तुम्हे याद हो के न याद हो - ११

Submitted by बेफ़िकीर on 24 June, 2011 - 04:45

कॉलेजला जायला म्हणून नीतू घराच्या दारातून बाहेर पडली आणि नेमका समोरून उमेश आला आणि तिच्याकडे खुळ्यासारखा पाहातच राहिला. ती नजरानजर सहन न होऊन निवेदिता पापण्या झुकवून हासत हासत सायकल घेऊन वाड्याच्या बाहेर पडली.

तमाम वाड्याला, उमेश आणि नीतूसकट सगळ्यांना, कळलेले होते की आपटेंनी आजोबांची माफी मागीतली, त्यांच्यात समेट झाला, आजोबा 'उमेश - नीतू' या बाबतीत जरा अधिकच सूचक बोलत होते आणि ते विचार आपटे तसेच राईलकर या दोन्ही घरातील जे कोण सदस्य तेथे उपस्थित होते त्यांना आवडतही होते.

एकंदर, प्रकरणाने भन्नाट वळण घेतले त्या दिवशी! उमेश आला आणि त्याला क्षमा चिडवू लागली. तिला वर्षाने सांगीतले होते की असे असे झाले. उमेशला आधी हेच कळेना की शिफ्टिंग होणार होते ते केवळ काल रात्री आपण गुरुवार पेठेत जाऊन केलेल्या अर्वाच्य शिवीगाळीमुळे कॅन्सल झालेच कसे? त्यातच आईने त्याला सांगीतले की आपटेकाका आणि जयश्रीकाकू येऊन गेल्या. त्यामुळे आणखीनच टेन्शन येत आहे तोवर आजोबांनी विधान केले की 'जरा जबाबदारी घ्यायला शिक रे, सवय पाहिजे आता, नुसता भटकत जाऊ नकोस'! हा उपदेश गंभीर आहे की चेष्टायुक्त यावर विचार करेपर्यंत क्षमाने पुढचे वाक्य टाकले होते की आजोबा आपटेंना व्याही म्हणाले.

मुलीसारखा लाजला उम्या! आणि आतल्या खोलीत निघून गेला. जाताना मात्र 'कायच्या काई काय बोलता तुम्ही मला तर समजतच नाही' वगैरे अभिनय केलाच! क्षमा पाठोपाठ आत धावली चिडवायला आणि अनेक वर्षांनी उम्याने तिला एक लाडीक धपाटा दिला. त्याचबरोबर आईही तिला दटावू लागली तसे क्षमाला प्रकरणाचे गांभीर्य समजले आणि ती पुन्हा हासत हासत स्वयंपाकघरात आली. आजोबा मात्र सुनेला चिडवतच राहिले 'मुलाची आई बुवा तू, तुझा काय थाट सांगावा' वगैरे!

हे सगळं फार फार अयोग्य वेळेला किंवा अयोग्य पद्धतीने होत होते. वास्तविक आपटे आल्यानंतर केवळ चहापाणी, दिलगीरी व्यक्त करणे, दिलखुलासपणे क्षमा करणे आणि अवांतर चर्चा झालेली होती. आजोबांनी काढलेला व्याही वगैरे विषय नंतर झालाच नव्हता, एक मात्र जाणवत होते की नितुची आई जरा जास्तच हासून पुढे पुढे वगैरे करत होती. घराचे आतून व्यवस्थित निरिक्षण करत होती. तिच्या नजरेत तरी जाणवत होते की तिला 'दिलगीरी व्यक्त करणे' यापलीकडेही काही स्वारस्य असावे. बाकी आपटे जरा खालमानेनेच वागत होते. पोलिस अधिकारी असल्यामुळे त्यांना ते फारच जड जात होते. पण एक त्यांनाही कबूल होते की उमेशसारखे स्थळ असल्यास खरेच काही प्रॉब्लेम नव्हता. आपल्यातच दोन दिवसांत इतका कसा काय फरक पडला हाही विचार ते करत होते आणि त्या फरक पडण्याचे श्रेय पत्निलाही मनातल्या मनातच देत होते.

