एक भेट टॉड बेअरशी

Submitted by ठमादेवी on 18 April, 2011 - 09:35

बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा केनियामध्ये जाऊन एका रिपोर्टरने त्यांच्या कुटुंबियांच्या संदर्भातली बातमी केली होती... ही बातमी अल जझीरा (इंग्लिश)च्या माध्यमातून प्रसिद्ध झाली आणि मग सीएनएन या वृत्तवाहिनीने या वार्ताहराला शोधलं... टॉड बेअर त्याचं नाव... अल जझीरा या कतारच्या वाहिनीचा तो मध्यपूर्व देशांचा प्रतिनिधी होता... मग त्याने पुण्यात साम टीव्ही, सीएनएन आयबीएन या चॅनल्सच्या वार्ताहरांना प्रशिक्षण दिलं. त्याची भेट मागच्याच आठवड्यात प्रहारच्या ऑफिसमध्ये झाली आणि ते दोन दिवस आम्ही दोघे एकत्र होतो... त्याच्याशी संवाद साधणं म्हणजे एक नवीनच जग उलगडल्यासारखं वाटलं... रोजच्या बातम्यांना एक्स्लुझिव्हचा टॅग लावून त्या पेश करणार्‍या मीडियाची शरम वाटली...
टॉड प्रहारच्या ऑफिसमध्ये आला आणि त्याच्याशी प्रथम बोलताना आपण आधी कधी भेटलो नाही आहोत असं वाटलंच नाही... वर्षानुवर्षांची ओळख असावी असं त्याचं बोलणं...
अल जझीराच्या माध्यमातून त्याने अनेक गोष्टी कव्हर केल्या.. त्यात बेनझीर भुत्तोंचं हत्याकांड, कराचीमध्ये एका गोळी लागलेल्या आणि मरणपंथाला असलेल्या माणसाचा "बाईट" कुणीतरी घेतल्यावरून जगभरात निर्माण झालेला वाद, गाझा पट्टीत झालेलयुद्ध्, मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला असं एक ना अनेक त्याने कव्हर केलं... या सगळ्यांचा व्हिडिओज त्याने दाखवल्याच पण त्याचबरोबर हे रोमांचक अनुभव शेअर करताना त्याने पत्रकारितेबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या... गाझा पट्ट्यात युद्धाच्या दरम्यान तरुणांचा दुर्दम्य आशावाद त्याने जगासमोर आणला... कदाचित आपल्याकडच्या लोकांना अगदीच छोटी वाटणारी बातमी अगदी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कशी महत्त्वाची ठरते हे त्यातून दिसलं...
भारतातली पत्रकारिता हत्या, चोर्‍या, बलात्कार, गुन्हेगारी, भ्रष्टाचार यांच्यापलीकडे गेलेली दिसत नाही.. हे नाही तर मग चॅनल्सवर सीरियल्स आणि सिनेमांचे प्रीमीयर... बातमी कधीपासून मनोरंजन होऊ लागलीय? पहिल्याच प्रश्नावर मी अवाक... भारतातली चॅनल्स अजिबात गंभीर नाहीत. बातमी कशी सादर करायची त्याचं त्यांना गांभीर्य नाही... बातमीदारी हा एक गंभीर व्यवसाय आहे आणि तो तितक्याच गांभीर्याने करायला हवा... पण हे जरा कठीणच दिसतं... कारण योग्य माहिती देण्यापेक्षा ती सनसनाटी कशी होईल याकडे लक्ष दिलं जातं, तो पुढे म्हणाला...
मग विषय वळला पेड न्यूजकडे... पश्चिमेकडच्या देशांमध्ये पत्रकारांनी गिफ्ट किंवा रकमेच्या स्वरूपात काय स्वीकारावं याचे काही लिखित नियम आहेत का?- इति मी... हो आहेत तर!! तिथे पत्रकारांना १०० डॉलर्सपेक्षा जास्तीचं गिफ्ट स्वीकारायचं असेल तर डायरेक्टरची परवानगी घ्यावी लागते... तसं केलं नाही तर पत्रकाराला एका वर्षासाठी नोकरीतून बाहेर राहावं लागतं आणि दुसरा कुठलाही पेपर किंवा चॅनल्स त्यांना नोकरी देत नाही... भारतात पत्रकारांनी कुठल्याही कंपनीने कुठे व्हिजिटला नेलं तर जाऊ नये... स्वखर्चाने जावं... टॉड... पण भारतात पत्रकारांना इतका पगार दिला जात नाही की त्यांना कुठेही स्वखर्चाने जाता येईल... पण तरीही कुठलाही पत्रकार कंपनीने नेलं म्हणून त्यांच्याबद्दल चांगलंच लिहिल असंही नाही... त्यांना जे दिसतं तेच लिहिलं जातं... हे माझं उत्तर...
