ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती ....

Submitted by जिप्सी on 10 February, 2011 - 23:51

ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ही रक्ताची नाती.......

"गाव" प्रत्येक शहरवासी/चाकरमानी यांच्या मनातील एक हळवा कोपरा. जेंव्हा जेंव्हा या कोपर्‍याला गोंजाराल तेंव्हा तेंव्हा याची सय आणखीनच गडद होते. कौलारू घर, सारवलेलं अंगण, अंगणातील रांगोळ्या, तुळशी वृंदावन, गावाशेजारी खळाळत वाहणारी नदी, चारही बाजुंनी डोंगर आणि मध्ये वसलेले छोटेसे गाव,आज्जी/आजोबा आणि गावातील इतर प्रेमळ माणसं यामुळेच तर गावात जायची ओढ सर्वांनाच. गावी जाण्याचा अजुन एक बहाणा म्हणजे गावची वार्षिक यात्रा/जत्रा. प्रत्येक गावात किंवा पंचक्रोशीत असलेल्या एखाद्या गावात वर्षातुन एकदा आपआपल्या कुलदैवतांचा हा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. कुठे तीन दिवस तर कुठे चार दिवस रंगणारा हा जत्रौत्सव आबालवृद्धांना आनंद देणारा असतो.

अशीच दरवर्षी चैत्र अष्टमीला असणारी माझ्या गावची यात्रा. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यापासुन साधारण ४-५ किमी अंतरावरील माझे गाव आहे. जवळच तालुका असल्याने आणि गावाशेजारूनच वाहणारा निरा नदिवरचा (उजवा) कालवा यामुळे बराचसा संपन्न असा हा गाव. (फलटण तालुक्यात श्रीराम मंदिर, निंबाळकरांचा राजवाडा, महानुभव पंथाचे मंदिर आणि ३०-३५ किमी अंतरावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेले शिखर शिंगणापूर, गोंदवले महाराज मठ असे बरेच काहि बघण्यासारखे आहे.) आजोबा पेशाने शिक्षक असल्याने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात बदली झाली आणि आम्ही सगळेच तिथेच स्थायिक झालो. दौंड तालुका शहरच असल्याने गावपण मला कधी जाणवलंच नाही Sad पण फलटण शहरापासुनच साधारण २५-३० किमी अंतरावर असलेल्या जावली या गावी आमचे कुलदैवत "श्री सिद्धनाथ" वसले आहे (निंबाळकर ट्रस्ट). तेथे दरवर्षी चैत्र महिन्यातील अष्टमी/नवमीला भरणार्या देवाच्या यात्रेला आम्ही न चुकता जात असतो. खरंतर हा संपूर्ण महिनाच गावच्या यात्रेचा असतो. साधारण शे-दोनशे उंबर्‍याचे हे गाव गाव कमी पर्जन्यवृष्टीच्या प्रदेशात येतं. जवळच असलेला माण तालुका (दहिवडी) हा तसा दुष्काळीच प्रदेश. एरव्ही शांत असलेला हा गाव मात्र यात्रेच्या दिवसात सारा परिसर माणसांच्या गर्दीने फुलुन जातो. पुरातन असे हे मंदिरही बघण्यासारखे आहे, सध्या ऑईलपेंट दिल्याने याचे मूळे सौंदर्य हरवले आहे. प्रत्येक गावच्या यात्रेची काहि वैशिष्ट्ये असतात. आमच्या गावची यात्राही इतर गावांसारखीच असते, पण सार्‍या पंचक्रोशीत हि यात्रा प्रसिद्ध आहे ती धडका, बगाडं यासाठी. अगदी दुरदुरून माणसे खास यासाठी यात्रेला दरवर्षी न चुकता येत असतात.

