द वर्ल्ड ऑफ डिफरन्स - ९

Submitted by बेफ़िकीर on 25 February, 2011 - 09:24

आज सुटका!

वाघसाठी अनेक वर्षांनी, नसीमसाठी तर मरणाच्या दाढेतूनच, मुल्लासाठी एका नव्या आयुष्याला चांगली सुरुवात करण्यासाठी, आकाशसाठी स्वातंत्र्य देणारी आणि...

.... संजयबाबूसाठी आठवा मर्डर करायला परवानगी देणारी... किंवा मग... एखादवेळेस नववाही!

निर्मल जैन... आणि द डेप्युटी इन चार्ज ऑफ द जेल... नवले...!

पहाटे साडेपाचला अलार्म झाला.. संपला कालच दिवस आणि रात्र... आजचा दिवस सुरू... सुटकेचा दिवस.. सगळे जागेच होते रात्रभर खरे तर... पण एक प्रथा म्हणून चुळबुळत उठून बसले... एकाच्याही चेहर्‍यावर सहजता उरलेली नव्हती... ताण.... नुसता ताण... आणखीन ताण... फक्त ताण.. !!!

जबरदस्त प्रयास पडत होते चेहरा नेहमीसारखा ठेवायला! साधी गोष्ट नाहीच! जिथे मुंगीसुद्धा प्रवेश करू शकत नाही असे कारागृह भ्रष्ट अधिकार्‍यांमुळे ढिसाळ कारभार असलेले कारागृह झालेले होते. राजासाब सोडला तर एकाही अधिकार्‍याबद्दल किंवा हवालदाराबद्दल काहीही आदर वाटत नव्हता कुणालाही! पण तरीसुद्धा ते एक कारागृह होते. समाजातील जहालांहून जहाल गुन्हेगारांना कायमचे आपल्या पोटात घेणारे, त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेणारे, त्यांना क्षणोक्षणी पश्चात्ताप वाटेल अशी भयानक अद्दल घडवणारे कारागृह! जिथून सुटलो आणि चुकून परत सापडलो तर काय याची कल्पना केल्यावर तिथून कधी सुटूच नये असे वाटावे असे कारागृह!

पाचच्या पाच जण मिनिटातून दहा वेळा छातीवर हात ठेवत होते. हृदयाची थडथड सहनच होत नव्हती. नसीम कसा काय जाऊन परत आला हा विचार इतर चौघांच्या मनातून जात नव्हता. नसीमचा त्याग असीम होता. बाहेर गेल्यानंतरही आणि स्वतः फाशीचा कैदी असूनसुद्धा मूर्ख परत आला होता. त्याचा त्याग पाहून संजयबाबूसारखा माणूसही हेलावला होता. नसीमने केले काय तर वाट्टेल ते प्रयत्न करून तो मिनीला भेटून आला. प्लॅन कसा कळणार याची खात्रीलायक बातमी काढून आला. खरे तर मिनीला प्लॅन सांग म्हणूनच तो आग्रह करत होता. पण वेळच नव्हता हातात, कसेतरी दोन मिनिटे बोलणे, त्यातही नसीमच्या अंगावरचा तो कैद्याचा पोषाख, मिनीने फक्त दारूच्या बाटलीत निरोप पाठवते इतकेच सांगीतले होते. आणि हा मूर्ख परत आला. कारागृहात परत आला. अर्थात, तो स्वतःहून आला नसता तर फार तर आणखीन सहा सात तासांनी पकडला गेलाच असता. आणि तसा जर पकडला गेला असता तर त्याची हालत अत्यंत वाईट झाली असती. खरे तर स्पेशल परवानगी मिळवून त्याला अठ्ठेचाळीस तासात लटकवलाच असता. बहुधा हाच विचार करून नसीम परत आला. नुसतेच स्वतःच्या जीवावर पळून जाण्यापेक्षा कुणीतरी काहीतरी व्यवस्थित सोय केल्यानंतर पळण्यात शहाणपणा वाटला असावा त्याला!

आणि आज शेवटी एकदाचा सुटकेचा दिवस उजाडलेला होता. बाहेर उजाडत होता नेहमीच स्वतंत्रपणे आकाशात दिमाखात राहणारा सूर्य! आणि येरवडा कारागृहात उजाडत होत्या अनेक आशा, इच्छा, कामना!

