तुम्हे याद हो के न याद हो - १४

Submitted by बेफ़िकीर on 25 July, 2011 - 05:47

"उम्या यड्या... मी नाही बाबा हे काम करणार"

राहुल्याने पहिल्याच दिवशी संध्याकाळी पर्वतीपासून सायकलवरून घरी परतताना दुसर्‍या सायकलवर असलेल्या उमेशला सांगीतले.

कालची रात्र प्रचंड गाजलेली होती. उमेशचा आजवर वाड्यात असा कधीच अपमान झालेला नव्हता. त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह बाब इतकीच की त्याला पहिली नोकरी मिळालेली होती. आज सकाळी उठल्यापासून त्याच्याशी कुणी एक शब्दही बोलत नव्हते. उमेश आणि हे तिघे दारू वगैरे पीत असतील याची फारशी काय सुतरामही कल्पना त्याच्या आईला आणि वडिलांना नव्हती. क्षमाला थोडेसे माहीत होते.

आणि आज सकाळीच सगळ्यांनी ठरवून टाकलेले होते. दारू बंद! बद म्हणजे बंद!

स्वतःच्या पायावर उभे राहिल्यानंतर आणि स्वतंत्र झाल्यानंतर पुढचे ठरवू, तोवर बापाचे पैसे उधळायचे नाहीत. आप्पा मात्र आता विवाहीत गृहस्थ झालेला होता. त्यामुळे तातडीने मिळेल ते काम बघणे आणि बिझिनेस वगैरे कल्पनांना तात्पुरती का होईना अडगळ दाखवणे हे क्रमप्राप्त होते. कालच्या दारू प्रकरणाचा झटका राहुल आणि विनितलाही त्यांच्या त्यांच्या घरी मिळालेला होता. विनितला तर त्याच्याही आईने एक लगावलेली त्याने कुणालाही सांगीतलेच नव्हते. भूमकर काकू, म्हणजे विन्याची होऊ घातलेली सासू मधेच येऊन काहीतरी कचाकचा बोलून गेल्या होत्या. ते ऐकून तर विन्याच्या आईने दारच आतून बंद केले होते. वर्षा तिच्या घरात हिरमुसली होऊन बसलेली होती. आणि नवीन लग्न झालेली आणि आप्पाच्या घरात गेलेली शैला तिच्या सासरी काहीही न विचारता वर जाऊन आपल्या धाकट्या भावाला, राहुलला झापून आलेली होती.

आज सकाळी मान खाली घालूनच उम्याने सगळे आवरले आणि पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस म्हणून मोठ्यांना नमस्कार केला. आजोबांनी त्याला एक अंगारा लावला. बाबांनी आशीर्वाद दिला. आईने आशीर्वादही दिला आणि पाठीवरून हातही फिरवला. उंबर्‍यातून बाहेर पडताना उमेशला वाटत होते, किमान आईने तरी म्हणावे.

"छान काम कर, डबा वगैरे देऊ का, कुठे आहे नोकरी? किती वाजता येणार आहेस? शाब्बास, नोकरी मिळवलीस"

पण नाही.

उमेशच्या या पहिल्या नोकरीच्या पहिल्या दिवसाचे तेवढे कौतुक मुळीच झाले नाही. त्यामुळे काहीसा हिरमुसलेला आणि चिडलेला उमेश वाड्याच्या दारातून बाहेर पडणार तर...

"उमेश... "

बाबा?????? बाबांची हाक ऐकू आली तसा तो मागे वळला. चौघेही मागे उभे होते.

"काय?"

"हे घे... शंभर रुपये... येताना काहीतरी गोड घेऊन ये... आणि राहुल कुठे आहे?"

राहुलही पुढे झाला. राहुललाही उम्याच्या बाबांनी पन्नास रुपये दिले. मग राहुलनेही सगळ्यांना नमस्कार केला. मग वाड्यातील एक एक जण जमू लागला. मग प्रत्येकानेच शुभेच्छा दिल्या.

आता उम्याची अपेक्षा वाढू लागली. नितुने बाहेर येऊन शुभेच्छा द्याव्यात अशी इच्छा मूळ धरू लागली. पण त्यांच्या घराची सताड उघडी असणारी दोन्ही दारे आत्ता बांद होती. वाड्याशी जणू संबंधच नव्हता काहीही!

शेवटी निघाले आणि ऑफीस शोधत एकदाचे पोचले.

जुनैद अख्तर!

त्या अत्यंत गजबजाट असलेल्या खोलीत कोणत्यातरी एका टेबलखुर्चीवर तेच प्रसन्न व्यक्तीमत्व बसलेले होते. खोलीत बसायला इतर एकही खुर्ची नव्हती.

"आओ मियाँ आओ"

अख्तरमियांने प्रसन्न हसून स्वागत केले तसे या दोघांना समजेना की बसायचे कुठे?

"अंदर चलो"

या खोलीला आतही खोली आहे? बघुयात तरी?

या खोलीत तरी सर्वत्र पुस्तकेच पुस्तकेच पडलेली होती. धूळ, पुस्तके, कागद, पाट्या, पेन्सिली आणि पवित्र कुरानांच्या अनेक प्रती!

एकेक गोष्टीचा अडथळा पार करत दोघे आत गेले आणि अवाकच झाले.

ती एक चक्क पंधरा बाय वीसची वगैरे खोली होती. अत्यंत व्यवस्थित! त्या ठिकाणी दोन टेबल्स व सहा खुर्च्या होत्या. लेखन करायची सर्व सोय होती. काही पुस्तकेही होती. त्यातील काही मराठी तर काही इंग्लीश! त्याही खोलीत कुरानमधील दिव्य संदेश एका भिंतीवर लिहून ठेवलेला होता.

