सावट - १०

Submitted by बेफ़िकीर on 20 May, 2011 - 06:45

सर्वांना सप्रेम नमस्कार! सावट या कथेचा अंतिम टप्पा आलेला आहे व बहुतेक अंतिम भाग उद्या प्रकाशित होईल. प्रतिसादकांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनाचा मी अत्यंत ऋणी आहे. चुकले माकले माफ करा. हा भाग कसा वाटला तेही कळवा. काहीसे आडवळणाने मुद्दाम लिहीले आहे. मायबोली प्रशासनाचेही आभार!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

========================================

सकाळचे आठ वाजले होते.

पस्तीशिचा इस्माईल आपली दाढी विंचरून आणि एक जाड पराठा भाजीबरोबर खाऊन आता कामावर चालला होता. एका ब्राह्मणाच्या शेतावर तो राबायचा. वर्षाचे धान्य आणि रोजची भाजी तिथेच मिळायची. खरे तर पगाराची काय गरज मग? पण पगारही मिळायचाच! आणि तो पगार साठवलाच जायचा. कारण खर्चच नव्हते काही! झेबा आणि तो दोघेच! घरात कुणी नाहीच! झेबावर इस्माईलचे प्रचंड प्रेम होते. तिचेही त्याच्यावर! आणि तिचाही किंवा त्याचाही खर्चिक स्वभाव नव्हताच! संध्याकाळी घरी आला की इस्माईल तिला घेऊन नदीपाशी फिरायला जायचा. गप्पा मारायचे. रात्री आठ वाजता परतले की नऊ साडे नऊपर्यंत झेबा मसाला राईस आणि मासा वगैरे मिळाला असला तर त्याचा रस्सा करायची. आणि दोघेही एकमेकांवर प्रेमाची बरसात करत झोपून जायचे.

आत्ताही दारात उभ्या असलेल्या आणि घरातून दहा पावले पुढे गेलेल्या इस्माईलला पाठमोरा पाहताना झेबाची जीभ तिच्या गालात घोळत होती. चेहर्‍यावर मिश्कील हास्य होते. कारण इस्माईलने आज तिला वचन दिले होते की शेतावर निघाल्यावर पुन्हा घरात येऊन तिला आवळणार नाही याचे! रोज काहीतरी कारण काढून दहा पावले चालला की परत घरात यायचा आणि तिला मिठीत आवळून ती कशीबशी सुटेपर्यंत हलायचाच नाही. खरे तर ते झेबालाही आवडायचे, पण आज तिने त्याची गंमत केली होती. आणि त्याने खरच वचन दिलेले होते. मी परत येणार नाही.

त्यामुळेच ती आत्ता त्याचा निर्धार पाहण्यासाठी दारात उभी होती आणि तेवढ्यात इस्माईलने मागे वळून पाहिले व थांबला जागच्या जागी!

"क्युं?? बदलगया इरादा??"

झेबाचा खोडकर प्रश्न ऐकून इस्माईल भानावर आला व त्याला आठवले की 'मला मोह आवरता येतो' हे तिला आज दाखवून द्यायचे आहे.

"नही तो?? मै सोच रहा था शायद बारिश आयेगी.. छाता ले जाऊ??"

"भीगही लीजिये एकाधबार?? कहते है पहली बारिशमे भीगनेसे किस्मत खुलती है.."

"तो तू भी तो आ?? भीगेंगे साथमे.. ?"

"अल्ला.. जाओ अब.. देख रहे है सब.."

"मियाँ बीवि है.. कोई देखे??"

"मै नही भीगती... सर्दी होती है.. "

"अभी हुवी है क्या??"

असे म्हणत इस्माईल 'तुझ्या तब्येतीची काळजी आहे' असे भासवत घरात येऊ लागला तशी झेबा दारात खमकेपणाने उभी राहिली आणि बोटाने त्याला जायच्या खुणा करत म्हणाली...

"चलिये चलिये... ज्यादा इश्क मत जताईये... वादा तोडदेनेवाले है आप अभी.. "

"अरे ना ना.. मै तो सिर्फ ..."

