उठल्या उठल्या तिनं नेहमीच्या सवयीनं हातातल्या घड्याळात पाहिलं. आजही तिचा अंदाज चुकलेला नव्हताच. जाग येता येता किती वाजले असतील याचा अंदाज बांधायचा आणि मगच घड्याळात पाहायचं हा तिचा आवडता खेळ. कधी हार कधी जीत. आताही पावणेसहा वाजले होते. दुपारी आमरसपुरीचं जड जेवण झाल्याने जी काय ग्लानी आली होती त्याची धुंदी अजून डोळ्यावरुन हटत नव्हती. ती उठून मांडी घालून तशीच डोळे मिटून बसून राहिली. ही तिची सर्वात आवडती अवस्था. म्हटलं तर जागी, म्हटलं तर निद्रिस्त. आपल्याला हवे ते आठवण्याचे, कल्पना करत बसण्याचे हेच ते फक्त तिचे क्षण! आता या क्षणांचाही अल्बम तयार झालाय. अशाच क्षणी उघडून पाहात बसावा असा. अगदी शाळेत असतानाही अशी अंथरुणावर बसून लागलेल्या तंद्रीत काल तेजूनं शिल्पा आणि आदित्यबद्दल सांगितलेलं खरं असेल? आजच्या वक्तृत्व स्पर्धेत अहिल्यादेवीकडून श्रुती इनामदार असेल की अमृता जोग? श्रुती असेल तर तेच तावातावाने आपले मुद्दे ठाशीवपणे मांडून ठराविक जागी माहित असल्यासारखं बोलायचं थांबून श्रोत्यांच्या टाळ्या घेणं आणि अमृता असेल तर ते कृत्रिम भाव ओसंडणारा चेहरा घेऊन स्टेजवरुन उतरताना आता तो ओघळेल की काय या कल्पनेनंच तिला फिसकन हसू यायचं. मग पुढे मोठी होत गेली तशी या इतरांच्या मते 'चिंतन काळात' विचार करण्याचे विषय बदलत गेले तर ती आणि ती वेळ मात्र तशीच राहिली वर्षानुवर्षांच्या भिंतीवरच्या गणपतीच्या फ्रेमसारखी. असून अडचण नाही आणि नसून खोळंबा नाही. तिला आठवलं, लग्नाआधी याला भेटायचो तेव्हाच्या मोहक क्षणांची पुनरावृत्ती करायची हीच तर आवडती वेळ असायची आपली! तेव्हा त्यानं जे केलं ते आठवायचं, न केलं असेल किंवा हे केलं असतं तरी चाललं असतं की असं जे तिला वाटायचं त्याची कल्पनाचित्र रंगवायची. फारच अनावर झालं तर पटकन उशीखालचा मोबाईल काढून एक sms. त्यातही काय लिहायचं असा प्रश्न पडायचाच. न बोलून याला आपल्या मनातलं कळायला पाहिजे..! असं खरंतर तेव्हापासूनच वाटायचं.. जे आजही कायम आहे त्यांच्या दोघातल्या प्रेमासारखंच! च्यायला, आला आपला बसस्टॉप. उतरा आता.