आपल्या नेहमीच्या आयुष्याशी अत्यंत विसंगत असे चित्र, सर्वत्र अल्ला व कुरान यांची स्तुती पाहून उम्याला आणि राहुल्याला प्रथम कसेसेच झाले. ते दोन खुर्च्यांवर बसताच अख्तरमियांने त्यांना भलेमोठे ताकाचे ग्लास दिले आणि स्वतः एक ग्लास घेऊन त्यांच्यासमोर बसला.

"मित्रांनो, मी मुद्दाम मराठीत बोलतोय कारण तुम्हाला आमचे काही शब्द समजणार नाहीत. आज तुमचा कामाचा पहिलाच दिवस आहे. कदाचित तुम्ही येथील वातावरण बघून चक्रावून गेलेला असाल. पण माझे बोलणे संपेल तेव्हा तुम्हाला पूर्ण आत्मविश्वास आलेला असेल की तुम्ही जे काम करणर आहात ते अत्यंत योग्य आहे"

ताकाचा घोट घेऊन तो पुढे बोलू लागला.

"निसर्गापासून मानव तयार होतो. आईच्या उदरात मुलाचा जन्म होतो. आणि नंतर बाहेरच्या जगात! यात निसर्गाचीच इच्छा असते. या विश्वातील प्रत्येक सजीव हा केवळ निसर्गानेच निर्मिलेला आहे. निसर्गाची इच्छा असल्यास जन्मही थांबत नाही आणि मृत्यूही!

मित्रांनो, तुम्हाला अजून जग बघायचे आहे. शिक्षणातून नुकतेच बाहेर पडलेले असाल किंवा शिकत असाल.

पण हे जग आपल्याला आत्ता वाटते तसे मुळीच नसते. वास्तव अत्यंत भयंकर असते.

हा निसर्ग सजीवांना जन्माला घालताना अन्याय करत नाही, मात्र तो कमीजास्त नक्कीच करतो. कुणाला माकड म्हणून जन्माला घालतो तर कुणाला बैल म्हणून! आपण फक्त आणि फक्त माणसांबाबतच बोलणार आहोत.

माणसातही तो फरक करतोच. कुणाला स्त्री म्हणून तर पुरुष म्हणून! कुणाला अपंग म्हणून तर कुणाला निर्बुद्ध म्हणून!

कोणी अफगाणिस्तानात जन्माला येते तर कुणी अरबस्तानात, कुणी भारतात तर कुणी फ्रान्समध्ये!

जेथे जन्माला आलो तेथील संस्कृती, तेथील सुबत्ता आणि संस्कार यामुळे माणूस घडतो.

एक माणूस दुसर्‍यापासून पूर्णतः भिन्न असतो. तुम्ही गणपतीची आरती करता आम्ही पैगंबरांच्या रस्त्यावर चालतो. कुणी चांगल्या स्वभावाचा तर कुणी वाईट! श्रीमंत, गरीब, असे असंख्य उपप्रकार, प्रकारांचे प्रकार पडू लागतात. जितकी माणसे तितके प्रकार!

प्रत्येकात फरक आहे. पण शासन म्हणते की सगळे सारखेच! शासन असे का म्हणते? कारण शासनाकडे असलेली देशाची सुबत्ता सर्वांमध्ये समान वाटली जावी व कोणत्याही कारणासाठी देशाची शांतता नष्ट होऊ नये असे शासनाचे कर्तव्य असते म्हणून! आता सगळे सारखेच कसे होणार? तर त्यासाठी समाजसेवक, अभ्यासक आणि प्रामाणिक नेत्याची जरूर आहे. अभ्यासक नवीन नवीन उद्योगधंदे, रोजगार यांची सूचना करून मानवाला उदरनिर्वाह मिळवून देण्यात योगदान देतात. प्रामाणिक नेते योजना जाहीर करतात.योजना, आरक्षण, सवलती असे सर्व काही देतात. समाजसेवक म्हणजे आपल्यासारखे लोक! ते एका पैशाचीही अपेक्षा न करता दोन समाजांमधील, दोन मानवांमधील भिन्नत्व कमी करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी झटत राहतात.

भारतातील मुस्लिम समाज , म्हणजे आमच्यासारखे लोक, इतके मागासलेले का आहेत माहीत आहे? कारण आमच्या नेत्यांच्या मनातील कडवेपणा! इस्लामबाबतचा अनाठायी असलेला कडवेपणा ! कुरानमध्ये म्हंटलेले आहे की जो सर्वव्यापी अल्लाहला मानत नाही तो पापी आहे व त्याला नष्ट करूनच धर्म स्थापन करता येईल. आमच्या धर्मरक्षकांनी याचा काय अर्थ घेतला? तर जो मुस्लिम नाही त्यालाच नष्ट करा. असे कसे चालेल? तो जरी अल्लाहला मानत नसला तरी तो अल्लाहच्या जागी कुणालातरी मानतोय ना? तोच त्याचा अल्ला! फक्त नांव वेगळे! हा विचार आमच्या मुल्लामौलवींना कसा रुचेल? कारण मग त्यांचे सगळे महत्वच नष्ट होईल. एखादा माणूस जर कुणालाच मानत नसला किंवा अल्लाच्या धर्मातील असूनही अल्लाहला मानत नसला तरच तो पापी ठरायला पाहिजे ना? पण असे दिलदार विचार न करता त्यांनी स्वार्थी विचार केलेला आढळतो.

यातूनच जगातील सर्व क्रूर लढाया असे ज्यांचे वर्णन करता येईल, त्या झाल्या. यातूनच मुस्लिम जग वेगळे झाले आणि बाकीचे जग वेगळे!

हे सर्व चुकीचे आहे. मुल्लामौलवींना आणि धर्मरक्षकांना हवी असलेली इस्लामची पातळी आम्हा सामान्यांना नकोच आहे. आम्हाला शिकायचंय, मोठं व्हायचंय, स्वच्छ राहायचंय, आम्हाला सर्व धर्मांचा आदर करायचाय, शांतता हवी आहे आम्हाला!

