॥पंचमपुराण॥

Submitted by लसावि on 10 January, 2009 - 01:38

pancham.jpg
आर.डी.च्या संगीताशी पहिली ओळख कधी झाली ते नक्की आठवत नाही.पण बहुतेक माझ्या पिढीच्या बर्‍याच जणांना पंचम हा प्रकार '१९४२ अ लव्ह स्टोरी' नंतरच कळला.नदीम-श्रवणच्या संगीतालाच 'मेलोडीयस' म्हणणार्‍या आम्हा सर्वांना तो एक जोरदार झटका होता! त्यानंतर मी जो पंचमभक्त बनलो तो आजतागायत...
'काळच्या पुढे'; 'व्हर्सटाईल' इ.इ.विषेशणे पंचमच्या बाबतीत एकतर अपुरी पडतात आणी ती अतिवापराने गुळगुळीत झाली आहेत.मी ते सर्व पुन्हा सांगणार नाही.त्याची गाणी ऐकता ऐकता त्यांच्या निर्मीतीचे किस्से गोळा करण्याचा,त्याच्या अफाट प्रयोगांना समजून घेण्याचा छंद लागला.हे त्यातलेच काही किस्से...
नवेनवे सांगितीक प्रयोग आणि रिदम पॅटर्न हा आरडीचाच प्रांत.एकाच वेळी भारतीय रागदारी आणि पाश्चिमात्य कॉर्ड सिस्टीमचा मिलाफ तोच करु जाणे.पहा (खरंतर ऐका!) अमरप्रेम मधलं 'कुछ तो लोग कहेंगे'.हे गाणे खमाजच्या जवळपास जाते पण वाद्यरचना मात्र पूर्णपणे कॉर्डवर आधरित आहे.अमरप्रेममधेच आरडीने अजून एक गंमत केलीय;तोडी हा खरंतर सकाळचा राग पण त्याने त्यात 'रैना बिती जाए' सारखी अदभुत रचना केली.आणखी एक अजब प्रकार त्याने 'आजा पिया तोहे प्यार दूं' (बहारों के सपने) मधे केलाय;नीट ऐका,या गाण्यात सगळा ताल केवळ इलेक्ट्रॉनिक गिटारने सांभाळला आहे-कुठेही तबल्याचा वापरच नाही! याच सिनेमात त्याने डबल ट्रॅक रेकॉर्डींगचा वापर सर्वात पहिल्यांदा केला (क्या जानूं सजन),आणि हेच तंत्र पुन्हा अत्यंत प्रभावीपणे 'कतरा कतरा मिलती है' (इजाजत) मधे वापरले.
स्केल बदलाचे खेळ हे तर त्याचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.त्याचे अत्यंत ठळक उदाहरण म्हणजे 'कारवां' मधले 'ऐ मै कहाँ आ फसी'.यात अचानक शेवटी स्केल वर जाते आणी मुळातल्याच विनोदी प्रसंगात अजुन धमाल उडते.पण या प्रकारातले माझे आवडते गाणे म्हणजे 'घर' मधले 'तेरे बिना जिया जाए ना'.त्यातल्या कडव्याच्या प्रत्येक ओळीत गाणे एकएक घर खाली उतरत जाते आणि शेवटच्या ओळीनंतर व्हायोलीनचा एकच तुकडा सर्व सुरावट पुन्हा मुळ स्केलवर घेऊन जातो.हे सर्व चालू असताना 'मादल'चा संथ ठेका मात्र बदलत नाही.
मादलवरुन आठवलं,अशीच अनेक नवी वाद्ये पंचमने प्रथमच वापरात आणली.मादल हे मूळ नेपाळी वाद्य,ते त्याने त्याचा वादक रणजीत गजमेरसकट मुंबईत आणले आणि भरपूर वापरले (कांची रे कांची,ऐसे न मुझे तुम देखो,इ.इ.).इलेक्ट्रॉनिक ऑर्गनचा पहिला वापर त्यानेच 'तिसरी मंजील'च्या 'ओ मेरे सोना' मधे केला.शोलेतले 'मेहबूबा मेहबूबा' सुरु होताना जे वाद्य आपण ऐकतो ते 'फ्लँजर'ही पंचमचीच देणगी.पण आरडीचे 'सिग्नेचर' ठरलेले वाद्य अर्थातच 'रेसो-रेसो'.त्याची निर्मीतीच त्याने केली.'मेरे सामनेवाली खिडकी में' हे गाणं आपल्याला या वाद्याच्या आवाजापासूनच आठवते. जाताजाता सांगतो,पहिला रेसो-रेसो त्याने दुधीभोपळ्याला तारा पिळून तयार केला होता! ही तर झाली 'कन्व्हेनशनल' वाद्यांची हकिकत,मात्र आरडीने याही पुढे जाऊन अशक्य गोष्टी वापरुन सुरावटी तयार केल्या आहेत.'चुरा लिया है तुमने' मधला चमचा-ग्लासचा किणकिणाट कोणाला आठवतं नाही? गुलझारच्या 'किताब' मधल्या 'मास्टरजी की आयी चिठ्ठी' या मॅड गाण्यात त्याने शाळेतली खरोखरीची बाकडी रिकॉर्डींगसाठी आणून बडवली होती.आरडीच्या पडत्या काळतले 'बटाटावडा' हे गाणे घ्या;रिकाम्या बाटलीवर आघात करुन ती पाण्यात बुडवल्यावर येणारा आवाज यात वापरला आहे.