मात्र आजोबांनी त्यांचेच मत पुढे रेटल्यामुळे आपटे पब्लिक निघून गेल्यानंतर उम्याच्या आईनेही जरा गंभीरपणेच विचार केला होता. पोरगी तर गोड होती. वागायलाही ठीकठाकच! समोरच माहेर असल्यामुळे सतरा वेळा माहेरी जाईल की काय इतकाच प्रश्न होता. बाकी तसं नाव ठेवण्यासारखं काही नव्हतंच! आणि त्यातच क्षमा आल्यावर आजोबांनी गंभीरपणे तिला 'तुझ्या भावजयीचे आई वडील येऊन गेले गं आत्ता' म्हणून सांगीतल्यावर तिच्या हातातून चहाचा कप निसटता निसटता राहिला. खरे तर आत्ता तिच्या हातात असलेला चहा हाही आजोबांनीच 'अगं अरुणा, क्षमा आलीय, चहा टाक' असे फर्मान सोडल्यामुळेच आलेला होता. आणि उम्याच्या आईला अर्ध्या तासात तिसर्‍यादा चहा टाकावा लागला होता. पाठोपाठ उम्याही आला आणि मग चिडवाचिडवी सुरू केली क्षमाने! तिकडे निवेदिता शिफ्टिंग संपले असेल या विचाराने रडवेले तोंड करत स्वतःच्या घरात गेली आणि तिच्या आईने तिलाही सगळा प्रकार सांगून टाकला. तिला तिचा आनंद लपवण्यासाठी लक्षावधी प्रयत्न करावे लागले. पटकन पळून ती आतल्या खोलीतल्या पलंगावर जाऊन पुस्तकात डोके खुपसून बसली. तिचे बाबा काही कारणाने घरातून बाहेर गेलेले होते हे तिला जरा बरेच वाटले. नाहीतर आपल्याला झालेला आनंद त्यांच्या पोलिसी नजरेला जाणवला तर परत काहीतरी उपटायचं असं तिला वाटलं! तरी आईच्या वागण्यात निर्माण झालेला उत्साह नेमका कशामुळे आहे हे काही समजत नव्हते. अचानक राईलकरांचे घर या माउलीला इतके का आवडायला लागले असावे यावर नितु विचार करत होती. आणि आई काही कारणाने बाहेर गेली तेव्हा मात्र...

... सर्रकन उठून नितुने आधी दार बंद केले... पुन्हा पलंगावर बसली आणि अगदी करंगळीच्या टोकाने हळूच पडदा सरकवला..

छे! दारं बंद आणि खिडक्याही बंद! इतक्या दुपारी? काय करतायत काय?

तेवढ्यात दार उघडलं! आणि कोण तर क्षमा बाहेर पडली. तिला पाहून वैतागलीच नितु! बघायचं कुणाला होतं आणि आलंय कोण! पण हे काय?? ही तर ... सरळ... इकडेच...

ताडकन नितुने दार उघडलं आणि क्षमा हासत हासत दारातून आत आली. निवेदिता आता मात्र खरच वैतागलेली होती. एका चांगल्या बातमीनंतर तिला उमेशचा चेहरा पाहायचा होता. किती आनंदी दिसतोय ते बघायचं होतं!

पण ही येडचाप मधेच कडमडली होती. नितु कुतुहलाने आणि भांबावून क्षमाकडे बघत होती तर क्षमा मिश्कीलपणे आणि खोडसाळपणे इकडे तिकडे बघत होती.

नितु - काय गं?

क्षमा - कुठे काय?

नितु - मग? आत्ता कशी काय आलीस??

क्षमा - बघावं म्हंटलं घर एकदा..

नितु - म्हणजे? पहिल्यांदा बघतीयस ?

क्षमा - नाही नाही.. पाहिलंवतं की आधी..

नितु - मग??

क्षमा - काही नाही.. आज तुझे आई बाबा आले होते म्हणे..

नितु - ए खरच... काय झालं गं? तू होतीस??

क्षमा - नाही बाई.. मी आत्ताच आले..

नितु - पण ... काय झालं काय??

क्षमा - काही नाही.. प्रचंड भांडणं झाली.. अक्षरशः मारामारीपर्यंत वेळ आली... शेवटी आईने मिटवलं...

नितु - क्षमे... एक लगावू का??

क्षमा - बघा... आता खरं सांगायची सोय नाही राहिली...

नितु - चेहरा सांगतोय की तुझा.. काय खरं अन काय खोटंय ते...