पण हे होण्यात अडथळे आहेत. प्रचंड अडथळे! मतांसाठी राजकारणी आपल्यात दरी पाडतात. धार्मिक भावनांना खतपाणी घालतात.

परिणाम काय होतो? तर जे चांगले लोक असतात तेही भरडले जातात. ज्यांचा काहीही अपराध नसतो तेही नष्ट होतात. समाजाची प्रगती तदूरच्ज, मुळात मानवतेचा प्रसारही परिणामकारकरीत्या होत नाही. अशा वेळेस काय करता येईल? मुळात काय करायचे आहे हे तरी जाणून घेता येईल का? होय! जाणून घेता येईल.

प्रेम ही एकच भावना अशी असते जी सर्व सजीवांना एकत्र बांधू शकते. दुराभिमान सोडून एकमेकांवर प्रेम करणे हाच एकमेव मंत्र आहे मानवाचे जीवन सुखी करण्याचा!

यासाठी गरज आहे ती फक्त इच्छेची! चांगले काम करण्याची इच्छा! आणि माझी तशी इच्छा आहे. माझ्याकडे अल्लाहच्या कृपेने दौलतहि आहे. मला मदत हवी आहे ती फक्त चांगल्या मनांची! बाकी काहीच नको. मला शासनाची मदत नको, भ्रष्ट नेत्यांची मदत नको आणि कोणत्याही मुल्लामौलवी आणि आचार्यांची मदत नको.

मित्रांनो, माझ्यासमोर आज जो मुस्लिम समाज आहे, तो अस्वच्छ राहणी, इस्लामशिवाय काहीही डोक्यात नसलेला, हिंदू आणि इतर बांधवांचा उगाचच तिरस्कार करणारा, अतिशय हलाखीचे जीवन जगणारा आणि शिक्षणाचा गंधही नसलेला समाज आहे. त्यांच्या एकाहून अधिक शादी होतात, लोकसंख्या वाढत राहते आणि ते शासन दरबारातून मिळत असलेल्या अल्पसंख्यांकांसाठीच्या सवलतीवर आयुष्य घालवत राहतात. त्याचवेळेस दुसरा समाज जो माझ्या डोळ्यासमोर आहे तो सुशिक्षितांचा! ज्यांनी प्रयत्नपुर्वक प्रत्येक पिढीला शिक्षण दिले, नोकर्‍या केल्या, राहणीमान वाढवले आणि माणसाचा जन्म मिळाल्याचे सार्थक करायचा प्रयत्न केला.

ही दरी बुजवणे एकट्याचे तर नाहीच पण आपल्या सरकारलाही सहज न जमणारे काम आहे. पण मी आयुष्यभर हीच दरी बुज्वण्यासाठी झटत आहे.

वयाने वाढलेल्या कडव्या मुस्लिम बांधवांना माझे विचार पटतच नाहीत. पण लहान मुलांना शिक्षण मिळावे व मिळत राहावे यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो.

इतर भाषांमध्ये असलेले साहित्य मी उर्दूमध्ये भाषांतरीत करतो. काहीवेळा इंग्लिशमध्ये भाषांतरीत करतो तर काही वेळा हिंदी, मराठीमध्येही! ज्याला जे समजेल ते त्याने वाचावे.

हे अक्षरशः समाजकार्य आहे. माझ्या आयुष्याचे ध्येय इतकेच आहे की मुस्लिम बांधवांमध्येही शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व मदरश्यांच्या बाहेर जे शिक्षण उपलब्ध आहे ते त्यांना मिळावे.

प्रथम प्रचंड विरोध सहन करून सुरू केलेल्या या कार्याला आज पंचवीसहून अधिक वर्षांचा काळ लोटलेला आहे आणि परिणाम असा झालेला आहे की ज्या वस्तींमध्ये आज मी जातो तेथे मला आदरभाव मिळतो. दोनशेहून अधिक मुले हे साहित्य वाचत आहेत. आपली आपली शिकत आहेत. त्यांना पदवी नको आहे, नोकरी नको आहे पण शिक्षण हवे आहे. स्वच्छ राहणी व जबाबदार नागरीक बनण्याची आवड त्यांच्यात निर्माण होत आहे. परिणामतः त्यांच्याबाबत वस्तींमध्ये असलेला आदरभावही वाढत आहे. हळूहळू या कार्याला एक स्वरूप प्राप्त होत आहे. मी आज, उद्या, दहा किंवा वीस वर्षांनी मरून गेलेलो असेन. पण हे कार्य चालूच ठेवण्यासाठी तोवर त्यातील शंभर मुले तयार झालेली असतील. तुम्ही असाल! आणि एक दिवस असा येईल की या कार्याचे कौतुक शासनाला करावेच लागेल, त्याला सहाय्य करावे लागेल.

तुमचे काम फक्त इतकेच, की जे काही शिक्षण तुम्ही घेतलेत, त्या पुस्तकांचे भाषांतर वेगळ्या भाषेत करायचे. तुम्हाला शक्यतो मराठीतच भाषांत्र करावे लागेल. क्वचित उर्दूत करायचे असले तरी देवनागरी लिपीत करा, काही हरकत नाही. काही वेळा हिंदीत करावे लागेल. मदतीला मी आहेच! तर मग...... तयारी आहे????"

अख्तरमियाँ बोलायचे थांबले तेव्हा या विचारांनी उम्या आणि राहुल भारावलेले होते.

नकळत माना होकारार्थी हालल्या आणि त्याच क्षणी कामाला सुरुवातही झाली.

आपण जे काम करत आहोत ते अक्षरशः उच्च कोटीचे काम आहे याबाबत आश्वस्त होऊन दोघे एकेक पुस्तक घेऊन त्याचे मराठीत काय भाषांतर होईल याचा विचार करत एक एक वाक्य एका वहीत लिहू लागले. वह्याही चांगल्या मोठ्या मिळालेल्या होत्या. पेनही मस्त मिळालेले होते. कामही सुंदरच होते.