"श्री सिद्धनाथ" नवसाला पावणारा असल्याने "जर मला मुलगा झाला तर मी त्याला धडका सोडेन" असा नवस केला जातो. देऊळ परिसरातच देवाचा एक दगड आहे त्या दगडाला तीन वेळा जोरात धडक देणे म्हणजेच "धडका". खास हे पाहण्यासाठी लोक येतात. जेंव्हा या धडका चालु असतात तेंव्हा अक्षरशः नारळ फोडल्याचा आवाज ऐकु येतो. देवावर असलेल्या अपार श्रद्धा असल्याने यामुळे आजवर एकही दुर्घटना घडलेली नाही ऐकीवात नाही. जे या धडका घेतात ते "धडके" म्हणजेच नवसाचे असे म्हणतात. त्यांना या जत्रेच्या दिवसात खुप मान असतो. पण काही वर्षांपासुन हि प्रथा अंधश्रद्धेच्या नावाखाली बंद करण्यात आली आहे.

या जत्रेचे दुसरे आकर्षण म्हणजे "बगाडं". यात देवळाच्या मुख्यद्वाराच्या समोर एका उंच चौथर्‍यावर एका उंच सरळ लाकडाला दुसरे एक लाकुड आडवे लावुन, एका बाजुल नवस करणारे (यात जर एखाद्या महिलेने "मला मुल होऊ दे, मी बगाडं घेईन" असा जर नवस केला असेल तर तिला त्या लहान मुलासहित बगाडं घेऊन नवस फेडावं लागतो.) तर दुसर्‍या बाजुला मानकरी असतात. नवस फेडणार्‍यांचे हात त्या लाकडाला बांधुन त्यांना लोंबकळत देवळाच्या कळसाएव्हढे उंच नेऊन एक चक्कर फिरवतात. हे बघण्यासारखे असते.

चार दिवस चालणार्‍या या जत्रेत पहिला दिवस देवाचे हळद/लग्न, दुसरा दिवस मांसाहारी जेवणाचा, तिसरा दिवस धडका/बगाड याचा आणि शेवटचा दिवस हा "छबिना" म्हणजेच देवाच्या पालखीचा. या चार दिवसांपैकी शेवटच्या दिवशी पहाटे तीन-साडेतीन वाजता "सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं", "जावलीच्या नाथाच्या नावानं चांगभलं", "नाथसाहेबाच्या नावानं चांगभलं" अशा घोषात आणि गुलाल खोबर्‍याच्या वर्षावात, सासणकाठ्या नाचवत देवाची पालखी निघते. या पालखीवर गुलाल खोबरे टाकल्याशिवाय हि यात्रा पूर्ण होत नाही. भल्या पहाटे हजारो/लाखो लोकांच्या साक्षीने देवाची पालखी निघते आणि गावची प्रदक्षिणा घालते. पालखीसोबत असलेले सारे भक्त देवाच्या जयघोषात आणि गुलाल खोबर्‍याच्या वर्षावात न्हाऊन निघतात. गुलाल खोबरे पालखीवर उधळ्यावरच सगळे आपआपल्या मार्गी रवाना होतात.

"श्री सिद्धनाथ" हे बहुतेकांचे कुलदैवत असल्याने यात्रेच्या दिवशी आजही वेगवेगळ्या गावातुन लोक आपआपल्या बैलगाडीला सजवून येतात. गावच्याच शेतात बैलगाडी लावून पाल ठोकुन तीन दिवस मुक्काम करतात. शेतात मांडलेली चूल, त्यातुन निघणारा धूर, त्यातच केलेली ज्वारीची भाकर आणि पिठलं, ठेचा हे कुठल्याही स्टार हॉटेलातील जेवणापेक्षा सुंदर लागत असे. आजही लहानपणी जत्रेत फिरताना आकाशपाळण्यात बसण्याचा केलेला हट्ट, तंबूतल्या थिएटरमध्ये बघितलेला चित्रपट (आजही गावच्या जत्रेत हे हमखास असतेच :-)) हॉटेलातील ती गोल भजी, साखरेच्या पाकातील शेंगदाणे असलेली गुडदाणी, रेवडी, लाल गोडी शेव, कुरमुरे/फरसाण टाकुन केलेली ओली/भेळ, तिखट चरचरीत मिसळ, तालुक्यापासुन गावी जाण्यासाठी खास यात्रेसाठी सोडण्यात आलेल्या "जादा" एस्टीतुन (लाल डब्बा) केलेला प्रवास हे सारे अजुनही आठवतंय. प्रत्येकजण आज काहि ना काहि कारणापासुन आपल्या मूळ गावापासुन, गावच्या नातेवाईकांपासुन दुरावलेला आहे. कामाच्या व्यापातुन गावी भेट द्यायला सवड मिळत नाहि पण या अशा प्रकारच्या यात्रा/जत्रा म्हणजेच सर्वांनी एकत्र येण्याचे साधन आणि ते आजही तेव्हढ्याच मोठ्या प्रमाणात साजर्‍या केल्या जातात हे हि नसे थोडके.

