रत्ननगरी "रत्नागिरी" – (८) श्री महाकाली (आडिवरे)

Submitted by जिप्सी on 28 December, 2010 - 23:17

=================================================
=================================================
आजच्या रत्नागिरी सफरीत आपण आज भेट देणार आहोत ते कोल्हापुरच्या अंबाबाईप्रमाणे महत्त्व असलेल्या आडिवर्‍याच्या श्री महाकाली मंदिराला. (सदर फोटो माझ्या दोन वर्षापूर्वीच्या रत्नागिरी भटकंतीतले आहेत. महाराष्ट्रातील थोड्याशा अपरीचित अशा या ठिकाणांची माहिती व्हावी म्हणुन पुन्हा या चित्रमालिकेत देत आहे.)
=================================================
कोकण म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो तो हिरवा निसर्ग, फेसाळणारा समुद्र, नारळी-पोफळीच्या बागा आणि त्यातून जाणारी लाल मातीची पायवाट, कौलारू घरे व त्यातील अगत्यशील माणसे. असे हे कोकण अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे येथील जागृत देवस्थाने, सुबक मंदिरे आणि देवदेवतांच्या थक्क करणार्‍या आख्यायिकांकरीता. काही परिचित तर बरीचशी अपरिचित अशी हि देवस्थाने. असेच एक ऐतिहासिक परंपरा लाभलेले एक देवस्थान म्हणजे आजच्या आपल्या भेटीचे ठिकाण आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर.

कोल्हापुरच्या अंबाबाईप्रमाणे महत्त्व असलेले व आडिवरे गावचे भूषण असेलेले श्री महाकाली मंदिर हे रत्नागिरीपासून ३४ किमी आणि राजापुरपासून २८ किमी अंतरावर आहे. महाकाली देवस्थान हे राजापुर
तालुक्यातील जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. धार्मिक संचित असलेले हे ठिकाण येथील सुंदर निसर्गसौंदर्यामुळे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे.

आडीवरे या गावात श्री महाकाली यांचे आगमन कसे झाले या संबंधी मंदिराच्या पुजार्‍यांनी एक दंतकथा सांगितली ती अशी कि, सुमारे बाराशे वर्षापूर्वी भंडारी ज्ञातीचे लोक वेत्ये या त्यांच्या समुद्राकाठच्या गावी
नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचे जाळे अडकून पडले. बरेच प्रयत्न करूनही जाळे वर येईना तेंव्हा त्यांनी जलदेवतेची करूणा भाकली. त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने
दृष्टांत दिला "मी महाकाली आहे, तू मल वर घे आणि माझी स्थापना कर". त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी जाळे ओढले असता त्यांना काळ्या पाषाणातील श्री महाकालीची मूर्ती सापडली व त्यांनी दृष्टांताप्रमाणे सर्वांना मध्यवर्ती अशा "वाडापेठ" येथे देवीची स्थापना केली.

(श्री महासरस्वती)

मंदीरात महाकालीसमोर उत्तरेस श्री महासरस्वती तर उजव्या बाजुस श्री महालक्ष्मीची स्थापना केली आहे. मंदिर परिसरातच उजव्या बाजुला योगेश्वरी, प्राकारात नगरेश्वर व रवळनाथ मंदिर आहे. देवीचे दर्शन
घेताना सर्वप्रथम परिसरातील नगरेश्वराचे दर्शन प्रथम घ्यावे, त्यानंतर श्री देवी महालक्ष्मी, श्री देव रवळनाथ आणि त्यानंतर श्री महाकाली आणि महासरस्वतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या संपुर्ण
परिसराला महाकाली पंचायतन असेही म्हणतात. कोकणातील इतर देवालयांप्रमाणेच श्री महाकालीचे मंदिरहि कौलारू आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असून श्री महाकालीची मूर्ती हि अतिशय आकर्षक व सुंदर आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. अशा या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामींनी भेट देऊन महाकालीचे दर्शन घेतल्याचे पुरावे सापडतात.

दरवर्षी विजयादशमीमध्ये नवरात्रौत्सव साजरा केला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसाच्या कालावधीत यात्रा भरते आणि भाविकांचे पाय आडिवरेकडे वळतात. उत्सव काळात देवीला
वस्त्रालंकारांनी देवीला विभुषित केले जाते. दहाव्या दिवशी दसरा होतो. याच काळात दैनंदिन कार्यक्रमांबरोबर पालखी सोहळा, सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

सध्याच्या धकाधकिच्या जीवनात आपण काही विरंगुळ्याचे क्षण आपण नेहमी शोधत असतो. निर्मळ आणि मनसोक्त आनंद देणारे क्षण आपल्याला पर्यटनातून हमखास मिळतात. अशा या जागृत देवस्थानाला व
नितांत सुंदर परिसराला एकदा अवश्य भेट द्या आणि पर्यटन व तीर्थटन या दोन्हीचा लाभ घ्या.

परिसरातील इतर काही ठिकाणेः
श्री महाकालीचे माहेर वेत्येः महाकालीच्या पश्चिमेस वसलेले वेत्ये गाव हे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. वेत्येच्या समुद्रकिनारी काही वर्षापासून सुरूची लागवड करण्यात आली आहे तसेच वेत्ये खाडीमध्ये नौकाविहारासाठी व पोहण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा आहे.

