एक अविस्मरणीय सामना - आशुतोष०७११

Submitted by विकवि_संपादक on 24 April, 2011 - 01:59

१९८३ मध्ये भारताने कपिलदेवच्या नेतॄत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर १९८५ साली सुनिल गावस्करच्या नेतॄत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियामध्ये झालेली मिनी वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा तेव्हा "बेन्सन अ‍ॅन्ड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप" म्हणून ओळखली गेली होती. हीच ती स्पर्धा ज्यात रवी शास्त्री "चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स" ठरला आणि त्याच्या पदरात ऑडी पडली.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे भारताने खेळलेला प्रत्येक सामना जिंकला. संपूर्ण स्पर्धेत भारताने फक्त २ झेल सोडले. कोणते ते या लेखात येतीलच ओघाने. स्पर्धेमध्ये भारताचे क्षेत्ररक्षण अगदी दॄष्ट लागण्याजोगे होते. स्पर्धेची सुरुवात भारत-पाकिस्तान सामन्याने झाली. याच स्पर्धेतला माझ्या दॄष्टीने झालेला अविस्मरणीय सामना म्हणजे उपांत्य फेरीतला भारत-न्यूझीलंड सामना. भारताने आधीचे सगळे सामने जिंकून उपांत्य फेरीत रुबाबात प्रवेश केला होता. भारताची उपांत्य फेरीपर्यंतची वाटचाल अशी झाली होती -

१) भारत - पाकिस्तान मेलबर्न २०-फेब्रुवारी-१९८५
भारत ६ विकेट्सनी विजयी

२) भारत - ईंग्लंड सिडनी २६-फेब्रुवारी-१९८५
भारत ८६ धावांनी विजयी

३) भारत - ऑस्ट्रेलिया मेलबर्न ०३-मार्च-१९८५
भारत ८ विकेट्सनी विजयी

भारताची उपांत्य फेरीत गाठ पडणार होती न्यूझीलंडशी, ५ मार्च १९८५ रोजी सिडनी येथे. क्षेत्ररक्षण,गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही आघाड्यांवर न्यूझीलंड आपल्यापेक्षा सरसच होते. एक नजर न्यूझीलंडच्या संघावर टाकून बघा म्हणजे क्ळेल.

न्यूझीलंड -
जॉन राईट, फिल मॅकईवान, जॉन रीड, मार्टिन क्रो, जेफ हॉवर्थ(कप्तान), जेरेमी कोनी, इयान स्मिथ, रिचर्ड हॅडली, मार्टिन स्नेडन, लान्स केर्न्स, इयान चॅटफिल्ड

भारत -
रवी शास्त्री, श्रीकांत, अझरुद्दीन, वेंगसरकर, मोहिंदर अमरनाथ, सुनिल गावस्कर(कप्तान), कपिलदेव, सदानंद विश्वनाथ, मदनलाल, रॉजर बिन्नी, शिवरामकॄष्णन

भारताने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. सामन्याची सुरुवातही सनसनाटी झाली, कपिलदेवच्या पहिल्या षटकातल्या तिसर्‍याच चेंडूवर सलामीवीर जॉन राईट शून्यावर यष्टीमागे झेल देऊन परतला. न्यूझीलंड १ बाद ०. संपूर्ण स्पर्धेत भारताने प्रतिस्पर्ध्याची सलामीची जोडी लवकर फोडण्यात नेहमीच यश मिळवलं. या स्पर्धेत भारतीय यष्टीरक्षक होता सदानंद विश्वनाथ. या पठ्ठ्याने एकही झेल सोडला तर नाहीच शिवाय एकही बाय दिली नाही. हा ही एक विक्रमच. (सदानंद विश्वनाथ परत भारतीय संघात कधीच खेळला नाही आणि कुठे गायब झाला देव जाणे). जॉन रीड आणि फिल मॅकइवान यांनी हळूहळू धावसंख्या वाढवायला सुरुवात केली. न्यूझीलंडची दुसरी विकेट १४ धावांवर पडली. मॅकिवान झे, स. विश्वनाथ गो. बिन्नी ९.

