इ.स.१०००० - भाग ६

Submitted by बेफ़िकीर on 24 March, 2011 - 00:54

"तुम्ही २००० साली बेशुद्ध पडला असावात. कारण तसे डिटेल्स तुमच्या खिशात मिळाले. एका कागदांवर लिहीलेले होते. कसलेतरी बिल होते. त्यावर तारीख होती. बिल आणि रुपये या संकल्पना आमच्या १६२२ ने आम्हाला समजावून सांगितल्या. १६२२ ने आम्हाला सर्वच समजावून सांगितले. आम्हाला त्या संस्कृतीबाबत काहीच कल्पना नव्हती. पण १६२२ अतिशय हुषार! १६२२ इतका हुषार आहे की त्याला वर्षातून दोन दिवस या, इतक्या लांब राहता यावे, या प्लॅटफॉर्मवर राहता यावे, यासाठी एजंट्सनी हा प्लॅटफॉर्म त्यांच्या प्लॅटफॉर्मपासून जवळ ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. इथे केवळ शांतताच असते. कसलाही आवाज नाही, आपण विनंती केल्याशिवाय कुणीही न्यायला येत नाही.

आपण ८०-११ चे अंश किंवा अनुयायी असल्यामुळेच आजच्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवण्यासाठी हयात राहिलात. आपण येथे, अशा ठिकाणी माझ्या सोबत आहात हे मी आजवर कष्टाने साठवलेल्या पॉईंट्सचे फळच म्हणायला हवे!

तर इसवीसन २०००!

मला माहीत नाही की तुम्ही का बेशुद्ध पडलात, बाकी सगळे का नष्ट झाले आणि कसे काय नष्ट झाले. पण नंतरचे सगळे मला माहीत असावे म्हणून मंगळावरून निघताना १६२२ ने माझ्या मानेवर ही नॉलेज चीप बसवलेली होती. यात मानवी आवाजात माहिती साठवली जाते. म्हणजे माणूस बोलतो व तो आवाज या चीपमध्ये डिजिटली सेव्ह होतो. या चीपमधून शारिरीक वेव्ह्जच्या स्वरुपात ती माहिती मेंदूकडे पोचते. या चीपवरील हा बिंदू दाबला की मेंदू अस्खलीतपणे ती माहिती सांगू शकतो.

तुमच्यानंतरचा इतिहास अत्यंत रंजक आहे. अर्थात, ८०-११ चे अनुयायी असल्याने तो तुम्हाला अप्रत्यक्षरीत्या ज्ञात असणारच म्हणा! पण सांगणे माझे कर्तव्य म्हणून सांगते. सांगू???"

"तुम्ही... बोलतताना हावभाव का नाही करत???"

"हावभाव म्हणजे??"

"म्हणजे... हे बघा.. इतिहास अत्यंत रंजक आहे यातील 'अत्यंत' या शब्दाला हा असा अंगठा आणि पहिले बोट एकमेकांवर ठेवून मनगटातून हात पुढे मागे करणे वगैरे, किंवा चेहर्‍यावर काहीतरी विशेष सांगतोय असे भाव आणणे वगैरे.. असे का नाही करत तुम्ही??"

"मला करून दाखवा ना हावभाव?"

"हो पण एखादं वाक्य सांगा की?"

"अं... म्हणा.. ४६३४४ ला १६९९ खूप आवडते..."

"नाही हो... असलं काहीतरी नको..."

"नाही आवडत??"

"म्हणजे आवडते.. पण म्हणजे.. असं बोलत नसतात..."

१६९९ ने गालावरून तीन वेळा बोटे फिरवून विचारले.

"पण बोलायचं झालंच तर हावभावांसकट कसे बोलला असतात??"

"माझी जीभच उचलली नसती हे बोलायला"

"जीभ उचलली नसती म्हणजे?"

"म्हणजे धाडसच झालं नसतं माझं..."

"आत्ता जे बोलतोय ते काही रेकॉर्ड नाही काही होत आहे.. सरळ बोलू शकता तुम्ही..."

"नको पण... एखादं दुसरं वाक्य द्या ना??"

"अं.. मग म्हणा.. ४६३४४ ला १६९९ अज्जिबात आवडत नाही..."

