सावट - ४

Submitted by बेफ़िकीर on 12 May, 2011 - 05:26

मावशी झापत असताना अर्चना डोळे फाडून मावशींकडे बघत होती. दुसर्‍या दिवशी दुपारचा प्रसंग हा! सतीश आणि अजित कामाला गेलेले होते. नॉर्मल झालेली नमा एका संस्थेत बोलणी करायला गेली होती. मनू झोपलेला होता. आणि मावशी अर्चना स्वैपाकघरात बोलावून प्रचंड झापत होत्या. हे इथे चालणार नाही, तुझ्या नवर्‍याला माहीत नाही का, त्याला कळले तर संसार उध्वस्त होईल हे समजत नाही का! अजित तरी असा कसा काय वागू शकतो! पण मुळात बाईमाणसाने काळजी घ्यायला नको का! मला वाटलेच नव्हते की तू असली असशील!

जवळपास तीन ते चार मिनिटांनंतर अर्चनाला विषय लक्षात आला आणि ती डोळे विस्फारून मावशींकडे बघतच बसली. ती काहीच उत्तर देत नाही आहे हे पाहून मावशींनी एक सेकंद बोलण्यात गॅप घेतली आणि अर्चना हमसाहमशी रडायला लागली. स्वतःच्याच कपाळावर अनेकदा हात आपटून तिने जे ऐकले त्याचा निषेध व्यक्त केला आणि अचानक रडणे थांबवून म्हणाली..

"वयाने मोठ्या आणि आम्हाला जागा देऊ करणार्‍या म्हणून तुमचा आदर वाटायचा मला... लाजलज्जा वाटत नाही का असे बोलताना?? आं?? कुणाला काय बोलता आहात तुम्ही?? आजच्या आज ह्यांना मी ही जागा सोडायला सांगते.. "

"गप्प बस.. कुणाशी बोलतीयस?? काय चाळे चालले होते काल तुमचे दोघांचे?? तुला काय वाटले माझे लक्ष नाही??"

"मावशीSSSSS .. तोंड बंद करा तुमचं.. काय बोलताय..."

अर्चना धावत खोलीत निघून गेली आणि पलंगावर पडून रडू लागली. इकडे मावशी तिचे हावभाव पाहून खरच विचार करू लागल्या. एखाद्या स्त्रीला तिच्या भानगडी इतरांना कळल्यानंतर ती करेल तसे हे आविर्भाव होते की यात खोटे ऐकायला लागले याचे खरेखुरे दु:ख होते! काहीही पान न करता होणार असलेल्या बदनामीची खरीखुरी भीती होती??

मावशींना त्यांचे डोळे जे सांगत होते ते ऐकणे अधिक विश्वासार्ह वाटत होते. त्यांनी स्वतः जे पाहिले होते त्यावर त्यांचा विश्वास अधिक बसत होता. आजवर अर्चना आणि अजितच्या वागण्यात असे काहीही दिसलेले नव्हते. याकडे त्यांचे लक्षच वळत नव्हते.

कालपासून घरात काय चाललेले होते हे काही समजत नव्हते. काल रात्रीपर्यंत नमा विचित्र अवस्थेत होती. ती नॉर्मल झाली म्हणेतोवर अजित आणि अर्चनाचा तो प्रसंग दिसला. घर बाधित झाले की काय असा प्रश्न मनात येत होता. मावशींनी ठरवले. इतके चांगले गेस्ट हाऊस, इतकी चांगली माणसे असे असताना आपण पुढाकार घ्यायला हवा. फक्त लोकांकडून न घाबरण्याच्या आणि सत्शील वागण्याच्या अपेक्षा करणे हे आत्ता चुकीचे ठरले! हे आपले गेस्ट हाऊस आहे, वास्तू आपली आहे. आपल्याकडे तसे आपल्यासाठी स्वतःसाठी गडगंज असले तरी एक सोबत म्हणून आपण काही चांगल्या माणसांना जागा देत आहोत. पुढे मागे आपल्याकडे कुणीतरी बघावे असाही त्यात हेतू आहे. असे असताना येथे आलेल्या माणसांना जर वास्तूमध्येच काही दोष आढळला तर ती कायमची निघून जातील. कदाचित अजित आणि अर्चना यांचे काही असेलही! पण आपल्याला जे आठवत आहे त्याप्रमाणे अर्चना सतीशच्या शेजारी होती. तिथे अजित कसा आला? अजितसाठि सतीश थोडाच सरकून बाजूला झोपला असता?

आपल्यालालाच पुढाकार घ्यायला हवा. कुणालातरी भेटायला हवे. आणि तेही आजच!

गणपतीच्या देवळामागे एक आपटे म्हणून होते. वृद्ध होते. त्यांना कळते असे लोक सांगायचे. दर गुरुवारी लोक त्यांन जाऊन भेटायचेही! काही अडचण असली तर ती ते आपट्यांना सांगायचे.

आज बुधवार होता. पण चोवीस तास थांबलो तर आणखीन काही प्रकार होऊ शकतील हे मावशींना माहीत होते. काका थोरात गेलेला होता. तो जिवंत असता तरी असल्या माणसाला मावशींनी कदापी घरात प्रवेश दिला नसता.

मावशी हळूच चपला घालून निघाल्या. जाताना त्यांना काय वाटले कुणास ठाऊक! अर्चनाला घेऊन जावे कीकाय असा विचार करत त्या तिथे रेंगाळल्या. पुन्हा मागे आल्या आणि अर्चनाच्या खोलीचे दार वाजवले. अर्चनाने दार उघडले, मावशींकडे एक तिरस्काराचा कटाक्ष टाकला आणि पाठ फिरवून आत गेली.

मावशी आत आल्या.

"अर्चना.. एक लक्षात घे.. जे मी पाहिले.. स्वतःच्या डोळ्यांनी.. ते मी बोलले.. ते खोटेच असणार.. पण आपल्या वास्तूत काय काय चाललेले आहे त्याचा सगळ्यात जास्त अनुभव तुलाच आलाय ना?? आता मला सांग.. सतीश तुझ्या शेजारी असताना मला अजित तिथे दिसलाच कसा?? नाही नाही ते प्रकार डोळ्यांना दिसलेच कसे?? . मी असा विचार केला की हाही त्यातलाच प्रकार असावा.. म्हणून.. म्हणून मी एक म्हणजे तुझी क्षमा मागायला आली आहे... आणि दुसरे म्हणजे.. एक आपटे म्हणून आहेत.. त्यांना यातलं कळतं.. आपण आत्ता त्यांच्याकडे जाऊन हे संकट सांगूयात.. चल माझ्याबरोबर... मावशी चुकल्या तर मोठं मन करून सोडून दे... हं??"

