चायना पोस्ट-सात

Submitted by शर्मिला फडके on 23 January, 2011 - 07:21

चीनच्या निसर्गात भौगोलिक परिस्थितीनुसार आश्चर्यकारक विविधता आहे पण तिथल्या नैसर्गिक, समृद्ध पर्यावरणासमोर कायमच कोणत्या ना कोणत्यातरी मानवनिर्मित अथवा नैसर्गिक आव्हानांचं संकट उभं ठाकलेलं असतं. शतकानुशतकं या संकटांशी सामना करताना चीनमधल्या नैसर्गिक पर्यावरणामधे कधी मुलभूत बदल होत गेले, कधी निसर्गाने हार पत्करली आणि बरेचदा तीव्र, उलटा वार करत यशस्वी प्रतिकारही केला.
अफाट लोकसंख्या आणि बेफिकिर औद्योगिक प्रदुषण तर तिथल्या पर्यावरणाचे कायमस्वरुपी शत्रूच. त्यांच्यामुळे तिथल्या निसर्गाची, वन्यजीवनाची न भरुन येणारी हानी झालेली आहे. वाघ, पांडा, हत्ती, अनेकविध क्रौन्च जातींसारखे पक्षी त्यांची नैसर्गिक परिसंस्थाच नाहिशी झाल्यामुळे चीनमधून जवळपास नामशेष झाले आहेत.
चीनी पर्यावरण, तिथल्या नैसर्गिक परिसंस्था आणि वन्यजीवन यांचं परस्परांशी असणारं नात काहीसं गुंतागुंतीचं. ते समजून घेताना चीनची आगळा भूगोल समजावून घेणं गरजेच होतंच.

great wall visit (28).JPG

' द ग्रेट वॉल ऑफ चायना' चढून जात असताना आजूबाजूला सुंदर वृक्षराजीने भरलेल्या दर्‍या आणि धुकं असं सुरेख दृश्य दिसत होतं. एका टप्प्यावर रोपवे होता तिथे कुतूहलाने आम्ही गेलो. फारशी कोणी माणसं नव्हती. आता केबल कार येईल आणि त्यात बसून जाऊ, फोटो काढू, व्हिडिओ शूटिंग करु अशा अपेक्षेने आम्ही दोन्ही हातांमधे कॅमेरे, चढत असताना मिळालेले काही सुंदर दगड घेतलेले, खांद्यावर ट्रॅव्हलसॅक लटकलेली अशा अवस्थेत उभे होतो. आणि अचानक एक मोकळं बाकडं आलं. मागच्या युनिफॉर्ममधल्या चिनी गार्डनी झपकन आम्हाला त्या बाकड्यावर लोटलं, वरचं उघडं झाकण लावून टाकलं आणि ते बाकडं दिलं खालच्या दरीत लोटून. आम्हाला श्वास घ्यायचीही उसंत नाही आणि बाकड्याच्या समोर असलेल्या गजाला धरण्याकरता हातही रिकामे नाहीत. पाय टेकवायला जागा कुठे आहे हे शोधत असताना ते अधांतरीच लटकलेले आणि ते बाकडं चाललय पाताळासारख्या खोल दरीतून वरच्या कभिन्न कड्याच्या दिशेने. त्यावर कुठेतरी चिनी भिंतीचे कंगोरे अस्पष्टपणे धुक्यातून दिसणारे. भितीने ब्रम्हांड आठवलं. जराही हालचाल करुन सावरुन बसायचीही मुभा नाही. ते बाकडं असं जोरात हिंदकळायचं की पोटात गोळाच यायचा. हॅन्डीकॅमची कॅप काढायला हात हलवला तर डोक्यावरुन संथपणे जाणार्‍या घारीची सावली अंगावरुन सरकत गेली आणि मी अजून घाबरुन गेले. जेमतेम दहा मिनिटांच्या त्या थरकाप उडवणार्‍या प्रवासात एकच सुख की खाली नजर टाकल्यावर नितांतसुंदर वृक्षांचं दर्शन डोळ्यांना व्हायचं. काही झाडांच्या फांद्या, शेंडे पायाच्या तळव्यांना गुदगुल्या करायचे. चिनी निसर्गाचं ते रुद्रभिषण आणि इतक्या जवळून पाहिलेलं दृश्य केवळ अवर्णनीय. चीनच्या भिंतीच्या दिशेने वर जाणारा तो लाकडी पाळणा मंगोलियाच्या बाजूचा निसर्गही मधेच दाखवून जायचा. खोल दर्‍या, मधेच वाळवंट, काळसर हिरवी जंगलं आणि बर्फासारखे थंडगार वारे त्यावरुन येत आणि आमच्या अंगावरुन जाताना आमचं ते लाकडी बाकडं हिंदकळवून टाकत. अजून आठवलं तरी पायांना घाबरुन मुंग्या येतात. पण निसर्गदृश्य अविस्मरणीय. चीनच्या भिंतीवरुन दिसणारं ते दृश्य पाहिल्यावरच ठरवून टाकलं या आगळ्यावेगळ्या चिनी भूगोलावरच्या पर्यावरणाचा वेध घ्यायचाच.