rd2.jpeg
आरडीची सर्वात मोठी ताकद कुठली असेल तर ती म्हणजे चित्रपटातला प्रसंग,ती सिच्युएशन ओळखून तिला,त्यातल्या पात्रांना साजेशी रचना करणे.त्याने संगीताचा वापर नेहमीच सिनेमाच्या संदृभातच केला.
'हरे रामा हरे कृष्णा' साठी पंचम हा देव आनंदचा पहिला चॉईस नव्हता यावर तुम्ही विश्वास ठेवाल? तो एसडीसाठी हटून बसला होता.एसडीने त्याला परोपरीने समजावले की या सिनेमाची जातकुळी पंचमच्या शैलीला साजेशी आहे,त्यालाच संगीत देऊ दे.त्यावर देवने तोड काढली की 'वेस्टर्न' प्रसंगाची गाणीच फक्त आरडीला मिळतील बाकी सर्व सिनेमा दादा बर्मननी करावा.त्यांनी हा प्रस्ताव नाकारला आणि अत्यंत अनिच्छेने देवने संगीत आरडीला दिले.यावरही कडी म्हणजे 'दम मारो दम' गाणे सिनेमात ठेवण्यास देव आनंद राजी नव्हता.त्या गाण्याच्या रेकॉर्डने ब्रिटनमधले काऊंटडाउन पादाक्रांत केल्यावर त्याचा नाईलाज झाला!! अनेक वेळा आपल्याला त्याचे गाणे त्या प्रसंगासकटच आठवते,याबाबतीत त्याच्या समोर नक्कीच एस.डीचाच आदर्श असावा.एक किस्सा सांगतो-अमरप्रेमच्या गाण्याचे सिटींग चालले होते,'एक भजन हवे आहे';शक्ती सामंतानी पंचमला सांगितले.ते करत असतानाच एस.डी. ने त्याला हटकले-'काय करतोयसं,अरे नुसते एक भजन केलेस तर त्यात काय विशेष? लक्षात घे सिच्युएशन भजनाची नाहिये,एक स्त्री जी कधीही आई होणार नाही आणि तरी जिच्या मनात ममता भरुन वाहतेय ती हे गाणं गाते आहे,आता पुन्हा विचार कर आणी मग दे संगीत' आर.डी.ने सल्ला मानला आणी 'बडा नटखट है ये' तयार झालं.
चित्रपटात मिसळून जाणारे संगीत द्यायच्या याच ताकदीमुळे पंचमने 'बॅकग्राऊंड म्युझिक' तयार करतानाही अनेक माईलस्टोन्स करुन ठेवले आहेत.हिंदी चित्रपटात बॅकग्राऊंड म्युझिकचा वेगळा विचार करणारा आरडी हा पहिला संगीतकार असावा असे माझे मत आहे.त्याआधी बर्याच वेळी केवळ 'स्टॉक' तुकडे वापरले जात,मारामारी आली वाजवा व्हायोलिन;दु:खी प्रसंग आहे लावा सारंगी इ.इ.अगदी मुगल-ए-आझम वा मदर इंडीया सारख्या क्लासिक्समधेही हाच प्रकार दिसतो.मात्र प्रत्येक सिनेमाचा बाज,त्यातल्या पात्र व प्रसंगांचा विचार करुन त्याची वेगळी ओळख,थीम तयार करणारे पार्श्वसंगीत पंचमनेच रुजवले.'तिसरी मंझील' मधला शम्मीला खुनी कोण आहे हे कळते तो सीन आठवा- शम्मीचे विस्फारलेले डोळे,कोटाचा क्लोजअप आणि जोडीला ट्रंपेट्सचा किंचाळणारा आवाज;त्या आवाजासकटच तो प्रसंग आठवतो.
sholay02.jpg
आणि अर्थातच-शोले.याततर आरडीची प्रतिभा पुर्ण भरात आहे;किती प्रसंग सांगावेत की जे त्या पार्श्वसंगीताने अजरामर करुन ठेवले आहेत वेस्टर्नपटांच्या जगात तात्काळ घेऊन जाणारा तो टायटल ट्रॅक,गब्बरच्या एंट्री सीनमधे चिरकणारी बासरी (जी आरडीने त्या प्रसंगासाठी विशेष बनवून घेतली),माउथ ऑर्गनची ती अजरामर धुन आणी जय-राधाची प्रेमकथा,गब्बर जेंव्हा ठाकूरच्या कुटूंबाला संपवतो तेंव्हाचा झोपाळ्याच्या कड्यांचा करकराट,आणि अर्थातच शांततेचा-सायलेन्सचा अंगावर येणारा वापर;पार्श्वसंगीताचे पाठ्यपुस्तक आहे हा चित्रपट.
आरडीच्या प्रतिभेची ही काही रुपे.जसेजसे आपण त्याचे संगीत ऐकत जातो तसेतसे त्याच्या नव्यानव्या आविष्कारांची ओळख होत जाते. अजून खुप मनात आहे -त्याच्या स्वतःच्या गायनाबद्दल,त्याच्या सहकारी वादक,गायकांबद्दल,ऑर्केस्ट्रेशनबद्दल आणि अर्थातच गुलजार-पंचम या जादूबद्दल,पण ते पुन्हा केंव्हातरी,पंचमपुराणाच्या पुढच्या अध्यायात.post4201097250375.jpg

