घर - ८

Submitted by बेफ़िकीर on 29 January, 2011 - 02:11

असा दिवस स्वप्नातही नव्हता गौरीच्या!

गेल्या दोन महिन्यात सहन केलेले टोमणे, त्यावर अजिबात प्रत्युत्तर न देण्याची जिंकलेली कसोटी आणि घरकामात कोणताही हलगर्जीपणा न दाखवण्यातील सातत्य या तिच्या गुणांमुळे अंजली वहिनी आणि तारका वहिनींना 'आता काय करावे' हे समजेनासे झालेले होते. अण्णाच्या विनोदी मिश्कील स्वभावाने उलट वातावरण थंड थंडच होत चालले होते. वसंताने 'गौरीला असे बोलत जाऊ नका, तसे बोलत जाऊ नका' हे विधान करण्याचे धाडसही पुन्हा केलेले नव्हते.

या सर्वाचा परिणाम असा झाला होता की अंजली वहिनी आणि तारका वहिनी या दोघींना गौरीबाबत कागाळी करण्याची संधीच मिळत नव्हती. आणि त्यातच एप्रिल महिन्याच्या अखेरीस मुलांच्या परीक्षा संपल्या आणि अंजली वहिनी उमेशला घेऊन रत्नागिरीला गेल्या पंधरा दिवसांसाठी! त्यातच तारका वहिनी आपल्या सख्या भावाकडे म्हणजे मुंबईला निघून गेल्या दोन आठवड्यांसाठी! वेदा आणि उमेश दोघेही घरातून निघून गेल्यामुळे सुने सुनेपण आलेले असले तरी ते दोघे परत येतील तेव्हा गीतावहिनीही बिगुलला घेऊन पंधरा दिवस पुण्यात येणार आहे या माहितीमुळे 'मे महिना' मस्त जाणार याच आनंदात सगळे पटवर्धन कुटुंबीय होते.

लग्न झाल्यानंतरच्या दोन महिन्यात गौरीने कमावलेले स्थान म्हणजे: ही कुणालाही कधीही उलटून बोलत नाही, सगळ्यांच्या सल्ल्याने घरात वागते, जे असेल ते काम करते, नाही म्हणत नाही आणि हिच्या एकटीवर सगळे काम सोपवणे शक्य आहे हे सर्वांना जाणवणे! त्यातच गौरीने कटाक्षाने एक गोष्ट मात्र जाणीवपुर्वक केलेली होती. ती म्हणजे वेदा आणि उमेषवर प्रेमाची बरसात करणे!

या गोष्टीचा परिणाम असा झाला होता की मुले आता सारखी 'गौरीताई गौरीताई किंवा गौरीकाकू गौरीकाकू' करू लागलेली होती आणि नाही म्हंटले तरी अंजली आणि तारका या दोघींना गौरीचे स्थान महत्वाचे आहे ही फॅक्ट मनातल्या मनात स्वीकारावीच लागलेली होती. इतकेच नाही तर 'ही आपल्या मुलांचे इतके प्रेमाने करते, तेही हिची स्वतःची मुले अपघातात गेलेली असताना' या गोष्टीमुळे तर दोघींचे तिच्यावर प्रेमही बसलेले होते.

घरातल्या बाईचे वागणे कसे आहे यावर घरातील कित्येक बाबी अवलंबून असतात हे गौरीने सिद्ध करून दाखवले होते. स्त्रीने कायम मान खाली घालून सोसतच बसावे असे तिला मुळीच म्हणायचे नव्हते. पण प्रत्येक कुटुंब सदस्याच्या इगो दिलखुलासपणेही जपता येतो आणि दरवेळेस तो मोडूनच काढावा लागतो किंवा सोसावाच लागतो असे नाही हे महत्वाचे तत्व तिच्या वागण्यातून निर्माण होत होते. ही बाब तर गीतावहिनी सासरी आल्यावरही झालेली नव्हती.

दिलखुलासपणे दुसर्‍याचा इगो जपतानाच त्याला 'आपला इगो आपण थोडा तरी सोडायला पाहिजे' असे वाटायला लावणे हे अती कौशल्याचेच काम म्हणावे लागेल. उदाहरणार्थ बाजारातून भाजी आणणे हे काम तारका कधीही कुणावरही सोडत नव्हती. यामागची तिची भूमिका अशी की माझा नवरा जर भाजीचे पैसे देत असेल तर कोणती भाजी आणायची हेही मीच ठरवणार! मोठ्या माणसांना भाजीबाबत विशेष काहीच आवडीनिवडी नसल्यामुळे कोणतीही भाजी असली तरी चालायचे. पण वेदा आणि उमेषच्या आवडीनिवडी होत्या. उमेषला न आवडणारी भाजी तारका आठवड्यातून एकदा तरी आणायचीच! यात तिचा 'अंजलीला दुखवायचे' असा हेतू नसला तरीही 'माझा हे करण्याचा अधिकारच आहे' हे दाखवण्याचा हेतू असायचाच! मग ती काही ना काही कारणे सांगायची. 'ही भाजी पौष्टिक असते, आज दुसर्‍या भाज्या तितक्या चांगल्या नव्हत्या' वगैरे!

गौरीला यात पडण्याचे खरे तर कारण काहीच नसायचे. पण एकदा सकाळी काही कारणाने तारकाला भाजी आणायला जाणे जमत नव्हते तेव्हा गौरी भाजी आणायला गेली. तिने आणलेल्या भाजीबाबत तारकाने 'भाजी घरात आल्यापासून ते जेवणे होईपर्यंत' किमान चार वेळा तरी 'भाजी आणणे हे एक कौशल्याचे काम आहे आणि ते तू तितकेसे व्यवस्थित केलेले नाहीस' हे दाखवून दिले बोलण्यातून! पण प्रत्येक वेळी गौरीचे दिलखुलास हासून एकच वाक्य!

"उद्यापासून तुम्ही जाल तेव्हा मीही येऊ का? मलाही शिकता येईल! खरे तर आईनेही कधी शिकवले नाही मला भाजी आणताना कशी आणायची ते!"

हा एक मोठा त्याग होता. ज्या बाईला आज दोन मुले झालेली होती, जिने गीतावहिनीपेक्षाही जास्त काळ संसार केलेला होता, जिला घर कसे चालवायचे याचे यच्चयावत ज्ञान होते, तिला कमीपणा घ्यावा लागत होता. स्वतःच्याच माहेरी 'हे प्रशिक्षण झाले नाही' असे स्वतःच म्हणावे लागत होते.

