मोबाईल आणि गेम्स -भाग १

Submitted by आदित्य चंद्रशेखर on 30 March, 2011 - 02:49

सर्व वाचकांच्या प्रतिसादावरुन मी ही लेखमालिका लिहित आहे. काही ठिकाणी हे लेख कंटाळवाणे होऊ शकतात, कारण यात तांत्रिक बाबीसुद्धा लिहाव्या लागणार आहेत. तरीसुद्धा मी जास्तीत जास्त वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करेन.
साधारणपणे मोबाईल फोन्स सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले तेव्हा मोबाईल गेम्स पाळण्यात होते.(२००० ते २००५ च्या सुमारास) तेव्हा ब-याच लोकांकडे नोकिया ११०० वगैरे फोन असायचे, त्यातला सगळ्यात जास्त प्रसिद्ध झालेला गेम म्हणजे ’स्नेक’. पाहिलं तर अतिशय साधा, कुठलेही डोळे दिपवणारे ग्राफिक्स नाहीत, कुठलंही संगीत नाही, फक्त व्हायब्रेशन असायचं. तेसुद्धा बंद करता यायचं. लोक आपले तासनतास तो गेम खेळत बसायचे. ख-या अर्थाने त्या गेमने लोकांना गुंगवून ठेवलं. लोक इतके फटाफट बटन्स दाबायचे की जसं पियानोच वाजवताहेत. प्रवासात तर तासनतास तो गेम खेळण्यात निघून जायचे. बरं तेव्हा नोकियाच्या विद्युतघटांची (बॅटरीची) कार्यक्षमता आजच्यापेक्षा नक्कीच बरी होती. त्यामुळे तासनतास फोन वापरला तरी विद्युतघट चालत असे.
snake11.jpg
"आग लागो त्या मोबाईलला... मी काय सांगते याचं लक्षच नसतं! अभ्यास गेला उडत!" - आईचा त्रागा.
"हे काय रे, मी तुझ्याशी बोलतेय आणि तू गेम काय खेळतोयेस? मी फेकून देईन हं तुझा मोबाईल! " गर्लफ्रेंड संतापून! असे संवाद तेव्हा कायम झडत असत, इतकं त्या गेमने लोकांना वेड लावलं होतं.
nokia-3315.jpg
नंतर नोकियाचे ३१००, ३३१५ असे फोन आले. त्यातही तो गेम होताच. ३३१५ तर निव्वळ दगड होता. गर्लफ्रेंडने खरंच फेकून दिला तरी भीती नव्हती. कसाही आपटला तरी तो व्यवस्थित चालायचा. तेव्हाची मोबाईलची स्क्रीनसाईज १२८ बाय १२८ असायची. त्या आधीही त्यापेक्षा लहान स्क्रीन असलेले फोन्स होते. (उदा. ९६ बाय ६५ पिक्सेल्स.आठवा रिलायन्सचे पाचशे रुपयातले फोन). पण त्यावर गेम्सची ती मजा नव्हती जी १२८ बाय १२८ स्क्रीनवर होती.
96x65.jpg
त्यावेळचे गेम्स साधारणपणे पूर्वस्थापित (प्री-इन्स्टॉल्ड) आणि दुस-या फोन वर कॉपी न करता येणाजोगे होते. ते फोन घेतेवेळेसच त्यात असत. ते काढूनही टाकता येत नसत.
मोबाईल फोन नादुरुस्त झाला की आपण त्याला त्याच्या डॉक्टरकडे घेऊन जायचो.
"साहेब सॉफ्टवेअर उडालंय! नवीन टाकावं लागेल."
"चालेल, कधी मिळेल?"
"दोन-तीन दिवस लागतील साहेब!"
"चालेल!" (आणि मनात, च्यायला दोन-तीनशे रुपये गेले तरी चालतील, नवीन मोबाईल कुठुन घेऊ? आपण काय लॅंडलॉर्ड नाहीये!) असं चालायचं. यातलं सॉफ्टवेअर म्हणजे सी-मॉस असायचं. फोनवर तोपर्यंत चालनप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) आलेली नव्हती.
