कधीकाळी तुझ्यासाठी

Submitted by आनंदयात्री on 19 January, 2011 - 23:54

मनाच्या खोल मातीने उन्हाळे सोसले होते
तरी मी पेरता स्वप्ने ऋतु झंकारले होते

अबोला फार दिवसांचा तुझा हा अन् तिथे माझ्या-
घराच्या स्वच्छ काचांवर धुके अंधारले होते

नसावी काय जगण्याला जरा खोली, जरा रूंदी?
तुम्ही नुसतेच श्वासांचे मनोरे बांधले होते

कळीचे फूल होताना तिथे मी नेमका होतो
जणू चोरून कवितेने कवीला गाठले होते!

अहो जे वाटते ना ते मला प्रत्यक्ष सांगा ना!
असे बरळून पाठीवर कुणाचे हो भले होते?

तशी ती भेट शेवटचीच होती आपुली तेव्हा
पुढे नुसतेच शब्दांना उरी कवटाळले होते

किती वाटायचे मजला फुलांनी गूज सांगावे!
(कितीही वाटल्याने का कुणीही आपले होते?)

नको दुस्वास दु:खाचा ठरवले मी, कुठे तेव्हा-
कुशीमध्ये सुखाच्या ते सुखाने झोपले होते

कधीकाळी तुझ्यासाठी दिला मी जीवही असता
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते

- नचिकेत जोशी
(कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते हा तरही मिसरा खूप आवडला होता म्हणून त्यावर गझल लिहिण्याचा प्रयत्न केलाय.)

गुलमोहर: 

व्वा..व्वा..वा.... क्या बात है...

तशी ती भेट शेवटचीच होती आपुली तेव्हा
पुढे नुसतेच शब्दांना उरी कवटाळले होते---> खासच.. Happy

मला वाटायचे मजला फुलांनी गूज सांगावे!
(कितीही वाटल्याने का कुणीही आपले होते?)... > काय बोलाव

एकापेक्षा एक आहेत सगळे... Happy

अबोला फार दिवसांचा तुझा हा अन् तिथे माझ्या-
घराच्या स्वच्छ काचांवर धुके अंधारले होते.............धुके अंधारले.. व्वा !!

कळीचे फूल होताना तिथे मी नेमका होतो
जणू चोरून कवितेने कवीला गाठले होते!............क्या बात है... !!

मला वाटायचे मजला फुलांनी गूज सांगावे!
(कितीही वाटल्याने का कुणीही आपले होते?).......हा शेर फार...आवडला. Happy

तुझ्यासाठी दिला असता कदाचित जीवही मी अन्-
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते........................ ह्या शेरात वरच्या ओळीत मी अन ऐवजी,''पण'' असे वाचून पाहिले.

मस्त गझल. Happy

मनाच्या खोल मातीने उन्हाळे सोसले होते
तरी मी पेरता स्वप्ने ऋतु झंकारले होते

अबोला फार दिवसांचा तुझा हा अन् तिथे माझ्या-
घराच्या स्वच्छ काचांवर धुके अंधारले होते

तशी ती भेट शेवटचीच होती आपुली तेव्हा
पुढे नुसतेच शब्दांना उरी कवटाळले होते

तुझ्यासाठी दिला असता कदाचित जीवही मी अन्-
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते

संपूर्ण गझल आवडली नचिकेत परंतु हे चार अत्यंत आवडले.

वा वा, काय सुंदर शेर आहेत रे एकसे एक....अगदी

नको दुस्वास दु:खाचा ठरवले मी, कुठे तेव्हा-
कुशीमध्ये सुखाच्या ते सुखाने झोपले होते>>>वाह..

कळीचे फूल होताना तिथे मी नेमका होतो
जणू चोरून कवितेने कवीला गाठले होते>>> हा शेर मस्त!

