इ.स. १०००० - भाग २

Submitted by बेफ़िकीर on 10 March, 2011 - 03:36

आजूबाजूला बसलेले प्रवासी नेमके काय करत आहेत हेच गोपला समजत नव्हते. बसमधील एका स्पॉटपाशी रांग लागली होती आतल्याआत! तेथे प्रत्येकजण जाऊन कार्ड स्वॅप करत होता. येताना खिशातून एक वस्तू काढून तोंडावर बसवत होता.

छाती धपापू लागली तसा गोप हादरला. त्याच्या डोक्यातच नव्हते की आपण वातावरणाच्या बाहेर जाणार आहोत. आधी आपण या काळात अजूनही जिवंत आहोत आणि भलतेच्या भलतेच प्रकार बघायला मिळत आहेत याचे आश्चर्य व्यक्त करण्यातच त्याचा वेळ जात होता. पण बसचा वेग इतका अफाट होता की केवळ बाराव्या मिनिटाला ती पृथ्वीपासून इतक्या दूर पोचली होती की आता प्राणवायू मिळणेच दुरापास्त झाले होते.

आणि गोप किंचाळला.

"मला श्वास घेता येत नाहीये... श्वास घेता येत नाहीये.. थांबवा हे रॉकेट.. मला पुन्हा पृथ्वीवर न्या हो.."

त्याचे किंचाळणेही क्षीणच झालेले होते.

अनेक प्रवासी हादरून या नवीन सोंगाकडे पाहात होते. १६९९ ताडकन उठली. ती विसरूनच गेलेली होती की गोपला ती प्रोव्हिजन द्यायची आहे. तिला तीन मिनिटे डुलकी लागलेली होती. ती दिवसातून साधारण बावीस मिनिटे झोपायची. फार कमी झोप मिळायची तिला! काही लोक तर चक्क तीस तीस मिनिटे झोपायचे. त्यांचा तिला हेवा वाटायचा. हेवा वाटला की ती तिचे उजवे कोपर विशिष्ट अंशातून फिरवायची. अर्थात, ते हेतूपुरस्पर फिरवायची नाही ती, आपोआपच ते कोपर फिरायचे. ते कोपर फिरले की पोटापासल्या चीपवर रेकॉर्ड व्हायचे.

'८१०००००१६९९ ला अडीच सेकंद हेवा वाटला. अडीच पॉईन्ट्स कमी!'

मग ती एखाद्या माणसावर काही ना काही उपकार करायची. तिने जर चालण्याची पट्टी भाड्याने घेतलेली असेल तर एखाद्या गरीबाला त्या पट्टीवर घ्यायची. एखादा कमी झोपत असेल तर ती त्याच्याहीपेक्षा कमी झोपायची एक दिवस! असे काही केले की तिला ते अडीच पॉईन्ट्स परत मिळायचे. तिची आणि तिच्या युगातील प्रत्येकाची अडचण हीच होती की चांगले कृत्य व वाईट कृत्य ही एकमेकांना 'नलिफाय' करत नव्हती. म्हणजे प्रत्येक माणसाने केलेल्या चांगल्या कृत्यांचा हिशोब सेपरेट होत होता आणि दुष्कृत्यांचा सेपरेट! त्यामुळे त्यांच्या हातात इतकेच होते की आयुष्य संपेल तेव्हा चांगल्या कृत्यांची संख्या दुष्कृत्यांच्या संख्येहून भरपूर जास्त ठेवणे!

असे का करायचे यावर वाद होते. पण अनेक लोक याच तत्वाने जगत होते. मात्र काहींना हे मान्यच नव्हते की एक स्वतंत्र शक्ती आहे जिच्यातर्फे शेवटी या सर्व कृत्यांचे हिशोब तपासले जातात व त्यावर अवलंबून असे एक जजमेन्टही मिळते!

१६९९ उठली आणि तिने कंडक्टरशी सहा सेकंद इतका प्रदीर्घ काळ वाद घातला. कंडक्टरनेही वाद घातल्यामुळे त्याचे नऊ पॉईन्ट्स कमी झाले. आता तो बावरला आणि त्याने बसमधील स्टोअरमधून एक मास्क काढला व तो अ‍ॅक्टिव्हेट करून १६९९ च्या हातात दिला. तिकडे गोप गुदमरून थडाथड उडू लागला होता. अचानक त्याला रिलीफ मिळाला. त्याच्या नाकावर काहीतरी बसवण्यात आले व त्यामुळे तो श्वास घेऊ लागला.

काही वेळ श्वास घेऊन झाल्यानंतर गोप भयानक चिडला आणि त्याने १६९९ आणि शेजारचा एक प्रवासी यांच्यावर हल्ला केला. पण त्याचे हातच पोचले नाहीत त्यांच्यापर्यंत! उलट त्यालाच फटाफटा फटके बसले आणि तो वेदनांनी ओरडत पुन्हा सीटवर बसला. शिव्या देऊ लागला.

गोप - मेलो असतो हरामखोरांनो मी... हे रॉकेट उलटं न्या नाहीतर फटके टाकीन फटके...

आपण यांना मारायला गेलो असताना यांना मारू का शकलो नाही आणि आपल्यालाच कसे काय फटके बसले यावर विचार करण्याची गोपची आत्ताची मनस्थितीच नव्हती. त्याला इतकेच जाणवले होते की आपण या लोकांना काहीही करू शकत नाही.

१६९९ - तू मरणार नाहीयेस.. चांगला श्वास घेतोयस.. पुन्हा हातवारे करू नकोस.. आठ वेळा मारहाण करण्याचा प्रयत्न केला की एकदम तीनशे पॉईन्ट्स कमी होतात ...

गोप - खड्यात गेले पॉईन्ट्स...

१६९९ - आणि तीनशे पॉईन्ट्स एकदम कमी झाले तर एक करंगळी आणि एक बोट कापून घेतले जाते..

ही धमकी फारच भयंकर होती. अडाणी म्हातारीसारखा गोप नुसता बघतच बसला १६९९ कडे! बर्‍याच वेळाने म्हणाला..

गोप - आत्ता.. आत्ता माझे किती पॉईन्ट्स गेले??

१६९९ - तुला फटके बसले ना??

गोप - हो.. भयंकर फटके बसले...

१६९९ - हं! म्हणून पॉईन्ट्स कमी झाले नाहीत...

गोप - अहो... मला सोडा ना हो??.. मला पृथ्वीवर जायचंय...

हे वाक्य बोलेपर्यंत अंधार झालाही! अंधार झाल्यावर मात्र गोप भयानक घाबरला. वातावरणातून बाहेर पडली होती बस पृथ्वीच्या!

काही म्हणजे काहीही दिसत नव्हते. जे जे होईल ते ते पहावे, अनंते ठेविले तैसे रहावे ही उक्ती गोपला आठ हजार वर्षांनी अंगिकारावी लागत होती त्याच्या आयुष्यात!

पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर पडताना चंद्र का दिसला नाही हा प्रश्न गोपच्या मनात सेकंदभर तरळला. तेवढ्यात १६९९ उद्गारली..

१६९९ - ज्या बाजूला आज चंद्र आहे त्याच्यापासून ४३ अंशात मंगळ आहे... म्हणून चंद्र दिसला नाही..

हादरलेल्या गोपला तो आवाज १६९९ चाच आहे की नाही हे अंधारात ठरवता येईना, कारण नाकावर बसवलेल्या मास्कच्या खाली बसवलेले उपकरण सर्वांचे आवाज सारख्याच पद्धतीने ऐकवत होते.

१६९९ - मीच बोलतीय..

तेवढ्यात बस प्रकाशाने उजळली. हा प्रकाश निळा होता. आपण काय 'मंगळ व्हाया शनी' वगैरे चाललो आहोत की काय असेही वाटून गेले गोपला! या जगात काय वाट्टेल ते घडत असू शकेल हे त्याने स्वतःला समजावले. मगाशीच गुदमरण्याचा अनुभव घेतलेला असल्यामुळे मरण कसे असू शकेल याची अर्धवट कल्पना त्याला आलेली होती.

गोपने इकडे तिकडे पाहिले. काही जणांचे डोळे मिटलेले होते. ज्यांचे मिटलेले नव्हते ते झोपलेल्यांकडे मत्सराने पाहिल्यासारखे करत असतानाच त्यांची उजवी कोपरे आपोआप वर्तुळाकार फिरत होती. कंडक्टर 'गाडीत तंबाखू व धूम्रपानास मज्जाव आहे' ही पाटी तात्पुरती डिअ‍ॅक्टिव्हेट करून गायछाप लावत होता. त्याचे अनेक पॉईन्ट्स कमी झालेले असणार हे गोपला त्याही परिस्थितीत जाणवले.

गोप - ते तंबाखू खातायत.. त्यांचे बरेच गुण गेले असतील ना??

१६९९ - नाही.. एकही नाही गेला..

गोप - का??????

१६९९ - तंबाखु अपायकारक आहे हे आधीच सांगण्यात येते.. त्यांनंतर स्वतःचे नुकसान करून घेण्याचा निर्णय घेतल्यास गुण जात नाहीत...

गोप - हो पण बिडी मारली तर???

१६९९ - बिडी मारली तर म्हणजे??

गोप - सिगारेट ओढली तर??

१६९९ - त्याचा धूर शोषून घेणारे यंत्र तोंडावर बसवावे लागते.. न बसवता सिगारेट ओढली तर एक फुफ्फुस काढून घेतात...

गोप - फुफ्.... कोण?? कोण काढून घेतात???

१६९९ - एजंट... एजंट असतात प्रत्येक कामासाठी..

गोप - तुम्ही एजंट आहात??

१६९९ - नाही.. मी १६९९ आहे...

गोप - मी कोण आहे??

१६९९ - ४६३४४...

गोपच्या चेहर्‍यावर अत्यंत कडवट भाव आले. आपण जिवंत राहिलो आहोत याचे त्याला भयंकर वाईट वाटू लागले.

गोप - अहो.. मला.. एक सांगाल का??

१६९९ - त्यावर विचार चाललाय... तो डिसीजन मंगळावर होईल..

गोप चक्रावला. काय विचारणार हेच माहीत नसताना उत्तर मिळालेले होते. ही नक्कीच भुताटकी असून आपण स्वप्नत आहोत की काय असे वाटून गोपने चिमटा काढून घेतला. अचानक त्याची आयडेन्टिटी किर्र किर्र अशी वाजली. दचकून त्याने ती हातात घेऊन पाहिली.. शेजारी बसलेली १६९९ म्हणाली..

१६९९ - तीन पॉईन्ट्स मिळाले तुला...

गोप - मिळाले??? कसले???

१६९९ - स्वतःच स्वतःला चिमटा काढून इजा पोहोचवलीस त्याचे...

गोप - म्हणजे काय?? म्हणजे मी आत्महत्या केली तर अनंतच गुण मिळतील मला...

१६९९ - नक्कीच मिळतील.. पण त्याचा उपयोग काय होतो ते माहीत नसते कुणालाच..

गोप - मग कशाला करायची आत्महत्या??

१६९९ - मग कोण म्हणतंय आत्महत्या कर म्हणून??

गोप - अहो.... मी.. मी काय विचारणार होतो हे तुम्हाला कसे कळले पण??

१६९९ - तू हेच विचारणार होतास ना की तुझ्या मनातले विचार इतरांना समजू नयेत अशी सवलत तुला मिळेल का??

गोप - ........... हो.......

१६९९ - त्यावर डिसीजन मंगळावर घेतला जाणार आहे...

गोप - का?? म्हणजे.. खाली पृथ्वीवर असतानाच का नाही घेतला??

१६९९ - पृथ्वी खाली नाहीये... तिथे आहे..

गोप हादरला. १६९९ चे उजवे बोट 'वरच्या दिशेला' झालेले होते.

गोप - तिथे म्हणजे??? वर???

१६९९ - स्पेसमध्ये वर, खाली, उजवे, डावे असे काहीही नसते.. पृथ्वी तिकडे आहे असे आपण आत्ता म्हणतोय कारण आपण पृथ्वीच्या 'इकडे' आहोत... आपणच तिकडे असतो तर आपण पृथ्वी 'इकडे' आहे असे म्हणालो असतो...

गोप - ......??????

१६९९ - सगळं सापेक्ष आहे...

गोप - तुम्हाला 'बकवास करणे' हा वाक्प्रचार ऐकून माहीत आहे का??

१६९९ - नाही. ते काय असतं??

गोप - तुम्ही आत्ता जे केलंत त्याला बकवास म्हणतात..

१६९९ - नाही.. याला माहिती आदानप्रदान म्हणतात... बकवास तुमच्या काळात म्हणत असतील..

गोप - मंगळ खरच लाल असतो का हो??

१६९९ - डिपेन्ड्स..

गोप - काय डिपेन्ड्स??

१६९९ - मंगळावर सूर्याचा प्रकाश पडला तर पृथ्वीवरून तो लाल दिसतो..

गोप - हो पण प्रत्यक्षात कुठल्या रंगाचा असतो??

१६९९ - प्रकाश नसला तर काळा असतो...

गोप - अहो तुळजाभवानी.. मूळ रंग काय असतो मंगळाचा??

१६९९ - मूळ रंग कसा कळेल?? पृथ्वीचा रंग कळतो का कधी??

गोप - म्हणजे काय??? डोंगर मातीच्या रंगाचे असतात, झाडे हिरवी, समुद्र निळे, हिमालय पांढरा..

१६९९ - हो पण हे सगळे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून वाटते...

गोप - मग?? सुर्याशिवाय कोण प्रकाश पाडतं??

१६९९ - अंहं.. तो प्रकाश नसला की सगळे वेगळे दिसते...

