गानभुली - काळ देहासी आला खाऊ

Submitted by दाद on 2 May, 2011 - 03:46

गानभुली - काळ देहासी आला खाऊ
मूळ - http://www.youtube.com/watch?v=26kme13XX2U

कशी गंमत असते बघा... जीव जन्माला आल्यावर फक्तं जी एकच गोष्टं अटळ, तिच आपण किती ’नाकारलेली’ असते. आपलं आपल्यालाच किती शिकवलेलं असतं... घडणं महत्वाचं.... ’न घडणं’ नाही....
हे म्हणजे कसं तर नुस्ता श्वास घेत रहा... आणि टाकत रहा... मध्ये उसंत नको क्षणाचीही... काहीतरी होत राहिलं पाहिजे... त्याशिवाय जगल्यासारखं वाटत नाही. काहीतरी सारखं घडत राहिलं पाहिजे.... मनासारखं, किंचित मनाविरूद्ध, बरचसं सुखाचं, पेलता येईल इतपत दु:खाचं... पण घडणं.... होत रहाणं महत्वाचं.... हे इतकं इतकं रुजतं आत आत खोलवर की, ’त्याने’ खांद्यावर हात ठेवला की आयुष्यातलं सगळं ’घडायचं’ काय ते थांबणार... ह्या कल्पनेने आपला थरकाप उडतो...

मृत्यू हे सुद्धा एक घडणंच आहे, बिघडणं नाही हे का विस्मरतो आपण? आपल्या जन्माच्या क्षणापासून बरोबर तो चालतोच आहे... आपण जाऊ तिथे, जाऊ त्या वेळी त्याची आपल्याबरोबर फरपट चालूच असते... असं प्रेम त्याचं आपल्यावर! फक्तं एकदाच.. एकदाच तो, ’अरे चल यार’ म्हणून खांद्यावर हात ठेवून ओढून नेतो.... हक्काने, ते एक कधी नेईल तेव्हढं एक माहीत नाही आपल्याला. आपल्या दृष्टीने हे घडणं नाही ’बिघडणं आहे... आपलं आपलं जे म्हटलं त्या सगळ्यापासून ’विघडणं’ आहे...

त्याचं खरं खरं कारण असं की जे काही आपण ’घडणं’ म्हणतोय ना, ते आपण स्वत: ’घडवत’ असल्याचा गंभीर गैरसमज!...
"मग? आपण गेल्यावर कोण घडवणार हे सगळं? कसं चालणार आपल्यावाचून त्यांचं?" हा जो ’स्वत:’ सगळं घडवत असल्याचा ’स्व’भाव किती म्हणजे किती नडतो... तर सगळ्याच जन्माला आलेल्याचं अगदी नैसर्गिक क्रमाने जे शेवटचं ’घडणं’... ते आपल्या हातात नाही, त्यावर ह्या ’स्व’चा काहीही हक्क नाही... ही कल्पनाच सहन होत नाही माणसाला. हे घडवणारा ’अहं’ नाही ’सोहं’ आहे... हे एकदा नक्की पटलं की ’त्या’नं खांद्यावर टाकलेला हात परका वाटत नाही, त्याचा दचका उरत नाही... ते ही एक ’घडणं’ म्हणून स्वीकारतो...

कसं? ते नामदेवांनी इतकं अचूक टिपलय!
अरे, ही ’त्या’ची संगत सर्वत्र आहे, सतत आहे... हे कळल्यावर नाचतात ते, आनंदाने... गातात...
आहा, हा दुसरा तिसरा कुणी नसून प्रत्यक्ष भगवंत आहे.. माझा सखा-सांगाती होऊन सदा-सर्वदा माझ्या बरोबर वावरतोय. हा पथ त्याच्या बरोबरीने चालणे आहे... नव्हे तर त्यानेच हाती धरून चालवलेला हा पथ आहे मग दु:ख कशाचे गड्यांनो?