पहिल्या तीन शेरात समारोप कसा होतो ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

( शेर तोडणे, कंस वगैरे चर्चा इतरत्र झालेल्या आहेतच.)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मनाच्या खोल मातीने उन्हाळे सोसले होते
तरी मी पेरता स्वप्ने ऋतु झंकारले होते

मनाच्या खोल मातीने अनेक उन्हाळे सोसलेले होते. (म्हणजे शुष्कता सोसलेली होती.) मात्र कवीने स्वप्ने पेरली (पाहिली) तसे मात्र ऋतू झंकारले. यात मातीने उन्हाळे सोसणे याचा ऋतू झंकारण्याशी संबंध कसा ते लक्षात आले नाही. जर ऋतूही मनाचेच असले तर ऋतुंमध्ये उन्हाळाही येणारच. म्हणजे समारोपासाठी वसंत झकारणे कदाचित योग्य ठरावे. तसेच, ऋतु 'झंकारणे' ही केवळ एक 'काव्यमय' टर्म आहे की रुतू झंकारण्यात काही म्हणायचे आहे? सतारीच्या तारा झंकारतात. सोसणे, पेरणे आणि झंकारणे ही क्रिया सलग किंवा सुलभ वाटली नाही.

अबोला फार दिवसांचा तुझा हा अन् तिथे माझ्या-
घराच्या स्वच्छ काचांवर धुके अंधारले होते

तिचा अबोला आणि घराच्या काचांवर धुके अंधारणे याचा संबंध लक्षात आला नाही. येथे शेर तोडलेला आहे हे अनेक लोक करतात व ते स्वातंत्र्य असतेच असे मानू ! पण फार दिवसांचा अबोला आणि धुके अंधारणे हे काही कळले नाही.

नसावी काय जगण्याला जरा खोली, जरा रूंदी?
तुम्ही नुसतेच श्वासांचे मनोरे बांधले होते

'नुसतेच' श्वासांचे मनोरे बांधणे यातून 'या व्यतिरिक्तही काहीतरी करायला हवे होते' असा सेन्स जाणवतो. याचा जगण्याला खोली किंवा रुंदी असण्याशी कसा संबंध येतो ते लक्षात आले नाही.

इतर शेरांबाबत आत्ता काहीच नाही.

शंका निरसन करून घेण्यास उत्सुक!

-'बेफिकीर'!

कळीचे फूल होताना तिथे मी नेमका होतो
जणू चोरून कवितेने कवीला गाठले होते

हा शेर खास.

श्वेता, कैलासजी, विजयजी, श्यामली, भुंगा, बेफिकीर, गिरीशजी, अवि, गंगाधरजी - मनापासून आभार.
उमेशजी, विशेष आभार... Happy
कैलासजी, त्या शेवटच्या शेरात ''पण'' म्हणायचे नव्हतेच... कधीकाळी जीवही दिला असता (आणि) कधीकाळी जगावेही वाटले होते असं (साधंच) म्हणायचं होतं... Happy

बेफिकीर, क्षमस्व, उशीर झाला उत्तर द्यायला.. पण कामाच्या गडबडीत होतो, त्यामुळे, या गझलेकडे आलो नाही...

शेर तोडला जाऊ नये हे माझं मत आहे. त्यामुळे गझल पोस्टली तरी समाधानी नव्हतो. म्हणून नंतर दोन शेर थोडे बदलले. (उरलेल्यांवरही विचार चालू आहेच!)

३ शेरांमधल्या आपल्या शंका समजल्या. आपल्याला सविस्तर लिहावे लागले म्हणून खेद वाटतो. पण ते नुसते शेर नसून त्या कविता आहेत असं मला वाटतं. त्यामुळे त्यांचा अर्थ सविस्तर शब्दांत सांगणे मला शक्य होणार नाही. कविता आपली आपण उलगडावी.. रसग्रहण एका मर्यादेपर्यंत आपली सोबत करते. आणि तेवढे रसग्रहण आपण आधीच केले आहे. आपले विवेचन अत्यंत practical असूनही शब्दांपलिकडील अर्थ त्या शेरांमध्ये आहेत, त्यामुळे क्षमस्व! अर्थात प्रत्यक्ष कधी भेटल्यावर मला ते सगळं शब्दात मांडता आलं तर नक्की मांडेन...

