आवर्त

Submitted by मामी on 13 January, 2011 - 11:58

एका निबिड जंगलातून तो धावत सुटला होता. समोरचं काही दिसत नाहीये, कुठे जातोय कळत नाहीये ... पण एकच गोष्ट ठाऊक आहे की इथून कसंतरी बाहेर पडायचयं ..... त्याने आपल्याला गाठायच्या आत. मागून आवाज येतोय का? की त्याचंच हॄदय त्याच्या छातीच्या पिंजर्‍यावर धडका मारतय? पायात पेटके येतायत ... त्राण कमी कमी होतय. पण निश्चय करून जीवाच्या आकांताने तो पळतोय. आणि मुठीत धरून ठेवलेली ती वस्तू????? दचकून त्याने ती पुन्हा चाचपून पाहतोय, तिच्याभोवतीची बोटं अधिकच घट्ट झालीत. ही वस्तू आपण किती शिताफीनं हस्तगत केली त्याच्या हातून पण मग त्यामुळेच तर तो खवळला. आता आपण त्याच्या तावडीत सापडून चालणारच नाही. 'ही वस्तू म्हणजे त्याचा जीवच आहे आणि आत्ता या क्षणाला तो माझ्या मुठीत आहे.' त्याला ही कल्पना सुखावह वाटतेय पण त्याचबरोबर त्याने जे काही स्वतःवर ओढवून घेतलय ते भयावह वाटतयं. चूक की बरोबर, योग्य की अयोग्य ... किती व्यक्तीसापेक्ष असतं ना? अरे बापरे, हे नक्कीच पावलांचे आवाज - धप्प...धप्प...धप्प.... अरे देवा, कुठे लपू आता? त्याला सापडलो तर???? ... कधी एकदा त्या गुहेपाशी जाऊन पोचतोय असं झालय त्याला. एकदा आत शिरलं की काळजी नाही. ती समोर दिसतेय गुहा ... आता पोचणारच ... पोहचलाच ... आणि अचानक एक जीवघेणी कळ डोक्यात. न दिसलेल्या दगडावर डोकं आपटून जमिनीवर खाली कोसळताना त्याच्या मनात एकच विचार ... शेवटी ती वस्तू जाणारच हातातून .............................
.
.
.
.
कर्रर्रर्र ... कच्च! मागच्या कारने जोरदार ब्रेक मारला. पण त्याला त्याची तमा नव्हती. सुसाट वेगात बाकी गाड्यांतून मार्ग काढत वेगाने पुढे जात असताना, आजुबाजुला काय घडतय हे बघायला त्याला ना वेळ होता ना गरज. बस्स एकच जिद्द! कसही करून निसटायचयं. निसटायच .... का? कशाला? कोणापासून? गटांगळ्या खायला लागलेला मेंदु अचानक पुन्हा भानावर आला. अरेच्चा त्याच्यापासून लवकरात लवकर दूर गेलं पाहिजे. तो पाठलागावर असेलच .... का बरं पाठलाग चाललाय ????? अरे हो! त्याची आवडती गोष्ट ... ती आपल्याकडे आहे की. आता एकच करायचय, कसही करून आपली हद्द गाठायचीय .. जोरात .... अजून जोरात .... गाडीचा वेग वाढतोय्...आणखी... आणखी ......अचानक गाडी समोरच्या खांबावर आपटतेय ...... शेवटी गेलीच ती गोष्ट हातातून ..............................
.
.
.
.
.
.
नितळ शांत सागराच्या तळाशी तो मासा हलकेच तरंगत पोहतोय ... वा किती शांत, हलकं वाटतयं .... काही चिंता नाही, फिकीर नाही .... फक्त मजेत पोहायचं .... गिरक्या घेत ... गिरक्या घेत ... गिरक्या घेत .... गाणंही म्हणायला काय हरकत आहे? पण हे काय तोंडात काय आहे बरं?? अरे ही वस्तू कोणाची? अरे बापरे खरेच की ही वस्तू तर त्याची आहे. म्हणजे तो आता माझ्या मागावर असणार ... पळा ...... पळा ...........पळा ........................
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अद्वैतच्या अंगावर पांघरूण घालून आई मागे वळली आणि अद्वैतच्या बाबांना म्हणाली, "आत्ता कुठे झोप लागली. मगापासून चाळवाचाळवच चालली होती. बिचारा!!! आज आपल्या अदुचं आणि नामजोश्यांच्या सार्थकचं भांडण झालं. एका बेब्लेडवरून. अदुचं म्हणणं की त्याने तो जिंकला होता तर सार्थक म्हणत होता की तो त्याचा अत्यंत आवडता बेब्लेड असल्याने अदुनं त्याला परत द्यायला हवा. बरं दोघेही आपापल्या जागी खरे आणि दहा वर्षांच्या मुलांच्यात कुठुन समजुतदारपणा असणार? शेवटी अदुनं तो सार्थकच्या हातातून खेचलाच आणि आपल्या घराकडे धावत सुटला. नेमकं आपल्या दारापाशी आला असताना शेजार्‍यांचा कुत्रा मधे आला आणि अदु जोरात पडला. डोक्याला लागलयं. आणि एवढं करून ज्या बेब्लेडवरून हे सगळं झालं ते तुटलचं."

गुलमोहर: 

छान!

खुपच मस्त मामी!!! जबरदस्त!!!!!!!! Happy छोट्याशा स्वप्नविश्वाची कार्यकारणभावासकट लिहिलेली अनुभूती खुप आवडली. पु.ले.शु.

धन्यवाद... सर्वांनाच.

हो दिनेशदा, हे माझं पहिलंच कथा-अपत्य. लोकांना बरी वाटतेय म्हणजे ते कथा-आपट्य ठरलं नाहिये तर.

मामी आख्खी कथा कल्पनाच गर्र्र्र्र्र्र्र्कन फिरवलीत की Happy मस्तच !
तुम्हाला कथा थोडक्यात अटोपायची नसती तर खुप काही करता आलं असतं !

अवघड न जमलेल..
या कथा वर्तुळाकार आहेत ना सुरुवात ना अंत..