आमचें गोंय- भाग ३ - पोर्तुगीज(राजकीय आक्रमण)

Submitted by टीम गोवा on 25 April, 2011 - 06:16

***
आमचें गोंय- प्रास्तविक(१)
आमचें गोंय- प्रास्तविक(२)
आमचें गोंय- भाग १ - प्राचीन इतिहास
आमचें गोंय- भाग २ - मध्ययुग व मुसलमानी सत्ता
आमचें गोंय- भाग ३ - पोर्तुगीज(राजकीय आक्रमण)
आमचे गोंय - भाग ४ - पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण)
आमचे गोंय - भाग ५ - शिवकाल आणि मराठेशाही

***

पोर्तुगिजांचा गोव्यात शिरकाव


व्हाश्कु द गामा (आंतरजालावरून साभार)

युरोपिय देशांमधे भारत तसा सुपरिचित होता. विशेषतः विजयनगर साम्राज्यामुळे आणि आशिया खंडातील सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. अश्या ह्या सुवर्णभूमीशी प्रत्यक्ष संबंध कोणत्या देशाला नको असतील? म्हणुन मग पोर्तुगालच्या राजाने भारतापर्यंत पोचणारी दर्यावर्दी वाट शोधण्यासाठी व्हाश्कु द गामा ह्याला पाठवले (इ. स. १४९८). व्हाश्कु द गामा भारतात यशस्वीरित्या पोचला. म्हणजे वाटेत मिळणार्‍या जहाजांची लूट, जाळपोळ, बायका मुले पळवणे, छोटे देश लुटणे, बाटवाबाटवी अशी यशस्वी कामे करत आला. कालिकतच्या राजाने आधी त्याचा सत्कार केला खरा पण नंतर त्यांचे बिनसले. १२ दिवस राहून तो परत गेला. जाण्यापुर्वी त्याने इथे एक वखार ही स्थापली. परत जाताना मलबारच्या हिंदुंना घेउन गेला, (आता तिकडे नेलं म्हणजे त्यांना ख्रिस्ती बनवणं हे तर ओघाने आलंच) आणि मग परत पाठवुन दिले. (ही पोर्तुगालच्या राजाची वसाहतविषयक धोरणांची नांदी होती.) तसाही, व्हाश्कु द गामा भारतात येण्यापुर्वीच, ख्रिस्ती धर्म बर्‍यापैकी पसरलेला होता.

यानंतर ज्या ज्या वेळेला पोर्तुगालची जहाजं / गलबतं भारतात आली ती वाटेत भेटणार्‍या यात्रेकरुंच्या गलबतांची लुटमार, जाळपोळ इ. केल्याशिवाय कधीच राहिली नाहीत.


व्हाश्कु द गामाचे जहाज (आंतरजालावरून साभार)

इ. स. १५०३ च्या ६ एप्रिलला पोर्तुगालच्या राजाने, अल्फान्सो दे आल्बुकर्क याला ४ गलबतांचा ताफा देउन भारताकडे पाठवले. कोचीननजिक किल्वा येथे उतरल्यावर त्याने तिथल्या राजाशी व्यापारासंबधी बोलणी तर केलीच पण तसा करार करताना त्याने एक मागणीही केली. पोर्तुगालतर्फे तिथे जो माणुस राहिल त्याच्याकडे तेथिल ख्रिश्चनांचे तंटे बखेडे सोडवण्याचे व न्याय देण्याचे काम सोपवावे. आधी राजा तयार झाला नाही; पण शेवटी त्याने ती मागणी मान्य केली. हा पोर्तुगालचा भारतातील पहिला व्हाइसरॉय. फ्रांसिस्कु दि आल्मेदा. ह्याची धोरणे व्यापारविषयक होती पण आल्बुकर्कची महत्वाकांक्षा सत्ता स्थापण्याची होती. पण त्याला तशी योग्य भूमी मिळत नव्हती.

ही संधी त्यांना मिळाली पण तेव्हा पोर्तुगीजांचा भारतात प्रवेश होउन ११ वर्षे लोटली होती.