कैलासजी, त्या शेवटच्या शेरात ''पण'' म्हणायचे नव्हतेच... कधीकाळी जीवही दिला असता (आणि) कधीकाळी जगावेही वाटले होते असं (साधंच) म्हणायचं होतं>>>>>>

ओक्के नचिकेत..... मी विरोधाभास असावा या समजुतीने ''पण'' लावून पाहिला. Happy

आनंदयात्री,

१. तसे काही नाही, मागे पण एका (इतर गझलेच्या) चर्चेत असे झाले होते. एक शुद्ध चर्चा म्हणून हा प्रतिसाद देत आहे.

२. चर्चेच्या ओघात काही दुखावणारे लिहीले जाणार नाही याची काळजी घेणारच आहे, पण चर्चा अंतापर्यंत नेली जावी व कुणीही सहभागी व्हावे इतके मान्य असावे.

धन्यवाद!

===================================================================

चर्चा सुरू करत आहे.

पण ते नुसते शेर नसून त्या कविता आहेत असं मला वाटतं. >>>

माझ्यामते प्रत्येक शेर ही एक कविता असतेच. 'नुसते शेर नसून' या आपल्या म्हणण्याचा अर्थ मला समजला नाही. गझलेतील द्विपदी ही नेहमी 'नुसतीच शेर' असायला हवी व ती एक 'स्वतंत्र कविता'च असायला हवी असे मी समजतो. कृपया या वाक्याचा अर्थ समजावून सांगावात.

त्यामुळे त्यांचा अर्थ सविस्तर शब्दांत सांगणे मला शक्य होणार नाही>>>

हे माझ्यामते कधी होवू नये. मुळात समभाषिक व सज्ञान वाचकाला / रसिकाला गझलेची द्विपदी समजायला हवी असे मी मानतो. पण समजा काहीशी संदिग्ध (मुद्दाम तशी रचलेली किंवा आपोआप तशी रचली गेलेली) द्विपदी असली तरी निदान कवीला त्यांचा अर्थ समजावून सांगता यायला हवा.

या शिवाय, गझलेतील द्विपदीत 'रीड बीटवीन द लाईन्स' असे जे म्हंटले जाते ते 'सूचकतेला, प्रतिमांच्या वापरांना' म्हंटले जाते असे मी मानतो. म्हणजे:

समजा असे म्हणायचे असेलः

मी नेहमी तिच्या कविता ऐकतो
त्या कवितांना मनापासून दादही देतो
पण माझी कविता ऐकवायची वेळ आल्यानंतर
मात्र ती माझी कविता ऐकण्याचे टाळते
दाद देणे तर दूरच राहो
याचा मला राग येतो
आणि त्यामुळेच आमच्यात दुरावा आला आहे

हे जर गझलेतील द्विपदीत बसवायचे असेल, तरः

ऐकतो कविता तुझ्या, मी दादही देतो तुला
शेवटी येतो दुरावा आपल्यामध्ये तरी

अशीद्विपदी रचल्यास 'तुमची कविता ती ऐकत नाही' हे स्पष्ट होत नाही. अशा वेळेस जर वाचकाने स्पष्टीकरण मागीतले तर 'तो नुसता शेर नसून ती कविता आहे व त्यामुळे मला सविस्तर अर्थ सांगता येणार नाही' हे स्पष्टीकरण माझ्यामते अपुरे आहे. व्हेअरअ‍ॅजः

मला भेटायला आले, मला भेटून जाताना
मला भेटायचे नाही, असे ठरवून गेलेले

हा ज्ञानेशरावांचा एक शेर! यात कोण भेटायला आले, त्यांनी आधी 'भेटायचे नाही' अस का ठरवले होते याचे स्पष्टीकरण वाचकही मागत बसत नाही. कारण त्यात 'सूचकता' आहे असे 'मला वाटते.'