जसजसे एकमेकांचे चेहरे दिसायला लागले... स्वभावाप्रमाणे सर्वप्रथम वाघ निगेटिव्ह बोलला..

"एक बार चाहिये तो सब सोचलो.. करना है क्या ये?? नही तो हालत खराब हो सकती है अपनी.."

परवाच्या मुद्यावर भडकलेला वादही आकाशनेच थांबवलेला होता. मिनीने एकच माणूस पळताना दाखवला असला तरी त्यात तिची काहीही चूक नाही. ती तिच्या नवर्‍यासाठीच ते धाडस करणार! मात्र आपण सगळे त्या ट्रकमधे बसून पळू शकतो. बाबूची चूक काहीही नाही. हे आकाशने परोपरीने समजावून सांगीतल्यावर वाघ आणि मुल्ला शांत झालेले होते. इकडे बाबू तर खवळलेलाच होता. त्याचे म्हणणे असे होते की त्याची बायको नरकयातना सहन करून वाट्टेल त्या परिस्थितीत सोडवायला बघतीय, त्याचे आभार मानून इथून पळण्याचा प्रयत्न करायचा तर तुम्ही मलाच बोलताय? पण ते भांडण मिटले होते. पण... हे नवीन चालू होऊ शकत होते.

वाघ म्हणत होता.. 'पुन्हा विचार करा.. पळायचे नसले तर पळू नका.. कारण पकडले गेलो तर फार भयानक हाल होतील आपले..'!

आणि संजयबाबूच्या मुठी परत वळू लागल्या होत्या. ताबडतोब आकाश पुन्हा मधे पडला!

"वाघ.. तुम्ही आता माघार घेतलीत तर तुम्हालाच अद्दल घडवतील हे तिघे.. पाचांपैकी एकानेही माघार घ्यायची नाही आहे.. लक्षात घ्या.. जो माघार घेऊन येथेच थांबेल त्याची हड्डीपसली एक करतील ते लोक.. बाकीचे चौघे गेले कुठे हे समजून घेण्यासाठी... कुणीही माघार घ्यायची नाही आहे.."

वाघच्या चेहर्‍यावर शेवटी एकदाचे निरुपायाचे भाव आलेले अंधुक प्रकाशात दिसले तसे सगळे एकमेकांकडे पाहू लागले.

विश्वास बसत नव्हता की आज आपल्या सुटकेसाठी बाहेरच्या जगातून एक परिणामकारक सेटिंग केले जाणार आहे. आपण फक्त साहस दाखवायचे आहे. नक्कीच सुटणार आहोत आपण!

मनात सारखा तोच विचार येत होता. नाही सुटू शकलो काही कारणाने तर?? सुटायचा प्रयत्न करताना पकडले गेलो तर?? मारले गेलो तर?? बाहेर गेल्यानंतर पुन्हा पकडू शकले तर??

बाबू - आज रात उस सालेके पेटमे छुरा डालनेवाला है मै..

निर्मल जैनचा असलेला संताप बाबूच्या स्वरांमधून प्रकट झाला.

आकाश - मै भी साथ चलुंगा तुम्हारे..

अचानक विचित्र प्रकार घडला.

वाघ रडायलाच लागला! पहिल्या दिवशी आपल्यावर अत्याचार करण्यासाठी आसूसलेला, केव्हाही मारामारी करणारा, शिव्यांशिवाय वाक्य न बोलणारा वाघ रडतो कसा काय हेच आकाशला समजेना!

आकाश - काय झालं... काय झालं काय... आ?? ओ वाघ.. अहो काय झालं काय तुम्हाला..

वाघ - नाय सुटणार आपण.. नाय सुटणार.. गोळ्या घालणार आपल्याला दिसल्यावर लगेच..

आणखीन एक चकीत करणारी घटना घडली. चक्क संजयबाबू उठून वाघपाशी आला आणि त्याने वाघच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. आकाश अवाक झाला.

बाबू - डर रहा है ये.. इसको लग रहा है हम नही छुट सकते... इसलिये डरता है हमेशा.. रो मत वाघ.. आज तू छुटजायेगा यहांसे..