याचा परिणाम इतकाच झाला की तारकाचे बोलणे आता घरातल्यांना 'एक कुत्सितपणा' वाटू लागला तर गौरीचे बोलणे हा 'एक दिलदारपणा'!

आणि गौरी हे बोलताना 'मी मुद्दाम तुम्हाला मान देतीय, तसे पाहायला गेले तर मला हे सगळे तुमच्यापेक्षाही जास्त कळते' अशी झाकही बोलण्यात येऊ देत नव्हती. तिच्या चेहर्‍यावरील आविर्भाव आणि स्वरातील मोकळेपणा अत्यंत शुद्ध होता. त्यात उपहासाची भेसळ नव्हती.

आणि लहान मुलांना त्याचे काय??

वेदा तर सगळ्यांसमोर म्हणाली.

"दुपारपासून चार वेळा ऐकलं आई तुझं.. तू पण असलीच भाजी आणतेस की? काय वाईट आहे?"

स्वतःच्याच पाचवीतल्या मुलीने हा शुद्ध जोडा मारल्यावर तारकाचा खरे तर संताप झालेला होता, गौरीबाबत असूया वाढलेली होती. पण आता सावरून घेणे शक्य नव्हते.

संसारातील जादू हीच असते.

माणसे स्वतःकडे जितका अधिक कमीपणा घेतील व दुसर्‍याला जितके अधिक महत्व देतील तितका संसार चांगला होण्याची शक्यता वाढते.

या आणि अशा अनेक प्रसंगातून वारंवार दृष्टीस पडणारे गौरीचे व्यक्तीमत्व आता एक 'नम्र, दिलखुलास, मिळून मिसळून वागणारी आणि कामसू' मुलगी असे झालेले होते. मनातल्या मनात वसंताच्या पसंतीस सगळेच दाद देत होते. पण ते बोलून दाखवणे हा आता कमीपणा ठरणार होता आणि....

.... कमीपणा घेणे हे गौरीशिवाय त्या घरात कुणालाही जमत नव्हते.

आक्का या गौरीच्या आईंचे आता या घरात येणे जाणे मुद्दाम कमी झालेले होते. कुणाला असे वाटू नये की आई समोरच राहते म्हणून सारखीच लक्ष ठेवायला येते. गौरीनेच गोड बोलून ते कमी केलेले होते. सणासुदीला किंवा काही विशेष कारणाने त्या आल्या किंवा ही तिकडे गेली तरच! दिवसातून एकदा मात्र ती आईला भेटून यायची आणि चौकशी करायची. मात्र आईची मदत घेऊन ती काहीही करायची नाही.

आणि त्यातच त्या दिवशी त्या विषयावर वादळी चर्चा झाली. वसंता हॉटेल टाकणार या विषयावर! वसंताने आधी भागीदार शोधलेले होते पण आता तो एकटाच ते काम करणार होता. कारण भागीदारांनी रस नसल्याचे शेवटच्या क्षणी सांगीतलेले होते.

भिकारदास मारुतीजवळच्या त्या पडीक टपरीवजा जागेत वसंता उपहारगृह चालवणार होता. पाच हजार डिपॉझिट आणि बाराशे रुपये भाडे! भाडे देण्याइतका तर वसंताचा पगारही नव्हता. डिपॉझिटचे पैसे त्याने कसेबसे जमा केलेले होते. कारण त्याने साठवलेले पैसे त्याने लग्नात वापरलेले होते आणि त्यानंतर सेव्हिंग असे झालेलेच नव्हते. त्याच्याकडे स्वतःचे असे जेमतेम पाच हजार होते ज्यातील दोन हजार त्याने डिपॉझिटसाठी वापरलेले होते. आणखीन तीन हजार त्याने त्याच्या अनेक मित्रांकडून थोडे थोडे करत जमवलेले होते. सख्या भावांकडून मात्र एक पैसाही मागीतलेला नव्हता. इतकेच काय तर त्यांना या प्रकाराची कल्पनाही एकदम एका रात्री जेवतानाच दिलेली होती. या शिवाय त्याला हॉटेलमध्ये जी भांडी, डिशेस वगैरे लागणार होते ते त्याने रविवारातून थोडे थोडे आणून ठेवलेले होते. मुळात वसंताला एक आचारी ठेवावा लागेल की काय याची काळजी वाटत होती. कारण त्याला स्वतःला सॅम्पल नीट करता यायचे. मात्र भजी करणे, चहा करणे ही कामेही आपणच करायची आणि सर्व्हीसही आपणच द्यायची हे जमेल की नाही याची त्याला काळजी वाटत होती. उपहारगृहाचे लायसेन्स मिळण्याची प्रक्रिया मात्र अपेक्षेपेक्षा सुलभ झालेली होती. आता प्रश्न होता तो दर महिना द्यावे लागणार असलेल्या भाड्याचा! हे भाडे देण्याइतका निदान धंदा तर व्हायला पाहिजे? वसंताला अंदाज नसला तरी इतके माहीत होते की त्या भागात अर्ध्या किलोमीटरमध्ये तरी असे हॉटेल नव्हते. नशीबाने त्या टपरीत पुर्वी कधीतरी हॉटेलच असल्यामुळे दोन टेबले आणि चार जुनाट खुर्च्या तेवढ्या होत्या. भिकारदास मारुती हा एक महत्वाचा बस स्टॅन्ड असल्यामुळे कन्डक्टर व ड्रायव्हर यांच्या जीवावर तरी चहा भजी जातीलच असा त्याला विश्वास होता. आणि त्याने घरच्यांना 'एकदम समजले' असे व्हायला नको म्हणून महिनाभर आधीच तो विषय काढला.

सगळे उडालेच! पहिले मत आईंनी दिले.

आई - काहीतरी धाडशी करू नकोस.. अंगाशी येईल..

व्वा! काय पण आशीर्वाद होता तो! पण हे सगळे वसंता आणि गौरीला अपेक्षित होतेच!

बाबा - हे काय आता नवीन काढलंयस??

वसंता - हातपाय तर हालवायलाच हवेत.. चितळ्यांकडे काय आयुष्यबर नाही राहता येणार ना?

आई - अरे पण नोकरी शोध ना दुसरी? हे हॉटेल वगैरे आपल्यासारख्यांचे काम नसते वसंता..

वसंता - आता डिपॉझिट सुद्धा दिलंय मी...

बाबा - आणि आता सांगतोयस हे??

हा एक महत्वाचा प्रॉब्लेम होता या घरातला! प्रत्येकाने आपल्या योजना, प्रगती, अडचणी सर्व काही जाहीररीत्या डिस्कस करावे अशीच सगळ्यांची अपेक्षा आणि तसेच संसार!