त्यानंतर आलेल्या मार्टिन क्रोला देखील फारसा टिकाव धरता आला नाही. तोही ९ धावा करुन मदनलालच्या गोलंदाजीवर अझरच्या हाती झेल देउन बाद झाला. मागोमाग कप्तान जेफ हॉवर्थ देखील दुर्दैवीरित्या धावचीत झाला. हॉवर्थने शास्त्रीचा चेंडू हलकेच फाईन लेगच्या दिशेने मारला आणि १ धाव घेउन दुसर्‍या धावेसाठी परत फिरला. धावता धावता त्याच्या उजव्या पॅडचा बंद सुटला, त्यामुळे त्याचा वेग मंदावला. तोपर्यंत कपिलचा थ्रो विश्वनाथच्या हातात आला होता आणि त्याने चपळाईने हॉवर्थला धावचीत केले. तेव्हा थर्ड अंपायर हा प्रकार अस्तित्वात नव्हता पण तरीसुद्धा स्क्वेअर लेगला असलेल्या अंपायर मॅककॉनेल यांनी हॉवर्थला धावचीत दिलं. अ‍ॅक्शन रीप्ले मध्ये हॉवर्थची बॅट जवळपास ६ इंच क्रीझबाहेर होती.

न्यूझीलंड ४ बाद ६९.

जेरेमी कोनी आणि जॉन रीड यांनी मग न्यूझीलंडच्या धावसंख्येला आकार द्यायचा प्रयत्न केला पण रवी शास्त्रीच्या कामचलाऊ फिरकीने कोनी, रीड आणि रिचर्ड हॅडली यांना पाठोपाठ बाद केल्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ७ बाद १५१ झाली. लान्स केर्न्सने हाणामारीच्या षटकात ३३ चेंडूत ३९ धावा कुटल्या. न्यूझीलंडच्या डावाच्या शेवटच्या म्हणजे ४९ व्या षटकाअखेरीस न्यूझीलंडची अवस्था ९ बाद २०४ होती. कपिलदेवच्या ५० व्या षटकातले पहिले ३ चेंडू निर्धाव गेले. ४था चेंडू केर्न्सने स्क्वेअर लेग सीमरेषेच्या दिशेन उंच मारला तो थेट श्रीकांतकडे. इतका सरळसोट आलेला झेल श्रीकांतने सोडला त्यामुळे २ धावा न्यूझीलंडच्या खात्यात वाढल्या. हा झेल सोडल्यानंतर कॅमेरा गावस्करच्या चेहर्‍यावर होता तेव्हा गावस्करच्या चेहर्‍यावरील भाव बरेच काही बोलून गेले. वर लिहिल्याप्रमाणे भारताने पूर्ण स्पर्धेत जे २ झेल सोडले हा त्यातला एक आणि दुसरा ऑस्ट्रेलियाविरुद्ध अझरुद्दीनने बिन्नीच्या गोलंदाजीवर वेन फिलिप्सचा. न्यूझीलंड ९ बाद २०६. समोर केर्न्ससारखा आडदांड कर्दनकाळ फलंदाजीला. ५ वा चेंडू परत निर्धाव गेला आणि ६ वा चेंडू केर्न्सने परत तोच फटका अगदी त्याच पद्धतीने परत श्रीकांतकडेच मारला, ह्यावेळेस मात्र श्रीकांतने चूक केली नाही. शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंड सर्वबाद २०६.

२०७ धावांच लक्ष्य घेउन शास्त्री आणि श्रीकांत ही भारताची सलामीची जोडी मैदानात उतरली. रिचर्ड हॅडली आणि इयान चॅटफिल्ड या किवींच्या तेज दुकलीचा पहिला स्पेल इतका अचूक होता की श्रीकांतसारख्याची तलवार एकदम म्यान झाली. एकाही चौकाराची नोंद न करता २८ चेंडूत श्रीकांतने फक्त ९ धावा केल्या आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्याजागी आलेला अझरुद्दीन तर इतक्या अचूक गोलंदाजीसमोर सुरुवातीपासूनच चाचपडत होता. मग धावा काढणं तर दूरची गोष्ट झाली. भारताच्या २० व्या षटकांत कशाबशा ५० धावा फलकावर लागल्या. हॅडली, चॅटफील्ड,स्नेडन आणि केर्न्स यांनी एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी कशी करावी याचा उत्कॄष्ट पुरावा सादर केला. या चौघांनी शास्त्री आणो अझर यांना पुरतं जखडून ठेवलं होतं.