वाघ अजूनही हमसतच होता. मुल्ला भकासपणे म्हणाला एकदम!

मुल्ला - छुटभी जायेगे तो जायेंगे कहा??

आकाश - मतलब??

मुल्ला - तेरी बहन है.. बाबूकी बिवी है.. वाघका बाप और भाई है.. मै कहां जाऊ??

आकाश - तुम्हारा भी तो घर है??

मुल्ला - घर! वो घर अगर घर होता तो मै लुटेरा बनताही नही..

दुसरी बेल वाजली! सकाळचे पावणे सात वाजले. प्रत्येक बरॅक उघडण्याचा आवाज यायला लागला. दोन तीनच दिवसांपुर्वी मार खाल्लेला असल्यामुळे या पाचजणांच्या अंगात बाहेर जाऊन कोणतेही काम करण्याचे त्राण नव्हते खरे तर! पण उठावेच लागणार होते. नाहीतर नाश्ता कुठून मिळणार?

बरॅक उघडायला हवालदार आले! नेहमीचेच दोघे! कोर्‍या चेहर्‍याने त्यातील एकाने बरॅकचे दार उघडले. पाचही जण उठून बाहेर निघाले..

पण त्यांना आतच थांबवले हवालदारांनी!

आजच असे का व्हावे हे समजत नव्हते. कान कोरत एक हवालदार थुंकत दुसर्‍या हवालदाराला म्हणाला...

"च्यायला.. ४३ नंबर बसचा रूटच बदलला साल्यांनी... आता पार कॉर्पोरेशनपर्यंत चालत जाऊन बस पकडावी लागते.. टायमात यायचं कसं माणसानं??"

तो संवाद ऐकून बाबू आणखीनच चक्रावला. हे असे दारात आणि आपल्याला आत उभं केलंय?? असं का आज? नवलेला सुगावा लागला बहुधा! आहे पुन्हा आज पिटाई! आपलं काही खरं नाही.

तेवढ्यात कारण समजले...

.... पन्नास एक फुटांवरून ते दोघे चालत येत होते... पठाण.....

..... आणि कोकिळ...!

हा कोकिळ सहसा दिसायचाच नाही. पण दिसायचा नाही तेच चांगलं होतं म्हणा! काळाकभिन्न, तानाजीसारख्या मिशा, राकट विद्रूप चेहरा, कायम दुसर्‍याला खलास करीन असे भाव आणि आवाज हा असला भोंगा लावल्यासारखा!

पायातले बळच गेले त्या दोघांना बघून या पाचजणांच्या!

पठाण परवडला! कोकिळ इथे कशाला??

मात्र... नसीम संपलेला होता मनातून..

कारण.. कारण त्याला ते व्यवस्थित माहीत होते...

"ए... चला आत.. तुमच्यायला तुमच्या.. "

कोकिळ आत आला आणि पाठोपाठ पठाणही!

"कोन नसीमेरे????"

"ये देखो ये... ये कुत्ता नसीम है..."

पठाणने त्याला काहीसा सिनियर असलेल्या कोकिळला नेहमीपेक्षा सौम्य भाषेत सांगीतले.

कोकिळने नसीमच्या खांद्यावर हात ठेवला... नसीम कोरड्या ठण्ण आणि मृतवत नजरेने कोकिळकडे पाहात होता..

"चल्ल.. चल्ल अल्ला बुला रहा है तेरेको... चल्ल.. "

'हॅन्ग ..... टिल.... डेथ...'

नसीम! नसीमची बरॅक आजपासून वेगळी होणार होती. याच क्षणापासून!

तोंडातून आवाज फुटणे दूरच.. नसीम जागचा हलूही शकत नव्हता..

कोकिळने खण्णकन एक ठेवून दिली त्याला!

तेव्हा कुठे सगळ्यांच्या टाळक्यात प्रकाश पडला.. नसीमला न्यायला आले आहेत..

आक्रोश! फक्त आक्रोश! येरवडा कारागृहाच्या भिंतींना अनुभव होता त्या आक्रोशाचा.. पण तरीही दर वेळेस तो आक्रोश व्हायला लागला की थरथरायच्याच त्या..

