकोट येळकोट जय मल्हार"... भन्नाट! क्या बात है! उपस्थितांना कल्पना आवडली. आणि नेमका याचा फायदा वाद्य वाजवताना झाला, तो असा, की ह्या निरोपगीतास लोककलेचा बाज असल्याने, मग डमरू, दिमडी, ताशा, ढोल, डफ, अशी एक ना अनेक चर्मवाद्ये वाजवायला वाव मिळाला. किंबहुना परकशनिस्टना हे एकंदर गीत इतके आवडले, की त्या कलाकाराने बाहेर उभ्या केलेल्या स्वत:च्या व्हॅन मधून जवळ जवळ १२-१५ वाद्यांची पोतडी बाहेर काढली- अनेक दुर्मिळ वाद्ये.

"आजकाल अशा रचना अन् असे संगीत यावर वाद्ये वाजवायला मिळत नाहीत, तेव्हा मी आज हात धुवून घेणार... " त्यांनी अशी उस्फूर्तपणे दिलेली दाद मला खूप मोलाची होती. "चालेल, या गाण्यात तुम्हां मंडळींना काय हवा तो वाद्य साज चढवा, मी फक्त खटकलं तरच बोलतो..." मी त्यांना अजून जोर दिला. पुढील २ तास निव्वळ मेजवानी होती. हा एक इसम, ही सर्व १२-१५ वाद्ये ज्या कसोशीने अन सफाईने वाजवत होता ते पाहून, ऐ़कून मी धन्य झालो. देहभान विसरून तो वाजवत असताना जणू स्टुडिओतच बाप्पांची मिरवणूक निघाल्यागत वाटत होते- तो अनुभव अन ते क्षण शब्दात पकडणे अशक्य आहे.
(हे गीत ईथे आहे.)

या गीतावर चर्मवाद्ये वाजवताना अनिल करंजगावकर:
studio1.jpg

पोवाडा रेकॉर्ड करताना पुन्हा एकदा या मंडळींच्या क्षमतेचा अन अनुभवाचा फायदा झाला. विशेष म्हणजे पोवाड्यासाठी कुठली वाद्ये चोख आहेत हे प्रशांतने खास फोन करून एका अत्यंत ज्येष्ठ अन् नावाजलेल्या संगीतकार तज्ञाला विचारून घेतले. कारण, मला पोवाड्याचाच मूळ फील हवा होता, कुठलाही ढोल, जॅरींग वाद्ये, किंवा आजकालचे कानठळ्या बसवणारे इफेक्ट्स नको होते. त्या अर्थाने या तज्ञांकडून मिळालेला सल्ला/मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरले. पोवाडाही संपन्न झाला.

आधी सर्व तालवाद्ये मग सूरवाद्ये (बासरी, शहनाई, सतार इ.) असे रेकॉर्डींग झाले. यातही विशेष उल्लेख अन् आभार मानावे लागतील, ते महान सितार वादक उमाशंकर शुक्ला यांचे. आधीचे रेकॉर्डींग थोडे लांबल्याने ४ वाजता सुरू होणारे शुक्लाजींचे सतारीचे रेकॉर्डींग आम्हाला सुरु करेपर्यंत ४.३० झाले.
"६ वाजता माझा ताज हॉटेलला गुलाम अली खान साहेबांबरोबर कार्यक्रम आहे- ५.३० ला गाडी येईल, तोवर आपल्याला उरकता येईल का"? शुक्लाजींनी असा प्रश्ण उपस्थित केल्यावर काय उत्तर द्यावे मला कळेना.

"प्रयत्न करूयात".. आज नाही संपले तर उरलेले काम उद्या करू.." असे म्हणून मी सुरू केले.
शुक्लाजींनी एक एक गाणे सतार तुकडे वाजवून रेकॉर्ड करायला सुरुवात केली. "शुक्लाजी सतार थोडी चढलेली वाटते हो...." मी नकळत बोलून गेलो आणि दुसर्‍याच क्षणी प्रचंड अपराधी वाटले. एवढा मोठा अनुभवी कलाकार, त्याच्या लक्षात इतकी छोटी गोष्ट कशी आली नसेल? बहुदा दोन दिवस सतत स्टुडिओच्या वातावरणात राहून अन् रेकॉर्डींग करून माझे कान फाटले असण्याची शक्यता अधिक होती.

शुक्लाजी थोडे गंभीर झाले. खरं तर स्टुडीयोत सर्वच जण गंभीर झाले. एक तर वेळ कमी होता, पुन्हा सतारीचे ट्युनिंग चेक करायचे म्हणजे वेळ जाणार होता, खेरीज मी कोण? हा कोण नवशिका हे काय बोलतोय? एक ना दोन अनेक शंका...

शुक्लाजींनी डोळे मिटले, स्वतः एक दोन वेळा पुन्हा वाजवून बघितले. "आता ऐका आणि सांगा पाहू"... शुक्लाजी मला म्हणाले. स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा निरव शांतता.. मी हेडफोन घालून प्रत्येक सूर ऐकू लागलो.

"अजून चढलेलीच वाटत आहे"...