=================================================
=================================================
प्रचि १
मंदिराचे प्रवेशद्वार

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६
मंदिर परिसरातील दीपमाळा

प्रचि ७

प्रचि ८
मंदिराच्या प्रवेशद्वाराआधीचा परीसर

प्रचि ९

प्रचि १०
मुख्य गाभारा

प्रचि ११
श्री सिद्धनाथ प्रसन्न

प्रचि १२

प्रचि १३
गुलालाने माखलेली देवाची पालखी

प्रचि १४
या ठिकाणी धडका घेतल्या जातात

प्रचि १५
मंदिर परिसर

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९
यात्रेच्या दिवशी

प्रचि २०
बगाडं

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
गावातील डाळिंबाच्या बागा

प्रचि २४

प्रचि २५

=================================================
=================================================

गुलमोहर: 

मस्त रे योगेश ...छान वर्णन केले आहेस.फोटोसुद्धा छान.... Happy
आमच्या पण गावची यात्रा मार्चमध्ये असते.गुलाल-खोबर,पालखी ... सगळ डोळ्यासमोर उभ राहिल बघ.
आता मला कधी गावाला जातोय याची ओढ लागुन राहिलेय.

योगेश ते बगाड की काय म्हणतात तो प्रकार मी फक्त सिनेमात पाहिला होता. एकदा तुझ्या गावच्या जत्रेत आलच पाहिजे. Happy
प्रचि आणि वर्णन नेहमीप्रमाणेच सुंदर.

आपलं गाव ते आपलं गाव रे. आमचा आजोळच्या गावाशी संबंध राहिला पण आमचे मूळ गाव राजापूर. तिथे जाणेच होत नाही. एकदा गिरिराज मला घेऊन गेला होता. आता तिथे गंगा आलीय. मी एकदाही बघितली नाही ती.

बगाड मस्तच रे....... मी ते फक्त अगं बाई अरेच्च्या मधेच पाहीलं होत.....
प्रचि छानच... Happy

मस्तच रे योगेश Happy
बगाड प्रत्यक्ष बघायला मजा येत असेल नाही.
डाळींबाची बाग तर एकदम खास Happy

मस्तच रे योगेश.. अगदी गावची आठवण करुन दिलीस... सर्वच प्रचि सुरेख.
बादवे.. प्रचि १५ मधील विरगळ हा राजांची पन्हाळ्यावरुन सुटका आणी बाजीप्रभुंचे विरमरण विषयीचा असावा का अशी शंका आली.

२ डझन. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच यात्रा, उरूस , जत्रा भन्नाट असतात रे मित्रा. बगाड, बोराच्या काट्यात उडी मारणे, घाटावरची बैलगाडा शर्यत , आखाडाला कुस्ती & नॉनव्हेज जेवण. हे ठरलेलं आहे तिकडे.

सगळेच प्रचि एकदम जबरदस्त.

बगाड बद्दलची माहिती मनोरंजक आहे. हे संजय नार्वेकरच्या 'अगंबाई अरेच्चा' या सिनेमात मध्ये बघितल्याचे स्मरते. गावाचे, मंदिराचे वर्णन आणि फोटोही छान. Happy