संसारात अशी अपेक्षा असणे चूक की बरोबर यावर प्रत्येकाची मते भिन्न भिन्न असतीलही! पण इतके तर मान्य व्हावे की प्रत्येक जण आपले आयुष्य पूर्णपणे जाहीररीत्या नाही जगू शकत! अनेक बाबी असतात ज्यावर आपणच निर्णय घ्यायचा असतो. प्रत्येक गोष्टीत दुसर्‍यांचा हस्तक्षेप, ते दुसरे अगदी आपले रक्ताचे नातेवाईक असले तरीही, शक्य नसतो. हस्तक्षेप तर दूरच राहो, नुसती चर्चाही शक्य नसते. याचे कारण 'सल्ले देणारा माणूस आपल्याच कुटुंबातील असला' तरीही त्याचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला आपल्याकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन असतो तितका साफ नसतो. उदाहरणार्थः आत्ताच हे ऐकून अंजली वहिनीच्या मनात आले की आता वसंता भावजी श्रीमंत होणार आणि ही गौरी डोक्यावर बसू शकेल. हा विचार त्यांच्या मनात अगदी नैसर्गीकपणेच आलेला होता. शेवटी हॉटेल म्हंटले की 'ते चालणार आहे की नाही' य विचारापेक्षा 'यांचा अर्थिक स्तर आपल्यापेक्षा उंचावला तर' हाच विचार मनात येणे साहजिक होते कारण बघण्याचा दृष्टिकोनच तुलनेचा होता. असा दृष्टिकोन अर्थातच वसंता व गौरीचा असू शकत नव्हता. ते दोघे केव्हाही स्वतःचा विकास आधी बघणार होते. आणि यामुळेच वसंताने हे गुपीत आज फोडलेले होते. कुमारदादाला मात्र वसंताचीच काळजी!

दादा - अरे पण.. पैसे होते का तुझ्याकडे डिपॉझिट द्यायला??

आता असे सांगणे की मी ते मित्रांकडून जमवले हे योग्य ठरणार नव्हते. कारण यात 'मला तुमची जरूर नाही' असे सांगीतल्यासारखे होणार होते.

वसंता - जमवले होते थोडे मी... तेच घातले..

दादा - पण... हे कधी ठरवलंस?? कुणाची जागा आहे?

वसंता - तळवलकर... गेल्या आठवड्यातच कळली ती जागा!

गेले दोन महिने मी या प्रस्तावावर विचार करत आहे हेही सांगणे प्रशस्त नव्हते.

दादा - किती डिपॉझिट म्हणालास?

वसंता - पाच हजार...

दादा - अन भाडे??

वसंता - बाराशे!

आई - बाराशे??? अरे काय हे वसंता?? इतके भाडे कसे परवडेल??

तारका - हॉटेल काढणारेत ते आई... आता काय.. पैसा नुसता वाहणार... काळजी कसली करताय??

तारका वहिनींचे हे प्रेमाच्या मुलाम्यातील शब्द उपहास घेऊन आले आहेत हे वेदा आणि उमेशलाही समजू शकत होते.

आई - वसंता.. इतका मोठा निर्णय.. आणि असा अचानक घेतलास? मोठ्या भावांशी तरी बोलायचंस..

वसंता - बोलतोच आहे की आता... दादा... तुला मान्य आहे ना??

वसंताचा हा प्रश्न गौरीला अजिबात पटलेला नव्हता. कारण आजवर असलेल्या अडचणींमध्ये दादांनी काहीही मदत केलेली नव्हती. अर्थात, घरखर्चातील फारच कमी भाग वसंताला बेअर करावा लागत होता ते दादा आणि अण्णामुळेच, हे त्या दोघांचे उपकार तिला मान्य होतेच! पण हा प्रश्न तिच्या आणि वसंताच्या आयुष्याचा होता. त्यात परवानगी घेणे हे योग्य नव्हते असे तिला वाटले. पण तिचे आणि वसंताचे पहिल्या रात्री ठरलेले होते. 'आपल्या दोघांना सतत सिद्धच होत राहावे लागणार आहे'! त्याप्रमाणेच ती आत्ताही गप्पच बसली.

इकडे कुमार काय बोलतो याकडे आई आणि बाबांचे लक्ष होते. तसे तर सगळ्यांचेच लक्ष होते.

दादा - वसंता.. हे साहसी पाऊल आहे... मी, शरद आणि राजू तुला लागेल ती मदत करूच.. पण एक लक्षात ठेव.. धंदा करताना चोवीस तास धंद्याचाच विचार मनात राहतो... त्यातून सुटका मिळत नाही.. त्यात चढ उतार खूप असतात... रिस्क असते.. त्यात आणखीन हा हॉटेलचा धंदा... आपल्याकडे सर्व्ह केल्या गेलेल्या अन्नामुळे कुणालाही काहीही त्रास होत नाही ना या बाबीकडे डोळ्यात तेल घालू लक्ष ठेवावे लागते... त्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे... धंदा करणारा माणूस...

दादाने घेतलेला तो पॉज असह्य होता. सगळ्यांनीच मान दादाकडे वळवली.

दादा - धंदा करणारा माणूस... त्याच वृत्तीचा बनायला लागतो.. वैयक्तीक आयुष्यातही तो नफा तोटा यांचाच विचार करतो... कारण धंद्याचा तो प्रभाव असतो....

वसंता - पण.. तू आता दुकान चालवतोस.. तू कुठे तसा झाला आहेस??

दादा - दुकान ही माझ्यासाठी एक नोकरी आहे वसंता.. ते दुकान बाबांचं आहे..

वसंता - मग... बाबा तरी तसे कुठे झाले??

दादा - तो काळ स्पर्धेचा नव्हता रे... तेव्हा स्टेशनरी विकणारे फार कमी असायचे.. हा काळ स्पर्धेचा आहे..

वसंता - म्हणजे??

दादा - उद्या तुझ्यासमोर कुणी अधिक चांगले किंवा अधिक स्वस्त पदार्थ देणारे हॉटेल टाकले तर तुझ्यावर ताण येणारच ना?? नोकरीत तसे नसते.. आपली रिस्क फक्त पगार न मिळण्याइतकी आणि नोकरी जाण्याइतकीच असते... त्यात मनाला ताण फार कमी असतो... तसेही, पगार न मिळणे किंवा नोकरी जाणे हे सहज होऊ शकत नाही..

