सावट - १

Submitted by बेफ़िकीर on 9 May, 2011 - 03:24

सावेळा गावचं पब्लिक जाईचना! ताना आता अक्षरशः ओरडून त्यांना जायला सांगू लागला. तरीही हालेनात ते! असतील तीस एक लोक, काही स्त्रिया, काही पुरुष! त्यातला एक पुरुष हताश होऊन नुसताच चितेकडे बघत बसला होता. स्त्रिया हंबरडे फोडत होत्या. पोलिस केस होणेच शक्य नव्हते कारण नव्या सुनेला घराची मालकीण बनवणारे लोक होते काकडे! मनीषा उत्तम काकडेशी लग्न करून आली त्या दिवसापासून तिला महाराणीचाच थाट मिळाला. माहेरी झाले नसेल इतके कौतुक सासरी! आणि हे सगळे खरेखुरे! नुसते दाखवायला नाही. उत्तमच्या थोरल्या दोन भावांच्या बायकाही घराच्या मालकिणीप्रमाणेच वागवल्या जात होत्या. इतके दृष्ट लागेल असे घर सावेळ्यात दुसरे नसेल! आणि कसे झाले माहीत नाही, पण मनीषा जळली. बहुधा स्टोव्हचा भडका असावा. हुंडाबळी असण्याचा प्रश्नच नव्हता कारण काकडेंनी व्याह्यांकडून फक्त मुलगी आणि नारळ आणलेला होता. लग्नाचा खर्चही निम्मा निम्मा वाटून घेतलेला होता. आणि गेल्या आठ महिन्यात मनीषाला सासरी जे कौतुक आणि प्रेम मिळालेले होते ते पाहून तिच्या गरीब आई बापांना आणि भावाला कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. मुलीपेक्षा सुनेवर अधिक प्रेम करणारे काकडे कुटुंबीय सावेळ्यातील आदर्श घराणे होते. त्यामुळे नव्या सुनेला घरात आठ महिने होत नाहीत तोच इतका भयानक प्रकार? अचानक दुपारी काकडेंच्या घरातून कर्कश्श किंकाळ्या आल्या. त्यांचा अर्थ समजून बाहेरचे आत धावेपर्यंत जळत असलेली मनीषा किंकाळ्या फोडत बाहेर आली आणि तिच्या मागोमाग तिच्या दोन्ही जावा, सासू आणि थोरला दीरही! ते भयानक दृष्य कुणालाही बघवेना! लोकांनी पाणी, माती वगैरे टाकेपर्यंत ती पंचाऐंशी टक्के भाजली होती. जवळचा जिल्हा म्हणजे नाशिक! तेथे अ‍ॅम्ब्युलन्समधून नेईपर्यंत मनीषा गतप्राण झालेली होती. आणि नाशिकच्या रुग्णालयात ती गेल्याचे कळल्यावर शोककळा पसरली. प्रेत अ‍ॅम्ब्युलन्समधून सावेळ्याला पोचले तोवर सटाण्याहून मनीषाच्या माहेरचे सगळे आलेले होतेच! संपूर्ण सावेळे रडले त्या दिवशी! जरूरीइतकेच पोस्टमॉर्टेम केले पोलिस पाटलाने! आणि देह दहन करण्यासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. एका सेकंदात इकडचे जग तिकडे झाले होते अनेकांचे! उत्तम, मनीषाचा नवरा तर उठून उभाही राहू शकत नव्हता. सावेळ्यातील स्मशान बांधकाम चालू असल्याने अजून काही दिवस वापरता येणार नव्हते. त्यामुळे लागूनच असलेल्या, नदीपलीकडील दिवे गावात प्रेत न्यायला लागणार होते. वास्तविक सावेळ्याची लोकसंख्या सहा हजार आणि दिवेची फक्त दोन हजार! सावेळे खूपच मोठे होते. पण नेमकी आत्ताच स्मशानाची डागडुजी चालू असल्याने दिव्याच्या स्मशानात न्यावेच लागणार होते प्रेत!

अर्थात, ही भयंकर बातमी कळल्यावर नदीवरच्या अशक्त पुलावरून काही दिवेकर आधीच सावेळ्यात आले होते. काकड्यांचे बहुतेकांशी चांगले संबंध असल्याने हे लोक सांत्वनासाठी आलेले होते.

संपूर्ण सावेळे आणि दिवे ही दोन्ही गावे मनीषाच्या हळहळ होईल अशा मृत्यूच्या शोकात असताना.. एकच व्यक्ती मात्र....

... खूप खूप आनंदात होती... तिला दिवे गावातील स्मशानावर असलेल्या ताना नावाच्या माणसाकडून कळलेले होते.. की असे असे प्रेत येत आहे...

सवाष्ण! मनीषा नुसतीच सवाष्ण असती तर त्या व्यक्तीला मुळीच आनंद झाला नसता. मरताना मनीषाच्या पोटात चार महिन्यांचा गर्भ होता.

एक गर्भारशी सवाष्ण मेलेली होती. आणि अशी संधी आयुष्यभर थांबले तरी केव्हा येईल हे माहीत नाही याची त्या व्यक्तीला पूर्ण जाणीव होती.

