ऑकलंड भाग ३ - बोटॅनिकल गार्डन

Submitted by दिनेश. on 26 January, 2011 - 15:55

पहिला भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22893
दुसरा भाग इथे आहे. http://www.maayboli.com/node/22950

ऑकलंड बोटॅनिकल गार्डन हे शहराला लागूनच आहे. ६४ हेक्टर्सवर पसरलेली हि बाग म्हणजे माझ्यासाठी स्वर्गच होता. नैसर्गिक उंचसखल भागांचा वापर करुन हि बाग वसवली आहे आणि त्यात नवनवीन विभागाची भर पडतेय.

आणखी एक नवलाची बाब म्हणजे या बागेसाठी कुठलीही प्रवेश फ़ी नाही.

सध्याच्या दिवसात, तिथे हवामान खूपच उष्ण असते. उन्हात गेल्यास चटका बसतो तर सावलीत थंडी वाजते.

म्हणून मी त्या बागेत जरा दिवस कलल्यावर गेलो. पण मग लक्षात आले कि, या बागेला पूर्ण न्याय द्यायचा तर आणखी वेळ द्यायला हवा. म्हणून मी दुस-या दिवशी सकाळीच, म्हणजे बाग उघडता उघडता बागेत पोहोचलो.

तिथे अनेक विभाग आहेत आणि सगळीकडे उत्तम माहितीफलक आहेत. एकाच काळात सर्व झाडे बहरात असतील, हे शक्यच नाही, त्यामूळे काही झाडांची फूले न बघितल्याची मला फार रुखरुख लागली. (खास करुन चाफा वर्गातील झाडे.)

त्या देशातील स्थानिक झाडे तिथे जोपासली आहेत. त्यातल्या काही प्रजाती नाहिशा होऊ घातल्या आहेत, त्याही तिथे प्रयत्नपूर्वक जोपासल्या आहेत. त्यांची सचित्र माहिती झाडाखाली आहे. हि चित्रे त्या झाडाच्या पानांची, फूलांची आहेतच पण लांबून ते झाड कसे दिसते, याची पण आहेत. एवढी सगळी माहिती मिळाल्यावर ते झाड, कायम लक्षात राहीलेच पाहिजे.

स्थानिक झाडांची मजेदार माहिती, औषधी उपयोग तिथे लिहिलेले आहेत आणि तेही अगदी रंजक स्वरुपात.

उदा. किरिकिरि नावाच्या एका झाडावर, काही खास पक्ष्यांचा वावर असतो, कारण त्यांना बसण्यासाठी
त्या झाडाच्या फांद्या सोयीस्कर असतात. त्यांचे रंग त्या झाडाच्या पानात आणि फूलाफळात बेमालून
मिसळून जातात. एवढेच नव्हे तर ते पक्षी त्या झाडावर पार्टी करतात आणि त्या झाडाची मादक फळे
खाऊन, झाडाखाली झिंगून पडतात.

झाडांना पाणी द्यायची काय व्यवस्था केलीय, ते वेगळे दिसत नाही. नैसर्गिक तळी, ओहोळ यांचाच वापर केलेला दिसला. सर्व बागेच्या मध्यातून जाणारा लूप रोड आहे आणि वेगवेगळ्या विभागांकडे जाणार्‍या पायवाटा आहेत.

तिथले अनेक भाग असे आहेत, कि आपण दाट जंगलात असल्याचा भास होतो. पण तरिही तिथे
व्यवस्थित पाट्या आहेत. माझ्यावर हि वेळ अनेकदा आली, (म्हणजे मी हरवलो )पण पायाखालची वाट सोडली नाही तर आपण त्या लूप रोड पर्यंत पोहोचतोच. किंवा मार्गदर्शक फलकापर्यंत तरी.

भाज्या आणि फळे, गुलाब, पाम, हर्ब्ज असे अनेक विभाग आहेतच पण आफ़्रिकन झाडे, (त्यातली
अनेक मी तिथे पहिल्यांदाच बघितली.) निवडुंग असे खास विभागही आहेत. तिथे वाढदिवस किंवा
लग्न वगैरेच्या पार्ट्या करता याव्यात, यासाठी खास फूलांची सजावट केलेल्या बंदीस्त जागा आहेत.

गेटजवळच सर्व माहीती मिळेल अशी व्यवस्था आहे, वाचनालय आहे आणि उपहारगृहदेखील. पण बागेत आणखी कुठे खाण्याची व्यवस्था नाही.

तर या बागेचे फोटो, मी ३ टप्प्यात देतो. या भागात केवळ त्या बागेची रचना लक्षात यावी असे फोटो
देतोय, पुढच्या भागात केवळ गुलाबांच्या फूलाचे तर तिस-या भागात, इतर फुलांचे.

तिथे राहुन राहुन असे वाटत होते, कि माझ्या निसर्गप्रेमी मित्रांना माझ्याकडून तोकडीच माहीती मिळते.
, त्यापेक्षा अशी माहिती त्यांना मिळती तर, त्यांची आवड जोपासली जाईल.

तर चला बागेत फेरफटका मारु या.
१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६.

१७.

१८.

१९.

२०.

२१.

२२.

२३.