इंग्लीशमध्ये असलेल्या विज्ञानाच्या पुस्तकाचे भाषांतर राहुल मराठीत करत होता. काही काही संज्ञांन मराठीत काय म्हणतात हेच त्याला माहीत नव्हते, पण अशा वेळेस अख्तरमियाँची मदत मिळत होती.

काही इंग्लीश कवितांचे व कोट्सचे भाषांतर उमेश करू लागला होता.

डबा नव्हताच!

पण दुपारी अख्तरमियाँनी चक्क खायलाही दिले. पुन्हा चहा वगैरे!

आणि साडेपाच वाजता बोटे लिहून लिहून दुखायला लागली तेव्हा अख्तरमियाँनी सांगितले.

"अब आजका काम होगया बच्चो, तनख्वाह महिनेकी महिने देदिया करू या कैसे?"

पुन्हा माना हालल्या. महिन्याच्या शेवटीच पगार द्या असे सांगण्यासाठी! आणि अख्तरमियांनी विचारले.

"शाममे महफिलमे शरीक होरहे हो ना?"

एकदम चेहरे गंभीर झाले दोघांचे!

"सर.. आम्ही... म्हणजे.. आता पिणार नाही कधीच"

क्षणभर मियाँनी एकटक पाहिल्यासारखे राहुलकडे पाहिले. आणि दुसर्‍याच क्षणी खदखदून हासले ते!

"मुहोब्बत करते हो, जवान हो, जिंदगी पडी है अभी, क्युं पिओगे! बात तो सही है! नश्शा तो उसे चाहिये जिसे जिंदगीसे नश्शा नही मिलता! नशा शराबमे होता तो नाचती बोतल! संभलभी जा के अभी वक्त है संभलनेका! संभलभी जा के अभी वक्त है संभलनेका.... संभल भी जा...."

मियाँ बोलत असतानाच कसेनुसे हासत दोघे उठून दारापर्यंत पोचले तरी मियाँ तीच ओळ घोळवत बसले होते. मात्र.. मुले दिसेनाशी होण्याच्या एकच क्षण अगोदर त्यांनी दुसरी ओळ ऐकवली... दुसर्‍याच शेराची....

"मगर ये दर्द का मौसम नही बदलनेका.... मगर ये दर्दका मौसम नही बदलनेका... "

खाडकन गंभीर झालेले चेहरे घेऊन मुले जिना उतरू लागली... आणि.... का कुणास ठाऊक... अत्तिशय अस्वस्थ वाटू लागले.....

त्या अरुंद जिन्यात.... त्या चौघांसाठी... वाट करून देताना भिंतीला अक्षरशः चिकटावे लागत होते... पण... तो प्रश्न नव्हता... प्रश्न हा होता... की ते लोक... ते चौघे...

शुद्ध, प्युअर आणि अत्यंत कडवे मुसलमान होते...

त्यांचा वेश, डोळ्यातील सुरमा, अवाढव्य देह, चेहर्‍यावर एक टिपिकल दुराभिमानी जहरी भाव आणि आवाजात कृत्रिम गोडवा, जो बहुसंख्य हिंदूंच्या देशात राहताना आणावाच लागतो....

काहीच महिन्यात...... जुनैद अख्तरमियाँकडचा हा जॉब भूकंपासारखा हादरा देणार होता... ..... हे राहुल आणि उमेशला अजिबात माहीत नव्हते...

...... आणि याच जॉबमुळे.... मोमीनची रडवणारी गझल... 'तुम्हे याद हो... के न याद हो'... ही गावी लागणार नव्हती.... ..........

.........हेही माहीत नव्हते....

====================================

वाड्यात पेढे वाटताना उमेशच्या आईने काल उमेशने दारू प्यायल्यानंतर त्याला वाड्यासमोर दिलेली झाप आता विस्मरणात टाकलेली होती. चेहर्‍यावर हसू होते. आणि त्याचवेळेस राहुलची आईही पेढे वाटत होती.

नोकरी आरामात लागू शकण्याचा काळ असला तरी आर्ट्ससारख्या पदव्यांना तितक्याही आरामात मिळत नव्हत्या. राहुलचे एक चांगले होते. डिप्लोमा झालेला असल्याने आज उद्या तो तांत्रिक कामात जाणारच होता. त्यामुळे आज आपली आई पेढे वाटत आहे हे पाहून जरी तो काहीबोलला नसला तरीही दोन दिवसांनी तो आईला सांगणारच होता की मी काही ती नोकरी करणार नाही.

मात्र उमेशचे तस नव्हते. त्याला ती नोकरी करावी लागणार होती. त्याची अनेक कारणे होती. निवेदिताला प्राप्त करण्यात 'मुलाला नोकरी आहे' हा घटक महत्वाचा ठरणार होता. दुसरे म्हणजे खरोखरच हातात काही पैसेही येणार होते आणि त्यातले काही घरात देऊन आई बाबांचे मत बदलण्यातही यश मिळवता येणार होते. तिसरे म्हणजे कोणत्यातरी नोकरीचा अनुभव आहे हे सांगून दुसरी कायमस्वरुपी नोकरी मिळू शकणार होती. चौथे म्हणजे घराबाहेर जाण्याचे नियमीत टायमिंग असल्याचे नितुला समजल्यानंतर काहीतरी करून ती बाहेर भेटण्याचा प्रयत्न तरी करणार होती. नाहीतर दोघेही दहा मिनिटांच्या अंतराने वाड्याबाहेर पडलेले कळल्यावर पब्लिकने लगेच लक्ष ठेवलेच असते.

आता रोज रात्री स्वयंपाकघराला हिरवा रुमाल आणि बेडरूमला लाल ओढणी होती.

