रत्ननगरी "रत्नागिरी" – (७) कशेळीचा श्री कनकादित्य

Submitted by जिप्सी on 27 December, 2010 - 23:53

=================================================
=================================================
रत्नागिरीच्या आजच्या भटकंतीत आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील एकमेव अशा सूर्यनारायणाच्या मंदिराला. सदर फोटो माझ्या दोन वर्षापूर्वीच्या रत्नागिरी भटकंतीतले आहेत. महाराष्ट्रातील एकमेव आणि थोड्याशा अपरीचित अशा श्री कनकादित्याची माहिती व्हावी म्हणुन पुन्हा या चित्रमालिकेत देत आहे.
=================================================

कोकण जसे आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते प्रसिद्ध आहे ते तेथील सुबक मंदिरे आणि त्यांच्या गुढरम्य दंतकथांबद्दल. आज आपण भेटणार आहोत अशाच एका सुंदर सूर्यनारायणाच्या मंदिराला. कशेळी गावात असलेल्या श्री कनकादित्याला.

कशेळी गावचे भुषण असलेले श्री कनकादित्य मंदिर रत्नागिरिपासून ३२ आणि राजापुरपासून ३५ किमी अंतरावर आहे. आपल्या भारतात फार कमी सूर्यमंदिर आहेत. सौराष्ट्रात प्रभासपट्टण, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या भागात काही सूर्यमंदिर आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात राजापुर तालुक्यातील हे सर्वात मोठे देवालय गावच्या मध्यभागी विस्तिर्ण सपाट प्रदेशात बांधले आहे. या मंदिराला उज्ज्वल अशी ऐतिहासिक पार्श्वभुमी लाभली आहे. मंदिरात जी आदित्याची मूर्ती आहे ती सुमारे आठशे वर्षापूर्वी सोमनाथ नजिकच्या सूर्यमंदिरातून आणली गेली आहे.

श्री कनकादित्य

कशेळी गावात या मूर्तीचे आगमन कसे झाले याबद्दल मंदिराच्या पुजारींनी एक दंतकथा सांगितली ती अशी की, काठेवाडीतील वेटावळ बंदरातून एक नावाडी आपला माल घेऊन दक्षिणेकडे चालला होता. त्याच्या जहाजामध्ये हि आदित्याची मूर्ती होती. जहाज कशेळी गावच्या समुद्रकिनारी आले असता अचानक थांबले. खूप प्रयत्न केला पण जहाज मागेही जाईना आणि पुढेही जाईना. शेवटी नावाड्याच्या मनात आले कि जहाजात जी आदित्याची मूर्ती आहे तिला इथेच स्थायिक होण्याची इच्छा दिसते. मग त्याने ती मूर्ती कशेळीच्या समुद्रकिनारी असलेल्या एका नैसर्गिक गुहेत आणून ठेवली आणि काय आश्चर्य! बंद पडलेले ते जहाज लगेचच चालू झाले. कशेळी गावात पूर्वी कनका नावाची एक थोर सूर्योपासक गणिका राहत होती. एकदा तिच्या स्वप्नात सूर्यनारायणाने येऊन सांगितले की मी समुद्रकिनारी एका गुहेत आहे तु मला गावात नेऊन माझी स्थापना कर. कनकेने हि हकिकत गावात सांगितली. गावकर्‍यांनी समुद्रावर जाऊन शोध घेतला असता आदित्याची हि मूर्ती गुहेत सापडली. पुढे कनकेने गावकर्‍यांच्या मदतीने मंदिर बांधून तीची स्थापना केली. कनकेच्या नावावरुनच या मंदिराला "कनकादित्य" आणि ज्या गुहेत आदित्याची हि मूर्ती सापडली ती गुहा "देवाची खोली" म्हणून ओळखली जाते.

रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक व पुरातन महत्त्व असलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी देशातील विविध भागातून लोक येतात. चारही बाजुला भक्कम चिरेबंदी असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात इतर देवदेवतांचीही सुबक मंदिरे आहेत. कोकणातील इतर देवलयाप्रमाणेच श्री कनकादित्यचे मंदिरही कौलारू आहे. मंदिर परिसरातील दीपमाळा, फरसबंदी पटांगण, शांत वातावरण यामुळे मंदिर पाहताक्षणी मन प्रसन्न होते. मंदिरात कोरीव कलाकुसर केली असून ते पुराणकालीन आहे. छतावर वेगवेगळ्या देवीदेवतांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर असून श्री कनकादित्याची मूर्ती हि अतिशय आकर्षक आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून देवस्थानच्या भक्तनिवासात राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते.