गोप - तुमच्याशी बोलण्यात अर्थ नाहीये..

तेवढ्यात एक मोठा अलार्म वाजला बसमध्ये! कंडक्टरने तातडीने एक विन्डो उघडली. सगले दचकून पहिल्यांदा एकमेकांकडे आणि शेवटी गोपकडे पाहात होते. गोपला इतकेच समजले की आपल्यासंदर्भात काहीतरी भयानक प्रकार झालेला असणार! १६९९ इमर्जन्सी असल्यासारखी धावली.

कंडक्टरचा नंबर ११७४ होता.

११७४ - तो कोण आहे??

१६९९ - ४६३४४

११७४ - असा कोणताही नंबर अस्तित्वात नाही व त्यामुळे त्याला मंगळावर प्रवेश नाही असा मेसेज आलेला आहे...

१६९९ - पण हे तुम्ही आधीच का बघत नाही??

११७४ - इन गुड फेथ बघत नाही..

१६९९ - याचा डेटा अपडेट करायचाय..

११७४ - सॉरी... तोवर बस पुढे जाऊ शकत नाही...

१६९९ - मग... आता???

११७४ - तुमचे साठ आणि त्याचे ऐशी पॉईन्ट्स जाणार...

१६९९ दु:खाने चीत्कारली. तिने ताबडतोब एका उपकरणावर काहीतरी संदेशांची देवाणघेवाण केली. बहुधा पृथ्वीवरील तिच्या प्रमुखाशी बोलत असावी. अचानक तिचा चेहरा उजळला..

१६९९ - झालं काम...

तोवर बसमधील यच्चयावत प्रवासी टिचक्या वाजवू लागलेले होते. गोप हादरून प्रत्येकाकडे पाहात होता.

११७४ - काम झालं असलं तरीही तेहतीस सेकंद गेले..

१६९९ - मग??

११७४ - तेहतीस पॉईन्ट्स जाणारच...

१६९९ - अं.. काही... इतर उपाय नाही का?? हे समाजकार्यच करतोय आम्ही..

११७४ - कसलं समाजकार्य??

१६९९ - प्राचीन इतिहासाचा अभ्यास आहे हा...

११७४ - तरी काय झालं??

बसमधले सगळे चेहरा कोरा ठेवून टिचक्या वाजवतच होते. गोपला वाटले आपणही टिचक्या वाजवलेल्या बर्‍या! नाहीतर नंतर म्हणायचे 'टिचक्या वाजवल्या नाहीस म्हणून दहा गुण गेले'! तोही टिचक्या वाजवू लागला. १६९९ने त्याच्याकडे धक्का बसून पाहिल्यावर तो टिचक्या वाजवायचा थांबला.

११७४ - बोला... करताय स्वतःहून तेहतीस गुण कमी की मी अर्ज पाठवू??

१६९९ - साहेब.. जरा.. एकमेकांच्या सोयीने बघा की...

११७४ - ठीक आहे.. मग मला दहा गुण द्या तुमचे...

१६९९ ने पटक पोटाची चीप काढून त्यावर काही बटन्स दाबल्यासारखे केले आणि कंडक्टरच्या चीपवर ती चीप दाबली आणि 'थॅन्क्स हं' असे म्हणत जागेवर येऊन बसली. आता टिचक्या कमी झाल्या. बस सुरू होणार असे गोपला वाटले. पण झाले भलतेच!

बसच्या बाहेर एक आणखीन बस दिसू लागली. तिचे तोंड उलटीकडे होते. बहुधा 'मंगळ - पृथ्वी डाऊन' बस असावी असे वाटले गोपला! त्या बसचा आणि या बसचा ड्रायव्हर एकमेकांकडे फक्त काही सेकंद बघत राहिले आणि बसेस निघाल्या.

गोपला काहीच समजले नाही.

गोप - हे दोघे असे मुंग्या थांबतात तसे का थांबले???

१६९९ - ते बोलत होते...

गोप - छे?? कुठे काय बोलले??

१६९९ - ते डोळ्यातून बोलले.. ड्रायव्हर्सना आणि कंडक्टर्सना तसे प्रशिक्षण असते..

गोप - डोळ्यातून म्हणजे??

१६९९ - नुसती बुबुळे फिरवून ते संदेश देऊ शकतात...

गोप - का पण?? तोंडाने बोलले तर काय झाले??

१६९९ - स्पेसमध्ये असताना एकमेकांचे बोलणे ऐकू कसे येणार??

गोप - का?? आवाजाच्या लहरी का काहीतरी असते ना?

१६९९ - आवाजाच्या लहरी पोकळीतून प्रवास करू शकत नाहीत, फक्त प्रकाशच तसा प्रवास करू शकतो.

गोप - मग... मग मंगळावर आपण कसे बोलणार?

१६९९ - मंगळावर सरफेस प्रेशर आहे.. वातावरण आहे..

गोप - पृथ्वीसारखं??

१६९९ - छे.. खूपच वेगळं.. कार्बन डायऑक्सईड आहे तिथे..

गोप - मग श्वास??

१६९९ - मोठे कन्व्हर्टर्स आहेत... कार्बन वेगळा होतो आणि ओ टू वेगळा..

गोप - च्यायला...

१६९९ - च्यायला म्हणजे??

गोप - च्यायला म्हणजे 'ऐकाल ते नवलच'!

१६९९ - तुमच्या काळात असा तीन चार शब्दांना एक शब्द असायचा का?

गोप - नाही हो... फार धक्के बसले की काहीही उच्चार तोंडातून येतात... तसाच एक च्यायला..

१६९९ ने निर्विकार चेहर्‍याने खिडकीबाहेर पाहिले. अर्थात, खिडकीबाहेर काही नव्हतेच, नुसताच अंधार होता.

गोप - मंगळ मोठा आहे का हो खूप??

१६९९ - कशापेक्षा?? कारण सगळं सापेक्ष असतं...

गोप - .. पृथ्वीपेक्षा...

१६९९ - पृथ्वीपेक्षा लहान आहे..

गोप - किती??

१६९९ - अर्धा असेल..

गोप - आणि चंद्रापेक्षा??

१६९९ - कुणाच्या??

गोप - कुणाच्या म्हणजे??

१६९९ - अनेक ग्रहांना चंद्र आहेत...

गोप - प्लच.. पृथ्वीच्याच हो...

१६९९ - दुप्पट असेल...

गोप - किती लांब आहे?? .. पृथ्वीपासून...??

१६९९ - असेल आठ ए यू..

गोप - म्हणजे??

१६९९ - सात आठ लाख किलोमीटर....

गोप - बाबो...

१६९९ - बाबो म्हणजे काय??

गोप - बाबो म्हणजे च्यायलाचा बाप! तिच्यायला यड्याचा बाजार आहे सगळा!

१६९९ - काय???

गोप - काही नाही..

१६९९ - ती आय डी चीप दे तुझी.... तुझे वीस पॉईंट्स कापते...

