तुम्हे याद हो के न याद हो - ८

Submitted by बेफ़िकीर on 11 June, 2011 - 05:55

मी माझ्या सदस्यत्वाचे नांव बदलले तेव्हा कोणीतरी ते नांव घेतले. म्हणून मी माझ्या मूळ नावाने एक आय डी तयार करून ठेवला व चुकून हा भाग त्या नावाने प्रकाशित झाला. आता 'बेफिकीर' याच नावाने प्रकाशित करत आहे.

-------------------------------------------------------------------------------------------

"नीतू... मी भाजी घेऊन येते... अभ्यासाला बस..."

"होSSSSSSयSSSS... "

एक नित्याचा चिडका स्वर!

आणि आई भाजी घ्यायला जाताच निवेदिताने आतून कडी लावून घेतली आणि आरशासमोर स्वतःला सादर केले. आजच सकाळी तिने उमेशला बाहेर भेटून खूप खूप रागावून घेतले होते की काल तिला जखमेबद्दल काहीही न सांगताच तो चालत राहिला. तिच्या त्या रागवण्याचे कोण कौतुक उमेशच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहात होते आणि ते कौतुक पाहून तिला आणखीनच कौतुक वाटत होते.

रास्ते वाड्याने ही प्रेमकहाणी माहीतच नसल्यामुळे पूर्ण शांतता पाळलेली होती व नित्याचेच व्यवहार चाललेले होते.

दुपारी चार वाजता आई भाजी घ्यायला बाहेर पडली आणि नुकतीच वामकुक्षी घेऊन उठलेल्या नीतूने आतून कडी लावली व ती कपाटातील भल्या मोठ्या आरशासमोर उभी राहिली.

बरेच क्षण स्वतःच्या ओठांचे निरीक्षण केले. मग आरशाला चिकटली. पुन्हा पटकन लांब झाली आणि एकदा आतली कडी लागलीय ना हे पाहून आली. खिडक्यांचे पडदेही लावलेलेच होते, पण तेही एकदा चेक केले.

मग पुन्हा आरशासमोर उभी राहिली. मग उमेशच्या शैलीत स्वतःच्याच प्रतिबिंबाला म्हणाली..

"मी कधीही पुन्हा असे काहीही म्हणणार नाही... जे काही मी इथे बोललो... ते याच स्पॉटला विसरून जा... प्लीज.."

हे वाक्य बोलून पटकन प्रतिबिंबाकडे पाठ फिरवून स्वतःशीच लाजली. काही क्षण तशीच खुसखुसत उभी राहिली. मग थोडे थोडे धाडस करून पुन्हा आरश्याकडे वळली.

मग धीर धरून स्वतःच काल बोललेले वाक्य पुन्हा तोंडातल्या तोंडात पुटपुटली.

"मी.. मला.. रागबिग नाही आला... मलाही... मलाही.. तुझ्याचसाठी यायचं होतं......."

आणि क्षणभर प्रतिबिंबाकडे बघत राहिली. आणि पुढच्याच क्षणी आवेगाने प्रतिबिंबाच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवले. पण काचेच्या त्या स्पर्शानेही तिला उमेशच्याच ओठांची आठवण झाली तशी चरकून मागे वळली. इकडे तिकडे पाहिले. आणि तोंडावर हात ठेवून हासत हासत आतल्या खोलीतल्या पलंगावर जाऊन लोळली.

हळूच दोन बोटांनी पडदा किंचित सरकवून किलकिल्या जागेतून पलीकडे पाहिले. उमेश खिडकीत नव्हताच. 'भावी सासूबाई' काहीतरी करत होत्या.

हे घर आपल्यासाठी कसे काय आहे याचा काही क्षण तिने विचार केला. एक मस्त, खुसखुशीत विनोद करणारे मिश्कील स्वभावाचे आणि सतत चहा मागणारे आजोबा! सासरे एकदम गंभीर आणि कामाशी काम असलेले! सासूबाई घरकामात वैतागलेल्या असल्या तरी प्रेमळ! आणि नणंद मैत्रिणीसारखी! व्वा! दोनच खोल्या, पण छान ठेवलेल्या आणि राहणीमान आपल्यासारखेच!

