फ़िर पुकारो मुझे.. फ़िर मेरा नाम लो...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

दोन आठवड्यापूर्वी मी पेडररोडवरच्या रशियन कॉन्स्युलेट जवळ असलेल्या कॉलेजलेनमधे गेले होते. काहीशी अचानक.

आणि काल न रहावून पुन्हा गेले.
मुद्दाम.

रशियन कॉन्स्युलेट बाहेरच्या बसस्टॉपला अगदी लागूनच ती लेन आहे. पेडर रोडवरच्या वर्दळीपासून आणि एकदंरीतच झगमगाटापासून ती अख्खी गल्ली इतकी अलिप्त कशी राहू शकलीय याचं आश्चर्य वाटण्याइतकी तिथे भर दिवसाही नि:स्त्बधता असते. गल्ली निरुंद आहे. दोन्ही बाजूंना काही जुनी विस्तारलेल्या, वेड्यावाकड्या खोडांची, तर काही नंतर सुशोभिकरणासाठी मुद्दाम लावलेली सुबक गुळगुळीत झाडं आहेत. गल्लीत शिरुन पायी चालताना खाली सोफ़िया कॉलेजपर्यंत गेलेल्या कोप-यावरुन वळलेल्या रस्त्यावरची दाट शांतता लोटालोटाने वर सरकत थेट तुमच्यापर्यंत येऊन पोचत रहाते.

तुझ्या लक्षात राहिल अशी फ़ेअरवेल पार्टी देतो तुला असं ऑफ़िसमधल्या जुन्या मित्राने मला त्या दोन आठवड्यांपूर्वी कधीतरी कबुल केलेलं. मी (एकदाची) चालले अशा खुशीत तो जरा जास्तच होता बहुधा. त्यामुळे नुसतं नेतो इतकंच म्हणून तो थांबला नव्हता तर आदल्याच दिवशी इतर सगळ्यांची मिळून JBTB मधे जोरदार पार्टी झाल्यावरही दुस-या दिवशी लक्षात ठेऊन ऑफ़िसमधून स्वत:च्या गाडीत घालून मला घेऊन गेला. कधी नव्हें ते त्याच्याकडून पार्टी मिळतेयच्या खुशीत मी सुद्धा कुठे वगैरेच्या भानगडीत पडले नव्हते.

गाडी पेडर रोडवरुन कॉन्स्युलेटच्या त्या टिपिकल फ़ॉर्मिडेबल पांढ-या रंगाच्या आणि काळ्या भक्कम लोखंडी गेटच्या इमारतीसमोर आली आणि मी बोलत असलेले वाक्य अर्धवट टाकत खिडकीतून बाहेर डोकावत तिकडे पहायला लागले. खूप वर्षांनी मुंबईत येऊन असं सलग रहाताना मला आता उगीचच कोणत्यातरी कोप-यावर, वळणावर नाहीतर इमारतींच्या कुंपणांवर विखरुन पडलेले आधीच्या वर्षांचे तुकडे गोळा करत रहाण्याचा नादच जडल्यासारखं झालय.
त्या काहीशा कुरुप चौकोनी इमारतीमधे नक्की कोणता तुकडा अडकून राहीलाय आता हे तपासायची संधीच न देता झपाट्याने राईट घेत ’माझ्या लक्षात राहील’ अशा त्या जागेवर मित्राने पोचवूनही टाकलं.
पोचल्यावर उतरताना समोर पाहीलं आणि निरवतेच्या लोटामागोमाग एक मोठाच देजाव्हूचा लोट गल्लीच्या दुस-या टोकापासून थेट माझ्यापर्यन्त वर चढत आला.
आणि समोरच ते अजस्त्र, पुरातन, सरळसोट पारंब्यांची तोरणं हवेत झुलवणारं वडाचं झाड होतं. त्याच्या काळसर हिरव्या पानांमधून खाली पाझरणारी ती गडद शांतता!
त्या लेनची ओळख जागवणारा हा एक मोठाच आठवणीचा तुकडा तर मनात जसाच्या तसा होता. होता खरा पण तो नुसताच अधांतरी तरंगत असणारा. समोरच्या लटकत्या पारंब्यांसारखा.
मागचे पुढचे काहीच संदर्भ त्या तुकड्याला चिकटून राहीलेले नव्हते.

