जग एकसमान आहे - इंग्रजी पुस्तक परीक्षण

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

नुकतेच प्रसिद्ध पुलित्झर पुरस्कार विजेते पत्रकार आणि न्यूयॅार्क टाईम्सचे स्तंभलेखक श्री. थॅामस फ्रिडमन यांनी लिहीलेले 'The World is Flat' वाचनात आले. जागतिकिकरणाचे इतके चांगले विश्लेषण पहिल्यांदाच वाचायला मिळाले.

पुस्तकाच्या पहिल्या भागात थॅामसनी जग कसे सपाट होत चालले आहे याचा आढावा घेतला आहे. त्यांनी आधुनिक जागतिक इतिहासातल्या दहा घटनांचा आढावा घेऊन त्या घटनांमुळे जग कसं अधिकाधिक एकसमान झालं आहे याची चर्चा केली आहे. त्यांच्या मते साम्यावादाचा अस्त, नेटस्केप ब्राउझरचा शोध, कार्यवाहक प्रणाली (workflow software) चा शोध, मुक्त स्त्रोत (open source) चळवळीचा उदय, सेवा बाहेरील देशातून आयात करणे (outsourcing), माल इतर देशातून तयार करून घेणे (off shoaring), पुरवठा साखळी (supply chain), घरी राहणाऱ्या गृहिणींकडून काम करवून घेणे (insourcing), माहितीची सहज उपलब्धता आणि वायरलेस तंत्रज्ञानावर आधारीत नवनवीन उपकरणांचा शोध ह्या त्या दहा घटना होत. या घटनांमुळे जग कसे बदलले आहे ते त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.

दुसऱ्या भागात जागतिकिकरणामुळे बदललेल्या जगाचे अमेरीकेवर काय परिणाम होतील याची विस्तृत चर्चा थॅामस करतात. कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या अमेरीकेतून बाहेर जातील, कुठल्या नोकऱ्या अमेरीकेतच राहतील आणि अमेरीकन माणसाने त्याला कसं तोंड दिलं पाहिजे याची चर्चा थॅामसनी या भागात केली आहे. माझ्या मते त्यांनी या भागात मांडलेले अनेक मुद्दे जागतिकिकरणाच्या झपाट्यात सापडलेल्या कुठल्याही देशाला लागू आहेत. अमेरीकन विद्यार्थ्यांनी आपले संशोधनातील नेतृत्व कायम राखण्यासाठी गणित व विज्ञानावर भर देण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली आहे. अमेरीकेने आतापर्यंत केलेली प्रगती अमेरीकन माणसाच्या नाविन्याची कास धरण्याच्या वृत्तीमुळे झाली आहे. नवनिर्मितीसाठी ज्याप्रमाणे देशाला संशोधकांची गरज आहे त्याचप्रमाणे नवीन कल्पना सुचण्यासाठी विविध कलांची उपासना करणेही तितकीच आवश्यक आहे. केवळ अभियंत्यांच्या आणि डॅाक्टरांच्या बळावर कोणताही समाज नवनिर्मिती करु शकत नाही असे आपले मत त्यांनी उदाहरणासहीत स्पष्ट केले आहे. भारतीयांनी ही बाब विशेष लक्षात घेण्यासारखी आहे.