शुक्लाजींनी एसी बंद करायला सांगीतले.. पुन्हा वाजवले, मी पुन्हा ऐकले. "आता सुरात वाटत आहे.."
शुक्लाजी हसले. गोची अशी झाली होती की बराच वेळ एसीमध्ये असल्याने थोडे बोटांचे/हाताचे स्नायू आखडले होते- परिणामी चिकारी देताना (सितार छेडताना) आणि वाजवताना त्यांच्या नकळत थोडे जास्त वजन पडत होते- त्यामूळे तारांना थोडा अधिक ताण बसून एक दोन सूर तीव्र भासत होते. सतार मूळ सुरातच लावलेली होती.

"भाई आपके कान बडे तीखे है..." शुक्लाजींनी अनपेक्षित हसून दाद दिली आणि स्टुडिओतील वातावरण पुन्हा हलके झाले. एव्हाना एकंदर गीते, चाल, सजावट यात शुक्लाजी मस्त रमले होते. स्वतः वेगवेगळ्या प्रकारे वाजवून, तुकडे बदलून पहात होते. एखादा झरा मस्त बेफाम वहावा तसे त्यांचे सितार छेडणे सुरू होते... ५.३० वाजून गेले, अजून ३ गाणी बाकी होती.

शुक्लाजी बाहेर आले... "देखो भाई, मैं तो इसे पूरा करकेही जाऊंगा... बढीया है!"

मला खरंच भरून आले.. एवढा महान कलाकार, पण कलेशी इमान राखून होता. गुलाम अलींचा कार्यक्रम थोडा उशीरा सुरू होणार होता, पण शुक्लाजींनी त्या आधी गुलाम अलींबरोबरचे चहापाणी, अन् छोटा रियाज नाकारून "मै थोडा रेकॉर्डींग मे फसा हू.. पुरा करके आता हू.. गाडी ना भेजे, मै टॅक्सीमे आउंगा.." म्हणून आमचा पुढील मार्ग मोकळा करून टाकला.

शुक्लाजी सतार वाजवताना:
studio2.jpg

शुक्लाजींनी रेकॉर्डिंग संपवले. त्यांचे व इतर सर्वांचे शुभाशीर्वाद घेऊन मी त्या रात्री १२.०० ला काम संपवून स्टुडिओतून निघालो.

सर्व वाद्य-रेकॉर्डिंग झाले होते, म्हणजे मास्टर ट्रॅक तयार होते. आता व्होकल्स, म्हणजे गायनाचे रेकॉर्डिंग बाकी होते. दुसर्‍या दिवशी सकाळी मोबाईलवर ऑफिसमधून संदेश होता "थोडे महत्वाचे काम आले आहे, लगेच ये..." एकच दिवसाची सुट्टी असल्याने मी दुबईत असेन अशी त्यांची कल्पना होती, पण मी मुंबईत होतो. त्यामुळे ३०/३१ ऑगस्ट ला गाण्याचे करायचे प्लॅन कोलमडले. लगेच रविवारी विमान पकडून सोमवारी सकाळी कामावर हजर झालो. पुढचे कसे होणार याचे भयंकर दडपण होते कारण दिवस उलटत होते आणि मुदतीची तारीख जवळ येत होती.

*****************************************************
दुबईला आलो आणि बायकोला सर्व वाद्य रेकॉर्डिंग ऐकवले. यावर रोज जमेल तसा रियाज करू, आता आपल्यालाच रेकॉर्डिंग करायचे आहे, एवढे सांगून मी माझ्या ऑफिसच्या कामात पुन्हा गुंतलो. वैयक्तिक मलादेखील रियाजाला वेळ मिळेना. पुन्हा एकदा आमच्या "दादा" मित्रा ने मदतीचा हात पुढे केला. एका दिवशी त्याने आमच्या छकुलीचा ताबा घेतला आणि आम्ही ४-५ तास रियाज करून घेतला. अन्यथा लहान मुलीला सांभाळत हे करणे अशक्य होते. त्यातही तीदेखील मध्ये मध्ये येऊन आमच्या गाण्यात स्वत: गाणी म्हणत असे. तिचे कौतूक होते, पण त्यामुळे लक्ष विचलीत होणे, वेळ जाणे याचाही त्रास होत होता. अशा वेळी मित्राने केलेली मदत लाख मोलाची ठरली. "वाद्यांचे रेकॉर्डिंग तर सुंदरच झाले आहे, आता उर्वरीत जबाबदारी तुमची-गाण्याची, तेव्हा जोर लावून हे काम पुरे करा", अशा त्याच्या शुभेच्छा आणि संदेश घेऊन पुन्हा दुसर्‍या दिवशी दुपारी म्हणजे ऑगस्ट २ ला, सहकुटुंब मुंबईचे विमान पकडले. विमानात पुन्हा एकदा स्वत:शीच रियाज/सराव चालू होता.