त्या व्यक्तीचे नांव होते... काका थोरात! संपूर्ण पंचक्रोशीत हा माणूस भूत काढतो हे ज्ञात होते. मात्र तो सहसा कुणाला दिसायचाच नाही. स्मशानाच्या मागेच त्याची खोली होती. तो भाग दिवसाही जाण्यासारखा नव्हता. अत्यंत अभद्र! हाडे पडलेली! कुत्री हिंडतायत, गिधाडे उगाचच आकाशातून घिरट्या घालून काही मिळते का ते बघतायत! दाट झाडी होती तिथे! कधी पाहिले नसतील असे किडे, लहान पशू तिथे असायचे. त्यातच कुठेतरी तो काका राहायचा. दिवसभर काय करायचा आणि कशावर जगायचा ते कुणालाच माहीत नव्हते. मात्र कुणाला बाधा वगैरे झाली तर त्याच्या घरचे दिवे गावच्या स्मशानात येऊन तानाला सांगायचे. ताना त्यांना आश्वासन द्यायचा की काका थोरातांना तो पाठवेल. ते लोक निघून गेले ताना काका थोरातला ती कहाणी सांगायचा. मग काका थोरात अंधार पडला की निघायचा. इतक्य वेगात चालणारा माणूस कुणीही आजवर पाहिलेला नव्हता. सहा फूट उंची, शरीरातील प्रत्येक शीर दिसेल इतका बारीक, गालाच्या खोबणी इतक्या आत गेलेल्या की त्यात एखादी लहान वस्तू ठेवता यावी, शरीराला कायम एक विचित्र अभद्र दुर्गंधी, जणू कधी स्नानच केलेले नाही, एकच पांढरा जोड अंगावर कायमचा, पिशवीतल्या वस्तू पाहून एखादा मुर्च्छा येऊन पडेल, तुळतुळीत टक्कल आणि ....

.. आणि ते डोळे मात्र भयंकर! अतिशय भयंकर नजर! एखाद्या पशूसारखी नजर होती त्याची! हे एवढाल्ले मोठे मोठे डोळे, सतत वटारल्यासारखेच, घारी बुबुळे आणि जिथे नजर पडेल तिथली वस्तू जळावी असा अंगार असलेला लाल रंग, जो बहुधा कुठल्याश्या नशेच्या पदार्थाने आलेला असावा.

मात्र आज तिथला लाल रंग अधिक लालभडक झालेल होता.

मनीषाचे प्रेत चितेवर ठेवल्यानंतर गर्भारशी सवाष्णीसाठी असलेले विशिष्ट अंत्यसंस्कार विधी एका ब्राह्मणाने केले होते आणि नंतर मनीषाच्या नवर्‍याने कशीबशी चितेला आग दिली होती. अजूनही बायका हंबरडे फोडून रडतच होत्या. अर्धा पाऊण तास झाला तरी कवटी फुटल्याचा आवाज आलेला नव्हता. कवटी फुटेपर्यत सगळे थांबणारच होते. मात्र सगळे जळत असलेल्या प्रेताच्या एका बाजूला होते आणि दुसर्‍या बाजूला होता स्मशानावरचा ताना! पन्नाशीचा हा माणूस रोज प्रेतांमध्येच राहात होता. त्याच्यादृष्टीने अभद्र रडणे, आक्रोष, किंचाळ्या आणि दहन हे नित्याचेच होते. आणि त्याच मेलेल्या वृत्तीने त्याने आज काका थोरातचे सर्वात महत्वाचे काम केलेले होते. त्यासाठी काका त्याला तीन हजार देणार होता आणि त्यातले आगाऊ दिड हजार काकाने दिलेलेही होते. प्रेताच्या या बाजूला ताना कुणालाच येऊ देत नव्हता. अत्यंत चलाखीने त्याने ते काम केलेले होते.

प्रेताच्या पलीकडच्या बाजूला सगळे रडत असताना तानाने इकडच्या बाजूला कामगिरी बजावलेली होती. आणि अंधारात हळूच मागे वळून पाहिले होते. ताना स्वतःसुद्धा चरकला होता. कारण काही अंतरावर त्याला फक्त दोन डोळे दिसले होते. भयावह प्रकार होता तो! इतक्या अंधारात काका थोरातचे डोळे दिसणे! पण तेवढ्यात काकाने काहीतरी पेटवून थोडासा प्रकाश तयार केला. त्या प्रकाशात तानाला काका थोरात पूर्ण दिसला. शहारलाच ताना! काका संपूर्ण नग्नावस्थेत होता. त्याच्या आसपास अत्यंत विचित्र वस्तू होत्या. आणि तो एकटक इकडेच पाहात होता. तेवढ्यातच काका थोरातने आपला उजवा हात वर नेला व बोकडाच्या मानेवर घाव घालावा तशा आवेशात खाली आणला. तानाने शहारून लोकांकडे पाहिले. आणि सगळे रडत आहेत हे पाहून.. हळूच एक सुरा घेतला आणि मगाचपासूनच बाहेर काढून ठेवलेला मनिषाचा डावा हात पाहून... खाडकन त्याने सुरा चालवला...