गोपने चीप पटकन हातात धरून विरुद्ध दिशेला नेली आणि घाबरून विचारले...

गोप - का म्हणून???

१६९९ - तू टिचक्या वाजवल्यास मगाशी...

गोप - सगळेच वाजवत होते...

१६९९ - हो पण तू वाजवायच्या नव्हत्यास...

गोप - का??

१६९९ - तुला कसला राग आला होता??

गोप - मला?? मला कुठे राग आला??

१६९९ - मग?? टिचक्या कशाला वाजवल्यास??

गोप - म्हणजे काय??

१६९९ - माझ्यामुळे बस थांबली म्हणून हे सगळे टिचक्या वाजवत होते.. राग आला म्हणून...

गोप - राग आला म्हणून टिचक्या??

१६९९ - हो मग??

गोप - ही कुठली तर्‍हा?? आमच्यावेळेस शिव्या घालायचे बस थांबली कुणामुळे की...

१६९९ - शिव्या घातल्या की स्वतःचेही गुण कमी होतात... फक्त दुसर्‍याचे गुण कमी करायचे असले तर टिचक्या वाजवतात...

गोप - अहो पण... हे मला माहीतच नाही ना??

१६९९ - त्याला मी काय करू?? तू १६४२ ला विचारायला हवं होतस....

गोप - याला काय अर्थय??

१६९९ ने पटकन गोपची आय डी हातात घेऊन वीस गुण कमी केले..

गोप - ही दादागिरी आहे... मोगलाई आहे मोगलाई ही...

१६९९ - अरे हो... तुला मोगलाई हा शब्द माहीत असू शकेल नाही का??

गोप - नुसता माहीतच होता आजवर... आज मोगलाई प्रत्यक्ष अनुभवतोय मी...

१६९९ - आता मंगळ आला की धमाल येणार आहे...

गोप - का??

१६९९ - तुला जुना डेटा पाहून बरेच काही कळेल... आम्हाला न कळणारे..

अचानक गोपला स्वतःचे महत्व जाणवले. तो आता अगदी ताठ वगैरे बसून डुढ्ढाचार्यासारखा पाहू लागला १६९९ कडे! मधेच त्याला आणखीन एक अन्याय आठवला.

गोप - तुम्ही त्या साहेबांना दहाच पॉईंट दिलेत ना?? मग माझे वीस का कापलेत??

१६९९ - या टिचक्यांमुळे माझे गुण गेले त्याचं काय??

गोप - अहो पण.. ते सगळे तुमच्यावर रागावले ना?? माझे का कापताय??

१६९९ - तुझ्यामुळे बस थांबवावी लागली..

हे मात्र गोपला पटले. या १६९९ ने बस थांबवलीच नसती तर आपल्याला ना मंगळावर घेतले असते ना पृथ्वीवर! नुसतेच अवकाशात उभे राहण्यापेक्षा वीस गुण गेलेले बरे!

गोप - माणसाला किती गुण मिळतात हो सुरुवातीला??

१६९९ - दहा लाख...

गोप - आणि मरताना किती उरतात ऑन अ‍ॅन अ‍ॅव्हरेज??

१६९९ - माणसा-माणसानुसार बदलतं ते..

गोप - तरी... एक रफ आयडिया???

१६९९ - मी आत्ता मेले तर माझे ८,९२,६५४ असतील..

गोप - कशाला अभद्र बोलताय?? तुम्ही कशाला मराल??

१६९९ - कुणीही केव्हाही मरतो...

गोप - मंगळ किती लांब आहे म्हणालात??

१६९९ - आठ ए यू...

गोप - बाप रे! ...

१६९९ - का?

गोप - म्हणजे आठवडाभर असेच बसणार तर आपण बसमध्ये!

१६९९ - का?

गोप - का म्हणजे?? मंगळ म्हणजे काय तांबडी जोगेश्वरीय का दोन मिनिटात पोचायला???

१६९९ - तो काय मंगळ! दिसला का???

ताडकन उभाच राहिला गोप!

मंगळ??? हा मंगळ??

लांबवर एक प्रचंड आकाराचा गोल दिसत होता. त्या गोलावर मात्र सूर्यप्रकाश असावा.

गोप - तो मंगळ आहे??

१६९९ - हं!

गोप - अहो १६९९... मला भीती वाटतीय हो...

१६९९ - कसली??

गोप - त्या मंगळावर... आपण आलो की पोचायला खरच!

१६९९ - मग??

गोप - किती स्पीड असतो हो या रॉकेटचा??

१६९९ - हे रॉकेट नाहीये... ही साधी बस आहे..

गोप - ही बस आहे??? मग रॉकेट म्हणजे काय असते???

१६९९ - रॉकेट हे नुसते पॉवर देणारे उपकरण असते... त्याला यान जोडलेले असते...

गोप - हो पण ते कुठे वापरता तुम्ही??

१६९९ - ६४१ आणि ६४३ ला जायला...

गोप - ते काय असतं??

१६९९ - आपण कसे सगळे जी ६४२ आहोत... तसे ६४१ आणि ६४३ ही आहेत..

गोप - जी ६४२ म्हणजे काय पण??

१६९९ - गॅलक्सी ६००, २३, ९१, ८४, ६४२!

गोप - म्हणजे काय??

१६९९ - हा आपल्या गॅलक्सीचा नंबर आहे..

गोप - मला काहीही समजल नाही...

१६९९ - आपल्या विश्वात ८०० अब्जच्या आसपास गॅलक्सीज आहेत ... त्यातील ६६०, २३, ९१, ८४, ६४२ व्या गॅलक्सीत लाखो सूर्यमाला आहेत त्यातील एका सूर्यमालेवर आपण आहोत... अशाच ६४१ आणि ६४३ आपल्या जवळ आहेत.. तेथे रॉकेट जाऊ शकते... त्या पलीकडे काहीही जात नाही...

गोप - मी हे असे नुसते ऐकूनच मरू शकतो याची कल्पना आहे का तुम्हाला??

१६९९ - तुला आम्ही जिवंत ठेवलेला आहे... मरू देणारच नाही... अर्थात, मरण हातात नाहीये म्हणा..पण आम्ही अथक परिश्रम घेऊन तुला जिवंत ठेवलेला आहे...

गोप - अहो... मी कधी साधा दिल्लीलाही गेलो नाही हो.. मंगळावर काय नेताय बस ने?? उद्या गुरूवर न्याल...

१६९९ - त्यात काय विशेष?? ती मगाशी बाजूला थांबलेली बस गुरू - व्हीनस बस होती... व्हाया अर्थ!

गोप - बास! बा SSSSSSस...

गोपचे ओरडणे पाहून सगळे दचकून गोपकडे पाहू लागले..

बर्‍याच वेळाने तो मंगळ नावाचा गोल काहीसा आणखीन जवळ आला.

गोप - आला वाटतं मंगळ!