त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम्स आल्या. त्याबद्दल सविस्तरपणे स्वतंत्र पोस्ट टाकेनच.
त्यानंतर हळूहळू रंगीत स्क्रीन्स आल्या. पण त्यांची रंगांची क्षमता मर्यादित होती. पण लोकांना त्या आवडल्या. त्यावर गेम्ससाठी मागणी होऊ लागली. जेव्हा ’सन मायक्रोसिस्टिम्स’ ने जेटूएमई (J2ME)ही ’जावा’ चा भाग असलेली प्रोग्रामिंग लॅंग्वेज बाजारात आणली तेव्हा ख-या अर्थाने गेमिंगला चालना मिळाली. अनेक कंपन्यांनी यात बराच फायदा आहे हे ओळखून छोटे छोटे मोबाईल गेम्स बाजारात आणायला सुरुवात केली. अनेक जण जेटूएमई शिकून स्वत:च गेम बनवायला लागले आणि विकूही लागले. अनेक परंपरागत गेम्स, जे आपण वर्गात मागच्या बाकावर शिक्षकांचं लक्ष चुकवून खेळायचो ते मोबाईलवर यायला लागले(उदा. फुली गोळा). यात आपला दुसरा भिडू म्हणजे मोबाईल असायचा. त्यात असा प्रोग्राम बसवलेला असायचा जो आपल्या चालीवर पुढचा निर्णय स्वत: घ्यायचा! ही ’आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ ची सर्वसामन्यांना झालेली ओळख होती.
कितीतरी दिवस असे गेम्स चालले. सोनी एरिक्सनने मोबाईल गेमिंगच्या क्षेत्रात खूप भर टाकली.त्यांनी त्यांच्या एस.डी.के.(एस.डी.के. म्हणजे असं एकत्रित पॅकेज ज्यात प्रोग्रामिंगचे वेगवेगळे टूल्स, त्यांची माहिती, ते कसे वापरायचे याची उदाहरणं आणि नोंदी असतात) अशा खूप गोष्टी दिल्या ज्यामुळे मोबाईल गेम बनवणं सोपं झालं. तशीच भर नोकियानेही घातली. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व टूल्स मोफत उपलब्ध होते. त्यामुळे ह्या क्षेत्राची वाढ तेव्हा फार मोठ्या प्रमाणात झाली. आंतरजालावर असे गेम्स बनवणा-यांचे गट बनू लागले. वेगवेगळ्या साधकबाधक चर्चा झडू लागल्या. नवीन लोकांना बरंच मार्गदर्शन मिळू लागलं. अनेक कंपन्यांनी ’मोबाईल गेम्स’ असा विभागच चालू केला. अनेक फक्त मोबाईल गेम्स बनवणा-या कंपन्या अस्तित्वात आल्या. त्यातल्या मोजक्या कंपन्या मोठ्या झाल्या तर खूप सा-या बंद पडल्या. कारण लोकांना नेहेमी काहीतरी नवीन हवं असतं की जे त्यांना गुंगवून ठेवेल, ते देण्यात त्या कंपन्या कमी पडल्या.
पुढील भागांमधे आपण गेम्स बनवणा-या कंपनीचं काम कसं चालतं, एका गेममागे किती लोकांची मेहनत असते, प्रत्येकाच्या कामाचं नेमकं स्वरुप काय, गेम्सचे किती प्रकार अस्तित्वात आहेत, मोबाईलवर कुठल्या चालनप्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम्स) उपलब्ध आहेत, त्यासाठी नेमके कुठल्या प्रकारचे गेम्स बनतात, त्या चालनप्रणालींचं वैशिष्ट्य काय यावरील लेख बघूयात.
आपल्या सूचना आणि प्रश्नांचं स्वागतच आहे.