मृत मनीषाचा डावा हात कोपरापासून तुटून खाली पडलेला होता. तानाला त्या हाताकडे खरे तर बघण्याचेही साहस होत नव्हते. पण तीन हजारांचा मोह जिंकत होताच! तानाने मागे वळून पाहिले तर...

... लहान मुलाला खाऊ दिसल्यावर व्हावेत तसे काकाचे डोळे अधाशी झालेले होते..

सरळ आहे.. त्याच्या प्रचंड मोठी सिद्धी हस्तगत करण्याच्या तयारीचा आत्तापर्यंतचा सर्वात महत्वाचा भाग पार पडलेला होता.

काका थोरात जिंकला होता.

एकशे तेवीस वर्षे हेच शरीर सहन केल्यानंतर काका थोरातला राहण्यासाठी एक नवेकोरे, धिप्पाड शरीर मिळू शकणार होते. फक्त शरीर शोधले की झाले! असे शरीर, जे भरपूर मांसल आहे, डबल हाडापेराचे आहे, जास्तीतजास्त पस्तीस वर्षांचे आहे, निरोगी आहे आणि ताकदवान आहे. एकशे तेवीस वर्षांपुर्वी काका थोरातला एका सहा फुट उंच टकल्याचे शरीर मिळालेले होते. तेच तो आजवर वापरत होता. पण विविध भयानक प्रयोगांचे, काही वेळा तर ते प्रयोग उलटण्याचे भीषण परिणाम सहन करून आता ते शरीर मोडकळीस आलेले होते. त्यामुळेच त्याला हा प्रयोग करणे अत्यावश्यक होते. रोज तो स्मशानाकडे डोळे फाडून बघत असायचा. हे कुणालाच माहीत नसायचे. अगदी तानालाही! काका अंधारात बसून राहायचा. पण गेले दोन वर्षे त्याला गर्भवती सुवासिनीचे प्रेत गवसत नव्हते. ते आज गवसणार आहे म्हंटल्यावर तो हुरळला होता. सावेळ्यालाच दहन झाले असते तर काका हळहळला असता. पण त्याच्या नशीबाने व घोर प्रयत्नांमुळे त्या प्रेताचे दहन दिव्यात करण्याचे ठरलेले होते. आणि बघता बघता तानाने डावा हात तोडून काकासमोर आणून ठेवलाही होता. तो हात हाती लागताच मात्र काका तानाकडे बघून अत्यंत भयावह हासला व उरलेले दिड हजार तानाला देऊन झाडीत गायबही झाला वार्‍याच्या वेगाने! तानाला आनंद फक्त तीन हजार मिळाल्याचा झाला होता. पण त्याला हे माहीतच नव्हते की उद्यापासून किंवा फार तर परवापासून स्मशानाच्या मागे काका थोरात दिसणारच नव्हता. कुणीतरी तिसरेच दिसणार होते.

रात्रीचे साडे आठ वाजलेले होते. स्मशानामागे एक लहानशी गुहा होती. त्या भागात कित्येकदा जाऊनही तानाला ती कधी दिसलिच नव्हती. काका थोरात नेमका कुठे राहतो हेच तानाला समजत नव्हते. पण हाक मारली की तो यायचा खरा!

काकाने अनेक रोपे बाजूला करून गुहेत आत प्रवेश केला. जेमतेम चार बाय चारच्या बाथरूम इतकीच जागा! पण अनंत वस्तू लटकत होत्या त्यातही! काही मुखवटे, काही हाडे, दोन कवट्या, काही पूडी, दारुच्या बाटल्या, पक्ष्यांची पिसे! खरे तर काका या जागेत आडवाही होऊ शकत नव्हता. पण त्याला आडवे व्हायची गरजच नव्हती. गेल सहा वर्षे तो झोपलेलाच नव्हता. बसून असायचा.

गुहेत आल्यानंतर काकाने एक घुसमटती किंकाळी फोडून आनंद व्यक्त केला. हातभट्टीची दारू बाजूला होती. गटागटा चार घोट प्यायले त्याने! मग मनीषाचा तो अर्धवट भाजलेला तुटलेला हात घेऊन तिथेच नाचला. तानाने त्याक्षणी तो हात तोडला नसता तर चितेतून बाहेर काढून ठेवलेला असूनही तो जळून गेला असता आणी काकाचे स्वप्न भंगले असते.

आता तयारी करायची होती! किमान दिड दिवस लागणार होते! त्या दिड दिवसात हात कुजला असताच! इतकेच काय तर काही गिधाडेही गुहेच्या तोंडावर घिरट्या घालून जाणार होती. कुत्री तिथेच रेंगाळणार होती. पण जीवापाड जपावा लागणार होता तो हात! गुहेच्या आत जायचे मात्र कुठल्याही जनावराचे साहस होणार नव्हते.