चार पावले चालले की सासर! सासरी वैताग आला अन चार पावले इकडे आले की माहेर!

आणि भावी नवरा? तो, जो आपल्याला आवडला आहे, पहिल्या दिवसापासूनच!

अँ??

कडी वाजली? आई आलीसुद्धा इतक्यात??

अभ्यासाचा अभिनय म्हणून एक पुस्तक हातात घेत निवेदिताने दार उघडले तर आई आणि बाबा दोघेही!

"बाबा??? आलात??"

"मग काय माझं भूत आलंय??"

आपटे काकांनी नेहमिच्या मिश्कीलपणे विचारलं आणि लटके फुरंगटून निवेदिताने त्यांच्या हातातील एक बॅग घेतली आणि आत गेली.

आईला बाबा रिक्षेतून उतरताना दिसल्यामुळे ती तशीच घरी आली होती भाजी न आणताच!

आईने चहा टाकला आणि निवेदिताला चिक्की दिसली लोणावळ्याची! ती तिने फोडून तिघांमध्ये वाटली.

बाबा एक दिवस आधीच परत आल्याचा आनंद दोघींच्या चेहर्‍यावर होताच!

आईने विचारले.

"काम आजच झालं वाटतं! "

"हं... दुसरं काम निघालं.. म्हणून तिथलं काम लवकर संपवलं आणि आलो.. "

"दुसरं कुठलं काम??"

"सांगतो.. जरा चहाबिहा होऊदेत.. नीतू.. पेपर दे आजचा.. "

निवेदिताने पेपर आणून दिला तसे आपटे काका पेपर वाचू लागले.

"काय काम काय होतं पण लोणावळ्याला?? "

आईने पुन्हा विचारलं!

"काय सांगायचं आता.. हल्ली पर्यटनाच्या जगी मवाली लोक येतात.. नाही नाही ते गैरप्रकार चाललेले असतात.. लोणावळा, माथेरान, पुणे... सगळीकडेच... त्यावर मीटिंग होती... की अशा ठिकाणी काय व्यवस्था पाहिजे... "

"मग काय झालं??"

"चाललाय विचार.. मी आलो निघून.. "

"हो पण हे प्रकार मुळात सुरू कसे झाले??"

"प्रेमं बिमं बसतात ना हल्ली लहान वयातच..."

आपटे काकांचा मिश्कीलपणा अजूनही तसाच होता. मात्र हे संवाद ऐकून आत अभ्यासाला बसलेली निवेदिता खुदकन हासली. कालच आपणही सिंहगडावर एक गैरप्रकार केलेला आहे हे तिला आठवले. हे गुपीत तिचे आणि उमेशचेच होते. त्या गुपीताची आठवण येऊन ती हासली.

चहा वगैरे झाल्यावर आपटे काका आत आले आणि त्यांना आडवे होण्यासाठी जागा द्यायला नीतु उठली आणि खुर्चीवर बसली.

"नीतु.. एक मिनिट इथेच बस.."

नीतु बाबांच्या शेजारी बसली आणि आई खुर्चीवर!

आणि आत्तापर्यंत स्वरांमध्ये असलेला सर्व मिश्कीलपणा जाऊन त्या जागी खास पोलिसी खाक्याचा आवाज आला.

"कोण होता तो???"

चपापल्याच दोघीही! सर्रकन नीतुचा चेहरा उतरला. प्रचंड घाबरून तिने कसेबसे विचारले.

"... कोण??"

खाड!

वयात आलेल्या मुलीला आजवर लहानपणीसुद्धा कधी मारले नव्हते वडिलांनी! पण आज एकच खणखणीत थप्पड तिच्या गालावर बसली. क्रोधाने तांबडेलाल झालेले होते आपटे काका! निवेदिताला ओरडतासुद्धा आले नाही. ती बसल्याजागीच पलंगावर आडवी झाली. गालावर पाचपैकी चार बोटे उमटलेली होती.

तो प्रकार पाहून हादरलेली आई तिथे धावली. तिने पहिल्यांदा आपटेंना गदागदा हालवून ओरडत विचारले.

"एवढ्या मोठ्या मुलीला मारतात का?? काय करताय तुम्ही?"