"ह्यॅ!"

"ह्यॅ म्हणजे काय?"

"म्हणजे काहीतरीच काय!"

"बरं... मग म्हणा.. की ४६३४४ ला १६९९ बरोबर इथेच थांबायचंय..."

"ओ... अहो मुद्दा बदला की जरा.."

१६९९ ने तिचे ओठ चार वेळा वर खाली केले. भरपूर हसून झाल्यावर ती म्हणाली..

"कळलं मला.. हावभाव म्हणजे काय ते!"

"कसं काय कळलं??"

"मन ही सर्वात कार्यक्षम चीप असते ३४४..."

"अरे वा? माझंच वाक्य! बरं आता कळलं ना?.. मग सांगा की हावभाव का नाही करत ते?"

"कारण.. अनावश्यक बाबी आम्ही नाही करत.. विषय समजावून द्यायला चेहर्‍यावर हावभाव कशाला हवेत?"

"मग मुद्दा ठसणार कसा?"

"मुद्दा स्वतःच्याच सत्यतेमुळे ठसतो.. तो काही हावभावांमुळे नाही ठसत..."

"हं! एकंदर रोबोट आणि माणूस यात फरक कमी कमी होतोय तर!"

"असंच काही नाही..."

"माहिती सांगा ना.. काय काय झालं ते..."

१६९९ ने मानेवरची चीप ऑन केली. गोपला 'आत्ता मधे बोलू नका' असे सांगितले. आणि अवकाशात बघत ती आपोआप बोलल्यासारखी बोलू लागली. आवाज तिचाच असला तरी शैली तिच्या साहेबासारखी, १६२२ सारखी होती.

'२०७५ मध्ये एक भयानक युद्ध झाले. मानवजमात नष्टच व्हायची वेळ आली. उत्तर गोलार्धातील बर्फाळ प्रदेशाच्या खाली असलेल्या एका प्रदेशातील एका मोठ्या मानव समुदायाने दक्षिण गोलार्धाजवळ पोचलेल्या आणि समुद्राने तीनहीबाजूंनी वेढलेल्या आणि एका बाजूला एक प्रचंड पर्वत असलेल्या एका प्रदेशातील एका खूप मोठ्या मानवसमुहावर हल्ला केला. या युद्धात अनेक अस्त्रे वापरली गेली. हे युद्ध का झाले त्याची नेमकी कारण ज्ञात नसली तरी आडाखा बांधता येतोच! लोकसंख्येचा एक प्रचंड उद्रेक या प्रदेशात झालेला होता. त्याचा परिणाम असा झाला की खूप मोठ्या संख्येने या प्रदेशातील लोक पृथ्वीवरील इतर विभांगांमध्ये राहण्यास गेले. निसर्गाकडे असलेली साधनसंपत्ती अमर्याद आहे. हे खरे असले तरी ती सगळी एक्स्प्लोअर करण्याइतपत त्यावेळेसचा मानव प्रगत नव्हताच. नुसते उत्खनन केले असते तरी यापेक्षा दसपट लोकसंख्या आरामात राहिली असती. पण ती बुद्धीच नव्हती तेव्हा! त्यामुळे नैसर्गीक साधनसंपत्ती मर्यादीत आहे असे गृहीत धरले गेले. म्हणजे पाणी, हवा, अन्न आणि दैनंदिन गरजेच्या बाबी! वास्तविक तसे नव्हतेच. तसे असते तर आजचा मानव राहिलाच नसता. पण आजही मानव आहेच.

सध्या, या तीन बाजूंनी समुद्र व एका बाजूला पर्वत असलेल्या प्रदेशाचे शास्त्रीय नांव हिंद असे आहे. हे नाव तेथून प्राप्त झालेल्या संस्कृती-पुराव्यांवरून ठेवण्यात आलेले आहे. या हिंदमधील लोकसंख्या अमाप वाढली. हा प्रश्न इतर देशांना छळू लागला. युद्धाचे वातावरण आधीपासूनच धुमसत असावे. त्याचेही काही पुरावे उपलब्ध आहेत. लिबर्टी नावाच्या प्रदेशाला हा प्रश्न सर्वाधिक भेडसावू लागला असावा. लिबर्टी या प्रदेशाचे नाव उत्खननात सापडलेल्या एका महाकाय पुतळ्यावरून ठेवण्यात आले आहे. हा पुतळा खूप उंच असून त्याला बहुधा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणत असावेत.