जिप्सी, फोटो व वर्णन नेहमीप्रमाणेच सुंदर.
पण<<< कौलारू घर, सारवलेलं अंगण, अंगणातील रांगोळ्या, तुळशी वृंदावन, गावाशेजारी खळाळत वाहणारी नदी, चारही बाजुंनी डोंगर आणि मध्ये वसलेले छोटेसे गाव,>>>>>>>>>>हे वर्णन वाचून अगदी बालपणात पोहोचले मी. त्या आठवणींनी मन भरून आले.
आमच्याकडे होळीच्या आधी शिमग्याला गावाचा उत्सव सुरु व्हायचा. ग्रामदेवतेची पालखी गावातील मानकारयांच्या घरी जायची तेव्हा पालखीबरोबरीची असलेल्या वादयांचा आवाज आजही कनात घुमतो. आजुबाजुच्या गावातील देवांच्या पालख्या यायच्या. गावात पालखी आल्याचा आवाज आला कि आमची शाळा शिक्षक सोडून द्यायचे. मग आम्ही पळत पळत घरी जाऊन पालखीच्या पुजेची तयारी करायचो. खूप छान वाटायचं ते वातावरण. होळीच्या दिवशी गावात एकच मोठी होळी पेटवली जायची. उंचच उंचच झाड होळीसाठी असायचे. त्याची पूजा करून होली पेटविली जायची. होळी बघण्यासाठी मान वर करून करून मान दुखायची. पण खरच फार फार मज्जा यायची.
जिप्सी,मनापासून धन्स. आज तुमच्यामुळे पुन्हा सगळया आठवणी ताज्या झाल्या.
फारच लिहिलंय ना? पण लिहिल्याशिवाय रहावेना.

शोभा१२३ अगदी माझ्या मनातल लिहलत... मीपण हे वाचताना आपल्या कोकणात होणार्‍या होळी उत्सवाचीच आठवण झाली . Happy

माहिती पुर्ण लिखाण आणि मस्त प्र.ची.<<<<"गाव" प्रत्येक शहरवासी/चाकरमानी यांच्या मनातील एक हळवा कोपरा. जेंव्हा जेंव्हा या कोपर्‍याला गोंजाराल तेंव्हा तेंव्हा याची सय आणखीनच गडद होते>>>> नकळत डोळे पानवले.........

जिप्सु माझ्यावर एकदम कृपा वगैरे करायचं ठरवलंयस की काय? Happy
सगळी चित्रं सुरेखच अगदी. आणि रंगसंगती पण सुरेख टिपलियेस..

मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून
नायतर देवा, देवा मी जातो दूरून.... Happy

जिप्सी..सुरेख वर्णन रे ..फोटो बघायच्या अगोदरच डोळ्यासमोर येऊन वातावरण निर्माण झालं..त्यात फोटो पाहून उगीचच धकांचा आवाज ही ऐकू आला आणी धडकी भरली Happy
खूप छान..
शोभा तुझा पण मनापासून लिहिलेला प्रतिसाद ही आवडला Happy

आमच्याकडे अजुनही सार्वजनीक गोपाळकाला, जत्रा, होळी तितक्याच उत्साहात साजरी होते पण बालपणी अनुभवलेल्या सणांची सर त्याला नाही. कदाचीत आता बालपणीच्या गमती, खेळ, गप्पांच स्वरुप आता वयाच्या मोठेपणात आल्याने असेल. आता बालपणीच्या स्मृती अजुनही ताज्या ताज्या दरवळतात. आपली मुले आता तो अनुभव घेतील अशी आशा आहे. पण त्यासाठी हे सण साजरे होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपणच पुढाकार घेणे गरजेचे आहे. वेळ नाही ही सबब थोडी बाजुला ठेवली पाहीजे. अजुनही आपण स्वतःला लहान समजुन तितकेच मनोरंजन मुलांना करुन दिले पाहीजे.

वर्णन आणि फोटो दोंन्हीही खुपच छान....
मी ही या वर्ष (ब-याच वर्षातून) मझ्या गावच्या यात्रेला गेलो होतो. म्हणून इतके दिवस मा.बो.वरून गायब होतो.माझ्या गावी खंडोबाची यात्रा असते(सट बोलतात गावी) त्यावेळी गावात लहान मुलांना देवळावरून उधळण्याची प्रता आहे.त्या बद्दल लिहीन मी नंतर ...

