॥पंचमपुराण॥

Submitted by लसावि on 10 January, 2009 - 01:38

pancham.jpg
आर.डी.च्या संगीताशी पहिली ओळख कधी झाली ते नक्की आठवत नाही.पण बहुतेक माझ्या पिढीच्या बर्‍याच जणांना पंचम हा प्रकार '१९४२ अ लव्ह स्टोरी' नंतरच कळला.नदीम-श्रवणच्या संगीतालाच 'मेलोडीयस' म्हणणार्‍या आम्हा सर्वांना तो एक जोरदार झटका होता! त्यानंतर मी जो पंचमभक्त बनलो तो आजतागायत...
'काळच्या पुढे'; 'व्हर्सटाईल' इ.इ.विषेशणे पंचमच्या बाबतीत एकतर अपुरी पडतात आणी ती अतिवापराने गुळगुळीत झाली आहेत.मी ते सर्व पुन्हा सांगणार नाही.त्याची गाणी ऐकता ऐकता त्यांच्या निर्मीतीचे किस्से गोळा करण्याचा,त्याच्या अफाट प्रयोगांना समजून घेण्याचा छंद लागला.हे त्यातलेच काही किस्से...
नवेनवे सांगितीक प्रयोग आणि रिदम पॅटर्न हा आरडीचाच प्रांत.एकाच वेळी भारतीय रागदारी आणि पाश्चिमात्य कॉर्ड सिस्टीमचा मिलाफ तोच करु जाणे.पहा (खरंतर ऐका!) अमरप्रेम मधलं 'कुछ तो लोग कहेंगे'.हे गाणे खमाजच्या जवळपास जाते पण वाद्यरचना मात्र पूर्णपणे कॉर्डवर आधरित आहे.अमरप्रेममधेच आरडीने अजून एक गंमत केलीय;तोडी हा खरंतर सकाळचा राग पण त्याने त्यात 'रैना बिती जाए' सारखी अदभुत रचना केली.आणखी एक अजब प्रकार त्याने 'आजा पिया तोहे प्यार दूं' (बहारों के सपने) मधे केलाय;नीट ऐका,या गाण्यात सगळा ताल केवळ इलेक्ट्रॉनिक गिटारने सांभाळला आहे-कुठेही तबल्याचा वापरच नाही! याच सिनेमात त्याने डबल ट्रॅक रेकॉर्डींगचा वापर सर्वात पहिल्यांदा केला (क्या जानूं सजन),आणि हेच तंत्र पुन्हा अत्यंत प्रभावीपणे 'कतरा कतरा मिलती है' (इजाजत) मधे वापरले.
स्केल बदलाचे खेळ हे तर त्याचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.त्याचे अत्यंत ठळक उदाहरण म्हणजे 'कारवां' मधले 'ऐ मै कहाँ आ फसी'.यात अचानक शेवटी स्केल वर जाते आणी मुळातल्याच विनोदी प्रसंगात अजुन धमाल उडते.पण या प्रकारातले माझे आवडते गाणे म्हणजे 'घर' मधले 'तेरे बिना जिया जाए ना'.त्यातल्या कडव्याच्या प्रत्येक ओळीत गाणे एकएक घर खाली उतरत जाते आणि शेवटच्या ओळीनंतर व्हायोलीनचा एकच तुकडा सर्व सुरावट पुन्हा मुळ स्केलवर घेऊन जातो.हे सर्व चालू असताना 'मादल'चा संथ ठेका मात्र बदलत नाही.
मादलवरुन आठवलं,अशीच अनेक नवी वाद्ये पंचमने प्रथमच वापरात आणली.मादल हे मूळ नेपाळी वाद्य,ते त्याने त्याचा वादक रणजीत गजमेरसकट मुंबईत आणले आणि भरपूर वापरले (कांची रे कांची,ऐसे न मुझे तुम देखो,इ.इ.).इलेक्ट्रॉनिक ऑर्गनचा पहिला वापर त्यानेच 'तिसरी मंजील'च्या 'ओ मेरे सोना' मधे केला.शोलेतले 'मेहबूबा मेहबूबा' सुरु होताना जे वाद्य आपण ऐकतो ते 'फ्लँजर'ही पंचमचीच देणगी.पण आरडीचे 'सिग्नेचर' ठरलेले वाद्य अर्थातच 'रेसो-रेसो'.त्याची निर्मीतीच त्याने केली.'मेरे सामनेवाली खिडकी में' हे गाणं आपल्याला या वाद्याच्या आवाजापासूनच आठवते. जाताजाता सांगतो,पहिला रेसो-रेसो त्याने दुधीभोपळ्याला तारा पिळून तयार केला होता! ही तर झाली 'कन्व्हेनशनल' वाद्यांची हकिकत,मात्र आरडीने याही पुढे जाऊन अशक्य गोष्टी वापरुन सुरावटी तयार केल्या आहेत.'चुरा लिया है तुमने' मधला चमचा-ग्लासचा किणकिणाट कोणाला आठवतं नाही? गुलझारच्या 'किताब' मधल्या 'मास्टरजी की आयी चिठ्ठी' या मॅड गाण्यात त्याने शाळेतली खरोखरीची बाकडी रिकॉर्डींगसाठी आणून बडवली होती.आरडीच्या पडत्या काळतले 'बटाटावडा' हे गाणे घ्या;रिकाम्या बाटलीवर आघात करुन ती पाण्यात बुडवल्यावर येणारा आवाज यात वापरला आहे.