पोलिसी खाक्याच तो! आपटेंनी तिला ढकलले आणि बाहेर वाड्यात आवाज जाऊ नये म्हणून घुसमटत्या आवाजात म्हणाले..

"पहिल्यांदा तिने काल काय केलं आहे ते विचार.. आणि मुलीला सांभाळता येत नसेल तर मी माझ्या डिपार्टमेन्टची माणसं लावतो.. तू फक्त स्वयंपाकघर बघत बस... लाज वाटत नाही तिला सिंहगडावर सोडताना एकटीला???"

संपलेलं होतं सगळं! सगळंच्या सगळं संपलेलं होतं!

बाबांकडे पाहताना नखशिखांत घाबरून थरथरा काप असलेली निवेदिता हळूहळू उठून बसली. गालावर अजून तिचा एक हात तसाच होता. डोळ्यातून सरी लागलेल्या होत्या. पण रडण्याचा आवाजही येत नव्हता. बाबा अजून मारतात की काय अशी भीती वाटून ती मागे मागे सरकत होती. काल झालेल्या गुलाबी गुलाबी प्रसंगाची आठवण आता कटू झालेली होती केवळ काही क्षणातच! अजून पुरेसे व्यक्तही न झालेल्या प्रेमाचा आरंभही होणार नव्हता. सगळे संपलेले होते.

"कोण होता तो?????"

आणखीन एक खर्जातल्या आवाजातला घुसमटता प्रश्न! धमकीयुक्त! आई तर आता नुसतीच निवेदिताकडे खिळून बघत होती..

"आम्ही... सगळे... सगळे होतो... आम्ही..."

आपटेंचा हात पुन्हा हालणार तेवढ्यात आई तिथे धावली आणि तिने नवर्‍याला धरले.

"खोटे बोलतीय ती... हो ना?? खोटे बोलतीयस ना?? तुला काय वाटलं?? मी लोणावळ्याला आहे म्हणजे मला इथलं काही कळणार नाही?? आता कोण होता तो ते सांगीतलं नाहीस तर फोडून काढीन.. "

कौटुंबिक हिंसा असा काही कायदाही नसावा तेव्हा! आणि असता तरी हा प्रकार त्यात मोडतो असे घरातील कुणालाच वाटले नसते. अगदी नीतूलाही! कारण हे वडिलांचे अतिरिक्त प्रेम होते, जे व्यक्त मात्र अत्यंत भीतीदायक पद्धतीने होत होते.

संतापाने थरथर कापत असलेल्या वडिलांना पाहून आता मात्र निवेदिता ओक्साबोक्शी रडू लागली. चेहरा हातात लपवून ती उशीवर कोसळली. आई तिच्या पाठीवर थोपटत असताना आईलाही बाबांची भीतीच वाटत होती. पुन्हा आपटेंनी विचारले, त्याच घुसमटत्या पण भीतीदायक आवाजात!

"कोण होता ते मला एका मिनिटाच्या आत कळायला हवे... चामडी सोलणार आहे मी त्याची.. आणि नाही सांगीतलंस तर तुला फटके मिळणार आहेत.. "

आईने नवर्‍याला गप्प केले खुणेने! निवेदिताचे रडणे वाढलेच होते. आणि आईचे थोपटणेही!

"सांगतीयस की नाही???"

आता मात्र आपटेंचा आवाज वाढला तशी निवेदिता घाबरून आईच्या कुशीत शिरली.

"तुम्हाला कळत नाही का मुलीशी कसं बोलायला पाहिजे?? हे काय ऑफिस आहे तुमचं??"

"तू आणखीन एक शब्द बोललीस तर तुलाही फोडून काढीन.. करतेस काय घरात?? मुलगी कुठ चाललीय, काय करतीय, कुणाबरोबर चाललीय, हे बघायचं कामही जमत नाही तुला??"

आपल्यामुळे आईलाही शिव्या बसत आहेत हे पाहिल्यावर मात्र निवेदिताला अतिशयच वाईट वाटले. धीर धरून बाबांकडे बघत ती म्हणाली...

"उमेश... "

"कोण उमेश??"

मात्र बाबांनी हा प्रश्न विचारला असला तरी आई चरकलेली होती. तिला वाड्यातील उमेश माहीत झालेला होता व्यवस्थित! आईनेच निवेदिताला घुसळत विचारले.