१६९९ - कधीपासूनच आलाय... बस जागा शोधतीय उतरायची..

गोप - म्हणजे काय??

१६९९ - मंगळावर सौरवार्‍यांच्या धडका बसत असतात.. प्रचम्ड वादळे असतात.. त्यापासून लांब बस थांबवावी लागते... तेही दक्षिण गोलार्धातच... उत्तर गोलार्धातील तापमान मनुष्यासाठी ठीक नाही..

गोप - मंगळावर किती माणसं आहेत हो??

१६९९ - असतील दोनेक अब्ज!

गोप - दोन अब्ज?????

१६९९ - जास्त लोक नाही राहू शकत तेथे..

गोप - का??

१६९९ - कन्व्हर्टर्स पुरत नाहीत.. श्वास कसा घेणार??

गोप - पण पाणी??

१६९९ - मंगळाच्या एका चंद्रावर हायड्रोजन भरपूर आहे... तो फवारला जातो ऑक्सीजनवर... मग स्पॉट बेसिसवर पाऊस पडतो.. एच टू ओ तयार झाल्यामुळे....

गोप - मग झाडेही उगवत असतील..

१६९९ - छे छे.. झाडे सी ओ २ कन्झ्युम करतात... मग ऑक्सीजन कसा निर्माण करणार??

गोप - हो पण ऑक्सीजनच सोडतात ना झाडे??

१६९९ - हो पण तो कॅप्चर कसा करणार??

गोप - मग कन्व्हर्टरमधून कसा कॅप्चर होतो??

१६९९ - कन्व्हर्टरचे आऊटलेट एका रिझर्व्हॉयरमधे असते... तेथे ऑक्सीजन फ्रीझ केला जातो.. नंतर डिस्ट्रिब्युशन होते..

गोप - विकतात की काय ऑक्सीजन??

१६९९ - अर्थात....

गोप - पण... इतका त्रास सहन करून जायचेच कशाला तिथे??

१६९९ - पृथ्वीवर किती जण राहणार??

गोप - आत्ता कितीयत??

१६९९ - सोळा अब्ज..

गोप - सोळा अब्ज??? सोळा अब्ज माणसं आहेत पृथ्वीवर???

१६९९ - हो.... का???

गोप - आमच्यावेळेस फक्त सहा अब्ज होती...

१६९९ - तोच प्रॉब्लेम झाला.... अणुयुद्धानंतरच्या जीवनसृष्टीत अतोनात माणसे जन्मली...

गोप - अणूयुद्ध?? ते कधी झाले??

१६९९ - मला वाटतं इसविसन २०७५ असावे...

गोप - तेव्हा मी कुठे होतो??

१६९९ - कुणाला माहीत??

गोप - तुम्हाला मी कधी सापडलो??

१६९९ - तू नुकताच सापडलायस..

गोप - नुकताच म्हणजे??

१६९९ - माझ्या माहितीनुसार तू फार तर एकशे वीस वर्षांपुर्वी सापडलास..

गोप - अरे तिच्यायला!

१६९९ - हं! हे बूट घाल आता..

गोप - का??

१६९९ - मंगळावर हे घालायला लागतात..

गोप - का पण??

१६९९ - तिथलं गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा कमी आहे...

गोप - मग काय झालं???

१६९९ - काय झालं म्हणजे?? पाऊल टाकलंस की दहा मजली बिल्डिंगइतका वर जाशील आणि खाली येशील पुन्हा!

गोप - तुम्ही किती साध्या पद्धतीने किती भयंकर बाबी सांगता हो समजावून??

१६९९ - आणि हे कपडेही घाल... तिकडे बाथरूम आहे..

गोप - हे कशाला??

१६९९ - तो डिसप्ले वाचलास का?? मंगळावर आत्ता मायनस २२ टेम्परेचर आहे...

गोप - हे... हे बाकीचे कुठे घालतायत असले कपडे??

१६९९ - ते घालतील.. त्यांना आणि मला सवय आहे.. बस थांबताना पटकन कपडे घालण्याची.. तू आत्ताच घाल..

गोप - काय हो?? एखादा माणूस आत्ता बसमधून बाहेर पडला तर???

१६९९ - तर वीस एक सेकंदात गुदमरून मरेल आणि विश्वाच्या अंतापर्यंत डेड बॉडी फिरत राहील.. मधेच चुक्न एखादा ग्रह जवळ आला तर गुरुत्वाकर्षणाने त्यावर जाऊन पडेल.. काही लोक अशीच आत्महत्या करतात...

गोप - काय सांगता???

१६९९ - आत्महत्या कायदेशीर आहे... माणसाला न्यायचा आणि सोडून द्यायचा स्पेसमध्ये..

गोप - भयंकर! हे सगळं अती भयंकर आहे.. असं कशाला करतात काही लोक??

१६९९ - त्यांना जगण्याचा कंटाळा येतो...

गोप - पण मग.. वेदनारहीत मृत्यू का देत नाहीत??

१६९९ - मरण्याचे पॉईन्ट्स कसे मिळणार मग???

गोप - सगळी मानवजमात पॉईन्ट्ससाठीच जगतीय बहुधा...

१६९९ - जा लवकर... कपडे घालून ये हे...

गोप - अहो त्यावरून आठवलं... एकही प्राणी कसा हो दिसला नाही पृथ्वीवर??

१६९९ - प्राणी सगळे दक्षिण गोलार्धात ठेवलेत....

गोप - का???

१६९९ - अभ्यासासाठी...

गोप - पण मग.. निसर्गचक्र कसं काय चालणार??

१६९९ - म्हणजे काय??

गोप - अनेक प्राणी त्यांच्या आहारामुळे व इतर काही गोष्टींमुळे मानवाची मदत करतात.. ते कोण करणार??

१६९९ - ते सगळे करायला मशीन्स आहेत... तू जाऊन ये.... दक्षिण गोलार्ध आलाय जवळ..

====================================

मंगळ!

चक्क मंगळ!

बस थांबलेली आणि आजूबाजूला अनेक लोक जमलेले पाहिल्यावर गोप स्तब्ध झाला.

१६९९ - चल.. उठ...

गोप उठला आणि बसमधून खाली उतरला. दोन्ही पाय खाली टेकून एक पाऊल उचलल्याच्याच क्षणी....

... सुम्म...

हळूहळू गॅसच्या फुग्यासारखा तो वर जायला लागला... भयाने किंचाळत...

ही धावाधाव!

दोन पन्टर्स कुठूनतरी उगवले... त्यांनी मंगळाच्या भूमीवर जोरात दोन्ही पाय आपटून उड्या मारल्या... आता तेही वर जाऊ लागले.. ते जसे वर जाऊ लागले तश्या त्यांच्या पावलांना बांधलेल्या दोन दोन दोर्‍या उलगडू लागल्या... त्या जमीनीत कुठेतरी खुंटीला टांगलेल्या असाव्यात..

शांतपणे ते वर गोपकडे बघत उडू लागले.. गोप भयातिरेकाने बोबडी वळून खाली पाहात होता...