तिनं एकवार घड्याळ पाहिलं. चौकोनी व्हॉयलेट डायलचं रोमन मध्ये फक्त XII आणि VI एवढेच अंक आणि अतिशय विजोड असा काळा बेल्ट असणारं टायटन. 'अगं काय आणलंयस हे? काहीतरी गर्लिश आहे का यात?' असं आरतीनं वैतागून विचारलं तेव्हा तरी त्याला मॅचिंग असा निळा बेल्ट होता. तिच्या पगारातून त्याला आणि तिला घेतलेलं दिवाळी गिफ्ट होतं अर्थातच लग्नाआधीचं. पुढे लग्न झालं. बेल्ट झिजला. तस्साच बेल्ट काही मिळेना. मिळणार नव्हताच हे समजायला हवं होतं. मिळाला तो काळा बेल्ट घेऊन तिनं वापरणं सुरुच ठेवलं त्या दिवाळीची आठवण म्हणून. त्याचं ते घड्याळ केव्हाच कपाटातल्या ड्रॉव्हरच्या मागच्या भिंतीला टेकून शेवटच्या घटका मोजतंय. आपलं नातं या घड्याळासारखंच झालंय नाही का?दर्शनी सुंदर डायल पण मागे डोळ्यात खुपणारा आणि हातात रुतणारा काळा बेल्ट. तिनं सणकून डोकं हलवलं. घड्याळ आणि लग्नाची अॅनालॉजी? फारच सिनिक होतोय आपण.आवरा. . पण आज आपल्याशी तरी गणित मांडायला काय हरकत आहे? तसंही याच्यासमोर ही गणितं मांडणं म्हणजे आपले हातचे हातातच राहायची भीती. त्याच केव्हाचं 'हॅ: इतकं सोपं आहे हे' म्हणून उत्तर काढून साई सुट्यो होणार आणि आपण बावळटासारख्या पायरीच्या पद्धतीपाशीच गुरफटणार. उत्तर मला तोंडीही येत होतंच की रे! पण 'पध्दतीचं' महत्त्व तुझ्या कधी लक्षात येणार? तिची कायमची अशीच हताश दमणूक. उत्तर माहीत असूनही गणित सुटल्याचा आनंद नाही. हे असं नको होतं मला. कधीच. मग का असं झालं? काहीतरी चुकतंय, सलतंय. दर वेळेस मनाच्या आरशाला त्याच ठिकाणी जाणारे तडे. आता त्याचे स्पष्ट दोन तुकडे दिसतात समोरुन. एक तड्याच्या अलीकडचा म्हणजे लग्नाआधीचा आणि नंतरचा. आपलं इतकं राजीखुशीनं झालेलं लग्न म्हणजे तडा की काय? ती शहारली. तिच त्याच्यावर खूप प्रेम. त्याचंही तिच्यावर. अगदी गोष्टीतल्या राजकन्येसारखंच. तो आला. त्यानं पाहिलं तिला जिंकलं आणि सफेद घोड्यावर स्वार होऊन दोघं स्वप्नांच्या प्रदेशात निघून गेले आणि सुखानं नांदू लागले. मग पुढं काय झालं?
एका नेहमीच्या सवयीच्या भांडणात तिनं त्याला विचारलं," एवढंच होतं तर मग का केलंस माझ्याशी लग्न?" "तू बदलशील असं वाटलं म्हणून! तू तरी का केलंस मग?" "मलाही तू सुधारशील असं वाटलं होतं म्हणून." पहिला तडा इथं गेला. "तू जशी आहेस तशी मला आवडतेस. तू इतरांपेक्षा निराळी आहेस, चार मुलींसारखी नाहीस म्हणूनच मला तुझं आकर्षण वाटतं.." हे कित्येक संध्याकाळी त्यानं तिचे हात हातात घेऊन कबूल केलं होतं. "लग्नानंतर तरी देशील का रे, न मागता डेअरी मिल्क, गिफ्ट्स?" असं १७ वेळा हट्ट करुन १८व्यांदा तो पुरवल्यावर ती अजीजीनं त्याला विचारायची. पण आता तिचं मागणंही बंद झालंय. मागून मिळवण्यात कसली मजा..? पुन्हा तेच.. मी न बोलताही याला... तुझ्या माझ्याकडच्या अपेक्षाच निराळ्या असतात, त्या मला समजत नाहीत. त्यापेक्षा तू सांग मी तसं वागेन. त्याचं साई सुट्यो. ती पध्दतीच्या पायरीवर बसलेली.
लग्नाबरोबर नात्यांची, भूमिकांची लागलेली पुटं सांभाळतानाही तिच्या जीवावर यायचं. तुमची सून पाककलानिपुण वगैरे तर नाहीच पण त्या रसास्वादात तिला अजिबात रस नाही हे घरच्यांना पटवून देताना तिच्या नाकी नऊ आले. घरी पाहुणे आले की मदत करण्याइतपतच तिचा किचनमधला वावर. एखादा पदार्थ अभ्यासू वृत्तीने शिकणं नाही की हे मी करु का विचारणं नाही. पाहूणेही कळीचे प्रश्न बरोबर विचारतात, "यातलं सूनबाईने काय काय केल?" यावर तिचं अनावर खुदकन हसणं, इतरांचं सांभाळून घेणं आणि याचं नजर रोखून पाहणं किंवा एखादा छद्मी उसासा. करायची वेळ येईल तेव्हा उपाशी बसणार नाही एवढा आत्मविश्वास तिला होता पण त्यासाठी सतत ते इतरांना पटवून देण्याची काय गरज हे तिला न उमगणारं कोडं होतं. सासूबाईंनी पुस्तक प्रदर्शनातून 'तिच्यासाठी' म्हणून 'नाष्त्याचे ५० प्रकार', ' १०० पुलाव' असली ६ मासिकं आणली तेव्हा चेहर्यावरचे भाव लपवतानाची तिची त्रेधा, मग पळत बाथरुममध्ये जाऊन बादलीत मोठा नळ सोडून हसता हसता डोळ्यात आलेलं पाणी आठवून आताही तिनं ओंजळीत चेहरा झाकला.
