को़कणसय ... पाऊसमय !!!

Submitted by सत्यजित on 5 June, 2011 - 08:36

माझ्या कोकणची माती
जशी अत्तराची खाण
नभरस कोसळता
देते सुगंधाचं वाण

आला मेघराज नभी
धरा कुंकवाची डबी
हिरवं सोनं लेउनिया
दिसे नववधू छबी

गोड लागतो खायला
ऐन उन्हाचा व्यायला
बाळंतपण लेकीचं
लागे काळजी आयेला

आता पुरवेल लाड
लाडावेल झाड झाड
उफाळल्या दर्यासंगे
डोलू लागतील माड

हरवता पायवाटा
गावे तेरडा टाकळा
नाही कुणाचंच भय
रवळनाथाचा हा मळा

घेता पागोळ्या ओच्यात
त्यात मिळे पारिजात
मळा मेंदीभरले हात
त्यात तरारेल भात

नभं थेंबानी चुंबता
लाज लाजली लाजाळू
तिला छेडते आबोली
किती किती गं मायाळू

बघ सरेल श्रावण
मग येईल भादवा
माहेरवाशी गौवरया
बाळा गातील जोजवा

माझ्या मायेच्या डोळ्यात
कसा वाहू लागे झरा
असा पाउस पाउस
येतो कोकणच्या घरा...

सत्यजित.

गुलमोहर: 

क्या बात है सत्या, पाऊस जोरात एकदम

आता पुरवेल लाड
लाडावेल झाड झाड
उफाळल्या दर्यासंगे
डोलू लागतील माड>>>हे फारच गोड...:)

अप्रतिम..
नाद, लय सगळंच छान..

आता पुरवेल लाड
लाडावेल झाड झाड
वाह!! Happy
(एकदम नलेश पाटील आठवले)

छान वर्णन .....
"नभं थेंबानी चुंबता
लाज लाजली लाजाळू" ..... हे अधिक आवडलं.
--------------------------------------------------------
अवांतर ---------
'अष्टाक्षरी' मध्ये रचना केल्याचं जाणवतंय.
१-२ ठिकाणी अधिक अक्षरं आली आहेत.

योग, हर्शल, अज्ञात आणि रोहीत आभार..!!!

सालस लहान निरागस मुलांना समजाऊन सांगणारा .....?? >> नाही हो मीच सालस लहान निरागस आहे Wink

सुंदर!

एखाद्या गोर्‍या गोमट्या, घार्‍या डोळ्यांच्या, डोईवर पदर घेतलेल्या कोकणातल्या स्त्रीनं लिहिल्यासारखं Happy

Pages