दोनच मिनिटात त्यांनी गोपला गाठले... तिघेही हळूहळू वर जाऊ लगले तसे खालच्या चार पाच पन्टर्सनी दोर्‍या ओढायला सुरुवात केली...

पाचच मिनिटात त्रिकुट सुखरूप मंगळावर परत आले..

गोप पायच उचलेना स्वतःचा! हालायलाच तयार नव्हता तो!

१६९९ ने त्याला सज्जड दम भरला..

"असा वाटेल तस पाय उचलून टाकायचा नाही... एक पाय उचलल्यावर ते फर्मली जमीनीत रोवायचे.. पृथ्वीसारखे वाट्टेल तसे चालता येत नाही इथे.. पळणे अन उडी मारणे तर दूरच... अर्थात.. गुरुत्वाकर्षणाने शेवटी खालीच येशील तू... पण मंगळावर कुठेही लॅन्ड होशील.. इथेच उतरशील असे नाही.. नीट भारीभक्कम पाऊल टाक..."

दम भरतानाच तिने गोपची आयडी घेऊन सगळ्या पन्टर्सच्या चीप्सवर दाबली. गोपचा मास्क कंडक्टरला देऊन टाकला. सगळ्यांना मिळत असलेल्या नळ्यांपैकी एक गोपलाही मिळाली. ती नळी नाकाला लावून १६९९ चा नाजूक हात हातात धरून गोप चालू लागला.

१६९९ चाहात किती नाजूक आहे ते अर्थातच मंगळ स्पेशल युनिफॉर्ममुळे कळतच नव्हते.

बिचारा गोप! उगीचच जगला होता इतकी वर्षे! मगाशीच या लोकांनी त्याला बसमधून बाहेर सोडला असता तरी त्याला काहीही करता आले नसते.

डोळ्यात पाणी घेऊन केविलवाणा होऊन तो इकडे तिकडे बघत १६९९ बरोबर चालू लागला. चालतानाही दोन तीन वेळा तो वर उडू लागला होता. पण १६९९ ने त्याला खेचून धरले.

शेवटी दोघे एका हॉलमध्ये आले.

तेथे १६९९च्या अनेक मैत्रिणी असाव्यात. कारण त्यांना १६९९ ला पाहून खूपच आनंद झाला व तो त्यांनी व्यक्त केला. सुट्टीत मामाच्या गावाला आपण गेलो की आपले भाऊ आणि बहिणी आपल्याला पाहून असेच आनंदीत व्हायचे हे गोपला आठवले.

गोपकडे मात्र सगळे निरखून पाहात होते.

एक ३३७२ म्हणून होती. तिच्याशी १६९९ जास्त आपुलकीने बोलत होती.

१६९९ - तू कधी आलीस इकडे??

३३७२ - तेवीस हजार सेकंद झाले...

१६९९ - का गं?? शिफ्ट झालात???

३३७२ - हं! एकटीच...

१६९९ - का??

३३७२ - अगं काय नुसता रश त्या चंद्रावर.. इकडे जागांचे भावही चांगलेत.. अर्थात.. राहणीमान महागडंय म्हणा..

१६९९ - ३३११ नाही आला??

३३७२ - अंहं...

१६९९ - निराश दिसतेस...

३३७२ - ३३११ बरोबर वागत नाही...

१६९९ - काय करतो??

३३७२ - काही चूक झाली तर पॉईन्ट्स द्यायला कडकड करतो.. भांडतो... चीपच देत नाही...

१६९९ - असल्यांना सोडून दिलेलेच चांगले..

३३७२ - याचा नंबर काय आहे गं??

१६९९ - ४६३४४...

३३७२ - चल.. मंगळून घ्या दोघं...

'मंगळून घ्या' म्हणजे काय असावे ते गोपला समजेना!

तो मधेच चिरकला..

गोप - ओ १६९९.. मंगळून घ्या म्हणजे काय असते???

१६९९ - आयर्न ऑक्साईडने हात पाय धुवायचे... म्हणजे इथला त्रास होत नाही....

ऐकूनच गोप थिजला!

काही वेळाने खरच ड्राय पावडर ओतली १६९९ ने त्याच्या हातावर! गारीग्गार! खसाखसा हात पाय घासले गोपने! खरच, जरा बरे वाटू लागले होते. या हॉलमध्ये मंगळाचा स्पेशल युनिफॉर्मही घालावा लागत नव्हता.

अचानक एका दालनात गोपला नेण्यात आले. तेथे प्रचंड गर्दी होती. आणि सगळ्यात मोठ्ठेच्या मोठे आश्चर्य म्हणजे १६४२ हा पृथ्वीवरचा त्या ग्रूपचा प्रमुखही तिथे उभा होता. हा इथे कधी पोचला हेच गोपला समजेना!

गोप - हे कधी आले हो इथे??

१६९९ - दोन तास झाले असतील..

गोप - अ‍ॅ??? पण आपल्यालाच तीन तास लागले ना??

१६९९ - ते सिनियर आहेत... त्यांना स्पेशल बसेस अ‍ॅप्रूव्ह्ड आहेत..

गोप - आता काय करायचंय??

१६९९ - आता एकेक डेटा तुझ्यासमोर उलगडला जाईल.. तू त्याचा अर्थ तुला माहीत असल्यास सांगायचास..

आपण फार म्हणजे फारच महत्वाचे आहोत हे गोपला समजले....

१६९९ - स्वतःला जास्त शहाना समजू नकोस.. खोटे सांगितलेस तर लगेच समजेल..

गोप - नाय नाय.. खोटं कशाला सांगेन...

१६९९ - तुझ्या मनात आलेलं होतं.. दिशाभूल करावी असं...

गोप - सॉरी...

१६९९ - आत्ता पॉईन्ट्स कापत नाहीये मी तुझे... पण पुन्हा असं मनात आलं तर कापेन..

गोप - मला.. मला एक विचारायचं होतं....

१६९९ - मनातलं कसं कळतं हेच ना?? मनातील विचारांच्या लहरी मेंदूपासून निघतात आणि त्याचा डोळे, ओठ, गाल आणि हातांची बोटे यांच्यावर परिणाम होतो... त्या अवयवांमधून सूक्ष्म लहरी निघतात.. त्या लहरींची फ्रिक्वेन्सी चीपवर मोजली जाते.. दोन गोष्टी समजतात.. एक अगदी नक्की आणि दुसरी अस्पष्टपणे.. जी गोष्ट नक्की समजते ती ही की माणूस खोटे बोलणार किंवा वागणार आहे.. जी अस्पष्ट किंवा अंदाजाने समजते ती ही की त्याच्या मनात काय विचार आला असावा..

गोप - भयंकर माणसे आहात तुम्ही सगळी... आणि असं होऊ द्यायचं नसलं तर??

