शहाणपण देगा देवा........!!!

Submitted by भुंगा on 24 January, 2011 - 13:38

एखाद्या मराठी निर्मात्याला "शिवाजीराजे" सारख्या चित्रपटातून बक्कळ पैसा वसूल करता आला, तर मग पुढचा त्याचा मराठी चित्रपट तो तितकाच दर्जेदार काढून मराठी प्रेक्षकांचे पांग फेडेल...... बरोब्बर?????
साफ चूक.

एखाद्या दिवशी आपण उंदियो करायचा बेत केला..... आपण नावाजलेली सुगरण म्हणून सगळ्या बाजारातल्या भाज्या "मला घ्या मला घ्या" असे करणार्‍या...... मग मिळतायत सगळ्या भाज्या तर घेऊनच टाकू आणि करुया उंदियो असे जर आपण ठरवले तर त्या सगळ्या भाज्या मिक्स करून तो उंदियो कित्ती कित्ती रुचकर होईल...... बरोबर???????
साफ चूक.

असच काहीसे "शहाणपण देगा देवा" या चित्रपटाचे झालय.....!!! Sad

महेश मांजरेकरच्या "द ग्रेट मराठा एंटरतेनमेंट" निर्मित, सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे दिग्दर्शित हा चित्रपट.
भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, सिध्दार्थ जाधव, महेश मांजरेकर स्वतः, वैभव मांगले, क्रांती रेडकर, मन्वा न्नाईक, संतोष जुवेकर, कमलाकर सातपुते, विद्याधर जोशी, किशोर कदम, किशोर प्रधान आणि इतर मांजरेकरांची नेहमीची यशस्वी मांजरे.... आय मिन कलाकार :फिदी:, एवढा सगळा लवाजमा.
पण चित्रपट अचरट पण म्हणवत नाहिये...... सगळाच शब्दशः वेड्यांचा बाजार....!!!!

चित्रपटाचे कथानक सुरू होतं तेच मनोरुग्णालयातून....... रणजितसिंग आणि मनजितसिंग यांची अगम्य कथा एका वेगळ्याच टोनमध्ये सुत्रधार (अर्थात महेश मांजरेकर) तुम्हाला सांगतो... आणि एका एका वेड्याची ओळख होत जाते...... यात सगळेच वेडे म्हटल्यावर जास्त तपशीलात जाऊन तुमचा आणि माझा वेळ घालवत नाही. कथा काहीच सांगण्यासारखी नाही त्यामुळे पुढे शब्दच खुंटले........

हा चित्रपट का बनवला हे एक कोडेच आहे..... बहुधा शिवाजीराजे बनवताना गडावरून ही सगळी मंडळी "डोक्यावर": पडली असावीत..... आणि मगच हा पुढचा कल्लोळ आपल्या वाट्याला आलाय.

सगळे वेडे, त्यांना वेगळ्या थेरपीने शहाणे करायला निघालेला डॉक्टर, त्याला अंतर्गत विरोध करणारे डिन आणि दोन डॉक्टर, मग शहाण्या दॉक्टरचा काटा काढायचा प्लॅन टिपिकल ईस्टोरी पण तरीही प्रचंड विस्कळीत.
सगळ्यात कहर म्हणजे खलनायक "खाल्या बिन पादेन" Rofl आता हा खलनायक "गे" असतो..... आणि त्याला न खाताच पादायची सवय असते..... मग याला अनुसरून अत्यंत सपक संवाद........

दोन पोलीसच सुपारी घेतात पण ते पोलिस असतात हे शेवटपर्यंत आपल्याला कळतच नाही कारण ते सुटाबुटात फिरत असतात...... नावे काय त्यांची तर "हिमेस" आणि "रेसमिया"..... Proud

नायिकांना इतक्या भाऊगर्दीत काम असणे अशक्यच आहे..... त्यांना फक्त दिसायचं आणि दाखवायचं काम आहे ते त्या व्यवस्थीत पार पाडतात एखाद दुसर्‍या सीनमधे..... एक नवी नायिका मधेच "बमचीकबाबा" च्या आश्रमातल्या डान्समध्ये येते आणि मग अखंड या हिरोंबरोबर फिरत रहाते...... ते का हे लॉजिक विचारायचे नाही...... नवी नायिका आहे ना, मग गुपचूप खुर्चीत बसून ती जे दाखवते ते बघयचे आणि घरी जायचं...... Happy
त्या नायिकेला बघून शेजारच्या खुर्चीतलं कोणीतरी म्हणालं की "अरे ही प्रदिप कबरेची मुलगी" आहे... थोड्या वेळाने लक्षात आलं की शेजारच्या सीटवर आपलीच बायको बसलीये.... Proud

वास्तविक तो डॉक्टर जेंव्हा या महत्वाच्या पाच हिरो वेड्यांना" ईंडिया पाकिस्तान" मॅच दाखवायला नेतो तेंव्हा प्रवासात एक छान गाणं आहे...... तेच टायटल साँग...... आता त्याच्या चित्रिकरणासाठी म्हणुन दिग्दर्शकाने गणपतीपुळ्याजवळचा "आरे-वारे" चा नवा सागरी रस्ता निवडलाय...... अप्रतिम लोकेशन आहे ते....
पण मॅच दाखवायला नेताना तो रस्ता कुठुन आला???? असले शहाण्यासारखे प्रश्न स्वतःला पाडून घ्यायचे नाहीत...... महेश साहेबांनी एक फोन मारला तर रत्नागिरितही एका दिवसात आंतरराष्ट्र्रीय दर्जाचं स्टेडियम होऊ शकते... आहात कुठे???? वेडे कुठचे......!!!!!! Rofl Lol