खरे तर गौरी सगळ्यात लहान होती. म्हणजे मानाने लहान होती. वयाने ती काही लहान नव्हती. गीतावहिनीचे अन तिचे वय एकच होते. पण आत्ता चाललेली चर्चा ही तिच्या वैवाहिक आयुष्यावर सहज प्रभाव टाकणार्‍या बाबीवरची चर्चा होती. त्यामुळे उत्स्फुर्तपणे तिच्या तोंडातून शब्द निघून गेले, तेही, दादाला ती इतरांपेक्षा अधिक जवळचे मानत होती म्हणूनच!

गौरी - पण दादा.. अधिक उत्पन्नासाठी काहीतरी करावे लागणारच ना??

झाले! भडका उडायला सुरुवात झाली. गौरीने कुमारदादाचा उल्लेख 'दादा' असा केलेला होता. अंजलीला ते पाहावले नाही.

अंजली - गौरी.. आता तू इथे सासरी आली आहेस.. ह्यांना दादाभावजीच म्हणत जा..

गौरीने जीभ चावली. 'सॉरी, चुकून तोंडातून गेले' असे म्हणून ती गप्प बसली.

कोणत्यातरी कारणावरून गौरीला चेचायला मिळाले याचा अंजली आणि तारकाला आनंद झालेला होता.

दादा - तुझं म्हणणं खरं आहे गौरी.. पण सर्व बाजूंनी विचार करायला हवा..

गौरीला मात्र 'गौरी वहिनी' असे संबोधायला पाहिजे हे कुणालाही सुचत नव्हते.

बाबा - काय काय बनवणार आहेस हॉटेलमध्ये??

वसंता - मिसळ, भजी, चहा आणि पाव सॅम्पल..

वेदा - येतं हे सगळं तुला वसंतकाका??

वेदाने या संवादात पडू नये म्हणून पटकन अण्णाने खुण केली तशी वेदा आणि उमेश उठून बाहेर निघून गेले.

बाबा - मदतीला कुणी आहे की एकटाच??

वसंता - दोन पार्टनर घेणार होतो.. पण त्यांनी नकार दिला..

बाबा - का?

वसंता - ... त्यांना आत्ता परवडत नाही आहे...

बाबा - तुला तरी कुठे परवडतंय??

वसंता - हो पण मला प्रयत्न तर करायलाच हवा..

बाबा - जागेचे कागदही झाले??

वसंता - ... हो...

बाबा - आणि हॉटेलला लायसेन्स लागते ना??

वसंता - हो.. तेही मिळेल दोन चार दिवसात...

बाबा - बघ बाबा.. मला तरी हे सगळं ... जरा अवघडच वाटतंय....

अण्णा - पण एक बरं झालं... काही फन्क्शन असलं की वसंतालाच ऑर्डर देऊन टाकायची.. कन्सेशनही देईल..

अण्णाच्या या विधानावर गौरी आनंदाने हासली.

दादा - हो पण कन्सेशन देईल म्हणून मुद्दाम फन्क्शन करायची नाहीत...

आता सगळेच हासू लागले, आई सोडून!

आई - वसंता.. एकदा त्या बिडकरांना पत्रिका तरी दाखव.. म्हणाव असं असं करतोय.. लाभेल की नाही ते बघा..

वसंता - ह्या! माझा नाही विश्वास!

तारका - मोठी माणसं सांगतात ते उगीच नसतं..

वसंता - वहिनी.. समजा बिडकर म्हणाले लाभणार नाही.. तर काय डिपॉझिट परत मागायचंय का??

तारका - म्हणूनच घरात वेळच्यावेळी बोलाव सगळं...

वसंता - मी आधी बोललो असतो तर मला हे करूच दिलं नसतं दादाने..

दादा - असं का म्हणतोस?? तुझं चांगलं होत असेल तर मी मदत नाही का करणार??

वसंता - तू घाबरतोस..

दादा - नाही रे बाबा.. मला काळजी वाटते ती तू जी रिस्क घेतोयस त्याची.. आणि काही झालं तरी सगळे आहोतच की आपण... काढ बिनधास्त हॉटेल... आत्ता काही पैसे वगैरे हवे आहेत का??

वसंता - अं.. नाही... आत्ता तरी नकोयत.. पण लागले तर सांगेन..

मोठ्या भावाला तितका तरी मोठेपणा द्यायलाच पाहिजे हे वसंताला सुचले..

अण्णा - आम्हीही लागले तर सांगूच.. आज दहा प्लेट मिस्सळ पायजेल... तर्री मारके..

सगळ्यांच्याच चेहर्‍यावर स्मितहास्य येऊ पाहात असतानाच अंजली वहिनी म्हणाल्या..

अंजली - डिपॉझिट देण्यापेक्षा आक्कांनाच थोडं भाडं दिलं असतं तर घरासमोरच हॉटेल झालं असतं की..

गौरी एकदम बोलून गेली.

गौरी - आईला कसं चालेल घरात कुणीही आलेलं??

नक्शाच बदलला मीटिंगचा!

अंजली - का? जावयाचंच आहे ना हॉटेल?? आणि मुलीचं सासर समोरच आहे की! कुणीही आलेलं म्हणजे काय? आता हॉटेल म्हंटलं की गिर्‍हाईकं येणारच ना?

वसंताने नजरेने दाबल्यामुळे गौरी गप्प बसली तरीही तारकाने मोठ्या जावेची री ओढलीच!

तारका - यांच्या माहेरी असले व्यवसाय नाही चालायचे वहिनी.. सासरी चालू शकतात..

हा टोमणा अनाठायी होता. अनावश्यक होता. मध्येच आक्कांच्या घराचा मुद्दा काढण्याची गरजच नव्हती. त्यावरून तुमचे माहेर, आमचे माहेर, तुमचे सासर असले टोमणे मारायची तर अजिबातच गरज नव्हती.

गौरीच्या डोळ्यात पाणी तरळल्याचा भास वसंता आणि दादा दोघांनाही झाला.

दादा - आता हा विषय थांबवा.. तो काहीतरी चांगलं, मोठं करायला चाललाय.. त्याला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत..

अंजली - शुभेच्छा आहेतच.. आमची का नजर लागणार आहे??

तारका - मग काय हॉटेलीण बाई?? आता हाताखाली नोकरचाकर येणार तुमच्या..

हासत हासत तारकाने टाकलेले हे वाक्य हेव्यादाव्यातून आलेले आहे हे गौरीला समजले. तिने प्रयत्नांती दाबून ठेवलेला आपला प्रक्षोभ आता उसळत आहे हे ध्यानातच घेतलं नाही.

गौरी - माझ्या आधीच्या सासरी तीन नोकर होते... मला काही ते नवीन नाही...