नितुने तेवढे तरी साहस केलेलेच होते. त्यामुळे एक प्रॉब्लेम होत होता. रोज रात्री आजोबांची पाठ वळून एकदा त्यांचे घोरणे सुरू झाले की होऊ शकणारी मधूर नजरानजर आता होत नव्हती....

..... पण...

बुद्दू उमेशला हा एक मोठ्ठाच्या मोठ्ठा 'पण' आजच रात्री झोपताना जाणवला...

अरे तिच्यायला! वयाच्या दुसर्‍या वर्षापासून आपण या वाड्यात वाट्टेल तसे आणि वाट्टेल तिथे बागडतोय...

.... आपल्या हे लक्षात येऊ नये????

सरप्राईझ सरप्राईझ!

कुमारिका निवेदिता आपटे यांना उद्या एक सुखद सरप्राईझ द्यायचे!

मात्र.... अंधार पडल्यानंतरच हे करता येणार!

याहू... चाहे कोई मुझे जंगली कहे...

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी पावणे सात वाजले तसा उमेश 'आलो गं आई जरा... मला त्यांनी संध्याकाळचे वाचन वगैरे करायला सांगीतलेले आहे... मोफत वाचनालयात जाऊन येतो... साडे आठ तरी होतील... " अशी असंबद्ध विधाने करून आईला काहीही विचार करायचा अवधी न देता सटकला आणि उलट्याच बाजूला चालत राहिला.

पार शनिवार वाड्यापाशी चालत आल्यावर एकदा खिसा चाचपला.

चाप!

तो नाही, ज्याच्यात अडकवून तिने गजरा फेकला होता. हा नवीनच होता त्याने घेतलेला. तो कुणाला दिसू नये म्हणून त्याने आज दिवसभर जे काबाड कष्ट केलेले होते त्याची तुलना काळ्या पाण्याच्या शिक्षेबरोबर व्हावी.

तिकडून पुन्हा याज्ञवल्क्य आश्रमाच्या दिशेने येताना त्याला फेफरे यायची वेळ आली होती. कारण वाड्यातील तीन व्यक्ती क्रॉस झाल्या. त्यातील एकाने त्याला पाहिले आणि हासला वगैरेही!

प्यार किया तो डरना क्या!

देवळापाशी आला.

प्रचंड मारुतीभक्त असल्याच्या थाटात घंटा वाजवून सहा सात मिनिटे नुसता उभाच राहिला.

या जगाचे काय करायचे काही समजत नाही बुवा असा चेहरा करून काही वृद्ध लोकांबरोबर तिथेच बसला.

आता तो मान फिरवून 'तिकडे' बघणार तर....

"उम्या??? काय रे?"

शैलाताई!

ही कुठून मधेच उपटली???

"काही नाही... अथर्वशीर्ष"

"मारुती मंदिरात...???"

"आपलं... भीमरूपी... महारुद्रा वगैरे... अप्पा कुठंय??"

"ते यायचेत..."

लग्न झाल्यापासून 'ज्याच्याबरोबर वर्षानुवर्षे खेळली' ती शैलाताई आत्ता आप्पाला 'अहो' म्हणू लागलेली होती. हे फार विचित्र वाटले उम्याला!

"तू कशी काय??"

" मी रोजच येते"

"पण आता झालं की लग्नं"

उम्याचा समज एकच! लग्न ठरावे म्हणून मुली ब्रह्मचारी मारुतीला साकडे घालतात.

त्या 'झालं की लग्नं' वर मोजून तीन म्हातार्‍या हासल्या. त्यामुळे गोरीमोरी झालेली शैला पटकन दर्शन घेऊन निघून गेली. जाताना तिने एक सतापलेला कटाक्ष टाकलाच उम्याकडे!

ती गेल्यावर उम्याची मान 'तिकडे' वळली.

क्या खूब लगती हो.... बडी सुंदर दिखती हो...

खिडकीत अभ्यासाला बसलेल्या निवेदिताला पाहून ही ओळ मनात येते तोच...

ये जालिम दुनिया वगैरेही संवाद आले.

कारण तिची आई मधेच उपटली.

काही वेळाने दोघीही आतल्या खोलीत गेल्या.

आता मारुतीला विसरून उम्या देवळाच्या मागे आला. तेथे एक कठडा होता. जो माणसाच्या शरीरापेक्षा उंच होता.. मात्र लहानपणी चोर पोलिस खेळताना हा कठडा उम्याने अगणितवेळा उल्लंघलेला होता... दोन्हीकडून! आणि तेही प्रचंड वेगात!

आत्ताही त्याने त्याच उत्साहाने उडी मारली आणि हातांच्या जोरावर शरीर वर घेताच येईना!

मग आठवले, च्यायला आपण पुर्वी या नळाच्या पाईपवरून वर जायचो. आता कसे जाता येईल तसे?

हां! इकडून जाऊ!

आलो की राव वर???

आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हा!

काय अ‍ॅन्गल आहे!

संभलके चल के अभी वक्त है संभलनेका...

कसलं आलंय संभलनं म्हणाव!

सामने ये कौन आया दिलमे हुई हलचल!

पुन्हा आई???

जा की बाई!

त्यांना आपण दिसलो तर आपण पुन्हा कुणालाही दिसणार नाही. हे आठवून उम्या अंधारातच खाली बसला चक्क!

असेल वीस फुटांचं अंतर! मोठ्याने बोलले तर आवाजही ऐकू यावा असे!

आणि तब्बल बावीस मिनिटे इंतजार - ए दीदार बिदार केल्यावर...

... चांदसा मुखडा ! ओह्ह्ह्हो! च्यायला काय दिसतीय ही!

अशी कशी काय दिसतीय???

रडलीय की काय?? असेल!

आता काय करावे??? एकदाच धाडस करून तिला ज्ञान दिले की आपण येथे असू शकतो... की झाले! नंतर ती स्वतःच आपोआप पाहू लागेल इकडे!

पण तिला कळणार कसे??

शुक शुक वगैरे केले तर रस्त्यावरचे पन्नास पब्लिक वळून पाहील.

