गाडी

Submitted by नीलिमा क्षत्रिय on 2 February, 2011 - 09:06

परवा एका मैत्रिणीच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला गेले होते. पहिलाच वाढदिवस असल्यामुळे खूप धूमधडाक्यात साजरा होत होता. फुगे, कागदाच्या रंगीबेरंगी झालरींनी संपूर्ण हॉल सजवला होता. सी.डी.वर
" हॅपी बर्थ डे " ची गाणी वाजत होती. चित्रविचित्र कपडे घालून छोटी छोटी मुले सर्वत्र हुंदडत होती. मुलाचे आई-वडील, आजी-आजोबा, नातेवाईक आलेल्या पाहुण्यांची सरबराई करण्यात गुंतले होते. स्टेजवर एका बाजुला आलेल्या प्रेझेंट्सचा खच पडला होता. मुलगा अजून चालतही नव्हता पण त्याच्यासाठी छोट्या तीन चाकी सायकली, विविध रंगाच्या, आकाराच्या खेळण्यातल्या गाड्या प्रेझेंट आल्या होत्या.

त्या गाड्या बघता बघता माझं मन तीन चार वर्षे मागे गेलं. आम्ही तेव्हा कोकणात ट्रीपला गेलो होतो. आम्ही दोघं, आमच्या दोन मुली, माझा धाकटा भाऊ, वहिणी आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा. हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवे आगर, जंजिरा अशी ट्रिप आटोपून आम्ही परतीच्या वाटेवर होतो. चार मोठी व तीन लहान सीट्स म्हणजे गाडीत तशी गर्दीच झाली होती. त्यात भाचा लहान आणि एकूलता एकच त्यामुळे जरा लाडोबाच. त्याला गाड्यांचं भारी वेड. पँट्च्या खिशात, शर्टाच्या खिशात, हातात अशा चार पाच हॉट व्हीलच्या एक दोन इंचाच्या गाड्या सतत बरोबर असायच्या. पाच-पाच मिनिटाला त्या गाड्यांचं चेकींग करायचा. एखादी गाडी हातातून खाली पडली की भोकाड पसरायचा. बरं चालू गाडीत खाली वाकून त्याची गाडी शोधणंही अवघड व्हायचं. कारण गाडीत हलायलाही जागा नव्हती. मग दर पंधरा मिनिटांनी, अर्ध्या तासाने गाडी थांबवून सगळी मंडळी खाली उतरायची. सीट खाली त्याची गाडी शोधायचो मग पुढे निघायचो. असा सगळा प्रवास सुरू होता.

दुपारी साडे तीन-चार वाजता चहाची आठवण झाली म्हणून एका टपरी वजा हॉटेल जवळ थांबलो. तिथे भाच्याचा दूध पिण्याचा कार्यक्रमही पार पडला. नुसतं दूध नको, त्यात चहा टाक, हे बिस्किट नको, क्रिमचंच पाहिजे. रडणं, सांड-लवंड सगळे प्रकार झाले. परत गाडीकडे वळलो. तोच त्याची पिवळ्या रंगाची गाडी खिशात नाही असे त्याच्या लक्षात आलं आणि एकच तांडव नृत्य सुरु झालं. आमच्याबरोबरच हॉटेलमधील माणसेही ती पिवळी गाडी शोधू लागली.