पाश्चिमात्य देशांमध्ये राजकीय नेत्यांना वृत्तपत्र किंवा चॅनल्स चालवण्याची, त्यात गुंतवणूक करण्याची परवानगी नाही. एकतर तुम्ही मंत्री असता किंवा मग तुम्ही व्यावसायिक असता... दोन्ही एकाच वेळी करता येत नाही... टॉड म्हणाला... पण भारतीय मीडियामध्ये नोकरी बदलणं जितकं सोपं आहे तितकं तिकडे सोपं नाही... खूप कडक नियम आहेत. या नियमांचं उल्लंघन करणं म्हणजे करिअरचं नुकसान करण्यासारखं आहे...
आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता करताना नेमक्या काय काय गोष्टींची काळजी घ्यावी लागते? यावर टॉड म्हणाला, सर्वात पहिलं- तुमची कागदपत्रं क्लिअर असणं महत्त्वाचं... माझ्याकडे दोन अमेरिकन पासपोर्ट आहेत आणि दहा देशांचे व्हिसा आहेत... त्यांची तारीख उलटली तर नाही ना, हे तपासणं, ती सतत दुरूस्त करून घेणं आवश्क. मग तुम्ही नेमकं काय कव्हर करायला जाताय त्याचा अंदाज घेणं... एखादं हत्याकांड किंवा तत्सम काही कव्हर करायचं असेल, युद्ध असेल तर तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवावं लागतं... त्याची जबाबदारी दुसरं कुणीही घेणार नाही... त्यानंतर असेल त्या परिस्थितीत संयम ठेवून बातमीदारी करणंही महत्त्वाचं... तुम्ही जगाला काय दाखवू इच्छिता हेही महत्त्वाचं... "मुंबईवर अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा संपूर्ण जगातला मीडिया त्यात किती अमेरिकन मेले आणि किती परदेशी मेले हेच दाखवत होता. पण माझा एक ऑस्ट्रियन मित्र म्हणाला, हा हल्ला भारतावरचा हल्ला आहे. त्यात १५० भारतीय मेले आहेत... माझंही तेच मत होतं. एकट्या अल जझीरा ने जगासमोर ही गोष्ट स्पष्ट केली" टॉडने आपला अनुभव सांगितला... गाझाच्या पट्टीत खूप धोका होता. तिथे बॉम्ब कुठे लावून ठेवला आहे, भूसुरूंग कुठे आहे तेच कळत नव्ह्ततं... एक पाऊल टाकायचो आणि ठार व्हायची भीती, हे ऐकताना अंगावर काटा उभा राहिला होता...
हल्ली या आंतरराष्ट्रीय चॅनल्सची मानसिकता बदलली आहे... त्यांना युरोपिय किंवा गोर्‍या चेहर्‍याच्या लोकांनी भारतात वगैरे येऊन बातमीदारी करावी असं वाटत नाही... मी लेबनीज अमेरिक्न आहे पण तरीही मला लेबनॉनमध्ये जाऊन बातमी सांगणं त्यांना फारसं रूचत नाही... भारताची बातमी भारतीयांनी सांगावी, असं त्यांना वाटतं. पण भारतीय तरुणांकडे तो दृष्टिकोन दिसत नाही... हे जाणून टॉड आणि त्याच्या काही सहकार्‍यांनी दिल्लीत आयएमआयआय नावाची एक संस्था सुरू केलीय आहे. अल जझीरा, सीएनएनसारख्या चॅनल्स, टॉड जिथे शिकला त्या युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रासाकाने त्याला पाठबळ दिलंय... आता पुढची दोन वर्षं टॉड भारतीय तरूणांना हे प्रशिक्षण देणार आहे... आंतरराष्ट्रीय दर्जाचे पत्रकार घडवण्याचा वसा मी घेतलाय, टॉड आवर्जून सांगतो...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठमे, नेमके बोट ठेवले बघ त्याने, आपल्या मिडीयावर. कशाची बातमी करायची, याचे भानच नाही राहिले, आपल्याला.