great wall visit (13).JPG

मग परतल्यावर झाली आमच्या चिनी मित्राच्या लिनच्या मागे माझी भुणभुण सुरु की मला चिनी वाईल्डलाईफची माहिती मिळेल अशा ठिकाणी घेऊन चल. त्याने मला बिजिंगच्या एका सहा मजली पुस्तकांच्या दुकानात नेऊन सोडलं. तिथे चिनी पानाफुलांची काही पुस्तकं होती पण ती बहुतेक सगळी चिनी भाषेतलीच. जी इंग्रजी पुस्तकं होती ती कॉफी टेबल पुस्तकांसारखी फोटोंनी भरलेली आणि प्रचंड महाग. शिवाय ती कॅरी करताही आली नसतीच. निराशाजनक प्रकार होता पण तिथेच मला बीबीसीने काढलेल्या वाईल्ड चायनाच्या दोन अप्रतिम डिव्हीडिजचा सेट मिळाला. लिनने त्याच्या युनिव्हर्सिटीमधल्या काही मुलांना विचारलं. त्यांच्याकडून मग युनिव्हर्सिटी एन्व्हायर्नेम्टल क्लबतर्फे चालणार्‍या पर्यावरणासंदर्भातल्या अवेरनेस कॅम्पेनमधे सहभागी असणार्‍या वॅन आणि लुई या दोन मित्रांचे फोननंबर मिळाले. त्यांनी आनंदाने मला त्यांच्या क्लबवर नेऊन माहिती द्यायचे कबूल केले.
त्यांचा क्लब म्हणजे एखाद्या एनजिओच्या स्वरुपाचा होता. खूपसे नकाशे, आलेख, आकडेवारीचे तक्ते आणि काही पुस्तकं असलेल्या शेल्फ. पॉवरपॉइन्टवर एक दोन मुली कसल्यातरी प्रेझेन्टेशनची तयारी करण्यात मग्न असलेल्या. वॅनला अजिबात इंग्रजी येत नव्हतं. लुई शिकत असताना गाईडचं कामही करायचा त्यामुळे त्याचं इंग्रजी बर्‍यापैकी. त्याने मला चीनचा भौगोलिक नकाशा दाखवला. मला का ही ही कळलं नाही. त्यावर हिरवा रंग म्हणजे जंगल एव्हढं सोडून. शिवाय तो पर्यावरण प्रदुषणाची पातळी किती कमी झालीय, नद्यांमधलं लेडचं प्रमाण किती कमी झालय वगैरे जी माहिती आकडेवारीच्या स्वरुपात देत होता ती अगदिच कंटाळवाणी आणि माझ्या काहीच उपयोगाची नाही. त्याच्याही बहुतेक ते लक्षात आलं. मग त्याने मी दुसर्‍या दिवशी तुमच्या हॉटेलवर येतो असं म्हणून मला परत पोचवून टाकलं.
दुसर्‍या दिवशी वँग्सोबत एक हसरी चिनी मुलगी. अ‍ॅना. ती शाळेत शिक्षिका होती. तिने तिच्या चिनी उच्चारांच्या इंग्रजीत माझ्याशी चिनी भूगोल, पर्यावरण संदर्भात बर्‍यापैकी गप्पा मारल्या. त्या गप्पा आणि बीबीसीच्या वाईल्ड चायनाच्या डिव्हीडिजमधून चिनी निसर्गाची थोडी थोडी ओळख व्हायला मदत झाली.

