त्याला समुद्र आवडायचा
खुप आवडायचा म्हणुन तो
खुप सुंदर रंगवायचा.
समुद्रासारखं खोल अथांग
असं त्याचं मन होतं..
काठांवर खेळ्त येणार्या
लाटांसारखं त्याचं असणं होतं....
त्याच्या डोळ्याच्या काठांवर
कायम एक चमकदार थेंब
लपलेला असायचा.
निळ्या सुंदर समुद्राच्या काठानं चालावं,
पण कोरड्या पायानं....
असा त्याचा संयम होता.
दिलखुलास हसण्याची त्याची लकब,
सकाळ्च्या उगवत्या किरणांनी
समुद्र जसा हळुहळु उजळ्तो तशी....
मायेनं त्याचा हात अलगद
कपाळावर फिरला की वाटे,
संध्याकाळ होताना समुद्रानं
थकलेल्या आभाळाला कुशीत घ्यावं.
आणि मग एक दिवस ती बातमी आली.........
मन समुद्राच्या पाण्यासारखं खारं झालं.
डोळ्यांत अश्रुंचा समुद्र झाला.
आठवणींनी काहूर माजवलं.
ओहोटीला लागलेल्या समुद्राच्या काठावर
वाळून भिजलेल्या भावनांचा खच झाला....
त्सुनामीच्या दहा फुटी लाटेनं
शंभर कोटी दिव्य व्यक्तीमत्वाचा वेध घेतला.....
असंख्य धडपडणार्या जीवांमध्ये
त्याचाही एक जीव असेल.
समुद्रात ओढले जाताना
त्याच्या डोळ्यात तो थेंब असेल?
आताशा मी समुद्रापास जात नाही.
समुद्र रंगवायला घेत नाही.
समुद्रापाशी गेले तरी,
त्या पाण्याला पाय लावत नाही.......
त्या पाण्यात त्याचा थेंब असेल.
त्याचं हसू लाटेलाटेंत असेल.
ह्या विक्राळ समुद्रात
त्याचा रंग मिसळ्लाय...
पाय कसे लावू?
ओंजळ्भर ते खारं पाणी हातात घेते,
आणि कपाळावर भक्तीनं लावते.
त्याचा मऊ ऊबदार हात
कपाळावर फिरल्याचा भास होतो मग......................
समुद्र....
Submitted by पल्ली on 3 January, 2008 - 02:15
गुलमोहर:
शेअर करा
सुरेख...
त्या पाण्यात त्याचा थेंब असेल.
त्याचं हसू लाटेलाटेंत असेल.
ह्या विक्राळ समुद्रात
त्याचा रंग मिसळ्लाय...
पाय कसे लावू?>>> great...!!!
खुप छान
खुप छान लिहिले आहेस.
खुप सु॑दर.
पाय कसे लावू?
मी तिथेच अडले.... छानच लिहिते आहेस....
सुरेख
संध्याकाळ होताना समुद्रानं
थकलेल्या आभाळाला कुशीत घ्यावं.>>>>>> फारच मस्त ग!
समुद्र
खूप गहिरी कविता, अनलंकृत कदाचित म्हणूनच थेट भिडणारी.
-बापू
ही सत्यता आहे...
धन्यवाद बापु...
माझे डॉक्टर त्सुनामीत गेले....ते फार छान होते..त्यांची मिसेस दवाखाना सांभाळते. खुप करारी, भक्कम, तेजस्वी स्त्री आहे. माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक अडचणीत ते मार्गदर्शन करीत.... मस्त माणुस आहे! आहेच्...आम्च्या मनात.
पल्ले, This is
पल्ले,
This is original pallI. खूपच हळुवार गं. कुणालाही कुठेसं खोलवर घेऊन जाईल असं. तुझ्या त्या मोरपिशी काळजाला दंडवत. पार हलवून टाकलं तुझ्या व्याकूळ शब्दशिल्पांनी अगदी तळापासून. हॅट्स ऑफ. सर्वांगसुंदर. तुझ्या ह्या रेशमी संवेदना अप्रतीम.
.................................अज्ञात