=========================================================

कविता आपली आपण उलगडावी>>>

हे मत मला व्यक्तीशः, निदान गझलेबाबत, अमान्य आहे. यात उलगडण्याचा प्रश्न येत नाही असे मला वाटते. हे मत मांडताना मीही अनेक गझला वाचून मांडत आहे. रसिकाला निदान 'एक' अर्थ तरी जाणवायला हवा. कविता संदिग्ध वाटणे व 'सांगायचे आहे ते तिसर्‍याच पद्धतीने मांडलेले आहे' असे वाटणे यात माझ्यामते फरक आहे. आपले वरील तीन शेर मला संदिग्ध वाटले. (वारंवार 'मला वाटले' असे म्हणत आहे त्याबद्दल दिलगीरी, पण चर्चा तुमची व माझी आहे त्यामुळे तसे म्हणत आहे.) गझल बरीचशी स्पष्ट असते व याबाबतीत ती (उदाहरणार्थ बालकवींची ती फुलराणी यासारख्या कविता) कवितेपासून काही प्रमाणात वेगळी ठरते असेही वाटते. (ती फुलराणी ही कविता 'बालवधू' या विषयावर आहे व त्यातील वारा हा त्या कळीचा सख्खा भाऊ आहे, मात्र हे लक्षवेधक पद्धतीने मांडलेले आहे बालकवींनी, स्पष्टपणे मांडलेले नाही) असे कवितेत व्हावे. पण गझल दैनंदिन जीवनावरची असल्याने शेराचा निदान एक अर्थ तरी जाणवायलाच हवा असे वाटते.

==========================================================

रसग्रहण एका मर्यादेपर्यंत आपली सोबत करते. >>>

यात 'आपली' हा शब्द आपण वाचक / रसिक / श्रोता यांना उद्देशून वापरला असावात असे मी गृहीत धरतो. यात आपली भूमिका अशी दिसते की 'तुम्हाला यातील जितके समजले तितके समजा, बाकी अर्थ सांगणे मला शक्यही नाही व ती माझी जबाबदारीही नाही'! मात्र ही भूमिका असल्यास माझा तिला विरोध आहे. मी आपल्याला एका आस्वादकाच्या भूमिकेतून ते प्रश्न विचारलेले नसून मी सरळ सरळ त्या शेरांचा अर्थच विचारलेला होता. मला कुणी असा अर्थ विचारल्यास तो सांगणे ही मी माझी जबाबदारी समजतो. यावरचे ताजे उदाहरण म्हणजे:

'तुला पाहिल्याने तरारू कशाला' या माझ्या गझलेत बांगडीबाबत एक शेर होता. तो एक दोघांना समजला नाही. मी विचार केला तेव्हा माझ्या असे लक्षात आले की उत्साहाच्या भरात मी तो शेर रचून गेलेलो होतो आणि आता त्याचे स्पष्टीकरण देणे हा भ्रष्टाचार ठरेल. प्रतिसाद असे होते:

'बांगडी हा शेर समजला नाही'

त्यामुळे मी गप्प बसलो.

प्रतिसाद जर असे असते:

'बांगडी या शेराचा अर्थ काय??"

तर मी 'शेर बहुधा फसलेला असावा' असे म्हणून गप राहिलो असतो.

तुझी बांगडी फार अस्वस्थ होते
तुझे नांव आता पुकारू कशाला

या शेरात मला खालील म्हणायचे होते:

मी प्रेयसीच्या नावाचा ( तिच्या अपरोक्ष) धावा करतो. तिच्यावर इतकाच परिणाम होतो की ती सतत हातातल्या बांगडीशी चाळा करत बसते. हा तिचा चाळा म्हणजे मी घातलेल्या सादेला प्रतिसाद आहे हे जगाला समजत नसले तरी मला समजते.

मात्र हा अर्थ खरोखरच त्या शेरात स्पष्ट होत नाही. त्यामुळे मी तो शेर फसला आहे असे कबूल केले असतेच. स्पष्टीकरण कुणी मागीतले नाही इतकेच!