अर्चना अजूनही स्फुंदत होती. पण आता तिला त्यात सेन्स जाणवू लागला होता. मावशीही असे कधीच बोलल्या नव्हत्या हे तिला जाणवले. तिने मागे वळून पाहिले. मावशींच्या मुद्रेवर पश्चात्ताप आणि अपेक्षा होती तिने ते सोडून देण्याची! अर्चना मावशींना बिलगली. मावशी तिला थोपटत होत्या. काही क्षणांनी अर्चनाने विचारले.

"कोण आपटे??"

"गणेश मंदिरामागे राहतात... भूत वगैरे कळते त्यांना..."

"ठीक आहे... जाऊयात.. चला..."

मनूला घेऊन अर्चना बाहेर आली. मावशींनी कुलूप लावले. सतीश आणि अजितकडे एकेक किल्ल असल्याने चिंता नव्हती. नमा आली तरच प्रॉब्लेम होणार होता. मावशींनी शेजारच्या वहिनींना निरोप सांगायला सांगितला की त्या दोघी तासाभरात परत येत आहेत.

आणि दोघी रस्त्याला लागल्या. मनू उन्हात बाहेर नेले जात आहे म्हणून वैतागला होता. त्याला कडेवर घेणेही शक्य नव्हते सारखे! मिनिटभरासाठी अर्चनाने मनूला जमीनीवर उतरवले तर त्याने रस्त्यावरचा एक दगड घेतला आणि मावशींच्या दिशेने भिरकावला जोरात. खरे तर इतका काही तो ताकदीने भिरकावला गेलेला नव्हता. पण नेमका मावशींच्या नाकावर आपटला. त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले. ते पाहून मनू स्वतःच घाबरला व रडू लागला. त्यातच त्याला अर्चनाने धपाटे मारले. मावशीनाक धरून घरात परतल्या व मागोमाग अर्चनाही! तिने मावशींच्या नाकाला हळद वगैरे लावून दिली. नाक चांगले सुजलेले होते. मावशी आता विचित्रच दिसू लागल्या होत्या. अचानक रडणे थांबलेला मनू मावशींचे ते विचित्र नाक आणि एकंदर अवतार पाहून जोरात हासला. तसा अर्चनाने आणखीन एक धपाटा त्याला ठेवून दिला. मावशी आता त्यांच्या खोलीत जाऊन पडल्या होत्या. आज दुपारचे जेवण आता अर्चनालाच बनवावे लागणार होते.

मावशी त्यांच्या खोलीत जाऊन निजतायत तोवर सतीश आला. सतीश जेवायला घरी यायचा. त्याला पाहिल्यावर अर्चनाच्या डोळ्यात पाणीच आले. याला जर मावशींनी काहीबाही सांगितले तर याला काय वाटेल? त्यातच मनूने फेकलेल्या दगडाची कहाणी अर्चनाने सांगितल्यावर सतीश हादरलाच. त्याने मनूला फटका वगैरे दिला नाही, पण त्याला आश्चर्यच वाटले. इतक्या लहान वयात, कधीही असे न वागलेला मनू दगड उचलतो काय, तो बरोब्बर मावशींच्या नाकावरच लागतो काय आणि त्यांना एवढी मोठी जखम होते काय! तो मावशींची विचारपूस करून खोलीत आला व पानावर बसला. त्याचे जेवण उरकायला आले तशी अर्चना म्हणाली..

"अहो.. ते कोण आपटे आहेत ते तुम्हाला माहीत आहेत का?? त्यांना यातलं कळतं म्हणे.. "

"नाही बाबा..."

"गणेश मंदिर माहितीय का??"

"गणेश मंदिर माहितीय.. "

"त्याच्याच मागे राहतात... "

"ओके.. "

"त्यांना जा ना आत्ताच भेटायला.. हे असे काही बरोबर नाही.. जे काय चाललेले आहे ते.."

"अर्चना.. मला काही हे पटत नाही.. हे भास असतात.. "

"काय भास असतात?? त्या मुलीचा हात तुटलेला दिसणे हा भास आहे?? तोच हात माळ्यावर दिसणे हा भास आहे??"

"आय अ‍ॅग्री.. पण.. ते आता संपलेले आहे... आता त्यावर पुन्हा चर्चा कशाला??"

"अहो कशावरून संपलेले आहे?? "

"पुन्हा काही झालंय का??"

आता स्वतःच्या नवर्‍याला कसे सांगायचे की काल मी अजितच्या मिठीत झोपले होते असे मावशींनी बघितले??

"तुम्ही फक्त जा हो.. का आणि कसे विचारत बसू नका... "

"मला आत्ता ऑफीस आहे... "

"ऑफीसला उशीरा गेलात तर काही बिघडत नाही..

"अजित आला की संध्याकाळी जाऊ... "

"भावजींना न्यायची काSSSSही गरज नाहीये.. "

अर्चनाचा तो तीव्र स्वर पाहून सतीशने चमकून तिच्याकडे पाहिले. तिला अजितचा रागबिग आलाय की काय असे त्याला वाटले.

"का?.. अजित आला तर काय??"

"तुम्ही माझे ऐकणार आहात की नाही??"

"मला एक समजत नाही की एक की एकच कसे डोक्यात घेता तुम्ही बायका.. आता त्या आपट्यांना काय समजणार आहे यातलं?.. तो असेल एक धार्मिक माणूस.. "

"तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना भेटायला जा.. तुम्हाला समजत नाही इथे केव्हाही काहीही घडू शकतं?? अजून मनू लहान आहे.. त्याला अचानक काही झाले तर किती धावाधाव होईल?? नाशिकला जायचं तरी दोन तास लागतात.."

शेवटी सतीश तयार झाला आणि निघताना पाहिले तर त्याच्या चपला घालून मनू बोळात चालत होता..

"मनू.. माझ्या चपला दे बेटा.. बाबांना ऑफीसला जायचंय.. "

"न्ना.. "

"ए हा बघ गं... चपला दे पटकन... "

"नाई देनाल.. "

अर्चनाने बाहेर येऊन मनूला उचलले आणि चपला सतीशच्या पुढ्यात टाकल्या. सतीश चपला घालून बाहेर पडणार तोच..