इतके म्हणेपर्यंत इस्माईलने तिला आत ढकलून आतून दार लावून मिठीत गच्च आवळलेही होते.. खदखदून हासत खरे तर सुखावलेली झेबा इस्माईलला चिडवत होती...

"हुस्न आखिर जीतही गया मानलो.. "

"हां लेकिन इश्कनेही तो जिताया हुस्नको...."

आणि आनंदाच्या पहिल्या लहरीवर स्वार होतानाच...

झेबाच्या सुंदर शरीरावर इस्माईलला सुरकुत्यांची जाळी दिसायला लागली... तिच्या शरीराचा स्पर्श त्याला आता भाजून काढू लागला.. झेबाचे डोळे खोबणीतून बाहेर आल्यासारखे दिसू लागले.. मात्र त्याला तिला दूर ढकलावेच लागले नाही.. तीच भीतीने शहारत त्याच्यापासून दूर झाली होती... कारण तिला त्याच्याजागी दिसत होता... रामोशी! गेस्ट हाऊसची झडती घ्यायला गेलेला... आणि शेजारीच राहणारा!

दिवे गावावर सावट पडू लागले होते... पहिली भयानक जाणीव इस्माईलच्या घरात पोचली होती..

आणि अजित कामतच्या शरीरातील ते आठशे वर्षांपुर्वीचे मन... मावशींच्या दोन खोल्यात...

=========================================

"माझं बाळ गंSSSSS" म्हणत कल्पनाने आपल्या नुकत्याच जागे झालेल्या सहा महिन्यांच्या बाळाला पाळण्यातून उचलले आणि त्याचे पापे घेत त्याच्या भोवती गुंडाळलेले दुपटे बाजूला केले.. सकाळची फ्रेश हवा आपल्या बाळाला मिळावी या उद्देशाने तिने त्याला कोवळ्या उन्हात आणले... त्याबरोबर बाहेर लाकूड तोडणारा सोपान आत धावला आणि त्याने बाळाला आपल्याकडे घेतले..

कौतुकाने बापाच्या हातात बसलेल्या आपल्या मुलाला त्याची आई बघत होती....

बाळाचे दोन मोठे भाऊ आणि एक बहिण खेळत होते तेही तेथे आले..

बाळाशी खेळून ते न्याहारी करायला आत आले...

"बाळ हुबं कधी र्‍हाईल गं आई??"

प्रतीकने, सहा वर्षाच्या मुलाने विचारले...

"सा म्हैन्यांनी.. "

"का?"

"का म्हन्जे?? ... तूबी तवाच हुबा झालावतांस.. "

"मी आता क्येवडाय??"

"सा वरीस.. बडबडू नकू.. खा..."

चार वर्षांची नीता उद्गारली..

"मी तुझ्याआधी र्‍हाइली हुबी.."

त्यावर कल्पना हासली अन म्हणाली...

"हा.. रांगमधंच व्हतीस... दोन भाव जलमल्या जलमल्या कवतुकं करून घ्यायला हुबीच हुतिस जल्मायला.. आशी वागलीस तर सासर न्हाय मिळायचं... "

भाकरी आणि मीठ, कांदा आणि ताक अशी न्याहारी सुरू झाली. सोपान बाळाला घेऊन आत आला.

"ह्यो असा काय गं करतूय??"

नवर्‍याच्या हातातील बाळाचा बदललेला रंग पाहून कल्पना उठून क्षणात तेथे धावली..

"बाई... हे काय हो???"

बाळाचा रंग बदलून आता शेवाळी कलरची स्कीन दिसू लागली होती... बाळ निर्जीव नजरेने आईकडे पाहात होते... बापाकडे पाहात होते.. आईच्या हातांचा स्पर्श त्याला अनोळखी वाटत असल्यप्रमाणे..

आणि पुढच्याच क्षणी चार वर्षांची नीता जागच्याजागीच बेशुद्ध पडली.. त्या पाठोपाठ प्रतीक!

लहान मुलांवर परिणाम सर्वात आधी होतो... सोपानच्या भरलेल्या घरावर सावट पडलं होतं..

कल्पना मीठ मोहरी ओवाळायला म्हणून मोहरी आणायला धावली तेव्हा..

... अजित कामत मोहरीने वर्तुळ काढून त्याच्या आत स्वतःच्या अंगठ्याच्या रक्ताची धार धरत होता..