चॅटफिल्ड तर एकदिवसीय सामन्यातला आदर्श गोलंदाज. धावा देण्यात महाकंजूष. हॅडलीबाबत काय बोलणार? स्नेडन आणि केर्न्स यांचे कटर्स भन्नाट पडत होते. Required run rate तर प्रत्येक षटकामांगे वाढत होता. शेवटी अझर ५४ चेंडूत २४ धावा करुन केर्न्सला उंच फटकावण्याच्या नादात बाद झाला. भारताचा धावफलक २५ षटकांत ७३ धावा इतका केविलवाणा होता. शास्त्रीच्या जोडीला आता कर्नल वेंगसरकर मैदानात उतरला. धावांचा वेग हळूहळू वाढू लागला पण दुसर्‍या बाजूला शास्त्री नेहमीप्रमाणे कुथत होता.

८४ चेंडू खेळून केवळ २ चौकारांनिशी ५३ धावा करणार्‍या शास्त्रीला हॅडलीने बाद करुन त्याचे हाल संपविले. भारत ३० षटकांत ३ बाद १०२ धावा. यावेळेस गावस्करने मोहिंदर अमरनाथ किंवा स्वतः न येता कपिलदेवला बढती देउन पाठविले. त्याचा हा जुगार चांगलाच यशस्वी ठरला. कपिलने आल्या आल्या हॅडलीला स्क्वेअर ड्राईव्हचा चौकार मारुन आपला इरादा स्पष्ट केला. शास्त्री आणि अझर या दोघांना मिळून ३० षटकांपर्यंत केवळ चारच चौकार मारता आले होते यावरुन किवी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण किती अचूक होतं याची पुरेशी कल्पना येऊ शकेल. वेंगसरकर आणि कपिलदेव यांनी मग खेळाची सूत्रे आपल्या हातात घेतली. शक्य होईल तेव्हा १-२ धावा पळून काढण्यात कुचराई केली नाही. खराब चेंडूंना सीमारेषा दिसू लागली. धावफलक हलता ठेवण्यात दोघांनाही यश आले. वेंगसरकरच्या फलंदाजीच्या दर्जाबाबत प्रश्नच नव्हता पण कपिलनेपण परिस्थिती ओळखून जबाबदारीने फलंदाजी केली. त्यावेळेस आततायीपणा केला असता तर मॅच परत न्यूझीलंडच्या हातात जाण्यास वेळ लागला नसता. दोघांच्या धावा काढण्याच्या सातत्यामुळे आधी धोकादायक वाटणारी किवी गोलंदाजी आता एकदम सामान्य वाटू लागली. अझर, शास्त्री आणि श्रीकांत जिथे धावा काढण्यासाठी चाचपडत होते तिथेच या दोघांनी आपला दर्जा सिद्ध करत धावा कशा काढाव्यात याचं सुरेख प्रात्यक्षिक दिलं. वेंगसरकर आणि कपिलदेव यांनी वैयक्तिक अर्धशतकं पण पूर्ण केली. ३० व्या षटकांत फक्त १०२ धावा होत्या तिथे ४३व्याच षटकांत २०७ धावा करुन दोघांनी सामनाही जिंकून दिला. वेंगसरकरने ५९ चेंडूत ६३ धावा तर कपिलने ३७ चेंडूत ५४ धावा फटकावल्या.

कपिलने रिचर्ड हॅडलीच्या नवव्या षटकांत विजयी धाव घेतल्यानंतर गावस्करने पॅव्हेलियनमधून धावत येउन मैदानावरच कपिल आणि वेंगसरकरला मिठी मारली. या दोघांनी शांत चित्ताने परिस्थितानुसार जो खेळ केला त्याला तोड नव्हती. या विजयामुळे भारत अंतिम फेरीत दाखल झाला.

अंतिम फेरीत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ८ विकेट्सनी पराभूत करुन "बेन्सन अ‍ॅन्ड हेजेस" कप जिंकला. याच स्पर्धेत रवी शास्त्री "चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स" ठरला आणि ऑडी गाडीचा मानकरी ठरला.

Victory celeb.JPG

- आशुतोष०७११

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९८३ साली आमच्याकडे टीव्ही नव्हता. मॅच बघायची असेल आणि ती टीव्हीवर दाखविली जात असेल तर वरच्या मजल्यावर राहणार्‍या बिर्‍हाडकरूंच्या टीव्हीवर ती पहायची, आणि जो काही स्कोअर असेल तो इमारतीत सगळ्यांना ओरडून सांगायचा असा दंडक असे! Proud

मॅच बद्दल फारसं काही आठवत नाही... फक्त शास्त्री आणि त्याची ऑडी तेव्हढी आठवत्येय>>>>> मलापण! फक्त ऑडीच आठवतेय.
सही लिहीलयस! मजा आली.