रात्री मुंबईत पोहोचलो. एक दिवस आराम करून मग दुसर्‍या दिवशी सकाळी १० पासून पुन्हा रेकॉर्डिंग करायचे ठरले. आम्ही दिवसभर स्टुडिओमध्ये दोघे अडकलो तर लहान मुलीला बघायला, खेळवायला खास पुण्याहून तिची आत्या (माझी मोठी बहीण) आली होती. मग मुलीला आत्याकडे सुपूर्द करून मी आणि बायको पुन्हा एकदा पार्ल्याला स्टुडिओमध्ये सकाळी १० ला हजर झालो. या पार्ल्याच्या स्टुडिओच्या तारखा संपूर्ण महिनाभर आरक्षित होत्या. पण स्टुडिओच्या मालकांशी एक दिवस आधी फोनवर बोललो तेव्हा कळले की नेमके पुढील दोन दिवस अचानक दुसरे कँसलेशन झाल्याने नेमका मला स्टुडिओ ऊपलब्ध झाला- श्री गणरायाच्या कृपेचा प्रत्यय असा सतत येत होता.

खरं तर म्युझिशियन्सकडून काम करवून पुन्हा रेकॉर्ड करून घेणे जास्त मेहनतीचे व क्लिष्ट, त्यापेक्षा आता निव्वळ गायकाचे रेकॉर्डिंग करणे, तेही आम्ही दोघेच गायक असल्याने सोपे असेल, या अंदाजाने मी एकाच दिवसात सातही गाण्याच्या रेकॉर्डिंगचा चंग बांधला होता. पण गेल्या दोन आठवड्यातील धावपळ, विमान प्रवास, बदलते हवामान, आणि निव्वळ मानसिक ताण यामुळे आवाजावर व्हायचा तो वाईट परिणाम झालाच होता. लवंगा, सुंठ, खडीसाखर इ. नेहमीची औषधे घेऊनही परिस्थिती वाईट होती. त्यातल्या त्यात बायकोचा आवाज चांगला लागला होता. शिवाय मुलगी आई शिवाय जास्त वेळ राहणार नाही हे ठाऊक असल्याने पहिल्यांदा बायकोच्या आवाजात गीते रेकॉर्ड करायचे ठरवले.

साधारण ४ तासांत तिच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करून घेतली. प्रसंगी काही सूचना, बडबड या सर्वांमुळे माझा आधीच बसलेला आवाज अजून क्षीण झाला होता. बायकोनेही कसलीही तक्रार न करता आम्ही नवरा बायको आहोत, हे विसरून स्टुडिओमध्ये ती गायक आणि मी संगीतकार आहोत अशा प्रोफेशनल जाणीवेने काम केले, सहकार्य केले, प्रसंगी माझे कटू बोल, सूचना शांतपणे ऐकल्या- याबद्दल शब्दांत आभार वगैरे मानणे अगदीच हलके ठरेल. एकीकडे गाण्यावर लक्ष, तर दुसरे मन, घरी मुलीचे जेवण झाले असेल का, ती व्यवस्थित राहिली असेल का, इत्यादी भावनिक गुंत्यात तीची चाललेली चलबिचल मला स्पष्ट दिसत होती. माझ्याही मनात तेच विचार असले तरीही त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून दोघेही हाती घेतलेले काम पुरे करायच्या इराद्यानेच ऊभे होतो. एक फायदा झाला की सर्व संगीत, गीत इत्यादीचे काम गेले दोन आठवडे तिच्या कानावर पडत असल्याने फारसे रिटेक ने घेता गाण्यांचे रेकॉर्डिंग पार पडले. काही तृटी शिल्लक होत्या, ज्यावर काम दुसर्‍या दिवशी २ तासांत करायचे ठरवून मी बायकोला/ एका "आईला" तिच्या छकुलीसाठी मोकळे केले Happy ३ वाजता दुपारचे जेवण संपवून ती पुन्हा घरी गेली आणि मी स्वताच्या गाण्याचे रेकॉर्डिंग करायला मागे थांबलो.

खरं तर क्षीण झालेला आवाज लक्षात घेता ते करणे धोक्याचे होते, पण मला पर्याय नव्हता.. काम दोनच दिवसांत संपवायचे होते कारण एकदा गाणी रेकॉर्ड झाली की मग फायनल एडीटींग, मास्टरींग, इ. साठी किमान २ दिवस लागणार होते. थोडक्यात ३ सप्टेंबर चा हा पहिला दिवस, मग ४ ला दुसर्‍या दिवशी रेकॉर्डींग चे काम संपवून ५ ला रात्रीपर्यंत फायनल मास्टरींग चे काम पार पाडायचे जेणेकरून ६ तारखेला मायबोली समितीला वायदा केल्या प्रमाणे ट्रॅक्स पाठवणे आणि गणेश चतुर्थीच्या आधी म्हणजे ११ सप्टेंबर च्या आधी किमान एखाद दिवस ध्वनिफीतीचे रीतसर प्रकाशन करणे असा सगळा एकात एक प्लॅन होता. शिवाय ११ सप्टेंबर ला पुनः कामावर रुजू व्हायचे होते. थोडक्यात "अभी नही तो कभी नही" अशी स्थिती होती.