लवकरच... किंचाळ्या फोडत.. बर्वेचे तेथे आगमन होणार होते...

===================================

बारकं करडू नेहमीसारखं कुठेतरी लपलेलं असणार आणि अख्खी सकाळ त्याला शोधण्यात जाणार आणि त्याला भूक लागली की शेळीपाशी येणार आणि मग आपण त्याच्या गळ्यात हा दोर बांधणार... हे गीताला माहीत होते... ती आज त्याला शोधणारच नव्हती...

अठरा वर्षांची गीता रोजच गुरे हाकायला घेऊन जायची... बाराव्या वर्षी जबरदस्तीने लग्न लावल्यानंतर सासरच्यांनी लहान मुलीच्याप्रती माणूसकीही न दाखवल्यामुळे व तिला राबायला लावल्यामुळे तिच्या सोळाव्या वर्षी तिचे वडील आणि गावातले काही जण तिला सरळ कायमची माहेरी घेऊन आले आणि तमाम दिवे आणि सावेळे गावात उदाहरण घालून दिलं की लग्न झालेली मुलगी माहेरी कायमची राहिली तर तिची बदनामी होण्याचे काहीच कारण नाही... उलट बदनामी झाली पाहिजे राक्षसासारख्या सासरच्यांची...

पण तरी त्या बारक्या करडाची थोडीशी काळजी तिला होतीच...

लटक्याच रागाने ती उठली आणि इकडेतिकडे शोधू लागली... इतके उंडारणारे करडू दिवे गावात अनेक वर्षांनी जन्मलेले होते..

शेळीला तर काही देणेघेणेच नव्हते त्याच्याशी...

आणि एका टेकाडाच्या टोकापाशी येऊन गीता सहज खाली वाकून उभी राहिली आणि...

नखशिखांत दचकली..

अजगर!

एक भला मोठा अजगर ते करडू गिळत होता.. करडू करुण नजरेने गीताकदे पाहात पाहात आत जात होते.. त्याच्या धडपडीत काही ताकदही नव्हती...

किंचाळण्याचेही तिला सुचले नाही... खिळल्यासारखी त्या करडाची संपणारी धडपड आणि अदृष्य होणारे शरीर ती पाहात राहिली..

आणि तिच्या कानात आवाज गुंजला..

"जा घरी गुरं घेऊन... एकच... एकच बळी घ्यायचा होता.. "

त्या अमानवी आवाजाच्या परिणामाने कानांवर हात ठेवून गीता तेथेच बेशुद्ध पडली...

दिवेगावाच्या मागे असलेल्या चरण्याच्या माळावर... सावट पडलेले होते...

आणि ... बळी जातानाची पहिली अभद्र आणि कर्णकर्कश्श किंकाळी गेस्ट हाऊसमध्ये फुटली होती..

अजितच्या खोलीत बसलेले चौघेही... घामाने नखशिखांत भिजलेले होते... तरीही थिजलेले होते..

आणि तो बळी दिल्यामुळे... शक्ती कार्यान्वित होऊन... किंचाळणार्‍या बर्वेचा.. मावशींच्या खोलीत प्रवेश झालेला होता..

===================================

अरुंद आणि कधीही पडू शकेल अशा दिवे आणि सावेळे गावामधील पुलावरून सुरेश आणि कथा.. दोघे मान खाली घालून चालले होते.. मान खाली घालण्याचे कारण होते लज्जा!

कथाचे गाल गुलाबी झाले होते आणि आश्चर्य म्हणजे.. सुरेशचेही..

दोघे शेजारी राहणारे... आणि एकाच वयाचेही... सतरा अठरा..

कथाला नाशिकला सोडण्याची जबाबदारी सुरेशवर देण्यात आली होती... लहानपणापासूनच्या मैत्रीला तारुण्याने गुलाबी झालर लावली असल्याने गेले तीन चार वर्षे दोघे एकमेकांशी किंचितच बोलायचे.. नजरा झुकलेल्या.. पण कुतुहलाने वारंवार एकमेकांकडे वळणार्‍या.. एकमेकांची वाट पाहणार्‍या.. एकमेकांसाठी आसूसल्या आहेत हे एकमेकांना नजरेनेच सांगणार्‍या... पण समाजाच्या भीतीने लाजून चूपचाप राहणार्‍या नजरा..

