'ये हृदयीचे ते हृदयी' - प्रवेशिका १(किंकर )

Submitted by संयोजक_संयुक्ता on 21 February, 2011 - 05:48

मायबोली आयडी - किंकर

कविता

नाव--' कणा'

कवी - कुसुमग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर

रसग्रहण कवितेचे ....... खरे तर रसस्वाद कवितेचा

मायबोलीचा आणि माझा ई-बंध तसा फार जुना आहे असे नाही. पाच
वर्षांपूर्वी पोटासाठी भटकत दूरदेशी येण्याचे नक्की केले आणि मुक्काम- पटवर्धन बाग
पोस्ट-कर्वेनगर,तालुका -हवेली जिल्हा -पुणे महाराष्ट्र भारत.हा पत्ता बदलून मुक्काम-
मर्क्युरी रोड,पोस्ट- इटोबिको जिल्हा- टोरोंटो ओंटारिओ कॅनडा या ठिकाणी येवून पोहचलो .
याठिकाणी राजाच्या सदनी अथवा घोर रानी पण नाही,तरी नव्या मातीत येवून पडलो हे खरे.आणि
मग आपल्या मातीची ओढ, भाषाभिमान यांचा मनास भिडणारा अर्थ उमजू लागला. त्यातून
संगणकाशी नाते दृढ होत गेले. आणि अंतर जालावर उंदीर मुसुंडी मारत असताना मराठी भाषा आणि
संस्कृतीस वाहिलेली काही अप्रतिम संकेत स्थळे गवसली त्यातील एक सुंदर संकेत स्थळ म्हणजे
आपणा सर्वांची आवडती ‘ मायबोली ‘ होय.

मराठीचा जगभरातील पाऊलखुणा जपण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच वंदनीय आहे.मागील वर्षा
पासून त्यांनी २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जो मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो तो या संकेत स्थळावर साजरा करण्याचे नक्की केले. यावर्षी त्या निमित्त त्यांनी जे उपक्रम नक्की केले आहेत त्यातील एखाद्या उपक्रमात आपणही हजेरी लावावी असे वाटले म्हणून प्रथम घडाभर तेल आणले.

आता मी ज्यात भाग घ्यावा असे ठरवले आहे ते या कानाचे त्या कानाला न कळता सांगावे असेच वाटत होते. कारण रस ग्रहणाचे माझे धाडस तसे वेडेपणाचेच आहे.पण मग लक्षात आले कि आपला प्रयत्न जरी या कानाचे त्या कानाला कळू नये असा असला तरी ये हृदयीचे ते हृदयी पोचणार कसे ? मग मात्र मनाशी पक्का निर्धारच केला नाही मी भाग घेणारच आणि तोही कवितेच्या रसग्रहणाच्या उपक्रमात.

आता एकदा मनाने मनावर घेतले, मग काय लगेच तयारीस लागलो तेही मनापासून . आठवणीतील अनेक कविता आणि त्याचे भावलेले अर्थ यांनी मनात विचारांची गर्दी केली. आणि एकदम एक थोडी वेगळ्याच घाटणीची एक कविता डोळ्यासमोर आली.आणि मग मात्र ती डोळ्यासमोरून हलेचना. कारण तिची पकडच तेवढी जबरदस्त आहे. कणाकणाने मनात उतरणारी रगारगातून रक्तात भिनणारी हि कविता आहे जणू ताठ कण्याने जगणाऱ्या एका कणखर कवी मनाची गाथा. आणि योग योग म्हणजे आज आपण ज्यांच्या जन्मदिवसाचे औचीत्य साधून हा उपक्रम साजरा करीत आहोत त्या कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर त्यांचीच हि रचना आहे. आज हे सर्व तुमच्या समोर मांडताना कवितेचा काळ मला माहित नाही कवी मन हि कविता रचताना कोणत्या परीस्थित होते याची मला आज माहिती नाही. यापूर्वी कोणी यावर काही भाष्य केले आहे का ? या संदर्भात मी अनभिज्ञ आहे. तरीही मी माझे रसग्रहण नव्हे खरे तर हि कविता मला कशी भावली इतकेच सांगणार आहे. कवितेची सुरवात एका एकतर्फी संवादाने झाली आहे.कवितेच्या सुरवातीस कवितेतील नायक गुरुग्रही येतो आणि कथानक पुढे सरकू लागते. कथानायकाचे आगमन केंव्हा व कसे झाले याचे वर्णन कवीने केले असले,तरी बोलणे फक्त कथा नायकाचेच आहे. आणि त्यातून सुरु होते एक कणखर कविता -