"माहीतेय रे मला ही जागा. आलेय मी इथे आधी" न रहावून मित्राला म्हटल.
"शक्यच नाही."त्याचा इगो दुखावला बहुतेक. मुंबईत जन्मलेल्या माझ्याबद्दल त्याला बहुतेक जरा असूयाच होती आणि ती तो अशी आता मी इथे नसतानाच्या काळात मुंबई त्याने किती अंतर्बाह्य जाणून घेतलीय, माझ्यापेक्षाही जास्त हे दाखवायची एकही संधी न सोडून मधेच व्यक्त करत रहायचा.
"आलीही असशील या गल्लीत आधी कदाचित तु." तो नाईलाजाने म्हणाला. " पण इथे नाहीच."
"हल्लीच झालय हे. तु तिकडे असताना."

शक्य आहे. नव्हें तो म्हणत होता ते अगदी खरं होतं. अंडर द बेन्यान ट्री अशी पाटी लिहिलेलं ते ओपन इटालियन स्टाईल रेस्टॉरन्ट मी पहिल्यांदाच पहात होते. सुरेख होतं. तासनतास निवांत घालवत बसून रहावं असं शांत. मुंबईत तर अशी फारच कमी ठिकाणं सापडतात त्यामुळे अप्रुपाचं सुद्धा. थोडाफ़ार अगदी पूर्वीच्या पृथ्वी कॅफ़ेची आठवण यावी तसा ऍम्बियन्स.

कॉलेजातली काही पिझ्झा स्लाईस आणि कोक साठी येऊन गेलेली मुलंमुली सोडली तर त्या दुपारी तिथे अजिबात वर्दळ नव्हती. वडाच्या झाडाखाली टाकलेली दगडी बाकं, स्वच्छ बांधून काढलेली फ़रसबंद जमीन आणि अप्रतिम मेनू.
त्या दुपारचं तिथलं लंच बराच काळ लक्षात रहाण्यासारखंच होतं यात काहीच शंका नाही. जेवण झाल्यावरही हातात वॉटरमेलन मिन्ट कूलिंग घेऊन आम्ही तिथे उगीचच रेंगाळलो. एक टीनएजर मुलगा कसलंतरी कंट्रीम्युझिक गिटारवर वाजवत आजूबाजूला वावरत होता. रेस्टॉरन्टवाल्याचं आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट असावं. मित्र त्याला हिंदी गाणी येतात कां वाजवता विचारत होता. त्याने जरासं चाचपडत एक वाजवायला सुरुवात केली. मित्राने शिट्टीवर ताल धरला.
"कोणतं रे?"
"ओळख की तुच. सोप्प आहे." तो काहीच क्लू न देता म्हणाला. जुनं होतं. अगदी ओळखीचं होतं. पण शब्दच आठवेनात. मला आज सारखंच असं ओळखीच वाटतय पण ओळखू येत नाहीचं फ़ीलिंग कां येतय या विचाराने आता चांगलच अस्वस्थ वाटायला लागलेलं.
"तु बस ऐकत. मी जरा गल्लीच्या टोकापर्यंत चक्कर मारून येते." शेवटी मी न रहावून म्हटलं.
मला माझ्या देजाव्हूचा थांग लावल्याशिवाय चैन पडेना.

पिन्स ऍन्ड कोम्ब्ज ग्रो अलॉन्ग ऑन धिस रोड ऍन्ड सो डू फ़्यू ब्राऊन स्ट्रॉ हॅट्स... ज्योचे उतारावरुन वेगाने धावताना सुटून पडलेले केसांमधले आकडे,पिना गोळा करुन आणताना टेडी गमतीने म्हणाला होता तसं मलाही मिळतील काही तशाच वस्तू जुन्या इथे सांडून गेलेल्या असा काहीतरी मजेदार विचार तो समोरचा उतार बघताना मनात डोकावला आणि हसू आलं.