गोमंतक ईस्लामी अधिपत्याखाली असताना गोमंतकीय जनतेस 'नायटे' लोकांचा फार त्रास होत असे. हे नायटे म्हणजे हिंदु स्त्रिया व मुसलमान पुरुष यांच्यापासुन झालेली मिश्र संतती. हे लोक फार क्रूर व धाडसी. चाचेगिरीत माहिर. भटकळ, होन्नावर ह्या बंदराजवळच्या भागात त्यांचे वास्तव्य असे. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय याला अरबस्तानातुन घोडे आणताना व्यत्यय आणल्याने त्याने त्यांचा नि:पात करायला एका मांडलिकास सांगितले. तर त्याने राजाचा हुकुम शब्दशः पाळला. जवळ जवळ दहा हजाराहून अधिक नायट्यांना ठार मारले. जे उरले सुरले नायटे बचावले त्यांनी गोव्याचा आश्रय घेतला व गोव्यातुन विजयनगर साम्राज्याला त्रास देणे सुरुच ठेवले. तर ह्या नायट्यांनी मुस्लिम राजवटीपासुन गोमांतकीयांना छळणे सुरु केले होते. त्यांना धडा शिकवावा व गोवा सोडून जाण्यास भाग पाडावे यासाठी वेर्णेच्या सरदेसायांनी त्यांच्यावर हल्ला केला व कित्येकांना मारुन टाकले. पण एवढे होउनही नायटे गोवा बेट सोडुन गेले नाहीत. तेव्हा सरदेसायांनी लोकांची तक्रार तिमोजा ह्या गोमंतकीय पण विजयनगरच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कानावर घातली. गोव्यावर हिंदु सत्ता स्थापन व्हावी व त्याचा सुभेदार आपण व्हावे असे तिमोजाला वाटत असे.

मग तिमोजाने होन्नावर येथे असलेल्या फ्रांसिस्कु आल्मेदा या पोर्तुगीज व्हाईसरॉय ची भेट घेतली व त्याची मदत मागितली. पुढे तिमोजा व आफोंसो दी आल्बुकर्क ची भेट झाली आणि गोव्यावर स्वारीचा बेत पक्का झाला. पोर्तुगिजांना व्यापार आणि द्रव्य पाहिजे तेवढे मिळाले की संतुष्ट होतील, गोमंतक पुन्हा विजयनगर साम्राज्याचा हिस्सा होईल व आपण सुभेदार बनू अशी तिमोजाची समजुत होती. याउलट येनकेण प्रकारेण हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्‍यावर आपल्या सत्तेची भूमी असावी अशी आल्बुकर्कची ईच्छा होती. पण ती सफल होत नव्हती कारण हिंदुस्थानचे राजे भूमी हातची जाऊ न देण्याबाबत फार जागरूक होते. अशा समयी तिमोजाची कल्पना त्याच्यासाठी खूप मोट्ठी संधी होती.

हा कट शिजत असतानाच गोव्यावर राज्य करणार्‍या आदिलशहाचा मृत्यु झाला व त्याचा मुलगा ईस्माईल गादीवर बसला. आणि गोव्यात त्यांचे केवळ २०० सैनिक होते. ही संधी साधुन आल्बुकर्क ने गोव्यावर स्वारी केली व तिसवाडी सर केली. पोर्तुगीजांनी गोवा जिंकण्यापुर्वी, गोव्यावर हिंदुंचे स्वामित्व होते. इस १३५२-१३६६ व १४७२-१५१० या काळात तेवढी मुसलमानी सत्ता होती. मुसलमानी सत्ता नको म्हणुन तिमोजाने व गोमंतकीय हिंदु लढवय्यांनी आल्बुकर्कला मुक्तपणे साह्य केले.

पण झाले भलतेच.

--------------

गोवा जिंकल्यानंतर


अफोंसो द आल्बुकर्क (आंतरजालावरून साभार)

आल्बुकर्क शूर होता, तसाच धूर्त मुत्सद्दी होता. गोवा बेट जिंकल्यावर त्याने दवंडी पिटुन प्रजेस धार्मिक स्वातंत्र्य जाहीर केले. सतीची प्रथा बंद केली. पण हा त्याचा मतलबीपणा होता. त्याला पोर्तुगीज सत्ता गोव्यात स्थापायची होती. त्यासाठी पोर्तुगीज संस्कृती येथे रुजणे महत्वाचे होते. याच उद्देशाने त्याने पोर्तुगीज पुरुषांस ठार झालेल्या मुसलमानांच्या विधवांशी विवाह करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांना घोडा, घर, गुरे, जमीन दिली. गोवा बेटाचे ख्रिस्तीकरण करण्याच्या मार्गात आणि ख्रिस्ती प्रजेचा विकासच्या मार्गात स्थानिक लोकांची अडगळ आल्बुकर्कला वाटली. आणि प्रसंगी त्यांना गोव्याबाहेर हाकलण्याची तयारीही होती.

आता सत्ता स्थापन झाली म्हणजे बाटवाबाटवी ,लुटालुट व त्यासाठी जनतेचा अमानुष छळ वगैरे सगळं राजरोस सुरू झालं. १ एप्रिल १५१२ ला पोर्तुगालचा राजा दों मानुएल याला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो की काही ब्राह्मणांनी व नाईकबारींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला!!!! हे काही सुखासुखी झालं नसेल....