काका बसला. त्याने आधी त्याला झालेला आनंदच किमान वीस मिनिटे व्यक्त केला. स्वतःच्या नष्ट होणार असलेल्या शरीराला असंख्य चटके देऊन! त्या वेदना त्याला प्राणाहून प्रिय वाटत होत्या. ज्या शरीराने गेली काही वर्षे जर्जर झाल्यामुळे पुरेशी साथ देण्यात आडकाठी केलेली होती त्या शरीराला तो आता शिक्षा देत होता. घुसमटत्या आवाजात शिव्या देऊन ते शरीर आधी ज्या आत्म्याचे होते त्या आम्यावर स्वतःचा राग काढत होता. आधी म्हणजे सव्वाशे वर्षापुर्वी!

एक लांब हाड त्याने हातात घेतले. हे कुणाच्यातरी मांडीचे हाड असावे! फिमर! काही किरकोळ विधी करून बसल्या जागी काका ताठ झाला. डोळे बंद केले. त्याला काहीतरी दिसत असावे. ते पाच जण! एक स्त्री, साधारण पन्नाशीची! स्त्रीचे शरीर नकोच होते काकाला! त्या स्त्रीच्याच घरात एक कुटुंब होतं! नवरा, बायको आणि दोन वर्षाचे मूल! यातील नवर्‍याचे शरीर ठीकठाक होते. वयाने असेल बत्तीस! पण कोणतातरी रोग असावा त्याला! काकाला असेही शरीर नको होते. दोन वर्षाच्या मुलचे शरीर व्यापणे ही खरे तर अत्यंत आनंदाची बाब होती! कारण ते शरीर अधिकाधिक सामर्थ्यवानच होत जाणार होते. पण किमान विधी करण्याची ताकद असलेले शरीर तरी हवे होते. म्हणजेच निदान पंधरा सोळा वर्षांचे तरी शरीर हवेच! मात्र तो पाचवा? तो पाचवा अगदी हवा तसाच होता. असेल पंचवीशिचा! धडधाकट! पण.. पाचवा?? पाचवा नाही काही.. सहावा! ... ही एक व्यक्ती कुठून आली मधेच? ही स्त्री आहे. ही तर नकोच! पण... पाचचे सहा जण झाले.. आता??

विचार करतानाच गदागदा हालला काका थोरात! काहीतरी संदेश आल्यासारखा! दोन वर्षांचे मूल जमेस नाही धरले तरी चालेल! आनंदाला उधाण आले काकाच्या! त्याला पाच वेगवेगळे लोक राहात असलेल्या वास्तूतील पुरुष हवा होता. गावात अशी एकंदर आठ घरे होती. पण प्रत्येक घरातील पाचही जण एकमेकांचे नातेवाईक होते. रक्ताचे नातेवाईक किंवा लग्नाचे नातेवाईक! हे एकच घर असे होते ज्यात पन्नाशीची स्त्री वेगळी होती, ते कुटुंब वेगळे होते आणि तो पाचवा पुरुष वेगळा होता. हे घ्र अतिशय सुटेबल होते काकासाठी! मात्र तितक्यातच ती सहावी स्त्री आली. आणि सगळा घोळ झाला असे वाटत असतानाच संदेश मिळाला की दोन वर्षांच्या मुलाला हिशोबात गृहीत धरू नकोस!

काकाने पद्मासन घातलेल्या अवस्थेतच दोन फुट उडी मारली. गुहेच्याच आढ्यावर टाळके आपटल्याच्या वेदना त्याला जणू गुदगुल्याच वाटल्या.

आता काकाने डोळे उघडले.

समोर एक पाते होते. तीक्ष्ण पाते! ते त्याने उजव्या हातात घेतले.

आणि मनीषाच्या तुटक्या जळक्या डाव्या हाताकडे बघून खदाखदा हासला. नंतर स्वतच्याच पोटाकडे नजर लावली अन पुटपुटला!

"सव्वाशे वर्ष! सव्वाशे वर्ष कुजतोय तुझ्यात आईघाल्या... आज वेळ आली... खलास करणार तुला आता मी... "

खट्ट!

संपूर्ण गुहा थरारली.

तिकडे मनीषाच्या प्रेतापाशी रडणारे हळूहळू पांगू लागले असावेत. आवाज कमी कमी होत चालला होता.

हा गुहा थरारणारा आवाज कसला होता??

एका भयानक कृत्याचा! काकाने हातातील पात्याने स्वतःचाच डावा हात कोपरापासून तोडला होता. झालेल्या वेदनांनी सव्वाशे वर्षाचा हा सहा फुटी देह आडवा तिडवा लोळला होता. मात्र त्याच वेळेस आनंदाने चीत्कारतही होता.

अचानक! अचानक ते झाले. हात तुटका काका दचकला. गुहेच्या तोंडापाशी मानवी अस्तित्व जाणवले.

ताना??

प्रेताचे दहन पूर्ण व्हायच्या आत इथे आला? आपले रहस्य जाणून घ्यायला? याला गुहा सापडली?