ओळखलत का सर मला पावसात आला कोणी

कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून

गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत राहिली

मोकळ्याहाती जाईल कशी बायको मात्र वाचली

याप्रमाणे कवितेची गोष्ट कवितेचा नायक कवी समोर मांडतो आहे या कल्पनेतून कविता साकारली आहे. प्रत्यक्षात इथूनच माझे विचार भिन्न दिशेने धावू लागले कवीने समाजाकडून अनुभवलेली अवहेलना म्हणा किंवा उपेक्षेचे अनुभव म्हणा हे कवी मनास जाळत राहिले . मग हे दुखः जगासमोर ठेवताना कदाचित कवीचे स्वाभिमानी मन, कवीस स्वतःची उपेक्षा मांडून सहानभूती घेण्यास मज्जाव करू लागले आणि या सर्वावर मात करण्यासाठी कवीने स्वमन उलगडताना तृतीयपूरषी निवेदक अर्थात कवितेतील नायक बोलता करून 'उपेक्षिलेले अंतरंग' आपणासमोर मांडले आहे. धुंवाधार पाउस , त्यामुळे नदीला आलेला पूर, निसर्गाचे हे अनाहूत संकट आणि त्यातून निर्माण झालेली नवी आव्हाने यातून कथानक पुढे सरकत असले तरी हा पूर मला प्रातिनिधिक स्वरूपाचा वाटतो. जगण्याची लढाई लढत असताना सत्याची कास धरून मार्गक्रमण करणाऱ्या सरळमार्गी नायकावर समाजातील दुष्ट प्रवृत्तींनी केलेला हल्ला म्हणजे हा पूर आहे.बरे हि संकटे अश्या अडचणी नकळत आणि इतक्या अचानक येतात कि त्यांची पूर्व कल्पना नसते, म्हणून या संकटरूपी रोरांवत आलेल्या नदीस कवी पाहुणी म्हणतो म्हणजेच या आरीष्टाकडे कवी सकारात्मक जरेने पाहताना दिसतो. बरे या झंझावाताने रौद्र लाटेने दिलेला तडाखा इतका जबरदस्त आहे कि घरादाराची वाताहत झाली आहेच पण त्याच बरोबर त्याचे लेकरूपण त्या लाटेने हिरावून घेतले आहे. या दुर्भाग्याचे वर्णन करताना कवी मन या संकटातील चांगली बाजू सांगण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्यामुळे क्षणार्धात सर्वस्व लुटून नेलेल्या लाटेच्या थैमानाकडे पाहताना दीर्घ काळानंतर माहेरी आलेल्या नवपरिणीत लेकीच्या अल्लडपणाची आठवण कवीस होते . बर माहेरी आलेली पोर परत जाताना जशी कधीच रिकाम्या हाताने जात नाही उलट आई बाबांना परवडत नसताना सुद्धा जसे काही ना काही घेवून जाते तसे या पुराने माझे पोर नेले हे वास्तव तो सांगतो. पण इतक्या पराकोटीचे दुखः सांगताना त्यांचा बाजार मांडून किंवा त्या सहानभूतीचा फायदा घेवून काही स्वार्थ हा नायक नक्कीच साधू इच्छित नाही त्यामुळे तो आपले दुखः हलके करता येईल अशा हक्काच्या ठिकाणी गुरुग्रही आला आहे. पण झालेल्या आघाताने तो इतका उद्वस्त झाला आहे कि त्याला आपल्याला गुरुजींनी ओळखले आहे याची सुद्धा खात्री वाटत नाही.आणि त्यामुळेच कवितेची सुरवातच –

ओळखलंत का सर मला अशी झाली आहे.

भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले

प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले

या संकटाने दिलेला तडाखा आणि त्याचे गांभीर्य विषद करताना ,शरीरास झालेला त्रास त्याने
संकटाचे वर्णन करताना, मी कसा देशोधडीला लागलो हे सांगण्यासाठी-----
"भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले" या शब्दातून चित्र उभे केले आहे पण मनास झालेला
त्रास आणि त्यातून आलेली विरक्ती याचा उलगडा करताना –
"प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले"
असे म्हणत नियतीने केलेली क्रूर चेष्टाच तो आपणास सांगतो. पण सुरवातीस म्हटल्या प्रमाणे
हे त्याचे सांगणे हे गाऱ्हाणे नसून मनाचे ओझे हक्काचे माणसाकडे हलके करण्याचा प्रयास आहे.
त्यामुळे, 'ठीक आहे संकटे तर येताच राहणार. यातून पुढील मार्गक्रमण चालू ठेवलेच पाहिजे' या
सकारात्मक बाजूकडे तो कसा पाहत आहे याचे यथोचित वर्णन म्हणजे –
"कारभारणीला घेवून संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे "
या ओळी आहेत.

माझ्या दृष्टीने इथ पर्यंतची कविता हा पूर्वार्ध आहे. हा पूर्वार्ध आहे संकटांच्या मालिकांचा.
हा पूर्वार्ध आहे सत विरुद्ध असत अश्या शतकानु शतके चालणाऱ्या संघर्षाचा. आहेरे आणि
नाहीरे या दोन गटातील अटीतटीच्या लढाईचा. पाऊस सुरूच असणे त्यातच भिजून नाही खरेतर
थिजून गेलेला नायक पुरेपूर डोळ्यासमोर येण्यासाठी कपडे होते कर्दमलेले हा एकच शब्द पुरेसा ठरतो. त्यानंतरचे नायकाचे त्याच्या वरील संकटांचे वर्णन हि रडकथा न ठरता ती रणकथा ठरते. सर्वस्व गेले, मुल गेले, छप्पर उडाले, चूल विझली. पण आता हे वास्तव स्वीकारले आहे. जे कोणी जीवाभावाचे आहेत त्याच्या मदतीने पुन्हा उभा राहत आहे. म्हणूनच हि रण कथा

म्हणजे फिनिक्स भरारी आहे.

कवितेच्या उत्तरार्धात -

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला

पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेवून नुसत लढ म्हणा

याठिकाणी कवितेचा नायक येवून गुरुग्रही मन मोकळे करत आहे.तो आला आहे ते मनातला सल कमी करण्यासाठी. त्यामुळे कवितेच्या सुरवातीस त्याची संभ्रमित अवस्था सांगताना कवी म्हणतो कणभर बसला नंतर हसला,म्हणजेच या ठिकाणची मनाची सर्व अवस्था देहबोलीतून पुरेपूर उतरली आहे. सरांनी आगमनानंतर ओळख दिली आश्वासक नजरेतून आधार दिला आणि म्हणून तो पुढे जावून, 'मग बोलला वरती पाहून'. म्हणजे आपले म्हणणे कोणीतरी ऐकणार या कल्पनेनेच त्यास उभारी आली.पण त्याला फक्त बोलून मोकळे होणे गरजेचे होते आणि म्हणून नजरेला नजर देत सरांच्या प्रतिक्रियेची चाचपणी करत तो काही सांगणार नव्हता, म्हणून तो बोलला वरती पाहून. प्रत्यक्षात या संपूर्ण पुर्वार्धानंतर कवितेने एक अनपेक्षित असे वळण घेतले आहे. उत्तराधात आधी देहबोलीतून आणि मग शब्दातून विचारांची देवाण घेवाण झाली आहे. अस्मानी संकट आणि त्याचा आघात यांनी सर नक्कीच हेलावले आहेत आणि जुन्या जाणत्या पिढीतील कर्तबगार कुटुंब प्रमुखाप्रमाणे मदत करण्याच्या उत्स्फूर्त इच्छेतून झालेली प्रतीक्षीप्त क्रियेतून सरांचा हात खिशाकडे गेला आहे.

आणि त्या देह्बोलीस उत्तर म्हणून कवितेचा नायक हसत उठतो इथे तितक्याच सहजतेने ती
मदत नाकारताना त्याचे हास्य म्हणजे सरांचा उपमर्द नसून मन मोकळे करण्यासाठी ,मानसिक
आधारासाठी, मी योग्य ठिकाणीच आलो होतो हे स्वतःस बजावणे आहे. आणि म्हणून तो
तितक्याच सहजतेने म्हणतो, नाही सर मी पैशासाठी नाहीच आलेलो.संकटे काय येताच राहणार
आजचा पूर हाही संकटांच्या मालिकेतील एक भाग असेल. पण या संकटातून सावरताना नियतीने
जी क्रूर थट्टा करीत माझे लेकरू नेले त्यातून मानस एकाकी वाटले. या गंभीर परिस्थितीतून
सावरून पुढे जात मला जगलेच पाहिजे. याठिकाणी शरीरात ताठ मानेने येणाऱ्या संकटांना सामोरे
जाण्यासाठी लागणारी जिद्द शरीरात आहे. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या म्हणजे मनाची जिद्द
तयार होईल आणि आपोआप नायकाच्या तोंडी शब्द् येतात….

पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसत लढ म्हणा

आणि अखेरीस इतकेच म्हणावे वाटते कि, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या या काव्यपंक्ती म्हणजे प्रत्येक जिद्दी मनाचे हे मनोगत असून त्यांच्या वाचनाने तुमचा कणनकण शहारेलआणि प्रत्येक संकटास तुम्ही ताठ कण्यानेच सामोरे जाल.

**************
ह्या कवितेचा प्रताधिकार (copyright) पॉप्युलर प्रकाशन गृहाकडे आहे. ह्या रसग्रहणात पूर्ण कवितेचा अंतर्भाव करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती अस्मिता मोहिते व पॉप्युलर प्रकाशन यांचे आभार.

तसेच ही परवानगी मीळवायला मदत केल्याबद्दल चिन्मय दामले (चिनूक्स) यांचे आभार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेकरूपण त्या लाटेने हिरावून घेतले आहे.>>>>>> ???
माहेरी आलेली पोर परत जाताना जशी कधीच रिकाम्या हाताने जात नाही उलट आई बाबांना परवडत नसताना सुद्धा जसे काही ना काही घेवून जाते>>>>>>>> असहमत.

आणि त्या देह्बोलीस उत्तर म्हणून कवितेचा नायक हसत उठतो >>>> हा परिच्छेद आवडला.

चांगलं लिहिलं आहे.

फक्त
>> त्याच बरोबर त्याचे लेकरूपण त्या लाटेने हिरावून घेतले आहे
हा संदर्भ कळला नाही.

छान लिहीलं आहे.
>> त्याच बरोबर त्याचे लेकरूपण त्या लाटेने हिरावून घेतले आहे>> मलाही संदर्भ कळला नाही.

स्वाती, सावली, रेशिम, >> त्याच बरोबर त्याचे लेकरूपण त्या लाटेने हिरावून घेतले आहे>> मलाही संदर्भ कळला नाही.

"मोकळ्याहाती जाईल कशी बायको मात्र वाचली" >>>>या ओळीत तो संदर्भ आहे.