आकारमानाच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर असणार्‍या चीनची भौगोलिक रचना तीन पायर्‍यांच्या स्वरुपात आहे. सर्वात वरच्या पायरीवर म्हणजे पश्चिमेला माउंट एव्हरेस्टसारखी उत्तुंग पर्वतराजी (या पर्वतराजीच्या दुसर्‍या बाजूला भारत). तिबेटही याच पायरीवर. ही पायरी जगावरचं आच्छादन (रुफ ऑफ द वर्ल्ड)म्हणून ओळखली जाते. अतीतीव्र हिवाळा (-४० डिग्री सेल्शियस) आणि तितकाच तीव्र उन्हाळा (४० डिग्री सेल्शियस) या प्रदेशातल्या तुरळक, विरळ पर्यावरणाला कारणीभूत ठरणारा. या प्रदेशात दक्षिणेला पांडा अस्वलांचं निवासस्थान. चीनचा मधला भाग म्हणजे दुसरी पायरी- हा भागही उंचसखल असा टेकड्यांचा बनलेला पण आता इथे बर्फ पडत नाही. चीनचा हा मध्यभाग बहुतांशी वाळवंटी आहे. गोबीचे सुप्रसिद्ध वाळवंट इथेच. काही भाग गवताळ कुरणांचा आहे ज्यात याक रहातात. इथे शेती होऊ शकत नाही. मंगोलिया याच भागात आहे. इथेही हवामान अत्यंत टोकाचं. पूर्व चीनमधे म्हणजे जिन्याच्या तिसर्‍या पायरीवर चीनमधल्या अजस्त्र नद्यांचे पॅसिफिक महासागरापर्यंत जाणारे जाळे आहे. यांगत्से आणि यलो रिव्हर त्यापैकी महत्वाच्या. चीनमधली सर्वात जास्त लोकसंख्या दाटीवाटीने या नद्यांच्या भोवताली स्थायिक आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय. (उत्तरेला गहू आणि दक्षिणेला तांदूळ अशी विभागणी). इथलं हवामान मध्यम असतं. नद्यांना सतत पुर येतो त्यामुळे जमिन सुपीक. इथे उत्तरेला चीनमधली घनदाट जंगले आहेत. त्यात हरण, रेनडिअरचे कळप, इतरही वन्यजीवन भरपूर आहे. वाघही त्यात अजून आपलं अस्तित्व टिकवून आहेत (कसं बसं अर्थात). चीनच्या दक्षिणेच्या वर्षारण्यातलं हवामान उन्हाळ्यात दमट आणि उष्ण. इथे मोठ्या प्रमाणात वादळेही होत असतात. या अरण्यांमधे जिन्सेन्ग ही चीनच्या पारंपरिक वन्य औषधीमधली महत्वाची आणि बहुमूल्य वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळते. इथलं वन्यजीवनही समृद्ध आहे.
चीनचा आर्थिक महासत्ता म्हणून होत असलेला उदय आणि तिथल्या समृद्ध पर्यावरणाचा र्‍हास यांचा आलेख समांतर जातो. चीनमधे फक्त २०% वन आच्छादन शिल्लक राहिल्यानंतर प्रदुषण विरोधक कायद्यांची, जंगलांच्या पुनर्मितीसंबंधातल्या कार्यवाहीची काटेकोर अंमलबजावणी चीनी सरकारने सुरु केली खरी पण जंगलाची प्राचीनता आणि त्यानुषंगाने मिळणारे नैसर्गिक फायदे याचं कायमस्वरुपी जे नुकसान या देशाचं झालं आहे ते भरुन निघणं केवळ अशक्य. याची जाणीव चीनमधल्या अनेकांना आहे.
त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट अशी की भौगोलिक दुर्गमतेमुळे अजूनही काही प्रमाणात ज्याला क्लोज्ड फॉरेस्ट किंवा अस्पर्शित जंगल म्हणतात ते तिथे शिल्लक राहू शकलं आहे. वाढत्या लोकसंख्येच्या आणि औद्योगिकीकरणाच्या दबावाचा धोका कायमच या जंगलांना राहणार आहे तरी पण युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेन्ट प्रोग्रॅम (UNEP) द्वारा या क्लोज्ड फॉरेस्टच्या रक्षणाकरता फार मोठे प्रयत्न चालू आहेत. वाढत्या वाळवंटीकरणाला (प्रतिवर्षी ७० किमी. इतका वाळवंटीकरणाचा वेग अजूनही आहे), पुर, वादळांच्या तडाख्यांना घाबरुन का होईना त्याला सकारात्मक प्रतिसाद चीनी सरकारकडून मिळत आहे हेही कमी नाही. फ्रेन्ड्स ऑफ नेचर सारख्या बिजिंगमधल्या काही एनजिओजचे सातत्याने चाललेले प्रयत्नही त्यांना हातभार लावतात. पातळ प्लास्टीक पिशव्यांवर संपूर्ण चीनमधे २००८ पासून कायद्याने बंदी आहे आणि कापडी पिशव्या, शॉपिंग बास्केट्सच्या वापराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देणार्‍या कॅम्पेन्स ठिकठिकाणी चालू असतात. कायद्याच्या अंमलबजावणीचा कडकपणा चीनमधे भारतापेक्षा कितीतरी जास्त असूनही मोठी शहरे सोडली तर इतर छोट्या शहरांत प्लास्टिक पिशव्या सर्रास दिल्या घेतल्या जातात हे पाहून मला चांगलीच गंमत वाटली.

