केल्याने भाषांतर - प्रवेशिका १ (साधना)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 20 February, 2011 - 23:21

मायबोली आयडी - साधना
पी जी वुडहाउस यांच्या 'द मॅन विथ टु लेफ्ट फिट' या कथासंग्रहातील 'अ‍ॅट गिसेनहेमर्स' या कथेचा अनुवाद.
--------

त्या दिवशी गिसेनहेमरला जाताना माझा मुड पार बिघडलेला. सगळ्याचा वीट आलेला, न्युयॉर्कचा, डान्सचा, जगण्याचा एकुण सगळ्याचा म्हणजे सगळ्याचाच. ब्रॉडवे लोकांनी फुललेला होता. रस्त्यावरुन गाड्या पळत होत्या. जगातले सगळे दिवे गोळा करुन इथे लावल्यासारखा लखलखाट रस्त्यावर पसरला होता. आणि मला हे सगळे आता नकोसे झाले होते.

गिसेनहेमर नेहमीसारखे भरलेले होते. एकही टेबल रिकामे नव्हते, डान्स्फ्लोअरही आताच भरुन ओसंडत होता. बँडवर गाणे वाजत होते

जावे वाटतसे परतुनी
जिथुनी मी आलो आहे
घुंद गंधित वा-याचे
गीत जिथे वाजत आहे

आता जर कोणी त्या गायकाला जबरदस्तीने गावी न्यायचा प्रयत्न केला असता तर त्याने निश्चितपणे पोलिसांना बोलावले असते, पण गाण्यात मात्र त्याने असा काही प्राण ओतला होता की खरेच त्याला गावी जायचेय असे वाटत होते. त्या गाण्यातच काहीतरी होते वाटते.

मी एखादे रिकामे टेबल दिसते का ते पाहात होते तोच एक माणुस मला पाहुन एकदम उठला आणि कित्येक वर्षांपुर्वी हरवलेली बहिण अचानक सापडल्यासारखा धावत माझ्याकडे आला, ' मिस रॉक्सबरो, हो ना?'

'हो, मग?' मी म्हटले.

'मला ओळखलं नाय?' मी अर्थातच ओळखले नव्हते.

'मी फेरिस'

'नाव चांगलेय, पण लक्षात नाही येत आहे.'

'गेल्या वेळेला आपली ओळख झालेली, एकत्र डान्सही केलेला.'

हे मात्र खरे होते. जर माझी याच्याशी कोणी ओळख करुन दिली असेल तर मी याच्याबरोबर डान्सही केला असणार. गिसेनहेमरमध्ये याचेच तर पैसे मिळतात मला.

'कधी?'

'गेल्या एप्रिलमध्ये.......'

हे गावचे लोक म्हणजे ना.... यांना वाटते हे इथुन गेले की न्यूयॉर्क शहराला कोल्डस्टोरेजमध्ये ठेवतात आणि हे आल्यावर परत बाहेर काढतात. फेरिसबरोबर घालवलेल्या त्या संध्याकाळनंतर पुन्हा आजपर्यंत माझ्या आयुष्यात मध्ये एकही दिवस उगवलाच नसेल अशी याची खात्री होती की काय देव जाणे!

'हो, आता आठवले, तू अल्गेरनॉन क्लॅरेन्स ना?'

'नाय नाय, अल्गेरनॉन क्लॅरेन्स नाय. माझे नाव चार्ली!'

'ओह, जरासे चुकलेच. मग कसे काय? आज परत डान्स करायचाय?'

अर्थात त्याला करायचा होता. आलिया भोगासी.... उद्या एखाद्या हत्तीने गिसेनहेमरमध्ये येऊन मला डान्स करायला बोलावले असते तरी मला त्याच्याबरोबर नाचावे लागले असते. आणि चार्ली काय एवढा वाईट नव्हता. उलट तो अगदी मन लावुन लक्ष देऊन डान्स करणा-यांपैकी होता - कॉरस्पाँडन्स कोर्सने डान्स शिकणा-यांसारखा.

मला वाटते त्या दिवशी कोणीतरी गावाकडचे भेटायचे माझ्या नशिबीच लिहिले होते. अजुनही कधीकधी एखादा दिवस असा उजाडतो जेव्हा गावाची अनिवार ओढ माझ्या रक्तात परत उसळ्या मारु लागते. आजही तसेच झाले. मी सकाळी उठुन खिडकीतुन डोकावले तर अचानक गावरान सुगंधाचा लोट अंगावर येऊन आदळला. त्या सुगंधाबरोबर मला गावातली कोंबड्या आणि डुकरे दिसु लागली. फिफ्थ अ‍ॅवेन्युवर गेले तर सगळीकडे फुलेच फुले. पार्कमध्ये गेले तर हिरवेकच्च ओले गवत, त्यात रुजुन आलेली उंच झाडे आणि ती वेडावुन टाकणारी धुंद हवा... नशीब एक पोलिस तिथे माझ्यावर एक डोळा ठेऊन होता, नाहीतर मी त्या गवतावर लोळून झाडांना मिठ्या मारत बसले असते!

आणि आता गिसेलहेमरमध्ये पाय ठेवताच ते गाणे......

चार्लीच्या जागी ब्रॉडवेवरचा एखादा फेमस स्टार माझ्याबरोबर असता तरी माझ्यावर तेवढा परिणाम झाला नसता. सकाळपासुन असले कोणीतरी भेटण्याचीच तयारी सुरू होती म्हणाना.

पण आयुष्यातले आनंद कायम टिकत नाही. गावातुन कधीमधी शहरात येणारा गावकरी भाऊ शहरी लोकांपेक्षा जास्त शहरी असतो हे मी विसरायला नको होते. आम्ही दोघेही अगदी विरुद्ध विचार करत होतो. मला या क्षणाला गावच्या गप्पा मारायच्या होत्या तर चार्लीला ब्रॉडवेवरच्या कोरसगर्ल्समध्ये रस होता. एकत्र नाचत असलो तरी मनाने मात्र आम्ही मैलभरतरी दुर होतो.

'ह्याल म्हणतात जिंदगी!'

माणसे जेव्हा हे उद्गार काढतात तेव्हा त्यामागे काहीतरी विचार असतो.

'तु इथे नेहमी येतेस?'

'हं, बहुतेक वेळा.'

मी तिथे दर संध्याकाळी येते आणि मला त्याचा पगारही मिळतो हे मी त्याला सांगितले नाही. गिसेनहेमरच्या व्यावसायिक डान्सर्सनी हे गुपित असे फोडायचे नसते. जर तुम्ही हे गुपित फोडलेत आणि नंतर लोकांनी तुम्हाला तिथे दररात्री होणारी लव-र्-ली सिल्वर कप नृत्यस्पर्धा जिंकताना पाहिले तर त्यांचा उगीचच गैरसमज होण्याची शक्यता आहे असे मॅनेजमेंटला वाटते. तो लव-र्-ली सिल्वर कप स्पर्धा म्हणजे मोठा जोक आहे. मी दर सोमवार-बुधवार-शुक्रवार ती स्पर्धा जिंकते आणि मेबल फ्रान्सिस दर मंगळवार-गुरुवार-शनिवार जिंकते. अर्थात, यात काहीच गैर नाहीय. स्पर्धा पुर्णपणे मेरीटवरच घेतली जाते. ती कोणीही जिंकु शकतो आणि दरवेळी मी किंवा मेबलच जिंकतो या योगायोगाचे मॅनेजमेंटला एवढे कानकोंडे वाटते की त्यामुळे आम्ही तिथे पगारदार डान्सर्स आहोत हे कोणाला कळू नये याची ते काळजी घेतात. आम्हाला कानकोंडे वाटलेले त्यांना चालते!

'एकदम हाय्क्लास जागा हाय,' चार्ली म्हणाला 'आख्खे न्युयॉर्कच एकदम हाय्क्लास हाय. इथे राहायला नशीब पायजे.'

'होक्का? मग तू इथेच का नाही राहात?'

'नशीब पाहिजे बाबा नशीब! तुला माहिताय आमचा म्हातारा आता वर गेला. मला दुकानाकडे बघावं लागतं.......'

ही जणु ब्रेकींग न्युज होती या थाटात तो बोलला.

'दुकान हातात घेतल्यापास्नं मी लै बिजी झालो. लग्नही झाले आता माहिताय?'

'अस्सं का? अरे वा! मग तु इथे असा एकटा काय करतोयस? बायकोला तिकडे हिक्स कॉर्नरला 'मोहे भुल गये सावरीया' गाण्यासाठी सोडुन आलास की काय?'

'हिक्स कॉर्नर नाय काय, माझे गाव अ‍ॅशले, मेनमध्ये. बायकोचे गाव रॉडनी.... सॉरी, तुझ्या पायावर पाय पडला....'

'असुदे,' मी म्हटले, 'माझीच स्टेप चुकली. पण मी म्हणते बायकोला असे तिकडे टाकुन इथे एकट्याने येऊन मजा करायला तुला काही वाटते का?'

'पर मी कुठे तिला सोडुन आलोय? तीपण आलीय.'

'कुठे? इथे? न्युयॉर्कमध्ये?'

'इथेच या हॉटेलात. ती काय तिथे वर बसलीय....'

मी वर बाल्कनीत पाहिले. वरच्या लाल गुबगुबीत रेलिंगवरून एक चेहरा खाली पाहात होता. कसल्यातरी दु:खाची सावली पडल्यासारखा काळवंडलेला चेहरा... मगाशीच माझे लक्ष तिथे गेले होते आणि या चेह-याला कसले दु:ख असेल बरे हा विचार मनात आलेला. आता समजले.

'मग तिच्याबरोबर का नाही नाचत? तिला पण जरा मजा करु दे ना...'

'ती मजाच करतीय...'

'तसे दिसत तरी नाहीये, तिच्याकडे बघुन वाटतेय की तिलाही इथे यायचेय.'

'तिला नाय जमत नाचायला.'

'अ‍ॅशले मध्ये तुम्ही नाचत नाही काय?'

'तसे जमते, पण ते गावठी. अ‍ॅशलेसाठी ठिक आहे, इथले थोडेच जमणार?'

'अस्सं.... तुला जमते?'

'मग?! मी काय पहिल्यांदा आलोय इथे?' त्याने मान उडवली.

त्याच्या कानाखाली सणसणीत आवाज काढावा अशी जबरदस्त इच्छा मला होत होती. चार लोकांसमोर आपल्या बायकोबरोबर नाचायला त्याला लाज वाटत होती. म्हणुन त्याने तिला एक खुर्चीत बसवले, हातात लेमोनेड दिले आणि गप्प बसायला सांगुन तो इथे मजा मारत होता. त्या क्षणी माझ्या मनात त्याच्यासाठी काय विचार येताहेत ते त्याला जर कळले असते तर आत्मसंरक्षणासाठी त्याने नक्कीच पोलिसांना बोलावले असते.

बँडने आता गाणे बदलले.

''ह्याला म्हणतात जिंदगी!.... चल ना आता हा नाच करुया.'

'आता कोणा दुस-याला करु दे हा नाच. मी जरा दमलेय. थांब, माझ्या मैत्रिणींशी तुझी ओळख करुन देते.' असे म्हणुन मी त्याला माझ्या ओळखीच्या मुलींच्या टेबलाकडे घेऊन गेले.

'हा चार्ली बरं का मैत्रिणींनो, ह्याला डान्समधल्या काही सुंदर स्टेप्स येतात, तुम्हाला तो करुन दाखवेल. त्यातल्या बहुतेक तो तुमच्या पायावरच करतो ही गोष्ट वेगळी!

आता ह्यावर चार्ली काय म्हणेल यावर हजाराची पैज लावायला तयार आहे. काय म्हणाला असेल तो? 'ह्याला म्हणतात जिंदगी!....

मी त्याला तिथेच सोडले आणि वर गेले.

लाल नरम आवरणाने सजवलेल्या रेलिंगवर रेलुन ती खाली डान्सफ्लोअरकडे पाहात होती. नुकतेच नवीन गाणे सुरू झाले होते आणि तिचा प्रिय नवरा माझ्या एका मैत्रिणीबरोबर नाचायचा प्रयत्न करत होता. ती गावाहुन आलीय हे वेगळे सांगावे लागत नव्हतेच. एका दृष्टीक्षेपातच ते कळत होते. साधेसुधे कपडे घातलेली ती इवलीशी एक मुर्ती होती.

मी तिच्या आजुबाजुला जरा घुटमळले. माझ्या बाबतीत असे घुटमळत राहण्याचे प्रसंग फारसे येतच नाही, मी कुठल्याही गोष्टीत धडाक्याने उडी मारते. पण आज का कोण जाणे, मला थोडे अवघडल्यासारखे वाटत होते.

शेवटी हिंमत करुन मी तिच्या बाजुच्या रिकाम्या खुर्चीत बसले.

'तुझी हरकत नसली तर मी इथे बसते.'

तिने एकदम चपापुन मागे वळुन पाहिले. मी कोण, इथे का आलेय इत्यादी प्रश्न तिच्या नजरेत दिसत होते पण त्याच वेळी शहरात कदाचित अशीच पद्धत असेल असे वाटुन ती गोंधळल्यासारखी दिसत होती.

'मी आत्ताच तुझ्या नव-याबरोबर डान्स करत होते.' वातावरण जरा सैल व्हावे म्हणुन मी बोलले.

'हो, मी पाहिले तुम्हाला.'

हरिणीसारखे मोठे आणि निरागस डोळे माझ्यावर रोखुन ती पाहात होती. तिच्या त्या डोळ्यांकडे पाहुन मला वाटले की काहीतरी जड घेऊन ते तिच्या नव-याच्या डोक्यात त्या रेलिंगवरुन टाकले तर कदाचित मला थोडेफार बरे वाटेलही पण मॅनेजमेंटला मात्र हे फारसे आवडणार नाही. कोणत्याही क्षणी रडू फुटेल असा तिचा चेहरा झालेला. अगदी गरीब गाय बिचारी!!!

तिने नजर वळवली आणि जवळच्या इलेक्ट्रिक वायरला बोटाभोवती गुंडाळू लागली. मग तिने टेबलावर पडलेली तिची हॅटपिन उचलली आणि रेलिंगच्या आवरणाला त्याने कुरतडु लागली.

'काय प्रॉब्लेम आहे ते सांगणार का?'

'म्हणजे?'

'तुला माहित आहे मी काय म्हणतेय ते. सांग तुला काय त्रास आहे तो.'

'मी तुम्हाला ओळखतही नाही.'

'आपले दु;ख सांगायला समोरचा ओळखीचाच लागतो असे काही नाही. मी कित्येकदा माझे दु:ख माझ्या मांजरीला सांगते. आता उन्हाळा तोंडावर आला असताना तु गाव सोडुन इकडे कशाला आलीस?'

ती एकदम गप्पच बसली पण तिच्या चेह-यावरुन ती काहीतरी सांगायची तयारी करतेय याची मला खात्री पटली. समोरची जरी अनोळखी असली तरी मनातले बोलुन टाकल्याने आपल्याला बरे वाटेल असे तिला एकंदर वाटत होते.

'आम्ही इथे हनिमुनला आलोय. चार्लीला इथे यायचे होते, मला अज्जिबात नको होते. पण तो इथे एकदा येऊन गेलाय ना...'

'ह्म्म.. तो बोलला मला'

'चार्लीला न्युयॉर्कचे खुप वेड आहे.'

'आणि तुला नाही!'

'मला नाय आवडत.'

'का?'

ती त्या लाल आवरणाला कुरतडुन आतला कापुस काढुन खाली टाकत होती. मला सगळे सांगायचेच असा निर्धार तिच्या चेह-यावर झळकत होता. जेव्हा आपली सहनशक्ती अगदी संपुष्टात येते तेव्हा अशीही एक वेळ येते की समोर कोणीही असो, मनातली सगळी तगमग त्याच्यासमोर ओकुन टाकाविशी वाटते.

'मला न्युयॉर्कचाच तिरस्कार आहे,' ती आता एकदम भराभर बोलायला लागली, 'मला खुप भीती वाटते. चार्लीने मला इथे आणायलाच नको होते. मला यायचेच नव्हते. काय होणार हे मला आधीच माहित होते.'

'काय होणार असे तुला वाटते, हं?'

उत्तर देण्याआधी तिने खोदुन खोदुन कमीतकमी इंचभर खड्डा त्या रेलिंगच्या पाडला होता. नशीब तेव्हा जिमी, बाल्कनीतला वेटर, तिथे नव्हता. त्या लाल रेलिंगवर त्याचा भारी जीव होता. जणु स्वतःच विकत आणलीय अशा त-हेने तो ती जपायचा.

'दोन वर्षांपुर्वी आम्ही रॉडनीला राहायला गेलो - आम्ही आधी इलिनॉयला राहात होतो, तिथुन रॉडनीला गेलो - गावात एकजण आहे जॅक टायसन म्हणुन. तो एकटाच राहतो. कोणात कधी मिसळत पण नाही. मला एकाने त्याच्याबद्दल सांगितलेले पण नीटसे कळले नव्हते. आता त्याचा अर्थ लागतोय. टायसनने तिथल्याच एका मुलीशी लग्न केले. आमच्यासारखेच तेही दोघे हनिमुनसाठी इथे आले. आणि मला वाटतं इथे आल्यावर तिला न्युयॉर्कची बाधा झाली. ती इथल्या लोकांशी टायसनची तुलना करायला लागली आणि या शहराशी रॉडनीची. परत गेल्यावर तिला तिथे अजिबातच करमेनासे झाले.

'मग?'

'काही दिवसांनी ती गायब झाली, इथेच आली असणार परत, अजुन कुठे जाणार?'

'त्याने घटस्फोट घेतला असेल ना?'

'नाहीना, उलट त्याला वाटते की एक दिवस ती परतेल म्हणुन!'

'काय? त्याला अजुनही वाटते ती परतेल म्हणुन?' मी चकित होऊन म्हणाले, ' तीन वर्षे झाली तिला जाऊन!'

'हो, त्याने अजुनही तिच्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा ठेवल्यात, ती जाताना जशा होत्या अगदी तश्शाच...'

'पण त्याला तिचा संताप नाही आला? मी जर पुरूष असते आणि कोणी मुलगी असे वागली असती माझ्याशी आणि वर परतुन आली असती तर... तर मी नक्कीच तिचा खुन केला असता.'

'तो नाही करणार... मीही केला नसता, जर असे.. असे काही माझ्या बाबतीत घडते तर... मीही आशेने वाट पाहात राहिले असते. आणि दररोज ट्रेन यायच्या वेळी स्टेशनवर गेले असते..... टायसन सारखे............'

टेबलावर काहीतरी सांडले वाटते....किती जोरात दचकले मी....

'अरे देवा, पण तु कशाला त्रास करुन घेतेयस? जे घडले ते वाईट घडले पण तु कशाला दु:खी होतेयस?'

'कारण आता तेच माझ्या बाबतीत घडतेय...'

'अशी रडु नकोस.'

'मग काय करु मी? मला माहित होतं की हेच होणार..... आणि आता अगदी तेच होतंय. बघा..बघा त्याच्याकडे बघा तरी एकदा!!'

मी रेलिंगवरुन खाली एक दृष्टीक्षेप टाकला. चार्ली अजुनही डान्सफ्लोअरवर होता आणि जणु काय परत कधीही डान्स करायला मिळणार नाही अस नाचत होता. नाचतानाचता तो त्याच्या पार्टनरच्या कानात काहीतरी कुजबुजला. इथे अजिबात ऐकु येत नव्हते पण ते नक्कीच ''याला म्हणतात जिंदगी!.... " हेच ब्रम्हवाक्य असणार! मी जर त्या मुलीच्या जागी असते तर मलाही तिच्यासारखेच रडु आले असते. चार्ली न्युयॉर्कग्रस्त झाल्याच्या खुणा अगदी ठळकपणे उठुन दिसत होत्या.

'''मी इथल्या मुलींसारखी नाsये, मी स्मार्ट नाsये.. मला स्मार्ट बनायचे पण नाय. मला माझ्या संसारात सुखाने राहायचेय. इथे आलो तर हेच होणार मला माहित होते. त्याला वाटते मी त्याच्या लायकीची नाsये. त्याच्या नजरेतुन मी उतरलेय.'

'स्वतःला संभाळ जरा.'

'आणि माझा त्याच्यावर इतका जीव........'

काय बोलावे ते मला सुचत नव्हते. तेवढ्यात संगीत थांबले आणि एक घोषणा ऐकु यायला लागली.

'लेडिज्ज्ज आणि जॅटलमेन, आता आमची ग्रेट नंबर स्पर्धा सुरू होत आहे. ही एक खरीखुरी स्पर्धा आहे......'

इजी बेअरमॅन त्या रात्रीच्या लव-र-ली सिल्वर कपची घोषणा करत होता. मला खाली जाणे भाग होते. घोषणा करताना त्याची नजर चौफेर मलाच शोधत होती. एक दिवस मी आणि मेबल - आम्हा दोघींपैकी कोणीच येणार नाही आणि हॉटेलमधले कोणीतरी गि-हाईक लव-र्-ली सिल्वर कप घेऊन जाईल अशी भीती मॅनेजमेंटला कायम वाटायची.

'मला आता जावे लागणार,' मी म्हणाले,' मला याच्यात भाग घ्यायचाय.'

आणि अचानक माझ्या डोक्यात ती ग्रेट कल्पना आली. मी एकवार मुक अश्रु ढाळणा-या त्या मुलीकडे पाहिले, मग खाली बसलेल्या तिच्या नव-याकडे - चार्ली द ग्रेटकडे पाहिले आणि जगातील थोर विचारवंत मंडळीमध्ये सामिल होण्याची एक सुवर्णसंधी माझ्या समोर आलीय हे मी ओळखले.

'चल लवकर,' मी म्हणाले,' ते रडु थांबव, तोंड धू आणि खाली चल. तु पण या नाचाच्या स्पर्धेत भाग घेतेयस.'

'पण चार्ली माझ्याबरोबर डान्स करणार नाही. त्याच्या मते मला नाचता येत नाही.'

'माझे आई, तुझ्या कदाचित लक्षात आले नसेल पण न्युयॉर्कमध्ये आणि ह्या हॉटेलमध्येही चार्ली सोडुन इतर पुरूषही आहेत. चार्लीबरोबर मी नाच करेन आणि माझ्या ओळखीच्या एकाला तुझ्याबरोबर नाचायला सांगेन. तो तुला व्यवस्थित गाईड करेल.

'जोडीतल्या प्रत्येक लेडीजला -- ' इज्जी नेहमीसारखे अडखळत बोलत होता, 'नंबरवाले एक तिकीट मिळेल. डान्स सुरू होईल आणि मग जसजसे जजेस नंबर पुकारतील तशी एकेक जोडी बाद होत जाईल. शेवटपर्यंत जो नंबर उरेल ती जोडी जिंकेल. तुमचे डान्सिंग स्किल दाखवायची ही संधी आहे, सगळ्यात बेस्ट डान्सर जिंकेल (इज्जी वयाच्या ६ व्या वर्षापासुनच अस्खलित खोटे बोलायला लागला होता). आता जोडीतल्या प्रत्येक लेडिजने इथे येऊन आपला नंबर घ्यावा. शेवटपर्यंत स्टेजवर असलेली जोडी (मी कुठे गडपले हे मोठ्ठे प्रश्नचिन्ह तोंडावर घेऊन इज्जी आता अगदी अस्वस्थ होऊन सगळीकडे पाहात होता) आमचा आज रात्रीचा मॅनेजमेंट पुरस्कृत लव-र्-ली सिल्वर कप जिंकेल. लेडिज स्त्रियांनी कृपया इथे येऊन आपापले नंबर्स घेऊन जावे.

'चल,' मी मिसेस चार्लीकडे वळुन म्हणाले,' तुला लव-र-ली सिल्वर कप जिंकायचा नाहीये काय?'

'पण मला नाही जमणार...'

'कदाचित आजचा दिवस तुझा लकी दिवस असेल'

'पण...... तुम्ही ऐकले नाही काय? जिंकायला चांगला नाच यायला पाहिजे.'

'मग कर ना चांगला नाच... ' मला तिला गदगदा हलवावेसे वाटत होते,' जरा जागी हो. नवरा परत मिळवण्यासाठी तु काहीच प्रयत्न करणार नाहीस काय? तु जर जिंकलीस तर काय काय होईल त्याचा विचार कर. तो आयुष्यभर तुझी पूजा करेल पूजा. त्याने कधी न्युयॉर्क हे नाव जरी घेतले तरी तु म्हणशील, ' न्युयॉर्क? तेच ना जिथे मी लव-र-ली सिल्वर कप स्पर्धा जिंकली होती, हो ना?' तो खल्लास. जरा धीर गोळा कर आणि प्रयत्न कर.'

तिच्या भु-या डोळ्यांमध्ये चमक आली. 'मी प्रयत्न करते,' ती म्हणाली.

'आता कसे? तु जरा फ्रेश हो आणि खाली ये. मी तोवर आपल्यासाठी तिकिटे घेते.'

मला बघुन इज्जीचा जीव भांड्यात पडला. ' मला वाटले तु पळुन गेलीस नाहीतर आजारी वगैरे पडलीस की काय? हे घे तुझे तिकिट.'

'मला दोन हवीत. माझी एक मैत्रिणही यात भाग घेतेय. इज्जी माझे एक काम करशील? तिला शेवटच्या दोन जोड्यांपर्यंत स्टेजवर राहु देशिल? ती गावातुन आलीय ना... म्हणुन जरा आकर्षण आहे ह्या स्पर्धेचे.

'नो प्रॉब्लेम. ही घे तिकीटे. तुझा छत्तिस नंबर आणि तिचा दहा. ' मग आवाज बारिक करुन तो म्हणाला,' मिक्स करु नकोस हा.. लक्षात ठेव तुझा नंबर.'

तिकिटे घेऊन मी परत बाल्कनीत गेले. वाटेत चार्ली भेटला.

'आपण दोघे यात भाग घेतोय.' मी म्हटले. तो तोंड भरुन हसला.

वर मिसेस चार्ली फ्रेश होऊन बसली होती. थोड्या वेळापुर्वी ती रडत होती याची कुठलीच खुण तिच्या चेह-यावर नव्ह्ती. अशी मुलगी पाहिजे!

'चल, हे तिकीट जपुन ठेव आणि मस्त डान्स कर.'

गिसेनहेमरचा हा रोज रात्रीचा सोहळा तुम्ही पाहिला असेलच. आणि समजा गिसेनहेमरचा नसेल पाहिला तर दुस-या कुठल्यातरी हॉटेलचा पाहिला असेल. सगळे सारखेच असतात. काहीच फरक नाही.

स्पर्धा सुरु झाली तेव्हा डान्सफ्लोअरवर इतके लोक होते की पायही हलवायला जागा नव्हती. आणि म्हणे जगातले आशावादी लोक कमी होताहेत! तिथला प्रत्येकजण अशा आवेशाने नाचत होता की जणु लव-र्-ली सिल्वर कप हॉलमध्ये ठेवायचा की बेडरुममध्ये हे सुद्धा त्यांचे ठरवुन झाले होते. मी तरी इतके आशावादी लोक इतर कुठे पाहिले नाहीत.

तेवढ्यात इज्जीला कंठ फुटला. त्याने थोडे विनोदी बोलावे अशी मॅनेजमेंटची अपेक्षा असते म्हणुन इज्जी त्याला जमेल तितका प्रयत्न करत असतो.

'नंबर ७, ११ आणि २१, तुमचे मित्र तुम्हाला मिस करताहेत.' आता जरासे हातपाय हलवण्याइतपत जागा झाली. बँड परत सुरू झाला.

काही मिनिटांनी, परत इज्जी, ' नंबर १३, १६ आणि १७, बाय बाय!'

आम्ही परत सुरू केले.

नंबर १२, तुम्हाला परत पाठवताना आम्हाला वाईट वाटतेय, पण.......'

लाल हॅट घातलेली एक जाडी मुलगी लहान मुलांची गंमत करण्यासाठी नाचतात तसे नाचत होती. तिचा नंबर १२ होता.

'नंबर ६, १५ आणि २०, बॅड लक!'

आणि लवकरच डान्सफ्लोअरवर मी व चार्ली, मिसेस चार्ली व मी ओळख करुन दिलेला तिचा पार्टनर आणि एक तरुण मुलगी व तिचा टकलु पार्टनर एवढेच लोक राहिले. त्या माणसाला मी संध्याकाळपासुन डान्सफ्लोअरवर पाहात होते. वर बाल्कनीतुन त्याचे डोके उकडलेल्या अंड्यासारखे दिसलेले.

तो ब-यापैकी नाचत होता. नेहमी सारखे असते तर तो जिंकावा असेच मला वाटले असते. पण आजची गोष्ट निराळी होती.

'नंबर १९, तुम्ही खुप दमलात. आता क्षणभर विश्रांती घ्या!'

आता आम्ही दोनच जोड्या फ्लोअरवर राहिलो. आम्हा दोन जोड्यांमध्ये थेट स्पर्धा! मला सॉल्लीड टेंशन आले असेल असे तुम्हाला वाटले असेल ना? पण तसे काही नव्हते.

मी आधीच म्हटलेय तसे चार्लीला नाच अजिबात जमत नव्हता. त्याचे सगळे लक्ष त्याच्या स्टेप्सकडे लागले होते. तो जिथे नाच शिकलेला तिथे एका वेळी एकापेक्षा जास्त गोष्टींवर लक्ष द्यायला बहुतेक शिकवलेले नव्हते. नाचताना आजुबाजुलाही पाहावे इतपत प्रगती त्याने अजुन केली नव्हती. त्यामुळे अर्थातच चार्लीला आजुबाजुला काय चाललेय याची गंधवार्ताही नव्हती. नाचताना त्याचे डोळे जमिनीला त्याच्या स्टेप्स पाहात खिळले होते. आजुबाजुची बरीचशी गर्दी कमी झालीय आणि आता अ‍ॅशलेची इज्जत केवळ त्याच्याच हातात होती एवढेच त्याला माहित होते.

असल्या स्पर्धांमध्ये शेवटाच्या जोड्या उरल्या की लोक कसे लक्ष देऊ लागतात ते तुम्ही पाहिलेच आहे. मी सुद्धा कधीकधी शेवट जवळ आला की वस्तुस्थिती विसरते आणि ख-या स्पर्धेत भाग घेतल्यासारखी एकदम चार्ज होऊन नाचायला लागते. वातावरण एकदम भारल्यासारखे होते आणि आपण गिरकी घेऊन जायला लागलो की लोक टाळ्यांचा कडकडाट करतात. अंदरकी बात काय आहे ते माहित नसेल तर तुमचीही छाती धडधडायला लागेल.

त्या संध्याकाळचे स्टार्स मात्र आम्ही दोघे नव्हतो हे माझा सरावलेल्या कानांनी कधीच टिपले होते. आम्ही दोघे गिरकी घेऊन गेलो की शांतता असायची पण मिसेस चार्ली आणि तिचा पार्टनर कॉर्नरला गेले की मात्र टाळ्यांचा कडकडाट होत होता. त्या मुलीने खरेच जिंकले होते लोकांना.

मी तिच्याकडे एक नजर टाकली आणि पाहात राहिले. वर बसलेल्या रडतराऊत मुलीची जागा आता एक वेगळ्याच मुलीने घेतली होती. एवढे आनंदी मी कधी कोणाला पाहिले नव्हते. तिचे डोळे चमकत होते, गाल लाल झाले होते आणि एखाद्या चॅम्पियनसारखी ती नाचत होती. तिच्यात लोकांनी काय पाहिले ते अचानक माझ्या लक्षात आले. तिच्यात एक प्रकारचा गावरान ताजेपणा होता. तिला पाहताच गावाची आठवण येत होती. शहरात राहणारे लोक पण कसे विचित्र असतात ना... ते न्युयॉर्कची तारिफ करतील, ब्रॉडवेशिवाय जगणे अशक्य म्हणतील, अजुनही बरीच बडबड करतील. पण मला वाटते त्यांचे सगळे लक्ष ते सुट्टीत गावी जाऊन जे दोन-तिन आठवडे काढणार असतात त्त्याकडे लागलेले असते. लोक मिसेस चार्लीला उगीचच चिअर करत नव्हते. तिच्याकडे पाहुन त्यांना येणारी सुट्टी आठवत होती. गावी फार्मवर जायचे, तिथल्या पद्धतीचे खायचे, प्यायचे, गाईंनाही नावाने हाका मारायच्या...

निदान मला तरी तसे वाटत होते. आज अख्खा दिवस गावच्या आठवणी येत होत्या आणि आता तर कढ अनावर व्हायला लागले होते.

मी अजुन वाहात गेले असते पण लवकरच भानावर आले. डान्स कॉम्पिटिशन हा माझ्या नोकरीचा भाग होता.

'जरा अजुन चांगले कर,' मी चार्लीला म्हटले, 'आपण मागे पडतोय बहुतेक'

'हं.. हं..' त्याचे लक्ष फक्त नाचात होते.

'तुझ्या एक्स्पर्ट स्टेप्स कर ना, आपल्याला गरज आहे आता.'

आणि चार्लीने खरेच दोनचार खुप चांगल्या स्टेप्स घेतल्या.

डोळ्याच्या कोप-यातुन मी इज्जीकडे पाहिजे. तो अगदी गलितगात्र झाला होता. एक अतिशय कठिण निर्णय द्यायची जबाबदारी त्या बिचा-याच्या गळ्यात येऊन पडली होती. असा निर्णय, जो दिल्यावर भडकलेल्या प्रेक्षकांपासुन स्वतःला वाचवण्यासाठी पंचाला मैदानातुन पळ काढावा लागतो. मधुन मधुन त्याच्यावर असले प्रसंग यायचे आणि त्यामुळेच ही नोकरी त्याच्यासाठी तितकीशी सोपी नव्हती. एकदा मेबल सांगत होती की स्पर्धेचा निकाल जाहिर केल्यावर असे वाटले की आता जणु दंगलच सुरू होणार. आजही तसेच काहीतरी होईल ही भीती त्याच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होती. प्रेक्षकांची मते कोणाला होती हे अगदी स्पष्ट दिसत होते. मिसेस चार्ली जिंकणार याच शंकाच नव्हती. मी आणि चार्ली केवळ आहोत म्हणुन होतो.

अर्थातच इज्जीचाही नाईलाज होता. तो ह्या कामासाठी रितसर पगार मोजुन घेत होता. त्याने सुकलेल्या ओठांवरुन एकदा जीभ फिरवली, तशीच वेळ आली तर पळायची सोय आहे ना हे एकवार पाहुन घेतले, दोनदा आंवढे गिळले आणि घोग-या आवाजात म्हणाला,' नंबर १०, प्लिज स्टेजवरुन खाली या.'

मी झटकन थांबले. 'चल,' मी चार्लीला म्हटले, 'आपण जायचे आता.'

आणि टाळ्यांच्या कडकडाटात आम्ही स्टेजवरुन खाली आलो.

'हम्म..,' चार्लीने रुमाल काढला आणि घामाने थबथबलेले कपाळ पुसू लागला,' आपण तसे खुप छान नाचलो, हो ना? एवढे काही वाईट नव्हते माझ्या मते.' बोलताबोलता तो वर बघायला लागला, त्याची प्रिय बायको तिथे उभी राहुन डोळ्यांनी त्याची आरती ओवाळतेय असाच त्याचा समज असणार बहुधा. पण वर शोधत असतानाच अचानक त्याला ती समोर दिसली, त्याच्या अपेक्षेपेक्षा एक मजला खाली, चक्क डान्स फ्लोअरवर.

आणि ती काही आरती वगैरे ओवाळत नव्हती. मुळात तिचे त्याच्याकडे लक्षही नव्हते.

ती विजयाच्या धुंदीत होती. ती आणि तिचा पार्टनर अजुन थोडा वेळ नाचत होते. गिसेनहेमरमध्ये ही नेहमीचीच पद्धत आहे. जिंकणारी जोडी अजुन थोडा वेळ आपले स्किल दाखवते आणि मग स्टेजवरुन खाली येते. त्या दिवशी ती जोडी थांबल्यावर लोकांनी एवढा जल्लोश केला की जणु सगळ्यांनीच तिच्यावर पैज लावलेली.

सगळे लक्षात आल्यावर चार्ली अवाक होऊन पाहात राहिला.

'पण...पण... पण...' तो अडखळला.

'मला कळतंय,' मी म्हणाले,' ती चांगल्यापैकी नाच करु शकते. ती खुप हुशार निघाली. तु तिच्याबरोबरच नाचायला पाहिजे होते.'

'मी...मी..मी....'

'तु आधी खाली बस आणि काहीतरी थंड पी.' मी म्हणाले,' तुला थोडे बरे वाटेल.'

माझ्यामागुन कसातरी हेलपाटत तो एका टेबलावर येऊन बसला. चेह-यावर बारा वाजले होते. त्याचे जीवाचे न्युयॉर्क करुन झाले होते.

मी चार्लीची व्यवस्था लावण्यात इतकी गुंग झालेले, त्या क्षणी त्याला पाण्याची आणि भरपुर ऑक्सिजनची नितांत गरज होती, की मी इज्जीवर ह्या घटनेचा काय परिणाम झाला असावा हेही पाहायला विसरुन गेले.

आयुष्यभर लाडाने वाढवलेल्या आणि म्हातारपणाची काठी म्हणुन सगळीकडे मिरवलेल्या लेकाने जर अचानक बापाला घराबाहेर हाकलुन दार लावून घेतले तर त्या बापाची जी अवस्था होईल तीच अवस्था इज्जीची झाली होती. तो माझ्याकडे डोळे फाडुन बघत होता आणि मध्येच हातवारे करुन मोठ्याने बडबडत होता. आता तो त्याच्यासमोर नसलेल्या माझ्याशी बोलत होता की मॅनेजमेंटला 'आज लव-र्-ली कप हॉटेलमधली एक ग्राहक जिंकली' ही गोड बातमी कशी सांगावी ह्याची रंगित तालीम करत होता हे तोच जाणे! जे काय असेल ते तो अगदी तावातावाने मांडत होता हे मात्र नक्की!

मी त्याच्याकडे पाहुन 'येतेच आता थोड्या वेळात' अशा अर्थाने मान हलवली आणि परत चार्लीकडे वळले. तो आता बराच सावरला होता.

'ती कप जिंकली.' तो अशा त-हेने म्हणाला जणु या सत्यघटनेत काही बदल करणे माझ्या हातात होते.

'हो, ती कप जिंकली.'

'पण - तु-तुला काय वाटते आता काय होईल?'

हीच अगदी योग्य अशी वेळ होती. लोखंड गरम होते, घण घालायलाच हवा आता...

'मी सांगते मला काय वाटते,' मी म्हटले,' शहाणा असशील तर तिच्यावर न्युयॉर्कचे भुत स्वार होण्याच्या आत इथुन निघ आणि परत जा अ‍ॅशले का काय जिथे तु लोकांना औषधांच्या नावाखाली काहीही खपवतोस त्या गावी. मी वर तिच्याशी बोलत होते तेव्हा ती तिच्या गावातल्या एकाबद्दल बोलत होती. तुझ्या बाबतीतही तसे झाले तर?'

त्याला प्रचंड धक्का बसला, 'काय? तिने तुला जॅक टायसनबद्दल सांगितले?'

'हो हो जॅक टायसनच म्हणालेली ती. त्यानेही बायकोला न्युयॉर्कमध्ये मोकळे सोडुन दिले आणि मग बसला भोगत आपल्या कर्माची फळे. तुला असे नाही वाटत की तिच्या मनातही असेच काहीतरी बेत असणार आणि म्हणुन तिला तो आठवला?'

चार्ली अगदी पांढराफटक पडला. 'तुला खरंच वाटतं ती असे काहीतरी करेल?'

'हम्म. आता मी कसे सांगु? पण ती सतत टायसन आणि त्याच्या बायकोबद्दलच बोलत होती. आता तिला त्याच्याबद्दल थोडे वाईट वाटत होते जरुर, पण तिच्या मते जे झाले ते योग्यच होते. अशा परिस्थितीत असे घडणे स्वाभाविकच होते. ती खुप विचार करत होती बाबा ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल.'

चार्ली खुर्चीतल्या खुर्चीत थरथर कापु लागला, त्याला घाम फुटला. थरथरत्या हातांनी टेबलावरचा रिकामा ग्लास उचलुन त्याने तोंडाला लावला आणि चक्क ग्लासभर पाणी प्यायल्यासारखा ग्लास वर केला. त्याच्या एकुण आविर्भावावरुन तो मुळापासुन हादरलाय हे लक्षात येत होते. तोंडावर आणलेले शहरीपणाचे उसने सोंग पार उतरुन गेले होते. मुळात आता तो आयुष्यात कधीही शहराचे नाव काढणार नाही असे दिसत होते.

'मी उद्याच तिला घरी घेऊन जातो,' तो पुटपुटला,' पण ती येईल ना माझ्याबरोबर?'

'आता ते तुझ्यावर आहे. तु जर तिचे मन वळवु शकलास तर.... ती आलीच बघ. मी निघते आता.'

कप हातात घेऊन मिसेस चार्ली आमच्या टेबलाकडे आली. ती चार्लीला काय बोलते याची मला जाम उत्सुकता लागली. अर्थात चार्ली तिच्या जागी असता तर तो 'ह्याला म्हणतात जिंदगी!' शिवाय दुसरे काही बोलू शकला नसता. पण मला तिच्या तोंडुन जरा मसालेदार काहीतरी ऐकायचे होते. मी तिच्या जागी असते तर त्याक्षणी मला कमीतकमी दहा वाक्ये तरी सुचली असती आणि तीही एकापेक्षा एक झणझणीत, बोचणारी.

ती खुर्चीत बसली, कप बाजुला ठेवला आणि क्षणभर कपकडे बघत राहिली. मग तिने एक लांब श्वास सोडला आणि ती चार्लीकडे वळली.

'ऑह चार्ली, मी तुझ्याबरोबर नाचायला हवे होते.'

एवढे चांगले वाक्य मला नक्कीच सुचले नसते.

मी येणा-या धोक्याची एवढी मोठी सुचना दिल्यामुळे चार्लीने जराही विलंब न लावता सुरवात केली. 'डार्लिंग, तु खरंच चमत्कार केलास आज. घरच्यांना काय वाटेल ना हे पाहुन?' तो क्षणभर थांबला, बोलावे की न बोलावे त्याला क्षणभर सुचेना, पण लगेच धीर धरून त्याने वाक्य तसेच पुढे रेटले, 'मेरी, आपण उद्या सकाळची पहिली गाडी पकडुन घरी जाऊया? घरच्यांना कप पाहायला खुप आवडेल ना?'

'खरेच?' ती म्हणाली.

बंद अंधा-या खोलीत लाईटचे बटन दाबल्यासारखा चार्लीचा चेहरा उजळला.

'तु येशील? तुला इथे राहायचे नाय ना ? तुला न्युयॉर्कमध्ये जराही रस नाय ना?'

'आताच एखादी ट्रेन असती तर, ' ती समाधानाने म्हणाली, ' मी आताच गेले असते गावी. पण मला वाटले तुला इथे अजुन राहायचेय.'

'छे छे, बकवास, मी तर परत कधी इथे येणार देखिल नाय.' त्याने अंग शहारल्याचा अभिनय केला.

'मी निघते तर आता,' मी उठत म्हणाले, ' माझा मित्र मला हाक मारतोय बहुतेक.'