यावेळेस मात्र वसंता गौरीवरच ओरडला. तशी ती रडायला लागली आणि आवराआवर करायला लागली. काही वेळाने आईंनी तिला तारकाची माफी मागायला लावली. तेव्हा मात्र गौरीने अगदी वाकून सगळ्यांना नमस्कार केला. तारका मात्र अजूनही ताठ्यातच खुर्चीवर बसून डोळे वटारून बघत होती. दादाने अण्णाला सांगीतले..

दादा - शरद... वहिनींना म्हणाव आता रागलोभ सगळं विसरून जा.. वसंताच्या पाठीशी आपल्याला उभं राहायला हवं..

त्या दिवशी रात्री आपल्या खोलीत वसंता गेला तेव्हा कूस वळवून झोपलेली गौरी अजिबात झोपलेली नाही आहे हे त्याला व्यवस्थित माहीत होते.

"गौरी... मी जे बोलतो ते फक्त ऐक.. नंतर तुला काय बोलायचे असेल ते बोल.."

गौरीने हालचालही केली नाही. वसंता पुढे बोलू लागला.

"आज जसा तारकावहिनींशी बोलताना तुझा तोल गेला.. अर्थात.. त्याला तोल जाणे म्हणणेही योग्य नाही म्हणा... तसाच माझा तुझ्यावर ओरडताना तोल गेला... हे सगळं का होतंय माहीत आहे??... कारण आपण दोघेही कसलेतरी टारगेट आहोत.. कशाचे ते माहीत नाही.. तसे तर आपण सगळ्यांपेक्षा गरीब आहोत.. तुझ्या आधीच्या सासरी तुमची गाडी होती, वैभव होते, ते सगळे सोडून तू इथे आलेली आहेस.. अर्थात, ते सोडून म्हणजे त्या आठवणी सोडून.. काहीश्या बाजूला ठेवून.. पण तुझे आधीचे वैभव यांना पाहावत नव्हते.. तेव्हापासूनच... तू सासरी गेल्यापासूनच या दोघींमध्ये खूप चर्चा व्हायची.. ही काय.. साधी आमच्याचसारखी एक मुलगी... आता अगदी तोरा मिरवतीय वगैरे... तेव्हापासूनच मला माहीत होते की या दोघींच्या मनात तुझ्याबद्दल राग आहे.. हेवा आहे.. पण तेव्हा त्याचा प्रश्नच नव्हता.. आता तो प्रश्न येतो कारण तू मनाचा मोठेपणा दाखवून मागच्या आठवणी कधीही न काढता या संसारात रमत आहेस.. मात्र त्यांना ते तुला पदोपदी दाखवून द्यायची इच्छा असणार हे मला माहीत आहे.. की आधी तुझे कितीही वैभव असले तरी आता तू आमच्याहीपेक्षा सामान्य आहेस..

... एक लक्षात घे की वेळ पडली तर याच दोघी तुझ्यासाठी वाट्टेल ते करतील.. पण अशी वेळ आयुष्यात एक दोनदाच येते गौरी... एरवी नेहमीचा नित्याचा संसारच चालू असतो.. आणि त्यात हे असेच हेवेदावे, तिखट संवाद, हेच सगळे असते...

... तुला आज माझा खूप राग आला असेल.. तुला वाटले असेल की शेवटी मी घरातील प्रथाच पाळणारा आहे... घरात मोठ्यांविरुद्ध बोलायचे नाही असे संस्कार कोणत्याही परिस्थितीत पाळणारा आहे.. अगदी त्यांनी पदोपदी हिणवले तरीही... पण तसे नाहीये गौरी.. मी तू तारकावहिनींना बोललीस म्हणून नाही ओरडलो तुझ्यावर.... तारका वहिनींना तू जे म्हणालीस ते अगदी योग्य, त्या वेळेस संयुक्तिक असेच होते.. त्यांनी कोणत्याही शुद्ध हेतूने तुझी गोड थट्टा केलेली नव्हती.. त्यांचा हेतूच तुला हिणवण्याचा होता..

मी का ओरडलो माहीत आहे??

मी यासाठी ओरडलो की तू आणि मी या दोघांबाबत कुणीही कधीही असे म्हणू नये की... हे आम्हाला त्या दिवशी असे असे बोललेले होते.. आपल्या दोघांवर फार फार मोठी जबाबदारी आहे गौरी.. ती म्हणजे 'आपण कधीच कुणाला दुखावले नाही' असे सिद्ध करण्याची...

आता हे सगळे असेच का असा प्रश्न तुझ्या मनात येत असेल तर त्याचेही उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो.. आज आपण कुणालाही दुखावू शकतो.. काय प्रॉब्लेम आहे?? काहीच नाही... अगदी घराबाहेर काढले तरी काही वेळ आपण तुझ्या माहेरीही राहू शकतो.. इतर काही सोय करू शकतो.. कमी पगाराची असली तरीही मला नोकरी आहेच.. आणि तूही काहीतरी काम करू शकशीलच.. नाही असे नाही.. पण.. एक गोष्ट लक्षात घे या तिघींपैकी या दोघी ज्या आहेत... थोरल्या वहिनी आणि तारका वहिनी.. त्या काही प्रमाणात अपयशी, मागे पडलेल्या, अशा आहेत..

आश्चर्य वाटेल तुला हे ऐकून.. पण तारकावहिनींना ग्रॅज्युएट बनायचे होते.. त्यांना घरच्यांनी शिकवले नाही.. आज त्या नोकरी करू शकतीलही.. पण हलकीसलकीच.. अंजली वहिनींनी तर तारका वहिनी येण्याआधी चार वर्षे एकटीने हे घर सांभाळलेले आहे.. आई कशी बोलते हे तू तर लहानपणापासूनच बघतेस... तिच्या त्या तोफखान्याला तोंड देत देत, उमेषला जन्म देऊन, अनेक अडीअडचणींमधून अंजली वहिनींनी अण्णाला, राजूदादाला आ़णि मलाही उभे केलेले आहे... अण्णा तरी मोठा होता... पण माझे आणि राजूदादाचे त्यांनी अक्षरशः मुलासारखे केलेले आहे.. का करावे त्या बाईने आमचे?? केवळ एकत्र कुटुंब आहे म्हणून?? आज त्यांना मला वाटेल ते बोलण्याचा अधिकार आहे तो याचमुळे गौरी... की एक काळ असा होता की मी घरात आलो आणि हातपाय धुतले की लहान दीर असल्याच्या कौतुकाने फुलून जाऊन स्वयंपाकघरात येऊन ऑर्डर सोडायचो... वहिनी.. काहीतरी खायला द्या... कपाळावर एक आठीही न आणता त्या माउलीने माझा प्रत्येक शब्द झेलला आहे गौरी...