चाप!

खरच की!

चाप! चाप फेकू!

आँ?????

हे काय????

बोंबला!

तिचीच आई देवळात??

लपा लपा!

आडवा झाला उम्या त्या कठड्यावर! नितुच्या आईने तीन प्रदक्षिणा घातल्या. नशीब! काहीही कळले नाही.

आणि त्यानंतर???

व्वा!

आई चक्क देवळातच काही बायकांबरोबर बसली.

आता तर चाप फेकायला काहीच हरकत नव्हती. फक्त इतकेच, की बरोब्बर खिडकीत बसलेल्या नितुला मिळायला पाहिजे. मुळात खिडकीतून आत जायला तरी पाहिजे???

अंहं! पहिलाच प्रयत्न चापाचा नको. खडे मारू खडे! लागेल बिचारीला... पण पर्याय उपलब्ध नसल्याने... मी खडे मारले असे सांगता येईल म्हणा...

पण नशीबच जोरावर होते.

पहिलाच खडा.... टण्णकन नितुच्या खिडकीच्या गजांवर आदळून खाली पडला.

ताडकन दचकलेली नितु पलंगावरून उतरून मागे उभी राहिली.

आता खरा प्रश्न होता. इतक्या अंधारात तिला आपण दिसलो तर पाहिजेत???

उम्या हळूहळू उभा राहिला. एकदा धाडस करावेच लागणार होते. नितुच्या आईकडे लक्ष ठेवून तो उभा राहिला तशी नितु दचकली... कारण तिला फक्त उंचावर एक आकृती उभी राहिल्याहे दिसले अंधुक प्रकाशात! म्हणजे जवळ जवळ नसलेल्याच प्रकाशात!

आणि नेमके त्याचवेळेस ते झाले!

शेजारच्या खांबावरचा दिवा लागला.

गच्चकन खाली बसला उमेश! पण.... मोठ्ठे काम झालेले होते.

निवेदिताला समजले होते.

उमेश तिथे आहे हे!

आता ती खिडकीत येऊन बसली. अभ्यासात कुणाचे लक्ष लागणार?? दर दहाव्या सेकंदाला मान उमेशकडे वळू लागली. आता तो खाली बसलेला असल्याने बाकी कुणालाच दिसू शकत नव्हता. मात्र तिला त्याची आकृती आणि चेहरा काहीसा दिसत होता.

आणि त्यानंतर उम्याने चाप फेकला. तो चापही खिडकीबाहेर पडला. पण निदान नितुला वाकून हे तरी बघता आले की तो एक नवा कोरा चाप आहे. आई घरी आली की हळूच बहेर जाऊन तो आणता येईल हे तिला माहीत होते.

सर्व विरोध, सर्व गोष्टी विरुद्ध आणि कशावरही ताबा नाही अशा अत्यंत नकारात्मक परिस्थितीत आज ती नजरानजर होत होती. आता नितु काहीशी आत सरकून बसली. कारण त्यामुळे ती खिडकीतून कुठेतरी बघत आहे हे बाहेरच्यांना समजणार नव्हते. आणि एकटक तिथेच बसून ती उमेशची आकृती बघत बसली. उमेश मधूनच हात हालवत होता. तसाच हात हालवून नितुही त्याला प्रतिसाद देत होती. तिच्या खोलीत लाईट असल्याने ती उम्याला व्यवस्थित दिसत होती. मधेच ती मुसमुसत होती. उमेशलाही वाईट वाटत होते. अचानक नितु उठली आणि तिने तिची नेलपॉलिशची एक बाटली अगदी सहज फेकल्यासारखी खिडकीतून बाहेर फेकून दिली.

डोळ्यांमधून जे भाव व्यक्त होत होते ते अक्षरे आणि शब्दात मांडण्यासारखे नव्हते. ती भाषा वेगळी होती. अननुभवी मने होती दोन! आयुष्याचे वास्तव अजून भिडलेलेच नव्हते. केवळ नजरानजरीला आणि एका एकदाच झालेल्या भेटीला प्रेम समजत होते. पण एक मात्र होतं! एकमेकांशिवाय चैन पडत नव्हती. दुसरा नजरेस पडत नसल्याहे दु:खही व्यक्त करता येत नव्हते. पण ते दु:ख मनाला जाळत होते. कित्तीतरी बोलायचे होते, काय काय झाले ते सांगायचे होते, पुढे काय करायचे हे ठरवायचे होते.

कालच ज्या प्रेमाची पूर्ण सांगता करण्यात वाड्यातल्यांना यश आलेले होते... त्या प्रेमाला आज एक नवीन आणि नव्या दिशेने कोंब फुटलेला होता. दोन्ही बाजूंची भावनांची तीव्रता तितकीच आहे हे दोघांनाही समजत होते.

आणि पुन्हा अचानक नितु उठली. उम्याला वाटले बहुधा कुणीतरी आले म्हणून दार उघडायला उठली असावी. टिच्चून बसून राहिला तो तिथेच! पाच मिनिटांनी ती आली तेव्हा तिच्या हातात फुलस्केप कागद होता आणि त्यावर लिहीले होते...

१७ आणि १८ तारीख!

१७ आणि १८???

म्हणजे काय? त्या दिवशी काय होते???

उम्याला काहीही समजेना!

तितक्यातच नितुने एक लाल रंगाची चादर फाडली आणि तिचा बारीकसा तुकडा खिडकीला बांधला.

तो पुन्हा काढला आणि पुन्हा बांधला! पुन्हा काढला आणि पुन्हा बांधला!

मेसेज समजला.

तो तुकडा असताना तिकडे फिरकायचेही नाही.

पुन्हा तिने १७ आणि १८ तारीख हा कागद दाखवला आणि खिडकी बंद करून घेतली.

