अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू.....!!

Submitted by अभय आर्वीकर on 15 April, 2011 - 14:23

अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू.....!!

आदरणीय अण्णा,

आपण ’जनलोकपाल विधेयकाच्या’ मागणीसाठी केलेले उपोषण खूप गाजले. चार दिवस सलगपणे विविध वृत्तवाहिन्यांवर अण्णा आणि त्यांचे उपोषण हा एकच विषय गाजत होता. वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने भरून आले. इंटरनेटवरही या विषयाची खूप चर्चा झाली. जगाच्या कानाकोपर्‍यातून पाठिंबा जाहीर करण्यात आला. फ़ेसबूकवरून वेगवेगळ्या तर्‍हेने समर्थन व्यक्त केले गेले. सार्वजनिक संकेतस्थळावर धमासान चर्चा झडल्यात. अनेकांनी आपापल्या ब्लॉगवरून या आंदोलनाची दखल घेतली. शेतकरी संघटनेच्या औरंगाबादला झालेल्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत या भ्रष्टाचारमुक्ती अभियानाला सक्रिय पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. आणि सेवाग्राम येथील बापूकुटीसमोर सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत लाक्षणिक उपोषण करून जनलोकपाल विधेयकाला समर्थन देण्याचे भाग्य आम्हालाही लाभले.

या विधेयकाच्या समर्थनार्थ संपूर्ण देशातला आमआदमी लढण्यासाठी मैदानात उतरला असला तरी त्यातील किती लोकांना जनलोकपाल विधेयक कितपत कळले हे सांगणे कठीण आहे. पण भ्रष्टाचारावर इलाज व्हायलाच हवा. "काहीच न करण्यापेक्षा, काहीतरी करणे कधीही चांगले" एवढाच विचार करून आणि प्रथमच भ्रष्टाचाराच्या विरोधात आपला रोष व्यक्त करण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे देशभरातली एवढी आमजनता रस्त्यावर उतरायला तयार झाली असणार, हे उघड आहे.

भ्रष्टाचाराचा महाभयंकर राक्षस आटोक्यात येण्याऐवजी वणव्यासारखा पसरून दिवसेंदिवस अधिक उग्र रूप धारण करत आहे. त्यात आमजनता होरपळून निघत आहे. "जगणे मुष्किल, मरणे मुष्किल" अशा दुहेरी कैचीत आमजनता सापडली आहे. या सर्व प्रकारात राजसत्ताच एकतर स्वतः: लिप्त आहे किंवा खुर्ची वाचविण्याच्या मोहापायी हतबल होऊन डोळेझाक करत आहे, भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालत आहे, हे आता जनतेला कळायला लागले आहे. त्यामुळे त्यांना संताप व्यक्त करण्यासाठी लढायला एक भक्कम आधार हवा होता; तो त्यांना तुमच्यात दिसला म्हणून आमआदमी नेहमीच्या कोंडलेल्या भिंती ओलांडून बाहेर पडला. त्यासाठी अण्णा तुमचे लक्ष-लक्ष अभिनंदन आणि कोटी-कोटी धन्यवाद!

अभियान नव्हे जनचळवळ

भ्रष्टाचार मुक्ती अभियान आता नुसते अभियान राहिले नसून एक जनचळवळ होऊ पाहत आहे. योग्य मुहूर्तावर, योग्यस्थळी या चळवळीची मुहूर्तमेढही रोवली गेली आहे. पण ही चळवळ पुढे न्यायची तर यापुढची वाटचाल नुसती सात्त्विक अथवा भावनिक असून भागणार नाही तर त्यासाठी तर्कसंगतीची जोड लागेल, अभ्यासपूर्ण वास्तवाचे भान लागेल. करावयाच्या उपाययोजनांची नेमकी जाण लागेल. त्यासाठी तुम्हाला या लढाईसाठी त्या तोडीचे सवंगडीही शोधावे लागेल. कारण चित्रविचित्र विचारधारा जोपासणारे अनेक विचारवंत एकत्र येणे सोपे असते पण उद्दीष्ट्य साध्य होईपर्यंत एकत्र टिकणे महाकठीण असते. त्यांच्यात आपसातच फार लवकर पोळा फुटायला लागतो, हा पूर्वानुभव आहे.