==========================================

आपल्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

(अवांतर - वीज नसल्यामुळे प्रतिसाद द्यायला उशीर झाला.)

अबोला फार दिवसांचा तुझा हा अन् तिथे माझ्या-
घराच्या स्वच्छ काचांवर धुके अंधारले होते
>>>

घराच्या स्वच्छ काचा हे मनाशी जोडायचे आहे, बरेच दिवस अबोला धरल्यामुळे आता स्वच्छ अशा मनावर गैरसमजांचे धुके अंधारू लागले आहे. आता यात गैरसमज, मन ह्या गोष्टी केवळ समजून घ्याव्या लागतील, ते शेरात कुठेही आलेले नाही. म्हणून म्हटले, की हे नुसतेच शेर नाहीत. कविता आहेत.

माझं असं प्रामाणिक मत आहे, की गझलेचा प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता असते हे कितीही खरं असलं, तरी प्रत्येक शेराला स्वतःची ओळख असते हे जास्त बरोबर आहे. मग ती ओळख म्हणजे एक कविता असेल किंवा गोटीबंद पण थेट पोचणारा एकच अर्थ असेल.
उदा.
माझ्याच एका गझलेचा
भेटलो बागेत आपण चार होत्या चांदण्या
बातमी झाली चवीची लागली पसरायला
हा केवळ शेर आहे, त्यात कविता अशी प्राधान्याने नाहीच. म्हणून म्हटले होते, की इथे पलिकडची कविताही आहे.

नसावी काय जगण्याला जरा खोली, जरा रूंदी?
तुम्ही नुसतेच श्वासांचे मनोरे बांधले होते

>>>
श्वासांचे मनोरे बांधणे म्हणजे केवळ भाराभर श्वास घेत काढलेले आयुष्य असं म्हणायचंय... रूंदी, खोली मध्ये सार अपेक्षित आहे. मनोरे शब्द म्हणूनच योजला आहे. मनोरेवरून कलात्मकतेने सजवलेले आयुष्य असा अर्थ घेऊन दुसरा एखादा शेर रचता येईलही.. पण इथे मनोरे हे नकारात्मक रूपक म्हणूनच हवंय मला...

मनाच्या खोल मातीने उन्हाळे सोसले होते
तरी मी पेरता स्वप्ने ऋतु झंकारले होते

याबद्दल -
जर ऋतूही मनाचेच असले तर ऋतुंमध्ये उन्हाळाही येणारच. म्हणजे समारोपासाठी वसंत झकारणे कदाचित योग्य ठरावे.
>>>
सहमत. पण उन्हाळे सोसल्यानंतरही त्याच मनामध्ये स्वप्ने पेरताच सर्व ऋतूंचा झंकार झाला. सतार झंकारते हे जरी खरं असलं तरी सतारीच्या तारा छेडणे आणि सतारीचा झंकार होणे हे वाक्प्रचार वापरायचे प्रासंगिक संकेत वेगवेगळे आहेत.
सोसणे, पेरणे आणि झंकारणे ही क्रिया सलग किंवा सुलभ वाटली नाही. >> हम्म्म... true.. मग ती एक काव्यमय टर्मच समजूया...

अगदी खरं सांगायचं ना, तर शेरामध्ये मिसर्‍यांचा संबंध स्पष्ट होत नसेल आणि तांत्रिक चुका असतील तरच मला स्वत:ला स्पष्टीकरण द्यायला आवडते. एक अर्थ थेट द्यावाच आणि बाकीचे वाचकावर सोडावेत हे करण्याचा नेहमी प्रयत्न असतो..

आता अवांतरः
१. तसे काही नाही, मागे पण एका (इतर गझलेच्या) चर्चेत असे झाले होते. >>>>
तुम्ही वाक्य न् वाक्य तेच छापलेत म्हणून मला मध्ये पडावे लागले..

पण चर्चा अंतापर्यंत नेली जावी व कुणीही सहभागी व्हावे इतके मान्य असावे.