त्यावेळेस कुमारदादा आणि अंजलीवहिनी या दोघांची आम्हा तिघांना अत्यंत गरज असायची... जे काही करायचे ते यांच्याच पाठबळावर.. तेव्हा जर दादाने निर्णय घेतला असता की तो आणि वहिनी वेगळ्या राहणार आहेत.. तर अण्णाला एकट्याला हा संसार ओढणे शक्यच झाले नसते.. आमची काही प्रमाणात तरी परवड झाली असती...

त्यानंतर आल्या तारकावहिनी.. तुला म्हणून सांगतो... माझ्या सगळ्यात आवडत्या वहिनी आहेत तारका वहिनी.. तुला हे कधीही खरे वाटणे शक्य नाही... पण खरोखरच आजही माझे त्यांच्यावर जितके प्रेम आहे तितके कुणावरही नाही.. आणि त्यांचे माझ्यावर जितके प्रेम आहे तितके त्यांचे कोणत्याही दिरावर नसेल.. अंजली वहिनी मला आईच्या जागी आहेत त्यामुळे आदर आहे... गीतावहिनी तर माझ्याहीपेक्षा लहान असल्यामुळे एखाद्या मैत्रिणीसारखीच आहे.. पण मी आणि तारका वहिनींनी जी धमाल केलेली आहे ती आठवली आजही डोळ्यात पाणी येते... तो जमानाच वेगळा होता गौरी... येताजाता या नवीन वहिनीची थट्टा.. तिनेही चक्क धाकट्या दिराच्या पाठीत धपाटा घालून पुन्हा त्याचे सगळे कौतुकाने करायचे.. नुसते हसायचोच आम्ही.. इतके हसायचो की आमच हे हासणे म्हणजे एक मोठा विषयच झालेला होता घरात...

तारकावहिनींनी माझे खूप खूप केले.. मी आजारी असलो काय आणि मला कसलीही अडचण आली काय... रात्र रात्र जागून तारकावहिनींनी मला दोनवेळा बरे केलेले आहे गौरी... पण त्यांच्या त्या वात्सल्यात आईपण नव्हते.. त्यात होते मोठ्या बहिणीचे प्रेम.. इतकेच काय.. तारकावहिनींनी तोंडातून शब्द काढावा आणि मी वाट्टेल ते करून ती गोष्ट आणावी याचे अण्णालाही आश्चर्य वाटायचे...

पण जशी गीतावहिनी आली... या दोघी काही प्रमाणात एक झाल्या.. अंजली वहिनी आणि तारका वहिनी दोघींची कोणतीच स्वप्ने सत्यात उतरली नाहीत गौरी.. त्यांचे कधीही स्वतंत्र घर झाले नाही, दोघींनाही नोकरी करता आली नाही, दोघींना जितका सासुरवास झाला त्याच्या अंशानेही गीतावहिनीला झाला नाही, तुझा तर प्रश्नच नाही.. आणि गीतावहिनी मात्र शिकलेली... आल्या आल्या ती नोकरीलाच लागली.. तिचे राहणीमान आणि या दोघींचे राहणीमान यात फरक स्पष्ट आढळू लागला.. गीतावहिनीशीही माझे चांगलेच जुळले.. पण आम्ही एकमेकांची वाट्टेल तशी थट्टा करू शकतो तशी मी दोन्ही मोठ्या वहिनींची करू शकत नाही... मागे अंजली वहिनी सगळ्यांसमोर मला बोलल्या ना गौरी?? की तुम्ही माझ्यावर ओरडताच कसे?? त्या प्रश्नाला खूप मोठा इतिहास आहे.. हाफ पँट घालायचो तेव्हापासून त्यांनी माझे केलेले आहे... त्यामुळेच त्या दोघींसमोर मी बोलू शकत नाही...

हे सगळे सांगणे, त्यांच्या उपकारांचे पाढे वाचणे.. यात माझा हा उद्देश नाही गौरी... की तुझ्या नवर्‍यावर ज्यांनी उपकार केलेले आहेत त्यांच्याशी तू नीट वागायला हवेस हे सांगणे.. माझा उद्देश हा आहे.. की आज आपण जो निर्णय घेत आहोत... तसा जर दादा किंवा अण्णाने घेतला असता... स्वतः स्वतःचे पहिले असते... अशी रिस्क घेतली असती... आणि त्यात काही मोठा आर्थिक प्रॉब्लेम झाला असता.. तर आमच्या अख्ख्या कुटुंबाची परवड झाली असती...

आणि आज आपण असा निर्णय घेत असतानाही दादा आणि अण्णा आपली साथ देत आहेत... या पार्श्वभूमीवर आपण तारकावहिनी आणि अंजलीवहिनींना एका शब्दानेही दुखावणे चांगले नाही.. विचार कर.. उद्या हॉटेल चालू झाले की नाही म्हंटले तरी मला आणि तुला खूप मानसिक ताण असेल.. अशा वेळेस या दोघींचे आपल्याला मनापासून आशीर्वाद पाहिजेत की... त्यांची असूया..???

हे घर... हे आपले एकत्र कुटुंब.. कुणाच्याही मुळे भग्न झाले असते गौरी.... अंजलीवहिनी स्वभावाने चांगल्या नसत्या तर दादाच्या मागे लागून लागून त्यांनी वेगळा संसार उभारायला लावला असता त्याला.... तसे नाही केले त्यांनी... तुला काय वाटते?? अण्णाच्या बँकेत फ्लॅटची स्कीम आत्ता निघालीय?? चार वर्षांपासून निघतीय... पण जेव्हा राजूदादा आणि गीतावहिनींनी ट्रान्स्फर झाल्याचे जाहीर केले तेव्हाच तारका वहिनींचे धाडस झाले हे वाक्य बोलण्याचे... की आम्हीही शिफ्ट होण्याच्या विचारात आहोत.. तुला माहीत नसेल तर सांगतो गौरी... खरे तर... अजून अण्णाने पुरते पैसेही भरलेले नाहीत त्या नव्या घराचे... कारण काय माहीत आहे?? मला माहीत आहे... मला तारकावहिनींनीच गेल्या महिन्यात घरात कुणी नसताना डोळ्यात पाणी आणून सांगीतले... पुरते पैसे भरू नका असे त्यांनीच अण्णाला सांगीतलेले आहे... कारण काय माहीत आहे?? कारण त्यांना हे घर सोडून जावेसेच वाटत नाही आहे...