आजूबाजूच्या झाडांवरच्या पक्षांचे आवाज थांबले.. पानांची सळसळ थांबली असावी असे जाणवू लागले... एक विचित्र सावट जाणवू लागले.. भर दुपारी एखाद्या अभद्र जागेत आपण असल्यासारखे अर्चना आणि सतीशला जाणवू लागले.. ती जाणीव शब्दबद्ध करण्याची त्या दोघांचीही क्षमताच नव्हती.. पण हबकल्यासारखे एकाच क्षणी ते एकमेकांकडे पाहू लागले.. आणि बघतच बसले.. काय जाणवत आहे ते बोलता येत नव्हते.. पण हवेतला, टेम्परेचरमधला आणि आजूबाजूच्या कोलाहलातील फरक स्पष्ट कळत होता.. सतीश थबकल्यासारखा तिथेच उभा होता.. आता अर्चनाही त्याला जायचा आग्रह करत नव्हती... कारण आत्ता या क्षणी प्रायॉरिटीच वेगळी होती... काहीतरी आत आल्यासारखे वाटत होते.. काहीतरी आत येत होते.. मनू मात्र आता बोळात गाडीगाडी खेळत होता.. त्याला काहीही जाणवले नव्हते...

"अर्चना... "

सतीश अर्चनाकडे पाहात विचारण्याचा प्रयत्न करत होता की तिलाही काही जाणवले का?

अर्थातच तिलाही ते जाणवलेले होते. अर्चना तर थरथर कापत होती. टळटळीत ऊन्हे असलेली दुपार ती! पण आत्ता एकही आवाज कानात शिरत नव्हता. कानात शिरत एक अभद्र सुरात चित्कारणारे सावट! कसलेतरीच आवाज होते ते! कुणी बाईने किंकाळ्या फोडाव्यात! खूप मारहाण चाललेली असावी. कुणीतरी शस्त्राचा वापर करत असावे. बाई बेंबीच्या देठापासून किंचाळत असावी. कुणीतरी विव्हळतंय! खूप धावाधाव! शिव्यांची खैरात! आणि वेदनांमुळे फोडलेले हंबरडे! पडझड! त्यातच एका पुरुषाने अतीव वेदनांनी खच्चून ओरडणे आणि ते ओरडणे मेल्यानंतर बंद पडावे तसे बंद पडणे!

जमीनीला खिळले होते सतीश आणि अर्चना! मनू अजूनही गाडीच खेळत होता.

त्यातच एका बाईचा आक्रोशयुक्त आवाज! "आलं... आलं..."! खूप पळापळ व्हावी तसे आवाज!

"काय आलं?? ...काय आलं?"

अर्चना स्वतःच्या कानांवर दोन्ही हात ठेवत किंचाळत 'काय आलं' असे म्हणत जमीनीवर मटकन बसली.

सतीशला तिच्याकडे धावण्याचाही जोर एकवटता येत नव्हता.

आणि त्याच क्षणी.. दोघांचीही नजर मागच्या बाजूला वळली....

नाकातून अजूनही रक्ताची संततधार असलेल्या मावशी अत्यंत भेसूर चेहरा करून बोळाच्या तोंडाशी उभ्या होत्या आणि त्यांचे ते भयानक रूप पाहून गर्भगळीत व्हायची वेळ येतीय तोवर दोघांच्याही नजरा बोळाच्या दुसर्‍या तोंडाशी असलेल्या प्रमुख दरवाज्यात लागलेल्या चाहुलीकडे वळल्या..

अजित कामत!

दरवाज्यात हे एवढे डोळे विस्फारून काळासारखा अजित कामत उभा होता... त्याला तसा पाहताच मनू घाबरून धावत आत गेला व रडू लागला..

अविश्वासाचा पहिला वार त्या घरावर पडला होता... होय... अविश्वासाचा.. कोणी.. कुणाला.. कशासाठी घाबरायचं हेच समजेनासं होणार होतं यापुढे...

स्तब्ध, थिजलेल्या नजरेने सतीश आणि अर्चना; मावशी व अजितकडे आळीपाळीने पाहात असतानाच..

दरवाज्यातून .. अचानक नमा आली... अजितला 'एक मिनिट' असे म्हणून साईड मिळवून पुढे आली..

आणि तिला पाहताच मावशी तातडीने तिथून निघून गेल्या. अत्यंत नॉर्मल असल्याप्रमाणे नमा अर्चनाला हासत हासत विचारत होती..

"अरे ताई?? अशा का बसलायत?? पुन्हा भूत बित आलं की काय?? भर दुपारचं??"

कसे ते माहीत नाही... पण.. त्याच क्षणी ते सावट नष्ट झालेले होते.. पुन्हा पावित्र्याचे वारे वाहू लागलेले होते..

=============================================

तहान लागली म्हणून पाणी पिणे सोडले तर त्या दिवशी कुणी अन्नाचा एक घासही घेतला नाही. नमाने स्वतःपुरता स्वैपाक करून घेतला तोही मावशींच्या सांगण्यावरून! अजित त्याच्या खोलीत जाऊन बसला होता व बाहेर येणारच नाही म्हणत होता.. त्यामुळे नमाला एक पुरुष इतका घाबरतो याचे हसू येऊ लागले होते.. मात्र ती अव्याहत मावशींची मात्र सेवा करत होती.. मधेच जाऊन अर्चनालाही भेटून येत होती.. मनूशी जमेल तसे खेळत होती.. त्याला खेळवत होती..

सतीशने अर्चनाला गरम पाणी करून दिले होते. नमाने आणलेला चहा पाजलेला होता. मनू सारखा विचारत होता की आईला काय झाले. त्यावर सतीश त्याला 'बाऊ झालाय, होईल बरा आत्ता' असे सांगत होता. मग मनू निरागसपणे हासत होता..

संध्याकाळ झाली, अंधार पडू लागला. दुपारी झालेल्या प्रकारानंतर सतीश आणि अजित ऑफीसला गेलेच नव्हते. मावशींच्या सांगण्यावरून नमाने शेजारच्या जोंधळे वहिनींना आपटे आजोबांना बोलवायची विनंती केलेली होती.

अत्यंत नेहमीसारखी संध्याकाळ होती ती! मात्र साडे सात वाजले.. आणि.. बाहेरचे वाहतुकीचे आवाज मंद मंद होऊ लागले.. झाडांवर पक्ष्यांची भरलेली शाळा जणू रात्र असावी तशी नि:शब्द झाली... वारा येईनासा झाला.. सावट! पुन्हा तेच सावट येऊ लागलेले होते.. अजित कामत खोलीतच होता.. नमा मावशींकडे होती... अर्चना हळूहळू नॉर्मलला येत होती.. अजूनही मनू खेळतच होता.. सतीश चिंताक्रांत होऊन अर्चनापाशी बसला होता..