आजही मिसळत होत्या जेमतेमच! कारण आज जो एकांत मिळाला होता... तो अचानक मिळाल्यामुळे काय करावे, काय बोलावे, कसे वागावे हेच समजत नव्हते.. आणि कथाच्या समवेत चालताना सुरेशला फुलांवरून चालत असल्यासारखे वाटत होते...

एक शब्दही न बोलता पूल ओलांडताना त्यांना बाजी आडवा आला.. आणि अचानक म्हणाला..

"जाऊ नका रे पोरांनो पुढं.."

"का?? " सुरेशने विचारले..

"काय म्हाईत.. मलाबी जो भ्येटंल त्यो ह्येच सांगून र्‍हायलाय.. जायचं तर जा.. "

वेळ सकाळची होती.. पूलावर अगदी शेवटी दोन माणसेही गप्पा मारत उभी राहिलेली दिसत होती.. त्यात काय घाबरायचंय?? सुरेशने कथाला धीर दिला व शांतपणे ते चालत राहिले..

काहीच वेगळं नव्हतं.. नेहमीसारखाच पूल.. नेहमीसारखीच सकाळ...

आणि पुलाचा दुसरा एन्ड जेव्हा जवळ आला.. तेव्हा जाणवलं..

आज सगळं सगळं.. अगदी सगळंच्या सगळंच वेगळं होतं..

तेथे गप्पा मारत बसलेली ती दोन माणसे...

दोघांनाही सुरेश आणि कथा अगदी अगदी नीट ओळखत होते...

आपटे आजोबा... आणि.. झुंबर गोरे..

कथा बेशुद्ध पडलेली आहे याकडे ढुंकूनही बघण्याची सुरेशची परिस्थितीच नव्हती...

तो सुटला होता पळत.. तुफान वेगाने.. घराकडे...

आणि बेशुद्ध पडलेल्या कथाला आपटे आजोबा हालवून उठवायचा प्रयत्न करत होते.. झुंबर गोरे पाणी आणण्यासाठी नदीकडे धावला होता...

पुलावरही होतेच सावट! गेस्ट हाऊसमधील मावशींच्या खोलीत... मोहरीच्या वर्तुळात चुकून अडकलेल्या बर्वेला अजित कामतने पहिला जाब विचारला होता...

आपटे आजोबा आणि झुंबरला का मारलेस???

आणि प्रश्नाचे उत्तर देता येत नसल्यामुळे मनूच्या रुपातील बर्वे.. जिवाच्या आकांताने किंचाळत असताना..

अजितच्या खोलीत अर्चना रडून रडून अर्धमेली झालेली होती...

================================

एक स्वस्त पावडर आपल्या अंगावर चोपडत आरशात पाहात नंदिनीने आरश्याच्या मागे ठेवलेले पाते एकदा हातात घेऊन पाहिले आणि मग घड्याळाकडे..

सव्वा आठ झालेले होते.. भीमा कांबळे कधीही येणार होता...

नंदिनी! कर्नाटकातील एक देवदासी तिथून पळ काढून एका माणसाबरोबर दिव्यात येऊन राहिली होती गेली तीन वर्षे... शेवटी तो माणूस तिलाही कंटाळून तिथून निघून गेला होता आणि मग नंदिनीने गावाला वेड लावलं होतं... धनवान माणसाला ती आपल्या कटाक्षांनी घायाळ करायची आणि भरपूर पैसा मिळवण्याच्या मागे लागायची...

तिच्याकडे नियमीतपणे जाणार्‍या चारही माणसांना बाकीचे तिघेही तिच्याकडे जातात याची पूर्ण माहिती असूनही त्यांना त्यात काहीच वाटायचे नाही.. निदान.. गेल्या पंधरा दिवसापुर्वीपर्यंत तरी...

मात्र गेल्या पंधरा दिवसापासून भीमा.. जो रात्री दहाला येऊन पहाटे जायचा.. तो मागे लागला होता..