हिंदमध्ये बेसुमार वाढणारी लोकसंख्या आता इतर प्रदेशांमध्ये पसरू लागली. तेव्हाची सांगण्यासारखी आणखीन एक गोष्ट म्हणजे मानवजमात 'एक' नव्हती. हा इथला, तो तिथला असे प्रकार होते. या प्रकारांमध्ये कायम असंतोष असायचा.

हिंदचे मानव सर्वत्र दिसू लागले. अन्न व निवारा मिळावा व अधिकाधिक चांगले राहणीमान मिळावे यासाठी ते हिंदमध्येच उपलब्ध असलेले ज्ञानार्जन करायचे व त्या ज्ञानाचा उपयोग इतर प्रदेशांना व्हावा व त्यातूनच आपल्यालाही अधिक चांगले राहणीमान मिळावे यासाठी तिकडे निघून जायचे. काही लेखनाचे पुरावे आम्हाला भाषांतरीत करण्यात यश मिळाले आहे. त्यावरून असे सूचित होते की २०५० च्या आसपास कधीतरी हिंदमधील एजंटांनी असाही कायदा काढलेला असावा की येथे मिळवलेले ज्ञान इतर प्रदेशांमध्ये जाऊन वापरून उदरनिर्वाह केल्यास एजंट खजिन्यात काही विशिष्ट मोबदला भरावा. तसेच असाही कायदा झाल्याचे निष्पन्न झालेले आहे की इतर प्रदेश, ज्यांना हिंदमधील लोकसंख्येपैकी ज्ञान प्राप्त झालेले काही लोक हवे होते त्यांनी हिंदच्या एजंट तिजोरीत त्या बदल्यात काही मोबदला भरावा. थोडक्यात, हिंदने आपल्याच प्रदेशातील लोकांचे मेंदू विकायला काढले. त्या बदल्यात ते लोक इतर प्रदेशामध्ये राहायला पाठवले.

हिंदमधील बेसुमार लोकसंख्या, सुबत्तेवर त्यामुळे आलेल्या मर्यादा, लिबर्टीसारख्या प्रदेशात माणसे कमी असल्यामुळे व सहज दृष्य स्वरुपातील नैसर्गीक साधनसंपत्ती अधिक असल्यामुळे असलेली सुबत्ता या सर्व घटकांमुळे एकीकडची खूप जास्त जनता दुसरीकडे स्थलांतरीत होण्याचे प्रमाणही प्रचंड वाढू लागले.

यात तसा प्रश्न काहीच निर्माण व्हायला नको होता खरे तर! पण त्या काळी विविध भौगोलिक प्रदेशांमधील एजंट्स वेगवेगळे होते. त्यांचे हेतू, उद्दिष्टे, संस्कृती, विचार, जीवनशैली या सर्व गोष्टी एकमेकांपासून भिन्न व त्यांच्याच भौगोलिक प्रदेशापुरत्या मर्यादीत अश्या होत्या. त्यामुळे मुळात एजंट्समध्येच वाद असायचे. त्यामुळेच युद्धे व्हायची. आता तसे होत नाही कारण समस्त मानवजमात एकच आहे व पृथ्वीवरील साधनसंपत्ती व ६४२ मधील प्राप्य साधनसंपत्तीवर सर्वांचा समान हक्क आहे अशी संस्कृती असून ती संस्कृती टिकवण्यात सर्व एजंट आपले आयुष्य घालवतात. त्यांच्यात्यांच्यात कसलेच वाद नसतात.