अण्णा, जेव्हा तुम्हाला नगर जिल्ह्यात सुद्धा पुरेशी प्रसिद्धी मिळाली नव्हती तेव्हापासून म्हणजे १९८५-८६ पासून तुम्हाला मी ओळखतो. तुमच्या कार्यशैलीवर मी तसा बारकाईने लक्ष ठेवून आहे. या देशातल्या सबंध गरिबीवर मात करता येईल असा काही कार्यक्रम तुम्ही हाती घ्याल, अशा आशाळभूत नजरेने मी तुमच्याकडे सदैव पाहत आलोय. पण माझी निराशाच झाली हे मी नाकारण्याचे काहीच कारण नाही. तुमच्या कार्याचे मोल कमी आहे असे मला म्हणावयाचे नाही आणि जेव्हा देशभरातून तुमच्या कार्याचा गौरव होत असताना माझ्यासारख्या एका फ़ाटक्या माणसाने एक वेगळाच सूर काढणे हेही शोभादायक नाही. पण तुम्ही दाखवलेल्या मार्गाचे अनुकरण करून या देशातल्या लक्षावधी खेड्यांमधल्या एकाही माणसाला "दुसरा अण्णा" बनून आपल्या गावाचे "राळेगण सिंदी" करता आलेले नाही. अगदी मला सुद्धा तुमचा कित्ता गिरवून माझ्या गावाचे रुपांतर "राळेगण सिंदी" सारख्या गावामध्ये करता आलेले नाही.

एवढे अण्णा कुठून आणायचे?

अण्णा, एकेकाळी क्रिकेटमध्ये भारतात वेगवान गोलंदाज ही दुर्मिळ गोष्ट होती, पण कपिलदेव आले आणि मग त्यांचे अनुकरण करून मोठ्या प्रमाणावर वेगवान गोलंदाज तयार व्हायला लागलेत.
ज्याला "भारतरत्न" म्हणून गौरविण्यात केंद्रसरकारने चालढकल चालविली त्या सचिन तेंडुलकरने तर फलंदाजीची व्याख्याच बदलून टाकली आणि सचिनचे अनुकरण करून गावागावात चेंडू सीमापार तडकवणारे फलंदाज तयार झालेत.

सर्व रोगावर रामबाण इलाज म्हणून प्राणायाम आणि योगाभ्यासाचे धडे स्वामी रामदेवबाबांनी दिले आणि अल्पकाळातच जनतेने अनुकरण केले आणि देशभरात हजारो "रामदेवबाबा" तयार झालेत.

"शेतकर्‍यांचे मरण हेच सरकारचे धोरण" असून "शेतमालास रास्त भाव मिळत नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला" त्यासाठी "भीक नको घेऊ घामाचे दाम" असा मंत्र शरद जोशींनी दिला आणि पिढोन्-पिढ्या हतबलपणे जगणारा शेतकरी खडबडून जागा झाला.
शरद जोशींचे अनुकरण करूनच गावागावात लढवय्ये शेतकरी तयार झालेत.

याउलट

संपूर्ण देशातील खेड्यांची "राळेगणसिंदी" करायचे म्हटले तर त्यासाठी काही सरकारी ठोस योजना बनत नाही कारण कदाचित ती अव्यवहार्य असेल. मग सरकारी तिजोरीतून गंगाजळी आपापल्या गावापर्यंत खेचून आणायची तर प्रत्येक गावात एकेक अण्णा हजारे जन्मावा लागेल. आणि अशी कल्पना करणेसुद्धा अशास्त्रीय आणि अव्यवहार्य आहे.

अण्णा, आपला देश हा नेहमीच चमत्कारिक व्यक्तिमत्त्वाच्या मागे धावणारा आणि व्यक्तीपूजक राहिला आहे. त्यामुळे एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची आणि त्याच्या कार्याची व्यावहारिक पातळीवर "चर्चा" करणे एकतर मूर्खपणाचे मानले जाते किंवा निषिद्धतरी मानले जाते. त्यामुळे बाबा आमटे, अभय बंग, अण्णा हजारे किंवा सिंधुताई सपकाळ ही व्यक्तिमत्त्वे उत्तुंग असली तरी यांच्या कार्यामुळे एकंदरीतच समाज रचनेवर, संस्कृतीच्या उत्क्रांतीवर, प्रशासकीय यंत्रणेवर आणि नियोजनकर्त्या निगरगट्ट राज्यकर्त्यांच्या धोरणांवर काहीही प्रभाव पडत नाही, हे सत्य असूनही कोणी स्वीकारायला तयार होत नाही.