पन्हाळगडाचा राजा शिलाहार याने कशेळी गावात दररोज बारा ब्राह्मणांना भोजन घालण्यासाठी येनाऱ्या खर्चाकरीता गोविंद भट भागवतांना कशेळी गाव इनाम दिला. त्याबद्दलचा ताम्रपट आजही मंदिरात पाहवयास मिळतो. गोविंद भट श्री कनकादित्याचे पुजारी होते. आजही श्री कनकादित्याच्या पुजेचा मान त्यांच्या घराण्याला दिला जातो. अशा या पुरातन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिल्याचे सांगितले जाते. तसेच इतिहासाचार्य राजवाडे, महोपध्याय दत्तो वामन पोतदार, प्राध्यापक गंगाधर गाडगीळ, माधव गडकरी यांचीही श्री कनकादित्यावर श्रद्धा होती. दरवर्षी रथसप्तमीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. पाच दिवस साजरा होणार्‍या या उत्सवाच्या काळात कालिकावाडी येथून कालिकादेवीला वाजत गाजत गावात आणून देविचा मुखवटा श्री कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो. कालिकादेवीबरोबर आडिवर्‍याची भगवती देवी हि तिची पाठराखीण म्हणून चार दिवस मुक्कामाला येथे येते. उत्सवाच्या काळात किर्तन, प्रवचन, आरती, पालखी याचे आयोजन केले जाते. मंदिराचे कामकाज पाहणारे बारा जणांचे विश्वस्त मंडळ या कार्यक्रमाचे चोख आयोजन करतात.

मंदिर परिसरात असलेली एक बैलगाडी

महाराष्ट्रातील एकमेव अशा या सूर्यनारायणाच्या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या.

जायचे कसेः
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी किंवा राजापुर येथे यावे.
रत्नागिरी पासून अंतर - रत्नागिरी, पावस, गावखडी, पूर्णगड, कशेळी (३2 किमी)
राजापुर पासून अंतर - धारतळे, आडीवरे, कशेळी (35 किमी)
=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)=================================================

गुलमोहर: 

रत्ननगरी "रत्नागिरी" – (१) गणपतीपुळे, गणेशगुळे आणि भंडारपुळे
http://www.maayboli.com/node/22045

रत्ननगरी "रत्नागिरी" – (२) श्री क्षेत्र मार्लेश्वर
http://www.maayboli.com/node/22073

रत्ननगरी "रत्नागिरी" – (३) प्राचीन कोकण–एक अनोखे म्युझियम
http://www.maayboli.com/node/22107

रत्ननगरी "रत्नागिरी" – (४) डेरवणची शिवसृष्टी
http://www.maayboli.com/node/22137

रत्ननगरी "रत्नागिरी" – (५) रत्नदुर्ग किल्ला
http://www.maayboli.com/node/22164

रत्ननगरी "रत्नागिरी" – (६) थिबा पॅलेस, पावस, भाट्ये समुद्रकिनारा
http://www.maayboli.com/node/22195

भुंग्याकडून ह्या मंदिराबद्दल नुकतच ऐकलं अन तुझ्या फोटोंमधून ते बघायला मिळालं. मंदीर खरोखर सुंदर आहे अन परीसर अगदी प्रसन्न. लवकरच बेत आखून आख्खा कोकण हाणावा असच वाटतं आहे. Happy