"अगं काही नाहीये पुढे. कॉलेज आणि मग स्टर्लिंग अपार्टमेन्ट. आणि मग सगळाच ट्रॅफ़िक. जाताना तिथूनच जावूयात हवं तर." मित्र.
पण मी उठलेच.
दुपार उलटून बराच वेळ झाला होता. नोव्हेंबरची अखेर होती. दिवस संपणारच होता अजून काही वेळानी. वडाच्या त्या प्रचंड गर्द विस्तारातून वरचं आकाश काही दिसत नव्हतं.
नसेना का. तसंही माझ्या आठवतय पण आठवत नाही चे कोणतेच तुकडे त्या वर आकाशात लटकत असण्याची शक्यता शून्य असं म्हणत पण तरी वरतीच बघत मी काही पावलं पुढे गेले. वडाची लाल फ़ळं खायला आलेली बरीचशी पाखरं इथे तिथे दिसत होती त्या वरच्या फ़ांद्यांवरुन उडताना त्यांच्यावर नजर ठेवत.
इतर काही नाही तर निदान यांची नावं तरी ओळखता येताहेत का बघू असाही एक विचार मनात. पीजीला ऍडमिशन घ्यायच्या आधीच्या एका वीकेन्डला कर्नाळ्याला शेवटचं बर्डवॉचिंग केलेलं. त्याला किती निदान सहा सात वर्षं लोटली की. आठ बहुतेक. मग आता कशाला नावं आठवताहेत.
असले जरासे खेदाचेच विचार करताना अचानक वरचा वडाच्या एकमेकांत गुंतलेल्या वेड्यावाकड्या काळपट रेघोट्यांचा विस्तारच पुसल्यासारखा दिसेनासा झाला आणि त्या जागी माथ्यावर आला एक कोवळ्या लालसर सोनेरी प्रकाशानी भरुन गेलेला घुमट.
मी चकित होऊन जागच्याजागीच थांबले.
मान वर गोल फ़िरवत तो घुमट न्याहाळला. चकचकीत लख्ख घासलेले तांब्याचे घंगाळ डोक्यावर कोणीतरी उलटे करुन ठेवले आहे आणि त्यातून ठिबकणा-या कोवळ्या हिरव्या प्रकाशाच्या थेंबांखाली आपण न्हाऊन निघतो आहोत असा काहीसा भास करुन देणारा खुलत्या सांजेचा उजेड चहुबाजूंनी त्या तेव्हढ्या गोलाकारात कोंदून राहीलेला. .
आठवणींचे तुकडे वरच्या आकाशातूनच टपटप डोक्यावर गळायला लागले.

गडद हिरव्या कडांची,आतल्या बाजूने चमकत्या तांब्याच्या रंगाच्या पानांची हीच कॅनोपी वर पसरलेली. कोणतं झाडं हे? मी कुणालातरी विचारतेय. इथेच या झाडाखाली उभं राहून. अचानक नजर वर गेल्यावर अशी आत्तासारखीच चकित झालेली मी. याला कॉपरटीचं झाड म्हणतात. बोलण्याच्या ओघात तिने दिलेलं उत्तर ऐकताच माझी अजूनच चकित झालेली नजर पाहून एकदम खजिल होत ’सॉरी कॉपरट्री म्हणायचं होतं मला’ असं जीभ चावत म्हणणारी ती. आणि नंतर अर्धा तास खो खो हसत बसलेले आम्ही. कोणत्याही आचरट गोष्टींवर पुन्हां पुन्हां आठवून हसण्याचेच ते दिवस.

मघासपासून घट्ट दडपून राहिलेल्या काळ्या पडद्यातून काही तुकडे प्रकाशायला लागले.
मी पाय उंचावत त्या कॉपरट्री मागच्या भिंतीकडे डोकावून पाहीलं. कॉलेजचं गर्ल्स हॉस्टेल. इथेच बाहेर रस्त्यावर मारलेल्या गप्पा. बहुतेक एकदोनदाच असणार. ती मग वळून तिथे आत गेली होती आणि आम्ही समोरच्या बसस्टॉपवर बस पकडून घरी. पावसाळा होता तो हेही स्पष्ट आठवलं. अगदी ती तिथली ओली हवा अंगाला लागण्याइतपत.
पण मैत्रिणीचं नाव? काय नावं तिचं. मला नावं आठवेना. बसमधून घरी जाताना ग्रूपमधे कोण कोण होतं? चेहरे,आवाज समोर दिसत होते काहींचे पण बाकी नाव-गाव तपशील शून्य.

वडाच्या झाडाखालच्या त्या दगडी बाकावर बसलेल्या गिटारवाल्याचं अजून तेच न ओळखता आलेलं गाणं वाजवणं चालू होतं. त्याचे सूर खालपर्यन्त येत होते.