rd2.jpeg
आरडीची सर्वात मोठी ताकद कुठली असेल तर ती म्हणजे चित्रपटातला प्रसंग,ती सिच्युएशन ओळखून तिला,त्यातल्या पात्रांना साजेशी रचना करणे.त्याने संगीताचा वापर नेहमीच सिनेमाच्या संदृभातच केला.
'हरे रामा हरे कृष्णा' साठी पंचम हा देव आनंदचा पहिला चॉईस नव्हता यावर तुम्ही विश्वास ठेवाल? तो एसडीसाठी हटून बसला होता.एसडीने त्याला परोपरीने समजावले की या सिनेमाची जातकुळी पंचमच्या शैलीला साजेशी आहे,त्यालाच संगीत देऊ दे.त्यावर देवने तोड काढली की 'वेस्टर्न' प्रसंगाची गाणीच फक्त आरडीला मिळतील बाकी सर्व सिनेमा दादा बर्मननी करावा.त्यांनी हा प्रस्ताव नाकारला आणि अत्यंत अनिच्छेने देवने संगीत आरडीला दिले.यावरही कडी म्हणजे 'दम मारो दम' गाणे सिनेमात ठेवण्यास देव आनंद राजी नव्हता.त्या गाण्याच्या रेकॉर्डने ब्रिटनमधले काऊंटडाउन पादाक्रांत केल्यावर त्याचा नाईलाज झाला!! अनेक वेळा आपल्याला त्याचे गाणे त्या प्रसंगासकटच आठवते,याबाबतीत त्याच्या समोर नक्कीच एस.डीचाच आदर्श असावा.एक किस्सा सांगतो-अमरप्रेमच्या गाण्याचे सिटींग चालले होते,'एक भजन हवे आहे';शक्ती सामंतानी पंचमला सांगितले.ते करत असतानाच एस.डी. ने त्याला हटकले-'काय करतोयसं,अरे नुसते एक भजन केलेस तर त्यात काय विशेष? लक्षात घे सिच्युएशन भजनाची नाहिये,एक स्त्री जी कधीही आई होणार नाही आणि तरी जिच्या मनात ममता भरुन वाहतेय ती हे गाणं गाते आहे,आता पुन्हा विचार कर आणी मग दे संगीत' आर.डी.ने सल्ला मानला आणी 'बडा नटखट है ये' तयार झालं.
चित्रपटात मिसळून जाणारे संगीत द्यायच्या याच ताकदीमुळे पंचमने 'बॅकग्राऊंड म्युझिक' तयार करतानाही अनेक माईलस्टोन्स करुन ठेवले आहेत.हिंदी चित्रपटात बॅकग्राऊंड म्युझिकचा वेगळा विचार करणारा आरडी हा पहिला संगीतकार असावा असे माझे मत आहे.त्याआधी बर्याच वेळी केवळ 'स्टॉक' तुकडे वापरले जात,मारामारी आली वाजवा व्हायोलिन;दु:खी प्रसंग आहे लावा सारंगी इ.इ.अगदी मुगल-ए-आझम वा मदर इंडीया सारख्या क्लासिक्समधेही हाच प्रकार दिसतो.मात्र प्रत्येक सिनेमाचा बाज,त्यातल्या पात्र व प्रसंगांचा विचार करुन त्याची वेगळी ओळख,थीम तयार करणारे पार्श्वसंगीत पंचमनेच रुजवले.'तिसरी मंझील' मधला शम्मीला खुनी कोण आहे हे कळते तो सीन आठवा- शम्मीचे विस्फारलेले डोळे,कोटाचा क्लोजअप आणि जोडीला ट्रंपेट्सचा किंचाळणारा आवाज;त्या आवाजासकटच तो प्रसंग आठवतो.
sholay02.jpg
आणि अर्थातच-शोले.याततर आरडीची प्रतिभा पुर्ण भरात आहे;किती प्रसंग सांगावेत की जे त्या पार्श्वसंगीताने अजरामर करुन ठेवले आहेत वेस्टर्नपटांच्या जगात तात्काळ घेऊन जाणारा तो टायटल ट्रॅक,गब्बरच्या एंट्री सीनमधे चिरकणारी बासरी (जी आरडीने त्या प्रसंगासाठी विशेष बनवून घेतली),माउथ ऑर्गनची ती अजरामर धुन आणी जय-राधाची प्रेमकथा,गब्बर जेंव्हा ठाकूरच्या कुटूंबाला संपवतो तेंव्हाचा झोपाळ्याच्या कड्यांचा करकराट,आणि अर्थातच शांततेचा-सायलेन्सचा अंगावर येणारा वापर;पार्श्वसंगीताचे पाठ्यपुस्तक आहे हा चित्रपट.
आरडीच्या प्रतिभेची ही काही रुपे.जसेजसे आपण त्याचे संगीत ऐकत जातो तसेतसे त्याच्या नव्यानव्या आविष्कारांची ओळख होत जाते. अजून खुप मनात आहे -त्याच्या स्वतःच्या गायनाबद्दल,त्याच्या सहकारी वादक,गायकांबद्दल,ऑर्केस्ट्रेशनबद्दल आणि अर्थातच गुलजार-पंचम या जादूबद्दल,पण ते पुन्हा केंव्हातरी,पंचमपुराणाच्या पुढच्या अध्यायात.post4201097250375.jpg