तिला प्रमोशन मिळालं तेव्हा दोघंही आनंदात होते. "बघ, तिची प्रगती ती करतेय. तू बस ठोंब्यासारखा!" असं म्हणून घरच्यानी केलेलं कौतुक त्याचा खर्रकन उतरलेला चेहरा पाहून मिठाचा घास पाण्याबरोबर घशाखाली ढकलावा तसं गिळून टाकलं होतं तिनं. माझं आयुष्य, माझी साध्यं ही माझ्या एकटीची कधीच नसणारेत का? चालता चालता रस्त्यातली एखादी सुतळी पायात अडकावी आणि आपल्याच दुसर्या पायाने तिच्यावर पाय देऊन तोंडघशी पडायला व्हावं, तसंच जाणवणारे का हे लग्न मला? ठेच लागल्यासारखं किंवा मग चुकून पायात अडकलेल्या सुतळीसारखं?
'मला खूप मोठ्ठं व्हायचंय रे!' एखाद्या निवांत क्षणी तिनं त्याचे हात हातात घेऊन म्हणावं.
त्याने विचारावं," कुणाच्या नजरेत? आय मीन, इन व्हॉट सेन्स?"
"कुणाच्या म्हणजे काय? माझ्याच."
"पैशानं?? हुद्द्यानं? मला समजतच नाही कधी कधी तू काय बोलतेस ते. नको की इतकी पुस्तकं वाचत जाऊस."
त्याच्या निरागसतेचं कौतुक करावं का या वयातही असणार्या इममॅच्युरिटीची चीड यावी या संभ्रमात असूनही संयम ठेवून ती म्हणते, "अरे, म्हणजे मला जी लोकं 'मोठी' वाटतात तेवढं मला व्हायचंय. मग तेव्हाही माझ्यापेक्षा मोठी आणि मी ज्यांना मोठी वाटेल अशी लोकं असतीलच की. म्हणून म्हटलं मला माझ्याच नजरेत मोठं व्हायचंय."
"मला नेहमी भीती वाटते, तू माझ्यापासून लांब जातेयस."
सुरवंटाचं फुलपाखरु झाल्यावर दुनियेनं 'अहाहा' म्हणावं आणि त्या तुतीच्या झाडानं मात्र 'तू सुरवंटच बरा होतास. निदान माझ्याजवळ तरी होतास' असं म्हटल्यावर त्या काही काळासाठी आपली प्रेमानं साथ सोबत केलेल्या बिचार्या झाडाकडे पाहून फुलपाखराला आपल्या अंगावरचे हे रंग, नक्षी, मखमल पुसून टाकावीशी वाटेल, तसं तिला होऊन जायचं. पण फुलपाखरुही आपल्या पानाफुलावर बागडेल हे तुतीला समजू नये? का त्याला ते झोपी गेलेलं, पूर्णत: आपल्यावर विसंबून असलेलं, आपल्या सुरक्षा कवचात पहुडलेलं बाळबोध सुरवंटच जास्त प्रिय होतं?
