बिलगून !

Submitted by vaiddya on 25 May, 2011 - 14:47

तू भेटलीस
हातात हात
मग मिठीही ..
भेट, बोलणं ..
बरंच काही एकमेकांत - एकमेकांतून पाहाणं
झालं .. मग आपण आपापल्या वाटेला पुन्हा !
पण माझ्या चेहर्‍यावर उमटलेलं एक
अनावर हसू
तसंच .. नंतर कितीतरी वेळ ..
तू गेलेली, तरीही !
नंतर मी ही कामांमधे गढून जात
हे विसरून गेलेला ..
की
ते हसू
आवरलेलं नाही अद्याप ..
उलट आता ते
चेहर्‍यावरून सरकत सरकत
थेट मनापर्यंत
झिरपून राहिलं आहे
मलाच ..
आतून
बिलगून !

गुलमोहर: 

वैद्यांच्या सगळ्याच कविता अप्रतिम आहेत. खरंच याआधी का लक्ष गेलं नाही याची चुटपुट लागून राहिलीये... Sad