फ्रेन्ड्स ऑफ नेचरतर्फे तिबेटन अ‍ॅन्टेलोप्स, वाघ, काही दुर्मिळ जातींची माकडे, पर्वतांवरील जंगले वाचवण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नांमधे काही प्राचीन, पारंपरिक चिनी चित्रकारीतेमधे आढळणार्‍या निसर्ग, प्राण्यांच्या प्रतिकांचा वापर करुन घेणारी एक अभिनव मोहिम आहे. चीनी जनतेला दीर्घायुष्य, आरोग्य आणि एकंदरीतच निरामय आयुष्यासाठी आपल्या पूर्वपरंपरेत सतत डोकावून पाहण्याचे एक टिपिकल पौर्वात्य म्हणता येइल असे वेड आहे. त्यांच्यातल्या या भावनिकतेला आव्हान करण्यासाठी जुन्या, पारंपरिक चित्रकलेला पुनरुज्जिवित करुन, ती शिकवण्याच्या कार्यशाळा भरवून त्यातून जंगल, निसर्गाचे रक्षण करण्याचा संदेश पसरवण्याचे हे प्रयत्न मला खूपच आवडले. चित्रकला काय किंवा कोणतीही कला ही यानिमित्ताने अशी सामाजिकतेला जोडली गेल्याने खूप काही साध्य होऊ शकते हे निश्चित.