ताना काका थोरातला दिसत नव्हताच, नुसताच जाणवत होता. आणि तानाला गुहेतले काहीही दिसत नव्हते. अंधार होता पूर्ण! मात्र काहीतरी अवयव तुटल्यासारखा आणि वेदनांमुळे आक्रोश केल्यासारखा घुसमटता आवाज आणि धडपड तेवढी ऐकू आली होती. मनीषाचा तुटका हात घेऊन काका थोरात आत काय करणार असेल या उत्सुकतेने ताना त्या जागेत फिरत असतानाच आवाज आल्यामुळे त्याला ती गुहा सापडली होती.

मात्र काकाला हे सहन झाले नाही.

त्याने अचानक एकाच हाताने तानाला आत ओढले.

हडबडत तानाचे शरीर आत आले. मुंडक्यापासून छातीपर्यंतचा भाग गुहेत, काकाने धरलेला आणि बाकीचा भाग गुहेच्या बाहेर अशी अवस्था होती त्याची!

काका थरारत्या आवाजात म्हणाला...

"टॉमी कुत्रा कुठांय???"

"बा... बाहेर.. आहे.. सोडा.. सोडा मला..."

"त्याचे नांव क्षीरसागर! क्षीरसागर असाच गुहेत आला होता साठ वर्षापुर्वी... मग कुत्रा झाला तो..."

त्या अर्धवट लटकलेल्या अवस्थेतही ताना ते वाक्य ऐकून मुळापासून हादरला.

"तुला कोणते रूप पाहिजे??? काळे मांजर??"

इतके भीषण हासत असा प्रश्न विचारणे हा प्रकार तानाला त्याही अवस्थेत घामाने भिजवून गेला.

"आत्ता सोडतोय.. पुन्हा इकडे फिरकलास तर गुहेबाहेर वटवाघुळ बनून लटकत राहशील.. जोवर मी आहे तोवर... आणि मी... पुढची निदान पन्नास वर्षे तरी आहेच.. मग दुसरी सवाष्ण गर्भवती असताना मेली तर उत्तमच.....ज्जा"

काका थोरातचा तो एक हात तुटलेला, त्यातून रक्ताच्या धारा वाहतायत, आणि ही असली वाक्ये! ताना गुहेच्या बाहेर फेकला गेला त्याक्षणी बेशुद्ध पडलेला होता.

आता काका थोरातला घाई झालेली होती. मृत मनीषाचा तुटका हात त्याने स्वतःच्या डाव्या कोपराला बांधला. वेदनांनी चेहरा पिळवटून निघत असतानाच त्याच्या ओठांवर मात्र हसू फुलत होतं!

आणि काका थोरातच्या पूजेला सुरुवात झाली..

... एक नवीन शरीर... त्या पाच जण आणि एक दोन वर्षांचे मूल असलेल्या घरातील तो शेवटचा, पंचविशिचा धडधाकट तरुण... काका थोरातला तो तरुण हवा होता... दिड दिवसात मिळवणार होता तो ते शरीर!

=========================================

"आज नाही हं चिकन वगैरे! आज गुरुवार आहे..."

मावशींनी ओट्यापासून मागे वळत हासत हासत वाक्य उद्गारले.

सतीश, अर्चना आणि त्यांचा दोन वर्षांचा उपद्व्यापी कार्टा सौरभ उर्फ मनु जेवायला बस्ले होते. मनु आईच्या मांडीवर बसून आवडेल त्या पदार्थात हात घालत शिव्या खात होता. अजित मात्र नाराज झाला होता. त्याने मावशींना पुन्हा विचारले.

"मला एक कळत नाही.. बुधवारी आणि रविवारी चालते तर गुरुवारी का नाही?"

"गुरुवार दत्ताचा असतो.. आणि मेसचे ठरलेले आहे.. बुधवारी आणि रविवारी नॉनव्हेज!"

"हो पण आज स्पेशल दिवस आहे.. आज तुमचा स्वतःचाच वाढदिवस आहे.."

"हे गेल्यापासून काही करत नाही रे मी वाढदिवस वगैरे.. आणि या आडगावात काय साजरं करायचं.. आमच्या नाशिकला मजा यायची..."

"काय सतीश... चिकन पाहिजे की नाही आज??"

सतीश आणि अर्चना नुसतेच हासले.

मावशी पुन्हा म्हणाल्या...

"आणि आत्ता ती नमा यायचीय.. आजपासून तीन नंबरमध्ये ती आहे.."

"कोण नमा??"

"माझी लांबची नातेवाईक आहे.. "

"आपल्यात राहणार??"

"हं... "

"काय करते ती??"

"एम एस डब्ल्यू चा कोर्स झालाय... समाजसेवा करण्यासाठी येतीय.."

"मग त्याचा चिकनशी काय संबंध?"

"अरे आल्या आल्या पहिल्याच दिवशी इथे रस्से अन मांसमटण बघून काय वाटेल तिला??"

"मला चिकन मिळणे ही समाजसेवाच आहे.."

"हा विषय आता संपला.. आज चिकन नाही.. फार तर उद्या करेन.. उद्या शुक्रवार आहे.."

"चालेल.. उद्या तर उद्या... "

"अरे?? आलीच की ही?? ये ये .. ये..."