गुलमोहर: 

आहाहा! सुन्दर लेख! (च्यामारी? इतके दिवस लक्ष कस गेल नाही???)
अगदी आठवणीन्च्या तळ्यात डुबकावुन घुसळून भिजवून काढलेस! पुनःप्रत्ययाचा आनन्द! Happy
तेही सहज समजेल अशा भाषेत!
आता पुढचा भागही लौकर येवु दे!
अन अशा काही स्पेशल थीम्स अस्तील तर दिवाळी अन्काकरता राखून ठेव! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

खूप छान लेख Happy आरडी अन गुलजार आहाहा ... किती छान गाणी दिली आहेत त्यांनी .

अरे इतके दिवस हा लेख दिसलाच नाही. बरे केलेस तू आपणहुन लिंक दिलीस. फार छान वाटला मला हा लेख.

१० जानेवारी पासून पडून होता हा लेख?

मस्त रे आगाउ.. छान लिहिला आहेस..

--------------------------
बहोतसे आधे बुझे हुए दिन पडे है इसमें
बहोतसी आधी जली हुइ राते गिर पडी है
ये ऍशट्रे भरती जा रही है

एक मस्त कलंदरावरचा मस्त लेख...
त्याने झिंगायला लावणारी गाणी दिली, वेड लावणारी गाणी दिली, भक्तिमध्ये तल्लीन होऊन भान हरपायला लावणारी गाणी दिली. ढसाढसा रडायला लावणारी, गळा दाटुन येणारी, डोळे पाणावणारी...
संगीताचं अनोखं जग आपल्या पुढ्यात उभं केलं.... एकट्याने...

------------------------------------------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

डोळे तपासुन घ्यायची वेळ आलीय बहुदा माझी. इतका सुंदर लेख निसटतोच कसा डोळ्याखालुन.
आर. डी. आणि आशा ही दोन्ही माझी दैवते आहेत. इतका सुंदर लेख आणि विषेश म्हणजे सत्यजीत, इतक्या प्रकारच्या वाद्यांची ओळख करुन दिली आहेस तु या लेखात. आभार मानावे तितके थोडेच आहेत.