ठम्स, खुप छान लेख आहे. न्युज चॅनेल्सवर ज्या भडक पद्धतीने बातम्या दाखवल्या जातात, त्यामुळे एकतर त्यांचे गांभीर्य समजत नाही किंवा कित्येक किरकोळ बातम्यांना उगीचच गांभीर्य दिले जाते...
टॉडच्या प्रशिक्षणातून तयार झालेल्या पत्रकारांकडून नक्कीच स्वागतार्ह बदलांची अपेक्षा करता येईल... Happy

सानी लेट्स होप सो... त्याची संस्था बोगस तर नाही ना यावर मी त्याला खूप पिळलं... ती योग्य आहे हे कळल्यावरच त्या संस्थेचा इथे उल्लेख केला आहे... पण त्याच्याकडून बरंच शिकण्यासारखं आहे हे तर नक्कीच!

लोकांना हेच पाहिजे असतं म्हणून आम्ही हे दाखवतो........... इति. मिडिया

मिडिया वाले असं काही दाखवतात म्हणून समाज तसं करतो.............. इति सामान्य जनता.

कोणि तरी पुढे आलं पाहिजे. मिडिया किंवा समाज कोण पहिल्यांदा आपली मानसिकता बदलतो.......कोण तु ..... का मी........ मी नको तु ........ हे असं चाललंय..........

बाकि ठमादेवी तुमचे अभिनंदन
(लेख नि त्यातून तुमची दिसून येणारी तळमळ ...ध्यास.................. चांगल्या पत्रकारितेची)

>>माझ्याकडे दोन अमेरिकन पासपोर्ट आहेत आणि दहा देशांचे व्हिसा आहेत... >> दोन पासपोर्ट ठेवता येतात एका वेळी?

चांगलं लिहिलय.

पेड न्यूज >> म्हणजे पैसे देऊन वृत्तपत्रात बातमी छापून आणायची, हेच ना? की, पत्रकारांनाही गिफ्ट/ पैसे देऊन बातमी छापून आणायची पध्दत आहे? Uhoh

ठमा, बाकी लेख चांगला आहे व मुद्दे विचार करायला लावणारे. आंतरराष्ट्रीय पत्रकारितेत असलेले व भारतीय नागरिक असलेल्या पत्रकारांचे भारतातील व आंतरराष्ट्रीय पत्रकारितेविषयीचे दृष्टीकोन वाचायलाही आवडतील.

चांगला लेख!

@शैलजा, जगभर कामासाठी फिरताना इथे बरेचजण दोन पासपोर्ट ठेवतात. एका पासपोर्टवर प्रवास करताना दुसरा व्हिसा साठी पाठवता येतो. तसेच ट्रॅव्हल रेस्टिक्शन असलेल्या देशात प्रवास करताना याचा उपयोग होतो. जर का 'क्ष' देशाला 'य' देशाशी वाकडे आहे तर 'क्ष' देशाकडे व्हिसा मागताना 'य' चा स्टँप नसलेला पासपोर्ट पाठवायचा. Happy

चांगले लिहीलय.
शैलजा
हो इथे लोकांकडे अमेरीकेचे दोन पासपोर्ट असू शकतात, एक स्वतःचा वैयक्तिक आणि सरकारी कामासाठी परदेशी जाणार असाल तर सरकारकडून मिळालेला पासपोर्ट.

मस्त गं कोके....छान लिहीलेयस...मलाही जाम आवडले असते त्याला भेटायला...मी ज्यावेळी पत्रकारीतेत आलो त्यावेळी वॉर जर्नालिझमची खूप क्रेझ होती. पण इतक्या वर्षात तेच चाकोरबद्ध काम करून ती क्रेझ कुठेतरी आत मरून गेली. असो...
आपल्या वाईट गोष्टींवर त्याने बोट ठेवले ते ठीकच केले पण इथल्या काही चांगल्या गोष्टी पण त्याने सांगितल्या का...

आशु, त्या आपण त्याला दाखवून द्यायच्या उदाहरणांनी. Happy तू, कोमल अशी आणि इतरही चांगली माणसं आहात की या फिल्डमधली.

चांगलं लिहिलंयस. आपलं मिडीया अजून बालवाडीतच आहे म्हणायचं.