क्षमा - मला तरी आईने हेच सांगीतलं.. तुझी आई काय म्हणाली??

नितु - ती म्हणाली... लोक तसे चांगलेत... एकच प्रॉब्लेम आहे...

क्षमा - कुठला गं?????

नितु - म्हणे त्यांची मुलगी वेडी आहे.. तिला फिट बिट येतात..

क्षमा नितुला मारायला धावली. दोघी खिदळत आतल्या खोलीत जाऊन झोंबू लागल्या.

नितु - सो... सो ...ड... सोडं... नालायक...

क्षमा - मला फिट येतात काय??

नितु - ना.... ही.... नाही नाही नाही... सोड...

हासत हासत पलंगावर बसल्यावर काही वेळाने दोघी गंभीर झाल्या.

नितु - खरंच... काय झालं गं?? मला काळ...

क्षम - काळजी वाटते??... कसली काळजी वाटते..

पुन्हा नितु फुरंगटून बसली. नाही तो विषयच काढत होती क्षमा! तिला नितूच्या तोंडून ऐकायचं होतं की उमेशदादाशी तिचं नाही जमलं तर काय याची तिला काळजी वाटत आहे. शेवटी नितु काही बोलेना तशी हासत हासत क्षमा म्हणाली..

क्षमा - सगळं व्यवस्थित झालं डिस्कशन म्हणे.. माझी आई खुष आहे...

नितु - पण... तुझे बाबा??

क्षमा - ह्यॅ! त्यांना आईचेच पटणार...

नितु - क्षमे... पण.. आजोबा गं???

क्षमा - आजोबांच्या मनात ज... रा वेगळंच आहे...

नितु - क... काय????

क्षमा - त्यांचं असं म्हणणं आहे की...

नितु - का SSSS य???

क्षमा - म्हणजे... आत्ता नुसतंच म्हणणं आहे...

नितु - अगं पण काय???

क्षमा - तसं फार मनावर घेतलं नाही तरी चालेल म्हणा...

नितु - क्षमे फटके मिळणारेत तुला... आता बोलतेस की कसं??

क्षमा - आजोबा म्हणाले... हे सगळं... हे सगळं योग्य नाही..

नितु ताडकन उभी राहिली. क्षमाच्या चेहर्‍यावर असीम गांभीर्य होते. निराशा होती. ते पाहून निवेदिताही कोमेजलीच!

हळूहळू क्षमाही उभी राहिली... एकेक पाऊल दाराकडे टाकत बोलू लागली...

क्षमा - आजोबांना नाहीये हे सगळं पसंत..

नितु - प... पण... म्हणजे... का पण??

क्षमा - ते म्हणतात... हे असं... कशात काही नसताना.. नुसतं असं फिरणं वगैरे म्हणजे...

नितु - फिरणं???

आत्तापर्यंत क्षमा दारात पोचलेली होती. चेहरा तसाच गंभीर ठेवूनच! आणि ताडकन मागे वळत तिने निवेदिताकडे पाहिले..

निवेदिताच्या चेहर्‍यावरील गांभीर्य पाहून... आत्तापर्यंत दाबून ठेवलेलं हसू फस्सकन पसरलं क्षमाच्या चेहर्‍यावर..

आणि कुजबुजत्या स्वरात श्वासात हवा भरत ती पटकन म्हणाली..

क्षमा - आजोबा म्हणतात की यांच लग्न करूनच टाका...

नितु तिला फटके मारायला धावणार तेव्हा क्षमा खिदळत खिदळत स्वतःच्या घराच्या दारात पोचलेलीही होती. तिथे जाऊन तिला बडवणं जमणारच नव्हतं नितुला! पण निदान स्वतःच्या दारत तरी उभे राहून दात ओठ खावेत अशी तिची फार फार इच्छा होती... पण तीही पूर्ण झालीच नाही... कारण क्षमाच्या हासण्याच्या आवाजाने त्यांच्या खिडकीचा पडदा अचानक सरकला होता... आणि तिथून उमेश अचंबीत होऊन नितुकडेच पाहात होता...

तो दिवस तसाच गेला आणि दुसर्‍या दिवशी नितु कॉलेजला निघाली तेव्हा उमेश एकदम समोर! गबाळ्यासारखा बनियन आणि टॉवेलवर वगैरे बाहेर आला होता. त्याचे ते ध्यान पाहून निवेदिता सटकली हासत हासत.

