पुष्पौषधी ( फ्लॉवर रेमिडी ) माझा अनुभव

Submitted by अवल on 17 May, 2011 - 13:02

या लेखात पुष्पौषधी बद्दलचा माझा अनुभव मी लिहिला आहे. याच्या शास्त्रीय तपासणीबाबत मला कोणतीही माहिती नाही याची कृपया नोंद घ्यावी. त्यामुळे या संपूर्ण लेखातली माहिती ही केवळ माझा अनुभव म्हणूनच फक्त ग्राह्य धरावी ही विनंती !

१.
साधारण वर्षांपूर्वीची घटना ! माझे एक जवळचे वयोवृद्ध अचानक गेले. तसं वय ८८ होतं, पण तब्बेत चांगली होती. त्यांच्या मुलाने (वय ५० ) त्यांचे जाणे जरा जास्तीच मनाला लावून घेतले. तशात ते गेले तेव्हा मुलगा त्याच्या कामानिमित्त बाहेर गावी होता. त्यामुळे आपण शेवटी त्यांच्या जवळ नव्हतो, आपण जवळ असतो तर काही करता आलं असतं . असं काहीसं त्यांनी मनाला लावून घेतलं. यातून दुसर्‍या दिवशी त्यांची इतकी वाईट परिस्थिती झाली की त्यांना आय सी यू त ठेवावं लागलं.
दोन दिवसांनी त्यांना घरी आणलं. पण आपली चूक झाली ही भावना काही त्यांच्या मनातून जाईना. आमची एक फॅमिली मैत्रिण आहे. तिने हे सगळे पाहिले अन मला विचारले की त्यांना फ्लॉवर रेमिडी देउ का ?
त्यांना पुष्पौषधी सुरू केली अन ४ दिवसात ते या सगळ्यातून हळूहळू बाहेर आला. पुष्पौषधी ची अन माझी ही पहिली ओळख !

२.
तीन महिन्यांपूर्वी माझ्या लेकाला अ‍ॅक्सिडेंट झाला. मला घरी फोन आला अन मी लगेचच तिथे पोचले. लेक रस्त्यात खाली बसला होता. डोळ्यात कसलीच ओळख नव्हती.....शर्टावर रक्त सांडलं होतं.... मी तिथे पोहचले अन मागून सायरन वाजवत अ‍ॅम्ब्युलन्स आली. आजूबाजूच्या भल्या माणसांनी मी तिथे पोहचे पर्यंत ती मागवली होती..... मी लेकाजवळ जायच्या आधीच, त्याने मला ओळखायच्या आधीच; डॉक्टरांनी त्याला अ‍ॅम्ब्युलन्स्मध्ये घेतले. मी तिथे जायला लागले तर त्यांनी अडवले. अन मला पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसायला सांगितले. तिथे काही फॉर्म्स भरणे वगैरे फॉर्मॅलिटीज पार पाडल्या. नवर्‍याला फोन करून डायरेक्ट दिनानाथमध्ये ये असे सांगितले. अन मग अ‍ॅम्ब्युलन्स निघाली. दिनानाथला अ‍ॅम्ब्युलन्समधून खाली उतरले, तो पर्यंत लेकाला स्ट्रेचरवरून आत अ‍ॅडमिट केलं होतं... अन मग मी त्याला पाहिलं. आता त्याच्या डोळ्यात ओळख होती... अन मग माझा श्वास एक क्षण अडला.... खळकन डोळ्यातून पाणी आलं..... पण लगेच सावरलं, त्याच्या जवळ गेले... डॉक्टर तपासत होते, मी लेकाच्या डोक्यावरून हात फिरवला तर हाताला रक्त लागलं.... मी डॉक्टरांना खूण केली.... अन तेव्हढ्यात माझा नवरा येऊन पोहचला.... आता फॉर्मॅलिटीज त्याने हातात घेतल्या... अन मी लेकाकडे पहायला मोकळी झाले...
मग लेकाचे सिटीस्कॅन, एम आर आय,.... वगैरे सगळ्या गोष्टी पार पडल्या....... सगळ्यांच्या शुभेच्छांतून लेक अगदी पूर्ण इनटॅक्ट हाती लागला. डोक्याला जखम असल्याने ४८ तास वाईट गेले... पण सगळ्यातून सही सलामत बाहेर पडलो.........
तीन दिवसांनी घरी आलो. हळूहळू रुटीन सुरू झाले. आमचे घर दिनानाथच्या जवळ असल्याने नेहमीच अ‍ॅम्ब्युलन्स जात येत असतात. तशीच त्याही दिवशी -घरी आल्यावर दुसर्‍या दिवशी एक अ‍ॅम्ब्युलन्स सायरन वाजवत गेली.... अन मी मटकन खाली बसले...... हृदयाचे ठोके अगदी कानापर्यंत ऐकू यायला लागले........ वरचा श्वास वरती, खालचा खाली..... जीव गुदमरायला लागला...... खरं तर मी अतिशय धीराची बाई.... काही मैत्रिणीतर मजेत मला पाषाण हृदयीही म्हणतात.... पण या अवस्थेतून बाहेर यायला मला मिनिट्-दिड्मिनिट लागलं......लेकाला अ‍ॅक्सिडेंटनंतर डोळ्यात ओळख नसलेलं पाहिलं तेव्हाच मागून अ‍ॅम्ब्युलन्स सायरन वाजवत आली होती, तो सायरन जवळ जवळ ८ ते १० मिनिटं अगदी डोक्यावर वाजत होता.....लेक डोळ्यासमोर नव्हता......काय, किती झालं आहे हे कळत नव्हतं... अन तो सायरन......
सगळी घटना माझ्या डोक्यातून काही केल्या जाईना...... जरा कुठे सायरन वाजला की माझे ठोके आपले धाड धाड चालू....... प्राणायाम करून झाला. मनाला समजावून झालं...... डॉक्टरांशी बोलून झालं...... लेकाला जवळ घेउन झालं....... पण मला काही हे कंट्रोलच होईना.....
अन तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला पुष्पौषधी दिली. तो धक्का इतका वाईट होता की चार दिवसांनी गुण आला. हळूहळू मला परिस्थिती आटोक्यात आणता येउ लागली.
अन जाणवलं पुष्पौषधी चा कित्ती उपयोग होउ शकतो. मग दोन महिने पुष्पौषधीचा अभ्यास केला. मैत्रिणीकडून काही अडचणी आल्या, त्या स्वमजून घेतल्या. अन नव्या जोमाने पुष्पौषधीच्या औषधांचा उपयोग आता घरच्या सर्वांसाठी करू लागले.