भारतातली चॅनल्स अजिबात गंभीर नाहीत. बातमी कशी सादर करायची त्याचं त्यांना गांभीर्य नाही... बातमीदारी हा एक गंभीर व्यवसाय आहे आणि तो तितक्याच गांभीर्याने करायला हवा... पण हे जरा कठीणच दिसतं... कारण योग्य माहिती देण्यापेक्षा ती सनसनाटी कशी होईल याकडे लक्ष दिलं जातं, >>>>>>एकदम पटलं.

टॉडचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. "सनसनाटी" हा शब्द म्हणजे मिडीयासाठी खूप काही होऊन बसला आहे. आपल्या पत्रकारीतेमधे काय कव्हर करावं आणि काय कव्हर करू नये? याचा सखोल अभ्यास हा हवाच. खरंतर आजकाल मॅनेजमेंट कॉलेजेसमधे एखाद्या क्रॅशकोर्स सारखी पत्रकारीता शिकवली जाते. ते ही भरमसाठ फी घेऊन. पत्रकारीता हि लोकशाहीची भक्कम बाजू आहे तीच खिळखिळी करण्याचा प्रयत्न इथे काही बड्या धेंडांकडून केला जातो असे मला वाटते. निवडणूका आल्या कि प्रचारसाठी पेड न्युज आहेतच.

पण ठमादेवी.. जसं भारतात 'तेहलका' झाला तसंच काहीसं आता तिकडे पाश्चात्य देशात 'विकिलिक्स' होत असावं असं मला वाटतं आहे. मग हे लोण ईकडून तिकडे पसरलं म्हणायचं काय?

माझा पेपर, माझं मासिक, माझा न्युज चॅनल या पलिकडे विचार करून जेव्हा माझ्या पत्रकारीतेली पारदर्शकता यावर एकदा विचार करावा. मी दिलेली बातमी खोटी असेल तर ती पडताळून पाहण्याची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे असं मनातून कुठेतरी वाटायला हवं.

कुठल्याही देशाचा कायदा, संविधान, सरंक्षण आणि मिडीया यांचं योग्य कॉर्डीनेशन असेल तर तो देश जगाच्या पाठीवरचा एक सुरक्षित देश म्हणून ओळखला जाईल.

टॉड बेअरच्या संस्थेविषयी आणखी माहिती असल्यास जरूर कळवा.

ठमे छानच संधी मिळाली गं तुला. एवढ्या जागतिक किर्तीच्या पत्रकाराच्या सहवासात राहून विचारांची मस्त देवाणघेवाण झाली असेल ना? शुभेच्छा.

>>>>पण दोन दिवसांच्या भेटीबद्दल अजून सविस्तर वाचायला आवडलं असतं. >>>>>> ललिला अनुमोदन. अजून डिटेल्स टाक ना.

मग विषय वळला पेड न्यूजकडे... पश्चिमेकडच्या देशांमध्ये पत्रकारांनी गिफ्ट किंवा रकमेच्या स्वरूपात काय स्वीकारावं याचे काही लिखित नियम आहेत का?- इति मी... हो आहेत तर!! तिथे पत्रकारांना १०० डॉलर्सपेक्षा जास्तीचं गिफ्ट स्वीकारायचं असेल तर डायरेक्टरची परवानगी घ्यावी लागते... तसं केलं नाही तर पत्रकाराला एका वर्षासाठी नोकरीतून बाहेर राहावं लागतं आणि दुसरा कुठलाही पेपर किंवा चॅनल्स त्यांना नोकरी देत नाही... भारतात पत्रकारांनी कुठल्याही कंपनीने कुठे व्हिजिटला नेलं तर जाऊ नये... स्वखर्चाने जावं... टॉड... पण भारतात पत्रकारांना इतका पगार दिला जात नाही की त्यांना कुठेही स्वखर्चाने जाता येईल... पण तरीही कुठलाही पत्रकार कंपनीने नेलं म्हणून त्यांच्याबद्दल चांगलंच लिहिल असंही नाही... त्यांना जे दिसतं तेच लिहिलं जातं... हे माझं उत्तर...
कोमल तुझ्या लेखातला मला महत्वाचा हा भाग वाटतो. यावर तुम्हीच पत्रकार काही करु शकता. निवडणुकांच्या काळात "पॅकेज"च्या बातम्या येतात. जर निवडणुकीच्याच काळात चुकिच्या बातम्या छापल्या गेल्या तर मिडीया हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे अस म्हणण किती योग्य राहिल?