"तो समोरचा???"

रडत रडत निवेदिताने मानेनेच होकार दिला. ताडकन आपटे उठले आणि बायकोलाच म्हणाले..

"कुठे राहतो सांग तो.. "

"नाSSSSही... नाही जायचंत तुम्ही तिथे... झाली असेल एक चूक.. पुन्हा नाही करणार ती असं... प्ण त्यांच्या घरी जाऊ नका.... ती काही वाईट लोकं नाहीयेत... आणि मुख्य म्हणजे... आपलीच मुलगी त्याच्याबरोबर गेली होती म्हंटल्यावर बदनामी कुणाची होईल?? अजिबात जाऊ नका तुम्ही.."

आपटेंनी बायकोच्या तोंडासमोर बोट रोखून धरले आणि दात ओठ खात म्हणाले..

"माझ्यामधे यायच????? नाSSSही... आत्ताच्या आत्ता सांग त्याचं घर कुठलं???"

निवेदिताने रडत रडत मान नकारार्थी हालवत विनंती केली पण आपट्यांनी ते पाहिलंच नाही.

मात्र आपट्यांना काही त्या दोघींवरच अवलंबून राहायची गरज नव्हती. ते सरळ घराच्या बाहेर आले आणि इकडे तिकडे पाहात त्यांनी अंदाज बांधला.. समोर एक पाच जणांचे कुटुंब राहते त्यात एक मुलगा आहे.. समोरचा असे नीतुची आई म्हणाली म्हणजे हेच घर असणार!

आपटे ताड ताड चालत तिथे गेले. दोघी आईलेक दाराच्या बाहेर आल्या होत्या तोवर!

वाडा थबकला. वाड्यात इकडे तिकडे विखुरलेली माणसे अचानक या नव्या भाडेकरूला असे भडकून राईलकरांच्या दारावर उभे राहिलेले पाहून खिळली होती तिथेच!

आपट्यांनी दाराच्या बाहेरूनच हाक मारली.

"उमेश आहे काSS??"

घरात फक्त उमेशची आई, आजोबा आणि वडील होते. उमेश आणि क्षमा बाहेर गेलेले होते वेगवेगळे!

आपटेंनी हा प्रश्न विचारेपर्यंत नीतुची आई त्यांच्या मागे जाऊन काकुळतीने त्यांना घरी चलायची विनंती करू लागली. एकंदर प्रकार आणि अनेक लोक थांबलेले पाहून शरमेनी काळी ठिक्कर पडलेली निवेदिता जोरजोरात धावत आतल्या खोलीत आली आणि हमसून हमसून रडत खिडकतून बाहेर पाहू लागली.

मात्र उमेशची आई अरुणा आणि पाठोपाठ वडील अनंतही दारात आले होते.

अनंत - अरे तुम्ही??? या ना??

आपटे - उमेश तुमचाच मुलगा का??

अनंत - होय.. का?? काय झालं??

आपटे - पोरीबाळींवर वईट नजर आहे त्याची... कुठे आहे तो??

अख्या वाड्यात गुणी कुटुंब म्हणून ख्यात असलेल्या घराला असले बोल ऐकावे लागताच आजोबाही तरातरा तेथे आले आणि बघू लागले. उम्याचे वडील तर हादरलेलेच होते.

अनंत - अहो आपटे.. काय झालं काय पण??

आपटे - माझ्या मुलीला घेऊन फिरला तो काल सिंहगडावर... आता त्याचे हातपाय मोडून ठेवणार आहे मी..

आता उम्याच्या आईने डोळ्यांना पदर लावला. उम्याचे वडील बाहेर आले.

अनंत - एक मिनिट एक मिनिट.. काल खूप जण गेलेले होते तिथे... ते सगळे क्षमाच्या वर्गातले..

आपटे - दोघे... काय??? फक्त दोघे... माझ्या माणसांनि पाहिलेले आहे..

उम्याच्या वडिलांसमोर दोन बोटे नाचवत कर्कश्श आवाजात आपटे म्हणाले तसे राईलकरांनि खाडकन मागे वळून पाहिले बायकोकडे!