वा किंकर!!! मराठी भाषा दिवसाला शब्दशः न्याय दिलात... शाळेत असतांना केलेले रसग्रहण आणि जगाच्या शाळेत कणा मोडण्याचे/ मोडू न देण्याचा प्रयत्न करतांना झालेल्या यातनांचे स्वानुभव घेतल्यानंतर स्वतःला उमगलेल्या ह्या कवितेचे रसग्रहण एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाते.... अगदी सहाजिक असे अर्थ उलगडणारी कविता तुमच्या चष्म्यातून वाचतांना वेगळेच अर्थ लागले. जसे-

माहेरी आलेली पोर परत जाताना जशी कधीच रिकाम्या हाताने जात नाही उलट आई बाबांना परवडत नसताना सुद्धा जसे काही ना काही घेवून जाते >>>>>>>> कधीच विचार केला नव्हता ह्या दृष्टीने...पण कटूसत्य आहे हे!!! आपल्या रुढी परंपरा पाळण्यासाठी, माहेरचे नाव राखता यावे म्हणून माहेरवाशिण पोरगी सणावाराला येऊन काही ना काही घेऊन जातेच. तशी आपल्याकडे प्रथाच आहे. ती पाळण्यासाठी आई वडिल मोठ्या कष्टाने पै न पै जमवून लेकीचे लग्न आणि नंतरचे सण वगैरे यथासांग पार पाडत असतात....आणि कर्जाच्या डोंगराखाली दबून जातात...

मोकळ्याहाती जाईल कशी? बायको मात्र वाचली >>>> इथे लेकरू हिरावले गेले आहे, असा अर्थ तुम्ही काढलात... अशी शक्यता वर्तवायला मन धजावत नाही. पण ही शक्यता नाकारताही येत नाही...

सर्व प्रथम आपण सर्वांनी वेळात वेळ काढून, मी केलेल्या रसग्रहणाच्या प्रयत्नाची दखल घेतली,त्यासाठी धन्यवाद!
लेकरू गेल्याचा गर्भित अर्थ हा खरोखरीच - 'मोकळ्याहाती जाईल कशी बायको मात्र वाचली', या ओळीत दडलाय असे मला वाटते. कारण बायको मात्र वाचली, यात कोणीतरी हिरावले गेल्याचा संदर्भ आहे. आणि तो व्यक्तीशी निगडीत आहे. कारण झालेले भौतिक नुकसान स्पष्ट करण्यासाठी, कवीने पुढील ओळ -'भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले' याचा वापर केलेला आहेच.
अर्थात हे माझे व्यक्तिगत मत झाले. कविवर्य कुसुमाग्रज यांनी त्यांच्या प्रतिभेतून केलेले विविध लिखाण आणि साहित्याचा खजिना हा आपल्याला लाभलेला अमुल्य ठेवा आहे.तो जपत त्यातील रत्ने पारखण्याचा प्रयत्न करणे
इतकेच आपल्या हाती आहे.
अर्थात आपल्या पैकी कोणास एखादा मुद्दा, जसा मला वाटला तसाच वाटला पाहिजे असे बिलकुल नाही. कारण प्रत्येकाची विचार पद्धत ही, स्वतंत्र व्यक्तीमत्वाची निशाणी आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे रसग्रहण भिन्न पातळीवर आणि भिन्न तऱ्हेने होणे देखील अपेक्षित असते. याचे एक उदाहरण म्हणजे, 'दुधावरची साय' या नावाची एक कविता इयत्ता दुसरी आणि एम. ए. (मराठी) स्पेशल या दोनी ठिकाणी एकच वेळी आभ्यासाला होती.त्यामुळे कविता समजणे आणि कविता भावणे, या दोन वेगळ्या गोष्टी असतात असे मला वाटते. तरीही एक मात्र आवर्जून सांगणे आहे, ते म्हणजे आपल्या सर्वांच्या प्रतिसादाने मन भारावून गेले. आपण दिलेल्या या पाठबळावरच पुढचा प्रवास होणार आहे.
अधिक काय लिहणार?