आता मला सांग... अशा या परिस्थितीत.. केवळ तू आणि मी उलटून बोलल्यामुळे या घरातील एकत्रपणा नष्टा व्हावा... असा दोष आपल्या माथी असावा असे तुला तरी वाटेल का??

हेवेदावे असतातच गं घरामध्ये... भावाभावात तर वाटण्यांवरून खून सुद्धा होतात जगात.. पण एक सांगू?? खरे आणि सात्विक आणि सर्वात मोठे समाधान कशात आहे माहीत आहे???

स्वतःचा दुराभिमान कमी कमी करत करत दुसर्‍यावर केवळ प्रेम आणि प्रेमच उधळून त्यांना प्रेमाने जिंकणे यात... आणि या कसोटीत तू तुझ्या जिभेमुळे किंवा मी माझ्या जिभेमुळे अपयशी ठरणे.. हे पातक तुला आपल्या माथी असलेले चालेल गौरी??????????"

शांतपणे पहुडलेल्या गौरीने हळूच कूस वळवून वसंताकडे पाहिले.

"नाही चालणार... कधीच नाही चालणार... यापुढे तुला मी हे सगळे मला सांगण्याची संधीच देणार नाही वसंता.... कधीच नाही... सगळे अपमान गिळीन मी... यासाठी नाही की तू अशीच अपेक्षा करतोस म्हणून.. यासाठी... की ही गौरी जिथे जाते तिथे वाईटच घडते हा शिक्का पुसण्यासाठी.... "

पहिली मिठी! नवरा बायको म्हणून नव्हे, शारिरीक आकर्षण म्हणून मुळीच नव्हे... केवळ भावनांचा निचरा व्हावा.. एकमेकांच्या स्पर्शातून आधार मिळावा म्हणून मारलेली ती पहिली मिठी... लग्नानंतर कित्येक दिवसांनी मारलेली होती... आणि तिचे आयुष्यही केवळ एखाद्या मिनिटाचेच होते... कारण लगेचच वसंता अपराधी चेहरा करून बाजूला झालेला होता... ती संपूर्ण रात्र गौरी तिच्याकडे पाठ करून खाली जमीनीवर झोपलेल्या 'वसंत पटवर्धन' या जगातील आठव्या आश्चर्याकडे बघत जागीच राहिलेली होती...

आणि आज दुपारी...

अंजली वहिनी, उमेष, तारका वहिनी, वेदा हे चौघेही गावाला गेलेले असताना, दादा आणि अण्णा आपापल्या कामावर गेलेले असताना आणि चक्क आई आणि बाबा स्वारगेटवरून बस धरून वाईच्या गणपतीला गेलेले असताना....

आपल्या खोलीत पालथी झोपून गौरी विचार करत होती... तिचे मन आनंदाने ओतप्रोत भरून वाहात होते...

कारण आज दुपारी एक वाजता वसंता घरी आला की संध्याकाळी तो चितळ्यांच्या दुकानात जाणारच नव्हता.. त्यामुळे एक संपूर्ण दुपार आणि अर्धी संध्याकाळ दोघांनाच घरात वावरता येणार होते...

.. आणि.. मनावर चढलेले भूतकाळातील अत्यंत अभद्र विचारांच्या धुळीचे थर.. वसंताच्या वागणूकीच्या कापडाने पुसत पुसत स्वच्छ होत असलेल्या मनाने गौरी विचार करत होती...

आजवर वसंताने.. मनात आणले असते तर... इतर कुणी तर दूरच राहो... आपण तरी विरोध करू शकलो असतो त्याला??

स्त्री! या एका अक्षरात अख्खं विश्व सामावावं?? जिच्या आकर्षणापायी सर्वात मोठाल्ली युद्धे झालेली आहेत, जिच्या उदराशिवाय इतर कशातूनही जन्म घेता येत नाही, जिच्याशिवाय जन्माला आल्यानंतर मोठेही होता येत नाही आणि जिच्याच प्राप्तीसाठी आयुष्य खर्ची घालणार्‍यांची करोडो उदाहरणे आहेत...

... ती स्त्री म्हणजेच विश्व नाही तर काय??

आणि ... असे असतानाही... वसंताने... नेमक्या कोणत्या भावनेने आजवर आपल्याला स्पर्शही केला नसावा?? आपण उष्ट्या आहोत असे वाटल्यामुळे??? शक्यच नाही...

असा नाहीच आहे तो...

... की???... आपण पुढाकार घ्यावा म्हणूण तो असा विरक्त वागत असावा??.. इतके मोठे मन?? असू शकेल एखाद्या पुरुषाचे??? परिस्थिती ताब्यात आली तर स्त्रीचा उपभोग अजिबात न सोडणार्‍यांची ही जात.. आणि हा असा कसा?? की?? ... की.. काही वाटतच नाही त्याला खरंच आपल्याबद्दल??

आपले पहिले लग्न होण्याआधी ज्या प्रेमाचा तो उल्लेखही करत नाही... त्याच प्रेमाचा इतका जाहीर उल्लेख तो इतक्या परंपरावादी घरात आपले पहिले घर उद्ध्वस्त झाल्यावर कसा काय करतो???

या विचारासरशी ताडकन उठून बसली गौरी!

असे तर नाही?? की... खरच त्याने आपल्या आयुष्याला आकार मिळावा म्हणून हा प्रस्ताव मांडला??

या भीतीदायक विचारात गौरी असतानाच...

... चोरपावलांनी दारात आलेला वसंता पाठमोर्‍या बसलेल्या बायकोच्या रुपाकडे पाहात होता...

दोन मुले झालेली गौरी लहान असताना दिसायची तशी अजिबातच नव्हती... पण तरीही.. ती एक स्त्री होती.. आणि... तिच्याकडे तसे बघण्याचा वसंताला 'समाजमान्य' हक्कही होता.. इतकेच.... की ती दृष्टी त्याला आज प्राप्त झालेली होती... आणि बहुधा... आजच्यापुरतेच त्या दृष्टीचे आयुष्यही अल्पच असणार होते... कारण आज प्राप्त झालेला एकांत..

तिला लागलीच चाहुल त्याची! पटकन सावरत ती तोंडभर हासली तिचे ते हासणे वसंताला नेहमीपेक्षा खूप वेगळे वाटले. त्यात एक आमंत्रण असावे असे! रहस्यमय आमंत्रण!

पण... हा पण पुन्हा आडवा आला. तिचे ते हासणे 'तसेच' आहे हा समज गैरसमजही असू शकेल या भावनेने वसंताने नेहमीप्रमाणे जमीनीवर बसकण मारली.