उम्याच्या आईला आता आणखीनच रडू आले. मुलाची आई असली तरी मुलाबाबत जाहीररीत्या असे काही बोलले जाणे अजिबातच खपणार नव्हते तिला!

नीतुच्या आईने आपट्यांना पुन्हा मागे ओढायला सुरुवात केली तसे त्यांनी बायकोलाही मागच्या मागेच ढकलले.

नीतुची आई - तुम्ही मला मारा... मला मारा हवे तर... पण यांना काही बोलू नका.. यांची काय चूक आहे.. माझा आणि माझ्या मुलीचा खून करा तुम्ही...

आपटे - एक शब्द बोललीस तर सडकून काढेन मी... काय हो.. कुठंय तुमचा पोरगा???

अनंत - तो... तो बाहेर गेलाय.. येईल आत्ता.. पण हे सगळं..

आपटे - केस! केस करणार आहे मी... तरुण मुलीला नादी लावल्याची... फूस लावून आमीष दाखवल्याची...

आता राईलकरही काहीसे चिडलेच.

अनंत - ओ.. तुम्ही काय बोलताय?? तो जाणारच नव्हता.. माझ्या मुलीने त्याला आग्रह केला चलायचा म्हणून गेला...

आपटे - तुमची मुलगी होती कुठे तिथे?? दोघेच फिरत होते..

अनंत - माझ्या मुलीचा क्लास होता हे तिला आठवलं म्हणून ती परत आली..

आपटे - आणि मग तुझा मुलगा माझ्या मुलीला घेऊन गेला फिरायला आ?????

अनंत - अरे तुरे करू नका..

आता भडकलेल्या आपटेंनी राईलकरांवरच हात उगारला तसे सगळेच चपापले. एक व्यक्ती सोडून! उम्याचे आजोबा! ते सरळ बिनदिक्कत पुढे आले.

तोवर आप्पा वाड्यातच होता तो तिथे आला होता.

आजोबा थेट आपट्यांसमोर येऊन उभे राहिले. अख्खा वाडा आता हादरलेला होता. आजोबा आता आपट्यांना काय म्हणतात कुणास ठाऊक!

आजोबा - बाळ.. घरात ये... डोकं शांत ठेव.. अरे मुलं आहेत... झालं असेल काहीतरी.. काहीच वावगं नाहीये.. जग बदलतंय... हं?? ये आत ये..

आपटे - ओ... तुमच्याशी बोलत नाहीये मी... तुम्ही कोण?? व्हा बाजूला.. मी ह्याच्याशी बोलतोय..

आणि त्या क्षणी मात्र रास्ते वाड्याने आजोबांचे कधीही न पाहिलेले रूप पाहिले..

संतापाने थरथर कापत आजोबांनी आपटेंच्या थोबाडापुढे टिचक्या वाजवत त्यांना हाकलल्याची खुण केलि अन म्हणाले..

आजोबा - माझ्या दारात उभायस म्हणून नीट 'जा' असं सांगतोय.. अजून उभा राहिलास तर तंगडं मोडून देईन हातात.. आणि इथे पुन्हा येऊन आवाज करायचा नाही... तुझी हवालदारकी तुझ्या चौकीवर... तुझ्या बापाचा वाडा नाही हा.. पोरीला सांभाळता येत नसेल तर जन्माला घातली कशाला??? आ??? चिंचेची तालीम गाजवलीय मी ... एक फटका टाकला तर मुतायला उठायचा नाहीस.. चल्ल????

आपटेंच्या आयुष्यात असा प्रसंग आलेला नव्हता. आयुष्यात!

वास्तविक पाहता कोणत्याही पोलिस अधिकार्‍याने आत्ता सरळ सरळ हातघाईवरच येणे पसंत केले असते. किमान एक केस तरी केलीच असती जवळच्या चौकीवर!

पण प्रकार असा होता की तमाम रास्ते वाडा आपटेंची दादागिरी आणि वाट्टेल तसे बोलणे ऐकूनच तिथे थांबलेला होता. आणि पुढची दादागिरी करायच्या आतच आजोबांनी असा काही जाहीर दम भरला होता की ते असे कसे काय करू शकले असतील याचाच अंदाज आपटेंना येत नव्हता. नॉर्मली कुणीच पोलिसाशी असे बोलत नाही. जो बोलतो त्याच्या मागे बर्‍यापैकी पाठबळ असावे लागते. आणि आजोबा तर आपटेकडे ढुंकूनही न पाहता मुलाला आणि सुनेला घेऊन आत निघून गेलेले होते.