बिजिंगमधल्या फ्रेन्ड्स ऑफ नेचरतर्फे एक लघुपट महोत्सव मी तिथे होते त्या दिवसात भरवला गेला होता. त्यातला एक लघुपट तु बघायलाच हवा असा लिनचा आग्रह होता. खरं तर त्या दिवशीच आम्हाला हांगझोला परतायचे होते. हातात फक्त आठ तास होते. बिजिंगमधून शॉपिंग काहीच केलं नव्हतं. काही पुस्तकं खरेदी करायला पुन्हा त्या सहा मजली दुकानात चक्कर मारायची होती. पण लिनचा आग्रह पाहून आम्ही दोघांनी या सगळ्यावर पाणी सोडायचं ठरवलं. लिनने आपला वेळ खर्च करुन माझ्या हुटॉन्ग्जमधल्या अवांतर भटकंतीसाठी आणि (त्याच्या भाषेत)पानाफुलांच्या माहितीसाठी खूप मदत केली होती तेव्हा त्याचा आग्रह मोडवत नव्हता.
लघुपट केवळ अप्रतिम होता. एक युरोपियन बोटॅनिस्ट आणि बिजिंगमधल्या वनस्पतीशास्त्र विभागातले दोन विद्यार्थी यांनी मिळून चीनमधल्या युनान प्रांतातल्या काही पवित्र, अस्पर्शित जंगलाच्या राखीव तुकड्यांच्या शोधासाठी (आपल्याकडच्या देवराया असतात तशा) एक मोहिम काही वर्षांपूर्वी आखली होती. त्या मोहिमेवर आधारीत हा लघुपट होता.
या जंगलात चीनी चहाची खूप प्राचीन अशी झाडं (wild tea tree: camellia senensis) अस्तित्वात आहेत अशी माहिति फ्रान्झला म्हणजे त्या युरोपियन बोटॅनिस्टला होती. जिन्कोचीही सर्वात प्राचीन म्हणजे फॉरबिडन सिटीमधे होती त्या १५०० वर्ष जुन्या झाडांहूनही प्राचीन झाडं त्या देवरायांमधे आहेत. शोध घेत घेत हे तिथे युन्नान मधल्या बादा गावात येतात. तिथे मुक्काम ठोकतात. बादामधले आदीवासी गावकरी या देवरायांच्या रक्षणासाठी खूप पझेसिव्ह असतात. सगळ्या जगातला तांदूळ आणि चहा एक दिवस नष्ट होणार आहे अशी त्यांच्या तिथल्या देवळामधे भविष्यवाणी झालेली असते. आणि मग तांदूळ आणि चहाच्या झाडांचं मूळ वाण आपल्या जंगलात जपून ठेवण्यासाठी हे गावकरी आपले प्राणही पणाला लावायला तयार असतात. गावात आलेल्या परक्यांना तर ते ही माहिती देणंच अशक्य. तिथे हे वनस्पती संशोधक त्या चहाच्या झाडांचे आणि जिन्कोचे फोटो काढून नेण्यात शेवटी यशस्वी होतात त्याचा हा लघुपट. चहाचं झाड म्हणजे छोट झुडूप बघीतलेल्या मला चहाचा वीस मीटर उंचीचा आणि दीड मीटर घेराचा प्रचंड वृक्ष बघून धक्काच बसला.
युनानमधे इतक्या प्राचीन नाहीत पण तरी बर्‍याच जुन्या चहाच्या झाडांच्या काही बागाही आहेत ज्या सगळ्यांना बघता येतात. पुढच्या वेळी आपण त्या बघायला नक्की जाऊया असं लिनकडून वदवून घेण्यात आम्ही यशस्वी झालो आणि मग बिजिंगमधे काहीच शॉपिंग न झाल्याची खंत जरा कमी होऊ शकली.

गुलमोहर: 

शर्मिला खूप छान माहिती वाचायला मिळतेय. पुढच्या आठवड्यात चायनिज न्यूइअरबद्दल इथे सुट्टी आहे, त्यानिमित्ताने ५ दिवस चायनाला जायचा प्लॅन करतोय. अर्थात एखादा देश समजून घ्यायचा असेल तर ५ दिवस काहीच नाहीत याची कल्पना आहे.