(सर्व चित्रे आंतरजालवरुन साभार)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुरवात तर छानच झाली. मला पण स्नेकचे बरेच वेड होते. बसमधे वगैरे छान टाईमपास असायचा. पण त्यातही भरपुर स्पीडने खेळणारे भिडू दिसायचे.
आणि हो ते जूने नोकिया, पेपरवेट म्हणून पण वापरता यायचे. खिशात ठेवले तर खिशात "काहितरी" आहे, असे वाटायचे.

मस्त... ३३१० हा एक महान फोन होता.. कधीच काही प्रॉब्लेम आल्याचे ऐकिवात नाही.. लोक कसेही वापरायचे..

धन्यवाद दिनेशदा, मंजुडी, हिरकु, स्वप्ना_राज, निवांत पाटील!
३३१०, ३३१५ खरंच खूप छान फोन होते. ३३१५ खरंच अगदी दगड होता. नाजुकपणाशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही!

हाय... माझा प्रिय ३३१०... आज फार आठवण येतिये त्याची Wink
जुन्या मोबाईल मधला माझा आवडता गेम होता Logic. नोकिया(किंवा सोनी) च्या २००१ सालच्या मॉडेलमधे (वायरलेस फोन सारखं मॉडेल होतं ते) बघितलेला होता... ६ चिन्ह वापरुन मोबाईल ४ चा एक सेट बनवून लपवून ठेवायचा जो आपण १० डावात ओळखायचा.. प्रत्येक डावानंतर मोबाईल आपल्याला क्लु द्यायचा.
... पुढच्या भागाची वाट बघतोय!

३३१५ माझा सर्वात आवडता. किती तरी वेळा १ ल्या माळ्यावरून फरशी वर पडला, पण साधा ओरखडा सुध्दा ऊठला नाही त्या मोबाईलवर

नमस्कार,

Khup chaan vishaya ahe... I liike that...

just for the info that I work in a gaming company, GAMELOFT.

Mi pan kahi mahiti share karu shakto Happy

Thanks,

सॅम, prafullashimpi, शिव, अर्चु, मन:पूर्वक धन्यवाद! तुमच्या अपेक्षांना न्याय द्यायचा प्रयत्न करतोय! धन्यवाद!

अगदी अगदी...मी दोन वेळेस गाडीवरून पाडलाय...तरीसुद्धा काही नाही...आणि तो स्नेकचा गेम तर सहीच..
फार नाही तीनचारच वर्षे झाली असतील पण एकदम नॉस्टाल्जिक व्हायला झाले..किती झपाट्याने तंत्रज्ञान आपल्याबरोबर खेचून नेतय आपल्याला...
रिंगटोन्स पण कसल्या त्या अजब असायच्या...

३३१०

मेरा पहला मोबाईल.... हा बरीच वर्षे चालला.. . मला नाही वाटत, कुठला मोबाइल हा विक्रम मोडेल. त्याची बॅटरीही ३-४ दिवस चालायची. आता एक बॅटरी मोबाइलात आणि एक खिशात ठेवायची पाळी आलेली आहे.

पु. मो. शु ( पुढील मोबाइलला शुभेच्छा)

अमित,एक मुलगी ,वेताळ_२५,प्रसिक ,आशुचँप,जागोमोहनप्यारे मनःपूर्वक धन्यवाद!

बढिया लेख.
आमच्या कॉलेजात ३३१० आणि ११०० वर खेळल्या जाणार्‍या टूर्नामेन्ट्स आठवल्या ! हो, चक्क स्पर्धा भरवायचो आम्ही रूममधे. ८ च्या स्पीडने स्नेक पळवयाचा आणि तीन चान्समधे ज्याचा स्कोर सगळ्यात कमी तो त्या दिवशीचा चायपाण्याचा खर्च उचलणार वगैरे..

रूमवरचे दिवस हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे खरं तर. नॉस्टॅल्जिक केलेत.
पुढे वाचण्यास उत्सुक.