हाताच्य मुठी वळत आपटे अपमानीत होऊन घरात परत आले. आणि तातडीने चौकीवर निघाले निवेदिताला घेऊन! तेव्हाही निवेदिताची आई 'नाही नाही' म्हणत विरोध करतच होती. तो विरोध मोडून काढण्यात आणि निवेदिताला ओढून घराबाहेर काढण्यात जो काही वेळ लागला त्यातच आप्पाने गेम टाकली. विन्याची वाड्यातच असलेली बाईक घेऊन त्यावर आजोबांना मागे बसवून तो सुटला!

आपटे चौकीवर पोचले तेव्हा आप्पा आणि आजोबा तिथेच होते. आपटेंना बघून एक कांबळे म्हणून पी एस आय उभा राहिला. दोघांचे पद एकच असले तरी आपटे सिनियर होते.

कांबळे - अरे आपटे साहेब?? तुम्ही कसे काय आत्ता??

आपटे - हे इथे कसे काय दोघं???

कांबळे - आपटे साहेब.. हे.. तुमचीच कंप्लेन्ट नोंदवायला आलेत.. अधिकारांचा गैरवापर करून सार्वजनिक ठिकाणी दादागिरी करणे, शिवीगाळ करणे, बदनामीकारक उलेख करणे आणि हाफ मर्डरची धमकी!

आपटे - पेपर करू नकोस यांचे..

कांबळे - नाही करत.. पण तुम्ही कसे काय आलात??

आपटे - माझ्या मुलीची कंप्लेन्ट आहे.. या म्हातार्‍याच्या नातवाने तिला फितवून सिंहगडावर्नेले काल..

कांबळे - हिला?? आयला काय माणसंयत?? म्हणजे गुंगीची गोळी बिळी दिली का??

आपटे - नाही.. ही शुद्धीवरच होती..

कांबळे - वय काय मुलीचं??

उम्याच्या आजोबांकडे संतापाने पाहणार्‍या आपटेंनी या प्रश्नावर खाडकन कांबळेकडे मान फिरवली. प्रश्नाचा अर्थ आणि गांभीर्य समजलेले होते त्यांना! खालच्या आवाजात ते म्हणाले..

आपटे - एको... एकोणीस...

कांबळे बिनदिक्कत निवेदिताला सर्वांदेखत विचारले..

कांबळे - बाळ???.. काय तक्रार आहे तुझी??? कुणाच्या दबावात येऊ नको बरं???

लालभडक झालेले डोळे, गालांवर ओघळलेल्या आणि मुरलेल्या कित्येक सरी, भीतीने थरकाप उडालेला, मान शरमेने खाली गेलेली.... तोंडातून शब्दही फुटणे शक्य नसलेल्या निवेदिताने हळूहळू वर पाहिले.. कांबळे पी एस आय, मग आप्पा, स्वतःचे वडील आणि शेवटि आजोबा.. आणि ठामपणे... अत्यंत ठामपणे म्हणाली...

"काही नाही... माझी काहीही तक्रार नाही... "

गुलमोहर: 

prem kathet aale khal nayak kaa yetaat...tyanchya shivay kuthaluch katha purn hot nahi .....

एकदम जबरदस्त........................
नाद नाहि करायचा................ आजोबाचा ................

आजचा भाग म्हणजे पुर्वि काहि महाभागानि जे प्रतिसाद दिले होते त्यान्च्या काना खालि आजोबानि आवज काढल्या सारखा वाटला.

एक्दम सोलिड..

आपलि प्रेमकथा वाचत असल्या सारख वाटल.आजोबा लय भारि आहेत बुवा..

नविन भाग लवकर आला पाहिजे.

दिजे

आजोबा जबरदस्त आवडले,

आजोबा नातवातले हे अनोखे भावबंध आहेत, कदाचित मुलाबरोबरही न जमलेले ... प्रेम कथेच्या अनुशंगाने आशा आहे आपण त्या विषयावरही लिहाल Happy