हे जवळपास तेच वातावरण होते जे दुपारी जाणवले होते.. आता काय होणार हे समजत नव्हते..

आणि जे होणार होते.. ते झाले..

पुन्हा अर्चना आणि सतीशला त्याच हाका ऐकू आल्या.. "आलं.. आलं... "

दचकून अर्चना उठून उभी राहिली तसा सतीश तिला सोडून खोलीच्या दाराकडे धावला.. काय आलं ते काही समजत नव्हतं...

पण त्याच क्षणी... ओह माय गॉड.. समोरच असलेल्या अजितच्या खोलीचे दार उघडले... आणि..

कंबरेवर्ती उघडाबंब असलेला अजित दाराबाहेर आला.. त्याच्या छातीवर तीन जखमा होत्या.. त्याचा चेहरा वेदनांनी पिळवटून निघालेला होता.. तो डोळे ताणून सतीशकडे पाहात होता.. मात्र त्याचे भयावह दर्शन होऊनही सतीश जमीनीला खिळल्यासारखाच उभा होता... त्यातच एकीकडून नमा धावत आली.. तिलाही काहीतरी जाणवलेलं असावं.. अजितला तसा पाहून ती किंचाळनार तोच..

ते सावट नष्ट होत असल्याची जाणीव झाली.. सगळ्यांनाच... कारण.. आपटे आजोबा आत येत होते..

आपटे आजोबा! पाच फुटी बुटकी मूर्ती! पण डोळे अत्यंत शार्प! वय असेल ऐंशी! ताडताड चालू शकायचे अजूनही! रामभक्त आपटे आजोबा! गोरापान कोकणस्थी रंग, याही वयात ताठ असलेला बुटका देह आणि डोळ्यांमध्ये पावित्र्याच्या जोरावर कोणतेही साहस करू शकण्याचे भाव!

त्यांना पाहताच ते सावट नष्ट झाले होते. त्यांना पाहताच नमा एकदम मनमोकळेपणाने हासली होती. सतीश मात्र अजूनही अजितकडेच पाहात होता. आणि अजित??

अजीतच्या चेहर्‍यावर लाचार हास्य होते. पकडले गेल्यावर येते तसे! रेड हॅन्ड! सतीशकडे व नंतर स्वतःच्या छातीकडे बघत तो अपराधी व लाचार हासत म्हणाला..

"ते .. माळ्यावर कुठलं तरी जुनं त्रिशुळ होतं.. ते छातीवर पडलं म्हणून.. मदत मागायला बाहेर आलो होतो मी... मलम.. मलम आहे का??"

सतीशने अत्यंत क्रोधीत नजरेने अजितकडे पाहिले. त्याला अजिबात वाटत नव्हते की अजीत खरे बोलत आहे. ते जे काही अभद्र सावट आहे ते अजित दिसायच्या आधीच बरोब्बर जाणवते हा अनुभव सतीशने काही तासांमध्ये दोनदा घेतला होता आज! तोवर नमा आपटे आजोबांकडे पोचली होती. मनू कुतुहलाने अजितकाकाच्या छातीवरच्या जखमा आणि ते रक्त बघत होता.

"आपण.. आपटे आजोबा का??"

नमाने आदराने विचारले. आपटे आजोबा अत्यंत धीरगंभीर होते.. काहीतरी शोधत असल्याप्रमाणे ते बोळाचा कोपरा अन कोपरा तपासत होते. नमाकडे न बघताच म्हणाले..

"होय... मावशी कुठे आहेत??"

मावशी तोवर आलेल्या होत्याच! त्यांनी आपटे आजोबांना अभिवादन करून नमाला चहा ठेवायला सांगितला. नमा स्वैपाकघरात पळाली तसे आजोबा म्हणाले..

"ही जागा सोडा... ताबडतोब... "

प्रत्येकजण चरकलेल्या नजरेने आजोबांकडे बघत होता. आजोबा मात्र बोळातून चालताना एका खुंटीपाशीच थांबले होते. ती खुंटी निरखून पाहात होते.

ही जागा कुणालाच कधीच सोडावी लागू नये अशी मावशींची इच्छा होती... कारण ते त्यांच्या उदरनिर्वाहाचे व आधाराचे साधन होते..

त्यांनी चाचरतच आजोबांना विचारले..

"का?? "

आजोबांनी तत्क्षणीच तीक्ष्ण नजरेने मावशींवर नजर रोखली.... त्या नजरेतील पावित्र्याच्या अधिकाराने मावशींसारखी देवभक्त बाईही थरारली...

"जे सांगतो ते ऐका... आणि ऐकायचे नसेल... तर मला बोलावत जाऊ नका.. ही थट्टा नाही... गोवर्धन आपटेला हवा तेव्हा बोलवायचा आणि त्याला प्रतिप्रश्न करायचा... ज्यातलं आपल्याला काही कळत नाही तेथे सांगितलेलं ऐकलेलं चांगलं... काय समजलात???"

मावशी एखादे झाड जमीनीत असावे तशा निश्चल उभ्या राहिलेल्या होत्या.. आता अचानक सतीश अजितला मलम देऊन, त्याच्याकडे एक तिरस्काराचा दृष्टिक्षेप टाकून आजोबांकडे गेला..

आजोबांना म्हणाला..

"आजोबा.. हिला.. हिला कालपासून खूप त्रास झालाय... "

आजोबांनी संतापाने आधी सतीशकडे आणि पाठोपाठ अर्चनाकडे पाहिले...

"तुम्ही कोण???"

"सतीश.. येथे भाड्याने रहतो आम्ही.. ही माझी बायको... हा मुलगा सौरभ... "

आजोबांनी मनूकडे पाहिले आणि काही क्षण पाहात राहिले.. नंतर अर्चनाकडेही पाहात काही क्षण पाहातच राहिले...

मग सतीशकडे पाहात म्हणाले...

"ही जागा तुम्हीपण सोडा... "

सतिश चाचरत म्हणाला..

"सोडतो आजोबा.. पण.. दुसरी एखादी जागा मिळे..."

"माझ्या खोलीवर राहा तोवर.. येथे राहू नका.... काय समजलात??? .. ही.. ही खोली कुणाचीय??"

"ती बंद असते... कुणी राहात नाही तिथे... "

"उघडा ही खोली.. मला पाहायचीय... "

मावशी आत धावल्या. तीन एक मिनिटांनी त्या आल्या आणि ती खोली उघडली.. जळमटे आणि धुळीने भरलेल्य त्य खोलीत श्वास घेणेही अवघड होते.. पण आजोबा तेथे थांबले.. सर्व खोली आपल्या तीक्ष्ण नजरेने पाहात नकारार्थी मान डोलावत ते बाहेर पडले अन म्हणाले..