मनापासुन प्रतिसाद दिल्याबद्दल रोहित, शुकु, दिनेशदा, चंदन, किश्या, जागू, वर्षा, सुनिलजी, स्मिहा, साजिरा, नाखु, शोभा, दादाश्री, वर्षूदी, मनोज, दक्षिणा, डॅफो, मानस, अभि सगळ्यांचे आभार!!!!! Happy

गावच्या यात्रेचे तुम्हा सगळ्यांना सस्नेह आमंत्रण. यावर्षी साधारण २५-२६ एप्रिल दरम्यान यात्रा आहे.

दा, राजापूरची गंगा कालच तीन वर्षानंतर अवतरली. Happy
शुकु,वर्षा,जागू पुण्यापासुन हडपसर -> फुरसुंगी -> दिवेघाट -> सासवड -> जेजुरी -> निरा -> लोणंदमार्गे फलटण अवघ्या दोन अडिच तासांवरच आहे. Happy

प्रचि १५ मधील विरगळ हा राजांची पन्हाळ्यावरुन सुटका आणी बाजीप्रभुंचे विरमरण विषयीचा असावा का अशी शंका आली.>>>>>>>>मनोज, आता तुम्ही सांगितल्यावर मला ते कळले. Happy असाच एक वीरगळाचा फोटो गोरखगडाच्या पायथ्याशी टिपला होता. घरी जाऊन टाकतो तोपण फोटो इथे. मला वीरगळबद्दल जाणुन घ्यायला आवडेल. Happy

घाटावरची बैलगाडा शर्यत >>>>>>येस्स, हि बैलगाडी शर्यत गेल्यावर्षी मी मंचरला एका गावात यात्रेदरम्यान पाहिली होती. Happy

हे संजय नार्वेकरच्या 'अगंबाई अरेच्चा' या सिनेमात मध्ये बघितल्याचे स्मरते. >>>>स्मिहा, साजिरा, अगदी बरोब्बर Happy या चित्रपटा दाखवले होते याबद्दल, पण चित्रपटात जी व्यक्ती बगाड घेते ती झोपाळ्यात बसल्यासारखी दाखवली आहे आणि आमच्या गावच्या यात्रेत त्या व्यक्तीचे हात बांधुन लटकवून एक फेरी मारतात. Happy

फारच लिहिलंय ना? पण लिहिल्याशिवाय रहावेना.>>>> धन्स शोभा, मनापासुन प्रतिसाद लिहिल्याबद्दल Happy

जिप्सु माझ्यावर एकदम कृपा वगैरे करायचं ठरवलंयस की काय? >>>>> Proud दक्षे बहुतेक तुझ्या ऑफिसातील पिकासा साईट अनब्लॉक केलीयं Happy

त्या बद्दल लिहीन मी नंतर ...>>>>>नक्की लिही, वाचायला आवडेल Happy

बावधनच्या बगाडाची आठवण करून दिलीस!>>>>>अभि, बावधन म्हणजे वाईजवळचेच ना? मीही ऐकलंय बावधनच्या बगाडाबद्दल.

अरे सही, आमच्या कडे माहीपौर्णिमे नंतर सुरु होतात सगळ्या यात्रा.. साधारण याच काळात..धमाल असते. कधीकधी तर एका दिवशी २-३ गावातल्या असतात मग पाहुण्यांनी बोलवलेलं असतं तर सगळीकडे थोडं-थोड जेउन यायचं. २ कोंबड्या मस्त पुरवुन वाढतात. Wink त्यादिवशी पाणी घालुन वाढवलेला रस्सा पण महान लागायचा!:P
शिखर शिंगणापूर माझं माहेरकडुन कुलदैवत.. फार प्रसन्न वाटतं त्या थंडगार गाभार्‍यात.. गर्दी नसताना जायला हवं मात्र.

मग पाहुण्यांनी बोलवलेलं असतं तर सगळीकडे थोडं-थोड जेउन यायचं.>>>>>चिंगी सेम पिंच Happy

शिखर शिंगणापूर माझं माहेरकडुन कुलदैवत.. >>>>गावच्या आमच्या घराच्या ओसरीतुन शिखर शिंगणापूरच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन होते. आमच्या गावापासुन साधारण १५-१६ किमी अंतरावरच आहे. Happy

Pages