अतिशय चांगला लेख. Happy

भारतातली पत्रकारिता हत्या, चोर्‍या, बलात्कार, गुन्हेगारी, भ्रष्टाचार यांच्यापलीकडे गेलेली दिसत नाही.. हे नाही तर मग चॅनल्सवर सीरियल्स आणि सिनेमांचे प्रीमीयर...

>> भारतातील प्रसारमाध्यमांची अगदी नेमकी स्थिती टॉडने सांगितलीय.

टॉडच्या प्रशिक्षणातून तयार झालेल्या पत्रकारांकडून नक्कीच स्वागतार्ह बदलांची अपेक्षा करता येईल. >> सानीशी सहमत.

खरच चांगला लेख... Happy Happy
२६/११ च्या वेळी म्हणे त्या दहशतवाद्यांना मिडियाच्या थेट प्रक्षेपणामुळे काय चाललय ते कळायला मदत होत होती.... म्हणजे २६/११ या चित्रपटात पण तसचं दाखवलयं कि 'पुढे काय करायचं' याचे संकेत हल्लेखोरांना आपल्या मिडीयाचं थेट प्रक्षेपण पाहुन दिले जात होते....
कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यावं याच भान प्रसारमाध्यमांना असायला हवं...

टॉडच्या प्रशिक्षणातून तयार झालेल्या पत्रकारांकडून नक्कीच स्वागतार्ह बदलांची अपेक्षा करता येईल. >> सानीला अनुमोदन...

आधी मी ते टेडी बेअर वाचल>>>> मलाही त्याचं नाव अजूनही टेडी बेअरच वाटतं... आता मनात घोटवून मी त्याला टॉड म्हणायला शिकलेय...

टॉड प्रहारच्या ऑफिसमध्ये आला... त्याच्याशी तिथे जे काही बोलणं झालं ते इथे दिलंच आहे... पण त्यानंतर आम्ही दोघे ईटीव्हीच्या ऑफिसमध्ये गेलो... मग त्याला त्याच्या हॉटेलवर सोडलं... दुसर्‍या दिवशी माझ्याच म्हणजे रुईया महाविद्यालयात त्याचं व्याख्यान होतं... मी त्याला मदत करायला गेले होते... तेव्हा प्राध्यापकांशी संवाद साधायला मदत करण्यासाठी त्याला माझी गरज होतीच... त्यादरम्यान पत्रकारिता आणि तत्सम विषयांवर आमचं जे काही बोलणं झालं ते मी इथे दिलंय... पण त्याच्याशी अजून संवाद साधण्याची इच्छा आहे माझी... तो या आठवड्यात मुंबईत येईल तेव्हा पुन्हा बोलणं होईल बहुधा...

आशु, तो इथल्या मीडिया आणि लोकशाहीबद्दल खूप चांगलं बोलला... इथे लोक सहजपणे नोकरी बदलू शकतात याचं त्याला आश्चर्य वाटतं... भारत या दृष्टीने खूप चांगला आहे असं तो म्हणतो... पण तरीही इथल्या पत्रकारांचा दृष्टिकोन व्यापक नाही असं तो म्हणतो तेव्हा ते विचार करण्यासारखं आहे... त्याची गाझा पट्ट्यातली तरुण कसे आयुष्य जगायची आशा धरून आहेत ही स्टोरी आपल्याकडे दोन किंवा तीन नंबर पानावर गेली असती.. पण एखाद्या स्टोरीला आंतरराष्ट्रीय दर्जा कसा द्यायाचा हे मी त्याच्याकडून शिकले...

नितीन पॅकेज जर्नालिझमवर केंद्र सरकार काही कायदा करतंच आहे... आणि उडदामाजी काळे गोरे असतातच... पण त्यामुळे एकूणच पत्रकारिता बदनाम होतेय असं वाटतं...

मला त्याला भेटता आलं, पत्रकारितेच्या व्यवसायात दृष्टिकोन बदलण्यास मदत झाली म्हणून मी नशीबवान आहे असं मला वाटतं...

म्हणजे पैसे देऊन वृत्तपत्रात बातमी छापून आणायची, हेच ना? की, पत्रकारांनाही गिफ्ट/ पैसे देऊन बातमी छापून आणायची पध्दत आहे>>> दोन्ही...

