गणित

Submitted by आशूडी on 17 May, 2010 - 02:43

उठल्या उठल्या तिनं नेहमीच्या सवयीनं हातातल्या घड्याळात पाहिलं. आजही तिचा अंदाज चुकलेला नव्हताच. जाग येता येता किती वाजले असतील याचा अंदाज बांधायचा आणि मगच घड्याळात पाहायचं हा तिचा आवडता खेळ. कधी हार कधी जीत. आताही पावणेसहा वाजले होते. दुपारी आमरसपुरीचं जड जेवण झाल्याने जी काय ग्लानी आली होती त्याची धुंदी अजून डोळ्यावरुन हटत नव्हती. ती उठून मांडी घालून तशीच डोळे मिटून बसून राहिली. ही तिची सर्वात आवडती अवस्था. म्हटलं तर जागी, म्हटलं तर निद्रिस्त. आपल्याला हवे ते आठवण्याचे, कल्पना करत बसण्याचे हेच ते फक्त तिचे क्षण! आता या क्षणांचाही अल्बम तयार झालाय. अशाच क्षणी उघडून पाहात बसावा असा. अगदी शाळेत असतानाही अशी अंथरुणावर बसून लागलेल्या तंद्रीत काल तेजूनं शिल्पा आणि आदित्यबद्दल सांगितलेलं खरं असेल? आजच्या वक्तृत्व स्पर्धेत अहिल्यादेवीकडून श्रुती इनामदार असेल की अमृता जोग? श्रुती असेल तर तेच तावातावाने आपले मुद्दे ठाशीवपणे मांडून ठराविक जागी माहित असल्यासारखं बोलायचं थांबून श्रोत्यांच्या टाळ्या घेणं आणि अमृता असेल तर ते कृत्रिम भाव ओसंडणारा चेहरा घेऊन स्टेजवरुन उतरताना आता तो ओघळेल की काय या कल्पनेनंच तिला फिसकन हसू यायचं. मग पुढे मोठी होत गेली तशी या इतरांच्या मते 'चिंतन काळात' विचार करण्याचे विषय बदलत गेले तर ती आणि ती वेळ मात्र तशीच राहिली वर्षानुवर्षांच्या भिंतीवरच्या गणपतीच्या फ्रेमसारखी. असून अडचण नाही आणि नसून खोळंबा नाही. तिला आठवलं, लग्नाआधी याला भेटायचो तेव्हाच्या मोहक क्षणांची पुनरावृत्ती करायची हीच तर आवडती वेळ असायची आपली! तेव्हा त्यानं जे केलं ते आठवायचं, न केलं असेल किंवा हे केलं असतं तरी चाललं असतं की असं जे तिला वाटायचं त्याची कल्पनाचित्र रंगवायची. फारच अनावर झालं तर पटकन उशीखालचा मोबाईल काढून एक sms. त्यातही काय लिहायचं असा प्रश्न पडायचाच. न बोलून याला आपल्या मनातलं कळायला पाहिजे..! असं खरंतर तेव्हापासूनच वाटायचं.. जे आजही कायम आहे त्यांच्या दोघातल्या प्रेमासारखंच! च्यायला, आला आपला बसस्टॉप. उतरा आता.
तिनं एकवार घड्याळ पाहिलं. चौकोनी व्हॉयलेट डायलचं रोमन मध्ये फक्त XII आणि VI एवढेच अंक आणि अतिशय विजोड असा काळा बेल्ट असणारं टायटन. 'अगं काय आणलंयस हे? काहीतरी गर्लिश आहे का यात?' असं आरतीनं वैतागून विचारलं तेव्हा तरी त्याला मॅचिंग असा निळा बेल्ट होता. तिच्या पगारातून त्याला आणि तिला घेतलेलं दिवाळी गिफ्ट होतं अर्थातच लग्नाआधीचं. पुढे लग्न झालं. बेल्ट झिजला. तस्साच बेल्ट काही मिळेना. मिळणार नव्हताच हे समजायला हवं होतं. मिळाला तो काळा बेल्ट घेऊन तिनं वापरणं सुरुच ठेवलं त्या दिवाळीची आठवण म्हणून. त्याचं ते घड्याळ केव्हाच कपाटातल्या ड्रॉव्हरच्या मागच्या भिंतीला टेकून शेवटच्या घटका मोजतंय. आपलं नातं या घड्याळासारखंच झालंय नाही का?दर्शनी सुंदर डायल पण मागे डोळ्यात खुपणारा आणि हातात रुतणारा काळा बेल्ट. तिनं सणकून डोकं हलवलं. घड्याळ आणि लग्नाची अ‍ॅनालॉजी? फारच सिनिक होतोय आपण.आवरा. . पण आज आपल्याशी तरी गणित मांडायला काय हरकत आहे? तसंही याच्यासमोर ही गणितं मांडणं म्हणजे आपले हातचे हातातच राहायची भीती. त्याच केव्हाचं 'हॅ: इतकं सोपं आहे हे' म्हणून उत्तर काढून साई सुट्यो होणार आणि आपण बावळटासारख्या पायरीच्या पद्धतीपाशीच गुरफटणार. उत्तर मला तोंडीही येत होतंच की रे! पण 'पध्दतीचं' महत्त्व तुझ्या कधी लक्षात येणार? तिची कायमची अशीच हताश दमणूक. उत्तर माहीत असूनही गणित सुटल्याचा आनंद नाही. हे असं नको होतं मला. कधीच. मग का असं झालं? काहीतरी चुकतंय, सलतंय. दर वेळेस मनाच्या आरशाला त्याच ठिकाणी जाणारे तडे. आता त्याचे स्पष्ट दोन तुकडे दिसतात समोरुन. एक तड्याच्या अलीकडचा म्हणजे लग्नाआधीचा आणि नंतरचा. आपलं इतकं राजीखुशीनं झालेलं लग्न म्हणजे तडा की काय? ती शहारली. तिच त्याच्यावर खूप प्रेम. त्याचंही तिच्यावर. अगदी गोष्टीतल्या राजकन्येसारखंच. तो आला. त्यानं पाहिलं तिला जिंकलं आणि सफेद घोड्यावर स्वार होऊन दोघं स्वप्नांच्या प्रदेशात निघून गेले आणि सुखानं नांदू लागले. मग पुढं काय झालं?