काळ देहासी आला खाऊ
आम्ही आनंदे नाचू गाऊ

कोणे वेळे काय गाणे
हे तो भगवंता मी नेणे

नामदेवांचे दृष्टान्त बघा तरी... किती अचूक

टाळ मृदुंग दक्षिणेकडे
माझे गाणे पश्चिमेकडे

पहिल्यांदा ऐकला तेव्हा चक्रावले... टाळ-मृदुंग दक्षिणेकडे आणि गाणं पश्चिमेकडे कसं?
गाण्यात टाळ-मृदुंग काळ किंवा साध्या भाषेत गाण्याची लय ठरवतात... आणि पाळतात. गाणं एकाच ठेक्यात, लयीत पुढे सरकत रहातं.... गाणार्‍याने कितीही प्रयत्नं केला तरी तालाची सम त्याला घ्यावीच लागते, ती लय संभाळूनच गावं लागतं... ती चौकट सोडता येत नाही.

काळाची दिशा एकच - दक्षिण... सर्व-परिचित, सर्वमान्य... मृत्यूच्या वाटचालीची दिशा - दक्षिण! हीच दिशा मुक्तीचीही. हा एकदिशा मार्ग आहे. काही कर्मं तो प्रवास लवकर घडवतात तर काही कर्मांमुळे आपण आहोत त्याच जागी तटून रहातो..... पण मागे जात नाही.
असो. पण, मग गाणं पश्चिमेकडे तोंड करून काय म्हणून?.... त्याचं उत्तर पुढल्या चरणांमधे मिळतं.
नामा म्हणे, बा, केशवा
जन्मोजन्मी घ्यावी सेवा
... जोपर्यंत मुक्ती नाही तोपर्यंत जीवाचा प्रवास जन्म-मृत्यूच्या चक्रात.... पूर्व - पश्चिम - पूर्व-पश्चिम होत रहाणार... पण दिशा दक्षिणेचीच, मुक्तीची.

नामदेवांना विश्वास असावा की, माझं गाणं पश्चिमेकडे आहे कारण आज अस्ताला जाणारा सूर्यं उद्या परत पूर्वेला उगवणार आहे... पुनर्जन्म आहेच ह्या जीवाला... एकच का? अनेक आहेत...
फक्तं एकच करा माझ्या जीवा-भावाच्या, ह्या जन्मी तुमच्या सेवेचं जसं करून घेतलत तसच पुढल्या जन्मीही, अन त्या पुढल्या जन्मी अन त्याच्याही पुढल्या जन्मी.... जन्मोजन्मी करून घ्या...
कसा समर्पण भाव आहे पहा... जे घडलं... ती भगवंताचीच सेवा होती.. ती सुद्धा ’मी’ केली नाही, तर त्यानं करून घेतली...

हाच अर्थं असेल असं म्हणत नाही, मी... पण हा अर्थं असेल असं वाटलं तेव्हा अन त्या क्षणापासून हा अभंग ’अ-भंग’ होऊन गेला... अव्याहत! चिरंजीव!...
धागेनधाs गदिन तागेनधाs गदिन
**********************************************
एखादं गाणं आपल्याला कुरतडतं म्हणजे काय... ते ह्या गाण्याने दाखवलं मला. नामदेवांचा अभंग आहे, श्रीनिवास खळ्यांनी अप्रतिम चाल दिलीये आणि सुरेश वाडकरांनी सुरेख गायलाय. ऐकताना सोप्पी वाटणारी चाल तालात इतकी कठीण आहे की, मी मी म्हणणार्‍या गायकांच्या नाकात दम आणते.