त्याला लग्न झाल्यावर, कार्टूनमध्ये दाखवतात तसं स्पिनॅच खाऊन पॉपॉयच्या अंगात शक्ती संचारते तसं गळ्यात मंगळसूत्र अडकवल्यावर लगेच हिनं 'बायको' व्हायला हवी होती.ऑफिसला जाताना मांजरासारखं पायात घुटमळत राहणं,अन ते संध्याकाळी नटून वाट बघत राहणं,वगैरे गोष्टी सिनेमातच तिला इतक्या फालतू वाटल्या की ती त्या करणं म्हणजे स्वतःच्या मतांचा कडेलोट करणं. तिनं केलंही असतं कदाचित, जर तो 'नवर्यासारखा' वागला असता तर. तिच्यापेक्षा जबाबदार, मॅच्युअर्ड. हमसे आया न गया, तुमसे बुलाया न गया असं होऊन ना मी बायको झाले ना तू नवरा.सात फेरे, मंगळसूत्र, जोडवी, जोडीनं बसून केलेल्या पूजा, केलेले आणि मिळालेले आहेर, आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे सगळं एकत्र एका छताखाली वर्षानुवर्ष केलं म्हणजे नाही रे होत लग्न. हे उत्तर झालं गणिताचं. पण पद्धत?
आता मात्र उठायलाच हवं होतं. हा मनातला गोंधळ कधी थांबेल का अजून अजून चरे तडे जात आरसाच शिल्लक उरणार नाही कुणास ठाऊक. पण आपल्याच वाट्याला असं का ? ची एक सूक्ष्म कळ आलीच. हे मनातलं सगळं कधी उमटलंच तर काय हाहाकार उडेल याच्या कल्पनेनही ती थरथरली.. नको त्या वेळी नेमक्या ओळी आठवल्या.."सर्द आहें कह रही है , है ये कैसी बला की आग.. सोते सोते जिंदगानी घबराके उठी है जाग!" साई सुट्यो म्हणू शकणारे खरंच नशीबवान. त्याचा हेवाच वाटायचा बर्याचदा. असं सहज, सुटसुटीत का नाही आपलं? पण या असल्या गणितांचं एक बरं असतं.. उत्तरासाठी शेवटचं पान बघायचा मोह होत नाही. कारण पद्धतीनुसार उत्तरं बदलत जातात अन आपलं उत्तर काय हे आपण निवडलेली पध्दत ठरवते. फक्त हे कळायला काहींना शेवटच्या पानापर्यंत पोहोचावं लागतं! ती स्वतःशीच साई सुट्योss म्हणून समोरच्या आरशात पाहून मनमोकळं हसली!
आवडलं. मस्त फ्लो आलाय
आवडलं. मस्त फ्लो आलाय लिहिण्याला.
मस्त ! < निरागस की
मस्त ! < निरागस की इम्मॅच्युअर?> ..... अवघड आहे.
मस्तच! आवडली कथा
मस्तच! आवडली कथा
परफेक्ट!! फुलपाखरू
परफेक्ट!! फुलपाखरू मस्तच...मला वाटते की ही प्रत्येक "तो" आणि "ती" ची कथा आहे...दोष कुणाचाच नाही, फक्त तो gender difference आहे...
आशुडी, केवळ अप्रतिम. खूप
आशुडी, केवळ अप्रतिम. खूप सुंदर उतरलेत विचार. ...
<<पण या असल्या गणितांचं एक बरं असतं.. उत्तरासाठी शेवटचं पान बघायचा मोह होत नाही. कारण पद्धतीनुसार उत्तरं बदलत जातात अन आपलं उत्तर काय हे आपण निवडलेली पध्दत ठरवते. फक्त हे कळायला काहींना शेवटच्या पानापर्यंत पोहोचावं लागतं<<>>
अधाशासारखं आधी वाचलं आणि परत परत वाचलं.
खुप आवडली. ओघवती आणि सुरेख
खुप आवडली. ओघवती आणि सुरेख कथा.
हमसे आया न गया, तुमसे बुलाया न गया>>
अजून चरे तडे जात आरसाच शिल्लक उरणार नाही >> छानच.
सुरेख लिहीलंयस
सुरेख लिहीलंयस
निळुभाऊ) >>>बुद्धिवादाचे
निळुभाऊ)
>>>बुद्धिवादाचे दुष्परिणाम .... अजून काय ! <<<<
स्पष्ट करा की राव...
तोपर्यंत...
तुम्हाला असं म्हणायचं आहे का?
की गणितं शेवटपर्यंत सोडवायलाच हवीत असं नाही सारी. हे अवघड गणित नीट समजलं तरी बास झालं.
ते सुटेल सुटेल वाटतं पण सुटत तर नाही. मग बुद्धीला ताण देत अजुन प्रयत्न आणि तरीही गणित सुटायची खात्री नाही. म्हणुन मग अपेक्षाच ठेवायच्या नाहीत जास्ती. आणि ठराविक एका मर्यादेपर्यंत पोचलो की गणित सुटलं म्हणायचं.