हॉटेलच्या शेजारीच एक लोहाराचं खोपटं होतं. खोपटावर गवताचं छ्प्पर, बाजुने प्लास्टिकचे कागद लावून आडोसा तयार केला होता. समोर भाता, तिथेच एक बाई काही काम करीत होती. आणि तिचं लहानसं दिड-दोन वर्षाचं मूल सापडलेली पिवळी गाडी कुणाला दिसू नये अशा रितीने आईच्या आडोशाला खेळत होतं. हॉटेल मालकाच्या ते लक्षात आले. त्याने बोटाने खूण करून मुलाच्या हातातील गाडी दाखवली. तसा तो छोटा मुलगा आईच्या पदरात गाडी लपवू लागला. इकडे त्याच्या हातात आपली गाडी बघून भाचा आणखीच थैमान घालू लागला. त्या बिचार्‍या मुलाचा केविलवाणा चेहरा बघून त्याच्या हातातून गाडी घ्यायचा आमचा जीव होईना. आणि भाचाही ऐकेना. दुसरं खेळणं त्या मुलाला घेऊन देवू म्हटलं तर जवळपास दुकानंही नव्हतं. शेवटी यांनी एक बिस्किटचा पुडा त्या मुलाच्या हातात दिला. त्याच्या आईने हळूच गाडी त्याच्या हातातून काढून आमच्याकडे दिली. हातात बिस्किट्चा पुडा होता पण त्याची नजर अजून गाडी सोडत नव्हती. तो रडवेला झाला पण त्याने जराही हट्ट केला नाही. फक्त एकदा आईकडे नाराजीने पाहिले. आईने अगतिकपणे मुलाचा रडवेला चेहरा आपल्या विरविरित पदराने पुसण्याचे निमित्त करून झाकला. जणू मुलाच्या डोळ्यांतली आशा-अपेक्षांची ठिणगी ती आपल्या फाटक्या मायेच्या वर्षावात विझवू पाहत होती. आमची गाडी रस्त्याला लागेपर्यंत तो मुलगा बिस्किटे खाण्यात गुंगही झाला होता.
मला मात्र आजही तशा खेळण्यातल्या छोट्या गाड्या दिसल्या की, त्या लोहाराच्या मुलाची आठवण होते. आणि विचार पडतो, कुठून बरं येत असेल गरिबांच्या मुलांमधे एवढा समजूतदारपणा? कुठुन येत असेल मनावर ताबा मिळवण्याची शक्ती? गरिबीमधे काय अशी ताकद असते की, दोन वर्षांच्या मुलालाही अकाली शहाणपण यावं?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वाईट वाटलं वाचून Sad
कुठून बरं येत असेल गरिबांच्या मुलांमधे एवढा समजूतदारपणा? कुठुन येत असेल मनावर ताबा मिळवण्याची शक्ती? गरिबीमधे काय अशी ताकद असते की, दोन वर्षांच्या मुलालाही अकाली शहाणपण यावं? >>> हे प्रश्न मलाही खूपदा पडतात. कधीकधी अकबर-बिरबलाची बागेतले गुलाब आणि ऊनपावसात तगून राहिलेले रानटी गुलाब ह्यांची गोष्टही आठवते. परिस्थिती माणसाला घडवते हेच खरं !

कुठुन येत असेल मनावर ताबा मिळवण्याची शक्ती? गरिबीमधे काय अशी ताकद असते की, दोन वर्षांच्या मुलालाही अकाली शहाणपण यावं? >>>> आपल्याला हे मिळणंच शक्य नाही याची जाणीव मनात कुठेतरी नक्की असेल, त्यामूळेच. कधीच काहीच हवे ते मिळत नाही अन् मिळाले तरी हातातून निघून जाते हे त्या चिमुरड्यालाही समजले होते. :(.
छान लिहीलाय लेख.

वाईट वाटलं वाचून. माझ्या मुलालाही अशाच हॉट व्हिलच्या चार पाच कार कायम खिशात न्यायची सवय आहे. मी तुमच्या जागी असते तर काय केलं असतं हा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही.

तुमच्या वहिनीला त्याच्या नकळत एक दोन कार स्वतःच्या पर्समध्ये टाकायला सांगत जा.

फारच छान!! मन हेलावुन गेले.
तुमचा भाचा= माझा मुलगा.
स्टेशनवर एका भिकारि बाइच्या पुढ्यातिल कपड्यात सामोसा पाहुन, "मला मामोसा हवे..." म्हणुन रडत बसलेला. त्या बाइचा चेहरा बघण्यासारखा झालेला...

Sad वाईट वाटले.
मेधासारखेच म्हणते की भाच्याचे लक्ष नाहीसे पाहून एखादी गाडी देऊन टाकायची होती जमण्यासारखे होते तर. अशी चुटपुट लागून राहिली नसती...

Pages