आता थोडं एक गाणं म्हणून मला सापडलेल्या गमती (जमती)

तालातलं फार नाही पण अगदी जुजबी कळणार्‍यांना चटकन कळेल.... की खूप गंमत केलीये चाल बांधताना. कायै, एखादं कवित्त हातात आलं की त्याचं गाणं होण्यासाठी त्यात ताल सापडावा लागतो. (चाली देणार्‍यांनी सुधारावं मला किंवा भाष्य करावं. ही चर्चा अतिशय शिकण्यासारखी आणि मजेची होईल). किंवा शब्दं तरी अशा सुरावटीत बांधावे लागतात की ताल सहजासहजी उद्धृत व्हावा.
उदा: गोरी गोरी पान... काय ठेका आहे! तालासाठी वेगळा विचार करायला नको.
आणि हे एक- ’ती येते आणिक जाते’... ह्यातल्या ओळी गाण्यात न म्हणता नुस्त्या म्हटल्या तर छंदबद्ध कविता सुद्धा वाटत नाहीत... पण हृदयनाथांनी कसली मॅड चाल बांधलीये.

तर, हा अभंग म्हणायचाच झाला तर आरतीच्या तालावर म्हणता येतो... तो एक ताल लगेच सापडतो.
’जयदेव जयदेव, जय मंगलमूर्ती’ सारखं ’काळ देहासी, आला खाऊ’
भजनी ठेका श्रीनिवास खळेंना ह्यात कसा सापडला असेल... हे एक त्यांना अणि त्या भगवंतालाच ठाऊक... अगदी नामदेवांनाही नाही.

काळ देहासी आला खाऊ.... हा ’काळ’ शब्दं भजनी तालात किती विलक्षण जागी उठलाय.
इतकच नाही तर ह्या चालीत त्यांनी भजनीच्या ठेक्याची येणारी सम कोणत्याही शब्दावर न घेता शब्दांच्या मध्ये घेतलीये. बरं... प्रत्येक वेळी ती सम त्यांनी बदललीये....
एकदा ’ळ’ आणि ’दे’ च्या मध्ये,
एकदा ’ळ’ वर
एकदा ’दे’ वर,
एकदा ’दे’ आणि ’हा’ च्या मध्ये दाखवलीये.
ऐकताना फटाके फुटतात मनात. पण कसे, आतशबाजीचे फुटतात ना, तसे.... आकाशातच पण एकाच जागी नाही... वेगवेगळ्या जागी... वेगवेगळी चमत्कृती फुलवत... एकाचं होतय तोच दुसरा... वेगळा फुलोरा आणि जर हटकून...
चालच अशी दिलीये की म्हटलं तर सम वेगवेगळ्या ठिकाणी दाखवायचं स्वातंत्र्य आहे... पण तशी ताकद (तालावर हुकुमत) हवी.

मूळ गाण्यात सुरेश वाडकरांची ’काळ’ वर तान झकास उठलीये. कडव्यात मधे ’टाळ मृदुंग दक्षिणेकडे’ वर भजनी सोडून अगदी पारंपारिक मृदुंगाचा ’धागिनधाग तिन ताकिन धाग धिन’ असलं सुरू होतं... छ्छे! ते तर थांबूच नये असं वाटतं.. इतकी ती दक्षिणेची वाटचाल वेधक आहे.

’आम्ही आनंदे’ ची थुई थुई कारंजी प्रत्येक वेळी त्याच त्या हरकती असून सुद्धा तितकीच सुखावतात. शेवटच्या कडव्यात ’बा केशवा’, हे इतकं इतकं आर्जवाने म्हटलय, इतकी आर्तं हाक आहे केशवाला की... तिथेच जीव अडकतो... पुढे काळ देहाला खाऊ आलेला जाणवतच नाही...

एक गंमत सांगते. नवर्‍याशी ह्या पूर्व-पश्चिम आणि दक्षिण बद्दल बोलले तर म्हणाला सोप्पय! हे म्हणजे "आपल्या सायनुसॉइडल वेव्ह" सारखं... साईन वेव्ह अक्षा भोवती वर खाली एकाच गतीत होते पण प्रवास अक्षाची दिशा धरून.... (त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं गणितात सापडतात... ’आपल्या’ गणितात! मला सापडलीच तर... अगणितातच!)