बाहेरच्या हवालदाराने कानावर हात ठेवले आणि उपहासाने हासत म्हणाला..

"च्यायला मरताना बोकडबी यवढा कोकलत नसंल.. "

पठाणने खाली पडलेल्या नसीमचा उजवा दंड बेदरकारपणे स्वतःच्या डाव्या पंजात धरला! पठाणचा पंजा म्हणजे व्हाईस होता!

नसीम मेलेल्या नजरेने सगळ्यांकडे पाहात असतानाच ओढला जाऊ लागला.

पहिल्यांदा भान आले मुल्लाला! मुल्ला पठाणच्या पायात पडला..

"रहम करो साहब.. रहम करो... अल्ला के नाम पर.. रहम करो साहब..."

पठाणच्या लेदर शूजची एक लाथ सण्णकन मुल्लाच्या छातीत बसली. मुल्ला तीन फूट उडून पडला. तोवर वाघने आक्रोश करत नसीमला परत आत घ्यायला सुरुवात केली. भयानक दृष्य होते ते! नसीम तर जणू प्रेतच बनलेला होता. कोकिळने वाघला मारायला सुरुवात केली तसे बाहेरचे दोन्ही हवालदार आत आले. प्रत्येकाने एकेकाला बडवायला सुरुवात केली.

आकाश चक्रावलेला होता. हा धक्काच त्याला सहन होत नव्हता. मनात विचार काय चालू होते अन झाले काय! एरवी मार लागल्यावर बेंबीच्या देठापासून ओरडणारा नसीम आज आवाजही फुटत नसल्यामुळे मृतवत बनून फक्त ओढला जात होता. आकाशला मात्र एका हवालदाराने उगाचच मारले. तो मार सहन करून आकाश म्हणाला..

"पठाणसाहेब.. एक दिवस ठेवा त्याला... आजचा दिवस... त्याला त्याच्या पापांची माफी मागायचीय खुदाकडे...कालच म्हणत होता.."

कोकिळ कर्कश्श आवाजात म्हणाला..

"फासी बरॅकमध्ये कुरान, गीता, बायबल, रामायन... सगलं मिलंल.. तुझी आई ** नको मधी..."

आत्तापर्यंत बाकीच्या बरॅक्समधून किंकाळ्या सुरू झालेल्या होत्या. अनेकांना बाहेर सोडलेले असल्यामुळे अनेक जण यांच्या बरॅकमधील दृष्य लांबून पाहात होते. कोकिळ आलेला अनेकांना दिसलेले होते. त्याचा अर्थही समजलेला होता. अत्यंत करुण आणि हृदय चिरेल अशा आवाजात त्यातील काही जण ओरडू लागले होते. एकाने तर मुठ मुठ मातीच खाल्ली. एक मानसिक परिणाम झालेला कैदी होता. त्याने दोन जणांशी मारामारी सुरू केली आणि मारता मारताच स्वतःच भीषण रडूही लागला.

इतके होईपर्यंत नसीमला दहा पाच श्वास घेता आलेले होते.

प्रथमच, त्या सगळ्या भयाण विव्हळणार्‍या कलकलाटात... प्रथमच नसीमची गगनभेदी किंकाळी घुमली..

ज्यांना ऐकू गेली ते जागच्याजागी थबकले.. वरचा श्वास वर.. खालचा खाली.. अशी किंकाळी होती ती!

नसीम! त्याची ती किंकाळी ऐकून पठाणच काय, पण कोकिळसारखा कोकिळही क्षणभर थबकला. शेवटी मानवता जागृत झालीच! अर्थात, कायदा तो कायदाच होता! पण कैद्याला फाशीच्या स्तंभाकडे नेताना त्याची काय हालत झालेली असते आणि त्याच्या चेहर्‍यावर पिशवी ओढून खटका खाली करेपर्यंत आणि तो तडफडेपर्यंत आपल्या जीवाची कशी तडफड होते ते कोकिळला अनुभवाने माहीत होते. बघवायचे नाही ते दृष्य कुणालाच! एक जीव घालवायचा? एका माणसाचा? भयानक दृष्य असायचे ते! खटका खाली करायला एक दिलावर नावाचा मुस्लिम होता. कोकिळ त्याच्याशी कित्येकदा बोलायचा. की कितीही हरामखोर आणि पोचलेला गुन्हेगार असला तरी त्याला मारताना कसे वाटते यार!