उदास झालेला उमेश कठड्यावरून उडी मारून खाली उतरला. आणि नेलपॉलिशची बाटली घ्यायला त्या बोळात जाणार तोच त्याच्या कानावर वाक्य पडले...

"आमच्या गावाला उत्सव असतो ना... त्यामुळे दोन दिवस जाणार आहोत दोघेही"

तो आवाज नितुच्या आईचा आहे हे समजतानाच्या क्षणी....

उमेश राईलकर स्वतःचा राहिलेला नव्हता... तमाम जगाला फसवून दोघांनी भेटण्याच्या तारखा निश्चीत केलेल्या होत्या...

काहीच वेळात त्याने ती नेलपॉलिश्ची बाटली उचलून खिशात टाकली आणि मागे वळणार तो...

.... निवेदिता...

ती बोळाच्या सुरुवातीला होती आणि... चाप घ्यायला आलेली होती...

तिला पाहून पटकन उमेशने आपली दिशा बदलली आणि बोळाच्या विरुद्ध बाजूला जाऊ लागला...

आता त्याच्याकडे नितुच्या तीन गोष्टी होत्या...

एक नेल पॉलिशची बाटली...

एक तिचा जुना चाप.. ज्याला अजूनही तिच्या केसांचा गंध येत होता... आणि...

... सिंहगडावर काढलेले तिचे तीन फोटो.... जे त्याने एकदाच बघून अजून स्टुडिओतून आणलेलेच नव्हते...

इतकीच मिळकत होती प्रेमाची! अर्थात, सिंहगडावरच्या भेटीची आतुर करणारी आठवण होतीच... आणि शैलाताईच्या लग्नाच्या आदल्या दिवशी झालेली रस्त्यावरची भेटही....

पण... अपुरेपणा हीच प्रेमाची सर्वोच्च पातळी आहे या वास्तवापासून दोघेही अजून दूर होते....

अरे???

सतरा तारीख तर... परवाच आहे...

काय काय प्लॅन करायचा?? विन्याला मोटरसायकल मागावी का??? आणि पैसे लागतील की?? की अख्तर मियाँकडून थोडे अ‍ॅडव्हान्स घ्यावेत???

काही समजत नाही आहे. पण अशी कशी तिला एकटीला सोडून जातील. काहीतरी घोळ आहे. वाड्यात तर नक्कीच ठेवणार नाहीत. पुण्यातल्याच एखाद्या नातेवाईकाकडे ठेवतील.

पण कळणार कसं??? कॉलेजमध्ये जाऊन भेटलो तर तिच्या तीन मैत्रिणींना सांगून ठेवले आहे की कुणी भेटायला आले तर घरी कळवायचे म्हणून!

रस्त्यात बोललो तर कुणीतरी पाहिले तर संपलाच विषय!

विचारांच्या नादातच चालत चालत तो वाड्यात आला. तर दारात क्षमा उभी... मागे आजोबा...

"दादा... अरे एक माणुस आला होता... तुला अख्तरसाहेबांनी बोलावलंय म्हणाला नेहमीच्या जागी... काहीतरी काम आहे.."

च्यायला???

नोकरीचा पहिला दिवस आणि असे कसे बोलावले लगेच??? इतक्या रात्री त्या विचित्र खोलीत परत जायचे???

की नकोच जायला???

पण... नोकरी गेली वगैरे तर???

पटकन सायकल काढून निघाला...

... आणि लक्षात आले... मंडईपासून जातानाच लक्षात आले... की 'त्या' विचित्र खोलीत जायचे नाही आहे आपल्याला...

आपल्याला बोलावले आहे प्यासाला!

प्रश्नच नव्हता पिण्याचा! शपथ घेतलेली होती. आणि आईला शपथ दिलेली होती.

एक म्हणजे एक घोटही प्यायचा नाही हे ठरलेलेच होते. केवळ भेटायला उम्या वरच्या मजल्यावर गेला.

अख्तरमियाँ!

सकाळी ओघवत्या वाणीतून वाट्टेल त्या साहित्यचे मराठी आणि हिंदी, उर्दूत भाषांतर करणारा हा प्रसन्न व्यक्तिमत्वाचा माणूस.... आत्ताही तितकाच प्रसन्न दिसत असला तरीही...

आत्ता त्याच्यासमोर होते मदिरेचे प्याले...

आज का कुणास ठाऊक... प्यासामधील दारू, चकणा आणि सिगारेटी यांचा घुसमटलेला मिश्र गंध उम्याला दुर्गंधासारखा वाटला...

एक एक पायरी चढ्त वर पोचला आणि मियाँसमोर जाऊन बसला...

"आओ आओ.... आओ दोस्त... क्या फर्माओगे...."

"दारू सोडली सर..."

पुन्हा खदखदून हासत मियाँनी त्याच्यासाठी नुसते चिकन मागवले...

"नातजुर्बाकारीसे वाईजकी ये बाते है... "

"सर...."

"फर्माओ यार"

"मला... आत्ता का बोलावले होतेत??"

"क्युंकी अब हम दोस्त बनगये है... "

कसनुसं हासला उम्या!

"सर... एक वि... विचारायचं होतं... "

"बताओ??"

"सतरा और अठरा तारीखको... मै नही आया तो... चलेगा क्या??"

निमिषार्धापुरताच अख्तरमियाँचा चेहरा हिंस्त्र झाल्यासारखा वाटला उम्याला! पण लगेचच दिलदार हासत ते म्हणाले..

"क्युं??? खी जा रहे हो???"

"येस सर... गावको"

"होकर आओ... होकर आओ.. काम तो है ही... यार कुछ तो लो... ये इस तरहा सुखे सुखे बैठोगे तो महफील तो वीरां होजायेगी??"

"सॉरी सर.. लेकिन... मां को कसम दी है..."

"कोई नही... कसम दी है तो मत पियो फिर... मै तो पी सकता हूं??"

"अर्थातच सर... "

"लेकिन... अम्मीको पता कैसे चल पाता है के आपने शौक फर्माया??"

