फोटोग्राफी: कॅमेर्‍याची काळजी भाग २

Submitted by सावली on 10 June, 2010 - 23:02

आपण कॅमेरा सर्वसाधारणपणे वापरतो तो पिकनिक किवा घरातले फोटो काढण्यासाठी. जेव्हा बाहेर कॅमेरा नेतो तेव्हा काही वेळा थोडी काळजी घेतली तर कॅमेऱ्याचे आयुष्य बऱ्यापैकी वाढते.
हि विशिष्ट काळजी घ्यायची ठिकाण म्हणजे समुद्रकिनारे, धबधबे, नदीकिनारे, वाळवंट / वाळू असलेले भाग,अतिशय थंड किवा अतिशय गरम ठिकाणे. हे म्हणजे जवळपास बऱ्याच पिकनिकच्या जागा.
तुम्ही नक्की म्हणत असाल कि मग काय कॅमेरा बाहेर न्यायलाच नको कि काय. पण जरा काही गोष्टी लक्षात ठेवल्या तरी पुरेत आपल्या कॅमेऱ्याची काळजी घ्यायला.

समुद्रकिनारे, नदीकिनारे , वाळवंट / वाळू असलेले भाग:
इथे कॅमेऱ्याला खारट हवा, खारट पाणी आणी वाळू या तिन्ही गोष्टींचा सामना करायला लागतो. या तिन्ही गोष्टीं कॅमेऱ्यासाठी वाईटच.
वाळूमुळे कॅमेऱ्याच्या लेन्सला, सेन्सरला चरे पडू शकतात. हि बारीक वाळू अडकून कॅमेऱ्याच्या मेकॅनिझम मध्ये बिघाड होऊ शकतो. म्हणजे शटर अडकणे वैगरे होऊ शकते.
म्हणून कुठलाही कॅमेरा सरळ वाळूत खाली न ठेवणे हि अगदी महत्वाची गोष्ट. एस एल आर कॅमेरा असेल तर लेन्स बदलताना अगदी उघड्यावर आणी वाऱ्याच्या दिशेला उभ राहून न करता आडोसा बघुन वारा येणार नाही अशा ठिकाणी बदलावी. म्हणजे वाळूचे कण आत जाणार नाहीत. इथे लेन्स वर यूव्ही फिल्टर लावला तर चांगल म्हणजे लेन्सच्या पुढच्या भागावर चरे पडणार नाहीत.समुद्रकिनाऱ्यावरच्या फोटोग्राफी साठी आणखीही उपयोगी फिल्टर आहेत पण ते आपण नंतर केव्हातरी बघू. तो बराच मोठा विषय आहे.
शक्यतो कुठल्याही कॅमेऱ्यावर समुद्राचे पाणी उडू देऊ नये. उडले तर लगेच पुसून शक्यतो प्यायच पाणी मऊ कापडावर टाकून त्याने कॅमेरा हलकेच पुसून घ्यावा, मग क्लिनिंग लीक्विडने पुसावा. समुद्राचे पाणी खारट असल्याने ते सुकले कि क्षार (salts) जमा होतात.हे कॅमेऱ्यासाठी किवा इतर कुठल्याही इलेक्ट्रोनिक वस्तूंसाठी अतिशय खराब.
पण समजा तुमचा कॅमेरा समुद्राच्या पाण्यात अगदी पडलाच आणि अगदी पूर्ण बुडालाच तर काय कराल? सगळ्यात आधी उचलून घाईने जमेल तितक्या लवकर त्याची बॅटरी काढून टाका. मग त्याला तसाच नेऊन अजिबात न सुकवता साध्या पाण्यात बुडवा नाहीतर नळाखाली धरा (पाण्याची धार हळू ठेवा). साध्या पाण्याने सगळे क्षार निघून जातील. नंतर तो कॅमेरा स्वच्छ मऊ कापडाने पुसून कोरडा करा. लेन्स काढून आत पाणी गेलय का ते पण बघा. आत असलेल पाणीसुद्धा पुसा पण सेन्सर किंवा शटरला हात आणि कापड लावू नका. कापडाचे सूक्ष्म धागे सेन्सरला चिकटतात आणि शटर मध्ये अडकू शकता. मग कॅमेरा कॅप लावून कोरडा करायला ठेवा. चालू करून बघायची अजिबात घाई करू नका निदान चार पाच दिवस तरी. एवढे झाले कि, लवकरात लवकर (अगदी त्याच दिवशी वैगेरे गेलं नाहीत तरी चालेल, ट्रीपवरून घरी गेलात कि मग गेलात तरी चालेल) सर्विस सेंटर मध्ये घेऊन जा. कॅमेरा चालू झाला असला तरी एकदा चेक करून घ्या.