३.
माझ्या आईच्या कला गुणांबद्द्ल मी आधी लिहिलं होतं इथे. तिची थोडी ओळख आहेच तुम्हाला.... ( http://www.maayboli.com/node/1507 )
लग्न झाल्यापासून आईनं त्या काळानुसार खुप सासूरवास भोगला, तशात खुप मोठं कुटुंब अन वडिलांचा भिडस्त स्वभाव... अनेक गोष्टी तिच्या मनात साठत गेल्या. त्या त्या वेळेस तिनं सगळं निभावून नेलं, अनेक न पटणार्‍या, मनाला लागून राहिलेल्या गोष्टी तिनं दडपल्या होत्या मनात....
पण आता ८०व्या वर्षी हळूहळू त्या वर येऊ लागल्यात.... खुप त्रास व्हायचा तिला.... सगळे समजावतात "जाउ दे झालं गेलं गंगेला मिळालं..." तिलाही समजतं , पटतं पण मन साथ देत नाही... डोळे गळतच राहतात. अन मग खुप दुखतात डोळे अन मन ही ...
मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीने, फ्लॉवर रेमिडीची काही औषधं मला दिली होती, माझ्या लेकाच्या अ‍ॅक्सिडेंटच्या धक्क्यातून बाहेर यायला मला त्याचा खुप उपयोग झाला होता. मग मी फ्लॉवर रेमिडीचा थोडा अभ्यास केला. अन काय आश्चर्य, मला आईच्या त्रासावर उपाय सापडला. गेले दोन महिने तिला ही औषधं देत्येय मी. पूर्वीची घट्ट्मुट्ट आई पुन्हा उभी राहतेय जुन्या आठवणींवर ताबा मिळवतेय अन पुन्हा नेहमी सारखी अतिशय आशावादी आई पुन्हा मिळालीय आम्हाला.

गुलमोहर: 

प्रत्यक्ष फ्लॉवर रेमिडिवर काही लिहिण्या आधी माझे अनुभव आधी इथे लिहितेय. सावकाशीने फ्लॉवर रेमिडिवरही लिहेन.