मला आवडणारी गाणी म्हणजे खुबसुरत चं पिया बावरी (आशा), मासुमचं "तुझसे नाराज" (अनुप घोषाल)
ए री पवन (बेमिसाल - लता), कतरा कतरा (इजाजत - आशा), कुछ ना कहो (कुमार सानु - १९४२ अ लव स्टोरी) इ. जर मी चुकत नसेन तर 'कागज के फुल' च्या गीता दत्त ने गायलेल्या "जाने क्या तुने कही" मध्ये पहिल्यांदा एस्.डी. ने आर. डी. चे काही तुकडे वापरले होते.

परिचय मधलं 'मुसाफीर हु यारो'(किशोरदा) , बीती ना बिताई रैना (लता), प्यार का मोसमचं 'तुम बीन जाऊ कहा'(किशोरदा), तेरे बिना जिंदगी से शिकवा (आंधी - लता-किशोर), ये शाम मस्तानी (कटी पतंग). खुप मोठी यादी आहे मित्रा. पुण्यात कॉलेजलाईफमध्ये आमच्या हॉस्टेलच्या रुमवर सदैव अगदी अष्टौप्रहर म्हणेनास का, आर. डी. दरवळत असायचा रे. तु सगळ्या आठवणी जाग्या केल्यास.

मनापासुन आभारी आहे रे भावा.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

आगाऊ, छान लेख. आरडीचं पार्श्वसंगीत तर भन्नाट. विशेषतः मेहमुद- आरडी कॉम्बिनेशनचे सगळे चित्रपट- भूतबंगला आठवतो ना??

छान आहे माहीती. बराच रिसर्च करुन लिहीला आहे लेख. प्रत्येक गाण्यामधिल वाद्यांची माहिती जबरदस्त आहे.

भूतबंगला आठवतो ना??>>

हे राहीलंच खरं. त्यातलं "आओ ट्विस्ट करे " मधला बावचळलेला (पडद्यावरचा)आर. डी. भन्नाटच होता.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

मस्त लेख! दुसरा भाग येऊ देत लवकर आता!

मस्त लेख! छान लिहीला आहेस. पुढचे भाग नक्की लिही.
-----------------------------------
मर जावां... तेरे इश्कमें मर जावां...

सर्वांना धन्यवाद! Happy लेख १० जानेवारीपासून हळुहळू लिहित होतो,२४ ला प्रकाशित केला काहिच प्रतिक्रिया न आल्याने थोडा निराश होतो म्हणुन ओळखीच्या तुम्हा काही जणांना कानाला धरुन वाचायला लावला,क्षमस्व Happy
विशाल,आरडीने संगीत दिलेले पहिले गाणे होते फंटूश मधले'ऐ मेरी टोपी इधर तो आ' त्यावेळी आरडीचे वय होते ९ वर्षे! आरडीला स्वतःला ही गोष्ट फार उशीरा आणी अपघातानेच कळली.एसडीकडे याचा जाब मागीतल्यावर त्याने शांतपणे सांगितले 'तुझे संगीत मार्केटमधे चालतयं की नाही याची ती चाचणी होती!' 'सर जो तेरा चकराए' हे त्याचे आणखी एक ढापलेले गाणे,त्याचेही 'ऑफिशिअल क्रेडीट' त्याला कधीच मिळाले नाही.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

लेख मनापासून लिहीला आहे. पंचमदांच्या संगीतावरचं प्रेम हा त्याचा पाया आहे. तरीहि, आणखी थोडा रिसर्च करायला हवा होता असं मात्र वाटून गेलं.