तर हिंदमध्ये प्रकार असा होऊ लागला की ज्ञानार्जन हा एक व्यवसायच बनला. लोक ज्ञान मिळवायचे तेच मुळी लिबर्टी किंवा इतरत्र जाता यावे म्हणून! त्यासाठी सतत खटाटोप करायचे. हिंदमध्येच असाही एक प्रचंड जनसमुदाय होता जो ज्ञानापासून वंचितच असायचा. का ते नक्की समजलेले नाही. ज्ञानापासून वंचित असा मानवच आता जन्माला येत नाही. तेव्हा मात्र जन्माला आल्यानंतर ज्ञान मिळवण्यासाठी स्वतंत्र प्रयत्न करावे लागायचे. त्यामुळे हिंदमधील ज्ञान असलेले लोक इतरत्र जाणे व ज्ञान नसलेले लोक हिंदमध्येच राहणे अशातून दोन भिन्न वर्ग निर्माण झाले. या इतरत्र गेलेल्या लोकांना श्रेष्ठ समजले जात असल्यामुळे त्यांना हिंदमध्ये परतल्यावर अधिक सुविधा असायच्या. त्यांचे राहणीमानही अधिकच असायचे. नेमकी याच लोकांची लोकसंख्या वाढ कमी असायची. ज्ञानापासून दूर असलेल्यांची खूप अधिक असायची. हे वर्ग असे विषम पद्धतीने वाढत गेल्यामुळे हिंदमध्ये एक अफाट लोकसंख्येचा असा वर्ग तयार झाला ज्याला हिंदमधील दृष्य स्वरुपातील साधन संपत्ती अपुरी पडू लागली व त्यामुळे स्थानिक एजंटांना असे लोक इतरत्र पाठवण्यावाचून पर्यायच उरला नाही. आधीच इतरत्र असलेले हिंदचे लोक आपल्याकडे ज्ञान असल्याचे समजून हिंदमधील अज्ञानी लोकांना कनिष्ठ समजायचे. त्यांचा तिरस्कार करायचे. त्यांना ज्ञानाचा गर्व झालेला होता व आपण अधिक सुबत्ता असलेल्या प्रदेशात आहोत याचाही! त्यामुळे ते आपल्याच बांधवांशी फटकून असायचे. यात तिढा असा होता की ते ज्या लिबर्टीसारख्या देशात गेलेले असायचे तेथे त्यांना मूळ लिबर्टीतील लोकांसारखे महत्वही नसायचे व त्यांची तिथे गरजही नसायची. त्यामुळे तेथे त्यांना एक प्रकारची फटकून असलेली वागणुक मिळायची. मात्र हिंदमधील बांधवांशी बोलताना ते मुळात लिबर्टीचेच लोक असल्याच्या थाटात वागायचे. या अर्धवट ज्ञानी लोकांचा फार मोठा प्रश्न पुढे निर्माण झाला. कारण अज्ञानी लोकांना निदान राबणारे मजूर म्हणून तरी कामे व समाजात स्थान मिळू लागले इतरत्र! पण या ज्ञानी लोकांचे ज्ञान कोणत्यातरी विशिष्टच विषयापुरते मर्यादीत असलेले असून त्याची गरज मूळ लोकांनीही पुरवायला सुरुवात केली. अनेक प्रदेशांमधील मूळ लोकांनी बंड केले. या बंडाची तीव्रता २०७० पर्यंत टप्याटप्याने वाढत गेली असावी. २०७० मध्ये परिस्थिती अशी आली की इतर प्रदेशातील एजंट्सनी या ज्ञानी हिंदवासियांना हाकलून दिले व अज्ञानी हिंदवासियांना गुलाम म्हणून आयात करायला सुरुवात करून त्या बदल्यात हिंदच्या एजंट-खजिन्यात मोबदला घातला.

परिणामतः हे ज्ञानी लोक जगभरातून हिंदमध्ये परतले व तेथे त्यांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोगच करता येत नसल्याने ते बेकार झाले व अज्ञानी लोक मोठ्या संख्येने जगभर पसरू लागले. हिंदचे एजंट मात्र आनंदात ओठ हालवत होते कारण त्यांच्याकडील उपलब्ध सुबत्ता आता कमी लोकांसाठी वापरावी लागत होती.

यातून दोन मोठी बंड झाली. इतरत्र पसरलेल्या व गुलाम म्हणून काम करणार्‍या हिंदवासियांनी त्या त्या प्रदेशात मूळ लोकांचे स्टेटस मिळावे यासाठी बंड उभे केले. त्याचवेळी हिंदमध्ये परतलेल्या ज्ञानी लोकांनी काम मिळावे व राहणीमान मिळावे यासाठी आपल्याच एजंट्सविरुद्ध बंड उभे केले.