स्टुडिओतील त्या तज्ञ मित्राबरोबर काम चालू केले तेव्हा तोही जरा चिंतेत होता.. म्हणाला, "अरे, आवाजाची अजून वाट लागेल.." पण पर्याय नव्हता. माझी परिस्थिती तो समजू शकत होता.
"अरे, ठरल्या दिवशी रेकॉर्डींग करणारे फक्त दोनच आर्टीस्ट्स माझ्या गेल्या १५ वर्षांच्या अनुभवात मी पाहिले आहेत- सुरेश वाडकर आणि आशाताई... बाकी इतर तर चक्क नुसता "सा" लावून परत फिरतात, आज आवाज लागला नाही म्हणून! कारण गळा कधी दगा देईल हे सांगता येत नाही- गायकाचे तेच एक अस्त्र असते. शिवाय त्या दृष्टीने पथ्य, पाणि, रियाज कितीही केले तरी मुंबईची हवा, विशेषतः जुलै-सप्टेंबर इतकी बेभरवशाची असते की घसा कधी बसेल सांगता येत नाही."

इतक्या मोठ्या कलाकारांची ही अवस्था तिथे मी कोण? तात्पर्य, दुसर्‍या दिवशीपर्यंत थांबून गळा सुधारेलच याची खात्री नव्हती. माझ्या आतील कलाकार स्वस्थ बसू शकत नव्हता आणि व्यावहारिकदृष्ट्या मला दुसरा मार्ग नव्हता.

थोडे गरम पाणी, कडक चहा असले जुजबी उपचार करून मी सर्व उरलेली शक्ती पणाला लावून एकसाथ ६ गाणी रेकॉर्ड केली. २ तासात ६ गाणी झाली होती- मला, मित्राला, इतर तंत्रज्ञांना बरे वाटले, आश्चर्यही वाटले- पण तेवढे कौतुक सोडले, तर सर्व गाणी, त्यात उतरलेले बारकावे इत्यादी सर्व पुन्हा ऐकताना "अजून नक्कीच चांगले होऊ शकेल.. " यावर सर्वांचे एकमत झाले, मलाही ते कळत होते. ठीक आहे, उद्या बघूया.. म्हणून मी संध्याकाळी ८ वाजता पुन्हा त्याची रजा घेतली. घरी पोचलो तेव्हा एव्हाना बाबा कुठे आहेत, म्हणून रडून गोंधळ घातलेली छकुली जेवून झोपली होती. (या लहान मुलांची गंम्मतच असते. आई जवळ असेल तर बाबा कुठे आहे म्हणून विचारतात आणि बाबा असले तर आई हवी असते..! Happy )

दुसर्‍या दिवशी पुन्हा त्या लहान मुलीची खोटी समजूत काढून दोघे सकाळीच निघालो. थोडीशी विश्रांती झाली असल्याने दोघेही फ्रेश होतो पण काम पुरे करायचे दडपण होतेच. बायकोने तिच्या गाण्यांचे ऊर्वरीत काम पुरे केले. कालच्यापेक्षा आज तिच्यातील आत्मविश्वास जास्त ठळकपणे गायनातूनही दिसत होता. एकंदरीत तिच्या व माझ्या मनासारखे काम संपवून ती लवकर घरी गेली.

"आज गळा चक्क नॉर्मल आहे रे आणि आवाज स्पष्ट आहे, चल सगळी गाणी परत करतो.." असे म्हणून मी माझ्या मित्राला धक्का दिला. एक फायदा झाला, की कालची रेकॉर्ड केलेली गाणी ऐकून नोट्स काढून कुठे सुधारणा हव्या आहेत, ते तपासून घेता आले. खेरीज इतरही तांत्रिक बाबींवर आम्ही चर्चा करून घेतली. मी पुन्हा गणपतीचे नाव घेऊन सुरूवात केली आणि एकामागोमाग एक सात गाणी एका टेकमध्ये पार पडली. गाताना असे राहून राहून वाटले, की पलिकडून कुणीतरी दुसरा संगीतकार माझ्याकडून गाऊन घेत असता, तर किती बरे झाले असते? कारण स्वतःच गायचे, पुन्हा ऐकायचे, पुन्हा सुधारायचे हे फारच जिकीरीचे काम होते- शिवाय काही वेळाने स्वत:चे कान "बहिरे" होतात.. अशा वेळी दुसर्‍याच्या कानांवर अवलंबून रहावे लागते. त्या बाबतीत तो तंत्रज्ञ मित्र मदत करत होता, पण एकंदरीत स्वत:ची निर्मिती स्वत: तपासून, क्रिटीक करून, पुन्हा सुधारून करणे म्हणजे एक व्यावहारीक दृष्ट्या वेळखाऊ आणि प्रसंगी डोकेखाऊ काम आहे. अर्थातच तुम्ही त्यात "भारलेले" असाल तर तो प्रवास मजेशीर, रोमांचकारी असतो. पण स्वताच्या निर्मीतेचे कौतूक बाजूला ठेवून त्यातील गुण दोष लक्षात घेवून पुन्हा सुधारणा करणे याला पर्याय नाही.