उदा. हिन्दी सिनेमातल्या 'पार्श्वसंगीत' ह्या प्रकाराला विशेष महत्व देणार्‍या आणि नैपुण्य दाखविणार्‍या संगीतकारांमध्ये अग्रपूजेचा मान जातो तो नौशाद या महान संगीतकाराला. 'मदर इंडिया' पासून ते 'दिल दिया दर्द लिया' सारख्या चित्रपटांतलं किंवा अगदी संजय खानच्या टि.व्ही. सिरियल मधलं त्यांनी दिलेलं पार्श्वसंगीत अतिशय परीणामकारक आणि श्रवणीय वाटतं. नौशाद-युगाचा उदय होण्यापूर्वी, लेखक म्हणतो त्याप्रमाणे, पार्श्वसंगीताकडे फारसे लक्ष दिले जायचे नाही. बहुदा, सहाय्यक संगीत-दिग्दर्शकाकडे ते काम सोपवलं जायचं आणि काहीशा ठोकळेबाज पद्धतीनं ते पार पाडलं जायचं. नौशादमियांनी स्वतः मेहनत घेऊन उत्तम पार्श्वसंगीत द्यायला सुरुवात केली. पाश्चिमात्य 'ऑपेरा' पद्धतीचं, 'हार्मनी' वर आधारीत पार्श्वसंगीत सर्वात प्रथम नौशादमियांनीच आपल्याकडे आणलं. त्याचप्रमणे शन्कर-जयकिशन ह्या द्वयीनेही दिलेलं पार्श्वसंगीत विशेष उल्लेखनीय असायचं. अगदी 'आवारा' मधल्या पार्श्वसंगीतासाठी वापरलेली धुन पुढे अनेक वर्षांनी 'संगम' मधे स्वतंत्र गाणं होउन यायची. सचिन देव बर्मन यांच्या चित्रपटातलं पार्श्वसंगीतही असंच वैशिष्ठ्यपूर्ण आणि समर्पक असायचं पण ते बहुतांशी पंचम किंवा जयदेव यांनी सचिनदांच्या सूचनांनुसार तयार केलेलं असायचं.

पंचम आपल्या पिताजींकडे सहाय्यक-दिग्दर्शक म्हणून काम करायला लागला होता. मेहमूदच्या 'छोटे नवाब' साठी पंचमनी प्रथम स्वतंत्ररित्या संगीत-दिग्दर्शन केलं, तेव्हा त्याचं वय होतं अवघं एकोणीस वर्षांचं! त्यावेळचा एक किस्सा ऐकण्यासारखा आहे. त्यासुमारास सचिनदा आणि लतादिदींमधे काही मतभेद झाले होते. त्यामुळे सचिनदांची गाणी फक्त आशाबाईंच्या स्वरात रेकॉर्ड होउ लागली होती. पंचमदांनी 'छोटे नवाब' साठी मालगुन्जी रागातल्या एका बन्दिशीवरून 'घर आ जा, घिर आये, बदरा सावरिया' ह्या गाण्याची अप्रतिम चाल बांधली होती आणि ते गाणं फक्त लतादिदीच गाउ शकतील असं पंचमला वाटत होतं पण लताबाईंचं तर सचिनदांशी बिनसलेलं. सचिनदांनी गाण्याची धुन ऐकली आणि त्यांनाही पटलं की ते गाणं लताबाईंनीच गायला हवं. त्यांनी पंचमला लताबाईंकडे विचारणा करण्याची अनुमती दिली आणि आश्चर्य म्हणजे दिदी ह्या पोरसवद्या संगीतकारासाठी गायला मोठ्या मनानं तयार झाल्या! आजही सिनेसंगीताचे रसिक त्या गीताच्या आठवणीनं घायाळ होतात. 'घर आ जा' प्रकरणात सचिनदा आणि लतादिदींमधले गैरसमजही दूर झाले आणि 'बंदिनी' तल्या 'जोगी जबसे तू आया मेरे द्वारे' ह्या एका अजरामर गीताद्वारे लतादिदींनी 'बर्मनदा कँप' मधे दणक्यांत पुनरागमन केलं!