उमेशला समजलं! की निवेदितालाही प्रकार समजलेला आहे.

सुखाच्या दिवसांना सुरुवात झाली तर एकदाची!

काल तो प्रकार समजल्यापासून एक धुंद चढलेली होती मनावर! आपण फक्त बी ए पास आहोत आणि नोकरी मिळत नाही याचे दु:ख जाणवेनासे झालेले होते.

सुखाबरोबरच एका निरर्थकतेलाही सुरुवात झालेली होती. शिक्षण इतपत नव्हते की अगदी कुणी बोलावून घ्यावे आणि नोकरीला ठेवावे. वय असे नव्हते की ज्याला परिपक्वता म्हणता येईल. दिनचर्या अशी नव्हती की ज्याचा कुणी आदर्श ठेवणे तर राहोच पण किमान कौतुकही करावे. सकाळी उठायचे, पेपरमधील आवडलेल्या जाहिरातींना पत्राने अर्ज धाडायचे आणि इतक्यात नोकरी नाही मिळाली तरी काहीही फरक पडत नाही अशा सर्वांच्या समजुतीलाच आपलीही समजुत बनवून दिवसभर उंडारायचे.

आयुष्यात काही केले असे म्हणण्याइतके तर वयही नव्हते. नुकते मिसरूड फुटू लागले होते. अशा वयात फक्त पहिली नजरमे प्यार स्वरुपाच्या गोष्टीच घडू शकतात हे मोठ्या माणसांना माहीत असले तरी ते आत्ता उमेशच्या करिअरसंदर्भात स्वतःच फार गंभीर नव्हते.

या आडनिड्या वयात फक्त स्वप्ने बघायचीच असतात. ती सत्यात उतरवण्याच्या दिशेन पहिले पाऊल टाकतानाही कोण अडचणी येतात याची कल्पनाच नसते.

उमेशला अर्थातच हे सगळे समजत नव्हतेच! निवेदिताच्या मोहक विभ्रमांमध्ये आणि काल झालेल्या सुखद प्रकाराच्या आठवणीत तो मश्गुल होता. वास्तवता आत्ता तरी त्याच्यापासून दूर होती आणि फक्त त्याच्या आई वडिलांनाच भेडसावत होती.

आपण पुढे काय होणार आहोत आणि कसे जगणार आहोत याबद्दल उमेशच्या मनात कोणत्याही योजनेने आकार घेतलेला नव्हता. काहीही स्वप्नं नव्हते. नितुच्या स्वप्नांच्या भाउगर्दीमध्ये स्वत:च्या व्यक्तीत्वाला आणि जीवनाच्या मागण्यांना पायदळी तुडवत एकेक क्षण तो जगणार होता आता!

आपल्याला आवडलेल्या व्यक्तीला आपण आवडणे आणि दोघांचे एकमेकांना आवडणे इतरांना मान्य होणे या पातळ्या अती अवघड! नशीबाने आजवर स्वतःचे दोन चार शिंतोडे उडवलेले असताना अचानक एकाच दिवसात इतकी बरसात केली की तिचा आनंद मानण्यासाठी एकाजागी दहा तरी हृदये आवश्यक होती.

सिंहगडावर घडलेला तो प्रसंग! क्षणाक्षणाला उमेशच्या मनात तो प्रसंग नव्याने आठवून पुन्हा तसाच प्रसंग निर्माण करण्याची मागणी करत होता.

पुन्हा घरात आलेल्या उमेशला आता पृथ्वी स्वर्गापेक्षा सुंदर भासत होती. पेपर उघडून त्याने 'पाहिजेत' च्या जाहिराती उत्साहाने वाचल्या.

तीन जाहिराती अशा होत्या की जेथे त्याचे शिक्षण व अजिबात नसलेला अनुभव चालू शकणार होते. भराभरा अर्ज खरडून त्याने पाकीटे तयार केली आणि आंघोळ करून बाहेर पडला.