संध्याकाळी ५ ला सर्व रेकॉर्डिंगचे काम संपवले. पुढचा अख्खा दिवस आता फायनल मास्टरींगसाठी द्यायचा होता. मग पुन्हा संध्याकाळी घरी गेलो. काम बहुतांशी संपले असल्याने मुलीबरोबर मस्त चौपाटीवर भटकून आलो- गेल्या पंधरा दिवसाच्या धावपळीत मुलीबरोबर चौपाटीवर घालवलेले ते क्षण म्हणजे एक "अमृत" होते. ऊर्वरित कामे पार पाडण्याची नवीन शक्ती, उत्साह त्या अमृतातून मिळाला.
पुन्हा एका दुसरे दिवशी दुपारी स्टुडिओत जाऊन बसलो. यावेळी निव्वळ कानात हेडफोन घालून व नुसते ऐकून मीच इतके दिवस केलेल्या ऊठाठेवीचा आढावा घेत होतो. त्यावेळी प्रथम त्या निर्मितीकडे एक त्रयस्थ म्हणून पाहायची संधीदेखील मिळाली. त्यातूनच अनेक गोष्टी शिकल्या, पुढे आल्या, नोंदवून घेतल्या- भविष्यातील अशा उपक्रमांसाठी.

२ सप्टेंबर ला गायन ध्वनिमुद्रण सुरू करून मग ५ तारखेला सायंकाळी ठरल्या वेळी फायनल मास्टर ट्रॅक बनवल्यावर त्याची ध्वनिफीत निर्मीती व पॅकेजिंगचे काम करणारा मनुष्य उगवला. काल दुपारी "अजून चांगले होऊ शकेल" म्हणणार्‍यांपैकी तोही होता. "वाह छान झालेय काम.." या त्याच्या प्रतिसादाने मी खुश झालो. किती दिवसात झालं सर्व? या त्याच्या प्रश्नावर मी "आजचा दिवस धरून, मोजून १७ दिवसात" असे उत्तर दिले, त्यावर त्याच्या चेहेर्‍यावर उमटलेले भाव बरेच काही सांगून गेले..!
"ग्रेट! गणपतीची कृपाच!" या त्याच्या शब्दांवर मला अजून एक पोचपावती मिळाली होती. गेल्या काही दिवसात स्टुडिओमधून लॅपटॉप वापरून मी ध्वनिफीतीचे डिझाईन, लेआउट वगैरे प्राथमिक गोष्टी त्याला बनवून दिल्या होत्या. त्यावर त्याचा अनुभव व व्यवसाय कौशल्य वापरून त्याने फायनल डिझाईन, फाँट्स वगैरे सर्व बनवले होते. हाडाचा कलाकार ,शिवाय कुशल धंदेवाईक अन् अनेक ओळखी, असे त्याचे अजब रसायन असल्याने एरवी बराच वेळ लागू शकत असलेले हे काम त्याने अवघ्या ३ दिवसात करून, ध्वनिफीतीच्या कॉपीज प्रकाशन सोहळ्याच्या एक दिवस आधी घरी आणून देण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले होते.

ती मास्टर सीडी घेवून मी एकदा सहकुटुंब माहेरी दाखल झालो. त्या रात्री सर्वांना ऐकवल्यावर त्यांच्या चेहेर्‍यावरील आनंद, अन् मुळातच सर्वच संगीतातील कानसेन असल्याने त्यांच्या आलेल्या सकारात्मक प्रतिक्रिया, यामुळे निदान घेतले काम व्यवस्थित पूर्ण झाल्याचे समाधान मला होते.
आता हत्ती गेला, शेपूट राहिले, या न्यायाने मुख्य ध्वनिफीतीचा प्रकाशन सोहळा होणे बाकी होते. एकदा मनात आले, ठीक आहे, अगदी घरगुती स्वरूपात करू, ध्वनिफीत झाल्याशी मतलब! पण एव्हाना संगीत क्षेत्रातील माझ्या मित्रमंडळींना खबर लागलीच होती. खेरीज इतक्या लोकांच्या मेहनत आणि मदतीमुळे हे काम पार पडले, तेव्हा किमान त्यांना त्या सोहळ्यात सहभागी करायचे तरी एक मोठा समारंभच होणार होता- घरगुतीच पण आकाराने मोठा Happy

मग कुणाच्या हस्ते प्रकाशन करावे यावर विचार सुरू झाला. अनेक गुणी कलाकार माहित असले तरी या प्रकारच्या प्रॉजेक्टसाठी कुणाचेच नाव पटत नव्हते. पं. शौनक अभिषेकी- नाव मनात आले. "नक्की येतो, प्रश्नच नाही" असा त्यांचा होकार आल्यावर या सोहळ्याची बांधणी सुरू केली. ९ सप्टेंबर तारखेसाठी एक जवळचा हॉल बूक केला. तिथला मॅनेजर ओळखीचा असल्याने निव्वळ पैसे आणि फॉर्म वर सही एव्हडे करून मी सर्व इंतजाम त्याच्यावर सोपवून आलो. दोस्त, मोठे लोकं येणार आहेत तेव्हा सोहळा सुंदरच व्हायला हवा, असे बजावून त्याच्यावर जबाबदारी टाकली.