"बंद करा... "

मावशी ती खोली बंद करेपर्यंत आजोबा स्वयंपाकघरात पोचले होते.. नमा चहा करत होती.. तिला पाहून आजोबा काही क्षण खिळल्यासारखे बघत होते आणि अचानक म्हणाले....

"मूर्ख मुली... तू कशाला आणखीन आलीस इथे???"

नमा चरकलीच! काहीच न बोलता नुसती उभी राहिली. मावशीच लगबगीने म्हणाल्या..

"माझी भाची आहे.. "

तेवढ्यात अर्चना मागून धावत येऊन तीव्र स्वरात पण कमी आवाजात म्हणाली...

"हिलाच... आजोबा... हिलाच काल बाधा झाली होती..."

नमाला वाईट वाटले. पण पर्याय नव्हता. ते खरे होते. मात्र आजोबांनी नमाकडे न पाहताच अर्चनाला उत्तर दिले...

"मला माहीत असलेल्या गोष्टी सांगण्यात वेळेचा अपव्यय करू नकोस.. सामान बांधायला लाग... "

चरकलेली अर्चना दोन पावले मागे झाली.. तरी हिंमतीने म्हणाली..

"आजोबा.. आणि आणखीन एक.... काल रात्री ना??...."

" माSSSळ्याSSSवरून काहीतरी गेलंSSSSS... हेच नाSSSS????"

आजोबांचा तो क्रोधीत चेहरा आणि माळ्यावरून काहीतरी गेलेलं असणं त्यांना माहीत असणं हे अनुभव घेऊन अर्चना मागे सरकत सरकत भिंतीला चिकटून उभी राहिली.. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता..सतीश तिला 'आता मधे बोलू नकोस' अशा खुणा करत होता.. मात्र... एक बाब जरा विचारात घेण्यासारखीच होती... अजित... स्वयंपाकघरात आला कसा नाही???

हा विचार सगळ्यांच्या मनात येतोय न येतोय तोवर आजोबा ताडताड चालत मावशींच्या दोन खोल्यांकडे वळले... त्या खोल्यांमध्ये ते पोचले आणि दारातच थबकले...

खाडकन दोन पावले मागे आले...

गर्रकन मागे वळून सगळ्यांकडे पाहात म्हणाले...

"इथे... इथे काल काय झालं???"

मावशी आणी सगळेच थबकून पाहात होते. मावशी म्हणाल्या...

"काल.. आम्ही सगळे तिकडेच झोपलो होतो.. स्वैपाकघरात.. इथे.. नव्हतंच कुणी..."

आजोबा जवळपास दहा मिनिटे दारात उभे राहून आत पाहात होते... हा कालावधी प्रत्येकालाच असह्य होत होता... काही विचारावं तर ते संतापत होते... जागा सोडा इतकंच म्हणत होते.. आणि जिथे काहीच झालं नाही तिथे दहा मिनिटे नुसतेच थबकून उभे होते... पण प्रकरण फार म्हणजे फारच गंभीर दिसत होतं.. अगदी आपटे आजोबांनाही बहुधा पेलत नसलेलं.. नाहीतर ते खोलीच्या आत नसते का गेले???

"इथे.. कोण असतं??"

"मी.. माझ्या खोल्यायत या.. " मावशींनी उत्तर दिले.

"येथे झोपत जाऊ नका.. इथे बाधा आहे.. संपूर्ण वास्तूतच आहे.. पण या दोन खोल्यांमधील प्रत्येक कणावर बाधा आहे.. येथे झोपत जाऊ नका.. मुळात ही जागाच सोडा... "

एवढे बोलून आजोबा ताडताड चालत नमाच्या खोलीत गेले.. तोवर सगळ्यांच्या पाठोपाठ नमाही चहाचा कप हातात घेऊन तिथे पोचली....

नमाच्या खोलीत आजोबांना पंधरा सेकंद पुरले..

"हम्म्म्म"

असा उद्गार काढत स्वतःला काहीतरी समजल्यासारखी मान हालवत आजोबा नमाच्या खोलीतून बाहेर पडले आणि सगळ्यांकडे बघून म्हणाले...

"संपूर्ण घर मी पाहिलेले आहे... या घराला जबरदस्त बाधा झालेली आहे.. माणूस मरूही शकेल.. कुणीही... तेव्हा.. "

"आजोबा.. तुम्ही अजितची खोली नाही पाहिलीत.. "

सतीशने हे वाक्य बोलायलाच नको होते. घशाच्या शिरा ताणून आपते आजोबा बेभान स्वरात किंचाळले..

"अक्कलशुन्य मुलाSSS.. कुणाशी बोलतोयस कल्पना आहे का?? ती खोली मी न पाहताही पाहिलेली आहे.. माझ्या बोलण्यात व्यत्यय आणू नका... "

सगळे चरकून एकेक पाऊल मागे सरकलेले होते.. आजोबांचा तो आवेशच भयंकर होता.. छातीवर मलम लावून शर्ट घालून अजित आता सगळ्यांबरोबर थांबलेला होता.. पण कसे काय कोण जाणे.. त्याच्या ओठांवर एक हलकेसे स्मितहास्य होते...

आजोबा पुढे बोलू लागले..

"जमले तर आजपासूनच सगळे दुसरीकडे राहायल जा.. ही वास्तू विकायचीही नाही.. आपापल्या वस्तू फक्त घेऊन निघा.. वास्तूतील काहीही न्यायचे नाही... "

"एक... एक.. शंका होती... "

मावशींनी व्यत्यय आणलाच.. तसे आजोबा भडकून मावशींकडे पाहू लागले.. मात्र ओरडले नाहीत.. तसा मावशींना धीर आला..

"काही.. काही उपाय नाही का??.. यावरती?? म्हणजे.. जागा न सोडता... "

मावशींचा प्रश्न पूर्ण झाला नाही.. कारण एका बाजूला खेळत असलेल्या मनूला चुकून ठेच लागली म्हणून तो रडू लागला.. अर्चनाने त्याला उचलले व आत नेले.. त्याला फार काही लागलेले नव्हते.. पण तो लहान असल्यामुळे घाबरून रडत मात्र खूपच होता... आजोबा अर्चना गेली त्या दिशेला पाहात होते.. आता त्यांनी मावशींकडे वळून पाहिले.. आणि काही बोलण्यात तेवढ्यात अजित फस्सकन हासला..