'शोले' मधल्या उत्कृष्ट पार्श्वसंगीताचा उल्लेख झालाच आहे. त्यात धन्नोचा पाठलाग दरवडेखोर करतात ते चित्त-थरारक दृश्य आठवून पहा. त्यावेळी तबल्याच्या दोन ठेक्यांचा वापर करून दिलेलं पार्श्वसंगीत खूप नावाजलं गेलं होतं. त्यावेळचा एक किस्सा आहे. चित्रपट जवळ-जवळ पूर्ण झाला होता. पंचमदांनी पार्श्वसंगीत संपवलं होतं, दिग्दर्शकांनीहि ओके केलं होतं. पंचमला मात्र स्वतःलाच 'त्या' सीनसाठी गिटार आणि ड्रम्सवर बनवलेला म्युझिक-पीस खटकत होता पण काय करावं ते सुचत नव्हतं. बनारसचे सुविख्यात तबला-वादक पं. किशन महाराजा यांचा पंचम गंडाबंद शागीर्द होता. शेवटी त्याने आपल्या गुरुजींनाच साकडं घातलं. गुरुजींना 'शोले' च्या रशेस दाखवण्याची व्यवस्था केली, विशेषतः 'तो' सीन अनेकदा 'रिवाइण्ड' करून दाखवला आणि त्यांचा सल्ला मागीतला. किशनमहाराजांनी बसल्या-बैठकीत तबल्यावर 'त्या' सीनसाठी संगीत कंपोझ करून दिलं! [ज्यांनी 'गाईड' मधल्या 'पिया तोसे नैना लागे' गाण्यासाठी १४ मात्रांच्या रूपक तालाचे साडेतीन मात्रांचे चार तुकडे करून एक अप्रतिम ठेका करून वाजवला होता, तेच हे किशनमहाराज.]

पंचम स्वतः तबल्याखेरीज इतर अनेक वाद्यं वाजवण्यात वाकबगार होता, विशेषतः माउथ ऑर्गनवर त्याचं प्रभुत्व होतं. ' मेरे सपनोंकी रानी, कब आयेगी तू' गाण्याच्या रे़कॉर्डिंगला आयत्यावेळी माउथ ऑर्गन वाजवणारा कलाकार गैरहजर होता, म्हणून सचिनदांनी त्या गाण्यांतले माउथ ऑर्गनचे पीसेस पंचमकडून वाजवून घेतले होते!

पंचम-पुराण हा खरंच एक मोठा विषय आहे. पुढच्या अध्यायाची आतुरतेने वाट पहातो आहे.

बापू करन्दिकर

आवडला. आरडीच्या पार्श्वसंगीताबद्दल अगदी अगदी. शेवटी जे कबूल केले आहेस ते नक्की कर मात्र Happy

    ***
    The Truth Shall Make Ye Fret. - The Truth, Terry Pratchett

    बापु, माहितीबद्दल मनापासुन धन्यवाद. आम्हाला फक्त आर. डी. ला कान देणं एवढंच माहीत. ही सगळी माहीती पुर्णपणे नवीनच आहे.

    सस्नेह...

    विशाल.
    ____________________________________________

    कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
    जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

    आगावु कसे तुझे गुण गावु... खुप छान लेख आहे.. गतस्मृती जाग्या केल्यास... अगदी आरडीमय करुन टाकलंस .. आता ही सगळी गाणी पुन्हा ऐकल्याशिवाय चैन नाही पडणार. Happy

    बापू,किशन महाराजांच्या किश्याबद्दल धन्यवाद.खरचं सांगतो मी तुमच्या प्रतिक्रियेची वाट पहात होतो.तुमचा मुद्दा मान्य करुनही असे म्हणावे वाटते की प्रत्येक सिनेमाची एक थीम म्हणून पार्श्वसंगीत देण्याचा प्रघात पंचमने आणला.नौशाद,शंकर-जयकिशन यांनी नक्कीच चांगले काम केले आहे पण त्यांनीही पार्श्वसंगीतासाठी वेगळा विचार,प्रयोग असे फार कमी केले आहे.बर्‍याचवेळी त्यांनी तुम्ही उदाहरण दिल्याप्रमाणे गाण्यांच्या सुरावटींचाच वापर केला आहे.
    लेख लिहिताना पंचमबद्दलचे अनेक किस्से (उदा.तुम्ही सांगितलेला 'घर आजा घिर आये') मुद्दामहून टाळले आहेत, कारण या अध्यायात मला त्याच्या टेक्निकबद्दल जास्त सांगायचे होते.
    अजून एक गोष्ट- 'है अपना दिल तो आवारा,न जाने किस पे आएगा' चा धमाल माउथ ऑर्गनही पंचमनेच वाजवला आहे!
    ********************************
    द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

    वा! मजा आली पंचमवरचा लेख वाचून आणि त्यावर झालेली चर्चा वाचूनपण.