धबधबे , बोटिंग करताना:
धबधब्याजवळ जाताना, किंवा बोटिंग करताना एकदोन साध्या प्लेस्टिकच्या पिशव्या नक्की जवळ बाळगा. पिशवीला खालच्या बंद टोकाला एक मोठ भोक पाडा, ज्यातून लेन्सचा पुढचा भाग जरासा बाहेर येईल. मग कॅमेरा पिशवीत घालून भोकातून लेन्सचा काही बाहेर काढा. आता पिशवीच्या मोकळ्या भागातून तुम्हाला व्ह्यू फाईंडर दिसेल, पण कॅमेऱ्यावर पटकन पाणी पडणार नाही. (फोटो खाली दिले अाहेत.)
अशाच प्रकारे अगदी हलक्या पावसात किंवा डोंगरांवर ढगांतून चालतानापण अशी पिशवी वापरता येते.
इथेही कॅमेरा ओल्याजागी वैगरे ठेवू नका.

पिशवीला खालच्या बंद टोकाला एक मोठ भोक पाडा / कापा.


कॅमेरा पिशवीत घालून भोकातून लेन्सचा काही बाहेर काढा.


पिशवीच्या मोकळ्या भागातून तुम्हाला व्ह्यू फाईंडर दिसेल.

अतिशय थंड ठिकाणे:
म्हणजे अगदी बर्फ असणारी ठिकाणे. या ठिकाणी सहसा बॅटरी लवकर संपते म्हणून जास्तीची बॅटरी किंवा चार्जर घेऊन जायला हवाच.
पुन्हा अशा ठिकाणी जी रेस्टोरंट वैगेरे असतात तिथे हिटर लावून अगदी उबदार केलं असतं.तुम्ही बाहेर फोटो काढलेत आणि तसाच हातात कॅमेरा धरून आत गेलात कि कॅमेऱ्यावर बाष्पं (Condensation) जमतं. आणि काच धुसर दिसायला लागते. हे बाष्प कॅमेऱ्याच्या आतल्या बाजूलापण जमू शकत. त्यामुळे कॅमेरा खराब होऊ शकतो किंवा तात्पुरता बंद पडू शकतो. लेन्स वरच बाष्प पुसल तरी थोडावेळ थांब्ल्यावरच कमी होतं.
हे होऊ नये म्हणूनपण एकदोन साध्या प्लेस्टिकच्या पिशव्या ठेवाव्या. तुम्ही आत जायच्या आधीच कॅमेरा या पिशवीत ठेवून पिशवी बंद करून मग आत जावे. यामुळे कॅमेऱ्यावर बाष्पं जमत नाही.