इतर प्रदेशांमध्ये अज्ञानींचे बंड मोडून काढताना खूप अमानवी प्रकार झाले. हिंदमध्ये ज्ञानी लोकांचे बंड मोडून काढताना एजंटांनी त्यांना गुलाम म्हणून इतरत्र जायचे असल्यास जा असे सांगितले व येथे राहणार असाल तर असेच राहावे लागेल हेही निक्षून सांगितले.

ही परिस्थिती नुसतीच धुमसत होती. पण ती प्रत्यक्षात तेव्हा चिघळली जेव्हा २०७४ ची पृथ्वीमानवगणना झाली. असे पुरावे उपलब्ध आहेत की त्यावेळेस पृथ्वीवर असलेल्या नऊ अब्ज लोकसंख्येपैकी एकट्या हिंदमध्ये जन्माला येऊन इतरत्र पसरलेल्या लोकांची संख्याच साडे तीन अब्ज होती.

पृथ्वीने हा भार काय म्हणून सोसायचा यावर जागतिक परिषद झाली. त्यात सर्व ठपका हिंदवर ठेवण्यात आला व हिंदमध्ये आता एकाही मानवाचा जन्म झाल्यास हिंदच्या एक हजार माणसांना आम्ही ठार करू असा इशारा देण्यात आला. म्हणजे माणशी हजार माणसे मारण्याचा इशारा! तरीही हिंदमधील एजंट व मानव बेदरकारच होते. त्यांनी वर्षभरात सुमारे सत्तर ते बहात्तर लाख माणसे जन्माला घातलीच.

याचा भीषण परिणाम म्हणजे इसवीसन २०७५ चे कुप्रसिद्ध आणि काळाकुट्ट इतिहास ठरलेले हिंद विरुद्ध उर्वरित पृथ्वी असे महाभयंकर युद्ध!

या युद्धात हिंदमधील किमान पावणे तीन अब्ज माणसे फक्त आठवड्याभरातच यमसदनी धाडली गेली. मात्र हिंद हा प्रांतही कमी नव्हताच. त्याने या चढाईला प्रत्युत्तर देताना उर्वरीत पृथ्वीमधील जवळपास दोन अब्ज माणसे ठार केली.

पृथ्वीच्या ज्ञात इतिहासात एवढी भयंकर मनुष्यहानी पुर्वी एकदाच झालेली होती व तीही हिंदमधील बहुधा कुरुक्षेत्र की काहीतरी नाव असलेल्या विभागात!

या भयंकर जीवितहानीमुळे निर्माण झालेल्या समस्याही तितक्याच भयंकर होत्या. रोगराई, प्रेतांची वासलात लावू न शकणे, अन्नपाण्याचा तुटवडा, सर्व यंत्रणा कोलॅप्स होणे वगैरे! हे केवळ हिंदमध्येच नाही तर इतरत्रही झालेच. मात्र युद्ध संपलेले नव्हतेच!

मध्ये एक आठवडा नुसताच गेला आणि अचानक लिबर्टी या प्रान्ताने हिंदच्या पश्चिमेला असलेल्या व त्याच खंडाचा भाग असलेल्या जवळपास बारा देशांवर अचानक हल्ला चढवून ती संस्कृतीच नष्ट केली. ही मनुष्यहानी तर केवळ दोन दिवसात करू शकले ते! पण याची झळ त्यांना स्वतःलाही पोचली. त्यांच्याही प्रांतातील मानव मेले, समुद्र बाधित झाले. एकंदर हे युद्ध मानव मानवातील असूनही शेवटी मानवसृष्टी व निसर्ग यांच्यातच झाले.

एक भयानक पोकळी निर्माण झालेली होती. नऊ अब्ज लोकसंख्या असलेल्या पृथ्वीवरील सात अब्ज माणसे ठार झाली व उरलेल्या दोन अब्जपैकी फार तर दहा लाख वगैरे किरकोळ मानव सोडले तर बाकी सर्व रोगराईने मरून गेली.

