आठवण

Submitted by उमेश कोठीकर on 16 April, 2011 - 22:57

आठवणींच्या मृदू हातांनी
अलगद डोळे असे पुसावे
टाहो फोडून नेत्र हजारो
रंध्रारंध्रातून फुटावे

स्पर्श तुझा हा आठवणींचा
रोम रोम व्याकुळ निरंतर
असशील तेथून जवळ असा घे
मिठी बनावी सगळे अंतर

आठवणींच्या लाख कळ्यांनी
रात्र अशी ही बहरून यावी
सहवासाची स्वप्ननिळाई
तनामनातून विखरून जावी

आठवणींचे हात हजारो
तुझ्या मिठीचे, क्षणाक्षणाला
ये नं राजसा, चुंबून घे ना
आत्म्यामधल्या कणाकणाला

आठवणींचा गंध परिचित
मिटून डोळे तुला बघावे
हळूच डोळे उघडून बघता
बाहू पसरून तूच दिसावे

गुलमोहर: 

स्पर्श तुझा हा आठवणींचा
रोम रोम व्याकुळ निरंतर
असशील तेथून जवळ असा घे
मिठी बनावी सगळे अंतर

बढिया !! सुंदर कल्पना Happy

सुंदर.....
<<स्पर्श तुझा हा आठवणींचा
रोम रोम व्याकुळ निरंतर
असशील तेथून जवळ असा घे
मिठी बनावी सगळे अंत>>
अशक्य भारी .......... Happy

काय कविता लिहिता कविराज तुम्ही ? फार हेवा वाटतो मला तुमच्या कवितेतील विविध विषयांचा, प्रतिभेचा.....
सलाम, सलाम्........काही बोलू शकत नाही यापुढे.

मिठी बनावी सगळे अंतर,

सहवासाची स्वप्ननिळाई

आठवणींचा गंध परिचित

ह्या ओळी फार सही आल्यात!! Happy

मिठी बनावी सगळे अंतर,

सहवासाची स्वप्ननिळाई

आठवणींचा गंध परिचित

आत्म्यामधल्या कणा कणाला...................क्या बात है.... टीपीकल उमेश कोठीकर ... जियो !!!

जियो Happy