ते हासणे त्या परिस्थितीशी अत्यंत विसंगत होते... अजितलाच बाधा झालेली आहे यावर सर्वांचे मनातल्या मनात एकमत झाले.. पण सतीश मात्र चमकून अजितकडे पाहात म्हणाला..

"काय रे... का हासलास??"

"एवढंसं लागलं तर... केवढा रडतो मनू..."

सतिशलाच काय, सगळ्यांनाच राग आला त्या वाक्याचा! अर्चनालाही, आत असताना तिला ते वाक्य ऐकू आलं! पण आत्ताची वेळ चिडण्याची नव्हतीच!

आजोबा पुढे बोलू लागले..

"उपाय एकच आहे.. तो म्हणजे आज रात्री मी इथेच थांबणार.. एक मोठी पूजा करणार.. माझा हा व्यवसाय नाही... मात्र पूजेचा खर्च ज्यांना पूजा करून हवीय त्यांनीच केला तरच परिणाम होतो.. तेव्हा पूजेला दिड हजार रुपये खर्च येईल.. आत्ता पैसे दिलेत तर मी रात्री सगळी साधने घेऊन अकरा वाजता येथे परत येईन... तोवर ही बंद असलेली खोली उघडून अतिशय व्यवस्थित साफ करून ठेवावी लागेल.. आणि हो.. मुख्य म्हणजे मला कसलाही व्यत्यय चालत नाही.. पहाटे दोन ते अडीचपर्यंत पूजा चालेल.. तोवर बायकांच्या बांगड्यांचे आवाज.. या घरातील बायकांना स्पर्शून आलेली हवा.. यातले काहीही मला जाणवता कामा नये... घरातील कोणत्याही बाईची अडचण असल्यास पूजा होणार नाही.. घरातील कुणीही काहीही व्यसन केलेले असल्यास ही पूजा होणार नाही.. ही पूजा संपन्न होईल तेव्हा या घरातील बाधा नष्ट झालेली असेल.. मात्र.. या पूजेची एक महत्वाची अट आहे.. "

आजोबा सगळ्यांकडेच बघत थांबले..

"कसली अट??"

"ही पूजा करणार्‍याकडची सर्व अध्यात्मिक शक्ती या पूजेत नष्ट होते.. अशा माणसाला पुढे काहीही करता येत नाही... उदरनिर्वाहसाठी तो लोकांना भविष्य सांगु शकत नाही कारण ती शक्ती नष्ट झालेली असते... भूतबाधा असली तर त्याला ते समजत नाही कारण ती शक्ती त्याच्याजवळ नसतेच... अशा माणसाचे उर्वरीत आयुष्य कसे जाईल याची काळजी जर... तुमच्यापैकी कुणी घेणार असेल तर... तर आणि तरच ही पूजा मी करेन.. त्याची मला नुसती हमी नको असून मला प्रत्यक्ष माझ्या उदरनिर्वाहासाठी रक्कम हातात लागेल.. "

चक्रावून सगळेच एकमेकांकडे बघत होते. ही कसली अट? या माणसाला कोण जपणार आयुष्यभर??

मावशी उद्गारल्या...

"आजोबा.. एक .. एक सांगू का??... हवं असलं तर .. तुम्ही इथेच राहा.. आमच्यात राहा, खा, जेवा.. आपलंच घर माना.. याच खोलीत राहा.. आम्हालाही आधार.. पैसे कशाला?? मी पुढच्या दहा वर्षांच्या भाडे पावत्या करून देते तुम्हाला हवे तर... "

"तुम्ही तेवढ्या जगणारच नाही आहात.. मी मात्र पुढची पंचवीस वर्षे जगणार आहे... एकशे पाच वर्षे जगून मरेन मी... भाडेपावत्या कसल्या देताय??? "

हादरलेच सगळे! मावशींचा तर चेहरा खर्रकन उतरला. पदराने डोळे टिपत त्या म्हणाल्या..

"पैसे भरपूर आहेत माझ्याकडे... किती लागतील..."

"हे पहा.. मला पैशांचा मोहच नाही आहे.. पण मला दोन वेळचे जेवण आणि राहण्याची जागा पुढची पंचवीस वर्षे तरी लागेल... तेवढी रक्कम..."

अजित पुन्हा फस्सकन हासला..

आता मात्र सगळ्यांनाच राग आला होता..

आजोबांनी अजितकडे पाहात विचारले... त्याला प्रश्न विचारताना मात्र आजोबांचा आवाज सौम्य होता.. हे कोडे काही कुणाला उलगडू शकले नाही...

"का हासलात???"

"सामान सौ सालका है.. पल की खबर नही... "

अशी ओळ म्हणून अजित खदाखदा हासला. तो तसा कधीच हसायचा नाही. त्या हासण्याचा आवाज ऐकून अर्चनाही बाहेर आली...

आजोबांचा मात्र चेहरा भयानक संतापलेला होता.. ताडताड पावले टाकत ते गेस्ट हाऊसच्या बाहेर जाऊ लागले...

मात्र सतीश आणि मावशींनी त्यांना अडवले... मावशींनी आत जाऊन तत्क्षणी चाळीस हजार रुपयांची कॅश आणली... या बाईजवळ एवढे पैसे असतील याची कुणाला कल्पनाच नव्हती.. बाकीचे पन्नास एक हजार उद्या दिले तर चालतील का असे मावशी म्हणाल्या.. एक लाखात आयुष्य जाणार नाही हे माहीत असले तरी त्या साध्यासुध्या गावात निदान एक खोली व एका मेसचे किमान काही महिन्यांचे पैसे इतके सहज जमले असते... आपटे आजोबांनी एकंदर दिड लाखाची मागणी केली.. भाडेकरूंचा काही संबंधच नव्हता ते पैसे देण्याशी... पण एक प्रेमाचे नाते म्हणून सतीश म्हणाला की तोही दहा हजार देईल... मावशींनी बाकीची रक्कम उद्या ते परवा द्यायचे कबूल केले.. आणि आपटे आजोबा दिड हजार पूजेचे वेगळे घेऊन निघून गेले..

ते दारातून बाहेर गेल्यागेल्या अजितला खूप झापायचे असा विचार मावशी आणि सतीशने केलेल होता.. मात्र आजोबा दारातून बाहेर पडताक्षणीच अत्यंत अमानवी वाटेल असे खदाखदा हासत अजित आपल्या खोलीत निघून गेला व त्याने दार बंद केले... सतीशने दार वाजवलेही... पण नो रिस्पॉन्स!

रात्रीचे पावणे अकरा!