जनलोकपाल विधेयक

अण्णा, "जनलोकपाल विधेयक" यायलाच हवे. त्यासाठी तुमच्या समर्थनार्थ मी माझ्यापरीने यथाशक्ती प्रयत्न करणारच आहे. पण या विधेयकामुळे काही क्रांतीकारी बदल वगैरे घडून येतील, या भ्रमात मी नाही. मानवाधिकार आयोगाचा फायदा ’कसाब’ला झाला पण या देशातल्या कष्टकरी जनतेला वेठबिगारापेक्षाही लाजिरवाणे जीवन जगावे लागते, शेतकर्‍यांना आयुष्य संपायच्या आतच आपली जीवनयात्रा संपवावी लागते. देवाने दिलेल्या आयुष्यभर जगण्याच्या त्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यास मानवाधिकार आयोग कुचकामी ठरला आहे. माहितीच्या अधिकाराचा उपयोग या देशातल्या सव्वाशेकोटीपैकी फक्त मूठभर लोकांनाच झाला. त्यामुळे तुम्ही ज्या मार्गाने वाटचाल करताहात त्यामुळे आमजनतेचे फार काही भले होईल असे मला वाटत नाही.
अण्णा, तुम्ही ४-५ दिवस दिल्लीला उपोषण केले आणि आम जनतेच्या नजरेत "हिरो" झालेत. कदाचित हिच आमजनता तुम्हाला एक दिवस "महात्मा" म्हणून गौरवायला मागेपुढे पाहणार नाही. तुमच्या समर्थनार्थ मैदानात उतरायला लागलीच आहे. त्यामुळे मूठभर लोकांच्या नव्हे या "आमजनतेच्या" आयुष्यात सुखाचे आणि सन्मानाचे काही क्षण निर्माण होण्यासाठी तसे थेट प्रयत्न करणे ही आता तुमची जबाबदारी आहे. त्यासाठी नुसती सात्त्विक अथवा भावनिक आंदोलने करून भागणार नाही तर त्यासाठी तर्कसंगतीची जोड लागेल, अभ्यासपूर्ण वास्तवाचे भान लागेल. करावयाच्या उपाययोजनांची नेमकी जाण लागेल. त्यानुरूपच पुढील वाटचाल करावी लागेल.

अण्णा, तुमचा कायद्यावर प्रचंड विश्वास आहे ही चांगली गोष्ट आहे. पण कायद्याने सगळे प्रश्न सुटत नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. कायदा करून उपयोगाचा नाही त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. दुर्दैवाने कायद्याची नीट अंमलबजावणी होत नाही, नाही तर आहे तेच कायदे खूप आहेत. त्यामुळे प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी पुन्हा नवा कायदा किंवा विधेयक हे काही रामबाण औषध ठरू शकत नाही.

याउप्परही तुम्हाला कायदा आणि विधेयके आणली म्हणजे प्रश्न चुटकीसरसी सुटतात, असे वाटत असेल तर मग या वर्धेला. हा जिल्हा महात्मा गांधीजींच्या पावनस्पर्शाने पवित्र झाल्यामुळे फार पूर्वीपासून येथे संपूर्ण जिल्हाभर कायदेशीर दारूबंदी आहे. पण याच जिल्ह्यात पावलापावलावर हवी तेवढी दारू, अगदी ज्या पाहिजे त्या ब्रॅंडमध्ये उपलब्ध आहे आणि गावठीही मुबलक उपलब्ध आहे.

नाही खरे वाटत? मग या सेवाग्रामला बापुकुटीसमोर. येताना एकटेच नका येऊ, हजारो कार्यकर्त्यांसह या आणि येथे दारूनेच आंघोळ करा. हजारो लोकांना आंघोळ करायला पुरून उरेल एवढी दारू एकटे सेवाग्राम हे गावच पुरवेल, याची मला खात्री आहे.