    ~~~~~~~~~

    आगाऊ,
    १० जानेवारीला सुरुवात करून, २४ ला प्रकाशित केला तरीही तो 'नवीन लेखन' मधे १० तारखेखाली दिसतो. हा मायबोलीचा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी प्रकाशित करायच्या वेळी चक्क कॉपी-पेस्ट करून 'नवीन लेखन करा' इथे पूर्ण नवीनच लेख करतो.

    असो. आता तुझ्या लेखाबद्दल.

    मला आरडी वर असा लेख फार दिवसापासून लिहायचा होता. पण तुझ्याएवढा चांगला आणि अभ्यासपूर्ण मला जमला नसता. तुझा लेख पाहून मला फार आनंद झाला. मी आरडीला R & D बर्मन म्हणायचो, इतके त्याचे गाण्यामधे प्रयोग चालायचे. आरडीचा USP म्हणजे त्याचे ठेके, विविध, चपखल व अफलातून. त्याकाळच्या ऑर्केस्ट्रातल्या 'ठेके'दारांना काही ते जसेच्या तसे वाजवता यायचे नाहीत. एकदा एक अनोळखी ऑर्केस्ट्रा पहायला गेलो - त्याची जाहीरात 'आरडीच्या वाद्यवृंदातील वादक' अशी होती म्हणून. प्रथमच मला आरडीची गाणी त्यांच्या सही ठेक्यासकट ऐकायला मिळाली.

    असंच कुणीतरी स.दे., सलील, हेमंतकुमार, मदनमोहन यांच्यावर लिहा रे.

    क्या बात है! मजा आली. पंचमचे संगीत फक्त बहिर्‍या माणसालाच आवडनार नाही. येउदेत अजून.

    मस्तच लेख. तुम्हांला संगीताची चांगली जाण दिसतेय.
    दुर्दैवाने मला गाणं ऐकणं नी आवडलं/नाही ह्या कॅटेगरीत टाकणं ह्यापेक्षा जास्त कळत नाही त्यामुळे एवढे बारकावे लक्षातही आलेले नाहीत इतक्या वेळा ही गाणी ऐकली तरीही. Sad
    पुढच्या लेख लवकरच येईल अशी आशा आहे.

    झकास! येवू देत अजून....
    पंचम हे खरच एक "पुराण" आहे... कितीही पारायणं केली तरी मन भरत नाही. चित्रपटाची जी एकंदर थीम आहे पार्श्वभूमी आहे (भौगोलि़क सकट) त्यानुसार कितीतरी वेग वेगळी वाद्ये संगीतात वापरण्याची त्यांची एक प्रचंड मोठी खूबी होती. He is truly a musical institution in himself..

    अजून वाचला नाही, पण सकाळी मायबोली बघितल्यावर आज काही जबरदस्त वाचायला मिळणार असे जे लेख बघून वाटते त्यापैकी दिसतो. १० नाही तरी २४ पासून सुद्धा कसा निसटला हे आश्चर्यच आहे.

    आगाउ, यापुढे तुझे लेख निसटले तर मला ही सांगत जा ही तुझ्या आयडी च्या अर्थाने सूचना Happy

    वा!!

    आहाहा.. बहुत खुब यारा. और आने दो.
    - अनिलभाई
    It's always fun when you connect.

    वा! छान छान गाणी आठवली. पुढचा लेख येऊ द्या लवकर.

    आगाऊ, सुंदर जमलाय लेख. आरडी चं संगीत. त्यातही त्याचं टेकनिक ह्याचं खरच एक पुराण होऊ शकतं. (कसा निसटला हा लेख माहीत नाही...)

    तुझ्या पुढच्या लेखाची वाट बघतेय.

    सहीच! सकाळी सकाळी कामावर आल्यावर असे कौतुक वाचायला मिळ्णे हे झकासच वाटतयं! सर्वांना मनापासून धन्यवाद! Happy कोल्हापुरात पंचम-अनुरागी नावाचा आरडी वेड्यांचा एक ग्रुप आहे,दरवर्षी त्याच्या स्मृतीदिनी ते एक अफलातून कार्यक्रम सादर करतात,त्यात मिळालेल्या माहितीचा बराच उपयोग मला झाला.
    पुढचा अध्याय नक्कीच लिहीणार आहे.
    ********************************
    द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

    Pages