वाडकरांनी गायलाय छानच... पण मला पंचरत्नांपैकी "मोदकाने" (प्रथमेश लघाटे) गायलेलं अधिक आवडलं.
http://www.youtube.com/watch?v=vwBU8OT7TUo.
मूळ गाण्यात तालात गाण्यासाठी, किंवा चालीची गंमत दाखवण्यासाठी शब्दं किंचित तोडून म्हटल्यासारखे आहेत.
काळ... देss... हाss... सीss... असं.
खरतर शब्दं तोडलेले नाहीत पण त्यातली मिंड घेताना मधे आवाज इतका लहान केलाय की, "देहासी" हा शब्दं तोडल्यासारखा वाटतोय.
पण मूळ गाणं ऐकून ऐकून लोकांनी त्यावर अधिक विचार केलाय. आता, तालासाठी शब्दं तोडून न गाता एकसंध गाऊनही तालाची गंमत दाखवता येण्याइतका हा विचार प्रगल्भं झालाय. माणसं अधिक "शहाणीवेनं" हे गाणं गातायत. प्रथमेशचं हे गाणं असं शहाणं झालेलं आहे.
ह्या मुलाची तालाची समज किती प्रगल्भं आहे हे त्याचं ते एकच कडवं ऐकण्यात कळतं. प्रथम ऐकलं तेव्हा लय किंचित कमी घेऊन गातोय का काय असं वाटलं. पण नाही. लय मुळच्याच गाण्याची आहे.
त्याच्या गाण्यात भजनी ठेका, ठळक आठ (किंवा सोळा) मात्रांचा न रहाता अधिक लवचिक होतो. मात्रा तितक्याच... पण मात्रांची सैनिक-परेड न होता झुल्यावर बसल्यासारखा प्रथमेश त्या ठेक्यात खेळतो.

अनिरुद्धं जोशीनंही चांगलं गायलय - http://www.youtube.com/watch?v=oHnqIX3yp7o&feature=related
पण मूळ गाण्यापासून फार दूर न जाता प्रथमेशनं जे साधलं ते... केवळ अप्रतिम.

अगदी खरं सांगायचं तर, मला ना, हा अभंग पंडितजी कसा गातील किंवा वसंतराव कसा गातील असं मॅडसारखं वाटत रहातं... गाण्यातल्या भावाशी समरसूनही तालाशी खेळणं जमणारे हे खेळिया.... ह्याचसाठी, ह्याच अतृप्तं इच्छेसाठी... तेव्हढ्याचसाठी पूर्व-पश्चिम होणार आमचं बहुतेक.

गुलमोहर: 

ग्रेट... Happy गाणी घरी जाऊन ऐकते.. सुरुवात खासच.. Happy गाण्यातली एकेक जागा जशी उलगडलीये तशी लेखातली पण उलगडावी इतकं सुंदर... Happy

नेहमीप्रमाणेच अप्रतिम!!!!

नामदेवांना विश्वास असावा की, माझं गाणं पश्चिमेकडे आहे कारण आज अस्ताला जाणारा सूर्यं उद्या परत पूर्वेला उगवणार आहे... पुनर्जन्म आहेच ह्या जीवाला... एकच का? अनेक आहेत...
फक्तं एकच करा माझ्या जीवा-भावाच्या, ह्या जन्मी तुमच्या सेवेचं जसं करून घेतलत तसच पुढल्या जन्मीही, अन त्या पुढल्या जन्मी अन त्याच्याही पुढल्या जन्मी.... जन्मोजन्मी करून घ्या...>>>>>सुरेख!!

अय्यो. अजिबात आवडत नाही याची चाल. कारागिरी जास्त, भाव कम.
हे मी खळ्यांच्या बॅड पॅच मधील असणार असे गृहित धरले होते.

पण आता पुन्हा ऐकावे लागणार दाद. Happy

गाण्याबद्दल - specially तालाबद्दल तुम्ही जे जे लिहिलंय ते ते गाणं ऐकताना मलाही कळलं होतं, म्हणून ही गानभुली माझ्यासाठी very very special आहे... चला, एकतरी अनुभव तुमच्यासरखा same आला! Happy

मस्त!