>>> अंत काय असावा हे आधीच ठरवलेले बरे, अन्यथा नंतर विनाकारण आखाडे व्हायचे.. कारण आपल्या मते चर्चेचा अंत काहीही असला तरी माझ्यामते, या तीन शेरांबद्दल मी अजून काहीच सांगू शकणार नाहीये.. त्यामुळे माझ्याकडून अंत झालेला आहे. आणि अजून कुणी सहभागी होईल असे वाटत नाही.

अंत काय असावा हे आधी ठरवणे अवघड आहे आनंदयात्री! कारण अंत चर्चेवर अवलंबून आहे.

माझ्यासारख्याला पडणारा प्रश्न म्हणजे धुक्याच्या शेरात 'घराच्या' ऐवजी 'मनाच्या स्वच्छ काचांवर' असे घेतल्यास काय फरक पडतो?

माझं असं प्रामाणिक मत आहे, की गझलेचा प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता असते हे कितीही खरं असलं, तरी प्रत्येक शेराला स्वतःची ओळख असते हे जास्त बरोबर आहे. मग ती ओळख म्हणजे एक कविता असेल किंवा गोटीबंद पण थेट पोचणारा एकच अर्थ असेल.>>> हे अधिक विस्ताराने सांगावेत. लक्षात आले नाही.

तसे काही नाही, मागे पण एका (इतर गझलेच्या) चर्चेत असे झाले होते. >>>>
तुम्ही वाक्य न् वाक्य तेच छापलेत म्हणून मला मध्ये पडावे लागले..>>>

मी तुमच्याच प्रतिसादासंदर्भात ते लिहिलेले होतेच, 'तसे काही नाही' याचा अर्थ मी ते अमान्य करतो आहे असा नाहीच आहे. 'तसे काही नाही' म्हणजे तो 'अजब प्रकार' नव्हता. मला आपण साधारण काय स्पष्टीकरण द्याल याचा अंदाज आल्यासारखे वाटले असल्याने मी येथे ती बाब ताणली नाही इतकेच. पण आता मी विस्तृत चर्चा करायच्या हेतूने लिहीत आहे. आपण जर चर्चा थांबवणार असाल तर हरकत नाही. प्रत्येक चर्चेचा आखाडा होत नाही यावर विश्वास ठेवायला हरकत नाही.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

गोटीबंद शेरांनाही एकापेक्षा अधिक अर्थ असू शकतात. गोटीबंद हे बरेचसे तांत्रिक बाबीचेच विशेषण आहे.

यावरही चर्चा व्हावी, वरील दोन्ही मते माझी आहेत.

आपली मते काय ते समजावे.

घराच्या स्वच्छ काचा हे मनाशी जोडायचे आहे, बरेच दिवस अबोला धरल्यामुळे आता स्वच्छ अशा मनावर गैरसमजांचे धुके अंधारू लागले आहे. आता यात गैरसमज, मन ह्या गोष्टी केवळ समजून घ्याव्या लागतील, ते शेरात कुठेही आलेले नाही. म्हणून म्हटले, की हे नुसतेच शेर नाहीत. कविता आहेत>>>

माफ करा, पण हे आपले मत विचारात घेण्याइतके महत्वाचे आहेच. कारण 'असे गृहीत धरणे' हा प्रकार मी वाचलेल्या गझलांमध्ये सहसा दिसलेला नाही.

आपल्याला अभिप्रेत असलेल्या अर्थात चार विधाने आहेत.

१. अबोला दीर्घ झाला आहे.

२. त्यामुळे गैरसमज निर्माण होत आहेत.

३. त्यामुळे घराच्या काचांवर जसे धुके जमते तसे मनावर धुके जमत आहे.

४. ते धुके अंधारत आहे.

इतका कल्पनाविलास वाचकाने / रसिकाने / श्रोत्याने करावा असे मला वाटत नाही. आपल्याला काय वाटते??