एकीकडे इमेल्स, फोनमार्फत सर्वांना आगत्याचे आमंत्रण केले. बर्‍याच जणांना काही कल्पनाच नव्हती, त्यामुळे, सोहळ्याला येईपर्यंत मी गंम्मत करतोय का खरेच असे काही आहे, हे त्यांच्या मजेशीर प्रतिक्रियांवरून जाणवत होते. अगदी निव्वळ संगीतातील ओळखी पाळखीचे लोक व नात्यातील जिव्हाळ्याचे लोक्स यातूनही तब्बल १०० जणांची यादी झाली. मुंबईच्या ट्रॅफिक, अन अवेळी पावसाला जागून त्यापैकी जवळ जवळ ७० लोक्स उपस्थित राहिले, लोकसत्ताच्या वार्ताहरासकट!

शौनकजींचे आभार मानावे तेवढे थोडेच! दादरमध्ये दिवसभर रेकॉर्डिंग संपवून पुन्हा संध्याकाळी ते ठाण्याला सोहळ्यासाठी उपस्थित झाले. त्यांचे बरोबरीने आमचे जिव्हाळ्यातील सूरमणी पं. नारायणराव देशपांडे (भारतरत्न कै. पं. भीमसेन जोशी यांचे गेल्या ३५ वर्षांपासून असलेल्या ज्येष्ठ शिष्यांपैकी एक), इतर मानवंत कलावंत मंडळी हजर होती. या सर्वांच्या आशीर्वाद व शुभेच्छांनी सोहळा यथोचित पार पडला.
"इतक्या सुंदर ध्वनिफीतीचे प्रकाशन माझ्या हस्ते होत आहे याचा मला खूप आनंद आहे" या शौनकजींच्या वाक्यावर मला खूप भरून आले. "योगेशने असे काम प्रत्येक वर्षी करावे अशी माझी विनंती आणि अपेक्षा आहे" या पंडित देशपांड्यांच्या शब्दांमुळे मला अधिक ऊत्साह आला.

शौनकजी ध्वनिफीतीचे प्रकाशन करताना, सोबत पं. नारायणराव देशपांडे:
prakashan1.jpg

मला दोन शब्द बोलायची संधी मिळाली, तेव्हा गेल्या महिन्याभरातील धावपळ, प्रयत्न, ताण, आनंद, दु;ख, तगमग, हितचिंतकांची मदत, इ. एक ना अनेक गोष्टींमुळे मन भरुन आले होते. या अशा भाषणासाठी वगैरे अजिबातच तयारी केली नव्हती, खेरीज स्वत:च स्वत:च्या निर्मितीबद्दल, कामाबद्दल काय चार चौघात सांगत फिरायचे? हे मला मान्य नव्हते. पण तरीही सर्वांच्या मदतीसाठी आभार व्यक्त करून आयत्या वेळी सुचलेले हे काही शब्द - "मनात विचार येण्यापासून ते प्रकाशनापर्यंत निव्वळ २१ दिवसात हे काम पूर्ण झाले यावर मी एवढेच म्हणेन की हा अल्बम व्हावा ही तर श्री गणरायांचीच इच्छा!"
ध्वनिफीतीचे कव्हर चित्रः
cdfront.jpg

सोहळा संपवून, भोजन समारंभ संपवून यथावकाश सर्व मंडळी आपापल्या घरी रवाना झाली. रात्री १.३० वाजता मोबाईल वर शौनकजींचा मेसेज होता, "गाडीत छान म्युझिक सिस्टीम असल्याने मी सर्व गाणी वाटेत पुण्याला जातानाच ऐकली. सर्वच काम अप्रतिम, कुठेही दर्जा कमी झालेला नाही. असेच काम करत रहा, मी कायम तुमच्या बरोबर आहे." ते शब्द पुन्हा पुन्हा डोळ्यांत साठवत आम्ही शांतचित्ताने झोपी गेलो. ती एक पोचपावती मला आजवरील सर्व व्याप अन भविष्यातील अशा कामांसाठी पुरेशी होती.

ठरल्याप्रमाणे मायबोली गणेशोत्सव समितीला गाण्यांच्या फाइल्स ईमेल केल्या आणि सोबत थोडी ओळख, प्रस्तावना. मायबोली प्रशासनाने आनंदाने या सर्व गीतांना मायबोली गणेशोत्सवात ईथे सामील करून घेतल्याने, गणरायाचे हे कौतुक अनेक लक्ष कानांपर्यंत पोचले असल्याने मी कृतार्थ आहे.