आजोबा पुन्हा दारात आले.. त्यांच्या हातात अनेक लहान लहान पिशव्या होत्या... आले ते तडक कॉमन नळावर गेले.. कपड्यांनिशीच एक पाण्याची बादली डोक्यावर उपडी केली.. तसेच ओल्या अंगाने उभे राहून खणखणीत आवाजात रामरक्षा म्हंटली.. रामरक्षा संपली तेव्हा मनू झोपलेला आहे ना याची खात्री करून घेतली.. तो आता रात्री परत उठत तर नाही ना याचीही खात्री करून घेतली.. सर्व बायकांना आपापल्या खोलीत जाउन बसायला सांगितले...

आणि पांगापांग होत असतानाच त्यांनी त्या सर्वांना शेवटच्या सूचना ऐकून जायला सांगितले..

"जे सांगतो ते नीट ऐका.. या बोळातून आता एकाही स्त्रीने ये जा करायची नाही.. मला कोणताही आवाज ऐकू येता कामा नये.. भांड्यांचा.. वस्तूंचा.. कसलाच नाही... पूजा संपून मी बाहेर येईपर्यंत तो लहान मुलगा सोडून कोणीही निद्रिस्त व्हायचे नाही आहे... या खोलीत मी गेल्यानंतर साधारण पंधरा ते वीस मिनिटात ते भयंकर अस्तित्व त्या खोलीत येईल.. त्यानंतर खोलीतून अत्यंत अभद्र आवाज यायला लागतील.. कदाचित मीच ओरडत असल्यासारखाही आवाज येईल.. ते सगळे खोटे असेल.. पूजा होऊ नये म्हणून बाहेरच्या माणसांना पूजेत व्यत्यय आणण्यास प्रवृत्त करण्याचा तो प्रयत्न असेल.. कदाचित खोलीच्या बाहेर आग लागल्यासारखीही दिसू शकेल.. पण काळजी करण्याचे कारण नाही.. मी सुखरूपछ असणार.. ही विद्या माझ्या गुरूंकडून कठोर परिश्रमांनी मी मिळवलेली आहे.. ही पूजा यशस्वी होते म्हणजे होतेच... मात्र त्यानंतर मी शक्तीहीन होणार आहे.. म्हणूनच मी ते पैसे तुमच्याकडून घेतलेले आहेत.. या खोलीतून स्त्रीचे किंचाळण्याचे आवाज येऊ शकतात.. मदतीची याचना केली जाईल.. तुमच्य नावाने हाका मारल्या जातील.. कदाचित माझ्याच आवाजात तुम्हाला मदतीसाठी हाका ऐकू येऊ शकतील.. विचलीत व्हायचे नाही... जागा सोडायची नाही.. आवाज करायचा नाही.. पूजा संपल्यावर मी बाहेर येऊन जेव्हा श्रीराम जय राम जय जय राम असे मोजून दहा वेळा म्हणेन तेव्हाच दारे उघडून बाहेर यायचे.. मात्र तसे दहा वेळा म्हणून मी निघून गेलेलो असेन.. उद्या सकाळपर्यंत त्या खोलीत जायचे नाही.. समजले का??"

भीतीने खिळलेल्या प्रत्येकाने कशीबशी होकारार्थी मान हालवली.. मावशींनी विचारले..

"आम्ही सगळे जण.... एकाच खोलीत.. "

"मुळीच नाही... सगळे एकत्र राहिलात तर मोठे भय आहे.. नेहमीच्या जागी नेहमीसारखे राहिलात तर काहीही भय नाही.. निघा आता.. "

पांगापांग झाली..

आणि पहाटे अडीच!

अत्यंत अभद्र किंचाळणे, विव्हळणे, आपटे आजोबांच्या आवाजात प्रत्येकाला हाका, मदतीची याचना.. काही ज्वाळा खोलीच्या बाहेर दिसणे.. मारहाणीचे आवाज.. कुणीतरी खदाखदा हासल्याचे आवाज.. शस्त्राचे भयानक जीवघेणे वार केल्याचे आवाज..

पुरुषालासुद्धा जागच्याजागी मुतायला होईल असे आवाज येत होते...

तोंडातून शब्दही फुटत नव्हता कुणाच्या..

हालचाल करू नका काय? करता तरी येईल का हालचाल??

अर्चना आणि नमाच्या चेहर्‍यांवर तर प्रेतकळाच आली होती.. मावशी निदाम मागच्या बाजूला.. लांब असल्याने जरा तरी धड होत्या.. नशीब मनूला त्या आवाजांनी जाग आली नाही.. अजितचे काय झाले काही समजत नव्हते....

शेवटी एकदा काळाला सर्वांची दया आली...

"श्रीराम जय राम जय जय राम..."

पहाटे अडीच वाजता हे शब्द घुमले आणि पावित्र्याचा सुगंधही दरवळला..

घाबरत घाबरत नमाने दार उघडले तर सतीश आणि अर्चना त्यांच्या दारातून डोकावून भयातिरेकाने बाहेर बघत होते... बोळाच्या एका तोंडाशी मावशी हबकून भिंतीच्या आधारने उभ्या होत्या.. दुसर्‍या तोंडाशी असलेले प्रमुख दार सताड उघडे होते.. आपटे आजोबा निघून गेलेले होते पूजा यशस्वी करून....

आणि अचानक... अचानकच अजितचे दार उघडले.. अर्चना तर त्याला पाहून आतच पळून गेली.. नमाला तो दिसत नव्हता कारण त्यांची दारे समांतर होती.. पण अर्चनाचे पळून जाणे पाहून तीही दचकून मागे झाली होती दारातल्या दारात.. सतिशही काही पवले मागे सरकला होता.. मावशी तर मटकन जमीनीवरच बसलेल्या होत्या..

अजित कामत!

अंगावर असंख्य जखमांचे फोड घेऊन स्वत:च्या दारात दमून भागून उभा होता.. त्याच्या डोळ्यातूनहीरक्त येत होते.. मात्र ओठांवर एक भयंकर हसू होते.. अनेकांची कत्तल केल्यावर सुलतानाच्या चेहर्‍यावर यावे तसे स्मितहास्य.. भयंकर..

आणि त्यातच छद्मी हासत तो उद्गारला.. वेगळ्याच.. त्याच्या नसलेल्या आवाजात.. काका थोरातच्या आवाजात.. नमाच्या तोंडी काल होता त्या आवाजात..

"सामान सौ साल का है.. पलकी खबर नही.. "

धाडकन अजित आत निघून गेला दार आपटून! सगळेच होते तिथेच, तस्सेच, चिडीचूप बसले होते उजाडेपर्यंत!