(सांगू की नको कळेना, पण अशा कात्रीत सापडली की सांगून टाकवंसं वाटतं..

हे जे "गणित" सांगितलंत ना वर, साईन वेव्हचं, तसंच ती पूर्व-पश्चिम वाचून मला एक क्षणभर वाटलं आधी..फक्त साऊंड वेव्ह आली डोळ्यासमोर. आठवीत पाठ केलेली व्याख्या.. Tranverse and longitudinal sound waves..direction of propagation is perpendicular.. अर्धवट काहीतरी...आणि म्हणूनच आपल्या मनाचा "आतला" आवाज आपल्याला ऐकूच येत नाही की काय असा वाईट्ट विचार आला मनात...)

आता हा अभंग जास्त लक्ष देऊन ऐकला जाईल दरवेळी! Happy

दाद, मस्तच निरुपण !
दक्षिण दिशा यमाची पण. कदाचित तो संदर्भही असेल.
हाच अभंग वाणी जयरामनेही गायलाय. पण चाल वेगळी आहे आणि उच्चार भयानक आहेत.

दाद..लेख छान आहे.

या गाण्याबद्दल बोलताना पं. हृदयनाथ मंगेशकरानी सांगितले होते की "दक्षिण" ही मृत्युची दिशा आहे आणि "पश्चिम" ही मुक्तीची दिशा आहे.
http://www.youtube.com/watch?v=8bacuORJaEU

तुमचा वेगळा अप्रोच ही आवडला.

दाद, अप्रतिम लेख. प्रथमेशचं गाणं ऐकल्यापासून मूळ गाणं शोधत होते, ते दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. पुन्हापुन्हा ऐकतेय आणि लेखही अनेकदा वाचतेय. खूप सुरेख. दक्षिण-पश्चिम अगदी सोपं करून समजावलंस Happy

दाद अप्रतिम लिहीलेस. पंडितजी शेवटी "आभारी आहे मी तुमचा, आनंद दिला तुम्ही मला" असे का म्हणाले प्रथमेशला ते थोडेफार उलगडले मला आत्ता. परत परत वाचून साठवतो आहे Happy

छान लिहिले आहे. मलाही हे गाणे फार आवडते. ह्या गाण्याचा ठेका मला कधी नीट कळलाच नाही, त्यामुळे ते जसे वाजवतात तसा वाजवताच येत नाही. आता वर दिलेला ठेका वाजवून पाहतो.

सुरेश वाडकरांनी फारच छान म्हटले आहे. त्यातही मला पहिले कडवे सर्वात जास्त आवडते. 'हे तो भगवंता मी नेणे' हे वाक्य एका पाठोपाठ एक असे तीन वेळा म्हटले आहे. ते म्हणताना 'नेणे' मधला 'णे' आणि पुन्हा 'हे तो.. ' मधला 'हे' ह्यामध्ये काहीच अंतर ठेवलेले नाहीये. 'नेणे' हा शब्द इतका मस्त ताणलाय शेवटपर्यंत की ते असे ऐकू येते 'नेsssssssssणेहेतो'. ऐकतना फार भारी वाटले मला ते. मी म्हणायचा प्रयत्न केला तर ते असे येते - 'नेsssssssणेssहेतो'. Happy

तुला सांगते, हे लेखाचे नाव वाचले आणि मी लिटरली धावा करत होते हे प्रथमेशने म्हटलेल्या गाण्याबद्दल असूदे!! Happy Happy
मी मॅडसारखी प्रेमात आहे त्या प्रथमेशच्या गाण्याची. आधी कधीही एकैले नव्हते, पण मोदकाने जे काही गायलंय ना.. नुसत्या आठवणीने काटा आला!!

आता लेख लेख परत परत वाचीन. थँक्स..

धन्यवाद... सगळ्यांचे आभार.
ह्या अभंगाचा मला लागलेला अर्थं इतका आवडला की, लिहून ठेवला. अभंग मला लागलेल्या अर्थामुळे अधिक जिवंत, जिवलग झाला, माझ्यासाठी.
मग गानभुली लिहायला घेतली तेव्हा हा अभंग त्यात घालावा असं वाटलं.