कायद्याच्या राज्याचा विजय असो!

गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही लिहलय लै भारी... पण प्लिज नम्र विनंती नाव आणि शेवटच्या काही लाइन्स तेवध्या बदलता आल्या तर बघा...

काही वेळा सरकार बेताल वागतं. कुणाचं सरकार आहे असा प्रश्न पडतो. पण आपणच निवडून देतो या सरकारला. जातीच्या माणसाला मत देऊन.. आणि नंतर अण्णांना पाठिंबाही देतो. हा पण भ्रष्टाचारच कि..

काल रात्री विधेयक मांडून पाणीवाटपाचे अधिकार मंत्रीमंडळाने स्वतःकडे घेतलेत. म्हणजेच आता लवासा सारखे प्रकल्प, उद्योग, व्यापारी यांना शेतीसाठीचं राखीव पाणी वळवलं जाईल. पाण्याविना कोरडी पडलेली शेती मग याच धनदांडग्यांच्या घशात जाईल.

हे घडत असताना नेहमी जनतेचं लक्ष विचलित होईल असा गोंधळ केला जातो. काल नेमकं महालक्ष्मीच्या देवळातलं आंदोलन चालू होत. या योगायोगाला आणि टायमिंग ला दाद द्यावीशी वाटली.

द्या अजून निवडून "आपल्या" माणसाला. पाण्यावाचून मारलं नाही तर नशीब म्हणायचं..

गंगाधर, तूम्ही अगदी मनापासून लिहिलेय. पण सध्यातरी भारताला यंत्रणा मजबूत करवूनच बदल घडवावे लागतील. भावनाप्रधान होऊन चालणार नाही. लढा नेटाने द्यायचा तर स्थितप्रज्ञच व्हावे लागणार.

मुटे जी योग्य लिखाण, तुम्ही म्हणता त्या प्रंमाणे प्रत्तेक गावात आण्णा असायला पाहीजेत. जर राळेगण सरकारच्या मदतीशिवाय उभे राहू शकते तर इतर गावे का नाही. सामान्य माणूस ही सरकारी गुलामगीरी / लाचारी जो पर्यंत झुगारून देत नाही तो पर्यंत हे चित्र बदलणार नाही. सरकारची तशी ईच्छाही दिसत नाही, अन्यथा ७५००० कोटींचे पॅकेज असे गायब नसते झाले.

मुटेसाहेब, आपण आपला उद्वेग व्यक्त रास्त शब्दात व्यक्त केला आहे.
आपला देश हा नेहमीच चमत्कारिक व्यक्तिमत्त्वाच्या मागे धावणारा आणि व्यक्तीपूजक राहिला आहे.>> हे दुर्दैवाने अगदी खरे आहे. म्हणुनच "आपल्याला" एक गांधी, एक जेपी, एक अण्णा यांची गरज भासते.

लोकपाल विधेयकाने तुम्ही म्हणता तसे क्रांतीकारी बदल वगैरे होतील अशा भ्रमात कोणीच नसतील. पण भारतात जनमत संघटीत होऊ शकतं हे सरकारला कळलं ही देखिल एक प्रकारची फलनिष्पत्ती असावी.

अनिलजी, सध्या सरकार 'आपण' निवडुन देतो कां, याचाच विचार करण्याची गरज आहे. आपण फक्त आपल्या मतदारसंघातुन एखादा उमेदवार निवडुन देतो. नंतर जे कडबोळं होतं त्यावर आपलं नियंत्रण कुठे आहे??

लढा नेटाने द्यायचा तर स्थितप्रज्ञच व्हावे लागणार. >>>> म्हणुनच अण्णा एखादेच होतात, त्यांचं पीक निघत नाही.

मुटेजी,
अगदी नेमकं...!
माणसाला "दुसरा अण्णा" बनून आपल्या गावाचे "राळेगण सिंदी" करता आलेले नाही. अगदी मला सुद्धा तुमचा कित्ता गिरवून माझ्या गावाचे रुपांतर "राळेगण सिंदी" सारख्या गावामध्ये करता आलेले नाही.
हाच तर खरा प्रश्न आहे, तो अनुत्तरित आहे...!
मला असं म्हणता येईल की अण्णा हे काहीं लोकांचेच आहेत, त्यापलिकडे ते जाऊ शकलेले नाहीत !
Happy

माणसाला "दुसरा अण्णा" बनून आपल्या गावाचे "राळेगण सिंदी" करता आलेले नाही. >>>

हा प्रश्न अण्णांचा नाहिये. हा लोकांचा आहे. दुसरे गांधी, दुसरे शिवाजी महाराज, दुसरा गौतम बुद्ध, कोठे झाले ? हे अपयश जनतेचे आहे त्या महापुरुषांचे नाहि.