कशेळीचा श्री कनकादित्य (सूर्यमंदिर), पूर्णगडचा किल्ला, माडबनचा समुद्रकिनारा, गणेशगुळ्याचा गणपती आणि तेथील रम्य समुद्रकिनारा, सुरूच्या बनातील भाट्ये बीच आणि नारळ संशोधन केंद्र. भाट्ये आणि पूर्णगड खाडीवर पूल झाल्याने रत्नागिरी शहरापासून जवळ अशी हि धार्मिक आणि पर्यटन स्थळे. रत्नागिरी - राजापुर मार्गावर एकापाठोपाठ एक येणारी हि ठिकाणे एका दिवसात सहज पाहता येतात.

माडबन येथील नयनरम्य समुद्रकिनारा (सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडलेला)
जायचे कसेः
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी किंवा राजापुर येथे यावे.
रत्नागिरी पासून अंतर - रत्नागिरी, पावस, गावखडी, पूर्णगड, कशेळी, आडीवरे ( ३४ किमी)
राजापुर पासून अंतर - धारतळे, आडीवरे ( २८ किमी)
=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)=================================================

गुलमोहर: 

रत्ननगरी "रत्नागिरी" – (१) गणपतीपुळे, गणेशगुळे आणि भंडारपुळे
http://www.maayboli.com/node/22045

रत्ननगरी "रत्नागिरी" – (२) श्री क्षेत्र मार्लेश्वर
http://www.maayboli.com/node/22073

रत्ननगरी "रत्नागिरी" – (३) प्राचीन कोकण–एक अनोखे म्युझियम
http://www.maayboli.com/node/22107

रत्ननगरी "रत्नागिरी" – (४) डेरवणची शिवसृष्टी
http://www.maayboli.com/node/22137

रत्ननगरी "रत्नागिरी" – (५) रत्नदुर्ग किल्ला
http://www.maayboli.com/node/22164

रत्ननगरी "रत्नागिरी" – (६) थिबा पॅलेस, पावस, भाट्ये समुद्रकिनारा
http://www.maayboli.com/node/22195

रत्ननगरी "रत्नागिरी" – (७) कशेळीचा श्री कनकादित्य
http://www.maayboli.com/node/22224

योगेश मेजवानी आहे रे... डोळ्यांसाठी Happy
माडबनचा समुद्र किनारा एकदम छान आणि स्वच्छ आहे नं.

प्रतिसादाबद्दल धन्स Happy
काय शांत आणि स्वच्छ समुद्र किनारा आहे.>>>>हो पण सध्या अणुउर्जा प्रकल्पामुळे अशांत झालेला Sad

मस्त Happy

मस्त...

सुंदरच !
इथून जवळच [ मला वाटतं "हळसोली" नाव आहे त्या गावाचं] आर्यादेवीचंही छान पुरातन मंदिर आहे; मुंबई-पुण्याच्या बर्‍याच जणांच तें कुलदैवत आहे.
शिवाय नाट्याकडे जाणार्‍या रस्त्याने उजव्या बाजूला समुद्राकडे वळलं [ मला वाटतं गगनगिरी महाराजांचा मठ आहे त्या बाजूला] कीं कांही सुंदर, स्वच्छ वाळूचे किनारेही पहायला मिळतात.
मायबोलीकर सध्या बर्‍याच आठवणीना उजाळा द्यायचं काम करताहेत. धन्यवाद !

अरे वा...मस्त प्रचि Happy
श्री महाकाली आमची कुलदेवता आहे..दोन वर्षांपूर्वी जाण्याचा योग आला होता..
पुन्हा दर्शन करवुन दिल्याबद्दल खुप धन्स! Happy

मस्त Happy

इथून जवळच [ मला वाटतं "हळसोली" नाव आहे त्या गावाचं] आर्यादेवीचंही छान पुरातन मंदिर आहे; मुंबई-पुण्याच्या बर्‍याच जणांच तें कुलदैवत आहे.

देवीहसौळची आर्यादुर्गा म्हणून प्रसिद्ध आहे ते मंदीर.

आडिवर्‍याची महाकाली, आमची कुलदेवी. मंदिराच्या आवारात आमच्या पुर्वजांनी उभारलेलं तुळशी व्रुंदावन आहे.

राजापुर भागात धोपेश्वर नावाचा निसर्गसौंदर्याने नटलेला एक अत्यंत सुंदर परिसर आहे. जमल्यास आवर्जुन पहावा.

http://www.konkanonline.com/Ratnagiri/Dhutpapeshwar-Temple.html

मस्त Happy

<<देवीहसौळची आर्यादुर्गा म्हणून प्रसिद्ध आहे ते मंदीर.>>प्रज्ञारजी, अगदी बरोबर. मी हल्लीच भटकंतीत गेलो होतो तिथं पण नावात गल्लत झाली; माझी चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद.

हेदेवि च्या मंदिरात पण शिवाजी महाराज येऊन गेल्याचं ऐकल्यासारखं वाटतय ? >>> हेदवी नाही अम्या.. आडिवरेच्या महाकली मंदिरातच शिवाजी महाराज येवून गेल्याचा/ भेट दिल्याचा उल्लेख आहे Happy

जिप्सी, मस्त फोटो Happy

कृपया मला आडिवरे मंदिराचा पत्ता किंवा फोन नंबर द्यावा मी त्यांचा सदैव ऋणी राहेन माझा इमेल m_palande81@hotmail.com व मोबाईल ९८९२०७५३८८ आहे माहिती मिळाल्यास कळविणे...