चिंब

Submitted by अज्ञात on 5 June, 2011 - 09:05

रानमाळी पावसाळी चिंब ओली पाकळी
झाडपानी निथळणार्‍या चाहुलींच्या थेंबओळी
मृत्तिकेच्या गर्भदेही अत्तरे घनबावळी
रोमरोमांचा फुलोरा रासक्रीडा सावळी

आडमेघांपलिकडे आतूर किरणे कोवळी
सावलीच्या पाउली उमले कळी कळि वेगळी
ओघळे मन ओघळांवर श्वास भरती पोकळी
बंड काळिजपाखरांना पापणीकड मोकळी

रम्य निर्मळ स्फटिकधारा जात त्यांची सोवळी
स्पर्श होताक्षण धरेचा अर्घ्यमुद्रा ओवळी
वाहतांना नांदती काठावरी स्वप्नावळी
जीवनी ही सृजनतेची एक मोठी साखळी

...........................अज्ञात

गुलमोहर: 

मृत्तिकेच्या गर्भदेही अत्तरे घनबावळी
रोमरोमांचा फुलोरा रासक्रीडा सावळी

ओघळे मन ओघळांवर श्वास भरती पोकळी
बंड काळिजपाखरांना पापणीकड मोकळी
>>>

सुरेखच !

अत्यंत सुरेख रचना, सौंदर्यपुर्ण आशय आणि समर्पक प्रतिमा.

कालगंगा ना ? मग थेंबओळी ?

आवडली.
रम्य निर्मळ स्फटिकधारा जात त्यांची सोवळी
स्पर्श होताक्षण धरेचा अर्घ्यमुद्रा ओवळी
>>
खासच. कुठेच ओढुनताणुन जोडल्यासारखी वाटत नाही. सहज सोपी आणि मस्त जमलीय. पुलेशु Happy

बंड काळिजपाखरांना पापणीकड मोकळी......

किती चपखल शब्दांत भावना व्यक्त झाली आहे!
कविता फारच आवडली... धन्यवाद !

Pages