माणसाला "दुसरा अण्णा" बनून आपल्या गावाचे "राळेगण सिंदी" करता आलेले नाही

आपण भारतीय जंता सदा शांत पडुन असतो. कोणीतरी स्वतःहुन येते आणि आपल्या स्थितीमध्ये बदल करु इच्छिते. त्यांचे ते बदल आपण शांतपणे पाहतो, करा म्हणत नाही आणि करु नकाही म्हणत नाही. त्यांच्या कुबड्या लावून त्यांनी जितके उभे केले तितकेच उभे राहायचे आणि त्या कुबड्या गेल्यावर परत आधी होतो तितके घसरुन पडायचे. आपण पार आडवे झालेलो ते आता थोडेफार उठुन बसलोय. आता कोणी हात धरुन उभे केले तर उभे राहायचे नाहीतर असेच पडुन राहायचे.

मला असं म्हणता येईल की अण्णा हे काहीं लोकांचेच आहेत, त्यापलिकडे ते जाऊ शकलेले नाहीत !

कशावरुन? त्यांनी तुमच्यासाठी काही केले नाही म्हणुन? त्यांनी जे काही 'काही' लोकांसाठी केले ती त्यांची जबाबदारी म्हणुन केले काय? त्यांना जेवढे जमले तेवढे त्यांनी केले, त्याचा लाभ काही लोकांना झाला. आता तो सगळ्यांनाच होत नसेल तर त्याचा दोष अण्णांवर कसा? आपण किती दिवस इतरांवर अवलंबुन राहणार?

हा लेख आवडला. काही गोष्टी फारच योग्य मांडल्या आहेत.
अण्णांच्या संदर्भाने आजच्या लोकसत्तामधला गिरीश कुबेरांचा लेख आणि १० तारखेच्या प्रहारमधील हा http://www.prahaar.in/index.php?news=39963 लेख हे पण वाचण्यासारखे आहेत.
अनेक पातळ्यांवर मला पटले.

मात्र दारू - सेवाग्राम याचा लेखाशी संबंध कळून येत नाहीये.

हा प्रश्न अण्णांचा नाहिये. हा लोकांचा आहे.

नाही. हे खरे नाही.

दुसरे गांधी झाले नाही, पण त्यांच्या विचाराचा प्रभाव तुमच्या आमच्या मनात आजही कायम आहे.
या देशाला कधी काळी गरज भासली तर गांधीचे विचार एक पर्याय म्हणून आपल्यासमोर उपलब्ध आहेच.

दुसरे शिवाजी झाले नाही पण (मावळे) सहकारी जमवून बलाढ्य शक्तींशी गनिमी काव्याने ताकदीनिशी लढण्याचा तुमच्या आमच्यात जो गुण आलाय तो शिवाजी महाराजामुळेच.

दुसरा गौतम बुद्ध, झाला नसला तरी त्यांच्या शिकवणीचा पगडा आमच्यावर आहेच ना?

अण्णांचे कार्य प्रयत्न केले तरी अनुकरनिय नाही, एवढेच मला म्हणायचे आहे.
बाबा आमटे, अभय बंग, सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याबद्दलही मला तेच म्हणायचे आहे.

(आणि तरीही त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातला आदरभाव काही कमी झालेला नाही)

अण्णांचे कार्य प्रयत्न केले तरी अनुकरनिय नाही, एवढेच मला म्हणायचे आहे. >> कारण त्यांनी नवीन शिकवण/मार्ग नाहि दिलाय. ते स्वता:च म्हणतात की ते गांधींच्या मार्गावर चालतात म्हणुन.

पण मुद्दा हा आहे की जरी गांधी, शिवाजी महाराज, गौतम बुद्ध यांची शिकवण कितीही लक्षात राहीली असली तरी पुन्हा अशी माणसे झाली नाहित हे सत्य आहे. मग अण्णांचे सोडुनच द्या.