पृथ्वीवरील सृष्टीच नष्ट झालेली होती. माणसे मेली तिथे प्राणी काय जगणार? मात्र समुद्रात अजूनही विश्व होतेच. आणि पृथ्वीवरील ती दहा लाख माणसे पृथ्वीवर सर्वत्र विखुरलेली होती. त्यांचे आयुष्य कसेबसे सुरू झाले. त्यांच्या कित्येक पिढ्यांमध्ये आजारपणे, रोग व अनेक बाबी होत्या. त्या दहा लाखांचा एकमेकांशी संपर्क होणे अवघड होते. कुणी लिबर्टीच्याही वर असलेल्या बर्फाळ प्रदेस्तात तर कुणी विषुववृत्तावर! मात्र काही काही जण काही काही जणांना भेटत होते. एकमेकांच्या बरोबर नवीन जीवन सुरू करत होते.

आजचा मानव हा त्या दहा लाखांचा वंशज नाहीच. सध्याचा मानव हा इसविसन ८०२१ मधील अती प्रगत मानवाचा वंशज आहे. त्या दहा लाखांचा एकही वंशज आज हयात नसावा. कारण...

.... इसवीसन ४००० मध्ये झालेला महाप्रकोपी भूकंप... ज्याच्यामुळे पृथ्वीचा दिवस आधीपेक्षा किंचित लहान झाला व समुद्रातील काही विशिष्ट प्रकारचे प्राणी सोडले तर संपूर्ण सजीव सृष्टी नष्ट झाली.

आज आपण इसविसन २००० ते २०७५ हा इतिहास अभ्यासला. ब्रेकनंतर २०७५ ते ४००० हा इतिहास अभ्यासूयात! तत्पुर्वी, आत्तापर्यंत अभ्यासलेल्या इतिहासातून शिकण्यासारख्या गोष्टी सांगत आहे.

क्रमांक १ - लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे हे सृष्टीतील प्रत्येक सजीवाचे कर्तव्य आहे

क्रमांक २ - जेथे जन्म झाला तेथेच उदरनिर्वाह केल्यास निसर्गाच्या साधनसंपत्तीची दुर्दशा होत नाही. अर्थात, प्रवास म्हणून कोठेही जावे, पण उदरनिर्वाहाचे साधन शक्यतो आपल्या जन्माच्याच जागी शोधावे. आपल्या प्रांतातील मानवांच्या उपकारांचे स्मरण ठेवून तेथेच जमेल तितका काळ व्यतीत करावा.

क्रमांक ३ - निसर्गाला अधिकाधिक जाणणे इतकेच मानवाच्या आयुष्याचे उद्दिष्ट आहे. जेव्हा निसर्गाला तो पूर्णपणे जाणेल तेव्हा तो स्वतःच निसर्गाचा एक भाग होईल व तेच मानवधर्माचे ध्येय आहे. हीच ज्ञानप्राप्ती आहे. याशिवाय कोणतेही ज्ञान मानव मिळवूच शकत नाही. किंवा तो जे काय ज्ञान मिळवतो ते त्याला केवळ निसर्गाच्याच अधिकाधिक जवळ नेते. जी ६४२ चा निसर्ग इतर गॅलक्सीजपेक्षा वेगळा नाही. निसर्ग एकच आहे. त्याची रुपे बदलतात एवढेच!

क्रमांक ४ - ६४२ जी मधील मानव हीच विश्वातील सर्वात सुपिरियर जमात आहे हे गृहीत चुकीचे आहे. या मानवावर असलेल्या मर्यादांमुळे त्याला इतर गॅलक्सीजमधील इतर जातीजमातींचे ज्ञान नाही. अन्यथा आपल्याच गॅलक्सीमधील शनीवर गेलेले पहिले मानव-यान असे तडकाफडकी ६४२ च्या बाहेर फेकले गेलेच नसते. तेथे कोणतीतरी शक्ती अस्तित्वात आहे जिला मानव तेथे पोचणे पटलेले नाही.

क्रमांक ५ - सर्व मानव समान असून प्रत्येकाचा निसर्गावर समानच हक्क आहे. दुसर्‍याच्या हक्कावर गदा आणू नये.

१६९९ च्या मानेवरील चीपमधून आवाज येणे थांबले तेव्हा गोप एकाग्रचित्ताने ते सगळे ऐकत होता हे १६९९ ला दिसले.

१६९९ - कसे वाटले??