माझ्या ध्वनिफीती तुम्ही विकायला ठेवा, विका, वगैरे सांगत वा त्यासाठी प्रायोजक शोधत फिरण्याची व्यावहारिक तजवीज व धडपड मी करणारच नव्हतो, मला त्याची गरज वाटत नव्हती. "ज्याच्या इच्छेने" हा व्याप मांडला होता, तडीस गेला होता त्याच्या इच्छेपुढे बाकी सर्व गौण होते, पण "त्याच्याच" इच्छेने अनेक गणेशोत्सव मंडळे इत्यादींनी ही ध्वनीफीत अनेक ठिकाणी गणेशोत्सवात लावली अन त्याची सेवा संपूर्ण करून घेतली. गंम्मत पहा- इतके वर्ष आमच्या सोसायटीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव होतो, पण नेमके याच वेळी गणेश चतुर्थीच्या दिवशी महाप्रसाद आमच्या घरातून बनायचा होता आणि गणपतीची पूजा देखील. हा निव्वळ योगायोग नसावा, गणरायाने सेवा शेवटपर्यंत पूर्ण करून घेतली, अशी माझी श्रध्दा आहे!

बाकी व्यावहारिक यश, अपयश या गोष्टी जगात महत्वाच्या असल्या तरी कलाकारासाठी त्या गौण आहेत. मुळात कुठलीही प्रतिभा, कला, वा निर्मिती कुठल्याही व्यावहारिक यशाची मिंधी नसते. ये हृदयीचे ते हृदयी पोहचते, तिथेच त्या अविष्काराचा प्रवास सुफळ, संपूर्ण होतो असे माझे मत आहे. त्या अर्थाने हा प्रवास इथेच संपूर्ण झाला. अर्थातच ध्वनिफीतीबद्दल ज्या काही असंख्य चांगल्या, वाईट, कौतुकासप्द, टीकात्मक अशा सर्व प्रतिक्रीया आल्या त्या सर्व एक कलाकार म्हणून पुढील वाटचालीसाठी खूप महत्वाच्या आहेत. सर्वच्या सर्व ध्वनिफिती अनेक गणेशभक्तांपर्यंत पोचल्या आणि अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला यातच खूप समाधान आहे. तुमची ध्वनिफीत रोज सकाळी कचेरीत जाताना गाडीत ऐकतो, पूजा, सोहळ्याच्या वेळी गणेशस्तवन लावतो, अशा प्रतिक्रीया हीच माझ्या सारख्या छोट्या कलाकारला मिळालेली दाद असते, आशीर्वाद असतो.

अलिकडे अचानक "त्याच्याच" कृपेने, आता ध्वनिफीतीचे पुन्हा एकदा प्रथितयश व नावाजलेल्या बॉलीवूड मधील गायकांकडून गाऊन घेणे, व्यावसायिक प्रकाशन व विक्री असा व्यावसायिक प्रस्ताव आला होता. मात्र या खेपेस असे ठरवून, प्लॅन करून सर्व करता येईल का, खेरीज इतक्या मोठ्या कलावंतांबरोबर काम करता येईल का हे मला ठाऊक नाही. २०११ चा गणेशोत्सव अगदी जवळ आला आहे. शेवटी "त्याची" मर्जी आणि "त्याची" कृपा!

हा संपूर्ण प्रवास शब्दांकीत करायची ईच्छा बराच काळ मनात घोळत होती. कार्यबाहुल्य वा ईतर व्यावहारीक अडचणींमूळे वेळ मिळत नव्हता. पण येणार्‍या २०११ च्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे शब्दांकन मुद्दामून पूर्ण केले आहे याचे कारण ईतकेच की या प्रवासातून "पुढच्याला ठेच मागचा शहाणा" या न्यायाने मायबोलीवर आपली कलाकृती प्रसिध्द करू पाहणार्‍यांना यातून प्रोत्साहन, मित्रत्वाचा सल्ला, बरोबरच आत्मविश्वास मिळावा हाच हेतू. वैयक्तीक माझ्यासाठी हे शब्दांकन म्हणजे एक आठवणींची साठवण असेल.

स्वतःच्या अतीशय व्यस्त दैनंदिनी व अडचणीतून वेळ काढून या प्रवासाचे टंकलेखन/शुध्दलेखन सहाय्य केल्याबद्दल मायबोलीवरील शैलजा यांचा मी ऋणी आहे.
------------------------------------------------------------------------------------
या सर्व प्रवासात खूप काही सुंदर आणि महत्वाचे नव्याने शिकायला मिळाले खेरीज जुन्या शिकवणींची ऊजळणी झाली. अनेक नविन मित्र, दर्जेदार कलाकार, यांची नव्याने ओळख झाली तर ज्यांना अजूनही फक्त मायबोलीच्या मंचावरच भेटलो आहे असे लोक अजून जास्त जवळ आले.

प्रतिभा/कला ही वैयक्तीक असली तरी समाजासमोर त्याचे सादरीकरण करताना एक टीम वर्क असते आणि त्यात मुख्य कलेपेक्षा ईतर सर्वांशी जुळवून घेत तुम्ही कसे काम करता याला जास्त महत्व असते. विशेषतः संगीत ध्वनिफीती सारखे काम करताना तर तुम्हाला अनेक प्रतिभावंत अन जाणकार लो़कांच्यातील अनेक सूप्त अन दृष्य गूण, पैलू ओळखत त्याचा मान राखत अन त्याचा योग्य वापर करून अन स्वताच्या गुण दोषांना स्विकारत, सुधारत, काम फुलवायचे असते. अशा वेळी मोठा, लहान, अशा वैयक्तीक बाबींना जागा नसते. हे काम "आपले" आहे अशी भावना निर्माण झाली तर काम मनासारखे होते. अर्थात निव्वळ भावनिक तत्वावर काम भागत नाही. स्वतः सर्व करायचे तर त्यातील तंत्र, मंत्र आणि अगदी यंत्र या बाबत देखिल अनुभव, ज्ञान हवेच. देशात, परदेशात अनेक ठिकाणी असे यंत्र, तंत्र हाताळतानाचा अनुभव या वेळी कामी आला- कुठलेही ज्ञान वा अनुभव कधिही फुकट जात नाही याची पुन्हा एकवार प्रचिती आली.