गुलमोहर: 

जागोजी तुम्ही दिलेली लिंक मी आधीही पाहिली आहे,पंचमच काय पण इतर कितितरी संगीतकारांच्या 'इन्स्पिरेशन्स' त्यावर दिल्या आहेत.ती गाणी नीट ऐकली तर इंप्रोव्हायझेशन आणी ढापुगिरि यातला फरक स्पष्ट होईल.रेसो-रेसो च्या माहितिबद्दल माझ्या मनात काही शंका नाही.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

खूप आवडला लेख. ती सगळी गाणी आताच्या आता ऐकावीशी वाटतायत. Happy
----------------------
एवढंच ना!

सुंदर लेख. पंचमदांचं संगीत हे जीव की प्राण आहे त्यामुळं ढापूगिरी की इंप्रोव्हायझेशन की अजून काही,
अपनेको क्या? ते जे काही आहे ते अविस्मरणीय आहे!!!

सॉरी, गाण चुकलं. ते " ओ माझी रे" होतं. Sad

नंतर का आत्ता लिही... तुमच्या सारखे लोक आहेत म्हणुन आम्ही फक्त देव म्हणुन हात जोडलेया देवाच्या कथा ऐकायला मिळता आहेत... थांबु नका...

कुणी तरी ह्रुदयनाथ, श्रिनिवास खळें वर पण लिहा रे....

उशीर झाला वाचायला पण चुकलं नाही हे नशीब. जुन्या गाण्यांशिवाय दुसरं काही मी ऐकत नाही. रस्त्यावर सुद्धा कधी कधी तेच शोधत असतो. त्यामुळे बरचं जुनं कलेक्शन जमा झालय. पण गाण्याबाबत मी फक्त कानसेन आहे.
पुढील लेखांची वाट पहातोय. भक्तांनी आपल्या प्रतिक्रिया बिनधास्त द्याव्यात. आमचं ज्ञान वाढतयं त्याने.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

आगाऊ, काल एक गाणं ऐकलं... त्याच्या स्टाईलवरून ते पंचमदाचं वाटतय.. थोडं इथे तिथे नेटवर बघितलं तर कळेलही. पण तुम्ही सांगा ते पंचमदांचं आहे का?
लता दिदींचं - सिली हवा छू गयी... सिला बदन छिल गया
बहुतेक गुलजार ने शब्दं धरतीवर आणलेत आणि पंचमदांनी सुरांमधे बांधलेत... लतादिदींनी परत आकाशात सोडलय त्यांना...