हो. नक्की लिहा, मलाही जाणुन घ्यायचे आहे, त्याबद्दल. <<अ‍ॅम्ब्युलन्स सायर<<>>या गोष्टी सेम तु सेम माझ्या आणी माझ्या आईबाबत झालेल्या.... माझ्या आजोबांच्या निधनाच्या वेळी....तेंव्हा कोणीतरी हे सुचविलेले. पण मला नक्की आठवत नाही आता. लवकर लिहा....

फ्लॉवर रेमेडी गुणकारी असतात. होमिओपथिबरोबर घेतल्यास आणखी गुणकारी. धागा आरोग्य सदरात का नाही टाकला?

अवल तुझे अनुभव छान लिहीले आहेस. मी पाहीलेला अनुभव सांगते.
माझ्या एका जवळच्या नातेवाईकांना असाच मानसिक धक्का बसला होता. तेंव्हा आम्हाला एका पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वाल्या व्यक्तिंनी पुषौशधींचा वापर करायाला सांगितला होता. त्यांनी तो केला. पण थोड्या दिवसांनी त्यांना काही एमोशन्सच राहत नव्हते. म्हणजे कशाच दु:ख वाटत नव्हत की कशाची ओढ राहीली नव्हती. मग आम्ही त्यांना घेउन मानसोपचार तज्ञांकडे गेलो. त्यांनी सांगितल की त्या वनौषधी डॉक्टरांना विचारल्याशिवाय घेउ नये. त्यात बरेच प्रकार असतात. नेमकी कोणते घ्यायचे हे त्यातील तज्ञालाच माहीत असत. मग मानसोपचार तज्ञांनी त्यांच्यावर ट्रिटमेंट केल्यावर ते व्यवस्थित झाले.
माझ्या हे अनुभव सांगण्याचा अर्थ अजिबात असा नाही की पुष्पौशधी वापरु नका , फक्त योग्य सल्ल्याने वापरा. अवल तुझ्याकडे त्याबद्दल पुर्ण माहीती आहे म्हटल्यावर निर्धास्त. तसेच तुझी माहीतीही लवकर येउदे.

चु.भु.द्या.घ्या.

बाकीचे खर तर माहिती नाही, पण माझा अनुभव ....
सकाळी ऊठल्यापासूनच काहीसे डिप्रेस वाटत होते तसेच तयार होऊन ऑफीससाठी निघाले, ट्रेन मधे स्व:ताला माववले आणि अचानक चाफा दरवळा माझ्या अगदी समोरच उभ्या असलेल्या महिलेने डोक्यात चाफा माळला होता... वातावरण आणि मन दोन्ही दरवळले Happy

तेव्हा पासून काहीसे डिप्रेस वाटायला लागले की चाफा नाहीतर मोगरा घेते Happy

फ्लॉवर रेमिडिचाच हा प्रकार आहे का?

Happy असं होतं खरं.फुलांनी नेहमीच प्रसन्न वाटतं.
पण फ्लॉवर रेमिडी ही एक होमिओपॅथी सारखी एक स्वतंत्र शाखा आहे. लिहेन थोड्या दिवसात त्यावर.

सुरश मला तुमचा उपाय जास्त आवडला. खरच फुलमार्केटमधुन जातानाही किती सुखद वाटत.

अवस सॉरी माझी टाईपात चुक झाली. मला पुष्पौशधीच टाईपायचे होते.

अवल,

तू ते सायरन चं म्हणतेस तसंच सेम मला अलार्म च्या घड्याळाने होतं गं. स्पेशली दादरचा तो ब्रिज जिथे फेरीवाले अलार्मवाली छोटी छोटी घड्याळं विकायला बसलेले असतात आणि सगळ्या घड्याळांचे अलार्म्स एकसाथ वाजत असतात तिथून पास होताना उगाचच घाबरायला होतं. हृदयाचे ठोके स्पष्ट जाणवतात. उगाचच अस्वस्थ वाटतं. तुला निदान असं पहिल्यांदा झालं तेव्हाची घटना लक्षात तरी आहे. मला असं कधी पासून व्हायला लागलं माहीत नाही, पण खूप लहानपणापासूनचा हा अनुभव आहे. मोबाईल/ घड्याळ अशा कुठल्याही यंत्राचा 'टिनिनिनिक...... टिनिनिनिक...' अशा प्रकारचा होणारा नाद मला अस्वस्थ करतो. मोदकला माझं असं वागणं विचित्र वाटतं आणि तो माझ्यावर हसतो, पण कुणालाच नीट एक्स्प्लेन करू शकत नाही की काय होतं मला ते. सकाळी मोबाईलमध्ये जाग येण्यासाठी लावायचा अलार्म मी काळजीपूर्वक निवडून सेट करते. एखादे गाणे वगैरे सेट करते. सतत तोच पर्टिक्यूलर नाद होईल अशा आवाजाचे अलार्म मला त्रास देतात. Sad