२४.

२५.

२६.

२७.

२८.

२९.

३०.

३१.

३२.

३३.

३४.

३५.

३६.

३७.

३८.

३९.

४०.

४१.

४२.

४३.

४४.

तर हि झाली केवळ लांबून ओळख. फूलांची "तोंडओळख" पुढच्या दोन भागात करुन घेऊ.

गुलमोहर: 

बापरे, किती भलीमोठ्ठी आणि देखणी बाग आहे. म्हटली तर आखीव-रेखीव, म्हटली तर नाही. कितीतरी वेळ लागत असेल ना, संपूर्ण बागेतून फेरफटका मारायला?

४ मधले गुलाबी तुरे खासच. ११ मधलं निळ्या फुलांच झाड आहे माझ्या घरी. आणलं त्यावेळी अर्थातच सुंदर फुललं होतं. पण नंतर फुलं नाही येत आहेत. Sad

२६,२७ मध्ये लव्हेंडर आहे का? लव्हेंडरची फुलं घालून केलेलं घरगुती आईस्क्रीम मला माझ्या बहिणीच्या अमेरीकेतल्या मैत्रीणीने खायला घातलं होतं. मस्त लागतं. तिच्याचकडे अंगणात लावलेल्या झाडावरच्या ताज्याताज्या स्टॉबेरीज पण तोडून खाल्यात.

मृण्मयी, तो एक फूलांचा तूरा होता, असे बरेच होते तिथे.

मामी, ४ आणि ११ मधे बरेच रंग होते तिथे. २६/२७ लॅव्हेंडर नाही, पण बहुतेक हर्ब्ज इथे होत्या. आणि वेळ म्हणाल, तर अपुराच पडला. आता त्यांच्या स्प्रिंग मधे जायला पाहिजे मला.

बाजिंदा- बागोबाच !

योगेश, खरेच तूम्ही सगळे हवा होतात.

बाकि दोस्तांनो, या विकांतला पुढच्या भागासाठी फूलांचे फोटो निवडायचे कठीण काम करायचे आहे मला. साडेचारशे फोटो आहेत माझ्याकडे !!!

१९ मधे गुलाबांच्या मधोमध निगडी आहे.
२५, मधल्या झाडाला माझ्या ओंजळीएवढे पांढरे फूल लागते, त्याचा क्लोजप मग टाकतो.
३०. मधे आहे ती पार्टी करायची जागा.
३२ मधे दिसतेय ती किरीकिरीचे झाड, त्याचाही क्लोजप मग टाकतो.
४१. मधे आहेत त्याच्या पानांचे ते बास्केट वगैरे विणतात.

मस्त फोटो. आपली बंगलोर वारी आठवली. उद्या परत तिथे जाणार आहे पण बागेत नाही. किरीकिरीची गंमतच आहे. ते तळे व बदके त्याच्या तिथे बसून गाणे गावेसे वाट्त आहे. फार मोठा प्रॉजेक्ट आहे असे दिसते. आरामात परत बघणार आहे. Happy गुलाब आने देव.

वॉव!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सगळे शब्द संपले. Sad

मस्त आहेत फोटो. बाग जास्त आवडली कारण उगाच landscaping न करता बर्‍याच गोष्टी नैसर्गिकच ठेवल्या आहेत. नाहीतर जास्त सुंदर करण्याच्या नादात कृत्रिमता आणली जाते.

१९ मधे गुलाबांच्या मधोमध निगडी आहे. >> हा निगडीचा नैसर्गिक आकार आहे? मी निगडीचा फक्त पालाच पाहिलाय झाड नाही बघितलेले.

माधव, खरेच सगळे नैसर्गिकच भासत होते तिथे.
निगडीचे झाड उभट वाढते. साधारण त्रिकोणी आकारात. हा खास जोपासलेला आकार वाटला.

मस्त.
एवढेच नव्हे तर ते पक्षी त्या झाडावर पार्टी करतात आणि त्या झाडाची मादक फळे
खाऊन, झाडाखाली झिंगून पडतात. >>> नवलच वाटलं हे वाचुन. Happy अजुन माहिती / फोटो मिळाले तर टाका प्लिज.

मस्त सफर घडवलीत बागोबाची !
६ नं मधला तो तुर्‍याचा झेंडा लई भारी.
किरकिरीची पार्टी Lol पक्ष्यांमध्ये पण ड्रिंक अँड ड्राईव्ह...फ्लाय बद्दल चर्चा होत असतील का ??
का ते नेमकं सांगता येणार नाही, पण नं ३४ वाला फोटो खूsssप आवडला.

दिनेशदा,
तुम्ही अशा बागेत फिरवल्यामुळे आता फ्रेश,मस्त वाटायला लागलं !
Happy

एवढेच नव्हे तर ते पक्षी त्या झाडावर पार्टी करतात आणि त्या झाडाची मादक फळे
खाऊन, झाडाखाली झिंगून पडतात

हे तिकडचे (माणसाळलेले) पक्षी किंवा त्यांचे कुणी वारसदार आपल्या देशात आढळतात का ?
आपल्याकडच्या पक्षांना या झाडाची (महती) माहिती न दिलेलीच बरी !
Lol