गोप - खूपच सुंदर! पण... २०७५ ते ४००० मध्ये काय झाले सांगा ना..

१६९९ - नक्कीच... पण त्या आधी... तिकडे बघा....

१६९९ ने अवकाशाकडे हात दाखवलेला होता. गोप ते दृष्य पाहून खिळलेला होता. एका लांबवर असलेल्या तार्‍यामधून रंगांची नुसती उधळण होत होती. सारे अवकाशच प्रकाशमान झाल्याप्रमाणे वाटत होते. नजर हटतच नव्हती...

गोप - काय आहे ते???

१६९९ - मरणारा तारा... तारा मरतो तेव्हा खूप सुंदर दिसतो... असे आयुष्य असावे नाही?? आपले मरणही पाहण्यासारखे असावे... काय वाटते तुम्हाला???

गोप - सूर्य... सूर्याचे पण असेच होणार आहे??

१६९९ - अजून पाच अब्ज वर्षांनी.. इतक्यात नाही.. एक इच्छा मागा ना मरणार्‍या तार्‍याकडे बघून.. खरी होते...

गोप - तुमच्या प्रगत समाजातही अश्या अंधश्रद्धा आहेत??

१६९९ - ही अंधश्रद्धा नाही. मरणारा तारा खूप आनंदी असतो. त्याचे ज्वलन थांबणार म्हणून! म्हणून तो खुषीत मागणी पूर्ण करतो आपली.. मी मागीतली एक गोष्ट...

गोप - .... काय मागीतलेत???

१६९९ - मला हासण्याचे अजून शंभर तास मिळावेत अशी प्रार्थना केली... तुम्ही काय मागीतलेत??

गोप - मी????...

गोपने मरणार्‍या तार्‍याकडे खिळून पाहातच हात जोडले आणि म्हणाला...

"मला हसायची इच्छा नाही... माझे हासण्याचे सर्व तास तुम्हाला मिळावेत असे मागीतले मी"

इसविसन १०००० च्या अतीप्रगत समाजातील एक अतीप्रगत स्त्री एका मागासलेल्या संस्कृतीतील मागासलेल्या मेंदूच्या मानवाचे विशाल हृदय पाहून शरमेने मान झुकवत होती...

गुलमोहर: 

काय अप्रतिम लिहिलय...युध्द आणि त्याची कारणं तर खरच खतरनाक आहेत, लोकसंख्यावाढ, बेरोजगारी हा यक्षप्रश्न आहे आपल्या देशासमोर... विचार करायला लावणारा भाग आहे हा.

<<<<<क्रमांक १ - लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे हे सृष्टीतील प्रत्येक सजीवाचे कर्तव्य आहे

क्रमांक २ - जेथे जन्म झाला तेथेच उदरनिर्वाह केल्यास निसर्गाच्या साधनसंपत्तीची दुर्दशा होत नाही. अर्थात, प्रवास म्हणून कोठेही जावे, पण उदरनिर्वाहाचे साधन शक्यतो आपल्या जन्माच्याच जागी शोधावे. आपल्या प्रांतातील मानवांच्या उपकारांचे स्मरण ठेवून तेथेच जमेल तितका काळ व्यतीत करावा.

क्रमांक ३ - निसर्गाला अधिकाधिक जाणणे इतकेच मानवाच्या आयुष्याचे उद्दिष्ट आहे. जेव्हा निसर्गाला तो पूर्णपणे जाणेल तेव्हा तो स्वतःच निसर्गाचा एक भाग होईल व तेच मानवधर्माचे ध्येय आहे. हीच ज्ञानप्राप्ती आहे. याशिवाय कोणतेही ज्ञान मानव मिळवूच शकत नाही. किंवा तो जे काय ज्ञान मिळवतो ते त्याला केवळ निसर्गाच्याच अधिकाधिक जवळ नेते. जी ६४२ चा निसर्ग इतर गॅलक्सीजपेक्षा वेगळा नाही. निसर्ग एकच आहे. त्याची रुपे बदलतात एवढेच!