असाच अनुभव मला ब्रूट आणो पॉइझन या २ परफ्यूम्स च्या बाबतीत पण येतो. त्या वासांचं परफ्यूम मारून कुणी जवळून जरी गेलं तरी मला मी श्वासही नीट घेऊ शकत नसल्याची भावना होते. जीब घाबराघुबरा होतो अगदी. १०वीत असताना तर मी एकदा क्लासमधून अर्ध्यावरून उठून घरी निघून आले. माझ्या चेहर्‍यावरचे विचित्र भाव बघून सरांनी विचारलं काय होतंय तर मी शिस्तीत सांगितलं की अमुक एका मुलाने आत्ता वर्गात एंट्री केली त्याच्या परफ्युमच्या वासाने मला गुदमरतंय, मी घरी जाते. अख्ख्या वर्गाने माझ्याकडे 'हिला वेड लागलं' असा लूक दिला. Uhoh

अवल पुष्पौषधी बद्दल कुतुहल आहे पण काही ना काही कारणाने कधी माहिती काढली गेली नाही. तु ही लेखमाला बनव जमले तर. वाचायला आवडेश.

अवल, या पुष्पौषधी संबंधी बरेच लेख मी वाचले होते. पण परिचयातील कुणावर तो उपचार झाला नव्हता.
आता कुणाला गरज असेल, तर या उपचारपद्धतीचा नक्कीच विचार करायला सांगेन.

नुकतेच मला माझ्या बहिणीने या बद्दल सांगितले. तिला कोणत्याही गोष्टीचे टेन्शन घ्यायची सवय आहे. खुप नाही पण नाही म्हणले तरी मानसिक ताणामुळे तब्ब्येतीवर काही ना काही परिणाम होत होता.
तिला कोणी एक आजी भेटल्या आणि त्यांनी पुष्पौषधीचा प्रयोग चालू केला तर आता काही दिवसातच तिला चांगला अनुभव आला आहे. लवकरच मला पण प्रयोग करून पहायचा विचार आहे.

मलाही उपयोग झाला होता.. बहीण होमियोपथी असल्यामुळे Bach फ्लॉअर रेमेडी वाचण्यात आले.. त्यातील सगळी औषधे कुठल्याही होमियोपथी च्या दुकानात असतात.. पाहीजे तर ते डोस तयार करून देतात.. मी बाटली आणायचो आणी साबुदाण्याच्या गोळ्यात टाकून घ्यायचो..

होमिओपथी डॉ/केमिस्टकडे औषधे मिळू शकतात.. ही साधारणपणे २४ -२५ औषधे आहेत. सगळ्या रोगांवर त्यातूनच औषधे निवडायची असतात. होमिओपथीसारखेच शाबुदाण्यासारख्या गोळ्यांवर औषधाचे थेंब सोडून बाटली हलवुन मग थोड्या थोड्या गोळ्या चघलणे.

पुष्पौषधी हा खरंच खूप इंटरेस्टिंग विषय आहे. मी त्याबद्दची पुस्तके (मराठी व इंग्लिश) वाचली आहेत व ह्या पुष्पौषधींचा अनुभवही घेतला आहे. उत्तम एवढेच म्हणू शकेन. नेहमीच्या स्वभावाच्या तक्रारी ( चिडचिड, कुढणे, आदळाआपट, नैराश्य, दु:ख, शॉक, अस्थिरता, आक्रमकता, हट्टी - हेकेखोरपणा, निरुत्साह) तसेच निद्रानाश, दु:स्वप्ने इत्यादी तक्रारींवर ह्या औषधींचे खूप उपयोग झालेले पाहिले आहेत. पुण्यात शनिपाराजवळ एम व्ही अँड कंपनी ह्यांच्याकडे ही औषधे व त्यावरील पुस्तके इत्यादी मिळतात. इतर होमिओ दुकानांतही मिळतात.

अवल, आपले अनुभव वाचून पुष्पौषधींबद्दल इंटरेस्ट वाटू लागला आहे. माहीती जाणून घ्यायला आवडेल.

Pages