<<मंदीर खरोखर सुंदर आहे अन परीसर अगदी प्रसन्न. लवकरच बेत आखून आख्खा कोकण हाणावा असच वाटतं आहे. >> सूर्यकिरणानी या सूर्यमंदिराला भेट दिली नाही अजून ! Wink
कशेळीवरून जाणारा रत्नागिरी -पावस-राजापूर रस्ता अरूंद व चढ-उताराचा असल्याने लोक महामार्गानेच प्रवास करतात व त्यामुळे हे देऊळ वैशिष्ठ्यपूर्ण असूनही कांहीसं दुर्लक्षित राहिलं असावं. [हा रस्ता सागरी महामार्गाचा भाग म्हणून विकसित झाल्यावर या मंदिराचं महत्व खूपच वाढेल]. कांही वर्षांपूर्वी स्थानिक वर्तमानपत्रात याची सचित्र माहिती आली होती म्हणून मुद्दाम तिथं गेलो होतो व खूपच प्रभावित झालो होतो. आता अजूनही चांगली देखभाल होतेय असं आपल्या प्र.चिं.वरून जाणवतं.
पुनःप्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद.
[मला वाटतं सिंधुदूर्गातील परुळे गांवी असलेलं श्री आदिनारायण मंदिरही सूर्यमंदिरच असावं ].

कशेळीवरून जाणारा रत्नागिरी -पावस-राजापूर रस्ता अरूंद व चढ-उताराचा असल्याने लोक महामार्गानेच प्रवास करतात व त्यामुळे हे देऊळ वैशिष्ठ्यपूर्ण असूनही कांहीसं दुर्लक्षित राहिलं असावं.>>>>अनुमोदन.

कनकादित्याकडे जायच्या आधी (गावखडीकडून येताना) कशेळीत शिरल्यावर एक तसं फारशी वर्दळ नसलेलं मोठं देऊळ लागतं. त्याबद्दलही लिहा जरूर. फार सुंदर आहे मंदीर. आणि बांधकाम, परीसर म्हणाल तर कनकादित्यापेक्षा सुंदर वाटला मला.

आडिवर्‍याचे नव्हे. कशेळी गावातच आहे. मंदीर बहुतेक तरी लक्ष्मीनारायणाचे आहे. फारशी वर्दळ नसते तिथे. गावखडीकडून येऊन गावात शिरल्या शिरल्या पहिली एक वाडी संपली की मग आहे. पटकन दिसत नाही. देवळाच्या शेजारी हर्डीकर म्हणून एकांचे घर आहे जुने आणि मोठ्ठे. त्यांचा फणसाचे गरे, पापड इत्यादींचा व्यवसाय आहे.
उजव्या बाजूला रस्त्याला लागून खाली पायर्‍या जातात. सगळं जुनं चिर्‍याचं बांधकाम आहे. अगदी अंगण सुद्धा. दुर्दैवाने मी ३-४ वेळा जाऊनही फोटो काढायचा राहून गेलाय. आता कधी गेलेच तर फोटो काढून आणेन.
देवळाकडून रस्त्याने पुढे गेल्यावर एका ठिकाणी रस्ता उजवीकडे वळतो. त्या कॉर्नरला चिर्‍याचं एक मोठ्ठ नवीन बांधलेलं घर आहे. एकदम डेकोरेटिव्ह. बांधकाम होतानाच अप्रतिम दिसत होतं. आता पुरं झालं असणार. तिथे उजवीकडे वळून मग सरळ जायचं. बांधाचा रस्ता आहे तो संपला की उजव्या रस्त्याला लागायचं आणि थोडं पुढे गेलं की कनकादित्य. असं आहे.

हम्म्म्म, हे मात्र नजरेतुन सुटले. पुढच्या वेळेस नक्कीच. Happy
पुन्हा जायला काहितरी निमित्त पाहिजेच ना Wink

मी आधी जाऊ शकले तर मीच टाकेन फोटो. पण माझं जाणं गुहागरपर्यंतच होतं हल्ली. नाहीतर एकदम महाराष्ट्र-गोवा बॉर्डर.

जिप्सी, देवाच्या खोलीच्या ठिकाणचे फोटो नाही टाकले. एकदम जबरदस्त ठिकाण आहे. तिथे खाली गेला होतास का? ओहोटी असताना जाता येतं म्हणतात.

फोटो बी बी वर माहिती विचारतोय पण इथे पटकन उत्तरं नीलतील याची खात्री आहे Happy
मला २६ ते ३० जानेवारी कोकणात जायचेय
माझा प्लॅन - २६ ला सकाळी निघउन हरिहरेश्वर किंवा आजुबाजुला येखादे बिच असेल तर , ओवर नाईट @ हरिहरेश्वर
२७ ला सकाळी निघुन रत्नागिरी पर्यंत आणि रात्री गुहागर्/चिपळुण
२८/२९ गुहागर आणि ३० ला संध्याकाळी परत.