पण कोकिळ कडक होता. मनात मृदूता निर्माण झाली तरी कर्तव्यात कसूर होऊ द्यायचा नाही. कामच फाशीच्या कैद्यांना सांभाळण्याचे आहे म्हंटल्यावर करणार काय??

नसीमला इतकी भीती वाटत होती की त्याचे डोळे खोबणीतून बाहेर येतात कीकाय असे वाटू लागले. पठाणने फटके लावले तरीही तो भीषण ओरडत होता. आणि ते ओरडणे पाहून बरॅकमधले हे चौघे आणि आजूबाजूचेही कैदी भीषण ओरडत होते. एका हवालदाराने आता बाहेर ओरडणार्या कैद्यांवर लाठी चालवायला सुरुवात केली.

नसीम आशेने प्रत्येक कैद्याकडे, प्रत्येक हवालदाराकडे बघत होता. सोडवायची भीक मागत होता. कैदी लाचार होते. असमर्थ होते त्याला सोडवायला! हवालदारांसाठी नसीम हे प्रकरण एकदाचे आज संपणार होते. एकदा का फाशीचा कैदी कोकिळच्या हाती सोपवला की आपण सुटलो इतकेच त्यांना माहीत होते. प्रत्यक्ष फाशी आजवर त्या दोघांनीही पाहिलेली नव्हती. खरे तर परवानगीच नसते फाशी पाहायची! पण वशिल्याने एखादा हवालदार गेलाही असता. पण या दोघांची हिम्मत नव्हती तेवढी! त्यांच्या दृष्टीने नसीम हे मुळातच एक प्रेत होते. फक्त ते हालणारे प्रेत होते, त्याची हालचाल थांबवण्यासाठी त्याला कोकिळकडे द्यायलाच हवे होते.

अचानक नसीमचे ते अभद्र विव्हळणे सहन न होऊन कोकिळ उद्गारून गेला..

"अरे अभी नही मार रहे है... फकत शिफ्ट कररहेले है.. फासी आज नही है तेरी..."

"कब है इसकी फासी सर????"

लालभडक डोळ्यांनी कोकिळने मागे पाहिले तेव्हा आकाशने हा प्रश्न विचारला हे कोकिळला समजले.

फाड!

आकाशचा डावा गाल लालेलाल होऊन सुजला! पाचही बोटे उठली त्यावर!

"सवाल नही करते बेटा.... कोकिलको सवाल नही करते..."

कोकिळचा तो उपहासात्मक नाजूक स्वर अत्यंत भयानक होता. आकाशला तर घेरीच आली होती. कसाबसा उभा होता तो!

नसीमला लघ्वी झाली. पठाणला पुन्हा तीव्रतेने आठवले की याच हरामखोराने आपल्या तोंडावर विष्ठा फेकलेली होती. पठाणने एक लाथ नसीमच्या थोबाडात घातली. खळ्ळकन रक्ताची धार आणि दोन दात जमीनीवर!

आपल्याला वेदना होत आहेत हेही माहीत असण्याच्या पलीकडे गेलेला नसीम जमीनीवर तडफडत होता.

त्याच क्षणी नियमाप्रमाणे राजासाब आला. राजासाब आल्या आल्या कोकिळ आणि पठाणने कडक सॅल्युट्स मारले. नसीम तर काहीही बोलायच्या पलीकडे गेलेला होता.

मात्र संजयबाबू भानावर होता.

बाबू राजासाबकडे धावला. डायरेक्ट राजासाबच्या पायांवर डोके ठेवत वर बघत म्हणाला..

"साब.. एक दिन रहनेकी पर्मिशन दीजिये ना इसे... हम लोग सिर्फ गले मिलेंगे.. बाते करेंगे.. पीछले ढाई सालसे साथ रहरहे है... अब ये हमे कभी दिखनेवाला नही है साब.. एक दिन... सिर्फ एक दिन..."