गोष्टीमधल्या "त्या"चं वागणं बालिश्/इम्मॅच्युअर ह्यातलं नक्की काय, हे तो इतर वेळी कसा वागतो यावरही अवलंबुन आहेच की. परिस्थिती जाणुन, "गणित सुटत नाहीये, तर आहे त्यात थोडं बालिशपणे वागत असेल" तर इम्मॅचुअर म्हणता नाही येणार कदाचित. (इथं बालिश शब्द बरोबर नाही वाटत आहे पण समजुन घ्या..)
बाकी, त्याच्या घरचे "ते", "तिला" प्रमोशन मिळाल्यावर "त्यालादेखिल" बोललेच की काहीतरी...
यावरुन मला वाटलं: - उगाच जास्ती विचार करण्यापेक्षा सोडुन द्यायचं त्या मर्यादेनंतर.. मग आनंदी राहता येईल. => समाधान.
मला ते बरोबर समजलं असेल तर तुम्हाला अनुमोदन...
वेगळं असल्यास जरुर सांगा..
अफलातून!
अफलातून!
>>>बुद्धिवादाचे दुष्परिणाम
>>>बुद्धिवादाचे दुष्परिणाम ....
अजून काय ! <<<<
म्हणजे काय निळूभाऊ, जरा स्पष्ट कराल का? >>>
अहो जर माणूस बुद्धिवादी असला तर माणसाला स्वत्वाची जाणीव असते ..
जसे प्रस्तुत कथेत लेखिकेला आहे ...
मी माझी आजी जेंव्हा पाहतो ... तेंव्हा दिसून येते की तिला आसपास बदलणाऱ्या गोष्टींत स्वतः ला मोजण्याची सवयच नाही.
आपण सुद्धा एक जिवंत व्यक्ती आहोत आपल्या विचारांना, भावनांना किंमत असावी असे तिला वाटत नाही.
कारण काय ?? ती बुद्धीवादी नाही म्हणून !!
जुन्या काळात स्त्रियांना समान वागणूक नसायची ... नंतर बुद्धिवादाच्या काळात फेमिनिस्म सारखे concept आले आणि सुदैवाने स्त्रियांना समान वागणूक मिळाली.
जर हे झाले नसते तर आज लेखिकेला स्वतः बद्दल इतका विचार करण्याची मुभा नसती मिळाली.
बुद्धिवादाने भरपूर काही चांगले झाले ... तर एखादी सूक्ष्म कळ (लेखाच्या शेवटात प्रस्तुत केलेली ) हा एक इवलासा दुष्परिणामच (side effect ) नाही का ?
शलाकाला डिट्टो आज इथे''
शलाकाला डिट्टो
आज इथे'' अभिप्राय द्यावाच असं काहीतरी वाचलं , लगे रहो, आशु मस्त लिहिलंयस.
ह्म्म्म्म ))))))
ह्म्म्म्म :)))))))
बुद्धीवादाने बाईला स्वत्वाची
बुद्धीवादाने बाईला स्वत्वाची जाणिव आली नाहीतर तोवर तिला आपण भरडले जातो हे समजलेच नव्हते. हे न समजणे चांगले? स्वत्वाची जाणिव वाईट?
हे मलातरी कधीच पटू शकत नाही. पण जाउदे इतक्या छान लिहिलेल्या गोष्टीवर वाद नकोत.
आशू. मस्त ! एकदम सहज,
आशू. मस्त ! एकदम सहज, ताजंतवानं लिखाण ! लिहित रहा ..!
आशूडी, खूपच सुरेख लिहिलय
आशूडी, खूपच सुरेख लिहिलय

धन्यवाद
अतिशय सुंदर .. सुरवंट,
अतिशय सुंदर ..
सुरवंट, फुलपाखरु, तुतीचं झाड >> छानच!
मनात एक विचार आला .. 'ती'चे विचार कितीवेळा मांडले जातात पण 'त्या'चे विचार कधीच पुढे येत नाहीत .. हेच मर्म असावं का गणिताचं उत्तर शोधण्यावर भर देण्यात vs. पद्धतीवर भर देण्याचं?
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद!
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद!