एका नेहमीच्या सवयीच्या भांडणात तिनं त्याला विचारलं," एवढंच होतं तर मग का केलंस माझ्याशी लग्न?" "तू बदलशील असं वाटलं म्हणून! तू तरी का केलंस मग?" "मलाही तू सुधारशील असं वाटलं होतं म्हणून." पहिला तडा इथं गेला. "तू जशी आहेस तशी मला आवडतेस. तू इतरांपेक्षा निराळी आहेस, चार मुलींसारखी नाहीस म्हणूनच मला तुझं आकर्षण वाटतं.." हे कित्येक संध्याकाळी त्यानं तिचे हात हातात घेऊन कबूल केलं होतं. "लग्नानंतर तरी देशील का रे, न मागता डेअरी मिल्क, गिफ्ट्स?" असं १७ वेळा हट्ट करुन १८व्यांदा तो पुरवल्यावर ती अजीजीनं त्याला विचारायची. पण आता तिचं मागणंही बंद झालंय. मागून मिळवण्यात कसली मजा..? पुन्हा तेच.. मी न बोलताही याला... तुझ्या माझ्याकडच्या अपेक्षाच निराळ्या असतात, त्या मला समजत नाहीत. त्यापेक्षा तू सांग मी तसं वागेन. त्याचं साई सुट्यो. ती पध्दतीच्या पायरीवर बसलेली.

लग्नाबरोबर नात्यांची, भूमिकांची लागलेली पुटं सांभाळतानाही तिच्या जीवावर यायचं. तुमची सून पाककलानिपुण वगैरे तर नाहीच पण त्या रसास्वादात तिला अजिबात रस नाही हे घरच्यांना पटवून देताना तिच्या नाकी नऊ आले. घरी पाहुणे आले की मदत करण्याइतपतच तिचा किचनमधला वावर. एखादा पदार्थ अभ्यासू वृत्तीने शिकणं नाही की हे मी करु का विचारणं नाही. पाहूणेही कळीचे प्रश्न बरोबर विचारतात, "यातलं सूनबाईने काय काय केल?" यावर तिचं अनावर खुदकन हसणं, इतरांचं सांभाळून घेणं आणि याचं नजर रोखून पाहणं किंवा एखादा छद्मी उसासा. करायची वेळ येईल तेव्हा उपाशी बसणार नाही एवढा आत्मविश्वास तिला होता पण त्यासाठी सतत ते इतरांना पटवून देण्याची काय गरज हे तिला न उमगणारं कोडं होतं. सासूबाईंनी पुस्तक प्रदर्शनातून 'तिच्यासाठी' म्हणून 'नाष्त्याचे ५० प्रकार', ' १०० पुलाव' असली ६ मासिकं आणली तेव्हा चेहर्‍यावरचे भाव लपवतानाची तिची त्रेधा, मग पळत बाथरुममध्ये जाऊन बादलीत मोठा नळ सोडून हसता हसता डोळ्यात आलेलं पाणी आठवून आताही तिनं ओंजळीत चेहरा झाकला.
तिला प्रमोशन मिळालं तेव्हा दोघंही आनंदात होते. "बघ, तिची प्रगती ती करतेय. तू बस ठोंब्यासारखा!" असं म्हणून घरच्यानी केलेलं कौतुक त्याचा खर्रकन उतरलेला चेहरा पाहून मिठाचा घास पाण्याबरोबर घशाखाली ढकलावा तसं गिळून टाकलं होतं तिनं. माझं आयुष्य, माझी साध्यं ही माझ्या एकटीची कधीच नसणारेत का? चालता चालता रस्त्यातली एखादी सुतळी पायात अडकावी आणि आपल्याच दुसर्‍या पायाने तिच्यावर पाय देऊन तोंडघशी पडायला व्हावं, तसंच जाणवणारे का हे लग्न मला? ठेच लागल्यासारखं किंवा मग चुकून पायात अडकलेल्या सुतळीसारखं?