माझ्यासारख्याला पडणारा प्रश्न म्हणजे धुक्याच्या शेरात 'घराच्या' ऐवजी 'मनाच्या स्वच्छ काचांवर' असे घेतल्यास काय फरक पडतो? >>
मीही आधी हाच विचार केला होता... पण मनाच्या काचा असा विचार करण्यापेक्षा, घराच्या काचा असा logical अर्थ निघालेला बरा.. आणि मला तरी त्यात काहीच वावगे वाटले नाही...


गोटीबंद शेरांनाही एकापेक्षा अधिक अर्थ असू शकतात.
>>
त्यासाठी तेवढा प्रतिभाशाली गझलकार हवा... कारण शेर गोटीबंदही हवा आणि अनेकार्थीही!! हे सातत्याने जमायला हवे तरच गझल आणि गझलकार दोघेही बहरतात असे मला वाटते.. मी तेवढा पारंगत नाही अजून... त्यामुळे अनुभवातूनच माझी मते बनत किंवा बदलतही जातील... तेवढा वेळ द्यायला मी तयार आहे...


माझं असं प्रामाणिक मत आहे, की गझलेचा प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता असते हे कितीही खरं असलं, तरी प्रत्येक शेराला स्वतःची ओळख असते हे जास्त बरोबर आहे. मग ती ओळख म्हणजे एक कविता असेल किंवा गोटीबंद पण थेट पोचणारा एकच अर्थ असेल.>>> हे अधिक विस्ताराने सांगावेत. लक्षात आले नाही.

हेही त्यातलेच एक मत... सध्या पटले आहे.. सविस्तर लिहीता येत नाही... आणि कळलेला मुद्दा पटवता आला नाही तर मुद्दा कुचकामी होतो असे नाहीच... क्षमस्व..

I m just enjoying writing, reading gazals... इतरांच्याही गझल वाचतोय, निरखतोय.. इथे हे असे असे करता आले असते, हा शेर असा झाला असता तर? इ प्रश्न पडताहेत, त्यांची उत्तरे स्वतः शोधतोय...i think that's the very nice process of self-learning... चुकत असेन तर आपल्यासारखे आहेतच... गझलांमध्ये कालांतराने होणारा qualitative बदल ही त्या learning process च्या निकालाची ग्वाही असते असं मला वाटतं...
(शब्दबंबाळ, निरर्थक वाटलं असेल तर थांबतो. पण गझलेचे तंत्र शिकवता येते, गझल नाही याबद्दल आपणही सहमत व्हाल ही खात्री आहे!) Happy

वरील प्रतिसाद पोस्टल्यावर हा पाहिला -

अबोला फार दिवसांचा तुझा हा अन् तिथे माझ्या-
घराच्या स्वच्छ काचांवर धुके अंधारले होते >>>
बेफिकीर, फार सरळ शेर आहे हो!!
कल्पनाविलास नाही करावा लागत!!!
अबोला, धुके अंधारणे, हा, तिथे, स्वच्छ काचा, हे सगळे शब्द परिणामकारक आहेत!!!
आता तर मला ही खात्री होऊ लागली आहे, की यातला प्रत्येक शब्द आपापली जागा सांभाळून आहे.. तो शेर यापेक्षाही अधिक चांगला होऊ शकला असता हे मान्य!
पण एखादा शेर नसेल पोचला आपल्याला, ठीक आहे ना!!!

थांबू नका आनंदयात्री, मस्त लिहिता आहात.

काही वेळा चर्चा फायद्याच्या होतात याचे उदाहरण तर दिसतेच आहे इथे!

कारण आपल्या चर्चेतून एक नवीन मुद्दा आलाच!

'शेर वाचून त्यात न सांगीतलेले संदर्भही लक्षात यावेत इतकी मराठी गझल मुरली आहे की नाही'

(म्हणजे, उर्दूत जसे गुल, बुलबुल, सय्याद म्हंटले की एक कहाणी डोळ्यासमोर येते तितके मराठीत झाले आहे की नाही हा मुद्दा!)

बोलत राहू!