साडे चार फुट उंच, खुरडल्यासारखी वाटावी अशी, डोळ्यांमध्ये सतत संशयी भाव आणि कुणीतरी आपल्याला फसवणार आहे अशी भीती! वय असेल वीस बावीस! नुकतीच प्रचंड फसवली गेली असावी अशी झाक डोळ्यात! सामान्य आर्थिक परिस्थितीची असावी.

नमा! ही काय समाजसेवा करणार? सगळ्यांच्याच मनात असलेल्या अपेक्षित प्रतिमेला तडा गेला.

"ये गं.. बस.. सतीश.. ही नमा..."

सतीशने मग स्वतःच्या बायकोची म्हणजे अर्चनाची ओळख करून दिली. मग मावशींनी अजितची ओळख करून दिली. सगळ्यांच्या ओळखी होत असतानाही नमाच्य चेहर्‍यावर स्मिताची एक पुसटशी रेषासुद्धा आली नाही. उलट बावचळल्यासारखे आणि काहीसे मारक्या म्हशीसारखे भाव आले. मात्र अजितकडे ती रोखून पाहात होती. त्यामुले अजितलाही कसेसेच झाले..

"हात पाय धुवून घे.. आणि जेवायला बस.. सगळे आत्ताच बसलेत जेवायला.. "

"बाथरूम कुठाय??"

प्रचंड घोगरा आवाज! श्शी! पुरुषासारखा आवाज आणि दिसायला ध्यान! ही कसली समाजसेवा करणार काय माहीत!

"असा काय आवाज झालाय तुझा नमा? आणि तब्येतही किती खराव झालीय??"

"बाथरूSSSSSम कुठाय??"

काहीशी जरब होती या प्रश्नात! किंचितसे चरकून मावशींनी तिला हाताने बाथरूमची दिशा दाखवली. तब्बल पंधरा मिनिटांनी नमा बाहेर आली तेव्हा सगळ्यांचीच जेवणे झालेली होती आणि मावशी नमासाठी जेवायच्या थांबलेल्या होत्या.

ती बाहेर आली तेव्हाही ते सगळे भाव तसेच होते तिच्या चेहर्‍यावर! फक्त आधीपेक्षा जरा फ्रेश दिसत होती इतकेच!

"जेवायला बसतीयस ना?? "

ऐकावेच लागत असल्याप्रमाणे नमा ताटावर बसली. सातव्या मिनिटाला उठून मावशींना आणखीन पोळ्या कराव्या लागल्या. कारण एकट्या नमाने बकाणे भरल्यासारख्या पाच पोळ्या आणि पानातले सगळे संपवलेले होते. बाकीचे सगळे तिच्याकडे दचकूनच बघत होते. हळूच अर्चनाने सतीशला खुण केली आणि ते तिघे निघून गेले. अजित मात्र थांबला! त्याला काहीसे अस्वस्थ वाटू लागले होते. थांबायची इच्छा नसतानाही थांबायला लागल्यासारखे!

मावशींना ही कल्पनाच नव्हती की तिचा आहार इतका असेल! तसे असल्यास त्या राहायचा खर्च अधिक मागणार होत्या. पण तो विचार त्यांच्या मनात येत असतानाच त्यांना एक पोळी तिच्या पानात घालायला जो काही तीन चार सेकंद उशीर झाला त्यात नमाने पानात उरलेले मीठ आणि मिठाच्या छोट्या बरणीतल्या मिठाचा एक मोठा घास करून खाऊन टाकला. नुसतेच इतके मीठ खाणे हिला कसे काय शक्य होत असेल हा विचारही अजितच्या मनात आला नाही. तो खिळल्यासारखा नमाकडे बघत होता आणि नमा त्याच्याकडे पाहातच खात होती. हे मात्र मावशींच्या लक्षात आले नाही.

जवळपास बारा पोळ्या आणि बाकीचे सगळे संपवून नमा उठली. हातही न धुता आणि चूळही न भरता तिच्या खोलीत निघून गेली. तीच खोली तिची आहे हे तिला कसे समजले हा विचारही मावशी आणि अजितच्या मनात आला नाही. मगाशी बाथरूम कुठे आहे विचारणारी नमा सरळ तिच्यासाठी असलेल्या खोलीत गेली हे पाहूनही दोघे नुसतेच तिच्या पाठमोर्‍या अवताराकडे पाहात होते. मात्र ती गेल्यानंतर अचानक खोलीत पहिल्यासारखे वातावरण आल्यासारखे वाटले. नमा गेलेली पाहून लगेचच अर्चना आणि सतीश पुन्हा लगबगीने स्वयंपाकघरात आले.

अर्चना - मावशी.. खरे तर असे बोलणे योग्य नाही.. पण.. ती आल्यावर कसेसेच वाटले हो मला?

मावशी - अगं.. आता तुला काय सांगू मी??.. तुलाच काय... मलाही.. मला तर अजूनही कससंच वाटतंय..

सतीश - मावशी... ही कोण आहे तुमची??