'मला खूप मोठ्ठं व्हायचंय रे!' एखाद्या निवांत क्षणी तिनं त्याचे हात हातात घेऊन म्हणावं.

त्याने विचारावं," कुणाच्या नजरेत? आय मीन, इन व्हॉट सेन्स?"

"कुणाच्या म्हणजे काय? माझ्याच."

"पैशानं?? हुद्द्यानं? मला समजतच नाही कधी कधी तू काय बोलतेस ते. नको की इतकी पुस्तकं वाचत जाऊस."

त्याच्या निरागसतेचं कौतुक करावं का या वयातही असणार्‍या इममॅच्युरिटीची चीड यावी या संभ्रमात असूनही संयम ठेवून ती म्हणते, "अरे, म्हणजे मला जी लोकं 'मोठी' वाटतात तेवढं मला व्हायचंय. मग तेव्हाही माझ्यापेक्षा मोठी आणि मी ज्यांना मोठी वाटेल अशी लोकं असतीलच की. म्हणून म्हटलं मला माझ्याच नजरेत मोठं व्हायचंय."

"मला नेहमी भीती वाटते, तू माझ्यापासून लांब जातेयस."

सुरवंटाचं फुलपाखरु झाल्यावर दुनियेनं 'अहाहा' म्हणावं आणि त्या तुतीच्या झाडानं मात्र 'तू सुरवंटच बरा होतास. निदान माझ्याजवळ तरी होतास' असं म्हटल्यावर त्या काही काळासाठी आपली प्रेमानं साथ सोबत केलेल्या बिचार्‍या झाडाकडे पाहून फुलपाखराला आपल्या अंगावरचे हे रंग, नक्षी, मखमल पुसून टाकावीशी वाटेल, तसं तिला होऊन जायचं. पण फुलपाखरुही आपल्या पानाफुलावर बागडेल हे तुतीला समजू नये? का त्याला ते झोपी गेलेलं, पूर्णत: आपल्यावर विसंबून असलेलं, आपल्या सुरक्षा कवचात पहुडलेलं बाळबोध सुरवंटच जास्त प्रिय होतं?

त्याला लग्न झाल्यावर, कार्टूनमध्ये दाखवतात तसं स्पिनॅच खाऊन पॉपॉयच्या अंगात शक्ती संचारते तसं गळ्यात मंगळसूत्र अडकवल्यावर लगेच हिनं 'बायको' व्हायला हवी होती.ऑफिसला जाताना मांजरासारखं पायात घुटमळत राहणं,अन ते संध्याकाळी नटून वाट बघत राहणं,वगैरे गोष्टी सिनेमातच तिला इतक्या फालतू वाटल्या की ती त्या करणं म्हणजे स्वतःच्या मतांचा कडेलोट करणं. तिनं केलंही असतं कदाचित, जर तो 'नवर्‍यासारखा' वागला असता तर. तिच्यापेक्षा जबाबदार, मॅच्युअर्ड. हमसे आया न गया, तुमसे बुलाया न गया असं होऊन ना मी बायको झाले ना तू नवरा.सात फेरे, मंगळसूत्र, जोडवी, जोडीनं बसून केलेल्या पूजा, केलेले आणि मिळालेले आहेर, आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे सगळं एकत्र एका छताखाली वर्षानुवर्ष केलं म्हणजे नाही रे होत लग्न. हे उत्तर झालं गणिताचं. पण पद्धत?