लता दिदींनी इतक्या म्हणजे इतक्या संयमानं गायलय की.. बस्स!

दाद,आहे म्हणजे काय आहेच!! गुलझारच्याच प्रदर्शित न झालेल्या 'लिबास' मधले ते गाणे आहे.याच सिनेमातले 'खामोश सा अफसाना' हे सॉलीड ड्यूएट जरुर ऐका.
आणि तुमचे रसग्रहण सहीच Happy
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

खामोश सा अफसाना
पानीपे लिखा होता
ना तुमने कहां होता
ना हमने सुना होता

लता अन सुरेश वाडकर या जोडीच हे गीत. सुंदरच आहे... टिपिकल पंचम (ऑफ) बीट मधे बांधलेलं. The Lgeneds R D Burman या 5 cd संचात अशी अन इतर बरीचशी गाणी याचं खास पंचम मेकींगही आहे.
"रिमझिम गिरे सावन" या गीतातील एक उत्कृष्ट composition contrast हे अजून एक उदाहरण. किशोरदांनी गायलेलं अन लता ने गायलेलं यातला भाव तोच आहे पण composition ची बांधणी अशी काही unique आहे की बस्स! "मेरे नैना सावन भादो" चही तसच आहे. पंचमदांची ही आणखीन एक खुबी. कुठल्या गायकाच्या तोंडी एखादी composition कशी उत्कृष्ट बसू शकेल यानुसार ते बदल करत असत. चित्रपटातील प्रसंग, एकंदर पार्श्वभूमी, गीताचे शब्द, मूड त्यानुसार एखाद्या रागावर बेतलेली रचना, त्या अनुशंगाने वाद्यांचा वापर हे बरेच संगीतकार करतात पण त्याहीपलिकडे जावून एखाद्या गायकाच्या तोंडी एखादी धून किंव्वा तीच धून दोन वेगळ्या गायकांकडून गावून घ्यायची असेल तर तेव्हा composition मधे केलेले बदल हे मला वाटतं R D Burman खेरीज फारच थोड्या लोकांन्ना जमलय. पंचमच्या अशा प्रत्त्येक composition वर, त्याची सौंदर्यस्थळे उलगडून बघण्यात एक लेख लिहीता येईल इतकं अफाट काम या माणसाने करून ठेवलं आहे.

आगाऊ, छान माहिती...आत्ता पर्यंत पंचम ला फक्त ऐकत होते...आता ओळखु ही लागले...

'किताब' मधल्या 'मास्टरजी की आयी चिठ्ठी' या गाण्याचे डाउनलोडेबल एमपी ३ कुथे मिळेल का? बरेच दिवस शोधतेय. विडीओ आहे यु टुब वर, पण मी ऑडिओ शोधतेय

दाद,
हे गाणं ऐकलं नसशील तर जरूर् ऐकः (सापडलं नाहीतर mp3 पाठवतो)
"जाने क्या सोचकर नही गुजरा... एक पल रातभर नही गुजरा"..
किनारा चित्रपटातील.. अर्थातच गुलजार, पंचम अन किशोरदा या त्रिकुटाचं.
किशोरदांनी काय भन्नाट संयत अन हळूवार गायलं आहे.. आणि आवाजाबद्दल काय बोलायचं..?
पण विशेष म्हणजे थोडसं गझलेच्या अंगाने जाणारं हे गीत पंचमने सरोद, संतूर, गिटार (स्ट्रींग अन लीड गिटार), सॅक्सोफोन, क्लॅरीनेट, xylophones, अशी नेहेमीची त्याची आवडीची वाद्ये घेवून काय भलत्याच उंचीवर नेवून ठेवलय... गाण्याच्या सुरुवातीची सारंगी ऐकली तर उमराव जान चा फील येतो थोडा अन मधले काही सॅक्सोफोन तुकडे ऐकले तर तिसरी मंझिल मधलं "तुमने मुझे देखा" हे रफीचं गीत आठवतं..