पोस्टाच्या पेटीत अर्ज टाकून पुढे निघाल्यावर आपोआपच त्याचे पाय गरवारे कॉलेजकडे वळले. चालत चालत अर्ध्या तासाने तो कॉलेजला पोचला तेव्हा रंगीबेरंगी तरुणाईने आवार फुलून गेलेले होते. चैतन्याचे धबधबे ओसंडून वाहत असणार्‍या त्या टवटवीत उमेश कुठे बुडून गेला हे त्याचे त्यालाही समजले नाही. खिदळणार्‍या मुलींचे ग्रूप्स बघताना आबासाहेब गरवारे कॉलेजच्या गंभीर भिंतींनाही स्मितहास्य फुटत होते. शिक्षक आपला चेहरा गंभीर असतो याचा अतीव पश्चात्ताप वाटून पुस्तक घेऊन खालमानेने इकडून तिकडे जात होते. मुलांमध्ये महाबळेश्वरला आल्यासारखा उत्साह होता. आणि उमेश शोध घेत होता एका चेहर्‍याचा!

निसर्गरम्य मुलायम रस्त्यावरून वेगात जात असताना एक वळण यावे आणि वळल्यानंतर अचानक समोर फुलांचा सडा पडलेला दिसावा तसा तो ग्रूप त्याच्यासमोर आला आणि इतर मुली चालतच राहिल्या असल्या तरी एक मुलगी स्तब्धपणे खिळून उभी राहिली.

"तू?"

तुम आगये हो नूर आगया है!

निवेदिताचा तो प्रश्न विचारताना झालेला कौतुकमिश्रीत आणि कुतुहल मिश्रीत आनंदी चेहरा पाहून आपण कॉलेजला येण्यात चूक केली नाही याचे समाधान वाटले उमेशला!

आता बाकीच्या मुलीही थांबल्या आणि मागे वळून या दोघांकडे पाहू लागल्या. उमेशसारख्या सामान्य मुलाचे नशीब इतके फळफळलेले पाहून गरवारे कॉलेजमधील काही तहहयात रोमिओंचा जळफळाट फक्त त्यांनाच स्वतःला समजू शकला.

"सहज इकडून चाललो होतो... म्हंटलं आहेस का बघावं"

उमेशच्या या खोटे बोलण्याचा प्रचंड आनंद झाला होता नितुला!

"लेक्चर आहे आत्ता... "

"कसलं??"

या प्रश्नाला काहीही अर्थ नव्हता. कसलंही लेक्चर असलं तरीही नितु लेक्चरला जाणारच होती इतके उमेशलाही समजले.

"जाऊ मी??"

म्हणजे काय? मी इतका आलोय इथे तुला भेटायला आणि सरळ निघालीस? इतके प्रश्न विचारण्याची हिम्मत नव्हतीच त्याची!

"हं... चल मग निघतो मी..."

उमेश काहीसा चिडला असावा असे वाटून दोन पावले पुढे निघालेली निवेदिता थांबली अन म्हणाली..

"तासभर थांबता येईल??"

आपण काय उत्तर द्यावे याचा विचारही न करता उमेश 'हो' म्हणाला...

आणि सव्वा तासाने निवेदिता, तिची मैत्रिण आरती आणि उमेश शेट्टीच्या कॅन्टीनमधला काही वेळा उकळलेला चहा भुरकून अबोलपणे बसलेले होते.

"ही आरती..."

"हॅलो, मी उमेश.. आम्ही एकाच वाड्यात राहतो... "

"हाय"

आरतीच्या चेहर्‍यावर मिश्कील भाव आलेले पाहून नितु खिडकीतून बाहेर बघून तो प्रसंग टळायची वाट पाहू लागली तर उमेशने बावचळून मान खाली घातली.

काही वेळाने एका अत्यंत अरसिक वेटरने एक इंच बाय इंच अशा चौरसाकृती कागदाचा तुकडा टेबलवर आपटला.

२.२५

पंचाहत्तर पैशाला चहा होता तेव्हा! उमेशने पटकन पैसे काढले.

"ए चल मी निघते गं"

आरती उठली तशी निवेदिता म्हणाली..

"तू घरीच चाललीयस ना?"

"हो?.. तू बस पुढच्या लेक्चरला.. आमच्याकडे आज फन्क्शन आहे"

फन्क्शन हा उल्लेख आरतीने उम्याकडे पाहून केला असल्याने त्याला आपोआपच विचारावं लागलं..