राक्षस असता तरी हेलावला असता ते बोल ऐकून! तो तर राजासाब होता! मुहम्मद कादिर! फक्त आणि फक्त कायद्यानेच वागणारा.... पण... मुळात एक... 'माणूस' असणारा..

त्याच्या सहीशिवाय आणि प्रत्यक्ष देखरेखीशिवाय कदी फाशीच्या बरॅक्समध्ये ट्रान्स्फर होऊ शकत नव्हता.

राजासाबला खरच दया आली.

"कोकिल.. नवलेसाबको बोलेगा तो तेरेको जानसे मारदुंगा.."

"स्सर.. क्या स्सर??"

"इसको एक दिन रख... कल सुबह लेके जाते है..आखिर ये लोग दोस्त है... इन्सानियत नामकी भी कोई चीज होती है कोकिल... इन लोगोंको पताही नही था की इसे हम आज ले जानेवाले है"

कोकिळ! त्यालाही हाच निर्णय खरे तर घ्यावासा वाटत होता. पण त्याला तो अधिकार नव्हता. अधिकार राजासाबलाही नव्हता. पण ढवळाढवळ करण्याइतपत राजासाब नक्कीच सिनियर होता. नवलेशिवाय कुणालाही अधिकार नव्हता तारीख बदलण्याचा! तेही प्रॉपर कोर्टाची आणि मालपुरेची परवानगी घेऊनच!

पठाणने रागरंग बघितला.. आणि नसीमला ओढत पुन्हा बरॅकमध्ये आणून सोडले..

मिठ्या! आकाश सोडून प्रत्येकाने खाली पडलेल्या नसीमच्या देहावर उडी घेत त्याला मिठी मारली. आकाश सोडला तर चौघे कैदी म्हणजे जणू एक शरीरच झालेले होते. ते हसू इच्छीत असून रडत होते.

'एक दिवस मित्राबरोबर जास्त मिळाला म्हणून आनंद झाला असेल' असे समजून राजासाब, कोकिळ आणि पठाण चालू लागलेले असताना..

... अंगावर असलेल्या तीन कैद्यांना कुजबुजत नसीम म्हणत होता..

"आई *** तुमची.. बाजूला व्हा.. तिच्यायला पळून जायची तरी ताकद राहील का माझ्यात???"

केवळ एका क्षणात... मृत्यूचा अर्थ बदलून झाला होता जीवन... कैदेचा अर्थ बदलून झाला होत सुटका.. रिहाई.. पलायन.. स्वातंत्र्य.. आजादी... !

============================================

हसावं का रडावं तेच कळत नव्हता पाचजणांना!

पाचहीजण आरामात ब्लॅन्केट्समध्ये लपलेले होते. कारागृहातील ढिसाळ कारभाराबाबत रडाव, की आपण सुटू शकणार याबाबत हसावं या गोंधळात होते ते! त्या घाणेरड्या ब्लॅन्केट्सच्या ढिगार्‍यात कोण कुठे आहे हे जरी समजत नसलं तरी कुजबुजणारे आवाज ऐकू येतच होते. मस्त थंड हवा होती बाहेर!पुण्याची खास थंड हवा! आणि भरपूर ब्लॅन्केट्समध्ये स्वतःला खुपसून सगळ्यांना खरे तर मजाच वाटत होती. पण या मजेला होती भयाण भयाची किनार!

हे झाले यावर अजून त्यांचाच विश्वास बसलेला नव्हता.

ट्रक बरॅकपाशी आला तेव्हा समजले. आज क्लीनरच नव्हता. का नव्हता ते माहीत नाही, पण नव्हता! वाघ ब्लॅन्केट्स घेऊन बाहेर गेला. शेजारच्या दोन बरॅकमधून एकेक कैदी ब्लॅन्केट घेऊन बाहेर आलेला होता. वाघने ड्रायव्हर त्याच्या जागेवर बसल्यानंतर त्याच्याशी दारुच्या क्वार्टरचा विषय काढला होता. नाही म्हंटले तरी ड्रायव्हर जरासा आनंदी झालाच होता. तीच काय ती दोन मिनिटे! त्या दोन मिनिटात पहिला नसीम, पाठोपाठ बाबू, आकाश आणि शेवटी मुल्ला ब्लॅन्केट्समध्ये घुसले. क्वार्टर ड्रायव्हरला देऊन वाघ गाडीच्या मागच्या बाजूला चालत आला. इतर कैद्यांना हे दिसणे शक्यच नव्हते. कारण नवीन ब्लॅन्केट्स घेऊन सगळे आनंदात आत गेलेले होते. कारण याच नवीन ब्लॅन्केट्समधून विविध गोष्टी सप्लाय व्हायच्या. सिगारेट्स, खाण्याचे पदार्थ, पुस्तक, सुपारी, गुटखा वगैरे कित्येक गोष्टी!