बाकी जमेची बाजू म्हणजे फक्त आणि फक्त टायटल साँग........ मस्त गाणं आहे...... गुणगुणावेसे वाटते...
सिध्दूची आणि वैभव मांगलेची जोडी मस्त......... आता कथानकच नसेल आणि इतके सगळे स्टार्स एकत्र तर कोणाच्या वाट्याला किती येणार???? त्यात कलाकारांचा दोष नाही...... Sad
क्रांती रेडकर अ‍ॅज युज्वल सर्व पेहरावात छानच दिसते...... मन्वा आणि नव्या नटीने आवश्यक ते सर्व गुण उधळून आम्ही पण आहोत इंडस्ट्रीत...... "आम्हाला आपले म्हणा" अशी हाकाटी दिलिये.... Happy

कधी नव्हे तो वडील तयार झाले सिनेमाला यायला आणि तो पाहून बाहेर पडताना, "मला पुन्हा अश्या पिक्चरना आग्रह करू नका हं" असा शालजोडीतला हाणून गेले...... यावरून कल्पना यावी.......

"खाल्या बिन पादेन" हा तर अचरटपणाचा कळसच होता....... Sad

यातून एक गोष्ट समोर आली. मी प्रोमोज आणि एकंदर पब्लिसिटि होताना सर्व कलाकारांचे बोलणे ऐकून आशेने गेलो होतो थिएटरमधे इतर चांगले चित्रपटाचे ऑप्शन्स असताना..... कल्पना होती की पब्लीसिटीसाठी कार्यक्रमात काय बोलायचे कलाकारांनी हे देखील स्क्रिप्टेड असते...... ज्या पध्दत्तीने तोंडभरून सगळ्या कलाकारांनी कौतुक केलं होतं त्यातले ५०% सुध्दा नाही त्यात....... कसली मॅड मॅड कॉमेडी....... कॉमेडी नाहीच ही...... साफ निराशा झाली.

सरतेशेवटी, शहाणे असाल तर चुकुनही पाहू नका ........ देव कोणालाही चित्रपटग्रुहाच्या जवळपासही न फिरकण्याचे शहाणपण देवो.......!!!!!!

ए भेजा माझा उल्टा.... तू कर ना रे सुल्टा......... Proud

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश साहेबांनी एक फोन मारला तर रत्नागिरितही एका दिवसात आंतरराष्ट्र्रीय दर्जाचं स्टेडियम होऊ शकते... आहात कुठे???? वेडे कुठचे......!!!!!!

Rofl

"मला पुन्हा अश्या पिक्चरना आग्रह करू नका हं" असा शालजोडीतला हाणून गेले....

खरंखुरं समीक्षण...

अप्रतिम लेख भुंग्या.... Happy

लेख आवडला

थोडक्यात काय,
Too many cooks spoil the cake
असंच काहीसं या चित्रपटाचं झालंय
हे तुमच्या लेखावरून वाटतंय.

मीही पाहीला रविवारी पाहीला हा सिनेमा. अगदी अगदी येडचापपणाचा कळस..! अपवाद वैभव मांगलेचा. मॅच पाहायला घेवून जाणे, महेश मांजरेकरांना गोळी घालून ठार करणे त्यावेळी हा सिनेमा थोडासा "क्रेझी ४" च्या जवळ जातोय असं वाटलं. त्यातही त्या वेड्यांना गाडीतून बाहेर घेवून जात असताना जुही चावलाचं अपहरण केलं जातं. धोबी घाट, नो वन किल्ड जेसिकाचा ऑप्शन असतानाही... यालाच स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारणे नव्हे तर समोर दिसणार्‍या कुर्‍हाडीवर स्वतःच जावून आपला पाय मारणे म्हणतात...

असा चित्रपट पाहण्यासाठी "सहनशक्ती देगा देवा"..!

चांगले समीक्षण भुंगा.

सगळ्या गुणी लोकांना एकत्र घुसडून काहीच द्यायचं नाही ही महेश मांजरेकरची जुनी खोड आहे.

"शिवाजीराजे" चे यश हे विषयाचे आणि सचिन खेडेकरचे होते.

भुंग्या Proud

मी मराठी चित्रपटांच्या वाटेला फारसा जात नाही याचा आज पुन्हा आनंद झाला.

"शिवाजीराजे" चे यश हे विषयाचे आणि सचिन खेडेकरचे होते.

>>>>

विजयजी, ते यश कथेचही होतं..... कलाकार आपलं काम चोख करतात हो, पण मुळात कथा हवी ना....... :स्मितः

भुंग्या, परत एकदा खुमासदार आता मी अजिबात बघणार नाही.
बाकी मल्टीस्टारर सिनेमे मराठीत कायम फ्लॉप गेलेत काही अपवाद वगळता (सामना, झुंज, सावरखेड एक गाव वगैरे).
सगळच चांगल करायच्या नादात एकही धड करता येत नाही.
मांजरेकरांच्या बाबतीत तेंडुलकर प्रत्येक मॅचला सेंच्युरी मारतोच अस नाही हे विधान सिद्ध झाल.

मी मराठी चित्रपटांच्या वाटेला फारसा जात नाही याचा आज पुन्हा आनंद झाला.
>>>>>
मला पण Biggrin

आचरट आणि वाह्यात चित्रपट बनवण्यात अनेक वर्षांपासून मराठी वाल्यांचा हात कुणी धरु शकत नाही Sad
अपवाद अर्थातच आहेतच्..पण ते अपवादच!