बाकीच्यांचा नाद सोड.. माझ्याबरोबर राहा.. माझ्या बायकोला हरकत नाही आहे.. असली तरी तिला देईन माहेरी पाठवून..

आणि नंदिनी म्हणत होती की तिच्याशी घटस्फोट घेऊन माझ्याशी लग्न करणार असलास तर येईन.. नाहीतर हे तिघे असेच येत राहतील..

आणि परवा रात्री मोठे भांडण झाले.. इतके की भीमाने नंदिनीला फटकेही दिले.. तिनेही चवताळून त्याचे मनगट चावले.. पण नंतर तो अधिक हिंस्त्र झाला तसा तिने तात्पुरता त्याच्या प्रस्तावावर होकार दिला.... तो येडाच होता.. त्याला खरे वाटले.. उद्याची रात्र विचार करण्यासाठी द्या असे नंदिनी म्हणाली.. पण काल रात्री तिला पळून जाणे शक्य झाले नाही... आणि आज सकाळी भीमा सव्वा आठ ते साडे आठला येऊन निर्णय मागणार होता..

नंदिनीने सरळ ठरवून ठेवले होते.. भीमावर वार करायचा... त्याला खलास करायचे.. आपल्यावर बालंट येणे शक्य नाही कारण आपण तो जबरदस्ती करत होता असे म्हणू शकतो... आपले आणि काही जणांचे संबंध सगळ्यांना माहीत असले तरी आपले बाकीचे तीन साथीदार आपल्याला त्यातून नक्की बाहेर काढतील..

आणि पटापटा आवरुन नंदिनी तयार होतीय तोवरच दार वाजले..

लाडीकपणाची अतिशयोक्ती करत नंदिनीने दार उघडले आणि तिच्या चेहर्‍यावरचे ते हास्य पाहूनच भीमा वितळला.. पाघळला.. आत येऊन त्याने दारावर आतून लाथ मारली आणि तिच्यावर चुंबनांची बरसात केली..

त्याला तिचे ते हासणे हा तिचा होकार वाटत होता...

त्याच्या मिठीत गुदमरत असतानाच नंदिनीने आपला उजवा हात हळूच मागे नेला..

भीमाला आता आवेग सहन होत नव्हता.. त्यातच त्याची मान चुकून कपाटाकडे वळली.. कपाटाला भला मोठा आरसा होता...

आणि आरश्यात ते स्पष्ट दिसत होते.. नंदिनीच्या उजव्या हातात ते मोठे दहा इंची पाते आलेले होते... त्यावरची तिची पकड घट्ट.. घट्ट.. अधिकच घट्ट होत आहे हेही भीमाला जाणवले..

क्षणभर थरकाप उडलेला असूनही... त्याला याचा आनंद झाला की त्याला हे आधीच समजले..

नंदिनीने काहीही हालचाल करण्यापुर्वीच भीमाने तिला गर्रकन वळवली व तिच्या हातातील पाते ओढले..

आणि... त्याचा एक सप्पकन वार तिच्या पोटात केला...

किंचाळलीही नाही ती... बाजी उलटलेली होती तिची...

अजित कामत मात्र किंचाळला...

कारण त्या मोहरीच्या वर्तुळात जिवाच्या आकांताने किंचाळतानाच बर्वेला वर्तुळ आखण्यातील एक चूक झालेली लक्षात आलेली होती.. तो अजित कामतपेक्षा अधिक अघोरी ज्ञानी असल्यामुळेच ती त्याच्या लक्षात आली.. परिणामतः त्याने त्याच घटकेला वर्तुळातून बाहेर जाऊन स्वतःची सुटका करून घेतली आणि अजितच्या खोलीत बसलेल्यांना प्रथमच.. मनूच्या खदाखदा हासण्याचा आवाज आला.. लहान मुलाच्याच नेहमीच्या आवाजात..

मात्र पाठोपाठ... अजितची गगनभेदी किंचाळी... बहुतेक सगळेच संपलेले होते..

कारण आता अजित कामत त्याच वर्तुळात होता... आणि बर्वे खदाखदा हासत होता..

पुढच्या एक तासात घडणार होता एक भीषण, थरारक आणि अमानवी सामना....

.... एक अघोरी नाट्य... ज्याचा अंत आता अजिबातच सांगता येणार नव्हता...

