झेन कथा - ७ चूक आणि बरोबर

Submitted by ठमादेवी on 14 March, 2011 - 04:51

गुरू बंकेईकडे खूप ठिकाणांहून विद्यार्थी शिकायला येत असत... त्यातला एक विद्यार्थी चोर्‍या करत असे... त्याला एका चोरीच्या वेळी पकडण्यात आलं आणि बंकेईकडे नेण्यात आलं... त्याला आश्रमातून काढून टाकण्याची विद्यार्थ्यांची विनंती धुडकावून लावत बंकेईने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं...

मग काही दिवसांनी या मुलाला पुन्हा पकडलं गेलं... तेव्हाही बंकेईने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं... विद्यार्थी संतप्त झाले... त्यांनी एकत्र येऊन गुरूला एक पत्र लिहिलं..

तुम्ही या चोरी करणार्‍या विद्यार्थ्याला इथून बाहेर काढा... नाहीतर आम्ही सग्ळे आश्रम सोडून जाऊ...

बंकेईने हे पत्र वाचलं आणि म्हणाला, तुम्हाला सगळ्यांना चांगलं काय आणि वाईट काय याची चांगली जाणीव आहे. पण या बिचार्‍या मुलाला त्यातला फरकही कळत नाहीये... तुम्ही दुसरीकडे कुठे ही जाऊन शिकू शकाल... पण या मुलाला चांगलं-वाईट माझ्याशिवाय कोण शिकवेल? त्यामुळे तुम्ही सगळे निघून गेलात तरी चालेल... पण मी या मुलाला बाहेर काढणार नाही....

हे ऐकून त्या मुलाचे डोळे पाणावले... चोरी करण्याची त्याची सवयही अश्रूंमध्ये वाहून गेली...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy