घर - १४

Submitted by बेफ़िकीर on 14 February, 2011 - 03:13

संशयाची भावना मनातून जाणे शक्यच नव्हते. गौरीने स्पष्टपणे सांगीतले की तिच्या आधीच्या कुटुंबाच्या अपघाती निधनानंतर तिला एका 'समजणार्‍या' माणसाने दर अमावास्येला लिंबु, मिरची, हळद व कुंकू परसात ठेवायला सांगीतलेले होते. तेही तिन्हीसांजा होताना! याचे कारण म्हणे असे होते की ती अभद्र छाया, जी त्या तिघांना संपवून गेली, ती आता राहू नये म्हणून! अर्थात, गौरीला तेव्हा जगावेसेही वाटत नव्हते. तिची आई मात्र हे करत होती. पण वसंताशी लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा आयुष्यात आलेल्या गौरीला जाणवले की आपल्याला असे असे सांगण्यात आलेले होते आणि या घरात आपल्याला अपशकुनी समजले जाते. ही बोच मनात राहू नये व निदान 'ते' न केल्यानेच काहीतरी वाईट घडले असे मनात येऊ नये म्हणून गौरीने ते करायला सुरुवात केलेली होती. आणि आज अमावास्या आहे हे ती विसरूनच गेलेली होती व आत्ता आठवल्यामुळे व अधिक उशीर होऊ नये म्हणून तिने ते दादांच्याच घरी केले. अर्थात, कुणाचे कसलेही गैरसमज होऊ नयेत म्हणून तिने ते लपवून केले.

मळभ तसेच राहिले. कुणाचाही विश्वास बसला नाही. मात्र कुमारदादांनी सावरून घेतल्यामुळे त्याबाबत कुणी काही बोलले नाही इतकेच!

मात्र घरी आल्यानंतर गगन झोपायला बाहेर गेल्यावर वसंताने विषय काढला.

वसंता - गौरी... मला एक विचारायचे आहे... हे सगळे.. हे सगळे तू करत होतीस हे मला माहीतही नव्हते.. आणि आजवर मी तुला कधीही ते करताना पाहिले नाही.. हे कसे काय??

गौरी - मला.. तुलाही समजू द्यायचे नव्हते... कारण त्यातूनही गैरसमजच झाले असते.

वसंता - मग अन्डरस्टॅन्डिन्ग म्हणजे काय?

गौरी - अन्डरस्टॅन्डिन्ग आहेच... मी काहीही लपवून करत नाही.. माझे हेतू शुद्ध आहेत आणि ते मला माहीत आहे.. तुझा विश्वास आहे की नाही हा प्रश्न आहे....

वसंताने तोंड फिरवले. गौरीला आयुष्यात पहिल्यांदाच एकाकीपणाची जाणीव अत्यंत तीव्रपणे झाली. तिचा आधीचा संसार नष्ट झाला तेव्हा तिला अपार दु:ख झालेले होते. पण तेव्हाही एकाकीपणाची जाणीव इतकी तीव्र नव्हती. कारण तेव्हा ती केवळ एक विधवा होती. तिला तिची स्वत:ची आई, सासू सासरे आणि संसाराच्या, मुलांच्या आठवणी हे साथीदार होते. मात्र या घरात आल्यानंतर पोटी जन्माला आलेल्या आणि अपघातात मेलेल्या मुलांची आठवण उघडपणे काढत रडत बसणे शोभण्यासारखे नव्हते. आधीच्या नवर्‍याची आठवण काढणे हे गैरसमजांना कारणीभूत झाले असते. निदान चेहरा तरी असा ठेवायलाच हवा होता की ती या संसारात रमलेली आहे पूर्णतः! आणि वसंताच्या मोठ्या मनामुळे आणि कुमारदादांच्या आधारामुळे अंजली आणि तारका या थोरल्या जावांच्या जाचक टोमण्यांनाही सहन करणे तिला शक्य होत होते. इतकेच नाही तर हळूहळू ती संसारातही खरोखरच रमलीही! पण आपल्याच पोटच्या गोळ्यांची प्रेते डोळ्यासमोर आली नाहीत असा एकही दिवस नसायचा. माणसाचे मनच अजब! गौरी त्या वेदनेतूनही सावरत सावरत वसंताचा संसार करू लागली. त्यातच वसंताची नोकरी जाणे, आईंना व्याधी होणे आणि मिसळीच्या रश्यात पाल पडून वसंतावर पोलिसकेस होणे या सर्व बाबी गौरी अपशकुनी असल्यामुळे झाल्याचा ठपका ठेवायला मोठ्या जावा तयार होत्या. पण त्यातूनही तिला भावनिकरीत्या सावरले ते वसंतानेच! अशा वेळेस, फक्त आपल्या आईला समाधान वाटावे म्हणून पुर्वी कधीतरी आवडणार्‍या वसंताशी लग्न करण्याचा निर्णय घेणार्‍या गौरीसाठी वसंता सबकुछ बनलेला होता. आणि आज ?

आज वसंतानेच तोंड फिरवले होते. हाही संसार कोणत्यातरी छायेत, सावटात करावा लागणार अशी चिन्हे दिसू लागण्याची शक्यता निर्माण झालेली होती. संताप संताप होत होता. माझ्या पोटच्या मुलांना विसरून मी तुझ्या आहे त्या परिस्थितीत तुझा संसार बहरावयास स्वतःला वाहून घेत आहे असे असताना तुझाही विश्वास नसावा?? हा प्रश्न पोटतिडकीने विचारावासा वाटत होता. पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. अतिशय निराशा आणि संताप झाला की माणूस अबोल होतो तशी गौरी झाली होती. तिने फक्त एकच विचारले.

गौरी - तुझाही विश्वास बसत नाही ना?

वसंताला 'माझा पूर्ण विश्वास आहे' हे उत्तर देण्याचा मोह होत होता. मोहच तो! त्याच्या मनाला होत असलेला मोह! पण आजवर अंजली वहिनी आणि तारका वहिनींनी केलेले अपशकुनीपणाचे उल्लेख, त्यातच घडत असलेल्या वाईट गोष्टी आणि आज गौरीने चक्क दादाच्या घरात असे काहीतरी करणे या सगळ्यांचा संबंध त्याची बुद्धी उगाचच जोडत होती. मन बुद्धीला सांगत होते, ही अशी नाहीच आहे. बुद्धी मनाला सांगत होती, नसेलही, पण मग न सांगता ती हे सगळे का करत होती? कशासाठी? त्या संपलेल्या संसारासाठी? सांगून करायला काय हरकत होती? असा कोण माणूस ज्याने अगदी लिंबु मिरचीच टाकायला सांगीतली? लिंबु मिरची तर दृष्ट लागू नये म्हणून बांधतात! मग तिने केले त्यात खरे तर वाईट काय? पण... पण... असे लपून का करावे? एवीतेवी तिन्हीसांजा कधीच होऊन गेलेल्या होत्या. मग घरी येऊन का केले नाही? आजवर इतक्या दिवसात आपण तिला हे करताना कधीच कसे बघितले नाही? जुन्या घरात राहत असताना हे कुठे करत होती ही?

की???... की गौरी आपल्याशी मनाने रत झालेलीच नाही आहे???

तिच्या मनात तिचा आधीचाच... बहरलेला संसारच तर नाही?? आपल्याशी लग्न ही केवळ एक स्वतःच्या आईसाठी केलेली तडजो तर नाही?

पण मग? पण मग ती आपल्या घरातल्यांचे तर कितीतरी प्रेमाने करते की? तेव्हा तिच्या वागण्यात कधीही असे वाटत नाही की तिच्या मनात काहीतरी गैर असावे. मग हे काय? हे लिंबु मिरची प्रकरण आणि तेही असे?? लपवून?? दादाच्या घरी?? जेव्हा हे माहीत आहे की आधीच नाव अपशकुनी पडलेले आहे.

वसंता - मला... तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे गौरी... घालवायचा नाही आहे..

गौरी - विश्वास असा... ठरवून वगैरे ठेवता येतो का?

वसंता - हा प्रश्न तिरकस आहे..

गौरी - काहीच सरळ, शुभशकुनी न घडलेल्या बाईकडून सरळ प्रश्न येणार तरी कसा?? नाही का??

वसंता - तुझा हेतू चांगलाच होता तर... हे सगळे मला आधीच का सांगीतले नाहीस??

गौरी - काय? की अजून माझ्या मनात माझा आधीचा संसार आहे, त्या संसारावर पडलेली अभद्र छाया जावी म्हणून मी प्रयत्न करते आहे असे सांगायचे??

वसंता - का नाही सांगायचे?

गौरी - तुला हे उपाय... पटले असते?

वसंता - मुळीच नाही.. पण निदान... तुला पटतात हे तरी पटले असते...

गौरी - म्हणजे तडजोड...

वसंता - आपले लग्न हीच तुझ्यासाठी एक तडजोड आहे..

गौरी - लग्न करताना होती... आता नाही.. अजूनही मी तडजोड करते असे वाटते तुला??

वसंता - स्त्रियांना एक आडनाव लागते... जे त्यांच्या आई वडिलांचे नसते असे..

गौरी - का?

वसंता - कारण त्यामुळे समाजात एक मान्यता मिळते..

गौरी - इतकंच?? म्हणजे तुझ्या आईंनी बाबांशी लग्नही आडनावासाठी केलं??

वसंता - लग्न ही एक प्रथा आहे.. स्त्री पुरुषांना ऑफिशियली एकत्र आणण्याची..

गौरी - मान्य आहे.. पण त्या प्रथेतून संसार निर्माण होतात..

वसंता - जो आपला निर्माण होऊ शकत नाही..

गौरी - खूपच कडवट बोलू शकतोस...

वसंता - कडवट ही सत्याची चव असते गौरी...

गौरी - मी तुला फसवलेले नाही...

वसंता - मलाही काही मुले बाळे हवीच होती असे नाही.. पण..

गौरी - काय??.. पण काय??

वसंता - तुझ्या आधीच्या संसारावर जी काही अभद्र छाया येऊ शकत होती ती आधीच आलेली होती.. तू एकटी वाचलीस... सगळेच गेले.. आता... आता आणखीन काय वाईट होऊ शकत होते?? आणि... हे सगळे उपाय तू नेमके कशासाठी करत होतीस??

गौरी - माझ्यासाठी.. तुझ्यासाठी.. आणि.. या घरासाठी..

वसंता - पटत नाही..

गौरी - मला सगळे अपशकुनी म्हणून हिणवतात ते पटते?

वसंता - कधीच नाही.. माझा विश्वासच नाही असल्या गोष्टींवर..

गौरी - हो पण.. एकदा तरी तू 'मी अपशकुनी नाही आहे' हे सांगण्यासाठी भांडलास?

वसंता - भांडायची जरूरच नाही. लोकांना आपोआप समजतात त्यांच्या चुका..

गौरी - चूक.. चूक आपलीही होऊ शकते वसंता..

वसंता - नक्कीच... आणि मी चूक मान्यही लगेच करतो...

गौरी - फक्त... ती चूक आहे हे कळल्यानंतर मान्य करतोस..

वसंता - म्हणजे???

गौरी - मी तुमच्या घरात यावे ही जर माझ्यासाठी तडजोड आहेस असे तू म्हणतोस तर तुझ्यासाठी काय आहे??

वसंता - प्रेम..

गौरी - मग प्रेमाचा पाया काय?

वसंता - पाया काय म्हणजे?? प्रेम हे प्रेम असते...

गौरी - बर ठीक आहे... प्रेम म्हणजे तरी काय?

वसंता - काहीही बोलतीयस तू आता..

गौरी - दे ना उत्तर?

वसंता - जे माझे तुझ्यावर आहे.. तुझे माझ्यावर आहे.. ते प्रेम..

गौरी - पण प्रेम म्हणजे काय?

वसंता - म्हणजे.. आवड... एखादी व्यक्ती आवडणे..

गौरी - कशा प्रकारची आवड??

वसंता - मला या प्रश्नोत्तरांमध्ये इन्टरेस्ट नाही... तुला काय म्हणायचे आहे ते स्पष्टपणे म्हण..

गौरी - मी प्रश्न विचारले तर उत्तरे द्यायला बांधील नसणे हे योग्य आहे?

वसंता - ठीक आहे.. माझे तुझ्यावर प्रेम आहे.. आणि प्रेम म्हणजे एखादी व्यक्ती आवडणे.. तिचे दिसणे, बोलणे, वागणे इतके आवडणे की तिला पाहिल्याशिवाय चैन पडत नाही.. ती व्यक्ती दुसर्‍या माणसाची झालेली पाहणे सोसत नाही... त्या व्यक्तीला आपले करणे यात धाडस लागते.. जे पाहिजे तेव्हा होत नाही..

गौरी - ठीक आहे.. मग मला सांग.. ती व्यक्ती आजही दुसर्‍याचीच आहे, आपली झाल्यानंतरही मनाने दुसर्‍याचीच आहे असे समजले तर??

वसंता - मग... मग माझे प्रेम राहणार नाही..

गौरी - अगदी बरोब्बर... कारण आता ती व्यक्ती समाजमान्य पद्धतीने, कायदेशीररीत्या तुझी आहे.. हो ना??

वसंता - तसे म्हणायचे नाही.. पण मी काहीही कमी केलेले नसताना त्या व्यक्तीने अजूनही दुसर्‍याचे का असावे मनाने?

गौरी - हं! आता ऐक! पहिली गोष्ट म्हणजे.... माझे पहिले लग्न होण्यापुर्वी एकदा तरी तू निदान असे म्हणावेस तरी... की गौरी मला तू आवडतेस... यासाठी मी अक्षरशः तडफडत होते.. मुली बोलत नाहीत.. बोलू शकत नाहीत... दाखवत नाहीत.. याचा अर्थ त्यांना मन नसते असे नाही.. माझ्या लग्नाच्या आदल्या रात्री.. म्हणजे सीमांतपूजनाच्याही आदल्या रात्री... जी माझी त्या घरातील शेवटची रात्र होती.. एक कुमारिका म्हणून.. त्या रात्री तू माझ्यावर आणि तुझ्या नशीबावर रागवून खिडकी बंद करून बसला होतास... हो ना??? ... वसंता.. ती संपूर्ण रात्र मी माझ्या घराची खिडकी उघडी करून तेथे बसून तुझ्या खिडकीची उघडण्याची वाट पाहात होते... होणार काहीच नव्हते... तू खिडकी उघडून माझ्याकडे पाहिले असतेस तरी लग्न झालेच असते माझे... पण निदान... आपल्या भावना व्यक्त तरी झाल्या असत्या.. निदान हे समाधान तरी मिळाले असते की आपल्याला एकमेकांचे व्हायचे होते ही भावना दोन्ही मनांमध्ये तितक्याच तीव्रतेने आहे... पण तू खिडकी उघडलीच नाहीस.. मुली अशा रात्री आपल्या आईबरोबर झोपतात वसंता... कारण दुसर्‍या दिवसापासून माहेर संपणार असते कायमचे.. मी एकटी झोपले होते... झोपले कसली?? जागी होते रात्रभर.. मगाशी तू म्हणालास... मी तुझे काही कमी केले आहे का? कशाला जास्त आणि कमी म्हणत आहेस वसंता?? या.. या आर्थिक परिस्थितीला?? जी माझ्या सासरी तुमच्या घरातील प्रत्येकापेक्षा कितीतरी जास्त पटीने होती??? की तू मला विधवा असतानाही लग्नाची मागणी घातलीस याला खूप केले म्हणत आहेस?? त्यालाही आता अर्थ नाही वसंता.. कारण आत्ताच तू म्हणालास.. की मी मनाने अजूनही दुसर्‍याच कुणाची आहे असे तुला समजले तर मी तुझ्या मनातून उतरेन... हे प्रेम नसते वसंता... मी जेव्हा खर्‍या अर्थाने दुसर्‍या कुणाची तरी होते तेव्हा मला मागणी तर राहोच.... माझ्याकडे त्या नजरेने बघायचीही हिम्मत तुझ्यात नव्हती... भौतिक अर्थाने माझे कुणीच राहिले नाही हे पाहून तू मला मागणी घातलीस वसंता... ही धमक तुझ्यात माझे पहिले लग्न ठरत होते तेव्हा नव्हतीच... त्यामुळे मला मागणी घालणे तुझ्या वकुबाला शक्य आहे हे तुला पटले तेव्हा तू मला मागणी घातलीस... आमचा मधुचंद्र गोव्याला झाला... पहिल्या रात्री नवर्‍याला सर्वस्व बहाल करताना मुलींच्या मनात जी एक प्रकारची धाकधूक, उत्सुकता, कुतुहल, ओढ आणि लज्जेत गुंडाळलेली बेभानता असते ना वसंता?? त्या सार्‍यांच्या जागी माझ्या मनात होती एकच भावना... आता तू आणि मी कायमचे आणि खर्‍या अर्थाने परके झालो ही भावना... स्त्रियांच्या चेहर्‍यावर कधीच दिसत नाहीत वसंता... पण चेहर्‍याच्या आत खूप खूप वादळे असतात... त्यामुळे तू समाजमान्य पद्धतीने मला तुझे आडनाव देणे ही बाब तेव्हाच केलीस जेव्हा तुला हे नक्की माहीत होते की ती करण्याच्या पात्रतेचा तू झालेला आहेस.. म्हणजेच... गौरी विधवा झालेली आहे आणि निराधार झालेली आहे.. चॉईसलेस झालेली आहे असेही तुला वाटले असेल... हे तुझे प्रेम आहे वसंता.. हे प्रेम असते?? की काय असते हे?? आता तू विचारशील.. की माझे लग्नाआधी जर तुझ्यावर तितकेच प्रेम होते तर मी ते का नाही व्यक्त केले??? काय होऊ शकले असते माहीत आहे? मी जर व्यक्त केले असते आणि काही कारणाने तू नकार दिला असतास... तर मी आयुष्यभर एक बदनाम स्त्री म्हणून वावरले असते... म्हणून मुली बोलत नाहीत... आता ऐक.. मी मनाने अजूनही दुसर्‍याचीच का आहे ते सांगते.. आपल्या हाडामासांमधून जेव्हा एक आकारहीन गोळा आकार घ्यायला लागतो... आणि आपल्याच शरीरापासून वेगळा होऊन बागडायला लागतो ना... तेव्हा आपल्याला नुसतेच मातृत्व नाही मिळत... नुसताच पुनर्जन्म नाही होत.. नुसतीच स्त्रीत्वाची भावना खरी ठरण्याचा मुक्काम नाही येत आयुष्यातील.. त्या वेळेस निर्माण होतो एक सजीव... जो आपले रूप असतो... आपल्याच शरीरापासून झालेला असतो.. पूर्णतः आपल्यावर अवलंबून असतो.. त्याचे ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असणे आपल्यातील माणूसपणाला जागृत करते.. निसर्गाचा सर्वोच्च निर्मीती-आविष्कार म्हणजे जर माणूस असेल तर त्या माणसातील माणूसपणाचा सर्वोच्च आविष्कार आपल्याला तेव्हाच अनुभवता येतो... आईलाच असे नाही.. बापाला.. आजीला...आजोबांना.. सगळ्यांनाच... आपले जगणे, असणे, काहीही करणे.. हे सगळे मग त्याच जीवासाठी असते... तो जीव अधिकाधिक चांगल्या पद्धतीने वाढणे यात आपली स्वप्ने गुंफली जातात.. ते आयुष्य बनते आपले.. आपल्या वैयक्तीक आयुष्याकडे आपण कितीतरी प्रमाणात दुर्लक्ष करतो... करू शकतो... करणे चालते.. अशी दोन मुले झाली मला.. एखादवेळेस नवर्‍याने टाकले ना? तर स्त्री जगू तरी शकते.. मुलाने त्याचे लग्न झाल्यानंतर बायकोचे ऐकून हाकलून दिले ना? तर म्हातारी भीक तरी मागू शकते.. पण मूल... वसंता... आपले मूल आपल्या डोळ्यासमोर निमिषार्धात नष्ट झालेले पाहिले ना?? ... तर काय होते हे वर्णन करायला भाषेत शब्द नसतात... डोळ्यात ते भाव फक्त दिसू शकतात.. तोंडाने व्यक्त करता येत नाहीत.. आजही झोपेत मी कित्येकवेळा दचकून उठते... तेव्हा तू झोपलेला असतोस गाढ.. पण मला या अंधार्‍या आढ्याकडे पाहताना तो प्रसंग आठवतो.. विपुलला मी पुढे दिले... ह्यांनी लाडाने त्याच्याकडे बघत त्याच्या डोक्यावरून डावा हात फिरवला.. त्याच्याशी बोलू लागले.... बोलता बोलताच एका क्षणी असे झाले की त्यांचे पूर्ण लक्ष विपुलकडे असताना अचानक डावीकडच्या पायवाटेवरून एक ट्रक जोरात आला... काही समजायच्या आत अशी परिस्थिती आली की कशीही गाडी वळवली तरी आपटणार... मी जोरात ओरडले.. माणूस अशा परिस्थितीत जीवाला घाबरून वागतो.. त्याचप्रमाणे यांनी गाडी उजवीकडे वळवली... ट्रकचा पुढचा भाग विपुलच्या सीटमध्ये घुसला.. गाडी ट्रकमध्ये अडकली... मुले तर रक्तबंबाळ होऊन निर्जीव झालेलीच होती... माझा आरडाओरडा ऐकायला हेही... हेही... जिवंत नव्हते... सगळं संपलं... काय भावना असेल तेव्हा माझ्या मनात... आणि आजही... आजही तीच भावना... तुझ्या प्रेमाखातर मी जर दोन्ही मुलांचा आणि ह्यांचा संसार सोडून पळून आले असते ना वसंता... तर मी त्यांना विसरलेही असते... पण माझे त्या तिघांवर अप्रिमित प्रेम होते... आजही आहे.. वाटते की पटकन विपुल आपल्या कुशीत शिरेल.. माझ्या मनातून तो संसार कसा जाईल?? आणि आज तू अशी अपेक्षा करतोस की तू केलेल्या प्रेमामुळे मी आधीचे सर्व विसरावे? .. पोटचे गोळे होते ते दोन माझ्या... तरीही वसंता... आज मी या संसारात रमलेली आहे.. माझे संपूर्ण लक्ष तुझ्याचकडे आहे.. पण एक सांगू का?? मधेच खूप तीव्र आठवण येते रे... त्या माणसाने जो उपाय सांगीतला तो का करते आहे माहीत आहे? की जर खरोखरच मी अपशकुनी असले ना? तर निदान त्याचा कोणताही तोटा या संसाराला तरी होऊ नये... फार तर मी मेले तरी चालेल.. पण बाकी कुणालाही काहीही होऊ नये.. आणि या... या सांगण्यासारख्या गोष्टीच नसतात... त्यामुळे लपवून करत होते सगळे.. प्रेमाचा पाया विश्वास असतो वसंता... जे उत्तर तू दिले नाहीस ते मी देते... विश्वास असतो... विश्वास.. तुझा माझ्यावरचा विश्वास डळमळीत झालेला असला तर खुशाल सांग.. कारण तुझ्यादृष्टीने मी केलेली ती गोष्ट चूक आहे... पण... पण माझा तुझ्यावर तितकाच विश्वास आहे...

उशीत तोंड खुपसून मूकपणे आक्रंदत असलेल्या गौरीकडे पाहताना वसंताला स्वतःच्या बुद्धीची कीव वाटली. त्याने तिच्या पाठीवर थोपटले. आणि तो एकच वाक्य बोलला...

"सगळ्यांनी संबंध सोडलेले असले तरीही... मी फक्त तुझा आहे गौरी... आणि तुझ्या पाठीमागे कायम उभा आहे... माझ्या विचारांसाठी मला माफ कर..."

गौरीने बिलगत वसंताला मिठीमारली तेव्हा दोघेही रडत होते. पण ते दु:ख वेगळेच होते.

अपमान करून करून आज सगळ्यांनी त्यांना हाकलून दिलेले होते. आणि कर्करोगाने ग्रस्त असतानाही आईंनी विधान केलेले होते...

"माझ्या धाकट्या मुलाला फितवणारी ही बला नकोच घरात... मला तीनच मुले होती असे समजेन..."

कसबा पेठ ते डेक्कन जिमखाना हा संपूर्ण रस्ता अश्रूंनी भिजवत दोघे घरी आलेले होते.

मूर्खपणा होता तो सगळ्यांचा! पण असे 'मूर्खपणे' अचानक घडत नाहीत. त्यांची पार्श्वभूमी अंजली वहिनी व तारका वहिनींनी कित्येक महिने तयार केलेली होती. त्यातच भाऊकाकांसारखा माणूस तिथे होता. गौरीने केलेला प्रकार असमर्थनीयच होता. तिचा हेतू चांगला असेल यावर विचार करण्याची कुणाचीही मनस्थिती नव्हती. तारका वहिनींनी वारंवार 'ही आल्यापासून काय काय झाले' याचा पाढा भाऊकाकांना वाचून दाखवला होता. गौरी स्तब्ध होती. मुले बाहेर निघून गेलेली होती. आणि वसंता त्याची बाजू मांडत होता. पण त्या क्षणी खरे तर वसंताच्याही मनात काहीसा संशयच होता. घरी येऊन बोलणी झाल्यानंतर त्याच्या मनातील संशय जरी दूर झालेला असला...... तरीही......

.... त्याच्यासाठी 'आपले घर' कायमचे संपलेले होते...

=========================================

"मांजर ठेवायची हो एक??? कसल्या पाली अन कसले उंदीर... कबुतर अन चिमण्यादेखील फस्त करते मांजर... हां... आता प्रत्येक गिर्‍हाईकापाशी जाऊन लाळघोट्यासारखे बसेल हे खरेच.... पण निदान पाली तरी खाईल ना??? नाही का??"

"नाही नाही.... आता ते सगळे विचार मागे टाकलेत मी..."

"हे असलं मन असतं म्हणूनच मराठी माणूस मागे राहतो... आत्तापर्यंत एखादा गुजराथी नाहीतर तमिळ अण्णा असता तर निगडीबिगडीला जाऊन नवा स्टॉल टाकलाही असता बेट्याने... मराठी माणूस म्हणजे राजा माणूस... आहे का नाही?? आं??? जेवणानंतर पान हवे असले तर बिहार्‍याचे पान पाहिजे... सकाळी दुध पाहिजे असले तर भैय्याचे दूध... केस कापायचे असले तर कन्नड न्हावी पाहिजे... किराणा माल पाहिजे असला तर मारवाडी पाहिजे... फ्लॅट घ्यायचा असला तर गुजराथ्याकडून घ्यायचा.. हॉटेलमध्ये जायचे असले तर मद्राश्याकडे जायचे... पोराला शाळेत घालायचे असले तर जैनांनी दानधर्म म्हणून काढलेल्या शाळेत शिकवायचे.. गोरा साहेब दिसला की हसून बोलायचे... अ‍ॅडमिट व्हायचे असेल तर डॉक्टर पारशीच हवा... तळकट खायचं असलं तर सिंध्याच्या शेजारी घर घ्यायचं... आणि मेल्यानंतर विद्युतदाहिनीतून हाडं शोधणारा माणूसही केरळी... अरे वा?? आम्ही नोकर्‍या करून दोन खोल्यात भाडं भरून राहणार... आमच्य सात पिड्या त्याच दोन खोल्यात निपजणार... आणि अख्या भारताला श्रीमंत करत बसणार... वा वा.. "

"अभ्यंकर.... एकदा हात पोळलेले आहेत..."

"च्यायला ती काय आग आहे होय मिसळ म्हणजे हात पोळायला? आता पालीच्या शरीरात विष असतं याला तुम्ही काय करणार? आं?? आणि त्या पब्लिकनेही जरा रस्सा ढवळून वगैरे नको का बघायला?? आणि मला एक कळत नाही.. की हे लोक अख्खी मिसळ आरामात खाऊन बिऊन झाल्यावर मस्तपैकी इकडे तिकडे बघत कसे काय मेले?? खाताना काही झाले नाही?? की पाल म्हणजे भांग आहे?? अन एका पालीने चार माणसं दगावली?? काय जर्मन पाल होती की काय?? ती बिचारी भाजून मेली ती मेलीच... तुम्ही धंदा काढायला कायमचे घाबरणार... अहो मी तर म्हणतो... सरळ नोटीस लिहा हॉटेलच्या बाहेर... 'आमचा कुणालाही मारायचा हेतू नाही... मात्र पाल मिसळीत पडून कुणी मेल्यास आमची जबाबदारी नाही... ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर मिसळ खावी'... हवे तर तिथे एक विमा एजंट बसवा म्हणतो मी... मेला माणूस की केला प्रोसेस क्लेम... क्काय???"

"म्हणजे माणसं मरतील हे गृहीतच धरायचं का??"

"अहो हे ज्यांना घरात कुणी खायला देत नाही ना?? हे असलेच येतात मिसळ बिसळ खायला.. आणि मी म्हणतो मांजर पाल खाऊन टुणटुणीत राहते.. तर माणूस मरतोच कसा???"

"अहो अभ्यंकर... मांजर पालीवर शेपटीकडून हल्ला करते... म्हणून तर पाल आपली शेपूट तुटू देते आणि स्वतःला वाचवते ना???"

"म्हणजे फुल्ल पालीत विष नसतंच होय??"

"छ्छे???"

"मग तर प्रश्नच मिटला.. ८० % पाल बिनविषारी आहे म्हंटल्यावर आपल्याला काय भीती???"

"हो पण ती मिसळीत पडताना काय आपला विषारी भाग डिटॅच करून पडत नाही... ती फुल्लच पडते.."

"तुमचं म्हणजे काय आहे माहितीय का?? कपडे का घालत नाही तर म्हणे शिंप्याच्या लेबलवरचं स्पेलिंग चुकलंय... तिच्यायला पुण्यातल्या हॉटेलांमध्ये काय पाली नसतील?? की त्यांना ट्रेनिंग दिलेले असते???"

"आणि मुख्य म्हणजे एकदा बदनाम झालेल्याकडे कोण येणार पुन्हा मिसळ खायला??"

"अहो नावंच दुकानाचं लिझार्ड मिसळ ठेवा मी म्हणतो.. इथे मरायलाही हजारो तयार आहेत..."

"लिझार्ड मिसळ???"

"बिनदिक्कत... नाहीतर आत्महत्या मिसळ... पुढे सरळ लिहा.. प्रेमभंगात भग्नहृदयी झालेल्यांनी आत्महत्या करण्यासाठी आमची मिसळ खावी... जागच्याजागी प्रेम सिद्ध होईल... आहे काय नाही काय??? असलं काहीतरी लिहीलं की पब्लिक फार येतं दुकानात..."

"तुम्ही काहीही बोलता...असलं नाव दिलं तर आधीच पकडतील.."

"घ्या... म्हणजे आमचीच चूक... आता महाबळेश्वरला सुईसाईड पॉईंट आहे... आ?? रायगडावर कडेलोट पॉईंट आहे.... ते चालतं... अन आम्ही सुइसाइड मिसळ काढली तर बेकायदा होय??"

"सुईसाईड मिसळ.. येथे जीव घालवता येईल.. वा अभ्यंकर वा... खडी फोडली नाही अजून मी.. तेही करून घ्याल माझ्याकडून..."

"पटवर्धन... एक आपले कोकणस्थ गृहस्थ आहात म्हणून घसा फाडून सांगतोय की हॉटेल पुन्हा चालू करा... तुमच्या मिसळीची चव चांगली होती... हवं तर एक माणूस नुसता पाली पकडायला ठेवा... पण हॉटेल काढा... आयुष्य चितळ्यांकडे घालवू नका..."

"नोकरी सगळ्यात सेफ..."

रस्त्यात भेटलेल्या अभ्यंकरांनी आपल्या त्या जुन्या मिसळीचे एवढे कौतुक करावे याचे वसंताला आश्चर्यच वाटले आणि घरी जातो तर दारात पाय ठेवतानाच गौरीचे वाक्य!

"हा गगन म्हणतोय घरातूनच पुन्हा मिसळीचे दुकान चालू करू... मी आणि त्याने सांभाळायचे म्हणे!"

"हां फिर?? धंदेमे एक नशा होती है.."

वसंताची एक थप्पड खाऊन पोरगं बाहेर पळालं तशी गौरी हसू लागली. गणपतीचे दिवस होते. वसंताने नवीन घर घेतल्यावरही मोठ्या घरी, म्हणजे जोथे आई बाबा असतील तिथलाच गणपती आपला हे ठरवलेले होते. कोकणस्थ असले तरी त्यांच्याकडे सात दिवसांचा गणपती असायचा. हा त्यांनी म्हणे मागून घेतलेला होता. आणि गौरी कुमारदादांकडे चाललेली होती. गौरी बसवायला!

एक शब्दही कुणी तिच्याशी बोलले नाही. इतकेच काय तर तिने ऑफर केलेली मदतही नाकारली. शेवटी सगळ्यांना नमस्कार करून ती परत आली. वसंता मात्र गणपतीचे दर्शन घ्यायलाही गेलेला नव्हता. गौरीने आल्यावर त्याला सांगीतले.

"छान बसल्यायत गौरी.. बरं वाटलं सगळ्यांना मी गेले म्हणून.. शेवटी आपण लहान आहोत.. जायला पाहिजे.. तूही जाऊन ये ना दर्शनाला???"

" हं... बघतो..."

नाही म्हंटले तरी वसंताला वाटत होतेच जावेसे! फक्त कुणी आपल्याशी बोलणार नाही आणि आपल्यालाही कुणाशी बोलावेसे वाटणार नाही या गोष्टीचा तो विचार करत होता. पण तरी शेवटी गेलाच! कुमारदादा मात्र त्याच्याशी बोलला आपुलकीने! आई बाबांनीही चौकशी केली. अण्णा आलेला नव्हता, तो बॅन्केतच होता.

दादा - वसंता.. मला खूप बरे वाटले गौरी येऊन गेली ते... तू आणि ती दोघेही येत जा हं?? राग कसला धरता?? अरे घर म्हंटले की भांडणे होणारच... आणि दर वेळेस काही लहानांची चूक असते होय?? मोठेही चुकतात... हे बघ... आज उमेश आणि वेदा पिक्चरला जाणार आहेत... तुला हवं असलं तर... गगनला पाठव... तोही लहानच आहे.. आपला नसला तरी तुम्हाला दोघांना मदत करून बिचारा राहतोय ना? साडे पाचला पाठव.. हं??... नऊ वाजेपर्यंत येईल परत तो घरी... आणि आता गणपती आले आहेत घरात... आता मागचं सगळं विसरून पुन्हा पहिल्यासारखे येत जा दोघे.. बर का???

आई मधे पडल्या..

आई - कुमार... आईचं मन आहे माझं.. कसं वाटत असेल मला वसंता दिसला नाही तर... पण एक लक्षात ठेव... गौरीने जे केले ते अयोग्यच नाही तर अत्यंत घाणेरडे आहे... तिला या घरात स्थान नाही.. इतकंच... की सणासुदीला आली तर अपमान होऊ देणार नाही.. शेवटी माझी सून आहे.. तिची आईही मला कित्येकदा भेटून गेली... पण जे आहे ते आहे.. मुळात तिने जे काही केले ते चांगल्यासाठी की वाईटासाठी हा प्रश्नच नाही... आधीच विधवा असलेल्या मुलीने हे असले प्रकार करायचेच नाहीत घरात.. भरल्या घरात... मला माझ्या घरातल्यांवर कोणतेही संकट यायला नको आहे.. वसंता.. तू येत जा केव्हाही.. पण गौरी मात्र... मी तिला माझी समजत नाही आता...

बाबा आईला समजावून सांगायला लागले. तारका वहिनींनी हळूच वसंताच्या हातात प्रसाद ठेवला. काही झाले तरी त्यांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते. अंजली वहिनी मात्र एक शब्द बोलल्या नाहीत वसंताशी!

उमेशला भेटून वसंता घरी निघाला.

'काय काय वळणं आहेत आयुष्यात आपल्या... आपल्याच आई वडिलांना भेटताना परक्यांना भेटल्यासारखे वाटते.. ते हयात असून आज असे पोरके पोरके का वाटतेय? आईच्या तब्येतीसाठी कुणी तिला दुखवत नाही.. म्हणून बाबा असे म्हणालेही नाहीत की वसंता आईचा राग मनात धरू नकोस.. तिला बरे नाही आहे.. दादा प्रेमाने बोलला.. पण वहिनी?? त्यांना काय झाले?? आणि मुख्य म्हणजे या इतक्या साध्या गोष्टीवरून संबंध सोडतात लोक?? की सोडायचेच होते आणि एक निमित्त मिळाले?? म्हणजे मी आणि गौरी नकोच असू का ह्या सगळ्यांना? काही कळत नाही.. आई तरी कशी दिसायला लागलीय बिचारी... उठवत नाही तिला साधं.. आपण नमस्कार केला तर किती थरथरत हात ठेवला आपल्या डोक्यावर वय काही इतकं नाही.. पण हा रोग... हा रोग कसा जातो?? काय केल्यावर जातो?? याला औषध का नाही?? हॉटेल... आपण पुन्हा हॉटेल खरच सुरू केलं तर?? चालेल का? आणि मुख्य म्हणजे... कॅन्सल झालेलं लायसेन्स मिळेल का??'

घरी आला तर वेगळेच दृष्य!

गगन एका मोठ्या कागदावर 'गगन मिसळ मार्ट' असे लिहीत होता.

वसंता - क्या रे? तेरा नाम कैसे क्या दुकान को??

गगन - फिर किसका?? काम मै करुंगा.. और नाम आपका??

वसंता - वही नाम रहेगा... एटीजी..

गगन - तो एटीजी गगन करते है.. क्या??

वसंता - चूप... तेरेको पिक्चर देखना है क्या??

गगन - मजाक कर रहे है क्या??

वसंता - सच पूछ रहा हूं...

गगन - तो पिक्चर किसको नही देखना होगा?? आप जा रहे हो दोनो??

वसंता - नही.. वेदा और उमेश जा रहे है..

गगन - फिर मै नही जाता...

वसंता - क्युं??

गगन - वो मेरेसे बात नही करते..

वसंता - क्युं??

गगन - पता नही...

वसंता - तू डायलॉग फेकता है कुछ भी???

गगन - नही तो?? मै तो मुंह नही खोलता..

वसंता - जब तू मुंहही नही खोलता तो वो क्या बात करेंगे..??

गगन - ये भी एक पॉईंट है वैसे...

वसंता - पॉईंट गेला खड्यात.. जानेवाला है क्या??

गगन - कौनसा पिक्चर??

वसंता - तुकाराम महाराज..

गगन - भगवान का है क्या??

वसंता - हां...

गगन - फिर रहने दो..

वसंता - क्युं??

गगन - उसमे फायटिंग नही होती...

वसंता - फायटिंग इस उमरमे नही देखते..

गगन - प्यार भी नही होता उसमे..

वसंता - प्यार?? प्यारसे तेरेको क्या मतलब??

गगन - प्यार होगा तो व्हीलन होगा.. फिर फायटिंग होगी..

वसंता - नही जानेका है तो मत जा..

गगन - जाता हूं जाता हूं... आदमी कुछ सोचनेका टाईम तो दोगे की नही??

वसंता - गौरी... जेवायला वाढ.. ए... जा जाके मसाला पान लेकर आ दो कॉर्नरसे..

गौरी - काय झालं सांग ना?

वसंता - काही नाही.. सगळे व्यवस्थित बोलले..

गौरी - मग काय तर??... आपणही सगळं विसरून जाऊ.. अंजली वहिनी बोलल्या??

वसंता - अं?.. हो...

गौरी - काय म्हणाल्या??

वसंता - जेवून जा म्हणाल्या...

गौरी - मग??? ... जेवायचं नाहीस का??

वसंता - तू एकटी जेवणार हे मला पाहवत नाही..

गौरी - आहाहाहाहाहा... फारच बाई प्रेमात व्याकुळ..

वसंता - मग? आमची मनस्थिती समजून घेतंय कोण??

गौरी - हो ना?? म्हणून तर हे पोरगं आणून ठेवलंयस घरात..

वसंता - तूच म्हणालीस.. सोबत होईल..

गौरी - तू नसशील तेव्हा सोबत.. तू असल्यावर काय??

वसंता - काय केलंय??

गौरी - भरले टोमॅटो..

वसंता - मला नेहमी एक प्रश्न पडतो...

गौरी - विशद करा स्वामी...

वसंता - टोमॅटो मुळातच भरलेले असताना परत भरायची अक्कल बायकांमध्ये येतेच कशी??

गौरी - त्याचं असं आहे... की लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा नवर्‍याचा भरलेला खिसा हलका करायचा... आणि मग पुन्हा भरायचा... हे कर्तव्यच असतं...

वसंता - पुन्हा भरायचा म्हणजे??

गौरी - मी आणि गगन हॉटेल टाकतोय...

वसंता - या अशा योजनांमध्ये मला काही स्थान आहे का??

गौरी - आहे..

वसंता - काय??

गौरी - गप्प बसण्याचं स्थान आहे..

वसंता - हे शुभकार्य आपण कोठे करणार आहात??

गौरी - याच वास्तूत..

वसंता - ही भाड्याची दिड खोली हॉटेलसाठी वापरल्यास राहायची परवानगी नाकारली जाईल..

गौरी - ते बोलणं आधीच झालंय मालकांशी..

वसंता - अच्छा.. म्हणजे प्रकरण बरंच पुढे गेलंय तर...

गौरी - हो.. आणि आता त्याला खीळ घालण्याची कुबुद्धी कुणाला सुचणारही नाहीये..

वसंता - पालींबद्दल काय उपाययोजना आहेत??

गौरी - घरात पाली नाहीच्चेत..

वसंता - पोळी वाढ.. गिर्‍हाईके कुठे बसणार?

गौरी - रस्त्यावर उभी राहणार..

वसंता - अच्छा.. म्हणजे उभी राहण्याचे पैसे देणार...

गौरी - पैसे मिसळीचे..

वसंता - आणि हे सगळे कधी सुरू होणार आहे??

गौरी - आज गगन पिक्चरला जाणार नसता तर आजच...

वसंता - माझी काही मदत??

गौरी - भांडवलाला दिड हजार लागतील..

वसंता - त्या बदल्यात मला काय मिळणार??

गौरी - दर महिना बाराशे नफ्यापैकी सहाशे तुला...

वसंता - इतकंच??

गौरी - मग काय पाहिजे?

वसंताने ओठ हालवून 'किस' पाहिजे असे सुचवले.

गौरी - आज संध्याकाळी सहा ते नऊ या कालावधीत भेटावे. नंतर तक्रार चालणार नाही.

वसंता - नाईट ड्युटी नसते का??

गौरी - एक इंचाची भिंत.. त्यात हा बाहेर घोरणार..

वसंता - हा बाहेर झोपेल..

गौरी - रात्री जागरणे झाल्यामुळे मिसळ बिघडल्यास व्यवस्थापन जबाबदार नाही..

वसंता - मिसळीमुळे रात्र बिघडल्यास दुकान बंद पाडण्यात येईल.

गौरी - असल्या धमक्यांना मी भीक घालत नाही.

वसंता - दुकान नवर्‍यापेक्षा महत्वाचे झाले अशी तक्रार ऐकणारे न्यायालय काढायला पाहिजे..

गौरी - आधी नवर्‍यांना समयसूचकता तरी शिकायला पाहिजे ना त्यासाठी??

वसंता - म्हणजे काय??

गौरी - तो गगन गेलाय पान आणायला अन तू जेवतोयस.. संध्याकाळच्या स्वप्नात..

वसंताला ते बोधप्रद विधान ऐकून अक्कल आली आणि जेवण सोडून त्याने गौरीला जवळ घेतले. पाचच मिनिटात गगन पान घेऊन आल्याची चाहुल लागली तसे दोघे दूर झाले.

वामकुक्षीच्या वेळेस मात्र गौरी गालातल्या गालात हासत होती. कारण वसंता चक्क झोपला होता.

संध्याकाळी पाच वाजताच गगन आवरून वगैरे बाहेर पडला आणि त्या 'दिड' खोलीत मधुचंद्राला उधाण आले. आणि मग नंतर चर्चेला!

"याला घरीच पाठवणार आहे मी आता.."

"काही नको.. हॉटेलला मदत लागेल.."

"मग रात्री बाहेर झोपायला सांगू.."

"परवा मी त्याला म्हणाले तसं.. तर म्हणे दिनभर मजदुरी घरमे करनेकी और रातमे बाहर..."

"जास्तच डोक्यावर चढवून ठेवतेस..."

"हो तिकडे... मला जरा पडूदेत.."

"आत्ता कसली पडतेस?? संध्याकाळ होतीय.."

"ए सांग ना.. खरच काय म्हणाल्या अंजली वहिनी??"

वसंताने खरे ते सांगीतले. आज जेवायला बाहेर जायचे ठरवले होते. गगनला आल्यावर बाहेरूनच आणलेले काहीतरी द्यायचेही ठरवलेले होते. वसंताने खरी परिस्थिती सांगीतल्यावर गौरी हिरमुसली. पण जे काही घडत होते ते टाळणे आता शक्य नव्हते.

दोघे पुरबला जेवायल गेले. साउथ इंडियन पदार्थ खाऊन चालत चालत घरी आले. येताना गगनसाठी मसाला डोसा आणला होता. तर गगन आधीच दारात बसलेला होता. तो तटकन उभा राहिला.

वसंता आणि गौरीला वाईट वाटले. त्याला भूक लागलेली असताना ताटकळत बसावे लागले म्हणून..

.. तर...

गगनने अचानक घाबर्‍या चेहर्‍याने विचारले..

"किधर थे किधर आप?????"

"क्युं?? देख तेरे लिये डोसा लाया..."

"उमेशभैय्या और वेदादीदीको अ‍ॅक्सीडेन्ट होगया.. चलो हॉस्पीटलमे पहिले..."

हादरलेल्या दोघांनी इतक्या रात्री एक रिक्षा मिळवली. जाताना गगन सांगत होता. अलका टॉकीजलाच पिक्चर होता. त्यामुळे तो सुटल्यावर गगन लकडीपुलावरून चालत घरी येणार होता तर ते दोघे करब्यात जाणार होते. वेदा आज उमेशकडेच राहणार होती. पण त्या दोघांनी रिक्षा केली. आणि नारायण पेठेत वळतानाच रिक्षाला एक भरधाव वेगात आलेला टेम्पो धडकला. रिक्षा तर उलटी पालटी झालीच! पण हे दोघेही बेशुद्ध पडले. गगन तेथे धावला. त्याने सांगितले की हे त्याच्याचबरोबर होते. दोघांनाही ससूनला नेले लोकांनी! तोवर गगन कुमारदादाकडे धावला. त्याने तेथे 'ससून' हे नाव आठवून सांगीतले. ते सगळे तिकडे धावल्यावर हा घरी आला तर घराला कुलूप!

गगनने सगळे सांगेस्तोवर रिक्षा ससूनला पोचली.

योग्य वॉर्डमध्ये वसंता आणि गौरी धावत गेले. रडारड चाललेली होती. दोघी वहिन्या हमसून हमसून रडत होत्या. कुमारदादा काउन्टरवर काहीतरी बोलत औषधे घेत होता. अण्णा आत डॉक्टरांशी बोलत होता. वसंताला पाहून तारकावहिनी वसंताच्या गळ्यात पडल्या. गौरीलाही रडणे आवरेना! आई बाबाना अर्थातच आणण्यात आलेले नव्हते.

आणि दहाच मिनिटात अण्णा बाहेर आला. आला तोच एका बाकावर बसून रडू लागला. त्याला रडताना पाहून तर तारकावहिनीने त्याला गदागदा हालवत विचारले.. काय झाले... काय झाले...

सावरल्यानंतर अण्णा उद्गारला...

"दोघांच्याही डोक्याला मार लागला आहे.. गंभीर ऑपरेशन्स आवश्यक आहेत... त्यानंतरही खूप काळजी घ्यावी लागणार आहे... वर्षभर तर खूपच जपावे लागणार आहे.. देवाची दया... मुले.. मुले वाचली आपली..."

त्याही वेळी कुमारदादा इतका शांतपणे कसे काय वागत होता हेच वसंताला समजत नव्हते. स्वतःवसंताही डोळ्यात पाणी आणून तारका आणि अंजली वहिनींना धीर देत होता.

गौरीने अंजली वहिनींना जवळ घेतले..

"वहिनी.. रडू नका.. काही नाही होणार.... अगदी पहिल्यासारखे होतील दोघे... रडू नका.."

अंजली वहिनी खूप रडत होत्या. पण जरासे सावरल्यावर म्हणाल्याच...

"वसंता भावजी....पहिले हिला घेऊन निघा येथून... पहिले निघा... "

गुलमोहर: 

या भागात गौरी आणि वसंताचा संवाद खुप आवड्ला... Happy

"हे असलं मन असतं म्हणूनच मराठी माणूस मागे राहतो... आत्तापर्यंत एखादा गुजराथी नाहीतर तमिळ अण्णा असता तर निगडीबिगडीला जाऊन नवा स्टॉल टाकलाही असता बेट्याने... मराठी माणूस म्हणजे राजा माणूस... आहे का नाही?? आं??? जेवणानंतर पान हवे असले तर बिहार्‍याचे पान पाहिजे... सकाळी दुध पाहिजे असले तर भैय्याचे दूध... केस कापायचे असले तर कन्नड न्हावी पाहिजे... किराणा माल पाहिजे असला तर मारवाडी पाहिजे... फ्लॅट घ्यायचा असला तर गुजराथ्याकडून घ्यायचा.. हॉटेलमध्ये जायचे असले तर मद्राश्याकडे जायचे... पोराला शाळेत घालायचे असले तर जैनांनी दानधर्म म्हणून काढलेल्या शाळेत शिकवायचे.. गोरा साहेब दिसला की हसून बोलायचे... अ‍ॅडमिट व्हायचे असेल तर डॉक्टर पारशीच हवा... तळकट खायचं असलं तर सिंध्याच्या शेजारी घर घ्यायचं... आणि मेल्यानंतर विद्युतदाहिनीतून हाडं शोधणारा माणूसही केरळी... अरे वा?? आम्ही नोकर्‍या करून दोन खोल्यात भाडं भरून राहणार... आमच्य सात पिड्या त्याच दोन खोल्यात निपजणार... आणि अख्या भारताला श्रीमंत करत बसणार... वा वा.. " >>>:राग: हे कटु सत्य आहे....!

मस्त ..

छान..

Hmmmmmm. Human tendency..........

बेफिकिर जी,

खुपच छान!

तुमचे टायमीग अचुक आहे.
घर आणि द वर्ल्ड ऑफ डिफरन्स दोनिहि कथा छान सुरु आहेत.
पण बोका कुठाय?????? लवकर पोस्ट करा.

आमित

मस्त!
पण गौरीचे सासर्चे आणि वसंता लिम्बवरुन एवढे चिडले का कळले नाही.
लिम्बाचा आणि गौरीचे मन आधिच्या संसारात असल्याचा काय संम्बन्ध ते पण नीट कळले नाही.
अर्थात पुढे प्रेम आणि विश्वासाबद्दल चा संवाद छानच.

बेफिकिर जी,
घर आणि द वर्ल्ड ऑफ डिफरन्स दोनिहि कथा छान सुरु आहेत. या वाचताना मी अजुन एक कथा वाचत होतो त्यात एक खन्जिर चे चित्र होते आनि ३ मित्राचि कथा होति. मला ती कथा आता सापडत नाहि आहे. मी नाव पण विसरलो. प्लिज लिन्क देता का त्याचि? मला ति कथा कोनाचि आहे हे पण आटवत नाहि पण वाचायचि नक्कि आहे. so pls help me & give the link.

सहि.
अभ्यंकर - पटवर्धन संवाद तर ग्रेटच, खुप हासायला आल.
आणि हे काय वेदा आणि ऊमेश ला अ‍ॅक्सिडेंट झाला त्याला गौरी कशि जबाबदार, काय एक एक माण्स अस्तात राव......

बेफिकिर तुमचि वल्ड ऑफ... वाचायला नाहि जमल, पण तिहि मस्तच अस्णार अ‍ॅज युजवल..

नवीन भागाच्या प्रतिक्षेत....

निलेश, तुम्हाला जर त्या कथेचा आशय थोड्क्यात देता आला तर मदत करता येईल ती कथा शोधायला....