आता मात्र उठायलाच हवं होतं. हा मनातला गोंधळ कधी थांबेल का अजून अजून चरे तडे जात आरसाच शिल्लक उरणार नाही कुणास ठाऊक. पण आपल्याच वाट्याला असं का ? ची एक सूक्ष्म कळ आलीच. हे मनातलं सगळं कधी उमटलंच तर काय हाहाकार उडेल याच्या कल्पनेनही ती थरथरली.. नको त्या वेळी नेमक्या ओळी आठवल्या.."सर्द आहें कह रही है , है ये कैसी बला की आग.. सोते सोते जिंदगानी घबराके उठी है जाग!" साई सुट्यो म्हणू शकणारे खरंच नशीबवान. त्याचा हेवाच वाटायचा बर्‍याचदा. असं सहज, सुटसुटीत का नाही आपलं? पण या असल्या गणितांचं एक बरं असतं.. उत्तरासाठी शेवटचं पान बघायचा मोह होत नाही. कारण पद्धतीनुसार उत्तरं बदलत जातात अन आपलं उत्तर काय हे आपण निवडलेली पध्दत ठरवते. फक्त हे कळायला काहींना शेवटच्या पानापर्यंत पोहोचावं लागतं! ती स्वतःशीच साई सुट्योss म्हणून समोरच्या आरशात पाहून मनमोकळं हसली!

गुलमोहर: 

आशूडी, आज परत वाचली....
पुन्हा तितकीच पोचली. माहेरमधे आलीये... अभिनंदन!

आशुडी, अप्रतिम कथा. अगदी हेच हेच्च आपल्याला वाट्त होते आणि सांगायला कधी जमले नाही असे वाट्ले.
आता गणिते सोड्वून परीक्षा संपल्यावरच्या आनंदी सुट्टीत, स्वत्व साकार करताना तर हा ब्लास्ट फ्रॉम द पास्ट फार ऑब्जेक्टिवली वाचता आला. मस्त:) कुठुन कुठून काय काय सांधून येत जातंय नवं बनतंय.
कथा संग्रह ड्यू आहे मॅड्म Happy

१००

सुरवंटाचं फुलपाखरु झाल्यावर दुनियेनं 'अहाहा' म्हणावं आणि त्या तुतीच्या झाडानं मात्र 'तू सुरवंटच बरा होतास. निदान माझ्याजवळ तरी होतास' असं म्हटल्यावर त्या काही काळासाठी आपली प्रेमानं साथ सोबत केलेल्या बिचार्‍या झाडाकडे पाहून फुलपाखराला आपल्या अंगावरचे हे रंग, नक्षी, मखमल पुसून टाकावीशी वाटेल, तसं तिला होऊन जायचं. पण फुलपाखरुही आपल्या पानाफुलावर बागडेल हे तुतीला समजू नये? का त्याला ते झोपी गेलेलं, पूर्णत: आपल्यावर विसंबून असलेलं, आपल्या सुरक्षा कवचात पहुडलेलं बाळबोध सुरवंटच जास्त प्रिय होतं?>> मस्त..

खूप छान लिहिलंय तुम्ही Happy फुलपाखराचा पॅरा. अगदी योग्य. तो प्रत्येक नात्यांना लागू होतो. अगदी मैत्रीतही Happy कथा आवडली Happy

सुरवंटाचं फुलपाखरु झाल्यावर दुनियेनं 'अहाहा' म्हणावं आणि त्या तुतीच्या झाडानं मात्र 'तू सुरवंटच बरा होतास. निदान माझ्याजवळ तरी होतास' असं म्हटल्यावर त्या काही काळासाठी आपली प्रेमानं साथ सोबत केलेल्या बिचार्‍या झाडाकडे पाहून फुलपाखराला आपल्या अंगावरचे हे रंग, नक्षी, मखमल पुसून टाकावीशी वाटेल, तसं तिला होऊन जायचं. पण फुलपाखरुही आपल्या पानाफुलावर बागडेल हे तुतीला समजू नये? का त्याला ते झोपी गेलेलं, पूर्णत: आपल्यावर विसंबून असलेलं, आपल्या सुरक्षा कवचात पहुडलेलं बाळबोध सुरवंटच जास्त प्रिय होतं?>> मस्त..खुप आवडला.

आशूडी, अप्रतिम लेख खरंच सुंदर!

.."सर्द आहें कह रही है , है ये कैसी बला की आग.. सोते सोते जिंदगानी घबराके उठी है जाग!" साई सुट्यो म्हणू शकणारे खरंच नशीबवान. त्याचा हेवाच वाटायचा बर्‍याचदा. असं सहज, सुटसुटीत का नाही आपलं?

लग्नाबरोबर नात्यांची, भूमिकांची लागलेली पुटं सांभाळतानाही तिच्या जीवावर यायचं.
खरच असच होताना पहिल आहे..............

Pages