"कसलं??"

"इन्टरकॉलेजला मी पहिली आले म्हणून.."

"कशात??"

"डिबेट.. "

"कॉमर्सला असून डिबेटिंगची हॉबी म्हणजे... नवलच आहे.."

उम्याने केलेल्या स्तुतीमुळे आरती तिथल्यातिथे मोहरली अन म्हणाली...

"नितु, यालाही घेऊन ये ना??"

"तो काय पहिलीत आहे?? मी घेऊन यायला??"

खळखळून हासत आरतीने नितुला चिमटा काढला. निवेदिता म्हणाली..

"तू चाललीच आहेस तर याच्याचबरोबर जा... हाही तिकडेच चाललाय.."

काहीही कारण नसताना उमेश आणि आरती एकमेकांना पॅरलल सायकल चालवत डेक्कनवरून बालगंधर्वकडे जात होते. आरती काही काही माहिती सांगत होती आणि उमेश आठवत होता निवेदिताचा चेहरा! आणि आनंद मानत होता की खास त्याच्यासाठी ती कॅन्टीनला येऊन बसली याचा!

निवेदिताबरोबर संध्याकाळी आरतीकडे जायला मिळेल या उद्देशाने उमेशने ठरवले की संध्याकाळी आरतीकडे जायचेच!

आपण काय करत आहोत हे त्याला माहीत असते तर त्याने हा निर्णय घेतला नसता.

मात्र घरी परतल्यानंतर त्याच्या आईने त्याला स्पष्ट नकार दिला... आत्तापासून नितुबरोबर फिरायचे नाही.. अजून कशात काही नाही.... आधी नोकरी शोधा.. जरा कमवायची अक्कल येऊदेत... मग मुलींशी मैत्री करा..

पुरता पोपट झाल्यामुळे उमेशला हेही सांगता येईना निवेदिताला की तो आज येऊ शकत नाही. आणि निवेदिताला त्याच्या येण्याची अपेक्षाही नव्हतीच!

ती आपली गेली आरतीकडे! आणि रात्री दहा वाजता आरती आणि तिचा भाऊ नितुला सोडायला आले तेव्हा आरतीने विचारले की उमेश कुठे राहतो. उम्या खिडकीतून हळूच पाहात होता. नितुने तिला त्याचे घर दाखवलेले पाहून आणि दिवे बंद असलेले पाहून आरती भावाबरोबर निघून गेली. नितुच्या बाबांनी नितुला 'केवढा उशीर' अशी नापसंती व्यक्त करून घरात घेतलेले उम्याने पाहिले आणि आता त्याच्या कुतुहलाने परमावधी गाठली. काल रात्री ती दिसलीच नव्हती. आज रात्री??????

आज रात्री काय होणार???

आजोबा मधूनच खोकत होते.

नितुच्या खोलीतला लाईट लागला. पडदा लावलेला असल्यामुळे आतले काहीच दिसत नव्हते उम्याला! पण तो झोपल्याचे सोंग करून खिडकीतून बाहेर बघत होता आपला!

मधेच कसलीही अपेक्षा नसताना आजोबांचा आवाज आला हळुवार!

"खिडकी लोटून घे रे जरा?? फार गार हवा येतीय..."

उम्याने वैतागून आजोबांच्या अंगावर आणखीन एक पांघरूण टाकले अन म्हणाला की त्याला उकडतंय म्हणून खिडकी उघडीच राहूदेत...

आता यावर गप्प बसतील ते आजोबा कसले...

"नैन लडगयी है.. मनवामां कसक होई जे करी... "

शेवटी प्रचंड वैतागून उम्याने अर्धी खिडकी लोटून घेतली आणि अर्धी तशीच ठेवली ज्यायोगे त्याला तिची खिडकी आणि तिला तो दिसू शकेल.

उम्याला हे समजत नव्हते की आजोबा नावाचा प्रकार आपल्या बाजूने आहे का आपली थट्टा करतोय!

दहा मिनिटांनी समोरच्या खोलीतला दिवा बंद झाला.

सगळा विषयच संपला! निराश मनाने उम्या आता नुसताच अंधाराकडे पाहात बसला.