मी दोन्हींचा नाद सोडत त्या तांबूस प्रकाशाच्या चौकोनामधून बाहेर पडत पुढे गेले. आणि पुढच्या उतारावर गल्ली एकदम संपल्यासारखीच झालेली. अर्ध्यावरच. पूर्वी बहुतेक ती अजून पुढे जायची आता समोर टॅक्सीज आणि कारपार्किंग. मग नंतर पेडररोडवरच्या आलिशान इमारतींचा पुंजका.
पुढे जायचा विचार नाईलाजाने सोडत मी मागे वळले. आठवणींचा माग अर्ध्यावरच राहील्याची चुटपुट मनात.
वळताना सोफ़िया कॉलेजच्या बाजूच्या चिंचोळ्या गॅलीमधून रशियन कॉन्स्ल्युलेटचा मागचा भाग दिसला. आवारातलं भलमोठं जंगली बदामाचं झाड. कडेचं फ़णसाचं झाड. दोन्हींना काहीच विशिष्ट ओळख नाही. मग कंपाऊंड वॉलपर्यन्त आले. समोर ऑडिटोरियमच्या काचेच्या खिडक्या दिसल्या आणि एकदम एक गंधच आला मनात. काहीसा उग्र, मस्टी. दमट. एसी सुरु करायच्या आधी बंद ऑडिटोरियममधे येतो तो वास. विशेषत: पावसाळ्यात. त्या वासाबरोबर कॉन्स्युलेटच्या आत लावलेली हसरी रशियन कुटुंबांची, गोजिरवाण्या मुलांची, तिथल्या शहरांची, त्यांच्या प्रगतीची खास कम्युनिस्ट स्टाईलमधली चित्र, फोटोग्राफ़्सही आठवले. आवारातला पहिल्या मजल्यावरचा प्रोजेक्शन हॉल.
त्या आठवणीबरोबर देजाव्हू पझलमधला एक तुकडा व्यवस्थितच सांधला गेला.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षात जॉईन केलेला फ़िल्मक्लब आणि या कॉन्स्युलेटमधे झालेला तो ऐन पावसाळ्यातला फ़िल्म-महोत्सव. कॉलेजातून शेवटची लेक्चर्स बुडवून काहीतरी अगदी महत्त्वाचं बघायला आल्याचा उत्साह. आणि मग त्या एका दिवसात पाहीलेल्या चार एकसे एक बोरिंग फ़िल्म्स. मग दुस-या दिवशी महोत्सवाला येऊन पहील्याच फ़िल्मनंतर मागच्या दारातून बाहेर पडून या गल्लीत वडाच्या झाडाखालच्या दाटगर्द विस्तारात भर पावसातही न भिजता उभं राहून दुपारभर केलेला टीपी आणि तिथल्याच चहाच्या स्टॉलवर अनेकदा प्यायलेला उकाळा.
ओ यस. त्या वडाच्या झाडाजवळ तेव्हां कोणतंतरी प्रोव्हिजन स्टोर होतं आणि त्याच्या बाहेर चहाची टपरी. त्याचंच रुपांतर झालय या सॉफ़िस्टिकेटेड UTBTमधे.
मला आता दुसरा मोठा तुकडा सांधल्याचा इतका आनंद झाला की आठवणींचं कोंडाळ उलगडत अगदी त्याच वर्षांत जाऊन पोचल्याच्या आनंदात परत वरच्या दिशेने जायला भरभर पावलंही उचलली.

तसाही खूपच उशिर झाला होता.
गल्लीच्या वरच्या टोकाकडून मित्राच्या हाका आता कानावर यायला लागल्या. ट्रॅफ़िक लागायच्या आत निघणं भाग होतं. गल्लीत आता अंधार दाटेल लवकरच आणि मग त्या अंधारात सापडले होते त्यापेक्षा काही जास्त तुकडे सापडण्याची काहीच शक्यता नव्हती.
तरी ती मुलगी कोण? ग्रूपमधले बाकीचे कडांवरचे अजून धूसर राहीलेले चेहरे कोणाचे? ते छोटे तुकडे संदर्भाशिवाय विस्कळीत विखरुनच रहात होते.
परतताना त्याच विचारांच्या तंद्रीत असतानाही मी गिटारवाल्याच्या त्या गाण्याच्या सूरातला अंतरा एकदम आठवून बरोबर पकडला आणि विजयी मुद्रेने मित्राकडे पाहीलं. आता मुखडा? आमचा जुना खेळ. पण मी आता तो अर्धवटच सोडला.
मला खरंतर काहीसं कंटाळायला झालं होतं.सापडलेत तेव्हढे सूर पुरेसे आहेत. अजून नाव-शब्द ओळ्खत बसण्यात काहीच अर्थ नाही असं वाटून.
घरी आल्यावर लक्षात आलं मित्राच्या ’लक्षात राहील अशा फ़ेअरवेलपार्टीच्या’ आनंदापेक्षा या धड लक्षातच नसलेल्या आठवणींच्या तुकड्यांची रुखरुखच मनात जास्त लक्षात राहीलेली आहे. आत्ताच्या माझ्या आयुष्यात त्यांना काहीच महत्त्व नसूनही. तसं कोणत्याच आठवणींना नसतं म्हणा. आणि माणसांपेक्षा, स्थळं, घटना, प्रसंग, इमारती अशा निर्जीव गोष्टीच मला सहजतेन आठवत असतात हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव काय मला माहीत नव्हता?