इज्जी कधीपासुन भुवया वेड्यावाकड्या उडवत मला खुणावत होता. मी त्याच्याकडे जाऊन उभी राहिले.

तसा इज्जी आधीपासुनच तोतरा होता. बिचा-याच्या स्वरयंत्रात काहीतरी दोष होता त्यामुळे त्याला सलग बोलता येत नसे. ब-याच दिवसांपुर्वी गिसेनहेमरमध्ये एक आफ्रिका रिटर्न भटक्या यायचा. जेव्हा तो आफ्रिकेत भटकत नसे तेव्हा तो कधीमधी इकडे हॉटेलात येत असे. त्याने मला एकदा एका आफ्रिकन जमातीबद्दल सांगितलेले. ह्या जमातीला बोलता येत नाही. गळ्यातुन चित्रविचित्र आवाज काढुन ते एकमेकांशी संपर्क साधतात. मला खुष करण्यासाठी त्या भटक्याने ते आवाज काढुन दाखवलेले. आता इज्जीच्याही गळ्यातुन थेट तसेच आवाज येत होते. फक्त तो ते मला खुष करण्यासाठी काढत नव्हता.

इज्जीचे ते आवाज एका जागी अडकलेल्या ग्रामोफोन रेकॉर्डच्या पिन प्रमाणे ऐकु येत होते.

'शांत हो, इसाडोर,' मी म्हणाले, 'तुला कसला त्रास होतोय ते मला सांग. मी कदाचित तुला मदत करू शकेन.'

त्याच्या गळ्यातुन अजुन थोडे चमत्कारीक आवाज निघाले आणि शेवटी एकदाचे शब्द बाहेर पडले.

'तु वेडी झालीस काय? का केलेस तु हे सगळे?तु तिकिटे घ्यायला आलीस तेव्हा मी तुला सांगितले होते ना? मी तुला शंभरदा बजावले होते ना की तुझा नंबर ३६ आहे म्हणुन?'

'माझ्या मैत्रिणीचा ३६ होता ना?'

'तु बहिरी आहेस काय? तिचा १० आहे मी म्हटलेले.'

'मग प्रश्नच मिटला,' मी उदारपणाचा आव आणुन म्हटले. 'माझी चुक झाली. मीच दोन्ही नंबर मिक्स केले.'

'प्रश्न मिटला? वा! सुंदर!! उत्तम!!! तुला मानायलाच हवे!'

'पण ही चुक तुझ्या दृष्टीने चांगली ठरली रे. तू वाचलास त्याच्यामुळे. तुला काय वाटते तु कप मला दिला असतास तर पब्लिकने तुला तसेच सोडले असते? कापुन काढले असते कापुन..'

'आणि बॉसचे काय? तो मला कापेल आता.'

'च्च्..बॉस गेला उडत. तुला काही भावनाबिवना आहेत की नाही इज्जी? जरा बघ ना त्या दोघांकडे, कसे मश्गुल झालेत एकमेकात ते! त्यांच्या आनंदासाठी एक लव-र-ली सिल्वर कप गेला तर काय बिघडले? ती दोघे हनिमुनला आलीत रे इथे. तु मॅनेजमेंटला सांग खरे काय झाले ते आणि हेही सांग की मला त्यांना हॉटेल मॅनेजमेंटतर्फे लग्नाची भेट म्हणुन कप द्यावासा वाटला.'

इज्जी परत थोडा वेळ अडकला. मग शब्द बाहेर आले.

'आता मला समजले. तु हे सगळे मुद्दाम केलेस. तुझ्याच शब्दात अडकलीस तु... तु मुद्दाम तिकिटांची अदलाबदल केलीस. मला वाटलेलेच. तुला काय वाटले? तु कोण लागुन गेलीस हे सगळे करायला? तुझ्यासारख्या प्रोफेशनल डान्सर्स इथे पैशाला पासरीभर मिळतात तुला माहित नाही काय? मी आत्ता बाहेर जाऊन एक शिटी मारली तर डझनभर पोरी उभ्या राहतील तुझ्या जागी काम करायला! बॉसला कळल्याबरोबर तो तुला धक्के मारुन घालवेल, माहिताय काय?'

'नाही घालवणार! कारण मीच सोडुन चाललेय.'

'तेच बरे होईल.'

'मलाही तसेच वाटतेय. मला कंटाळा आलाय या जागेचा. मला कंटाळा आलाय नाचाचा. मला कंटाळा आलाय न्युयॉर्कचा. मला सगळ्याचाच कंटाळा आलाय. मी परत गावी चाललेय. मला वाटलेलं मी माझ्यातुन गाव पुर्ण उखडून फेकुन दिलंय म्हणुन. पण नाही! मला बरेच दिवस संशय येत होता पण आज खात्री पटली. बॉसला सांग की मला माफ कर पण हे होणारच होते. आणि त्याला काही बोलायचे असेल तर पत्र लिही म्हणावे. माझा पत्ता लिहुन घे - मिसेस जॅक टायसन, रॉडनी, मेन.'

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त जमलाय अनुवाद... अनुवाद करायची स्पर्धा आहे माहिती होते म्हणून तसं म्हणतोय..
नाहीतर नुसती कथा झक्कास जमलीये असंच म्हणालो असतो.. आणि मध्ये त्या दोघींमधल्या संवादात थोडीशी कल्पना आली होती. की नाचणारीच मिसेस जॅक टायसन असेल म्हणून...

आवडले! Happy

साधना, छान कथा निवडलीस आणि अनुवाद अगदी रसाळ झालाय. एका लयीत कथा पुढे सरकते. संवाद ही अगदी सहज उतरलेत. शुभेच्छा!

हिरकुला अनुमोदन! तीच मिसेस टायसन असणार असे वाटत होतेच... अप्रतिम अनुवाद... कथेत पार गुंतून गेले होते.. गावठी भाषेचा फ्लेव्हर मस्त उतरलाय भाषांतरात...
मस्त! मस्त! मस्त! साधना Happy

अप्रतिम Happy अनुवादापेक्षाही तुमच्या लिखाणातून अगदी सहज आल्यासारखी वाटली कथा Happy मी ही अगदी गुंतून गेलो होतो Happy शेवटाची मत्र कल्पना करण्यापर्यंत गेलो नाही, त्यामुळे शेवटचा धक्का सुखद वाटला Happy
खूप सुंदर Happy

Pages