जागतिकिकरणाचा जगातील विविध कंपन्यांवर होणारा परिणाम थॅामसनी एका भागात मांडला आहे. ज्याप्रमाणे अनेक अमेरीकन कंत्राटे भारतीय कंपन्याना मिळत आहेत त्याप्रमाणेच बँक अॅाफ इंडीयाचे एक मोठे कंत्राट HP या अमेरीकन कंपनीला मिळाल्याचे उदाहरण त्यांनी नमूद केले आहे. जागतिकिकरणाच्या या नवीन युगात सर्व कंपन्यांना, मग त्या कुठल्याही देशाच्या का असोत, जागतिक बाजारपेठ खुली असून ज्यांना कमी खर्चात उत्तम प्रतीची सेवा देता येईल त्यांना जागतिक बाजारपेठ जिंकता येईल. रोल्स रॅाईस, लेनोवो, एच्. पी. अशा अनेक कंपन्यांची उदाहरणे देऊन 'अमेरीकन कंपनी', 'भारतीय कंपनी' या संकल्पना धूसर होत असून सर्व कंपन्या आता 'जागतिक कंपन्या' किंवा 'बहुराष्ट्रीय कंपन्या' बनत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पुस्तकातील एका भागात थॅामसनी जागतिकिकरणाचा जगातील लहान संस्कृतीवर काय परिणाम होईल याची चर्चा केली आहे. त्यांच्या मते माहितीच्या जाळ्याने जगातील लहान संस्कृतींना जगापुढे येण्याची संधी प्राप्त करुन दिली आहे. अमेरीकेत स्थायिक झालेल्या कित्येक भारतीयांना आज आपल्या भाषेतील कार्यक्रम टि.व्ही. वर बघता येतात, आपल्या भाषेतील वेबसाईट बघता येतात आणि आपल्या भाषेतील गाणीही ऐकता येतात. अशा अनेक उदाहरणांनी त्यांनी जगातील लहान संस्कृती नष्ट होतील व अमेरीकन संस्कृती त्यांना गिळंकृत करेल या भितीचे खंडन केले आहे. अर्थातच अमेरीकन संस्कृतीचा प्रभाव वाढेल हे ते अमान्यही करत नाहीत.

एकंदरीत या पुस्तकात भारताचा आणि भारतीय उद्योजकांचा उल्लेख बरेच वेळा आला आहे. आपल्या पुस्तकाची सुरुवातच थॅामसनी बँगलोरमधल्या इंफोसिसच्या मुख्यालयातील प्रसंग वर्णन सांगून केली आहे. इंफोसिसचे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. नंदन नीलकेणी यांच्याशी झालेल्या चर्चेतूनच त्यांना या पुस्तकाचे नाव सापडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताचा आधुनिक अर्थशास्त्रीय इतिहासही त्यांनी थोडक्यात सांगितला अाहे.
पुस्तकाची भाषा सोपी व अोघवती असून अनेक तांत्रिक संकल्पना थॅामसनी सोप्या शब्दात मांडल्या आहेत. जागतिकीकरणामुळे जगात झपाट्याने होणाऱ्या बदलांचे त्यांनी अचूक विश्लेषण केले आहे. हे पुस्तक ज्याप्रमाणे अमेरीकन नागरीकांची आऊटसोर्सिंग विषयीची भिती नष्ट करायचा प्रयत्न करते त्याप्रमाणेच भारतीयांना त्यांच्या कामगीरीची जाणीवही करुन देते. भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर का आहे हे कोडं अमेरीकन लोकांना उलगडून सांगताना भारतापुढील आव्हानेही मांडते. ज्या जागतिक नागरीकांना या नवीन जगात यशस्वी व्हायचे आहे त्यांना हे पुस्तक वाचणे अतिशय आवश्यक आहे.

प्रकार: 

हम्म्.. वाचलं पाहिजे हे पुस्तक...

तुम्ही 'थॉमस' लिहिलेलं नीट दिसत नाहीये. खरंतर, ज्या शब्दांमध्ये 'ऑ' आहे असे बहुतेक शब्द नीट दिसत नाहीयेत.. उदा. थॉमस, रॉइस, डॉक्टर...
'थॉमस' लिहायचे असेल तर असे लिहिता येईल - thOmas

लेखात लेखकाचा उल्लेख 'थॉमस' असा करण्याऐवजी 'फ्रीडमन' असा करणे जास्त योग्य वाटते...

आपलं बरोबर आहे. फ्रीडमन जास्त संयुक्तीक वाटलं असतं. मॅक वरुन टाईप करताना नेहमी त्या अक्षराचा घोळ होतो.