खूप वर्षांनी स्वत:च्या शहरात, स्वत:च्या घरात परतून आल्यावर सगळचं मागचं आयुष्य सहजतेनं आपल्याजवळ येऊन भिडतं असं होतंच नसतं कधी. ते असं तुकड्यांमधे विखरुन, हरवून, पसरूनच रहातं चोहोबाजूंना. मग ते दिसले तरी धावून गोळा करण्यात खूप एनर्जी खर्च करण्यात खरंच अर्थ नसतो. त्यांच मिळून होणारं चित्र अजिबातच आपल्या जुन्या घरासारखं, शहरासारखं, आयुष्यासारखं नसतं हे असे कित्येक तुकडे वेचून एकत्र केल्यावर आणि मग पुन्हां टाकून दिल्यावर हताशपणे लक्षात येतं.
कोणीतरी म्हणालेलं कितीही सिनिकल असलं तरी किती खरं आहे! Yu can never go home again!

म्हणूनच त्या दोन आठवड्यांनंतर वेळ मिळाल्यावर आज परत तिथे जाऊन आले.
उगीचच.
त्यादिवशी न सापडलेलं काहीच शोधलं नाही.
मुद्दाम.
आणि मग हे लिहावसं वाटलं.
तेही उगीचच.

--

विषय: 
प्रकार: 

आणि मग हे लिहावसं वाटलं.
तेही उगीचच
>>>
मस्त.. अजुन एक आवडलं म्हणजे अश्या विषयातला लेखांमध्ये येणार्‍या त्याच त्या उपमा कुठेही वापरल्या नाहीस. (उदा: 'कॅलिडोस्कोपमधल्या आकृत्यांसारखे आठवणींचे तुकडे मनात उचंबळुन आले' इ.इ. फोनी उपमा Happy )

अप्रतिम.. Happy
अगदी आपणच तिथे जाऊन, ते क्षण जगून आल्याचा अनुभव देणारा लेख!
मस्त..

सुरेख लिखाण...

सुरेखच !

    ***
    उसके दुश्मन हैं बहुत
    आदमी अच्छा होगा

    सुरेख टुलिप.
    ही अशी खंत दुखावते अन सुखावतेही.
    पुन्हा तिथं गेलो तरी 'तिथं' आपण पोहोचू, अशी अजिबात खात्री नसते.
    मन मात्र जात राहतं तिथं. उगीचच.

    --
    .. नाही चिरा, नाही पणती.

    सुरेख लिहिलस ट्यु! साजिराला मोदक.
    तुझं लेखन वाचतांना सर्व विसरून जायला होतं. असं वाटतं, समुद्रकिनारी बसलो आहोत गारव्याला लपेटून आणि एक एक लाट संथपणे येउन पायाशी खेळत्येय..

    छान लिहिलंयस ट्युलिप. आवडलं.

    मस्तच. नेहमीसारखंच. शेवटचा एक पॅरा वाचायचा राहिलाय अजून. पण चांगलाच असणार ह्यात वाद नाही.

    खुपच छान!! Happy

    >>चेहरे,आवाज समोर दिसत होते काहींचे पण बाकी नाव-गाव तपशील शून्य.>>
    हे असलं माझ्या बाबतीत पण बरेचदा होतं. अन मग ते शोधताना बरेचदा छानसं काहीतरी सापडुन जातं.

    सुरेख ....