आणि..... आणि जवळपास दहा पंधरा मिनिटे झाली असतील.... हळूहळू पडदा सरकल्याचे वाड्याच्या चौकातील एका मरणासन्न अवस्थतेतील बल्बच्या प्रकाशात उम्याला जाणवले...

चमकुन उम्या पाहू लागला...

... डोळ्यांच्या पापण्या लवल्या तर फाशी चढवू असा कायदा असल्याप्रमाणे डोळे ताणून बघत राहिला.. मग एक चंद्रकोर उगवली खिडकीत... पुनवेपर्यंत चंद्राचा विकास होतो तशी ती चंद्रकोर हळूहळू विस्तारत गेली.. तिला एक चेहर्‍याचा आकार मिळाला...

गच्च अंधारात लख्ख विजेसारखा भास झाला... काही वेळाने तो चंद्र अचानकच मावळला..

उम्या पुन्हा निराश झाला.. पण आता एक मात्र झालेले होते.. तो स्वतः मात्र झोप येईपर्यंत खिडकीकडे बघतच राहणार होता...

आणि... त्याचा खरच फायदा झाला..

कधीतरी रात्री अकरा वाजता सगळी कसबा पेठ काळोखात अदृष्य झालेली असताना लाईट लागला नितुच्या खोलीतला..

उमेश अर्धवट उठूनच बसला.. कारण अर्धवट उघडलेल्या तिच्या पडद्यातून आता मधूनच तिची झलक दिसतही होती...

काय करत होती कुणास ठाऊक ती??

आणि दिसलं! ती काय करत होती ते!

ए फोर साईझच्या एका मोठ्या कागदावर मोठ्ठ्या अक्षरात तिने लिहिले होते...

"झोप की आता"

एवढ्या लांबून त्याला ते नीट दिसावे म्हणून स्केचपेनने मोठ्ठेच्या मोठ्ठे लिहिले होते..

तो कागद हातात घेऊन ती मागच्या भिंतीला चिकटून उभी होती... आता ती फक्त उमेशलाच दिसू शकत होती आणि जागे झालेच तर उम्याच्या आजोबांना!

उमेश मात्र तिला नीटसा दिसत नसावा कारण त्याच्या खोलीत अंधार होता....

उमेशला दिसले मात्र खरे ते!

आता हिला उत्तर कसे द्यावे हे काही उम्याला कळत नव्हते. दिवा लावला तर सरळ सरळ आजोबा उठूनच बसले असते. आणि ते मागच्या भिंतीपाशी झोपत असल्यामुळे निवेदितासारखे त्यांच्या भिंतीपाशी उभेही राहता येणार नव्हते. आजोबा उद्यापासून बाहेर कसे झोपतील यावर विचार करण्यातही अर्थ नव्हताच. कारण ते चौघे बाहेर आणि हा बादशहा एकटा आत असे होणेच शक्य नव्हते. आजोबांना रात्री झोपायच्या आधी पाण्यातून अफू वगैरे द्यावी की काय असाही विचार उम्याच्या मनाला चाटून गेला.

आपल्या वडिलांनी रास्ते वाड्यातल्या तीन खोल्या भाड्याने घेतल्या असत्या तर काही बिघडले असते का हा प्रश्न उम्याच्या मनात आत्ता या क्षणी आला. डोळे फाडून तो न हालणार्‍या नितुकडे पाहात होता. तिला हे माहीत होतं की तो बघतोय, पण तो तिल नीटसा दिसत मात्र नव्हता. उम्याचा रंग काही तिच्यासारखा नव्हता. तो होता एक सावळा मुलगा!

शेवटी उम्याने हिय्या केलाच! आजोबा उठले तर उठले! अभ्यास करतोय म्हणून थाप मारावी.

उठून त्याने सरळ दिवाच लावला. आजोबांची पाठ होती! म्हणजे त्यांच्या भिंतीकडे त्यांचे तोंड होते आणि खिडकीकडे पाठ!

उम्याने पटकन एका तशाच मोठ्या कागदावर "आधी तू झोप" असे खरडले. मग बावळटाला समजले की हे बरेच मोठ्या अक्षरात लिहायला हवे. मग ते खोडून तेथे मोठ्या अक्षरात लिहीले आणि आजोबांना चाहुल तर लागत नाही ना याची प्रचंड काळजी घेत तो खिडकीत आला तर???