आणि उजाडताच उघडेच असलेल्या दारातून शेजारच्या जोंधळे वहिनी आत येत पलीकडे समोरच जमीनिवर बसलेल्या मावशींना बघत म्हणाल्या..

"अशा काय बसलायत मावशी जमीनीवर?? "

मावशी काहीच बोलू शकल्या नाहीत.. उजाडल्याची क्षीण जाणिवही त्यांच्या घाबरलेल्या चेहर्‍यावर नव्हती..

जोंधळे वहिनींना ते न समजल्यामुळे त्या पुढे.. म्हणजे अर्चनाच्या खोलीपर्यंत येत म्हणाल्या..

"वाईट बातमी कळली की नाही?? आपटे आजोबांचे प्रेत नदीपाशी मिळाले.. पूर्ण जळलेले.. "

गुलमोहर: 

ओह माय गोंड.
हे काय?
मला तर वाटल संपली. बे.फि. ट्च.............
झक्कास. रात्री काका थोरात दिसले मला स्वप्नात.........
हा हा हा.

आधाश्यासारखी वाचून काढली...मॉनिटरवरुन नजर सुद्धा इकडे-तिकडे हलली नाही....... लय भारी!

प्रच्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्चंड उत्सुकता उत्पन्न केली आहे या भागाने भुषणराव!
आणि दिवसेंदिवस कथा अधिकच खतरनाक, भयावह होत चालली आहे.

ते आपटे आजोबांचे संवाद एकदम जबरी ठरले आहेत आणि क्काय वातावरण निर्मिती केलीय व्वाह..!
मी जर फिल्म डायरेक्टर असतो ना, कथा इथेच थांबवुन चित्रपट निर्मितीचि तयारी सुरु करायला लावली असती.

अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

धन्यवाद!*

<<रात्री काका थोरात दिसले मला स्वप्नात......... >> Lol Lol मला पण
आता हसायला येत आहे पण खरच रात्री खुप भिती वाटली होती. मनातच देवाचे नाव घेऊन हि कादंबरी वाचन बंद करावे अस ठरवलही होते, पण.... आज आल्या आल्या मायबोलीवर पहिला हाच नवीन भाग वाचला Happy
बेफिकिरजी .. पु.ले.शु. Happy

चातक अगदी माझ्याच मनातल बोललास

बेफिकीर तुमच्यात दृश्य खुप छान उभ करायची ताकद आहे. उत्तम स्क्रिन प्ल्रे आहे.

फुटबॉल किंवा क्रिकेट बघणारे कस मॅच रंगात आली की आपण तिथे असतो तर वगैरे अस म्हणायला लागतात तसच काहीस फिलींग आपटे गेल्यावर आल की जाव आता आणि करावेत प्रयत्न.

चला पुढचे एपिसोड येऊ द्यात

खतरनाक...कुठलाही ओंगळवाणा प्रसंग येऊ न देता भयकथा कशी लिहावी हे या पार्टने दाखवून दिले...त्याबद्दल बेफी तुमचे करावे तितके कौतुक थोडे आहे...
ते भर दुपारी आलेले सावटाचे वर्णन तर अगदी जाणवले...
मी जर फिल्म डायरेक्टर असतो ना, कथा इथेच थांबवुन चित्रपट निर्मितीचि तयारी सुरु करायला लावली असती.

अगदी अगदी चातका...अनुमोदन

चँप, मला ९९% माहीत होतं हा भाग तुला १००% आवडेल Happy , कारण या भागात तु म्हणतोस तसा अतिरंजितपणा नाहीय, असल्यास १०%. (दगड लागुन नाकातुन सतत रक्त येणे आणि छातीवरील त्रिशुळाने झालेल्या तिन जख्मा). दोहोंचा प्रासंगीक ताळमेळ अगदी परफेक्ट बसवला आहे. दुसरे म्हणजे आपटे आजोबांच्या एकुण वास्त्वव्य + विधि वर्णाने, आणि मग अचानक त्यांचेच प्रेत आढळल्याने, कथा अधिक इंटरेस्टींग झाली आहे.

मलाही हा भाग मागच्या तिन भागांहुन ४०% जास्त...म्हणजे १४०% आवडला Happy

अहाहाहा!!!!!!!!!!!!!!!! याला म्हणतात भयकथा!!!!!! अंगावर सरसरुन काटा, जीवाचा थरकाप... सगळं सगळं अनुभवलं..... जिवंत चित्रण होतं अगदी!!!! खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प आवडला हा भाग! माझ्या निवडक १० त नोंदवत आहे!

जियो बेफिजी!!! जियो!!!!!!!!!!!! Happy

चँप, मला ९९% माहीत होतं हा भाग तुला १००% आवडेल >>> मलापण चातक Lol

पण चॅम्पाचे अगदी पटले! जितके थ्रिल ह्या रक्तहिन, ओंगळपणारहित भागात वाटले, तितके आधीच्या भागात वाटले नव्हते. तिथे बिभत्सरस होता, आज खरा भयरस कुठल्याही इतर रसांच्या मिश्रणाशिवाय अनुभवायला मिळाला.... अजूनही हृदय धडधडते आहे!

वर्षू, आपण दोघी मिळूनच नखं वाढवूयात Lol

मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त! ओफिसमधून वाचतेय - परवानगी नसूनसुध्द्दा! नविन भाग दिसला अन राहवलेच नाही! पुढच्या भागेच्या आतुर प्रतीक्षेत!

अमी

ब्रावो .... एक्सलेन्ट वर्क ..
बीभत्स रस नव्हताच मुळी ... कथा जिवंत होती ... अजून काय पाहिजे ?
पुढचे भाग पटापट यायलाच हवेत ... नाहीतर मी येऊन बाधेन ...
आय डोन्ट नो कसे .. पण नक्की !
वन्स मोअर .... एक्सलेन्ट !

काय लिहिण्याची कला आहे..अफाट.. थरथराट...खरच काटा आलाय.. जीथे तीथे आता काका दिसतोय्..अभिनन्दन..बेफिकिरजी आपल्या भाषाशैली ची मी कायल झालीय..
Desperately waiting for the next part..

४ ही भाग जबरा !!!

आपटे आजोबांचे प्रेत नदीपाशी मिळाले.. पूर्ण जळलेले.. >>पूर्ण जळलेले प्रेत नक्की आजोबांचेच होते हे कसे ओळखले?

प्रेताची शहानिशा केल्यावर.
प्रेताजवळ काही वस्तु, कपडे, निशाण्या भेटल्या असतील...............?

Pages