"दोही कमरे है... एक दरवाझा"

"तो सोनेकी जगह बदलदो??"

"आता नाही वाटत प्यावसं"

"क्युं भाई?"

अख्तरमियाँ त्याला भरीला पाडत असण्याचं कारण होतं!

"अंहं"

"लो... एक घुट लेलो.. कोई बू नही आती..."

"नही स्सर"

"अरे मेरे कमरेमे सो लिया करना आगेसे... जबभी खुदको जाममे डुबाओगे?? वहां तो कोई नही होता"

"नही सर... ठीक है"

"खैर... काम ठीक लगरहा है?? वैसे पहलाही दिन था आज"

"हां सर भौत अच्छा काम है वो"

"चलो... अच्छा सुनो... बीस तारीखको बडी मीटिंग है... अंजुमने-इस्लामके कुछ लोग, मै, और कुछ बच्चे! तुम्हारी सबसे जानपहचान होजायेगी... तुम मनेजर जो हो... क्युं??"

"नक्की येईन सर, कुठे आहे??"

"घोरपडे पेठ... दोनो वक्तका खाना वही पर है.... "

"आता हूं सर.. पहले ऑफीसमेही आना ना?"

"हं! यही बतनेके लिये बुलावा भेजा था... और कुछ खाओगे??"

"नही नही सर... .. मै निकलता हूं... निकलू सर??"

"हं!"

जिना उतरून खाली येत असताना उमेशच्य कानांवर पुन्हा हाक पडली. त्याने मागे वळून पाहिले. अख्तरमियाँनी वाक्य उच्चारले.

"और... बहुत जियादा जिक्र मत करना इस चीज का... मतलब... जब काम काबीलेतारीफ होगा... तब बतायेंगे"

होकारार्थी मान हालवत इनोसंट उमेश राईलकर प्यासातून बाहेर जात असताना....

..... अख्तरमियाँचे लबाड डोळे त्याच्या पाठीवर रोखले गेलेले होते....

गुलमोहर: 

आज मी पहिला..
खुप प्रतिक्षेनन्तर नवीन भाग वाचायला मिळाला.
धन्यवाद..

खुप मस्त भाग .
मी तुमच्या सगळ्या कादंबर्‍या वाचलेल्य आहे पण कधी प्रतिसाद नाही दीला.
पण आज देत आहे कारण तुम्ही खुप प्रतिक्षे नंतर भाग टाकता लिंक जुळत नाही. चक्क १३ वा भाग परत वाचावा लागला. तुमच्या अफाट लेखनाची खुप खुप तारीफ. असेच लिहित जा.

>>>पण तिला कळणार कसे?? शुक शुक वगैरे केले तर रस्त्यावरचे पन्नास पब्लिक वळून पाहील. चाप!
खरच की! चाप! चाप फेकू! आँ????? हे काय???? बोंबला! तिचीच आई देवळात?? लपा लपा! >>>
अस वाटल समोर चालु आहे हा खेळ.

खुप प्रतिक्षेनन्तर नवीन भाग वाचायला मिळाला. फार वाट पहावीलागली.
आत्ता कदाचित कथा वेगळे वळण घेईल आसे वाटते.
धन्यवाद..

खुप मस्त भाग आहे.
आत्ता कदाचित कथा वेगळे वळण घेईल आसे वाटते. फार फार वाट पहावी लागली.
पण तरि धन्यवाद..

शुभु

सर्व सुस्वभावी, शाबासकी देण्यास उत्सुक, दिलदार व रसिक प्रतिसादक हो,

माझ्या लेखनाला प्रतिसाद देऊ नयेत अशी नम्र विनंती केलेली होती. ती अजूनही 'जारी'च आहे. पण ती पाळली जात नाही म्हणून हा एक लहानसा प्रतिसाद प्रपंच! किमानपक्षी आपल्या सदस्यत्वाला १ वर्ष व १८ आठवडे यापेक्षा कमी कालावधी झालेला असल्यास तरी प्रतिसाद देऊ नयेत अशी एक उपविनंती करत आहे. समजून घ्याल अशी अपेक्षा!

-'बेफिकीर'!

बेफिकीरजी,
विनंती मंजूर. उत्साहाच्याभरात तुमची विनंती लक्षात नाही राहिली. क्षमस्व.
उपविनंती नामंजूर. गेली ६ वर्ष मी मायबोलीचा सदस्य आहे. जुन्या मायबोलीवर २००५ मधे सदस्यत्व घेतले होते. नवीन मायबोलीवर ते उशीरा घेतले इतकेच.
आता कादंबरी पूर्ण झाल्याखेरीज प्रतिसाद देणार नाही.
तरी वाचणे सोडणार नाही.

खुप टिपीकल....कादंबरी कुठे जाणार याचा आधीच अंदाज आलाय.. तापल्या तव्यावर पोळी शेकली जाणार बहुधा

पु.ले.शु

CHALA...AALA EKDACHA.....

NAVIN BHAG...LAVKAR YENAR KI...manachi tayari karu vaat baghanyachi....?

MALA 1 VARSH ZALE NAHI AJUN..MHANUN LEKHANA VAR KAHI LIHILE NAHI...YACHI NOND ASAVI

जियो बेफिकिर जियो
कहानि मे जबरद्स्त ट्विस्ट ,आता पुढे काय होणार?????????
पुढचा भाग लवकर टाका.
आणि हो तुमची विनंती /उपविनंती लक्षात राहणार नाही क्षमस्व.काय आहे न,इकडे नोकरि दाव पर लगाकर ,तुमच्या कथा/कादम्बर्या वाचते मि.ओफिस च्या ताणतणावातुन बाहेर पडायचे औशध आहे ते माझ्या साठि.धन्यवाद माबो.
बेफिकिर कुठलाहि राग न मानता ,असेच मनापासुन लिहित रहा सुपर फास्ट स्पिड नि.