ट्रक मस्तपैकी डुलत डुलत लाँड्रीपर्यंत येऊन थांबला. इथून नवलेची क्वार्टर पन्नास फुटांवर होती फक्त! एकदा तर चक्क नवले खिडकीत दिसलाही!

आणि सातव्या की आठव्याच मिनिटाला ते घडले! जे अपेक्षित होते तेच!

अलार्म! कर्कश्श अलार्म!

कैदी पळाला! किंवा दुसरा अर्थ म्हणजे कैदी पळाले! एकवचन किंवा अनेकवचन! परवा नसीम पळाला होता तेव्हा असाच अलार्म वाजला त्यावरून या पाचजणांना ते जाणवले.

अक्षरशः मुतायची वेळ आली ट्रकमध्येच!

ट्रक चेक केला तर??

सहज समजेल कुणालाही की आत्तापर्यंत इथेच असलेले कैदी आता नाहीत आणि आत्ताच ट्रक येऊन गेला याचा अर्थ ते ट्रकमध्ये असणार!

मिनी मूर्ख आहे. शतमूर्ख आहे.

कुजबुज वाढू लागली.

शेवटी लीडरशीप बाबूकडेच असायची.

बाबूने कुजबूजत आज्ञा सोडली.

'नवले बाहेर पडला की धावत त्याच्या क्वार्टरमध्ये जायचंय..'

करायचं तेच होतं प्लॅननुसार! पण ते बरेच नंतर! आत्त प्रसंग असा होता की शिट्या आणि धावाधाव सुरू झालेली दिसत होती आणि ट्रकचे चेकिंग न होण्याचे आता काही कारणच उरलेले नव्हते. समोर चक्क स्टाफ दिसायला लागलेला होता. शंभर एक फुटांवरून अनेक हवालदार शिट्या फुंकत धावू लागलेले होते. नवले क्वार्टरच्या दारात येऊन अवाक होऊन पाहात होता.

तेवढ्यात नवलेचा मोबाईल वाजला..

"सर... मै आजाऊ न आज???"

"अबे चूप..."

नवलेने शिव्या घालत मिनीचा फोन बंद केला.

पुन्हा क्वार्टरमध्ये धावला नवले फोन करायला! अनेक फोन करायला हवे होते. मालपुरेसाहेबांना पहिला, स्थानिक नेत्याला दुसरा आणि असेच अनेक! त्यात प्लस इन्टरकॉमवर उपस्थित असणं अत्यावश्यक होतं!

भयंकर गोंधळ वाढू लागला होता.

अनेक शिकार्‍यांनी वेढलेले असताना सावज जसे स्टॅन्डस्टिल होते तसे हे पाच जण ट्रकमधून जीवाचे डोळे करून बाहेर पाहात होते.

आणि त्याचवेळेस....

....

ज्याअर्थी नवलेने आपला फोन शिव्या देऊन आणि ओरडून त्वरेने बंद केला त्या अर्थी जेलमध्ये काय झालेले असेल याचा अ‍ॅप्रोप्रिएट अंदाज येऊन..

.... नखशिखांत नटलेली मिनी संजयबाबू...

खडकी मेन रोडवर असलेल्या एका रिक्षेत बसत रिक्षेवाल्याला सांगत होती....

"जेल... येरवडा...."

गुलमोहर: 

जबरी...

खरच उत्सुकता ताणली गेलीय...... काय होणार पुढे??????? अप्रतिम भाग.... गुंतुन जायला होत कथेत आणि हीच तुमची खासियत आहे..... पु. ले.शु