हेच खरे!

Submitted by कविन on 26 April, 2011 - 07:27

लहानपणी वीज गेली
की मेणबत्तीच्या प्रकाशात
सावल्यांचा खेळ रंगायचा
हरिण, ससा, पक्षी, मासा
वेगवेगळा आकार त्या
सावल्यांमधून तयार व्हायचा

घामाच्या धारा आणि गुणगुणणारे डास
कासवछापचा चुरचुरणारा उग्रसा वास
सगळ्या सगळ्याचा विसर पडायचा,
सावल्यांच्या त्या भासमय खेळात
जीव असा रंगून जायचा

शेवटी छोटे काय नि मोठे काय?
नको असलेला वर्तमान विसरायला
आभासी दुनियाच लागते
तात्पुरती का होईना

हेच खरे!

गुलमोहर: 

>>>नको असलेला वर्तमान विसरायला
आभासी दुनियाच लागते
तात्पुरती का होईना<<<
अगदी, अगदी ! पटलं एकदम ! Happy

>>>नको असलेला वर्तमान विसरायला
आभासी दुनियाच लागते
तात्पुरती का होईना<<<
असेच म्हणतो. Happy

अगदी १००% पटलं ग कविता. आभासी दुनिया हवीच, अंगावर येणारं वास्तव काही काळापुरतं विसरायला, आणि नंतर सोसायला!

"नको असलेला वर्तमान विसरायला
आभासी दुनियाच लागते
तात्पुरती का होईना

हेच खरे!"

हे पटलं,
पण कवितेमधल्या केवळ एका उदाहरणावरून सरसकट काढलेलं अनुमान म्हणून नाही पटलं... आणि तिथे कविता संपतेय म्हणून हे जास्त जाणवलं...

(वीज गेलेली नसतानाही लहानपणी वर्तमान जगावा लागतो त्याचं काय?)
चुभुद्याघ्या.

>>(वीज गेलेली नसतानाही लहानपणी वर्तमान जगावा लागतो त्याचं काय?)

आनंदयात्री, मला वाटतं हे उदाहरण नसून ती एक प्रतिमा आहे. त्यामूळे तुला पडलेला प्रश्न उद्भवतच नाही इथे. असं मला वाटतं.

ओह्ह!!! thanks झाडा...
(पानं सळसळवून एकदम श़ंकांची जळमटं दूर केल्याबद्दल... :P)
jokes apart, ह्म्म... मी तसा विचार केलाच नव्हता... Happy