श्रीकांतने पहिला झेल सोडल्यानंतर गावस्करने त्याची जागा बदलली होती. परंतु ६ वा चेंडू केर्न्सने तो जिथे होता तिथेच मारला आणि श्रीकांतने तो झेल पकडला. असे पाहिल्याचे आठवते.

>>> भारताच्या २० व्या षटकांत कशाबशा ५० धावा फलकावर लागल्या.

आशुतोष,

हा सामना जसाच्या तसा आठवतोय. जिंकायला २०७ धावा हव्या असताना शास्त्री आणि अझरूद्दीन अत्यंत हळू खेळून षटकात १ किंवा २ धावा काढत होते. २१ षटकानंतर भारत फक्त १ बाद ४७ पर्यंत पोहोचला होता. त्यावेळी भारताला २९ षटकात १६० धावा हव्या होत्या. वरवर पाहता हे आव्हान फारसे अवघड नव्हते, पण ज्या तर्‍हेने शास्त्री व अझरूद्दीन खेळत होते, ते पाहता हे लक्ष्य अशक्य वाटत होते. शास्त्रीच्या नावाने पाहणार्‍यांच्या तोंडातून असंख्य शिव्याशाप बाहेर पडत होते. शेवटी ते दोघे बाद झाल्यावर कपिल व वेंगसरकरने टोलेबाजी करून अर्धशतके झळकावली व सामना भारताला जिंकून दिला. कपिलने तर हॅडलीच्या एकाच षटकात ४ चौकार ठोकले होते.

>>> मॅच बद्दल फारसं काही आठवत नाही... फक्त शास्त्री आणि त्याची ऑडी तेव्हढी आठवत्येय

ही स्पर्धा भारताने केवळ गोलंदाजांच्या जीवावर जिंकली. ५ पैकी ४ सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना भारताने प्रतिस्पर्ध्यांना ३ वेळा १७५ ते १८३ या धावसंख्येत रोखले होते, तर उपांत्य सामन्यात किवींना २०६ धावात रोखले होते. फक्त एकाच इंग्लंडविरूध्दच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून २३० धावा करून सामना जिंकला होता. उरलेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना लक्ष्य अतिशय कमी असल्याने शास्त्रीने अत्यंत कूर्मगती फलंदाजी करून ३ अर्धशतके केली. तसेच त्याने थोडे बळीही मिळविले होते. श्रीकांतने सुध्दा वेगवान ३ अर्धशतके केली होती. माझ्या दृष्टीने मालिकावीर श्रीकांत होता. परंतु तो मान शास्त्रीला मिळाला.

>>> (सदानंद विश्वनाथ परत भारतीय संघात कधीच खेळला नाही आणि कुठे गायब झाला देव जाणे).

सदानंद विश्वनाथ हा अत्यंत उत्साही, चपळ व आक्रमक यष्टीरक्षक होता. तो फलंदाजांना अतिशय वेगाने धावबाद व यष्टीचित करत असे. भारताच्या या १९८५ च्या या बेन्सन अ‍ॅन्ड हेजेस स्पर्धेतल्या विजयात त्याच्या उत्साही कामगिरीचा मोठा वाटा होता. वारंवार अपील करून तो प्रतिस्पर्ध्याच्या फलंदाजांना वैताग देत असे.

या मालिकेनंतर तो एकदम गायब झाला. १९८७ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या पाकिस्तानविरूध्दच्या ६ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याला अचानक ३ र्‍या सामन्यात घेण्यात आले. पहिले २ सामने भारत हरला होता. तिसरा सामना टाय झाला, परंतु भारताचे कमी गडी बाद झाल्याने भारताला विजयी घोषित करण्यात आले. नंतर भारत ही मालिका १-५ अशी हरला. या सामन्यानंतर मात्र तो परत कधीही दिसला नाही. त्याची जागा किरण मोरेने घेतली.

या टाय सामन्याची एक मजेशीर आठवण आहे. शेवटच्या चेंडूवर पाकड्यांना विजयासाठी २ धावा हव्या होत्या. चेतन शर्मा गोलंदाजी करत होता. १९८५ मध्ये शारजामध्ये शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ४ धाव्या असताना चेतन शर्माच्या फुल्टॉस चेंडूवर जावेद मियांदादने षटकार मारून पाकड्यांना जिंकून दिला होता. त्या कटु आठवणी या सामन्याच्या वेळी ताज्या होत्या.