मला हवी असलेली नाहीती मुंबई ते हरिहरेश्वर , हरिहरेश्वर ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते गुहागर अंतर आणी रोड ची माहिती.
आवर्जुन भेट दिलिच पाह्जे अशा काही जागा
हरिहरेश्वर आणि गुहागर ला चांगली/बरी हॉटेल्स किंवा होम स्टे आहे का? जमल्यास कॉन्टॅक्ट डीटेल्स.

आणि मासे खायला कुठे कुठे थांबायचे .

धन्यवाद

योग्या किती भटकतोस ? पण भटकतोस त्याचा उपयोग मला झाला परवा तु सांगितलेले म्युझियम अप्रतिम होते. सगळ्यांना खुप आवडले. धन्स.
इथलेही फोटो सुंदर.

प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद Happy

तिथे खाली गेला होतास का? ओहोटी असताना जाता येतं म्हणतात.>>>>>ammi तेथे नाही जाता आले. Sad

अजय, एक-दोन दिवसात डिटेल्स देतो Happy

ह्या मंदिराबद्दल माहित नव्हते... माहिती बद्दल आभारी आहे... Happy

फोटोबद्दल काही बोलायला राहिलेले नाही... Lol

ह्या मंदिरासमोरील विहीर आणि त्यातील पाणी काढायचे ते बांबुचे साधन (जर मी चुकत नसेन तर मी ते त्याच मंदिरासमोर पाहीले होते) त्याचा फोटो नाहि काढला का?

ह्या मंदिरासमोरील विहीर आणि त्यातील पाणी काढायचे ते बांबुचे साधन (जर मी चुकत नसेन तर मी ते त्याच मंदिरासमोर पाहीले होते) त्याचा फोटो नाहि काढला का?>>>>>मोनाली, त्याच मंदिरासमोर आहे ती विहिर. कनकादित्याच्या मंदिर परिसरात नाहि, पण अशीच एक विहिर आडिवर्‍याला आहे. त्याचे काढले आहेत फोटो, घरी जाऊन करतो अपलोड. Happy

योगेश, ने अ फो.

खुप सुंदर मंदीर आहे हे. आम्ही दोन वर्षापुर्वी मे महिन्यात गेलो होतो.
मंदीरातील लाकडी छतावर देवतांच्या मुर्ती कोरल्या आहेत.

मोनाली त्या बांबुने पाणी काढायच्या साधनाला कोटबं म्हणतात.

मस्तच रे योगेश.... फोटो आणी माहीतीपण...माझ्या गावाच्या वाटेवर आहे हे मंदिर.. गावाला जाताना खूप वेळा गेलोय..
त्याबद्दलचा ताम्रपट आजही मंदिरात पाहवयास मिळतो >>>त्या ताम्रपटाचा फोटो नाही टाकलास? तेथील पुजार्‍यांना विचारल्यास, त्या ताम्रपटाचे मराठी भाषांतराची प्रत आपल्याला देतात. माझ्याकडे एक होती.
प्रचि ७ मधील सभामंडपाच्या छतावरचे नक्षीकाम कशेळी गावातील इ. ५-६ तील विद्यार्थी करतात आणी इतक्या सुंदर नक्षीकामासाठी त्यांना बाहेरील गावातील कामे पण मिळतात.

अवांतर -
महाराष्ट्रातील एकमेव अशा या सूर्यनारायणाच्या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या>>>> कोकणातच अजुन एक सुर्यनारायणाचे मंदिर आहे. संगमेश्वर तालुक्यात आंबव (पोंक्षे) गावी असेच एक सुर्यनारायणाचे मंदिर आहे. माझ्याकडे त्याचे फोटो आहेत. जमल्यास टाकतो.

मंदीर फारच मोठ आणि प्रशस्त आहे.
कोकणातली बहुतेक सर्व मंदिरे अशीच प्रशस्त, शांत व स्वच्छ असतात. आमच्या लहानपणी दुपारच्या वेळी उन्हाळ्यात मंदिरांमधे आणि आजुबाजुच्या परिसरामधे खेळायला खूप मजा यायचि. लहानपणीच्या आठवणीने "मन ऊचंबळून येणे" म्ह्नणजे काय ते कळते.
जिप्सी तुम्ही आम्हा मायबोलिकरांना हा जो आनंद देताय त्याला तोड नाहि.