मावशी - अरे माझी खरं तर कुणीच नाही... ह्यांचे एक मावसभाऊ होते.. त्यांच्य बायकोच्यामाहेरची आहे ही.. पण नाशिकला आम्ही जवळच राहात असल्याने संबंध होते... ही अशी... अशी कशी काय झाली काय माहीत.. चांगली होती तब्येत... दिसायलाही बर्‍यापैकीच होती.. आणि आवाज?? कळत नाही हिचा आवाज असा कसा झाला?? अर्थात... हे आता तिच्या आईला विचारणे म्हणजे त्या बिचार्‍या बाईला आणखीन दुखावण्यासारखे आहे.. काही बोलायलाच नको आपण.. फक्त बघत राहू.. काय करते.. कशी वागते.. नाहीतर मग सरळ एक दिवस सांगायचं.. की बाई गं तू काही इथे राहू नकोस... हो मग?? बघते कशी बघितलंस ना?? .. भीती नाही वाटली कुणाला तुम्हाला?? आणि हा काय आहार?? जेवण काही कुणी काढत नाही कुणाचं.. पण.. शेवटि हे गेस्ट हाऊस म्हणजे एक व्यवहार आहे.. यावर माझा उदरनिर्वाह चालतो.. हिचा आहार पाहून जास्त पैसे मागणे अयोग्य आहे का?? असो... जपून राहा रे बाबांनो.. मला माणसांची नजर कळते.. नमाची नजर.. आता माझीच रिलेटिव्ह आहे तरी सांगावं लागतंय याचं दु:ख होतंय मला.. पण नमाची नजर... मला तरी बरी नाही वाटली.....

बोलणी चालू असतानाच तिकडे नमा आपल्या खोलीत आरशासमोर उभी राहिलेली होती.. संपूर्ण विवस्त्रावस्थेत... आणि टक लावून स्वतःच्या शरीराकडे पाहात होती... तिला जोरजोरात किंचाळायचे होते.. पण ते या घरात योग्य झाले नसते... इथे आल्यापासून काहीतरी विचित्रच वाटत होते तिला... कसलेतरी सावट असावे असे...

घोळ फार फार वेगळा झालेला होता... ती नमा नव्हतीच... अजितच्या शरीराचा ताबा घेऊ पाहणार्‍याकाका थोरातला कोणत्यातरी अपरिचित शक्तीने शेवटच्या क्षणी नमाच्या शरीरात ढकलले होते..

तो काका थोरात होता.. त्या शरीरातून निसटू पाहणारा काका थोरात.. शरीरातून काहीसा बाहेर आला की नमाला स्वत्वाची सेकंदभर जाणीव होत होती... आपण नमा आहोत याची.. पण तितक्यातच तो पुन्हा आत यायचा.. आत्ताच तो पुन्हा शरीरात येऊन स्वतःला दुर्दैवने मिळालेल्या स्त्रीच्या शरीराकडे आरश्यात पाहात होता... स्त्रीचे दुबळे शरीर त्याला नको होते... त्यामुळे त्याला स्वतःचाच तिरस्कार वाटत होता..

हे?? हे असं शरीर असतं स्त्रीच?? काही ताकदच नाही...

काका थोरात अभद्र चेहरा करून आरशात पाहात होता...

तोवर इकडे पुन्हा बोलणी चालू झाली.

अजित - आणि माहितीय का?? मीठ खाल्लं तिनी मीठ...

अर्चना - म्हणजे??

अजित - असं नुसतं मीठ खाल्लं..

अर्चना - बाप रे..

अजित - मावशी.. हे काही खरं दिसत नाही मला प्रकरण!...

मावशी - दोन तीन दिवस बघू नाहीतर सरळ सांगून टाकते मी.. खाण्याचं काही नाही रे... हवं तितकं खावं.. पण हे जर विचित्रच वाटतंय सगळं.. काय आवाज.. काय थोबाड... काय वागणं...

आणि.... काका थोरातने त्याच क्षणी त्याच्यामनात धगधगद असलेल्या सुडाचा पहिला वार केला..

सगळे जण स्वयंपाक घरात बोलत असतानाच एक किंकाळी ऐकू आली....

.... दोन वर्षांच्या मनूची...

बेफाम धावले सगळे सतीशच्या खोलीत...

काहीतरीच दिसलं! दिसू नये ते!

दोन वर्षांचा मनू पलंगावर आडवा झोपलेला होता.. त्याच्या दोन्ही डोळ्यांमधून रक्ताचे थेंब बाहेर आलेले होते.. आणि ... इतके सगळे होऊनही.. या क्षणी मात्र तो हासत होता.. आणि हे हासणे मनूचे हासणेच नव्हते.. ते हासणे होते एखाद्या मोठ्या माणसासारखे.. आणि तेही विकट हास्य होते ते...

अर्चनाने धावून त्याला उचलले तेव्हा तो पुर्ववत झाला झटक्यात... डोळ्यांमधून आलेले रक्त तिने टिपून घेतले आणि विचारले..

"काय झालं मनू??? काय झालं माझ्या बाळाला??"

"कुते काय??... बाऊ धाया.. "

"बाऊ धाया?? कसा धाया बाऊ?? कुणी माल्लं??"

"कुनी नाई.."

"मग रक्त कसं आलं???"