    खूप वर्षांनी स्वत:च्या शहरात, स्वत:च्या घरात परतून आल्यावर सगळचं मागचं आयुष्य सहजतेनं आपल्याजवळ येऊन भिडतं असं होतंच नसतं कधी. >> अस काहीतरी लिहितेस ......

    मस्त ग ट्युलिप. खूप छान!

    खूप छान लिहिलं आहे. (मला एकदा तुझे याआधीचे लेखही निवांत परत वाचायचे आहेत.)

    छान लिहिलंस नेहेमीसारखंच.

    गाणं कुठलं होतं ते ? jbtb म्हन्जे ?

    jbtb म्हन्जे ? >> Jazz By The Bay ग.
    UTBT : Under The Banyan Tree. (त. टि. : जाने तुम आवडला नसेल तर इथे जाऊ नये. भारी यंग crowd असतो, उगाच करकरीत संध्याकाळी येणारे feeling येईल. :D)

    ट्यु, हि तीच जागा ना जिथे आधी एक दुकान होते कसलंतरी ज्याला sophia चा कट्टा म्हणत ?

    सुरेख लिहिलयस ट्यु.
    आणि
    >>>>>>>>
    कोणीतरी म्हणालेलं कितीही सिनिकल असलं तरी किती खरं आहे! Yu can never go home again!
    >>>>>>>>

    हे किती खरं आहे! आपल्या मनात आणि आठवणींत आपलं घर किंवा आवडलेल्या इमारती, स्थळं, त्यांच्याशी संलग्न गोष्टी जशा जपल्या असतात तश्या त्या काही काळाने, प्रत्यक्ष भेटीत सामोर्‍या येत नाहीत. अगदी ती स्थळं तशीच असली तरी त्याच्याशी संबंधित व्यक्ती, प्रसंग सगळे विखुरलेले असतात. आणि मनात त्या आठवणी तशाच जपून नवीन संदर्भ शोधणं हेच हातात राहातं.

    ट्युलीप.... एकदम श्रावणझडीसारखं कसं लिहायला जमतं तुला?
    त्या कॉपरटीचं... अतिशय अतिशय सुंदर... 'वर्णन' असा शब्दं टाइपला आणि खोडलाही... इतकं आंखो देखाच काय पण सुना, खाया, पिया... वाल्या 'बात'ला असलं वर्णन्-बिर्णन म्हणायला कायतरीच वाट्टं.

    टचींग....
    Yu can never go home again! अगदी खरं.
    देजावू चा इतका सुंदर फील यापुर्वी वाचनात कधीच आला नव्हता.
    *************************************************************
    द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

    छान लिहलय गं..............
    मला पासुन आवडले...

    ~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
    दिसलीस तू, फुलले ॠतू

    सही...... अगदी सही Happy
    ********************************************
    The trouble with being punctual is that, no one is there to appreciate it!!

    खुप आवड्ले..........

    आनेवाला पल जानेवाला हे

    वा उत्तम , जुन्या पिढीतला लघुनिबंध वाचल्याचा प्रसन्न फील आला

    ---------हितगुज दॅट इ़ज....
    पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
    गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

    ट्यू, सुरेख! Happy

    ट्यू
    नेहेमीप्रमाणे खूप सुंदर लिहिलयंस. आणि लिट्ल विमेन्(चौघीजणीमधला) मधला ज्यो आणि टेडीबद्दलचा उल्लेख इतका चपखल ........!
    एकदम मन भूतकाळात गेले. कित्येक वर्षापूर्वी (पहिल्यांदा) वाचलेलं हे पुस्तक अगदी बारिक सारिक डीटेल्ससह मनात घर करून आहे. खूप नॉस्टॅल्जिक वाटलं!

    ट्यूलिप, तुझं लेखन मला खूप आवडतं.. पहिल्या दोन चार ओळीतच वाचणार्‍याला अलगद तुझ्या दुनियेत नेतेस.. आणि अजून पुढे ..अजून पुढे ..जावं असं वाटत असतानाच परतावं लागतं.. पण त्यातच खरी गंमत आहे..
    खूप खूप मस्त!! आणि ते माणसांपेक्षा निर्जीव वस्तू ...वगैरे अगदी पटलं बरं! Happy
    ---------------------------------------------------------------------------
    ऊन सावलीच्या परी कधी नकोसं हवंसं..

    खुप छान...
    --------------------------------------------------------------------
    ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
    अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
    रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
    धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

    Pages