क्रमांक ४ - ६४२ जी मधील मानव हीच विश्वातील सर्वात सुपिरियर जमात आहे हे गृहीत चुकीचे आहे. या मानवावर असलेल्या मर्यादांमुळे त्याला इतर गॅलक्सीजमधील इतर जातीजमातींचे ज्ञान नाही. अन्यथा आपल्याच गॅलक्सीमधील शनीवर गेलेले पहिले मानव-यान असे तडकाफडकी ६४२ च्या बाहेर फेकले गेलेच नसते. तेथे कोणतीतरी शक्ती अस्तित्वात आहे जिला मानव तेथे पोचणे पटलेले नाही.

क्रमांक ५ - सर्व मानव समान असून प्रत्येकाचा निसर्गावर समानच हक्क आहे. दुसर्‍याच्या हक्कावर गदा आणू नये.>>>>>> केवळ अप्रतिम....

मस्त Happy

बेफिकीर जी,
काय अफाट अन भन्नाट कल्पनाशक्ति आहे हो तुमची?
अतिशय सुदंर चाललीय कादंबरी....
या भागापर्यंतची कहाणी तरी खूप खूप आवडली.
गोप अन १६९९ मधले विनोदी संवाद तर दुधात साखर.....
<<<गोप: खूपच सुंदर! पण... २०७५ ते ४००० मध्ये काय झाले सांगा ना..>>>
आम्हालाही ऐकायचयं.......
पु.ले.शु.

बेस्ट केवळ बेस्ट...
युद्ध आणि त्याची कारणे तर लाजवाब...
आत्ताची परिस्थिती लक्षात घेतली तर हे अगदीच अशक्यकोटीतले वाटत नाही...
कुणी सांगावे अशी परिस्थिती येईल सुद्धा आणि त्यावेळची मनुष्यजात हे लिखाण वाचून म्हणतील..
२०११ मध्ये एक भविष्यवेत्ता होऊन गेला होता..त्याने जागतिक युद्धाबद्दल भाकित वर्तवले होते..त्याच्या कूट लिपीची सध्या अभ्यास सुरू आहे..जेणेकरून अजून काही अंदाज आणि भाकिते आपल्याला समजू शकतील...
Happy

छान झाला हा देखिल भाग, युध्द व त्याची कारण खुप भयानक आहेत.

कदाचित असच पुढे घडु शकत.

पुढचा भाग येऊ दया. वाट पहातेय.

बेफिकीरजी खरंच तुम्ही खुप ग्रेट आहात . खुपच छान.
इतिहासातुन शिकण्यासारख्या गोष्टीँवर तुम्ही आम्हीच काय तर इतरांनीही गंभीरपणे विचार केला पाहिजे .
आणि विचार करायला लावण्यासारख्याच हा भाग आहे . खुप आवडला हा भाग पुढचा भाग लवकर येऊ दया . पु . भा . शुभेच्या

२०७५ ते ४००० च्या इतिहासाबद्दल आता उत्सुकता वाढली.
आणि ८१ कोण ते अजुन कळले नाही.

सगळे भाग आज वाचले... मस्त... मजा आली.

आजचा मानव हा त्या दहा लाखांचा वंशज नाहीच. सध्याचा मानव हा इसविसन ८०२१ मधील अती प्रगत मानवाचा वंशज आहे. त्या दहा लाखांचा एकही वंशज आज हयात नसावा. कारण... >> हे पटल नाही.
२००० वषात माणुस इतकी प्रगती नाही करु शकत ... हा जर ८०२१ जे आहेत त्यानी जर by default सगळ्याना c++, E= mc2, magnetisum etc च knowledge देउन जन्माला घातल असेल तर होउ शकत.

पुढचा भाग लवकर पोस्टाना................ खुप आतुरतेने वाट पहातोय.

ओ बेफिकीर... पुढचा भाग लवकर टाका की..... ईकडे नुसती चिडचिड झालीय वाट बघुन.
महिला मुक्तीच्या कथा लिवण्यापेक्षा ईकडचे भाग नियमत टाका.. आम्ही किती वाट पाहतो माईत हाय का!

बकासूरसाहेब,

मी एका गझलेत गुंतलेलो आहे. या कथेचा पुढचा भाग उद्या लिहिणार आहे. आपला प्रतिसाद व परेश आणि श्वेता यांचे प्रतिसाद 'सर आंखोंपर' घेऊन माफी मागतो. मनापासून आभारी आहे.

-'बेफिकीर'!