अतिशय गरम ठिकाणे:
या अशा ठिकाणीही बॅटरी लवकर संपते म्हणून जास्तीची बॅटरी किंवा चार्जर घेऊन जायला हवाच.
तुम्ही सगळ्यांनीच लहानपणी भिंगाने कापूस जाळायचा प्रयोग केला असाल. कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये अशी अनेक भिंगे एकत्र ठेवलेली असतात. त्यामुळे बाहेर उन्हात तसाच ठेवणार असलात तर लेन्स काढून / कॅप लावून ठेवा. नाहीतर आत ऊन जाऊन शटर / सेन्सर अति उष्णतेने जळू किंवा खराब होऊ शकतो. कॅमेऱ्यावर टॉवेल वैगेरे झाकलात तरी बर होईल.
फोटो काढत नसाल तेव्हा कॅमेरा बॅगेत ठेवा.
फोटो काढताना स्वत: शक्यतो एखादी कॅप घाला. यामुळे तुम्ही कॅमेऱ्यातून बघताना व्ह्यू फाईंडरवर किंवा डिजीटल कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर सावली पडेल आणि दृश्य नीट दिसेल.

आता कॅमेरा प्रवासातून नेण्याबद्द्ल एक दोन गोष्टी:
शक्यतो कॅमेऱ्यासाठी असलेली बॅग वापरा. याला नीट कुशानिंग असते.
खूप लांबचा किंवा खराब रस्त्यांवरचा प्रवास असेल तर एसएलआर कॅमेऱ्याची लेन्स काढून, लेन्स आणि कॅमेर्याला कॅप लावून वेगळी ठेवा. खूप हलल्यामुळे किंवा धक्के बसल्याने कॅमेरा ते लेन्सची जोडणी (camera mount) खराब होऊ शकते. किंवा बॅग खूप आपटली तर कॅमेऱ्याला लावलेली लेन्स तुटू सुद्धा शकते.
चेक इन बॅगेत कॅमेरा टाकू नका. डीजीकॅम वैगेरे छोटे कॅमेरे चालतील पण एसएलआर नाही.
क्लिनिंग किट,ब्लोअर नेहेमी जवळ ठेवा.

आधिचा भाग इथे पहा फोटोग्राफी: कॅमेर्‍याची काळजी

http://prakashraan.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती.

एक सुचना: पुढचा भाग लिहिताना त्यात अगोदरच्या भागांची लिंक दिल्यास आमच्यासारख्या आळशी लोकांची सोय होते Wink

पण समजा तुमचा कॅमेरा समुद्राच्या पाण्यात अगदी पडलाच आणि अगदी पूर्ण बुडालाच तर काय कराल>>> हे राम !

हाही भाग छान झाला आहे स्वप्नाली. विशेष म्हणजे सोप्या मराठीत. नायतर फोटूग्राफरलोकु पदार्थविज्ञानात लै शिरतात. Happy

सावली, बघ तुझ्या सुप्तगुणांना (म्हणजे लेखन म्हणायचंय) आमच्यामुळे वाव मिळाला कां गं?(हो की नाही गं रैना?) Wink

खूपच महत्त्वाची माहिती टाकतेयस तू त्यासाठी परत खूप खूप अरिगातो. सो कीप इट अप.

अाडो खरच हो. Happy धन्यवाद दोघींना. नाहितर मी हे लिहायचा विचारच केला नसता.
पण या लेखात लेखनमुल्य अस कााहि नाही, नुसतिच माहिती. ती अजुन रंजक व्हायला काहितारि करायलाा हव। पण काय ते माहित नाहि. तुम्हाला काहि सुचल तर सांगा.

सावली, खूप उपयुक्त, छान व सोप्या भाषेतील माहिती! Happy

माहिती अजून रंजक करायची आहे? मग वेगवेगळे प्रसंग टाक.... जिथे अश्या प्रकारच्या शक्यता उद्भवतात की कॅमेरा धोक्यात येतो.... किंवा अश्या परिस्थितीत हमखास ऐकू येणारे संवाद टाक! Wink ''तरी मी तुला सांगितलं होतं'' टाईप! किंवा आयत्या वेळी काय काय दिव्य करायला लागतात कॅमेरादेवतेला सांभाळायला ते सांग! मजा येईल वाचताना!

वाव... पाण्यापासुन संरक्षण करण्यासाठी प्लॅस्टिक च्या पिशवीची कल्पना फारच आवडली. खुपच प्रॅक्टिकल...