गोजिरी... तुझ्या विपूत त्याच्या संस्थेची लिंक टाकतेय...

स्वाती मलाही हाच प्रश्न पडला होता... नवीन माहिती कळली तुझ्याकडून... धन्स... Happy

सगळुयांचे आभार... आपल्याला शक्य असेल तर आपण त्याच्यासोबत एखादं गटग करू शकतो... तो संवाद साधायला नेहमीच उत्सुक असतो...

टॉड चं बहुतांश म्हणणं पटलं!

बाकी कधीकाळी 'मला पत्रकार व्हायचंय' ही निबंधवजा आवड नाही जोपासल्याचं बरंच वाटतंय! Proud

इथे लोक सहजपणे नोकरी बदलू शकतात याचं त्याला आश्चर्य वाटतं... भारत या दृष्टीने खूप चांगला आहे असं तो म्हणतो... पण तरीही इथल्या पत्रकारांचा दृष्टिकोन व्यापक नाही असं तो म्हणतो तेव्हा ते विचार करण्यासारखं आहे... त्याची गाझा पट्ट्यातली तरुण कसे आयुष्य जगायची आशा धरून आहेत ही स्टोरी आपल्याकडे दोन किंवा तीन नंबर पानावर गेली असती..

>> सनसनीखेज न्युज आणखी भडक करून छापण्यापेक्षा हे जमायलाच हवं.

एका अध्यक्षाला बुट फेकून मारलेल्या न्युजचं काय झाल? मायकल जॅक्सन, टायगर वुड्स यांच्या वैयक्तिक आयुष्याला फुटेज देऊन मिडीयाने नेमकं काय साधलं? याचाही विचार करायला हवा.

आजकाल कित्येक गोष्टींमधे "मिडीयाला बोलावून जगासमोर अपमान करू का?", त्याने पत्रकार परिषद घेऊन बिन्धास्त चार शिव्या दिल्या तर माझ्याकडे काय पत्रकार नाहीयेत काय? या सगळा गोष्टीला कोणी आणि कसं थांबवावं.

आजच्या युगात इलेक्ट्रॉनिक मिडियाचं महत्व दिवसेंदिवस वाढत चाललं आहे पण 'ऑफ दि ट्रॅक' काहीही ऐकायला न मिळोत एवढीच आशा आपण करायची आणि त्यांनी फक्त देख भाई देख तमाशा .. असं करून कसं चालेल. आपणही पत्रकारांना सहकार्य केलं पाहीजे ना?

हो ना गं गोजिरी... पत्रकार काही आकाशातून पडलेले नाहीत... तेही या समाजाचाच एक घट्क आहेत... हेही लोकांनी लक्षात घ्यायला हवंय.. पत्रकार जे करतात ते अनेकदा समर्थनीय नसतंही... पण ते जे काही दाखवतात ते आपल्या समाजाचं प्रतिबिंब नाही का? आपण थेट बातम्या दाखवणारी किती चॅनल्स बघतो ? जे सनसनाटी आहे तेच जास्त पाहिलं जातं हे तितकंच खरं... चॅनल्सवरचे विचारांना चालना देणारे, नवीन काही ऐकायला देणारे टॉक शोज आपण किती पाहतो? सहकार्य हे दोन्ही बाजूंनी हवं...

बीबीसी, एनडीटिव्ही सारख्या चॅनल्सवर कित्येकतरी आंतराष्ट्रीय पातळीवर मुलाखती, टॉक शोज आयोजित करतात. तिकडे सहसा चुकूनही कोणाच्याही रिमोटचं बटण प्रेस होत नाही. टिआरपी वाढवण्यासाठी कुठल्या गोष्टींना किती दर्जा द्यावा आणि कशाला महत्व द्यावं हे चॅनलवाल्यांना का कळू नये? आता आपण म्हणतो कि स्पर्धेचं युग आहे त्यात टिकून रहायचं म्हटलं कि या सगळ्या बाबीना महत्व देणं हे ओघाने आलंच पाहीजे. पण टिआरपी हा आपोआप मिळतो पण कधी कधी मिडियावाल्यांनी स्वतःविषयीचे सजेशन्स मागवणंही जरूरी आहे.पण ती सजेशन्स चर्चा मर्यादित न ठेवता खुल्या चर्चेने त्यावर मते मांडली गेली पाहिजेत.

Pages