गोमंतकात पहिले चर्च भाणस्तारच्या किल्ल्यात बांधले गेले. त्याला नाव दिले सेंट कॅथरिन चर्च कारण ज्या दिवशी गोवा जिंकला तो दिवस सेंट कॅथरिनचा होता. दुसरे चर्च जुने गोवे (Old Goa) इथे उभारण्यात आले. हे चर्च, गोवा जिंकताना झालेल्या लढाईत ज्या स्थानावरुन मुसलमान सैन्याने पळ काढला, त्या ठिकाणी बांधण्यात आले.

आल्बुकर्कच्या गोव्यात पोर्तुगीज रक्ताची केंद्रे वाढवणे व ख्रिस्ती धर्मप्रसार यांच्या हव्यासामुळे स्त्रिया व कुमारिकांची स्थिती अत्यंत दयनिय झाली होती. एकाही मुस्लिम पुरुषाला जिवंत राहु दिले नव्हते. मग तो सैनिक असो वा साधा नागरिक!!! त्यांच्या घरच्या विधवा स्त्रिया, कुमारिका यांना कैदेत ठेवण्यात आले होते. जे कोणी पोर्तुगीज पुरुष त्यांच्याशी लग्नास राजी होत त्यांना त्या स्त्रिया पत्नी म्हणुन दिल्या जात. शिवाय घर, पैसे, कपडे, जमीनही मिळे. इतर स्त्रिया गुलाम म्हणुन जीवन कंठीत. काहींना तर पोर्तुगालला पाठवण्यात आले होते.

ईस्माईल आदिलशहाने गोवा जिंकण्याचे दोन प्रयत्न इ. स. १५१६ व इ. स. १५२० मधे केले पण त्याचा दारुण पराभव झाला आणि सासष्टी, बारदेश व अंत्रुज (आताचे फोंडा) हे तीन महाल (तालुके) त्याला पोर्तुगीजांना द्यावे लागले. आणि या विजयाने आल्बुकर्कचा आत्मविश्वास वाढला व त्याची खात्री झाली आता त्याची गोव्यातील सत्ता अबाधित आहे. आणि त्याने जोमाने ख्रिस्ती धर्मप्रचाराला सुरुवात केली.

इ. स. १५३० साली पोर्तुगालचा राजा दीं ज्युआव याने मिंगेल व्हाज नावाच्या धर्मोपदेशकास गोव्याचा धर्माधिकारी म्हणुन पाठविले. आणि धर्मांतरे सुरु झाली. हा राजा त्यावेळी केवळ १९ वर्षांचा होता.

याच सुमारास गोव्यात कॅथॉलिक बिशपची गादी स्थापन करण्यात आली.

क्रमशः

**

विशेष सूचना - या लेखमालेचे स्वरूप एकंदरीतच ललित लेखनाच्या अंगाने जाणारे पण गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे, आणि वर्तमानाचेही, दर्शन वाचकांना करून देणे एवढेच आहे. वाचकांना विनंती की त्यांनीही ते तेवढ्याच बेताने घ्यावे. आम्ही कोणीही इतिहासकार / इतिहासतज्ञ वगैरे नाही आहोत. पण थोडे फार वाचन करून, माहिती जमा करून इथे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तपशीलात अथवा आमच्या निष्कर्षात चूक / गल्लत असू शकते. पण काही चांगले लेखन यावे आणि गोव्याची रूढ कल्पना सोडून त्याहून वेगळा गोवा काय आहे हे लोकांना कळावे म्हणूनच हा सगळा लेखमालेचा उद्योग.

- टीम गोवा (ज्योति_कामत,प्रीतमोहर, बिपिन कार्यकर्ते)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाटेत मिळणार्‍या जहाजांची लूट, जाळपोळ, बायका मुले पळवणे, छोटे देश लुटणे, बाटवाबाटवी अशी यशस्वी कामे करत आला.
>> अगदी अगदी.. आपल्याकडे मात्र शाळकरी पुस्तकातून त्याचा केवढा उदोउदो.. पहिलाला दर्यावर्दी इतका फिरून तो भारतात आला... आम्हाला तेंव्हा केवढा आनंद वाटायचा... Sad

ह्या कालावधीत तिथे जनतेची काय अवस्था झाली असेल ह्याची कल्पना देखील करवत नाही...
पुरुषांना गुलाम करायचे आणि स्त्रीयांना उपभोगाची वस्तू... अत्यंत अमानुष छळ Sad

खरंच त्या कळातला इतिहास वाचताना त्या दुर्दैवी लोकांच खूप वाईट वाटतं!
सर्व लेख उत्तम!