असच, "लावा" चित्रपटातील एक गीत आहे:
जीने दे न दुनिया.. चाहे मार डाले (आशा, मनमोहन सिंग Happy )
(हेच गीत याच चित्रपटात पुन्हा लता अन किशोर च्या आवाजातही आहे)
रुपक तालात बांधलेलं आहे पण ठेक्याची "चाल" अशी काही ठेवलीये की ते गाणं टिपिकल रुपक च्या "शास्त्रीय" अंगाने ने जाता एका वेगळ्याच मस्त अंगाने जातं..
गम्मत म्हणजे या गाण्याचे अगदी सुरुवातीपासून धृवपदातील गिटाच चे chords, bars, notes ऐकलेस तर लक्षात येईल की जो जिता वोही सिकंदर या चित्रपटातील खालील दोन गीते अगदी थेट inspired आहेतः
१. रुठ के हमसे कही जब चले जाओगे तुम
२. हमसे है सारा जहा (दिवाने हम प्यार के)

लावातील वरील गीताची कडवी- त्याची चाल अन परत तो एक off beat रुपक ठेका हा पुन्हा अदनान सामीचे फेमस " कभी तो नजर मिलाओ" गीताच्या कडव्यास बराचसा तसाच वापरला आहे.

अर्थात यातून कुणालाही कमी लेखायचा उद्देश नाही कारण जतिन ललित, अन अदनान यांन्नी वेळोवेळी त्यांच्यावरील पंचमदांचा प्रभाव मान्य केला आहेच. पण अशी साधर्म्य असलेली बरीच गीते आहेत...

वर लेखात पंचमदांचे बरेच पैलू मांडले आहेत पण एखाद्या गाण्यावर पंचमनी केवळ तांत्रिक दृष्ट्या रेकॉर्डींग रुम मधे काय भन्नाट संस्कार (प्रयोग शब्द थिटा वाटतो) केले आहेत. त्याच्या वेळच्या सर्व संगीतकारांपेक्षा पंचम तांत्रिक बाबतीतही फारच पुढे होता त्यामुळे चित्रपटातील त्याच्या गाण्याचं "सादरीकरण" हे त्या प्रसंगाला अधिक फुलवायचं. अर्थात मूळ गायक, वाद्य, हे सर्व सुरेल अन उत्कृष्ट दर्जाचं होतच त्यावर technical modifications was only icing on the cake. आजकाल सर्रास अगदी भेसूर गायक्/गायिकेलाही गावून घेतात अन मग थेट technology वापरून सर्व सारवासारव केली जाते..

पंचम प्रेमींनो,

नुकत्याच आम्ही सादर केलेल्या 'आनेवाला पल' या पंचम-गुलजार गाण्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी सराव करताना आम्ही तो बाटलीचा प्रयोग केला होता - ओ माझी रे साठी.

त्यावेळी हवा तो सूर बाटली मध्ये मिळवताना आम्ही जे उपद्व्याप केले त्याच्या २ लिंक्स -

http://www.youtube.com/watch?v=MwuudLHI_jA&feature=related

http://www.youtube.com/watch?v=hMDr7bK_jEI&feature=related

की-बोर्ड वर मी आहे, तबला - विक्रांत केळकर, गिटार - देवेन पानसे, आणि आमची ग्यांग ....

काय लेख काय विपु , वाचताना फक्त वेड लागायच बाकी राहिल यार ! मला वाटायच माबोवर सगळे साहित्यीक तज्ञ आहेत. आता पटलय की इथे फक्त साहित्यीकच नाहीत तर अनेक क्षेत्रातले तज्ञ रमतात आणि इतरांना रमवतात.

नंद्याने लिन्क दिली नसती तर हा लेख कधी वाचलाच गेला नसता. जबरी लिहिलं आहेस आगाऊ. करंदीकर, प्रशांत, योग यांनीही सुरेख भर घातली आहे. आवडत्या संगितकारावर आज लागोपाठ दोन मस्त लेख वाचायला मिळाले.

जबरा लिहिले आहे.

मला सदे फारच जास्त apeal होतात पण पन्चम मध्ये सदे आहेच पण अजुन बरेच काही आहे. मला वाटते की पन्चम सारखी लोक ही "शापित गन्धर्व" असावीत. वरती काही mistake केली म्हणुन देवाने पाठवले जा खालच्या लोकान्चे कौतुक घेवुन ये.

त्यामुळेच की काय रफी किशोर पन्चम सारखी लोक लवकर गेली त्याना बहुतेक आतुन कळले असेल कि आपले काम झाले आहे!!!

शोले चे background music सुसाट आहे. अगदी सत्ते पे सत्त चे सुद्धा बाबु च्या entry ला मस्त आहे.

मलाही कधितरी ओ.पी वर लिहायला खुप आवडेल.

Pages