च्यायला दिवाच बंद झाला होता तिकडचा!

तरी त्याने कसाबसा तो कागद धरलाच हातात! काही सेकंद धरल्यानंतर पुन्हा दिवा लागला तेव्हा नितु तिथेच उभी होती. म्हणजे ती दिवा बंद करून पलंगावर न झोपता तशीच अंधारात उभी होती. आता ती काही सेकंद दिसेनाशी झाली आणि पुनह दिसली तेव्हा तिच्या हातात दुसरा कागद होता.

"नाही.. आधी तू झोप"

"शक्य नाही, आधी तू"

असे उत्तर काहीच सेकंदात उम्याने तिला लिहून दाखवले. नितुने तिकडे स्वतःच्या कपाळावर हात मारून कौतुकमिश्रीत वैताग व्यक्त केला. तस्स्स्स्से उभे राहिले काही वेळ दोघेही, आपापल्या खोलीतले दिवे बंद करून!

शेवटी पुन्हा नितुने दिवा लावला. यावेळेस तिच्या हातात कागद होता आणि त्यावर लिहिलेले होते.

"शेवटचा कागद, मी झोपतीय"

ठरले! उद्या भरपूर कागद आणून ठेवले पाहिजेत! दुसरा पर्यायच नाही.

माधुर्याच्या लाटांनी भिजत भिजत एक रात्र सुरू झाली होती. आयुष्यातील ती अशी पहिलीच रात्र होती, की जी संपू नये असे वाटत होते दोघांनाही!

किती वेळ झाला कुणास ठाऊक! पण बराच वेळ झालेला असावा. पुन्हा दिवा????

चक्रावून उम्या पुन्हा अर्धवट उठून उभा राहिला.

"खरंच शेवटचा कागद, उद्या भेटू"

यांनी स्वतःचे उत्तर लगेच लिहीलेच!

"तू झोप, मी जागाच"

त्यानंतर पुन्हा शांतता पसरली. दोन्हीकडचे दिवे बंद!

अचानक दचकलाच उम्या!

आजोबांनी वाक्य टाकले होते.

"पाटी पेन्सिल आणा की त्यापेक्षा???"

ही व्यक्ती उद्यापासून येथे झोपणे आपल्या प्रेमासाठी हानिकारक आहे हे उम्याला आता पूर्ण कळले. हे आता नितुला कधी आणि कसे कळवायचे या विचारात असताना कधीतरी चक्रमाला झोप लागली.

सकाळी जाग आली तेव्हा कशाने जाग आली हेच कळले नाही. कुणीतरी हाका मारत सुटले होते. साडे आठ??? आपण एवढे झोपलो??? तसेच केस अस्ताव्यस्त घेऊन उम्या उठून बाहेरच्या खोलीत आला तर दारातून बाहेर पाहिल्यावर दचकलाच!

निवेदिताबरोबर क्षमा होती आणि तीच त्याला हाका मारत होती दादा दादा करून!

खूप चिडल्यासारखा अभिनय करत आणि जरा केस बरे'बिरे' करत तो दारात आला. ध्यान दिसत होता. पण दारात आला तेव्हा त्याला पुढचा धक्का बसला. आपली सायकल घेऊन आरती तिथे आली होती. नितुला म्हणत होती की आता रोज आपण बरोबरच कॉलेजला जाऊयात!

आणि क्षमा उमेशला एक कागद देत होती.

"दादा.. हिच्या ज्या भाषणाला बक्षिस मिळालं ते तिने लिहून आणलंय वाचायला....... घे.. "

प्रॉब्लेम काहीच नव्हता. नितुच्या मैत्रिणीचे ते बक्षीसपात्र भाषण वाचण्यात काय हरकत होती?....... पण तरीही क्षमाचा....... आणि त्याहून बाहेरच चहा पीत बसलेल्या आजोबांचा... आणि त्याहीहून नितुचा चेहरा पडलेला होता...

कारण... ते भाषण ज्यावर लिहीलेलं होतं...

.... तो कागद गुलाबी रंगाचा होता..

गुलमोहर: 

प्रेमाचा त्रिकोण...............................

.................................................

कही पे निगाहें कही पे निशाना..............

वा

मस्त मजा आली..............

पहला पहला प्यार है................
....................................
....................................
.................पहली पहली बार है