मात्र दारू - सेवाग्राम याचा लेखाशी संबंध कळून येत नाहीये.

वर्धा जिल्यात दारूबंदी लागू आहे. पण दारूचा महापूर वाहतो.
कायद्याने सर्वच प्रश्न सुटत नाही.
किंवा सर्व रोगावर कायदा किंवा विधेयक हे रामबाण औषध आहे, असे मानने भावडेपणा आहे. असे मला त्या उदाहरणातून सुचवायचे आहे.

१० तारखेच्या प्रहारमधील लेख फारच बालिश आहे. लेखकाच्या ज्या बालिश कल्पना लोकपाल बिलाबद्दल आहेत त्या सर्व जनतेच्या आहेत असे समजणे म्हणजे फारच बाष्कळपणा आहे.

बाबु, वर नीने दिलाय ना???

मुटेसाहेब तुम्ही हा प्रश्न अण्णांचा नाहिये. हा लोकांचा आहे.
ह्यावर प्रतिसाद म्हणुन जे लिहिलेय ते काही खरे नाहीय.

या देशाला कधी काळी गरज भासली तर गांधीचे विचार एक पर्याय म्हणून आपल्यासमोर उपलब्ध आहेच.
गांधींच्या सगळ्याच विचारांशी मी सहमत नाहीय पण 'कधी काळी गरज' म्हणजे काय? आज देश चांगल्य परिस्थितीत आहे? खुर्चीचिकटु निगरगट्ट भ्रष्ट शासन, संपुर्णपणे भ्रष्ट यंत्रणा आणि डोळे बंद करुन आपले काम करुन घेण्यसाठी भ्रष्टाचार करणारा समाज - अजुन किती खालची पायरी गाठायची बाकी आहे? गांधींचे विचार, जे काही आहेत ते, ह्या परिस्थितीतुन बाहेर पडायला मदत करत असतील तर, आता वापरायलाच हवेत, नाही का?

तुम्ही जी नावे दिलीत ती हाताच्या बोटांवर मोजण्यासारखी आहेत. ज्यांच्या विचारांबद्दल लिहिलेत ते विचार आपण आचरले असते तर अण्णंना आंदोलन करावेच लागले नसते. कोट्यावधी लोकांच्या देशात आमटे, बंग, सकपाळ निदान हजारभर तरी असावेत. पण आजच्या घडीला चांगले काम करणा-या सगळ्या लोकांना मोजायचे ठरवले तर १००-२०० च्या पुढे गिनती जाईल असे वाटत नाही.

अण्णांचे कार्य प्रयत्न केले तरी अनुकरनिय नाही, एवढेच मला म्हणायचे आहे.
बाबा आमटे, अभय बंग, सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याबद्दलही मला तेच म्हणायचे आहे.

का नाही अनुकरणीय? काय वाईट करताहेत हे लोक? अनुकरणीय नाही याचे कारण असली कामे करण्याची आपली कुवत नाही हे आहे की ह्यांचे कार्यच मुळात समाजविघातक आहे हे?

जनलोकपालमुळे एका रात्रीत क्रांती घडेल हे मलाही वाटत नाही. पण आज माहिती अधिकारामुळे निदान दाबलेल्या फायली उघडून वाचता येताहेत. ह्या माहिती अधिकारासाठीही अण्णांनीच लढा दिलेला ना? आज काहीतरी फायदा होतोयच ना त्याचा? जनलोकपालमुळेही होईल. कायदा झाला की लोक तो कसा वापरताहेत यावरही बरेच अवलंबुन आहे.

मुटे,
मुळात दारुबंदीने गुजराथ राज्याचे काय भले झाले ? गुजराथमधे दारु मिळत नाही कि गुजराथी लोक दारु पित नाहीत ? ती नसती, तर गुजराथमधील किनारपट्टीवर उत्तम पर्यटन व्यवसाय चालला असता, असे गुजराथी लोकच म्हणत असतात.

गांधींनी ते राज्य, कायद्याने भ्रष्टाचार मुक्त करायला हवे होते ! निदान ५० वर्षात कायद्याने भ्रष्टाचार रोखता येतो का, ते तरी समजले असते आपल्याला. आणखी मग नवे उपाय शोधता आले असते.