"जेवणारेस ना?"

"हं... वाढ..."

"की इथेच आणू वाढून??"

"कसंही..."

"पुलाव केलाय... तु..... झ्यासाठी..."

'तुझ्यासाठी' हा एक शब्द बोलताना मधे तोडावा लागण्याइतपत मधे बरेच काही झालेले होते हे दोघांनाही जाणवत होते. दोघांनाही आठवला तो प्रसंग!

त्या दिवशी संध्याकाळी अचानक आक्का घरी आल्या होत्या. सगळे जेवायला बसले असतानाच त्या म्हणाल्या..

"कुमारच्याई... गौरीने आज पुलाव केलावता... चव म्हणून आणलाय.."

मागोमाग गौरीही आली होती. कॉलेजला जाणारी गौरी!

सर्वांनी थोडा थोडा वाढून घेतला आणि वसंताने पहिला घास खाल्या खाल्ल्या उच्चारलेले ते वाक्य..

"तारका वहिनी... पुलाव असा तर असा.... शिका जरा आमच्या मैत्रिणीकडून..."

ते वाक्य त्याने गौरीकडे पाहातच उच्चारलेले होते. कुणालाही जाणवले नाही पण गौरी अशी काही लाजली होती की बास! आणि ते न जाणवण्याचे कारण म्हणजे..

तारका वहिनी डोळे वटारून म्हणाल्या होत्या..

"आता वाढते की नाहीच बघा जेवायला मी तुम्हाला रोज.. आल्या आल्या म्हणतात... व्हैनी... पान वाढा... मग कशाला म्हणता???"

थट्टेथट्टेत त्य जमान्यात झालेला तो प्रसंग क्षणार्धात आज दोघांनाही आठवला.

गौरी लगबगीने खाली जाऊन पान वाढून वर आली. तोवर वसंताही हात पाय धुवून वरच आलेला होता.

"तू?? तू नाही जेवणार??"

"अंहं.. तुझं झालं की बसेन..."

"छे छे.. घेऊन ये ना ताट..."

गौरी पुन्हा जाऊन आपलेही ताट घेऊन आली.

"वर जेवायला बसायलाही मजा येते ना??"

गौरीच्या त्या प्रश्नावर वसंताने नुसतेच 'हं' म्हंटले.

"क... सा.. झालाय?? पुलाव??"

वसंताने अर्थपूर्ण नजरेने मान वरून गौरीकडे पाहिले. तीही खूप अपेक्षेने पाहात होती.

"पुलाव... असावा तर असा...."

खुदकन हासणे विसरूनच गेली होती गौरी! किती हळूहळू ते स्मितहास्य तिच्या तोंडभर पसरले. वसंता आपला खाली बघून जेवतोय! त्याला 'भरपेट' वाढण्याचाच आनंद घेत बसली गौरी!

जेवण झाल्यावर तो नेहमीप्रमाणे खाली झोपला. ती पलंगावर बसून त्याच्याकडे पाहात राहिली. बर्‍याच वेळाने म्हणाली...

"वसंता.... तिथे गार वाटत असलं तर... इथे.. झोपलास तरी... चालेल हां???"

'मधुचंद्र, मधुचंद्र' म्हणतात तो नक्की कसा असतो ते जगाला सांगायला...

.. संध्याकाळी वसंता काबील झालेला होता...

गुलमोहर: 

जबरी..

बेफिकीरजी,
छान, फार फार आवडला हा भाग. नातीगोत्यांचा हा भावविश्व छान उलघडत आहात आपण.
काही प्रसंग तर लाजवाब (दुसरे शब्द सुचत नाहिये)

<< दादा - नाही रे बाबा.. मला काळजी वाटते ती तू जी रिस्क घेतोयस त्याची.. आणि काही झालं तरी सगळे आहोतच की आपण... काढ बिनधास्त हॉटेल... आत्ता काही पैसे वगैरे हवे आहेत का?? >>

<< मागे अंजली वहिनी सगळ्यांसमोर मला बोलल्या ना गौरी?? की तुम्ही माझ्यावर ओरडताच कसे?? त्या प्रश्नाला खूप मोठा इतिहास आहे.. हाफ पँट घालायचो तेव्हापासून त्यांनी माझे केलेले आहे... त्यामुळेच त्या दोघींसमोर मी बोलू शकत नाही... >>

मस्तच.

पुढच्या भागाची प्रतिक्षा करत आहोत. Happy

पु ले शु. Happy

बेफिकिर जी
हे 'घर'ही आवडायला लागलय.
वसंता अन गौरीचं संभाषण फार आवडलं(वसंताचं समजावणं).
माणसांच्या वर्तनांचे बारकावे अन मनातल्या अवर्णनीय भावना यांना अचूक शब्दात पकडणे कसं काय जमतं तुम्हाला???
भारीच......
पु.ले.शु.

Happy
खरच लाजबाब....वसंताच समजावण तर लई भावल.. आणि गौरी हि तेवढिच समजुतदार... आणि शेवटचि ओळ(बेफिकिर टच), अहाहा.....

प्लिज हि कादंबरि मि जमेल तशि वाचेल पण भुषणराव दररोज एक भाग टाकाच.... प्लिज.

बेफिकीरजी......
वसंता अन गौरीचं संभाषण फार आवडलं(वसंताचं समजावणं).......
परत एकदा रोज नविन भागाचि वाट पाहायची सवय लागलीयं....

स्वतःचा दुराभिमान कमी कमी करत करत दुसर्‍यावर केवळ प्रेम आणि प्रेमच उधळून त्यांना प्रेमाने जिंकणे यात... आणि या कसोटीत तू तुझ्या जिभेमुळे किंवा मी माझ्या जिभेमुळे अपयशी ठरणे.. हे पातक तुला आपल्या माथी असलेले चालेल गौरी??????????">>>>

प्रचंड सुंदर संवाद!!! पुन्हा एकदा!!! वसंता ग्रेट आहे आणि गौरीचा समजुतदारपणा खुप काही शिकायला लावणारा!!! नात्यांमधील हेव्यादाव्यांचे सुक्ष्मविश्लेषण यात बेफिकीरजींचा हातखंडा आहे. जबरदस्त!!! जियो... Happy

सुट्टीवर होते काही दिवस,,, पण आज भाग ५,६,७, ८ एका दमात वाचुन काढले,,,,,,, खूपच आवडल घर........
वसंता आणि गौरी कडुन खरच खुप काही शिकण्यासारख आहे. पु. ले. शु.