मध्यंतरी हृदयनाथांनी सांगितलेला अर्थंही तूनळीवर ऐकला. म्हटलं... नेमका उलट आहे. पण काही केल्या मला लागलेल्या अर्थाशी फारकत घेता येईना म्हणून तसाच ठेवला.

रैनाचं खरय. निव्वळ गाणं म्हणून मला स्वतःला हे तितकसं आवडलं नसतं. असो... एकुणात गाणं मला भूल घालणारं खरं.

सारेगमपमुळे समजलेलं हे गाणं..
प्रथमेशने अफाटच गायलं तेव्हापासून मूळ गाणं शोधत होतो, सापडलंही.. पण प्रथमेशचं गाणं पहिल्यांदा ऐकलं म्हणून असेल, पण त्याच्या गाण्याची छाप जी बसलीये ती बसलीच आहे.
अर्थात, वाडकरांनी गायलेलं पहिलं कडवं जे आहे त्याला तोड नाही. तो 'नेणे' हा शब्द किती गोड केलाय त्यांनी...
आणि शेवटी 'बा केशवा' ही अप्रतिम.
चाल बांधताना खळेकाकांना कसा काय भजनी ठेका सापडला असेल याचं खरंच नवल वाटतं.

तुमचं टाळ मृदुंग दक्षिणेकडे- चं लॉजिक फार पटण्यासारखं आहे..
फारच छान लेख...

धन्यवाद,
चैतन्य.

सुंदर!! Happy

हे गाणं नुसतं वाचलं तरी वाडकरांचा आवाज कानात घुमायला लागतो. प्रथमेशनेही मस्त गायलं होतं.

उत्तम आहे लेख. आपला संगीताचा अभ्यास आणि अध्यात्मावर थोडेसे भाष्य करण्याची प्रज्ञा वाखाणावी लागेल. खर तर संतांची अभंगवाणी किंवा अन्य साहित्य याचे अर्थ वेगवेगळे लावले जाऊ शकतात. यात आपल्याला सापडणारा वेगळा अर्थ बुध्दीच्या आणखी वरच्या स्तरावर अर्थात प्रज्ञा यास्तरावर सापडतो. कारण इथे अनुभवजन्य, इंद्रियांनी मिळणारे ज्ञान किंवा सामान्य तर्क उपयोगी नसतो.

श्रीनिवासजी खळेंच्या संगीताबाबत काय लिहाव. खरच मनमोहक चालीत ते गाण किंवा अभंग बांधतात. सुरेश वाडकर सुध्दा अप्रतिम गातात.

दाद,
या अभंगाचा तुला भावलेला अर्थ सुरेखच.
स्वप्नील बांदोडकरने ही हे गाणे गायले आहे - मला स्वतःला तरी तेच सगळ्यात आवडले.

ऐकताना फटाके फुटतात मनात. पण कसे, आतशबाजीचे फुटतात ना, तसे.... आकाशातच पण एकाच जागी नाही... वेगवेगळ्या जागी... वेगवेगळी चमत्कृती फुलवत... एकाचं होतय तोच दुसरा... वेगळा फुलोरा <<<

दाद, हे असलं इतकं स्वच्छ आम्ही तुमचा चष्मा लावल्याशिवाय आम्हाला असं नाई बा दिसत. तेवढ्यासाठी तुमचा चष्मा आम्हाला अधूनमधून उसना द्या असाच.

आणि,

कडव्यात मधे ’टाळ मृदुंग दक्षिणेकडे’ वर भजनी सोडून अगदी पारंपारिक मृदुंगाचा ’धागिनधाग तिन ताकिन धाग धिन’ असलं सुरू होतं... छ्छे! ते तर थांबूच नये असं वाटतं.. इतकी ती दक्षिणेची वाटचाल वेधक आहे. <<<
_/\_

Pages