या प्रश्नावर मात्र जे उत्तर मिळाले... ते ऐकून उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर एक जळजळीत शहारा आला..

"माधं नाइये हे लक्त"

अजितने खाडकन मागे वळून पाहिले तेव्हा भीषण घाबरल्यासारखा चेहर करून नमा तिच्या खिडकीचे दार बंद करत होती.

काका थोरातने गेस्ट हाऊसमध्ये आपली पहिली चुणुक दाखवलेली होती आज!

हे सावट कसलं ते कुणालाच कळणे शक्य नव्हते.. पण एक मात्र खरं...

अतिशय... अभद्र सावट होतं ते...

आणि त्याचवेळेस पोस्टमन आला...

मावशींना या मनस्थितीत पत्र वाचायची इच्छाही नव्हती... अजितनेच वाचले..

दहशतीच्याच आवाजात मावशींनी विचारले..

"कुणाचंय रे?? पत्र??"

हादरलेल्या अजितने दिलेले उत्तर ऐकून घराच्या भिंतीही चक्रावून पाहू लागल्या त्याच्याकडे!

"नाशिकहून आलंय... नमा दिवेगावला येणार नाही असे तिच्या आईचे पत्र आहे... "

गुलमोहर: 

ओ बापरे.. मती गुंग झालीये.. पुढे काय होणार हा विचार करून..
(हास्यरसाच्याच कथा लिहित जा हो.).
तरी ही कथा ही मी वाचणारच आहे पुढे Happy

बापरे!!!!!!!!!!!!!!!!! जब्बरदस्त!!!!!!! Happy Happy Happy

लवकर येऊ द्या पुढचा भाग!

हे हे हे
आताच प्रतिसाद दिला लास्ट कांदबरी वर आता पुढे काय आणि हि दुसरी भय कादंबरी आली सुद्धा.
मस्तच. पु.ले.शु.
आता जरा बिगी बिगी घ्या कि. मला खुप खुप घाबरुन मज्जा येत आहे. आता रोझ एक तरी भाग आलाच पहिजे हव तर ही शिक्षा समजा. पण ह्याचा रोझ एक तरी भाग आलच पाहीजे. अगदी न्याहारी सारखा............

भुषणराव, एकदम 'सावट' शिर्षक वाचुन गोंधळच झाला. आणि त्या समोर 'बेफिकीर'.

...हा काय विचित्र विषय घेतला..?

सवाष्ण! मनीषा नुसतीच सवाष्ण असती तर त्या व्यक्तीला मुळीच आनंद झाला नसता. मरताना मनीषाच्या पोटात चार महिन्यांचा गर्भ होता >> हे विधान वाचताना एकाएक साक्षात्कार झाला. आणि आणखीन सावरुन बसलो वाचायला..!

सुरुवात छान झाली आहे. 'कथेनुरुप' वर्णन ही 'चोख' रेखाटलं आहे.

[पुढच्या भागांसाठी] या कादंबरीसाठी खुपखुप शुभेच्छा!

धन्यवाद!*

बेफिकीरजी,
दुपारी फर्स्ट हाफ वाचलं, खरं सांगतो पुढे वाचायला मनच होईना, सेकंड हाफ आता वाचलो. खरंच, थरकाप उडवणारी कादंबरी होणार आहे.

झकास.. वाचताना खरच अंगावर काटा आला. अजुन भाग येउद्यात.

आणि बेफिकिरजी, ह्या वेळी जरा पटापट पुढचे भाग टाका हो, नाहीतर लिंक जाते.. ही कथा मस्त रंगणार असं आत्ताच दिसतय..

पु. ले. शु.

झक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्कास................ बेफिकीर..

मस्तच........

पण पूढचे भाग मात्र पटापट येऊ द्या नाहीतर भय प्रभाव लगेगच संपेल.

Danger ........generally I really read horror, fantancy stories......
May be I will try this time....

प्रसन्न, शायर हटेला, स्मिता, कुचि, वर्षू, उदय, मंदार, रोहित, गुगु, सानी, मित, तृष्णा, मानसी, आशू, चातक, म्हमईकर, डीप सी, चौकट राजा, चैत्रा, प्रफुल्ल, सनि, पल्लवी, आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. दुसरा भाग लिहायला घेत आहे अर्ध्या तासाने! लोभ असू द्यावात!

-'बेफिकीर'!

अभिनंदन, भीती वाटू लागली की पोस्टाने कळवण्यात येईल>>> Lol अत्यंत दिलदार प्रवृत्तीचा नमुना! 'तू मला असं करतोस काय? मग मी पण असेच करते / तो'! Lol कळवा कळवा, तुम्हाला कसली भीती वाटणार? पब्लिक तुम्हालाच घाबरून पळ काढते माबोवरून! Lol

अनघा मीरा - मी आपला जमेल त्या वेगाने लिहिणार आहे. प्रतिसादाबद्दल मनापासून आभार!

भानुप्रिया, लिहितोय दुपारपासून, पण चार वेळा लॅपटॉप बंद पडला, तीन वेळा माबो ऑफलाईन गेली.

आपले मनापासून आभार!

Pages