निरोप

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

ठीक आहे तर, आता आपल्या वाटा वेगळ्या
तू पूर्वेकडे जा, मी पश्चिमेकडे...
हो! चुकूनही भेट व्हायला नको पुन्हा...
आता मोठ्ठे झालोत ना आपण?
क्षणात कट्टी..क्षणात बट्टी करायला,
लहान का आहोत आता?
असं करु यात.. सीमारेषाच आखू यात,
हा भाग तुझा, तो भाग माझा..
वाटून घेऊ सगळं..
तू माझ्या भागात यायचा नाहीसच,
(आणि मला तुझ्या भागात यायची बंदीच आहे)
ए, पण तुला खरं सांगू का?
आपल्या दोघांमधलं नातं..
च्च! नातं म्हणलेलं चालेल ना?
अंऽऽ! किंवा असं म्हणू यात..
कुठलंही नातं, असं 'संपलं' म्हणून संपतं,
यावर माझा खरंच विश्वास नाहीये..
तू मला विचारलंच नाहीयेस म्हणा, असो.
तर कुठे बरं होतो आपण... हं सीमारेषा..वाटणी
तर कुठून बरं सुरुवात करु यात?
या किबोर्डपासून... चालेल?
आपण चॅट करायचो तेव्हा,
आपल्यात "बॅकस्पेस" वापरायची बंदी होती
ती आता वापरायला शिकेन मी.. लागेलच वापरायला
माघार घ्यायला तुच शिकवलंस ना मला अखेर..?
मग ठरलं तर "बॅकस्पेस" माझ्याकडे..
बाकी सगळाऽऽ किबोर्ड तू घे
अरे हो! "स्पेस" कि खूप मोठी आहे..
ती विभागून घेऊ यात का?
थोडी "स्पेस" देशील मला? थोडी..?
तू ज्या ठीकाणी माझी वाट पहात थांबायचास,
तो रस्ता टाळणं शक्यच नाहीये..
पण त्या रस्त्याच्या तो तेवढाच भाग,
तो तुझ्याकडे घे..
या इमारतीतली ती खिडकी,
जिथून 'ती' जागा दिसते ती पण तुझ्याकडेच ठेव,
म्हणजे पुन्हा चोरुनही तुझी वाट मी पाहू शकणार नाही..
अरे हो! तुला सांगितलं नव्हतं मी.....पण..
तुझ्यासाठी एक भेट आणून ठेवली होती..
तुझ्यासाठी वाढदिवसाचं सरप्राइज गिफ्ट..
ते ....जाऊ देत....
ते गाणं? तू मला दिलं होतंस भेट म्हणून?
तू परत मागितलं नाहीस..
पण आता ते माझ्यासाठी नसेल ना..?
ते तुला परत करु ना? म्हणजे...
डीलीट करुन टाकेन माझ्या मशिनवरुन..
तू दुसर्‍या कुणाला देऊ शकशील.....
तुझ्या कानात अजूनही घुमत असतील..
माझे काही चुकार शब्द, माझे उसासे तर..
हुसकावून लाव त्यांना..
तू परवा माझ्या स्वप्नात आला होतास..
असू दे, असू दे, चुकून असेल ते..त्याचं काय एवढं?
तुझ्या माझ्यातलं ते कनेक्शन...
ते तोडायची रिक्वेस्ट कुणाकडे पाठवायला लागेल रे?
कुठला फॉर्म भरायला लागतो त्यासाठी तेवढं सांग फक्त..
आणखी एक..जाता जाता तुला एक विनंती करायची होती,
तो रस्ता, जिथे सिग्नलला गजरेवाला उभा असतो..
तो तेवढा तुझ्याकडे घे..
मोगरा सहन नाही व्हायचा आता..
एवढं करशील ना रे,
तुझ्या एकेकाळच्या जीवलग मैत्रिणीसाठी...?
जाता जाता तुला एकदा कडकडून मिठी मारायची होती..
आणि......असो.

प्रकार: 

धन्यवाद प्रतिसादाबद्दल..
मिलिंदा हो मलाही 'मेरा कुछ सामान.. ' ची आठवण झाली होती हे लिहीताना..

सुपर्ब Happy

आपल्यात "बॅकस्पेस" वापरायची बंदी होती
ती आता वापरायला शिकेन मी.. लागेलच वापरायला
माघार घ्यायला तुच शिकवलंस ना मला अखेर..?
मग ठरलं तर "बॅकस्पेस" माझ्याकडे..
बाकी सगळाऽऽ किबोर्ड तू घे
अरे हो! "स्पेस" कि खूप मोठी आहे..
ती विभागून घेऊ यात का?
थोडी "स्पेस" देशील मला? थोडी..?>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> हे प्रचंड आवडलं..... सगळीच कविता प्रचंड आवडली................... खूप छान लिहिलय Happy

अफाट !
>>>अरे हो! "स्पेस" कि खूप मोठी आहे..
ती विभागून घेऊ यात का?
थोडी "स्पेस" देशील मला? थोडी.
....
तो तेवढा तुझ्याकडे घे..
मोगरा सहन नाही व्हायचा आता..<<<< जबरदस्त !

श्यामली, हम्म जीवघेणं Happy धन्यवाद..
अमल, कविता, गिरीश, स्मित, सात पुर्ण, इन्द्रधनु धन्यवाद!

तो रस्ता, जिथे सिग्नलला गजरेवाला उभा असतो..
तो तेवढा तुझ्याकडे घे..
मोगरा सहन नाही व्हायचा आता..

आणि बॅकस्पेस..जबराट!

खूप दिवसानंतर आज मायबोलीवरची कविता वाचली.

मीनू, तू जुनीचं मीनू का? की नवीन आहे इथे? असो..

ही कविता "यावर माझा खरंच विश्वास नाहीये.." इथेचं संपायला हवी होती. नंतर फार पोरकट झाली. पण छान आहे.

हो रे बी मी मीनूच.

प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद Happy