१६९९ - तर एक चीप मिळते... ती आजवर कमावलेल्या व गमावलेल्या पॉईन्ट्सवर अवलंबून असणारी असते.. तिला एक विशिष्ट कालावधी व अटी असतात.. ती कॅन्सलही केली जाऊ शकते.. ती चीप लावली तर आपण खोटे बोलल्याचा संदेश आपली मूळ आय डी दुसर्‍याच्या चीपला पाठवतच नाही... काही श्रीमंत लोक स्वतःची रेकॉर्ड्स एजंट्सना बदलायलालावून ती चीप विकत घेतात.. त्यात खूप भ्रष्टाचार चालतो..

गोप - तुमच्याकडे आहे??

१६९९ - अर्थातच...

गोप -खरच काय माणसं आहात तुम्ही... !!!!

१६९९ - अजून तुला काहीच माहीत नाही... आता तुला काही जुने फोटो, काही लिटरेचर, काही चित्रे, काही पुतळे दिसतील... त्यांचा तुला जाणवलेला, माहीत असलेला अर्थ या माईकमध्ये बोलायचा... तो सगळ्यांना मराठीतच ऐकू येईल.. हा ग्रूप तुझे सगळे बोलणे लक्षपुर्वक ऐकून त्यावर नोट्स काढेल.. त्यानंतर मिटिंग्ज होतील अनेक.. तुझी येथे राहण्याची चांगलीशी व्यवस्था केलेली आहे... मार्गदर्शक म्हणून मी आहेच... तू जे सांगतोस त्यातून एक सुसंगत असा 'इतिहास-धागा' तयार केला जाईल.. आजच्या वळणावर मानव संस्कृती कशी कशी आली य अभ्यासात हे खूप महत्वाचे ठरू शकेल..

गोप - १६९९... मला जे माहीत आहे ते तर मी काहीही चित्रे वगैरे न बघताच सांगू शकतो...

१६९९ - तुला जे मुळातच माहीत आहे ते समजून, जाणून घेण्याचा सेशन दोन दिवसांनी आहे... या दोन दिवसात तू आम्ही दाखवलेल्या गोष्टींवर काय म्हणतोस याचा अभ्यास होणार आहे... नंतर तुझे वैयक्तीक जीवन व त्या वेळचे जग या गोष्टी समजून घेण्यात येणार आहेत...

गोप - आणि मी मदत केलीच नाही तर??

१६९९ - अनन्वित छळ केला जाईल तुझा...

आधीइतक्याच शांतपणे व त्याच उच्चारांमध्ये बोलले गेलेले हे विधान गोपला थिजवून गेले.

१६९९ - जा आता तिथे...

चिडीचूप शांतता पसरली होती. १६४२, जो प्रमुख होता, तो भाषण द्यायला उठला..

"सर्व जी ६४२ जी २ रवीसमोरील इन्नर प्लॅनेटरी ऑर्बिटवासीयांनो... आज आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालेलो आहोत.. चक्क इसवीसन २००० मध्ये जिवंत असणारा एक मानव आजही आपल्यात जिवंत राहिलेला आहे व तो इतर कोणत्याही गॅलक्सीला अजून माहीतही नाही.. इतकेच काय आउटर प्लॅनेटरी ऑर्बिट्समधील फक्त शनीपर्यंतच ही बातमी जाऊ देण्यात आलेली आहे याचे कारण म्हणजे युरेनस व नेपच्यून आणि त्यांचे चंद्र या सर्वांवर जी ६४१ चा डोळा आहे...

आज हा ४६३४४ आपल्यात उभा आहे... तो आता अनेक चित्रे, संदर्भ, लेख, पुतळे, फिल्म्स वगैरे पाहून निर्वाळा देईल की त्याला त्या पैकी काही माहीत आहे की काय? असल्यास ते तो आपल्या सर्वांना जाहीररीत्या सांगेल.. माझे प्रत्येकाला आवाहन असे आहे की तो जे सांगेल ते नीट ऐकून घ्यावे.. कारण बरोब्बर दोन तासांनी एक चर्चासत्र आहे ज्यात आपण आपल्या मनातील शंका या मानवाला विचारायच्या आहेत.. आपण शंका विचारायलाच हव्यात असा कायदा मुळीच नाही... मात्र त्याचे बोलणे व्यवस्थितपणे न ऐकता विचारलेल्या शंकांसाठी प्रत्येकी पाच पॉईन्ट्स कापून घेतले जाणार आहेत.. याचे कारण इतकेच की चर्चा सुसूत्र व्हावी...

२३९०.... आता सेशन सुरू कर... हा मानव जेथे आपल्याला दिसला तय जागेपासूनचे चित्रण आधी दाखव.. म्हणजे मग याला पटापटा स्फुरेल... "

सेशन सुरू झाले... डोळ्याची पापणीही न लववता गोप समोर दिसणार्‍या टेकाडाकडे बघत होता.. काहीही हालचाल नाही.. कॅमेरा तय टेकाडाच्या सर्व बाजूंनी फिरला.. नंतर टेकाड फोडणारे टेकाड फोडू लागले.. त्यानंतर एकदमच संपूर्ण टेकाड फोडून झाल्यानंतरचे चित्रण लागले... आत काही जुनाट, मातीचे थरच्या थर बसलेल्या अर्थहीन आकारांच्या वस्तू वगैरे होत्या... एकाही वस्तूचा आकार गोपला समजत नव्हता... फक्त... ती एकच गोष्ट..... ओह... ओह माय गॉड.....!!!!!!!

====================================

"काय हे??? पहिला का वाढदिवस आहे लग्नाचा???"

"म्हणून काय झालं????"

"घराचे हप्ते, फ्रीझचे हप्ते, टीव्हीचे हप्ते... तुमच्या लुनाचे हप्ते... कशाला आणलंत हे????"

"हम तुम्हारे लिये कुछभी करेंगे दिलबर..."

"आहा.... आधी सांगा... हे परत करून काहीतरी दुसरे घेता येईल का???"

"काय दुसरे??? चांदीचंय हे... हे परत करून दुसरे काय आणणार???"

"एक चांदीचं निरांजन आणूयात का?? मी बोललेवते गणपतीला.. मूल झालं तर देईन म्हणून..."

"अरे पण त्यासाठी बिचार्‍या गणपतीला कशाला बोलयचं?? मला सांग ना???"

"अहो.. जरा गंभीर व्हा ना... खरच... तीन वर्षे झाली... आता मूल व्हायला पाहिजे..."

"अगं पण म्हणून आधीच निरांजन???"

"गणपतीला आधी निरांजन दिलं तर एक गुटगुटीत मुलगा होईल आपल्याला... "

"करा बाबा.. काय करायचं ते करा.... आम्ही आपलं प्रेमाने आणलं.. तुम्ही मोडा ते..."

आशा एकदम गळ्यात पडली... गोपच्या...

"रागावता काय??? असूदेत.. हेच वापरते मी... कित्ती मस्त नेकलेस आहे.... सांगा ना.. केवढ्याचा आहे???"

