वसुंधराराजे शिंदे - एक खंबीर व्यक्तीमत्व

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

भारताला सत्ताधीश स्त्रियांचं वावडं नाही. संपूर्ण देशात स्त्रियांची परीस्थिती आजही वाईट असली आणि निवडून आलेल्या स्त्रियांचे प्रमाण कमी असले तरीही भारतीय राजकारणात स्त्रियांनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांची कामगिरी इतर स्त्रियांमध्ये लक्षवेधक आहे.

२००७ मध्ये संयुक्त राष्ट्रांचा नारी एकता (Women Together) पुरस्कार वसुंधराराजेंना देण्यात आला. यापूर्वी हा सन्मान हिलरी क्लिंटन आणि मेलिंडा गेटस् यांना मिळालेला आहे. राजस्थानच्या नागरीकांचे - विशेषत: महिलांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याबद्दल ही पुरस्कार वसुंधराराजेंना देण्यात आला.

विकासाठी फॅशन हा प्रकल्प राजस्थान सरकारने २००५ साली सुरु केला. ह्या कार्यक्रमांतर्गत सरकारने बीबी रसेल या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फॅशन डीझाईनरला हाताशी धरुन खादीच्या कपड्यांचा नवीन डीझाईन्स बाजारपेठेत आणली. बीबी रसेलने राजस्थानी विणकर महिलांबरोबर काम करुन खादीच्या कापडाची प्रत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या कार्यक्रमाचं अजून एक उद्दीष्ट होतं - महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे. एकिकडे ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षण देऊन उत्तम खादी विणून घेणे आणि ह्या विणलेल्या कापडाला आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फॅशन डीझाईनरना हाताशी धरुन आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणे असा हा अभिनव आणि परीपूर्ण कार्यक्रम आहे. यातूनच मग पुढे महिलांचे बचत गट स्थापन करणे, त्यांना छोटी कर्जे देणे आणि त्यांना आपल्या पायावर उभे करणे अशी अनेक कल्याणकारी कामे या प्रकल्पामुळे शक्य झाली. २००७ मध्ये जेव्हा वसुंधराराजेंना पुरस्कार मिळाला तेव्हा राजस्थामध्ये सुमारे १,३०,००० बचतगट सुमारे १६० कोटी रुपयांची उलाढाल करत होते. अलिकडच्या काळात महिलांसाठी राबवण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये हा एक लक्षणीय कार्यक्रम आहे यात शंकाच नाही.

राजमाता विजयाराजे आणि जिवाजीराव शिंदे यांच्या पोटी ८ मार्च १९५३ रोजी मुंबईमध्ये वसुंधराराजेंचा जन्म झाला. मुंबईच्या सोफिया महाविद्यालयातून त्यांना अर्थशास्त्र व राज्यशास्त्रामध्ये पदवी मिळवली. १९७२ साली ढोलपुरचे (राजस्थान) राजे श्री. हेमंत सिंग यांच्याशी त्यांचा विवाह झाला. १९८४ मध्ये त्यांनी आईच्या मदतीने राजकारणात प्रवेश केला. १९९१ ते २००३ या काळात त्या ५ वेळा लोकसभेवर निवडून आल्या. केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांनी परदेश मंत्री, लघुउद्योग मंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. २००३ साली आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन त्या राजस्थामध्ये निवडणुकीच्या रींगणात उतरल्या. २०० पैकी १२० जागा जिंकून त्यांनी निर्विवाद बहुमत मिळवले.

राजस्थानच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकिर्द मात्र वादळी ठरली. प्रत्यक्ष त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत पण त्यांचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले. दिनदयाळ ट्रस्टला जयपूरमधील मोक्याची जागा देण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केला. ट्रस्टने शेवटी उभ्या राहीलेल्या वादामुळे जमिनीचा अर्ज मागे घेतला. किरण शॅा मुजुमदार या प्रसिद्ध उद्योगपती बाईंनी वसुंधराराजे यांना दिलेले चुंबन वादग्रस्त ठरले. राजस्थान सरकारने नवीन घेतलेल्या विमानाचा निर्णयही वादग्रस्त ठरला. टोयोटा करोला हि नवीन गाडी मुख्यमंत्र्यांसाठी घेतली असताना मुख्यमंत्री मर्सिडीज गाडी घेणार अशी वावडा विरोधी पक्षांनी व प्रसारमाध्यमांनी उठवली. 'हकिकत' पुस्तकाचे प्रकरण आणि त्यावर तोडगा म्हणून आलेला धर्मांतर बंदी कायदाही वादग्रस्त ठरला. सरतेशेवटी गुज्जर जातीच्या लोकांनी त्यांची गणना भटक्या विमुक्त जातीत व्हावी (व आरक्षणाचा फायदा मिळावा) म्हणून केलेले आंदोलन त्यांना हाताळावे लागले. त्यांच्याच मंत्रीमंडळातील एक मंत्री त्यांचा फोटो देव्हाऱ्यात लावून त्यांची दुर्गा म्हणून पूजा करतो हे प्रकरणही प्रसारमाध्यमांनी बराच काळ चघळलं. परंतु बाई या सर्वांना पुरुन उरल्या. अतिशय खंबीरपणे त्यांनी या वादांना तोंड दिलं.

२००८ च्या निवडणुकांच्या वेळी मात्र प्रसारमाध्यमांनी त्यांना उचलून धरलं, त्यांनी महिलांसाठी केलेल्या कामाचं कौतुक केलं. नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या निवडणुकांना त्या अनेक अडथळ्यांसह सामोऱ्या गेल्या. हिंदुत्वाचा मुद्दा कटाक्षाने बाजूला ठेवून विकासाच्या मुद्यावर त्यांनी निवडणूक लढवली. पक्षांतर्गत फूट टाळण्यात मात्र त्यांना यश आलं नाही. २०० पैकी ७५ जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं. काँग्रेसला ९८ जागा मिळाल्या. काँग्रेसला निर्विवाद यश मिळालं नाही तसाच वसुंधराराजेंचा सपशेल पराभवही झाला नाही.

५५ वर्षीय वसुंधरा राजेंना भारतीय राजकारणात अजून बरीच मजल मारायची बाकी आहे. एका पराभवाने खचणाऱ्यातल्या त्या निश्चितच नाहीत. राजस्थानसारख्या पुरुषप्रधान राज्यात एका स्री मुख्यमंत्री म्हणून केलेल्या त्यांच्या कामाचं निश्चितच कौतुक करावं लागेल.

विषय: 
प्रकार: 

स्री मुख्यमंत्री म्हणून केलेल्या त्यांच्या कामाचं निश्चितच कौतुक करावं लागेल. >>
नक्कीच. राबडी आणि तत्सम स्त्रियां मध्ये शिला दिक्षीत, वंसुधरा राजे ह्या नक्कीच वेगळ्या आहेत.

छे ! शीला दिक्षीतचे कौतुक येथे करण्याचे काय कारण ?

---------हितगुज दॅट इ़ज.
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

वैभव्,छान लिहिले आहेस, परंतु वादग्रस्त प्रकल्प किंवा घटनाच काय ते रेंगाळत राहतात अन त्याबरोबर
त्या व्यक्तीची ओळखही.