शेवटचा चेंडू टाकण्याआधी गावसकरने चेतनला काहितरी सल्ला दिला. त्यानंतर धाव घेऊन चेतनने जो चेंडू टाकला तो आश्चर्य म्हणजे फुल्टॉस होता. त्या चेंडूवर फलंदाजाला एकच धाव घेता आली व दुसरी अशक्यप्राय धाव घेताना फलंदाज धावबाद झाला. धावसंख्येची बरोबरी झाल्याने व भारताचे कमी गडी बाद झालेले असल्याने भारत विजयी झाला. चेतन शर्मा १९८५ च्या शारजाच्या कटु अनुभवामुळे कोणत्याही परिस्थितीत फुल्टॉस चेंडू टाकणार नाही, अशा समजुतीत समोरील फलंदाज होता. गावसकरने हे बरोबर हेरून चेतनला फक्त फुल्टॉसच टाक हा सल्ला दिला. अचानक फुल्टॉस आल्यामुळे गोंधळलेल्या फलंदाजाला कशीबशी एकच धाव करता आली व भारताने सामना जिंकला.

आशुतोष मस्तच... फक्त ऑडीच आठवतेयं

गावसकरने हे बरोबर हेरून चेतनला फक्त फुल्टॉसच टाक हा सल्ला दिला. >>> मास्तुरे अगदी अगदी... त्या वेळी स्केवर लेग वरून यष्ट्यांवर आलेल्या अप्रतिम थ्रो ने तो सामना टाय झाला होता.

ती संपूर्ण मालिका बघितली होती. शास्त्रीला ऑडी मिळणे हा एक विनोद दर्जेदार होता. तो सोडला तर खरच खूप मस्त मालिका झाली. विशेषतः श्रीकांतने मेलबोर्नवर (भारतातल्या पहाटे पहाटे) मारलेले सरळसोट षटकार!

पण काही म्हणा, अगदी गावसकरपेक्षाही कर्नल वेंगसरकर वॉज अ मॅच विनर! त्याने आणि कपिलने कित्येकदा उत्तम भागीदार्‍या केल्या. मजा म्हणजे हेल्मेट घातल्यावर केवळ 'फटका मारण्याच्या शैलीवरून' कोणता कपिल आहे आणि कोणता वेंगसरकर ते ओळखावे लागायचे. कारण तेव्हा बरेचदा काळे पांढरेच टीव्ही असायचे आणि प्रक्षेपणही भारीच असायचे. सदानंद विश्वनाथला आपण खरच मुकलो. मात्र तो टकळी चालवून फलंदाजाची एकाग्रता कंप्लीट भंगवायचा. त्यामुळे शिव्याही खायचा प्रतिस्पर्ध्यांच्या!

शास्त्रीने खरे तर समालोचकही होऊ नये. सव्वा सहा फुट उंची आणि देखणे रूप या जोरावर बहुधा तो हिरो झाला असावा. काहीही केले नाही त्याने! गावसकरचाही शेवटची चार एक वर्षे नितांत कंटाळा आला होता.

वेंगसरकर, कपिल आणि काही प्रमाणात मोहिंदर (वर्ल्ड कप मध्ये होताच, पण एरवी काही प्रमाणात) हे आपले बर्‍यापैकी तारणहार असायचे. श्रीकात हा एक मटका होता. हल्ली सेहवाग आहे त्यापेचा जरा कमी दर्जाचा मटका! लागला तर उत्तम, नाहीतर विसरून जा असा!

उत्तम लेख. फारच आवडला. अगेन लिव्ह्ड दोज मोमेन्ट्स! धन्यवाद!

अजून लिहा.

-'बेफिकीर'!

छान लेखाने पुनःप्रत्ययाचा खास आनंद दिला. धन्यवाद, आशुतोष.