या सर्वाखेरीज काही अद्भूत्/दैवी अनुभव देखिल आले ज्याचे स्पष्टीकरण शोधणे/देणे अवघडच आहे. पण हे काम पूर्णत्वास जावे, हातून व्हावे असे सूचित करणारे ते सर्व संकेतच जणू.

या सर्व गीतांना मायबोलीकरांनी सर्व गुण दोषासकट स्विकारल्याने भविष्यातील कामही अधिक चांगल्या पध्दतीने करता येईल असा आत्मविश्वास निर्माण झाला.

ॐ गं गणपतये नमो!
-योग

विषय: 
प्रकार: 

छान

मस्त रे ! वाचुन तु घेतलेले कष्ट जाणवले. तुझ्या पुढील प्रोजेक्टस्ना अनेक शुभेच्छा! तुला वेळॅत वापरता येइल असे काही लिहु शकलो ह्यात आनंद आहे...

पेशवे,
धन्स! पुढील वेळी काहितरी ठरवून करायची संधी मिळाली तर आगाऊ सूचना देईन.. तुला तशी गरज नाही म्हणा पण तरिही. Happy

मस्त लेख!
योगेश, फारच छान !
गणपती बाप्पा तुमच्यावर असेच प्रसन्न राहोत हीच त्यांना प्रार्थना!

मस्त उपक्रम ! लेख पूर्ण वाचला नाही अजुन, पण गणपती बाप्पा आवडीचा म्हणुन लगेच प्रतिसाद दिला. शेवटचा फोटु छान आहे.

वैयक्तीक माझ्यासाठी हे शब्दांकन म्हणजे एक आठवणींची साठवण असेल. >>> अनुभव घेतला नाहीये पण अश्या स्टुडीयो, रेकॉर्डींगच्या वगैरे बाबी ऐकायला नेहमीच आवडते.. खूप धन्यवाद शेअर केल्याबद्दल.. Happy सारे काही कौतुकास्पद आहे.. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा ! Happy गणपती बाप्पा मोरया !

सही! अभिनंदन Happy
२१ ऑगस्ट, २०११ ला संयोजकांनी पुन्हा एकदा सहमतीची/ परवानगीची>> इथे २०१० हवंय नं? मी २-३ दा आजची तारीख तपासली Happy

मस्त !
अलिकडे अचानक "त्याच्याच" कृपेने, आता ध्वनिफीतीचे पुन्हा एकदा प्रथितयश व नावाजलेल्या बॉलीवूड मधील गायकांकडून गाऊन घेणे, व्यावसायिक प्रकाशन व विक्री असा व्यावसायिक प्रस्ताव आला होता. >>> नक्की कर , खुप मस्त गाणी आहेत, ऑल द बेस्ट !

खुप सुंदर अनुभव.

गणपती बाप्पाची कृपा असली तर जगातली कुठलीही अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते याची खात्री देणारे लिखाण!!

फार सुंदर !!

योग खूप मनापासून लिहिलं आहेस रे.... !! सगळी तुझी मेहेनत बाप्पाच्या कृपेनी पूर्णत्वाला गेली. खरंच त्याचाच आशीर्वाद होता तुझ्या सोबत म्हणून इतक्या कमी वेळात इतकं काही करु शकलास. तुझ्या या प्रवासात तुला थोडीशी का होईना मी साथ देऊ शकले....ह्याचा मला मनापासून आनंद आहे Happy

तू खरोखरच हरहुन्नरी आहेस त्यामुळे तुझ्याकडून आणखी खूप अपेक्षा आहेत योग !! तुला खूप खूप शुभेच्छा !!

जया,
आवर्जून दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद! हितचिंतकांच्या अपेक्षा ह्या अधिक बळ देणार्‍या ठरतात Happy

अरे, केव्हढ्या जिद्दीने, तळमळीने, भक्तिभावाने काम केलेस हे..........
मला तर वाचतानाच धाप लागली........, काय विशेषण वापरुन तुझे कौतुक करावे हेच कळत नाही..
धन्य रे बाबा तुम्हा सर्वांचीच.... तू म्हणतो तसं उत्कृष्ठ टीम वर्क असल्याशिवाय होउच शकत नाही एवढे मोठे व सर्वांगसुंदर काम.
बाप्पाचे खरंच आशिर्वाद आहेत बाबा तुझ्यापाठी.
मनःपूर्वक अभिनंदन.....सर्वांचे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.