अरे वा!!
मी कशेळी म्हटलं आणि खरंच फोटो हजर!!! Happy

आता मात्र खरंच धन्स!

पुढच्या ट्रिपला अजून काही निमित्त...
१. खुद्द रत्नागिरील शहरातलं पतितपावन मंदीर. तिथे गेल्यावर स्वा. सावरकर आणि हे देऊळ यांची माहिती देणारी डॉक्युमेंट्री जरूर बघा(स्मारकाची वेळ बघावी लागेल, ते देवळाजवळच आहे).
२. टिळक जन्मभूमी (वेळ आधी बघुन घ्यावी लागेल. बहुधा संध्याकाळी ५ ला बंद होते.)
३. शीळ चं धरण. जास्त डीटेल्स मलाही माहिती नाहित Sad
४. थिबा पॉईंटवरून खाली दिसतं ते कर्ला गाव. मी खूप लहानपणी गेलेय, पण तिथे शंकराचं देऊळ आहे. आणि बाइकवरून नुसतं फिरायला छान आहे. (तेव्हातरी होतं. छ्या!!! आता एकदा मलाच टूरिष्ट होउन माझ्याच गावाला भेट द्यायला हवी आहे! शेम शेम :हातपाय झाडून निषेध करणारी रडवी बाहुली:)
दिनेशदांनी सांगितलं तो काळा समुद्र (मांडवी) आणि पांढरा समुद्र (मिर्‍याबंदर च्या रस्ताला लागतो तो, आरे-वारे बीच नव्हे. फक्त पांढर्‍या समुद्रावर आता फिरायला म्हणून कोणी जात नाही. तो समुद्र खूप आत गेला कारण त्यातून खूप उपसा केलाय. शिवाय आता तिथे अन्त्यविधीसाठी वेगळी सोय केली आहे त्यामुळेही लोक जात नाहीत जास्त.)
हे छोटे छोटे स्पॉट्स आहेत, पण महत्त्वाचे.

गुहागरच्या अलिकडे मुंढर म्हणून गाव आहे. तिथे मामाचा गाव म्हणून कृषी पर्यटन केंद्र आहे. एकदा अनुभव घेण्यासारखं आहे. रहायची-जेवायची उत्तम सोय. आधी फोन करून बुकींगची चौकशी करा. फोनवरून बुकींग करून ठेवा. कोकण हॉलिडेज - 022-27467044 / 9773395010.
समीर साळवी - 9422690530, ९७६७८९८९९८
http://community.webshots.com/user/mamachagaon
लिंकमधे ४ रूम्स बद्दलच उल्लेख आहे पण १५-२० जणांचा ग्रुप असेल तर बोर्‍या बंदराजवळ त्यांचाच बंगला पण आहे. तिथे सगळी व्यवस्था ते करतात. ती जागा तर अप्रतिम आहे.

प्रज्ञा/नीधप धन्यवाद माहिती आणि लिकंबद्दल. Happy

पांढरा समुद्र (मिर्‍याबंदर च्या रस्ताला लागतो तो, आरे-वारे बीच नव्हे.>>>>मी तो पांढरा समुद्र आरेवारेचाच समजत होतो. Happy

ह्या मंदिरासमोरील विहीर आणि त्यातील पाणी काढायचे ते बांबुचे साधन (जर मी चुकत नसेन तर मी ते त्याच मंदिरासमोर पाहीले होते) त्याचा फोटो नाहि काढला का?

मोनाली त्या बांबुने पाणी काढायच्या साधनाला कोटबं म्हणतात.>>>>>>हे त्याचे फोटो. हे फोटो आडिवर्‍याचा महाकाली मंदिरातील आहे. Happy

मस्त आहे तिथे. आम्ही नेहमी तिथेच रहातो. तिथे जागा नसेल तर आबलोली ला सचिन कारेकर यांच्या इथेही चार रूम्स आहेत मस्त आहेत. नंबर थोड्या वेळाने टाकते विपु मधे.

Pages