आज त्याचे नांव, ज्याचे काल झाले बारसे

Submitted by बेफ़िकीर on 1 August, 2011 - 07:17

चालताना होत गेले पावलांचे कोळसे
पेटलेली वाट होती, पेटले नव्हते ठसे

गाडल्या सिंहासनाची धूळ माथी लेवुनी
चालले क्रांती कराया नामधारी वारसे

आणती अवसान हिरवे... बोडके पाषाणही
मीच नाही फक्त केली पावसाळी साहसे

आजही नव्हतेच पैसे खेळणी आणायला
झोपली होती म्हणा कंटाळलेली पाडसे

पाहतो जल्लोष बाजूला उभा राहून मी
आज त्याचे नांव, ज्याचे काल झाले बारसे

भाळण्याची मंजुरी मागीतली नाही खरी
पण तरी स्वीकार आता जे जसे आहे तसे

आज जे झाले नकोसे त्याचसाठी एकदा
का करावी लागली होती नको ती धाडसे

या जगाला आपलासा वाटण्यासाठी अता
काय बसवावेत मी डोळ्यांत माझ्या आरसे

म्हण... बदलत्या माणसांना दोष देण्याऐवजी
ही निराळी माणसे अन ती निराळी माणसे

औषधे काळाकडे असतील या रोगावरी
या तुझ्या वाक्यात नव्हते तथ्य काही फारसे

कोण माझ्यासारखा प्रख्यात होता 'बेफिकिर'
मी जिथे नाही तिथेही व्हायचे माझे हसे

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

>>चालताना होत गेले पावलांचे कोळसे
पेटलेली वाट होती, पेटले नव्हते ठसे<<

>>गाडल्या सिंहासनाची धूळ माथी लेवुनी
चालले क्रांती कराया नामधारी वारसे<<

खुपच आवडले. Too Good.

जबरदस्त!!! मस्त जमलीये!
मतला झक्क्कास!

पण तरी स्वीकार आता जे जसे आहे तसे
सर्वात आवडलेला मिसरा... कित्त्त्त्ती सहज आलाय!!

शेवटचा (आज) जsssरा कळला नाही...
(उद्या कळेल कदाचित) Happy

अभिनंदन Happy

बेफिकीरजी, सुपर्ब झालीय गजल. आपल्या आफाट प्रतिभेस कुर्निसात. ४/५ वेळेस वाचली. समाधानच होत नाही
हॅट्स ऑफ्फ टु यू.

दुसरा, तिसरा, पाचवा व मक्ता - जरा कमी आवडले

बाकीचे सर्व शेर खूप आवडले

'पाडसे' ह्या शेरासाठी पुढच्या पुणे भेटीत माझ्याकडून तुम्हाला पार्टी Happy

आजही नव्हतेच पैसे खेळणी आणायला
झोपली होती म्हणा कंटाळलेली पाडसे.....

क्या बात है....अफाट..अचाट ....सुसाट

छान.

आज जे झाले नकोसे त्याचसाठी एकदा
का करावी लागली होती नको ती धाडसे...

---अप्रतीम शेर
--खुप आवडली गझल

व्वा मस्त गझल बेफिकिर

मतला, पावसाळी साहसे, आरसे, धाडसे सुरेख...

पण तरी स्वीकार आता जे जसे आहे तसे >>> फार छान ओळ आहे...

एकंदरीत सर्वच मिसरे सहज आणि प्रवाही

माणसे मधली गंमत पण आवडली

मस्त गझल ! ओघवती,

आणती अवसान हिरवे... बोडके पाषाणही
मीच नाही फक्त केली पावसाळी साहसे

पाहतो जल्लोष बाजूला उभा राहून मी
आज त्याचे नांव, ज्याचे काल झाले बारसे

म्हण... बदलत्या माणसांना दोष देण्याऐवजी
ही निराळी माणसे अन ती निराळी माणसे

औषधे काळाकडे असतील या रोगावरी
या तुझ्या वाक्यात नव्हते तथ्य काही फारसे

कोण माझ्यासारखा प्रख्यात होता 'बेफिकिर'
मी जिथे नाही तिथेही व्हायचे माझे हसे

हे शेर आवडले.
'तखल्लुस' अतिशय चांगल्या पद्धतीने वापरता तुम्ही, प्रत्येक गझलेत ! Happy

बेफ़िकीर....हे नावच आता निवडक दहा मधे त्यातही पहिल्या क्रमांकाच करायची काही सोय व्हायला हवी.

कारण बेफिकीर तुमच्या गझलां मधलं नाविन्य त्यातली सहजता खरोखर स्तिमित करणारी आहे..

अजब प्रतिभेचा गजब परीस स्पर्श तुम्हाला बहाल आहे .. तुमच्यातल्या या अचाट गझलकाराचे इतक्या वारंवारतेने , तितक्याच दर्जेदार गझल दिल्याबद्दल मनापासून आभार ...

अप्रतीम गझल

गाडल्या सिंहासनाची धूळ माथी लेवुनी
चालले क्रांती कराया नामधारी वारसे

आणती अवसान हिरवे... बोडके पाषाणही
मीच नाही फक्त केली पावसाळी साहसे

पाहतो जल्लोष बाजूला उभा राहून मी
आज त्याचे नांव, ज्याचे काल झाले बारसे

या जगाला आपलासा वाटण्यासाठी अता
काय बसवावेत मी डोळ्यांत माझ्या आरसे

औषधे काळाकडे असतील या रोगावरी
या तुझ्या वाक्यात नव्हते तथ्य काही फारसे

हे शेर जबरीच झालेत , मस्त, मस्त, मस्त

Pages