बर्वेच्या हातात सगळा ताबा गेल्यामुळे...

.. दिवे गावावरचे सावट मात्र गडद झालेले होते...

गुलमोहर: 

हा भाग जमला नाही असे वाटले. कदाचित इतर भागांच्या तूलनेत छोटा असल्याने असेल.
अर्थातच अंतिम भागाच्या प्रतिक्षेत.

अरे वा................छान आहे................थोडी लांबवाच...............दोघांच्यात सामना जरा रंगु द्या...........कधी हा तर कधी तो वरचढ होउ द्या............

किमान १५ भागांची तरी असावी............

नही......................
हे का झालं.
अजुन सपंल नाही मला वाटलं आजच निकाल लगला?
हुश्श्श्श अजुन आहे.........?
मज्जा येईल.

.

हम्म.. वाचतोय ( एवढा अपमान होऊन सुद्धा, खरा पंखा यालाच म्हणत असावेत )
.....असो आपण सगळे एकाच परीवारातले आहोत्......मान अपमान कशाला ......मुठ्भर आयुष्य.....मजेत जगायच..पण तुमच मन खरच छान आहे हे समजल.....तुमच स्वागत ...

हे इथे लिहीणयाच कारण एव्हढ्च की इथे सगळ्याचे प्रतिसाद न चुकता वाचते......तुमचेही...आणी यापुढेही वाचायला आवडतील......

धन्यवाद......

सावरी

प्रसन्न अ - ते तुम्हाला उद्देशून नव्ह्ते इतकी खात्री जरूर बाळगा. तुम्हाला उद्देशून मीआधीच प्रतिसाद दिला होता.

जबर्दस्त! बर्याच काळाने मायबोलीवर आले मुलीला सध्या बरे नाही म्हणुन वेळ मिळत नाही.
पण भुताच्या गोष्टी आवडतात . ही गोष्ट त्या इ स १०००० पेक्षा जास्त आवडली.

विशेष जमला नाही हा भाग. पकड सुटल्या सारखे प्रकर्षाने जाणवले. गावावर पडलेले सावट दाखवण्यासाठी निर्माण केलेल्या घटना मुळ कथाबीजाशी (कादंबरी) सुसंगत वाटत नाहीये.

पण कादंबरी मस्त चाललीय, वेग ही ऊत्तम आहे आणि उत्सुकताही छानपैकी ताणली गेलीय.

पुलेशु

नमस्कार....खर तर काल ९ व्या भागावर प्रतिसाद द्यायच्या आतच नवीन भाग आला....
खुपच छान वेग आहे.....मस्तच....पण एक शन्का आहे ...आठ्शे वर्षापुर्वीच्या मनाचा अजुन उलगडा केलेला नाही.......तेन्व्हा त्याही बद्दल जाणुन घ्यायला आवडेल्....जस बर्वे बद्दल तुम्ही सान्गीतलेत्.....वाट पाहतोय नवीन भागाची...शुभेच्छा.......

सावरी

सहि ! अजुन गडद रंग भरा. <<<दोघांच्यात सामना जरा रंगु द्या...........कधी हा तर कधी तो वरचढ होउ द्या............>>>
अनुमोदन

बर्वे ला चांगलाच बडवा.

बर्वे ला चांगलाच बडवा.
>>

हे खूपच प्रेडीक्टेबल ...एक्क्षपेक्टेड,... झालं ...असं काही दाखवा की काक्याच्या विजय होतो पण .....मावशीच मुळ सुत्रधार आहे ...किंव्वा अर्चना ! ती त्याला वापरुन घेत असते !

.
.
.....च्या आता हे ही मी एक्स्पेक्ट करतोय...

I want something really really unexpected ....:फिदी:

<<<हे खूपच प्रेडीक्टेबल ...एक्क्षपेक्टेड,... झालं ...असं काही दाखवा की काक्याच्या विजय होतो पण .....मावशीच मुळ सुत्रधार आहे ...किंव्वा अर्चना ! ती त्याला वापरुन घेत असते !

.
.
.....च्या आता हे ही मी एक्स्पेक्ट करतोय...

I want something really really unexpected .... >>>

हे पण चालेल.