ऋयाम, निळूभाऊ यांनी वर चर्चा केली आहे त्या अनुषंगाने या लेखनाची जबाबदारी म्हणून मला काही गोष्टी स्पष्ट करायला आवडतील.
मला वाटलं: - उगाच जास्ती विचार करण्यापेक्षा सोडुन द्यायचं त्या मर्यादेनंतर.. मग आनंदी राहता येईल. => समाधान. >> ऋयाम, काही अंशी तुम्ही म्हणताय तसाच शेवट आहे कथेचा. अगदी समाधान नाही, पण कदाचित उशीरा का होईना ज्या गोष्टी आपल्याला जाणवतायत त्या 'त्यालाही' जाणवतील अशी नायिकेला आशा वाटते आणि तिचं "याला कधी कळणार..?" हे गणित आपोआपच सुटतं.
बुद्धिवादाने भरपूर काही चांगले झाले ... तर एखादी सूक्ष्म कळ (लेखाच्या शेवटात प्रस्तुत केलेली ) हा एक इवलासा दुष्परिणामच (side effect ) नाही का ? >> निळूभाऊ, तुमच्या
आपण सुद्धा एक जिवंत व्यक्ती आहोत आपल्या विचारांना, भावनांना किंमत असावी असे तिला वाटत नाही. >> या वाक्यानंतरची निळी बाहुली 'तुमच्या आजीला स्वत्वाची जाणीव नसल्याने ती आपल्या भावनांना, विचारांना किंमत देऊ शकली नाही' याचे तुम्हाला वाटणारे शल्य दाखवते. असं असूनही तुम्ही हे साईड इफेक्टवालं वाक्य लिहू शकताय हा मला तरी विरोधाभास वाटतो.
ज्ञानाचा प्रकाश हा बर्याचदा नको त्या गोष्टीही उजेडात आणतो. तुम्ही त्या गोष्टींकडे पहिल्यांदा दचकून पाहाल, मग कदाचित त्यावर विचार कराल. पुढे जाऊन त्या बाबतीत आपण काय करु शकतो हे ही पाहाल आणि त्या दृष्टीने स्वतःची अशी एक भूमिका घ्याल.बघायचं टाळता आलं तरी त्या अस्तित्वातच नाहीत असं आपण म्हणू शकत नाही. मेंदूच्या कोपर्यात कुठेतरी त्याची नोंद होतेच. ही एक सामान्य थॉटप्रोसेस आहे जी नायिका स्वतःच्या बाबतीतही वापरते आहे.
पण म्हणजे ज्ञान होणं चूक का? माझ्या मते नाही. पण काहींना असंही वाटतं, की अशा ज्ञानाच्या प्रकाशापेक्षा अज्ञानाचा अंधःकार बरा. यानुसार जर तुम्ही नायिकेच्या विचाशृंखलेला 'बुद्धिवादाचे दुष्परिणाम ....' म्हणत असाल तर तो तुमचा वैयक्तिक दृष्टीकोन असू शकतो.
'ती'चे विचार कितीवेळा मांडले जातात पण 'त्या'चे विचार कधीच पुढे येत नाहीत .. हेच मर्म असावं का गणिताचं उत्तर शोधण्यावर भर देण्यात vs. पद्धतीवर भर देण्याचं? >> सशल, ही कथा 'नायिकेची' आहे. तिच्या दृष्टिकोनात 'तो' कसा वाटतो याची. 'त्या'च्या कथेत कदाचित 'ती'चे हे विचार अजिबात येणार नाहीत. कॅलिडोस्कोप असतो रे, तुम्ही कसा फिरवताय तशी आतली नक्षी बदलते! नजारा वही होता है, नजरिये बदलते रहते है!

याहून अधिक पोस्टमॉर्टेम माझ्या कथेचं मी करु शकणार नाही!
धन्यवाद!
@ नीधप.. नाही हो .... मी वाईट
@ नीधप..
नाही हो .... मी वाईट म्हणत नाहीये..
स्वत्वाची जाणीव होणे नक्कीच चांगले!
कथेतील पात्राला ती जाणीव आहे ह्याचा मला आनंदच आहे.
पण त्याच सोबत त्या पात्राला आपले गणित चुकतेय असे वाटल्यामुळे मला थोडे वाईट वाटले.
मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटेल ... गणिते कधीच चुकीची नसतात ... उत्तर चुकते .. त्याला आपण काहीच करू शकत नाही.
@ आशुडी ... अहो पण माझ्या आजीला ती स्वत्वाची जाणीव नसणेच चांगले वाटते .. (त्यासाठी ती निळी बाहुली)
तिचे मत म्हणजे अतिशय सनातन आहे.
मस्तच... ओघवते लिखाण. आवडली
मस्तच... ओघवते लिखाण. आवडली
प्रिय आशुडी, हेच म्हणजे अगदी
प्रिय आशुडी,
हेच म्हणजे अगदी हेच विचार छळतात काधी काधी, हतबुद्ध व्हायला होत....
मागुन मिळालेल्या गिफ्ट्स ला काय अर्थ आहे....
काही गणित न सुटणारीच का असतात??
पण मग .. तरी ही .. ही ओढ कसली..
पद्धत चुकली तरीही .. उत्तर आवडतय!!!
मग पद्धत को मारो गोली ... हे हे हे
पु. ले. शु.
सशल, ही कथा 'नायिकेची' आहे.
सशल, ही कथा 'नायिकेची' आहे. तिच्या दृष्टिकोनात 'तो' कसा वाटतो याची. 'त्या'च्या कथेत कदाचित 'ती'चे हे विचार अजिबात येणार नाहीत. कॅलिडोस्कोप असतो रे, तुम्ही कसा फिरवताय तशी आतली नक्षी बदलते! नजारा वही होता है, नजरिये बदलते रहते है! स्मित
याहून अधिक पोस्टमॉर्टेम माझ्या कथेचं मी करु शकणार नाही!
>>> आशु, माझी ही comment ह्या कथेसाठी नव्हती तर in general च तीचे विचार मांडणार्या खुप कथा, लेखनप्रकार दिसून येतात पण 'त्या'चे विचार मांडणारं लेखन किमान माझ्या तरी बघण्यात आलेलं नाही असं म्हणायचं होतं मला .. माझं दुसरं वाक्य हे माझ्या ह्या निरिक्षणाच्या possible कारणमिमांसेदाखल आहे जे ह्या गोष्टीत मांडलेल्या विचाराशी सलग्न वाटलं मला ..
(I hope, आता तरी भा. पो.) .. :p
मस्त लेखनशैली.
मस्त लेखनशैली.
चांगलं मांडलं आहेस गणित, आशू!
चांगलं मांडलं आहेस गणित, आशू!
अतिशय सुंदर!!
अतिशय सुंदर!!
आशुडी, (अत्यंत चांगल्या
आशुडी,
(अत्यंत चांगल्या शब्दात) मत मांडल्याबद्दल खरंच धन्यवाद!
बाकी तुमची शैली किती भारी आहे याबद्दल सगळ्यांनी म्हटलंच आहे, परत लिहीत नाही...
निळुभाऊ खुलाशाबद्दल आभार! काही अंशी पटतं मलाही तुमचं म्हणणं. आणि ते स्त्री-पुरुष अशा गोष्टीत न अडकवता अजुन मोठ्या पातळीवर (ब्रॉड लेव्हलवर) बघितलं तर जास्ती पटतं... असो... पर्याय नाही...
आशुडी, मस्त कथा!!! आवडली.
आशुडी, मस्त कथा!!! आवडली.
सर्द आहें कह रही है , है ये कैसी बला की आग.. सोते सोते जिंदगानी घबराके उठी है जाग!" >>> काय सही ठिकाणी सही ओळ वापरलियेस तू!!!कमाल आहे.
आशू मस्त... बरेच दिवसांनी
आशू मस्त...
बरेच दिवसांनी काहीतरी गद्य वाचल... मस्त लिहिले आहेस... काही काही वाक्य तर फार छान उतरली आहेत...
कथे ऐवजी मला हे ललित जास्त वाटलं...
आशू, सुंदर!!
आशू, सुंदर!!
ही कथा माहेरच्या फेब्रुवारी
ही कथा माहेरच्या फेब्रुवारी अंकात प्रसिद्ध झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, आशूडी!
यापुढेही चांगलं लिखाण तुझ्या हातून होवो, यासाठी शुभेच्छा.
फार सुरेख लिहिली आहेस कथा.
फार सुरेख लिहिली आहेस कथा.
Pages