बाकी, कुणाला सांभाळुन घेण्याच्या पात्रतेचा मी नाहीच, पण मला फक्त चर्चा करायची आहे हे काही वेळा काहींना पटलेले नाही. हे वाक्य आपल्याला उद्देशून नाही यावर विश्वास ठेवावात.

धन्यवाद!

पुढच्या गझलेच्या प्रतीक्षेत!

-'बेफिकीर'!

थांबू नका आनंदयात्री, मस्त लिहिता आहात.

काही वेळा चर्चा फायद्याच्या होतात याचे उदाहरण तर दिसतेच आहे इथे!

कारण आपल्या चर्चेतून एक नवीन मुद्दा आलाच!

'शेर वाचून त्यात न सांगीतलेले संदर्भही लक्षात यावेत इतकी मराठी गझल मुरली आहे की नाही'

(म्हणजे, उर्दूत जसे गुल, बुलबुल, सय्याद म्हंटले की एक कहाणी डोळ्यासमोर येते तितके मराठीत झाले आहे की नाही हा मुद्दा!)

बोलत राहू!

बाकी, कुणाला सांभाळुन घेण्याच्या पात्रतेचा मी नाहीच, पण मला फक्त चर्चा करायची आहे हे काही वेळा काहींना पटलेले नाही. हे वाक्य आपल्याला उद्देशून नाही यावर विश्वास ठेवावात.

धन्यवाद!

पुढच्या गझलेच्या प्रतीक्षेत!

-'बेफिकीर'!

नचिकेत आणि भूषणजी,

अशा चर्चांमधून माझ्यासारख्या नवशिक्यांना खूपच शिकायला मिळते त्यामुळे आपल्या दोघांचेही धन्यवाद!! कोणतीही चर्चा ताणून वाद पर्सनल लेव्हलवर नेण्यात काहीच साध्य होत नाही. सर्व गोष्टी सामोपचाराने सुटू शकतात असा माझा नेहमीचाच विश्वास आहे. Happy

प्रतिसाद आगाऊ वाटला असल्यास क्षमस्व!!

निश्चिंत रहा विजयजी... मी वाद का, कशावर घालायचा हे (माझ्यामते :)) जाणतो आणि कधी सोडून द्यायचा हेही... एका मर्यादेच्या बाहेर आपण कोणाचीही मते बदलू शकत नाही...सामोपचाराने भांडणे सोडवायची असतात, चर्चा नव्हेत. चर्चा घडवली जाते, भांडणे सोडवली जातात.. चर्चा कशासाठी करतो आहोत हे दोन्ही बाजूंना नक्की माहित असेल तर प्रश्न येतच नाहीत... अर्थात अनावश्यक वादात न पडण्याची खबरदारी मी यापुढेही घेईनच... म्हणजे personal वर काहीच येणार नाही.. Happy

मस्त गझल. शेवटचे पाच शेर छान भिडले.
गंमत म्हणजे अंधार आणि मनोरे खूप आवडले.

अबोला फार दिवसांचा तुझा हा अन् तिथे माझ्या-
घराच्या स्वच्छ काचांवर धुके अंधारले होते >>>
येथे-
अबोला फार दिवसांचा तुझा हा अन् इथे
स्वच्छ काचांवर धुकेसे पसरले होते >>>असे लिहिल्यास कसे वाटेल?

एक शंका-
एकदा तुझे आल्यानंतर, तुम्ही म्हणणे ठीक आहे का?
" तेथे तर मनोरे श्वासांचेच बांधले जात होते " असा बदल केला तर?

अलकाताई,
अबोला फार दिवसांचा तुझा हा अन् इथे
स्वच्छ काचांवर धुकेसे पसरले होते
>>>
ल गा गा गा * ४ हे वृत्त आहे... त्यामुळे हे नाही जमणार.

एकदा तुझे आल्यानंतर, तुम्ही म्हणणे ठीक आहे का?

हे असे कुठे आढळले??

" तेथे तर मनोरे श्वासांचेच बांधले जात होते " असा बदल केला तर?

>>> वृत्ताचा problem होईल...

Pages