"असं काही भेट दिलं तर किंमत विचारत नसतात... "

"आपल्याच माणसाला विचारली तर काही बिघडत नाही... सांगा ना..."

गोपला आत्ता त्या चित्रणातील ती वस्तू पाहून.. ज्यावर अनेक थर बसलेले असूनही ज्या नेकलेसचा मूळ आकार तसाच राहिलेला होता तो नेकलेस पाहून.. त्याने आशाला त्या नेकलेसची सांगितलेली किंमत आठवली.. आणि... नखशिखांत दचकला गोप... कारण त्यावर आशा म्हणाली होती...

"किती प्रेम करता माझ्यावर.. इतकी परिस्थिती असूनही माझ्यासाठी ही एवढी महागाची भेट आणलीत?? .. तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या संकटाच्या वेळी.... माझी हीच भेट आणि मी तुम्हाला उपयोगी पडेन... "

हासत हासत गोपने त्या भोळ्या आशाला जवळ घेऊन थोपटले होते... आणि मग दोघांच्याही डोळ्यात एकमेकांना दिसणार नाही अशा पद्धतीने पाण्याचे दोन दोन अश्रूही आले होते...

मात्र... यात दचकण्यासारखं काहीच नव्हतं...

दचकण्यासारखं हे होतं.... की... त्या नेकलेसची किंमत होती..

फक्त रुपये १६९९

गुलमोहर: 

क्या बात है.
आज मी प्रथम!
बेफीकीर जी, लवकर वाचतो आनि कळवतो.

अमित

वाह !! मस्त रंगत आहे कादंबरी !!

फक्त रुपये १६९९ >>> मस्त ...नेहमीप्रमाणेच बेफीकीर टच शेवट !!

बाकी
मनातील विचारांच्या लहरी मेंदूपासून निघतात आणि त्याचा डोळे, ओठ, गाल आणि हातांची बोटे यांच्यावर परिणाम होतो... त्या अवयवांमधून सूक्ष्म लहरी निघतात.. त्या लहरींची फ्रिक्वेन्सी चीपवर मोजली जाते.. दोन गोष्टी समजतात.. एक अगदी नक्की आणि दुसरी अस्पष्टपणे.. जी गोष्ट नक्की समजते ती ही की माणूस खोटे बोलणार किंवा वागणार आहे.. जी अस्पष्ट किंवा अंदाजाने समजते ती ही की त्याच्या मनात काय विचार आला असावा.

>>> ही कन्सेप्ट फार फार भयानक वाटली !! खरच घाबरलो ...लोकांना असे मनातले विचार कळायला लागले तर वाटच लागेल ....

काय मस्त वाटतं इमॅजिन करुन सगळं... अप्रतिम भाग, रंगतदार होणार आहे कादंबरी एकदम..... खुप्प्प्प्प्प्च आवडला हा भाग....मस्तच, अप्रतिम, पु. ले. शु.

झाले........................ वा.................., भले बहाद्दर!!!!!!!!!!!!!
भुशनराव छान!...थोडा वेळ लागतो संदर्भ लागयला, कारण तुम्ही केलेल्या वास्तव चित्रणातुन बाहेर पडायला जड जातय....पण मस्तच!!!

पण काय हो, बोका कुठाय?????????????????
आणा त्याला लवकर........

अमित

बेफिकीरजी खूप खूप धन्यवाद मस्त कादंबरी.आत्ताच मंगळावरून येऊन तुंम्हाला धन्यवाद देतोय.
खूप खूप शुभेच्छा.

सह्ही!!!

कंडक्टर 'गाडीत तंबाखू व धूम्रपानास मज्जाव आहे' ही पाटी तात्पुरती डिअ‍ॅक्टिव्हेट करून गायछाप लावत होता.>> इ.स.१०००० मध्ये गायछाप??, किंमत किती होती त्याची Lol

भारी.......
खास करुन ओ२ अन सी .....
सायन्स ग्रजुएट असल्यानी इमॅइनेशन भन्न्न्नाट आवड्लं..... लवकर लवकर लवकर पुढचा भाग येऊ देत.....

कंडक्टर 'गाडीत तंबाखू व धूम्रपानास मज्जाव आहे' ही पाटी तात्पुरती डिअ‍ॅक्टिव्हेट करून गायछाप लावत होता.>> इ.स.१०००० मध्ये गायछाप??, किंमत किती होती त्याची Rofl

मजा आली..........तुफान

हम्म...वेगळ्या पद्धतीने विचार करून लिहिलेली विज्ञान कादंबरी आहे.
एक शंका...त्या कालच्या लोकांना आतासारख्या काळज्या कशा असतील? म्हणजे भ्रष्टाचार वगैरे....आणि point कापणे वगैरेचा उद्देश काही समजला नाही.

लय भारी ,
वाचताना खरंच असं वाटतं की आपण इ.स.१०००० मध्ये आहोत.मला खुप आवडला विषय बेफिकीरजी फुढच्या भागासाठी शुभेच्या.

लय भारी ,
वाचताना खरंच असं वाटतं की आपण इ. स . १०००० मध्ये आहोत . मला खुप आवडला विषय बेफिकीरजी फुढच्या भागासाठी शुभेच्या .

भन्नाट म्हणजे एकदमच भन्नाट!! प्रचंड आवडला भाग २!!! तुमची कल्पनाशक्ती फारच मोठ्या भरार्‍या घेतेय हो बेफिकीरजी.... Happy
सापेक्षतेची संकल्पना सहीच समजावली आहे... मज्जा आली तो भाग वाचतांना. Happy
तुमचा विश्वास बसणार नाही, पण एखादा जीव जर अंतराळात फेकला गेला, तर त्याचे नक्की काय होईल? हा प्रश्न नेहमी मनात यायचा... आज त्याचेही उत्तर मिळाले. Happy
पॉईंट सिस्टिम भारीच आहे एकदम! तिचे काहीही प्रयोजन नाही तरीही लोक ती पाळतायत... हे म्हणजे आपल्या काळातले लोक जो गुणसंचय करतात, त्याचेच ८००० वर्ष नवे रुप ना? Wink
भरपूर उपरोधिक, भरपूर तत्वज्ञानयुक्त आणि भरपूर विनोदी असे लेखन होते हे... गोपचे बोलणे, इ.स. १०००० मधल्या लोकांना ते न समजणे, त्याच्या शिव्या खुपच एन्जॉय केल्या Happy

आजचा भाग माझ्या निवडक १० त Happy

बेफिकीर
मजा आली एवढ्या विनोदी शैलीत लिहिलेली, पण विचार्पुर्वक लिहिलेली विज्ञान कथा वाचली नव्हती.
बारीक तपशील खुप छान जमुन आले आहेत.

भन्नाट कल्पनाविश्व... पुढे काय काय् कल्पना असेल तुमची .........ह्याचीच कल्पना करतोय

लवरकर द्या पुढचा भाग Happy