तूम्ही जी उदाहरणे दिलीत, त्या व्यक्तींचे कार्य दुसर्‍या एखाद्या व्यक्तीच्या क्षमतेबाहेरचे आहे पण समाज म्हणून तर आपल्या क्षमतेबाहेरचे नाही. छापाचे गणपति, थोडीच निर्माण करायचे होते ?

निदान ५० वर्षात कायद्याने भ्रष्टाचार रोखता येतो का, ते तरी समजले असते आपल्याला.

जनलोकपालाने निदान प्रश्न विचारायला तरी मोकळे राहु आपण. आज काय चित्र आहे? आज आपण फक्त्स कोट्यावधींचे स्कॅम होताहेत हे वाचतोय, करणारे लवकरच सुटणारच (उदा. कल्माडी, पवार इ.इ.) याबद्दल त्यांना तर सोडा आपल्यालाही पुर्ण खात्री आहे. आपण फक्त् एवढ्या पैशांचे हे लोक करतात तरी काय याचा विचार करुन आपल्या मेंदूचा भुगा पाडतो Happy

"अगदी मला सुद्धा तुमचा कित्ता गिरवून माझ्या गावाचे रुपांतर "राळेगण सिंदी" सारख्या गावामध्ये करता आलेले नाही.">> हे कां झालं असावं मुटे साहेब???

कायद्याने भ्रष्टाचार मुक्त करायला हवे होते >> दादा, म्हणजे नक्की कसे?
त्या व्यक्तींचे कार्य दुसर्‍या एखाद्या व्यक्तीच्या क्षमतेबाहेरचे आहे पण समाज म्हणून तर आपल्या क्षमतेबाहेरचे नाही>>> अगदी. अगदी. आणि म्हणुन दुसरे अण्णा आपण सुद्धा होऊ शकतो, नाही कां??

भ्रमर, समजा जसे एक आदर्श गाव नसते का, तसे एक आदर्श राज्य. तिथे कायदा असा पाहिजे, कि भ्रष्टाचार करताना पकडला गेला तर थेट जन्मठेप, तशी तक्रार आली तर विनाचौकशी अटक वगैरे वगैरे.
कडक कायदे करुन भ्रष्टाचार रोखता येतोय, का लोक त्यातून पळवाटा काढताहेत, का तक्रार करणार्‍यांचाच खातमा केला जातोय, हे ५० वर्षात सिद्ध झालं असतं की.
जर ते मॉडेल यशस्वी झाले असते, तर देशभरात लागू करता आला असता कायदा, नाहीतर आहेच....

दारुबंदीचा कायदा करुन काही तिच्यावर नियंत्रण आणता आलेले नाही, हे मुटेंनी सांगितलेच आहे. जी गावे दारुमुक्त आहेत, ती स्थानिक महिलांनी केलीत. कारण दारूची थेट झळ त्यांना बसली.

दादा, कल्पना चांगली आहे. पण मला वाटतं की आपल्याईथे 'भ्रष्टाचार" याची व्याख्या काय असावी हे ५०वर्षात ठरवता आलेलं नाहिये. तसे कायदे आताही आहेत पण त्यांची योग्य रितीने अंमलबजावणी करण्याची ईच्छाशक्ती सरकार/अधिकारी/सामान्यजन ह्यापैकी कुणीही दाखवत नाही. "दुसरे गांधी" या बाफवर मी शेषन यांचे उदाहरण दिले आहे. प्रचलीत कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या कुणालाही दयामाया दाखवली नाही तर हे प्रकार कमी होतील, हा माझा (भाबडा का होईना) आशावाद आहे. Happy

तुमच्या शेवटच्या परिच्छेदाचा अर्थ मी असा घेतो की कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा जिथे आणि जेव्हा असमर्थ ठरते तेव्हा जनमानसालाच ते काम हाती घ्यावं लागतं.

अण्णांचे कार्य प्रयत्न केले तरी अनुकरनिय नाही, एवढेच मला म्हणायचे आहे.
मुटेजी,
पुर्ण अनुमोदन !
आदर आहे पण यात देखील नक्कीच तथ्य आहे !
Happy