<< शास्त्रीला ऑडी मिळणे हा एक विनोद दर्जेदार होता >> बेफिकीरजी, शास्त्रीने ‍ऑडीसाठी असलेल्या नियमांचा कसून अभ्यास केला होता व त्यानुसार इतर स्पर्धकांची व आपली गुणवारी प्रत्येक सामन्याच्या आधी तपासून तो आपली फलंदाजी व गोलंदाजीतली कामगिरी चतुराईने गुण वाढतील अशी करत होता. गावस्करने त्याला हे करण्यात खूप मदतही केली [ फलंदाजी व गोलंदाजीत योग्य वेळी वाव देऊन ], असं निश्चितपणे आठवतं; धोनी व जडेजा बद्दल आतां बोललं जातं तसं गावस्कर व शास्त्रीबद्दल बोललं जायचं ! एकंदरीतच , घोकंपट्टी करून मिळालेल्या अग्रक्रमासारखंच शास्त्रीला ऑडी मिळणं होतं, हे बर्‍याच जणांच , बेफिकीरजी व आस्मादिक धरून, ठाम मत होतं.

<< सदानंद विश्वनाथ परत भारतीय संघात कधीच खेळला नाही आणि कुठे गायब झाला देव जाणे >> मला आठवतं कीं त्याच्या एकसारखं ओरडून फलंदाजाना त्रास देण्याबद्दल बर्‍याच तक्रारी झाल्या होत्या व तेंच त्याला महागात पडलं; शिवाय, त्यावेळीं मुंबईची चलती होती व एकदा किरण मोरे आंत आल्यावर व चांगली 'कीपींग' करतो असं झाल्यावर, सदानंद विश्वनाथला पुनरागमन करणं अशक्यच झालं असावं. अर्थात, हा आपला माझा तर्क !

या मॅचमधे कपिलने कव्हरमधे एक जोरदार ड्राईव्ह केला, तो लो कॅच पुढे डाइव्ह टाकून पकडता आला नाही. कपिल वाचला. त्या आधी अझर व शास्त्रीने मॅच जवळ जवळ घालवलीच होती. अझर खच्चून जोरात शॉट मारायचा पण थेट फिल्डरकडे (द्रविड मारतो तसा). कपिल आणि वेंगसरकर आल्यावर मग कुठे गॅपातनं बॉल जायला लागले.

या सदानंद विश्वनाथने घेतलेली एक विकेट मला आठवतेय. मॅच कुठली ते आठवत नाही. मला वाटतं रन घेताना बॅटसमन क्रीजमधे आल्यावर थ्रोमुळे बेल्स पडल्या. तेव्हा विश्वनाथने हातात बॉल लपवला आणि बॉल शोधायचं नाटक केल्यामुळे बॅटसमनने परत रन घ्यायला सुरुवात केली. तो क्रीजमधून बाहेर पडल्यावर विश्वनाथने स्टंप उखडून अंपायरकडे अपील करत धाव घेतली. तो अर्थातच आउट झाला. बेल्स पडलेल्या असतील तर स्टंप पूर्णपणे पाडावा लागतो हा नियम मला तेव्हा समजला.

छान लेख!

हो, ह्या मालिका फारशा आठवत नाहीत आता पण रवि शास्त्री ची औडी, 'चॅम्पिअन ऑफ चॅम्पियन्स्' आणि त्याने ती औडी मैदानात फिरवलेली आठवते, गाडीत, टपावर आपले सगळे खेळाडू होते .. त्या औडी आणि 'चॅम्पिअन ऑफ चॅम्पियन्स्' मुळे रवि शास्त्री खुपच आवडायला लागला .. Happy

फक्त, लेखाच्या आधी २०११ च्या विश्व चषक मालिकेविषयी थोडी तरी प्रस्तावना असायला हवी होती असं वाटलं .. हा विशेषांक त्या निमित्ताने आहे म्हणून ..

छान!
मला फार आठवत नाहीये पण तरी नोस्टेलजिक वाटले कारण त्यावेळी आमच्या घरात मॅच बघायला प्रचंड गर्दी झाली होती! खुप चिल्ली पिल्ली, त्यांचे बाबा/काहींच्या आयापण. काही लोकांना खर तर संकोच वाटायचा यायला. त्यांना आमचे बाबा खास आमंत्रण द्यायचे Biggrin एकत्र जेवणं व्हायची. चहा-पाणी. अजुनही त्या चिल्ल्यापिल्ल्यांपैकी कुणी आई बाबाना भेटले तर आवर्जुन सांगतात, 'काका, तुम्हाला आम्ही विसरुच शकत नाही! तुमच्यामुळे ती अमकी ढमकी मॅच बघायला मिळाली!' आणि गंमत म्हणजे त्यावेळी आमच्याकडे सध्याच्याअ मा वे च्या आकाराचा ब्लॅक-व्हाईट क्राऊन कंपनीचा टीव्ही होता. Happy
विषयांतराबद्दल क्षमस्व!